Apr 1, 2021

दिवाकरविरचित श्री दत्त कवच - ब्रह्मवैवर्त पुराण


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

श्री गणेशासी वंदुनी l श्री व्यासांते नमन करुनी l श्री दत्त चरणी माथा ठेवुनी l श्री दत्त कवच देतसे ॥१॥ श्री दत्तात्रेय कवच l अंगीरस ऋषींचे वच l स्तोत्र महामंत्र साच l छंद ओवी रुप हा ॥२॥ परमात्मा श्री दत्तात्रेय l देवता यासी ध्येय l ऐं क्लीं बीज-शक्तीमय l स्वाहाकार कीलक ॥३॥ या स्तोत्रमंत्राचा जप l करितां व्हावे पूर्ण निष्पाप l दत्त प्रसाद अमाप l लाभावा हा संकल्प ॥४॥ श्री दत्तात्रेयाचें ध्यान l तेथे लागले माझें मन l संयमी ऋषी ज्याचे चरण l सेविताती निरंतर ॥५॥ उज्ज्वल कांति कमलापरी l गुप्तपणे संचरे पृथ्वीवरी l माहिष्मती नगरी जरी l पावन निवास मानिती ॥६॥ रेवा नदीतीरीं विहार l करीतसे हा यतिवर l कृपा करुनी भक्तावर l संकटे त्यांची निवारी ॥७॥ योगारुढ जो प्रसन्नवदन l त्या योगीश्वरा करितों वंदन l त्या दत्ता श्रद्धेने प्रार्थून l दत्त कवच म्हणतसे ॥८॥ ॥ अथ कवचम ॥ योगीश रक्षो पूर्व दिशेसी l माधव तो आग्नेयेसी l सर्वात्मा रक्षो दक्षिणेसी l भक्तवत्सल नैऋत्य ॥९॥ ब्रह्मण्य तो पश्चिमेसी l दिगंबर तो वायव्येसी l सुव्रत रक्षो उत्तरेसी l भद्रद तो ईशान्य ॥१०॥ विष्णु रक्षो अधर दिशेसी l सर्वग रक्षो सर्व दिशांसी l दत्तात्रेय रक्षो शीर्षासी l मौनीशेखर ललाट ॥११॥ सर्वज्ञ रक्षो भ्रूमध्यासी l दयानिधी मम नेत्रांसी l महायोगी नासिकेसी l श्रुतीप्रिय तो श्रवणेंद्रिये ॥१२॥ मनोजव रक्षो स्कंधांसी l पुरुषोत्तम पार्श्व-भागासी l जो वरदाता कार्तवीर्यासी l तो रक्षो कर दोन्ही ॥१३॥ अघसंहारी रक्षी नखांसीं l भयापह रक्षो कुक्षींसी l नारायणात्मक वक्षांसी l स्तनांसीही मम रक्षो ॥१४॥ सर्व लोकांचा नियामक l मम पृष्ठासी होवो रक्षक l अच्युत होवो उदर रक्षक l महात्मक रक्षो नाभीते ॥१५॥ अत्रिपुत्र रक्षो कटीसी l शाश्वत रक्षो पोटऱ्यांसी l नग्नवेषधर गुह्यासी l परात्पर करो रक्षण ॥१६॥ त्रिकालज्ञ रक्षो अंकांसी l शंकर तो मम जानूंसी l मायाजित तो जंघांसी l रक्षण करो सर्वदा ॥१७॥ स्वयें प्रभू तो गोफ्यांसी l सदाभोगी तो चरणांसी l सदायोगी करांगुलीसी l सर्व शरीर रक्षो हें ॥१८॥ त्रिकालज्ञ रक्षो देहासी l सर्वग रक्षो रोमारोमांसी l ऐसें रक्षो सर्वथा मजसी l दत्तात्रेय भगवान ॥१९॥ भगवान दत्तांसी नमन l सर्व लोक ज्या करिती वंदन l सर्वांचे जो करी नियमन l सर्व तंत्रें ज्या पासुनी ॥२०॥ सर्व कामना सफल करित l सर्व विद्या पारंगत l सर्व योगीन्द्र शरण येत l मुनींद्रही जयाला ॥२१॥ सर्व भक्तांचे करी रक्षण l ब्रह्मचर्य व्रत करी धारण l मायागूढ ज्याचे संचरण l विलक्षण भासतसे ॥२२॥ कीं हा उन्मत्त जाहला l अथवा वाचेविना जन्मला l कीं बधिर कीं भोळा l लोकाचार न मानी ॥२३॥ नग्नपणे करी संचार l ऐसा जो गुरु खरोखर l वंदन त्याचिया चरणावर l नमन हे फिरफिरुनी ॥२४॥ भगवान दत्तात्रेयासी l वंदन त्या मुनिपतीसी l अभयदाता देवांसी l राक्षसांचा नाशक ॥२५॥ निवारण करी उपद्रवांचे l दुष्ट मंत्र तंत्र यंत्रांचे l उच्चाटन करी दुष्ट ग्रहांचे l सर्व रोग नष्ट करी ॥२६॥ ॐ ह्रीं क्रों क्षौं l क्रूं हौं हूं श्रीम l मंत्र बीज रुप सूक्ष्म l म्हणूनी मी वंदितो ॥२७॥ ओम नमो भगवंता l कार्तवीर्याचा उद्धारकर्ता l रेवा नदी जळी खेळता l धन्य दर्शन पावती ॥२८॥ माहिष्मती नगरांत l निवास जो सदा करीत l अनसूयेचा असे सुत l अत्रिनयनां सुख देई ॥२९॥ जो क्षणमात्रें करून l तिन्ही लोकी करी भ्रमण l यमनियम संपन्न l दत्तात्रेय तो रक्षक ॥३०॥ निवारी ब्रह्मराक्षसातें l भूतप्रेत वेताळांतें l पिशाच्च शाकिनी डाकिनीतें l पूतनादी ग्रहांदिकां ॥३१॥ आश्रितांचे दु:ख हरण l संकट पीडा करी हरण l दत्तात्रेय तो भगवान l नमन माझे साष्टांगी ॥३२॥ एकदांही करितां स्मरण l सन्निध उभा करि रक्षण l दत्तात्रेय योगीश चरण l तयाचे मी वंदितों ॥३३॥ सर्व कार्ये मम साधोत l रक्षण करी करी हित l हुं फट स्वाहा उच्चारीत l कवच संपूर्ण करीतसे ॥३४॥ हे कवच स्वीकारावें l श्रद्धेने नरें ऐकावें l लिहूनी धारण करावें l संपुटात अंगावरी ॥३५॥ नित्य याचें करिता पठण l सर्व कार्ये साधती पूर्ण l सर्वत्र विजय पावून l यश थोर मेळवी ॥३६॥ संकट येता राजद्वारी l भयंकर वा संगरीं l अराजक देशभरी l तरी ती नच बाधती ॥३७॥ नौका बुडतां प्रवाहात l प्राणभय मोठें उपस्थित l चोर सर्वस्व लुटीत l अग्नीभय वा उपजे ॥३८॥ ऐसीं येता संकटे l कवच रक्षण करी नेटें l व्याघ्रसिंहादिक उठे l जिवावरी श्वापद ॥३९॥ लांडगे विषारी उरग l अरण्यात वा लागे आग l सांपडेना कोठें मार्ग l निबिड वनीं चुकोनी ॥४०॥ तरी निर्भय राही गिरिकुहरीं l ब्रह्मराक्षसही काय करी l गंधर्व भूत यक्ष सत्वरी l उडवुनी देई कवच हे ॥४१॥ दुष्टग्रह वा डाकिनी l शाकिनी पिशाच्चें येउनी l त्रास देतां कवच पठणी l पीडा त्यांची टळेल ॥४२॥ निपुत्रिकासी पुत्रलाभ l निर्धनासी धनलाभ l विद्यार्थ्यासी विद्यालाभ l मोक्ष लाभे साधकां ॥४३॥ रोगी सुटे रोगापासुनी l अपस्मार क्षय व्याधीतुनी l बंदी सुटे बंधनातुनी l कवच प्रभावें सुख मिळे ॥४४॥ एक दोन तीन दिवस l चार दिवस वा विशेष l पक्ष अथवा पूर्ण मास l ज्वर असा येतसे ॥४५॥ मस्तकी उठतसे शूळ l शीत बाधा उष्ण ज्वाळ l वायुविकारही सबळ l दूर होय कवचानें ॥४६॥ कवच पठणे सत्वरी l सरस्वती कृपा करी l विवादीं प्रतिपक्षावरी l विजय तो लाभेल ॥४७॥ सर्व ग्रह अनुकूल l संपत्ती मिळे विपुल l सकल कामना सफल l दत्तप्रसादें होतील ॥४८॥ ऐसें श्रीदत्तकवच l अंगिरसमुनींचे सत्य वच l ब्रह्मवैवर्त पुराण साच l मंत्रयुक्त संस्कृत ॥४९॥ तयाची बहुजनांसाठी l ओवी रचियली मराठी l दिवाकर कवि-चित्तीं l प्रकटली सुलभपणें ॥५०॥ विनयानें दत्तचरणीं l नम्र होउनी प्रतिदिनीं l म्हणता इष्ट फल, मिळूनी l धन्य होय गुरुभक्त ॥५१॥ ॥ श्रीदत्त कवच संपूर्ण ॥ ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

अवश्य वाचावे असे काही -

*** दत्तभक्तांच्या नित्योपासनेसाठी अमौलिक वाङ्मय संग्रह ***


No comments:

Post a Comment