ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय ॥ अकोटाचे शेजारीं । मुंडगांव नामें एक नगरीं । तेथें बायजा नामें खरी । समर्थांची भक्तीण असे ॥१॥ हळदी माळ्याच्या वंशांत । इचा जन्म झाला सत्य । शिवराम नामें इचा तात । भुलाबाई जननी असे ॥२॥ बायजा आली तारूण्यांत । गर्भाधान करण्याप्रत । घेऊन गेला तिचा तात । जामाताच्या गृहासी ॥३॥ परी उपयोग नाहीं झाला । जामात षंढ होता भला । तेणें जनकजननीला । शोक झाला अनावर ॥४॥ भुलाई म्हणे पतीसी । चला जाऊं शेगावांसी । महाराजातें पुसायासी । पुढील भाकीत बायजेचें ॥५॥ तें मानलें शिवरामासी । आला घेऊन कन्येसी । महाराजांतें पुसायासी । आपुल्या त्या कांतेसह ॥६॥ बायजा घातली पायांवर । केली विनंति जोडून कर । कृपा करा या मुलीवर । पुत्र पौत्र द्यावे हिला ॥७॥ तें समर्थांनीं ऐकिलें । शिवरामासी हांसत वदले । अरे नशिबीं नाहीं लिहिलें । विधात्यानें पुत्र हिच्या ॥८॥ तें ऐकतां शिवरामाला । अनावर शोक झाला । घेऊन त्या बायजाला । परत आला मुंडगांवी ॥९॥ परी त्या समर्थवचनांनी । बायजा आनंदली मनीं । निष्ठा गजाननाच्या चरणीं । जडली तेव्हांपासून ॥१०॥ समर्थांचा एक भक्त । पुंडलीक नामें मुंडगांवांत । त्याच्या संगें शेगांवांत । बायजा येऊं लागली ॥११॥ पहिल्या प्रथम अडथळा । जननीजनकें नाहीं केला । शेगांवांस जाण्याला । पुंडलीकाचे बरोबर ॥१२॥ त्यांना ऐसें वाटलें । साधुचरण इनें धरिलें । तेच तिच्या करतील भले । निजकृपेने कल्याणा ॥१३॥ पुरुषत्व देतील जामातासी । अशक्य ना कांहीं संतांसी । ऐसा विचार मानसीं । करून राहिले स्वस्थ ते ॥१४॥ पुंडलीकाचे बरोबरी । बायजा जाऊं लागली खरी । तेणें पुकार जगभरी । ऐशा रीतिं जाहली ॥१५॥ हें शेगांवच्या वारीचें । ढोंग आहे दोघांचें । तरुणपणीं मानवाचें । मन परमार्थी लागेना ॥१६॥ या दोघांचें अंतर । शुद्ध होतें साचार । नव्हता कामाचा विकार । मनीं उत्पन्न जाहला ॥१७॥ मग भुला शिवराम बायजाबाई । पुंडलीक भोकर्या आला तोही । चौघे येऊन लागले पायीं । शेगांवीं श्रीसमर्थांच्या ॥१८॥ पुंडलीकासी पाहून । बोलूं लागले दयाघन । कीं बायजा तुझी बहीण । पूर्वजन्मीची पुंडलीका ॥१९॥ लोक निंदा जरी करिती । तरी अंतर न द्यावे इजप्रती । दोघें मिळून करा भक्ति । सच्चिदानंद हरीची ॥२०॥ ही राहील ब्रह्मचारी । अशीच गे जन्मभरी । जनाबाई पंढरपुरीं । अशाच रीतिं राहिली गे ॥२१॥ तिनें नामदेव गुरु केला । ही शरण आली आम्हांला । माझ्या जनाबाईला । कोणी ना आतां छळावें ॥२२॥ ऐसें समर्थांचें भाषण । शिवरामानें ऐकून । गेला असे गहिंवरून । शब्द न कांही बोलवे ॥२३॥ घेऊन आपुल्या मुलीला । शिवराम मुंडगांवासी आला । पुढें बायजाच्या वारीला । अडथळा कोणी केला नसे ॥२४॥ भाऊ राजाराम कवर । एक होता डॉक्टर । पहा खामगांवावर । दवाखान्याचा अधिकारी ॥२५॥ त्यास दुर्धर फोड झाला । आणविलें मोठ्या डॉक्टराला । औषधपाणी करायाला । खामगांवा माझारीं ॥२६॥ नाना औषधें पोटांत दिली । विविध पोटीसें बांधिलीं । शस्त्रक्रिया ही असे केली । त्या झालेल्या फोडाला ॥२७॥ कशाचा ना उपयोग झाला । फोड वाढूं लागला । वडील बंधूस धाक पडला । त्या भाऊच्या दुखण्याचा ॥२८॥ भाऊ तळमळे शय्येवरी । व्याधि असह्य झाली खरी । शेवटीं त्यानें अंतरीं । विचार ऐसा केला हो ॥२९॥ आतां हाच उपाय । आठवावे सद्गुरुपाय । याविणें दुसरी सोय । कांही नसे राहिली ॥३०॥ पडल्या पडल्या जोडी हात । म्हणे धांव धांव हे सद्गुरुनाथ । या लेंकराचा वृथा अंत । किमपि आतां पाहूं नको ॥३१॥ ऐसी श्रोते विनवणी । करूं लागला क्षणोक्षणीं । रात्र गेली उलटोनी । सुमारे समय एकाचा ॥३२॥ तों एक दमणी आली । तट्ट्यावरी लागलेली । गाडीस होती जुंपिली । जोडी खिलार्या बैलांची ॥३३॥ दवाखान्याच्या दारापाशीं । दमणी आली निश्चयेंसी । डॉक्टर पाहात होता तिसी । पडून आपल्या शय्येवर ॥३४॥ तों एक उतरला । ब्राह्मण दमणीच्या खालीं भला । दार ठोठावूं लागला । डॉक्टराच्या बंगल्याचें ॥३५॥ डॉक्टराच्या बंधूंनीं । दार उघडलें ते क्षणीं । प्रश्न केला कोठूनी । आपण आलांत ये ठायां ? ॥३६॥ ब्राह्मण बोले त्याकारण । माझें गजा नामाभिधान । तीर्थ अंगारा घेऊन । शेगांवाहून आलों मी ॥३७॥ डॉक्टर भाऊ कवराला । जो कां आहे फोड झाला । हा अंगारा पाठविला । लावण्या त्या फोडासी ॥३८॥ प्यावयासी दिलें तीर्थ । हें घ्या आपुल्या हातांत । मी जातों आतां परत । वेळ न मशी राहावया ॥३९॥ तीर्थअंगारा देऊन । निघून गेला ब्राह्मण । त्या शोधायाकारण । भाऊनें शिपाई पाठविला ॥४०॥ परी न पत्ता लागला । गाडी न दिसली कवणाला । भाऊ मनीं घोटाळला । कशाचा ना तर्क चाले ॥४१॥ फोडास लावितां अंगारा । तो तात्काळ फुटला खरा । येऊं लागला भराभरा । पूं त्या श्रोते फोडांतून ॥४२॥ एक घटका गेल्यावर । पूं गेला निघून पार । पाहा किती आहे जोर । समर्थांच्या अंगार्याचा ! ॥४३॥ भाऊस निद्रा लागली । व्याधी पुढें बरी झाली । हळुं हळुं शक्ति आली । भाऊ झाला पूर्ववत् ॥४४॥ दर्शना गेला शेगांवास । तों समर्थ वदले ऐसें त्यास । माझ्या गाडी बैलास । नुसता न चारा दिलास तूं ॥४५॥ हें सांकेतिक भाषण । कळलें भाऊलागून । हृदय आलें उंचबळून । त्या भाऊ कवराचें ॥४६॥ त्या रात्रीचा ब्राह्मण । खचित माझा गजानन । लेंकरासाठीं धांवून । खामगांवास आला हो ॥४७॥ कवरें केलें अन्नदान । त्या व्याधीच्या निमित्त जाण । अंतर्ज्ञानी असती पूर्ण । श्रीगजानन अवलिया ॥४८॥ असो एकदां समर्थस्वारी । निघती झाली पंढरपुरीं । त्या श्रीचंद्रभागेतीरीं । विठ्ठलासी भेटावया ॥४९॥ होती मंडळी बरोबर । दिवस वारीचा साचार । स्पेशल गाड्या वरचेवर । जाऊं लागल्या पंढरीला ॥५०॥ जगू आबा, पाटील हरी । बापुना व मंडळी दुसरी । सोडूनिया शेगांव नगरी । नागझरीला आले हो ॥५१॥ त्या गांवीं माळावर । आहे एक भुयार । येथें गोमाजी नामें साधुवर । समाधिस्थ झालासे ॥५२॥ हा गोमाजी बोवा साचा । गुरु महादजी पाटलाचा । प्रथम आशीर्वाद झाला याचा । शेगांवींच्या पाटीलवंशा ॥५३॥ म्हणून पाटील शेगांवचे । गोमाजीला वंदून साचे । रस्त्यास लागती पंढरीचे । ऐसा त्यांचा परिपाठ ॥५४॥ हरी पाटलाबरोबरी । समर्थांची होती स्वारी । बापुना आणि दुसरी । माणसें पांचपन्नास ॥५५॥ आषाढ शुद्ध नवमीचा । तो दिवस होता साचा । समुदाय वारकर्यांचा । येऊं लागला पंढरीसी ॥५६॥ तें भूवैकुंठ पंढरपूर । गजबजून गेलें फार । भरती येतां सागर । जेवीं जाय उंचबळोनी ॥५७॥ नाथ निवृत्ति ज्ञानेश्वर । सांवता गोरा कुंभार । श्रीतुकोबा देहूकर । सोपान मुक्ता जनार्दन ॥५८॥ या संतांच्या पालख्या । पंढरीस आल्या देखा । भक्तांनीं उधळिला बुक्का । आदर करायाकारणें ॥५९॥ श्रोते त्या समयाला । समर्थ आले पंढरीला । उतरले जाऊन वाड्याला । त्या कुकाजी पाटलाच्या ॥६०॥ हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी । वाडा चौफाळ्याशेजारीं । दर्शनाला भीड खरी । झाली असे राऊळांत ॥६१॥ एकादशीस साचार । हरी पाटलाबरोबर । बापुनाविना इतर । गेले दर्शना हरीच्या ॥६२॥ बापुना मागें राहिला । तो होता स्नानासी गेला । म्हणून त्यासी वेळ झाला । मंडळी गेली निघून ॥६३॥ स्नान करून आला घरीं । तों समजलें ऐशापरी । दर्शनासी गेली सारी । आत्तांच मंडळी विठ्ठलाच्या ॥६४॥ मग तोही निघाला पळत पळत । दर्शनाचा धरून हेत । राऊळाच्या भोंवतीं अमित । गर्दी झाली लोकांची ॥६५॥ मुंगीस वाट मिळेना । तेथें हा बापुना । केवीं जाईल दर्शना । शिवाय गरिबी पदरांत ॥६६॥ बापुना म्हणे मानसीं । हे विठ्ठला हृषीकेशी । कां रे निष्ठुर झालासी ? । मजला देई दर्शन ॥६७॥ तूं सांवत्या माळ्याकारण । अरणीं गेलास धांवून । तेवीं येई राऊळांतून । मज भेटाया पांडुरंगा ॥६८॥ तुला लोक म्हणतात । तूं अनाथांचा असशी नाथ । मग कां रे देवा मजप्रत । उपेक्षिलें या वेळीं ? ॥६९॥ ऐसा बहुत धांवा केला । शेवटीं बापुना हताश झाला । परत बिर्हाडासी आला । अस्तमानाचे समयास ॥७०॥ मुख झालें होतें म्लान । अवघ्या दिवसाचें उपोषण । बापुनाचे अवघें मन । विठ्ठलाकडे लागलें ॥७१॥ शरीर मात्र होतें घरीं । मन मंदिराच्या सभोंवरी । फिरत होतें भिरीभिरी । याचें नांव ध्यास हो ॥७२॥ बापुनासी पाहून । हंसूं लागले अवघे जण । हा बेटा अभागी पूर्ण । कळून आला आपणां ॥७३॥ याची दांभिक अवघी भक्ति । यास कशाचा श्रीपती ? । ऐन वेळेला राहती । गैरहजर दुर्दैवी ! ॥७४॥ ऐसा उपहास तयाचा । प्रत्येकानीं केला साचा । अवघ्यांपुढें एकट्याचा । टिकाव लागावा कोठूनी ? ॥७५॥ तो बापुना बसला उपोषित । दातांसी लावूनी दांत । ते होते अवघे पहात । स्वामी निजल्या जागाहून ॥७६॥ समर्थ म्हणती बापुना । दुःख नको करूंस मना । ये तुला रुक्मिणीरमणा । भेटवितों ये काळीं ॥७७॥ तों महाराज उभे राहिले । कटीं हात ठेविले । पाय खालीं जुळविले । समचरण दावावया ॥७८॥ तुळशीफुलांच्या माळा कंठीं । मूर्ति सांवळी गोमटी । बापुनाच्या पडली दृष्टि । शीर ठेविलें पायांवर ॥७९॥ पुन्हां जो पाहे वरीं । समर्थ दिसले पहिल्यापरी । तेणें बापुनाच्या अंतरीं । अति आनंद जाहला ॥८०॥ धोतर, पागोटें आणि शेला । जो घरीं दृष्टि पडिला । तोच त्यानें पाहिला । दर्शना जातां राऊळांत ॥८१॥ पहा समर्थांनीं बापुनाला । विठ्ठल साक्षात् दाखविला । कुकाजीच्या वाड्याला । संतत्व हा खेळ नसे ॥८२॥ संत आणि भगवन्त । एकरूप साक्षात । गुळाच्या त्या गोडीप्रत । कैसें करावें निराळें ? ॥८३॥ काला घेऊन अखेरी । मंडळी फिरली माघारी । बापुनाच्या अंतरीं । दर्शन तें ठसावलें ॥८४॥ याच पुण्यें करून । पुत्र झाला त्याकारण । रसिक चतुर विद्वान । संतसेवा न जाई वृथा ॥८५॥ पंढरीच्या प्रसादानें । पुत्र झाला त्याकारणें । म्हणूनच नांव त्यानें । ठेविलें नामदेव बालकासी ॥८६॥ कवठे बहादूर गांवाचा । एक माळकरी होता साचा । तो वर्हाड प्रांताचा । म्हणून उतरला वाड्यांत ॥८७॥ तेथें आषाढी द्वादशीसी । मरी आली मुक्कामासी । त्या पंढरपूरक्षेत्रासी । मग काय विचारितां ? ॥८८॥ पोलिस घरांत शिरती । वारकर्याला ओढिती । चंद्रभागेच्या पार करिती । कुर्डुवाडी रस्त्याला ॥८९॥ हा कवठे बहादूरचा वारकरी । झाला मरीनें आजारी । ढाळ होती वरच्यावरी । उलटी मुळींच थांबेना ॥९०॥ गोळे हातांपायांसी । येऊं लागले बहुवशी । कोण न जाई त्याजपाशीं । शुश्रुषा त्या करावया ॥९१॥ पोलिसभयानें हें वृत्त । कळविलें ना कोणाप्रत । शेगांवीचे समस्त । लोक जाया निघाले ॥९२॥ लोक सुखाचे सोबती । संकटकालीं अव्हेरिती । तेथें एक रक्षण करती । संत अथवा देव हो ॥९३॥ तो पाहून प्रकार । श्रीगजानन साधुवर । म्हणाले हा ओसरीवर । निजला यास घेऊन चला ॥९४॥ लोक म्हणती गुरुराया ! । हा बहुतेक मेला सदया । याच्या नादीं लागतां वायां । संकट येईल आपणांतें ॥९५॥ अशा स्थितींत ये ठाईं । थांबणें हें कांहीं बरें नाहीं । चला जाऊं लवलाही । चंद्रभागेच्या पलीकडे ॥९६॥ तों महाराज म्हणती अवघ्यांला । तुम्ही कैसें खुळावला ? । आपल्या देशबंधूला । सोडितां हें बरें नव्हे ! ॥९७॥ ऐसें वदून जवळ गेले । वारकर्याच्या करा धरलें । त्यासी उठून बसविलें । आणि केलें मधुरोत्तर ॥९८॥ चाल बापा ऊठ आतां । जाऊं आपल्या वर्हाडप्रांता । वारकरी म्हणे गुरुनाथा ! । आतां वर्हाड कशाचें हो ? ॥९९॥ समीप आला माझा अंत । जवळ नाहीं कोणी आप्त । तईं म्हणाले सद्गुरुनाथ । वेड्या ! ऐसा भिऊं नको ॥१००॥ तुझें टळलें गंडांतर । ऐसें वदोन ठेविला कर । त्या वारकर्याच्या शिरावर । ढाळ उलटी बंद झाली ॥१०१॥ घटकेंत झाला पहिल्यापरी । मंडळींच्या बरोबरी । चंद्रभागेच्या पैलतीरीं । आला समर्थांसमवेत ॥१०२॥ आनंद झाला फार त्यासी । वंदी समर्थचरणांसी । म्हणे दयाळा काढिलें मशी । दाढेंतून काळाच्या ॥१०३॥ ऐसा घडतां चमत्कार । भक्त करिती जयजयकार । आले कुर्डुवाडीवर । निर्धास्तपणें सर्वही ॥१०४॥ पंढरीची करून वारी । आली शेगांवाप्रती सारी । मंडळी ती बरोबरी । श्रीगजाननस्वामींच्या ॥१०५॥ एक कर्मठ ब्राह्मण । घ्याया आला दर्शन । त्या शेगांवाकारण । श्रीगजाननस्वामींचें ॥१०६॥ तयानें स्वामीची कीर्ति । निजदेशीं ऐकिली होती । म्हणून आला दर्शनाप्रती । फार लांबून त्या ठायां ॥१०७॥ सोवळें ओंवळें त्याचें अती । तो होता मध्वमती । खट्टु झाला परम चित्तीं । समर्थांसी पाहातां ॥१०८॥ व्यर्थ आलों म्हणे येथ । या वेड्यासी वंदण्याप्रत । हा भ्रष्टाचा आहे सत्य । सार्वभौम शिरोमणी ॥१०९॥ सोंवळें ओंवळें येथ मेलें । अनाचाराचें राज्य झालें । अशा पिशाला म्हणूं लागले । साधु लोक हाय हाय ॥११०॥ तो तया मठांत । काळें कुत्रें झालें मृत । पडलें होतें त्याचें प्रेत । येण्याजाण्याच्या वाटेवरी ॥१११॥ त्या श्वानातें पाहून । ब्राह्मण झाला मनीं खिन्न । आणूं कसें जीवन । श्वान मध्यें पडला हा ॥११२॥ त्याचा संशय फेडावया । समर्थ आसन सोडोनिया । येते झाले तया ठायां । जेथें होता ब्राह्मण ॥११३॥ आणि म्हणाले तयाप्रत । पूजा करावी यथास्थित । कुत्रें झालें नाहीं मृत । संशय उगा घेऊं नका ॥११४॥ तें ऐकून रागावला । नीज समर्था बोलूं लागला । अरे नाहीं वेड मला । तुझ्यासम लागलेलें ॥११५॥ ऐसें ऐकतां विप्राला । समर्थांनीं जाब दिला । आम्ही भ्रष्ट आम्हांला । तुमच्या सम ज्ञान नाहीं ॥११६॥ परी खंति न करा तिळभर । पाणी आणाया घागर । घेऊन चलावें सत्वर । माझ्यामागें विप्रवरा ॥११७॥ ऐसें बोलून कुत्र्यापासी । येते झाले पुण्यराशी । स्पर्श पदाचा करतां त्यासी । कुत्रें बसलें उठोन ! ॥११८॥ तों पाहता चमत्कार । ब्राह्मण झाला निरुत्तर । म्हणे याचा अधिकार । थोर आहे देवापरी ॥११९॥ माझे अपराध गुरुवरा ! । आज सारे क्षमा करा । वरदहस्त ठेवा शिरा । मी अनंत अपराधी ॥१२०॥ तूंच सोंवळा साचार । एक आहेस भूमिवर । करण्या जगाचा उद्धार । तुम्हां धाडिलें ईश्वरानें ॥१२१॥ श्रोते त्याच दिवशीं भली । समाराधना त्यानें केली । कुशंका मनाची पार फिटली । लीन झाला अत्यंत ॥१२२॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति अष्टादशोऽध्यायः समाप्तः ॥
No comments:
Post a Comment