Nov 20, 2020

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय ४


शिवशर्मा ब्राह्मणाची कथा, कुरवपुरांत वासवांबिकेचे दर्शन आणि श्री पळनीस्वामींचा पर-काया प्रवेश

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

स्नान-संध्या करून श्री पळनीस्वामी, शंकरभट्ट आणि माधव तिघेही गुहेत परतले. आसनस्थ झाल्यावर श्री पळनीस्वामींनी थोडा वेळ ॐकार प्रणवाचा जप केला, श्रीपाद श्रीवल्लभांची हृदयमंदिरांत प्रतिष्ठापना करून मानसपूजा केली आणि गंभीर आवाजांत ते बोलू लागले, "बाळांनो, आज शुक्रवार असून हूणशकानुसार दिनांक २५-५-१३३६ आहे. या शुभयोगांनी युक्त असलेल्या दिवशी ईशकृपेनें आपल्याला काही आध्यात्मिक अनुभव येणार आहेत. तेव्हा, आपण आता श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेचे पालन करत, त्यानुसार संकल्पपूर्वक ध्यानांस बसावे. आपण त्यांना अनन्यभावानें शरण जाऊन त्यांच्या दिव्य स्वरूपाचे ध्यान करू या. आज ध्यानांत श्रीपादांची मला आज्ञा होताच मी सूक्ष्म रूपाने कुरवपुरला जाऊन त्यांचे दर्शन घेईन."

पळनीस्वामींचे हे बोल ऐकून, शंकरभट्टांनी आपल्या मनांतील शंका त्यांना विचारली, " स्वामी, या माधवाने सूक्ष्म रूपाने श्रीपादांच्या मंगल आणि दिव्य रूपाचे दर्शन घेतले आहे, तसेच आपणही श्रीवल्लभांचे प्रत्यक्ष दर्शन तर घेतलेच आहे शिवाय कधीही सूक्ष्मरूपांत कुरवपुरांत जाऊन त्या स्मर्तुगामी दत्तात्रेयांच्या सान्निध्याचा लाभ घेऊ शकता. मी मात्र केवळ त्यांचे नाव आणि काही लीलाच ऐकल्या आहेत. तेव्हा त्यांच्या त्या दिव्य स्वरूपाचे मी ध्यान कसे करु?" त्यांवर पळनीस्वामी मंदहास्य करीत आश्वासक वाणींत म्हणाले, " शंकरा, तू फक्त श्रीपादांवर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांचे नामस्मरण कर, त्यांच्या कृपेची अनुभूती तुला सत्वरच येईल." एवढें बोलून त्यांनी श्रीपादांचे अमूर्तचिंतन करीत ध्यानमुद्रा धारण केली. शंकरभट्ट आणि माधवही प्रभूंचे एकाग्रपणें चिंतन करत ध्यानमग्न झाले. सुमारे दहा घटका सरल्यावर पळनीस्वामी ध्यानांतून बाहेर आले. त्यांवेळी ते अत्यंत प्रसन्न दिसत होते. कुतूहलाने शंकरभट्ट व माधव यांनी त्या थोर तपस्व्यास, त्यांच्या ध्यानानुभूतीबद्दल सांगण्याची प्रार्थना केली. तेव्हा उल्हासित स्वरांत पळनीस्वामी शिवशर्मा ब्राह्मणाची कथा सांगू लागले. 

श्रीपाद श्रीवल्लभांच्या वास्तव्यामुळें पावन झालेल्या कुरवपूर द्वीपांत शिवशर्मा नावाचा यजुर्वेदी, काश्यप गोत्री ब्राह्मण आपली पत्नी अंबिकेसह रहात होता. तो विद्वान, वेदपारंगत आणि कर्मठ धर्माचरण करणारा होता. गावांतील एकमेव ब्राह्मण असल्याने आजूबाजूच्या परिसरांतही जाऊन तो अनुष्ठान, शास्त्रोक्त विधी करत असे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणीं त्याची दृढ भक्ती आणि निष्ठा होती. पूर्वजन्मींच्या कर्मभोगांमुळे त्याची संतती जगत नसे. अनेक व्रत-वैकल्य करून अखेर त्याचा एक पुत्र जीवित राहिला. मात्र दुर्दैवानें तो मंद बुद्धीचा असल्यानें शिवशर्मा त्यास काहीच वेदाध्ययन करू शकला नाही. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या चिंतेनें तो ब्राह्मण फार दुःखी-कष्टी झाला. एके दिवशी श्रीपादांसमोर वेद पठण केल्यानंतर तो अतिशय उदासपणे उभा होता. अंतर्ज्ञानी प्रभूंनी त्याच्या दुःखाचे कारण जाणून ' तुझें काय मागणें आहे ?' असे विचारले. त्यावर शिवशर्मा श्रीपादांच्या चरणीं नतमस्तक होऊन म्हणाले, "हे परमेश्वरा, तू हे सर्व चराचर व्यापले आहेस. तुम्हांस या जगतीं अशक्य असे काही नाही आणि तुम्हांस शरण आलेल्यांचा तू नेहेमीच उद्धार करतोस. आपल्या कृपादृष्टीनें माझा जड व मंदबुद्धी असलेला पुत्र विद्वान आणि वेदापारगंत व्हावा, हीच माझी प्रार्थना आहे." त्यावर श्रीपाद स्वामी म्हणाले, " अरे, प्रारब्ध हे सर्वांना भोगावेच लागते. पूर्वजन्मींच्या काही पातकांमुळेच तुझा पुत्र मंदबुद्धी झाला आहे. मी त्याचे ते कर्म नष्ट करून त्यास वेदज्ञानी करेन, मात्र कर्मसूत्रांच्या सिद्धांतानुसार तुझे उर्वरित आयुष्य त्याला द्यावे लागेल." 

“स्वामी, माझा पुत्र बृहस्पतीप्रमाणे सर्व वेदांचे ज्ञान असलेला, उत्तम वक्ता व्हावा आणि आपला कृपाहस्त त्याच्या मस्तकीं सतत असावा, हीच माझी इच्छा आहे." असे म्हणत  वृद्धावस्थेकडे झुकलेला शिवशर्मा देहत्याग करण्यास तात्काळ तयार झाला. श्रीपाद प्रभू अत्यंत प्रेमानें त्याला म्हणाले, '' वत्सा, हा देहत्याग केल्यावर, तू  सूक्ष्म देहाने धीशीला नगरामध्ये ( सध्याचे  शिर्डी ) एका निंबवृक्षाच्या तळाशी असलेल्या भुयारांत थोडाकाळ तपसाधना करशील. त्यानंतर, पुण्यभूमी महाराष्ट्रदेशी तुझा पुनर्जन्म होईल. मात्र माझी ही भविष्यवाणी तू गुप्त ठेव.''  

श्रीपाद प्रभूंच्या वचनांनुसार, काही काळाने शिवशर्मा कालवश झाले. त्याची पत्नी अंबिका भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागली. मात्र गांवातील लोक त्या ब्राह्मणपुत्राची 'विद्वान पित्याचा मूर्ख मुलगा' अशी सतत टिंगल टवाळी, अवहेलना करीत असत. असा वारंवार अपमानित झालेला तो ब्राह्मणपुत्र एके दिवशीं त्या त्रासास कंटाळून आपला जीव देण्यास नदीकडे धावत निघाला. त्याची आई अंबिकासुद्धा असहाय्य होऊन त्याच्याबरोबर आपला प्राण त्यागण्यास निघाली. मात्र त्या दयाळू ईश्वराची काही वेगळीच लीला होती. नदीवर येतांच त्यांना श्रीपादयतींचे दर्शन झाले. त्या दिव्यमूर्तीस पाहताच अंबिकेने त्यांना श्रद्धापूर्वक नमस्कार केला. त्या करुणासागर श्रीपाद श्रीवल्लभांनी कृपाकटाक्षानें पाहताच तो मुलगा अत्यंत तेजस्वी दिसू लागला. प्रभूंनी आपला वरदहस्त त्या विप्रपुत्राच्या मस्तकावर ठेवताच तो क्षणांत वेदशास्त्रसंपन्न झाला. अंबिकादेखील अनन्यभावानें श्रीपदयतींच्या चरणीं लीन झाली आणि " स्वामी, पुढच्या जन्मीं मला आपणांसारखा त्रैलोक्यांत वंदनीय असा पुत्र व्हावा." अशी तिने प्रार्थना केली. त्यांवर प्रभूंनी तिला शनिप्रदोष व्रताचे माहात्म्य सांगून शिवाराधना करण्यास सांगितले आणि त्या व्रताचे फलित म्हणून पुढील जन्मीं तुला माझ्यासारखाच पुत्र होईल, असा तिला वर दिला. मात्र या त्रैलोक्यांत त्यांच्यासम कुणीही नसल्याने, आपल्या त्या आशीर्वचनाच्या पूर्तीसाठी स्वतः तिच्या पोटी जन्म घेण्याचा श्रीपादप्रभूंनी निर्णय घेतला. शिवशर्माची ही कहाणी सांगून श्री पळनीस्वामी पुढे म्हणाले, " वत्सांनो, श्री दत्तप्रभू केवळ स्मरणमात्रेच भक्तांवर प्रसन्न होतात, त्यांना दर्शनही देतात. मानवाचे पतन होण्याचे जितके मार्ग आहेत, त्याहीपेक्षा असंख्य मार्ग श्रीचरणांचा अनुग्रह आणि कृपा प्राप्त होण्यासाठी आहेत. हेच परम सत्य आहे. स्मरण, अर्चन, त्यांच्या लीलांचे श्रवण, मनन अशी अनेक प्रकारे नवविधा भक्ती करून साधकांस श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे सतत सान्निध्य लाभते. साधकांचे जे काही पापकर्म, दोष, अथवा विषयवासना आहेत, तें सर्व श्रीपाद श्रीवल्लभांच्या योगाग्नीनेच नष्ट होतात. यासाठीच अनन्यभावानें श्रीगुरु-पादुकांना शरण जावे. श्रीगुरुचरण सर्वशक्तीसंपन्न असतात. आपल्या भक्तांचे कर्मबंधन कितीही जडस्वरूपी असू दे, त्यांतून सुटका करण्याचे सामर्थ्य केवळ श्रीगुरुंना असते, मात्र साधकांची ईश्वरावर, आपल्या गुरूंवर श्रद्धादेखील हवी. शंकरा, भगवान दत्तात्रेय आपल्या भक्तांच्या अधीन असल्यामुळेच श्रीपादप्रभूंच्या ह्या अवतारानंतर त्यांचा पुढील अवतार करंज नगरींत श्री नृसिंहसरस्वती म्हणून प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ते पुन्हा ३०० वर्षे समाधींत राहून प्रज्ञापुरात(अक्कलकोट) श्री स्वामी समर्थांच्या रूपांत अवतरित होऊन आपले भक्तांच्या उद्धाराचे कार्य सुरु ठेवतील."

आपल्या सूक्ष्म देहाने कुरवपुरांस गेल्यावर आपणांस श्रीपाद सहोदरी श्री वासवी कन्यकांबाच्या दर्शनाचाही लाभ झाला होता, हेदेखील पळनीस्वामींनी कथन केले. तसेच भविष्यकाळांत घडणाऱ्या अनेक घटनांचा वृत्तांत, कर्मफल सिद्धांत, सृष्टी-स्थिती-लय-तिरोधान अनुग्रह विवरण आणि श्रीपाद प्रभूंचे कार्य यांविषयीही शंकरभट्ट आणि माधवास प्रबोधन केले. त्यानंतर पळनीस्वामींनी त्या दोघांस त्यांचा ध्यानानुभव विचारला. त्यांवर शंकरभट्टांनी आपणास एका तप करीत असलेल्या यवनवेषधारी संन्याशाचे दर्शन झाले असे सांगितले. तो संन्यासी एका भुयारांत असून त्याच्या चारही बाजूला दिवे तेवत होते, ह्याचेही वर्णन केले. ध्यानमग्न असतांना आपणाला आलेले अनुभव सांगताना माधव म्हणाला, “ स्वामी ! मी ध्यानांत एका  कौपीनधारी ब्राह्मण संन्याशाला बघितले. ते अग्नीची व सूर्याची आराधना करीत होते. त्यानंतर मी सूक्ष्म देहानी पीठिकापुर येथे पोहोचलो असता एका स्थानी दोन दिव्यपादुकांचे मला दर्शन झाले." 

त्यांचे हे अनुभव ऐकून श्री पळनीस्वामी म्हणाले, " बाळांनो, या सर्व भविष्यकाळांत घडणाऱ्या घटना आहेत.  शंकरा, तुझ्या मनीची श्रीप्रभूंच्या चरित्र लेखनाची इच्छा सुफळ होणार आहे. श्रीपाद प्रभूंच्या प्रत्यक्ष आशीर्वादाने भक्तकल्याणासाठी तुझ्या हातून हे अदभूत कार्य होणार आहे. माधवा, तू दर्शन घेतलेले स्थान म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान म्हणजेच त्यांच्या आजोबांचे गृह आहे. त्या मातुलगृहात तू पाहिलेल्या दिव्य पादुका पुढील काळांत प्रतिष्ठापीत होतील."

पळनीस्वामींचे हे स्पष्टीकरण ऐकून शंकरभट्टांचे अष्टसात्त्विक भाव जागृत झाले. श्रीहरि कृष्णांच्या आशीर्वादाने ते उडुपीहून श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी कुरवपुरांस जाण्यास निघाले होते. मार्गांत कितीतरी अकल्पित घटना घडल्या, मात्र श्रीपाद प्रभू आपल्या पाठीशी आहेत, याची त्यांना सतत प्रचिती येत होती. 

इतके बोलून पळनीस्वामींनी थोडा वेळ मौन धारण केले. त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम घेऊन त्यांनी गुहेजवळ पुरलेल्या गांवातील युवकाचा मृतदेह बाहेर काढायला सांगितला. त्यांच्या सूचनेनुसार शंकरभट्ट आणि माधव यांनी तो मृतदेह त्या खड्डयातून बाहेर काढला. श्री पळनीस्वामी प्रणवोच्चार करु लागले. इतक्यात “ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये " असा जयघोष करीत व्याघ्रेश्वर शर्मा व्याघ्ररूपातच तिथे प्रगट झाला. श्री पळनीस्वामींनी त्या नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला. व्याघ्रेश्वर शर्मा पळनीस्वामींचा वृद्ध, जीर्ण देह तिथे जवळच असलेल्या नदीत विसर्जित करण्यासाठी घेऊन गेला. नूतन शरीर धारण केलेले श्री पळनीस्वामी शंकरभट्ट आणि माधवास म्हणाले, “ तुम्ही दोघेही आता आपल्या पुढील प्रवासास निघा. माधवा, तू तुझ्या विचित्रपुर नगरीला परत जा. श्रीपाद श्रीवल्लभांच्या आशीर्वादाने तू सूक्ष्मरूपाने त्यांचे आणि पीठिकापुरमच्या पुण्यवंतांचे दर्शन घेतलेस. तू कृतकृत्य झाला आहेस. शंकरा, तू तिरुपती पुण्यक्षेत्री प्रयाण करावेस. तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहाचा लाभ लवकरच प्राप्त होवो." त्या थोर सिद्धपुरुषास नमन करून आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन माधव विचित्रपुराकडे व शंकरभट्ट तिरुपतीकडे मार्गस्थ झाले. खरोखर श्रीपाद स्वामींच्या लीलांचा अंत लागत नाही हेच खरें !  

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय फलश्रुती - विवाहयोग्य कन्यांस उत्तम वर प्राप्ति, गुरुनिंदा-दोष-निवारण


Nov 17, 2020

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय ३


राजपुत्रास वाचाप्राप्ती, श्री पळनीस्वामी दर्शन आणि माधव विप्राची संजीवन कथा  

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

' सदगुरूंसारखा असता पाठीराखा ...' या वचनांची प्रचिती घेत श्री शंकरभट्ट विचित्रपुरांत अचानक उद्भवलेल्या कठीण प्रसंगातून अलगद बाहेर पडले. पुन्हा कुरवपुराच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरु झाला. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे नामस्मरण करत तर कधी प्रभूंच्या लीलांचे मनन करीत तीन दिवस शंकरभट्टाची वाटचाल सुरुच होती. चौथ्या दिवशी ते अग्रहारपूर नामक गावांत पोहोचले. माध्यान्हींची वेळ झाल्यामुळें कुठेतरी भिक्षा मागावी, असा विचार करून ते ' ॐ भिक्षां देही ' असे म्हणत एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभे राहिले. तेव्हा एक अतिशय संतापलेली स्त्री घराबाहेर आली आणि " इथे भिक्षा मिळणार नाही. " असे अत्यंत क्रोधीत स्वरांत शंकरभट्टांना म्हणाली. त्या स्त्रीचे असे बोल ऐकून अचंबित झालेले शंकरभट्ट तिथून निघतच होते, इतक्यांत त्या घरातील गृहस्थ धावतच बाहेर आले आणि " अतिथीमहाराज क्षमस्व ! माझा माझ्या पत्नीशी कलह झाला आणि त्याची परिणीती म्हणून पैसे आणल्याशिवाय या घरांत येऊ नका, असे सांगून तिने मला घराबाहेर हाकलले. तेव्हा मीही आपल्याबरोबरच भिक्षा मागण्यास येतो." असे म्हणत त्यांच्याबरोबर चालू लागले. शंकरभट्टही " जशी प्रभूंची इच्छा !" असे पुटपुटत काही अंतरावर असलेल्या एका विशाल पिंपळवृक्षाच्या छायेत बसले. मात्र क्षुधेने व्याकुळ झाल्यानें दत्तभजनांत त्यांचे मन काही लागेना.

तोच एक नवल वर्तलें ... शंकरभट्टांचा शोध घेत तिथे विचित्रपूरच्या राजाचे दूत आले. त्यांना तिथे पाहून ते दूत म्हणाले, "तुम्ही प्रयाण केल्यानंतर, आमच्या मुक्या युवराजांना वाचा प्राप्ती झाली. त्यांमुळे प्रसन्न होऊन विचित्रपुराच्या महाराजांनी आपणांस घेऊन यावे, अशी आज्ञा केली आहे. तेव्हा आपण कृपा करून राजदरबारांत यावे." त्यांवर शंकरभट्ट उत्तरले, " मी अवश्य आपल्यांसोबत येईन, मात्र माझा हा मित्रसुद्धा माझ्याबरोबर येईल." राजदूतांनी ही विनंती मान्य करून, शंकरभट्ट आणि त्या गृहस्थांस घोडयावर बसवले. थोड्याच वेळांत ते सर्वजण विचित्रपुर नगरीत पोहोचले. सारे प्रजाजन त्यांच्याकडे आश्चर्याने पहात होते. राजवाड्यात आल्यावर राजाने स्वतः पुढे येऊन शंकरभट्टांचे उत्तम स्वागत आणि आदरातिथ्य केले.

त्यानंतर अत्यंत नम्रपणें राजा बोलू लागला, " विप्रदेव, आपण इथून प्रयाण केल्यावर आमचा युवराज जो बोलू शकत नसे, तो एकाएकी मूर्च्छित झाला. आम्ही राजवैद्यांना तातडीने बोलावणें पाठवले, परंतु ते येण्याआधीच युवराज शुद्धीवर आला आणि '' दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा " असा मंत्रोच्चार करीत उठून बसला आणि आमच्याकडे पाहत अत्यंत शांतपणे म्हणाला, " मी मूर्च्छित झाल्यावर एक सोळा-सतरा वर्षाचे आजानबाहु, अत्यंत दैदिप्यमान असे यती तिथे आले. त्यांनी माझ्या जिभेवर विभूती लावली, अन त्याच क्षणी मी स्पष्टपणें बोलू लागलो." इतके बोलून राजाने शंकरभट्टांना वंदन केले आणि प्रार्थनापूर्वक स्वरांत म्हणाला, " ब्राह्मण महाराज, ते तेजस्वी यती कोण होते ? श्रीदत्तप्रभूंशी त्यांचे काय नाते आहे ? हे सारे मला कथन करावे.'' हे ऐकून शंकरभट्ट श्रीपाद श्रीवल्लभांच्या स्मरणभक्तीत रंगून गेले. भानावर येत ते राजास म्हणाले, " हे राजन, युवराजांना ज्या दिव्य यतींचे दर्शन झाले ते निश्चितच श्रीदत्तप्रभूंचे कलियुगातील अवतार, श्रीपाद श्रीवल्लभ होते. त्यांच्याच कृपाप्रसादाने तुझ्या पुत्रास वाचा प्राप्ती झाली आहे. मी त्यांच्याच दर्शनासाठी कुरुगड्डी क्षेत्रास जात आहे.” श्री दत्तप्रभूंचा असा महिमा ऐकून सर्वांनी एकमुखाने श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार केला. अति प्रसन्न झालेल्या राजाने त्यांचा आणि त्यांच्या बरोबर आलेल्या त्या ब्राह्मणाचा सुवर्णमुद्रा देऊन सत्कार केला. राजाचा निरोप घेऊन ते दोघे परत अग्रहारपूरास निघाले. विचित्रपुरांतील माधव नंबुद्री नावाचा एक ब्राह्मणही त्यांच्याबरोबर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दर्शनासाठी निघाला. ते तिघे मार्गक्रमण करीत अग्रहारपूरास येऊन पोहोचले. त्या गृहस्थानें राजानें दान केलेल्या त्या सुवर्णमुद्रा आपल्या पत्नीस दाखवून श्री दत्तप्रभूंची लीलाही कथन केली. तो महिमा ऐकून तिचीदेखील श्रीपाद श्रीवल्लभांच्या ठायीं श्रद्धा दृढ झाली. तिने या तिघांना उत्तम भोजन दिले. त्यानंतर शंकरभट्ट आणि माधव नंबुद्री चिदंबरम या गांवी जाण्यास निघाले.

गुंटूर (गर्तपुरी) मंडलातील नंबुरु हे माधवाचे मूळ गांव होते. मळियाळ देशातील राजाने ह्या गांवातील अनेक विद्वान ब्राह्मणांना राजाश्रय दिला होता. नंबुरु या ग्रामातील हे आचारसंपन्न आणि वेदपारंगत ब्राह्मण नंबुद्री ब्राह्मण या नांवाने प्रसिद्ध झाले. दुर्दैवानें, माधवाचे माता-पित्याचे छत्र त्याच्या लहानपणीच हरपले होते. त्यांमुळे त्याचा वेदाभ्यास अथवा काही अध्यापन झाले नव्हते. मात्र त्याची श्री दत्तात्रेयांवर असीम श्रद्धा होती. शंकरभट्ट आणि माधव लवकरच चिदंबरम क्षेत्री पोहोचले. तेथील पर्वतावरील एक गुहेत श्री पळनीस्वामी नांवाच्या एक सिद्ध माहात्म्यांचे वास्तव्य आहे असे कळताच, ते दोघेही त्यांच्या दर्शनासाठी गेले. गुहेच्या द्वाराजवळ येता श्री पळनीस्वामी यांनी " शंकरा, माधवा यावे !", असे म्हणत प्रेमाने स्वागत केले. या प्रथम भेटीतच शंकरभट्ट आणि माधव यांना त्या वृद्ध तपस्व्याच्या अंतर्ज्ञानाची,श्रेष्ठत्वाची प्रचिती आली. श्री पळनीस्वामींनी त्या दोघांस कणाद महर्षींचा कण- सिद्धांत आणि कुंडलिनी शक्ती यांविषयी ज्ञानोपदेश केला. ते पुढें म्हणाले, "श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा आहेत. सुमारे १०८ वर्षांपूर्वी याच क्षेत्रीं त्यांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन माझ्यावर अनुग्रह केला होता. त्यावेळी हिमालयातील काही महायोगी बद्रीकेदार तीर्थातील ब्रह्मकमळे बद्रीनारायणांस अर्पण करत होते, तीच कमलपुष्पें आणि ते सर्व उपचार श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणांवर येऊन पडत होते." तो दिव्य अनुभव शंकरभट्ट आणि माधव अतिशय विस्मयचकित होऊन ऐकत होते. या ब्रह्मकमळांची विशेषता सांगतांना पळनीस्वामी म्हणाले," श्री महाविष्णूंनी श्री महादेवाचे पूजन याच ब्रह्मकमळाने केले होते. चतुराननाचे जन्मस्थान म्हणजेच श्री विष्णुंचे नाभीकमळ, हेदेखील ब्रह्मकमळ आहे. पृथ्वीतलावर हे दिव्य लोकांतील पुष्प केवळ हिमालयांत अतिशय दुर्गम उंचीवर वर्षातून फक्त एकदाच उमलते. हिमालयात तपस्या करत असलेल्या असंख्य सिद्धपुरुषांना अमरेश्वर हिमलिंगाचे दर्शन श्रावण पौर्णिमेस होते, त्याच मध्यरात्रीं केवळ याच महान तपस्व्यांसाठी हे दैवी पुष्प पूर्ण विकसित होऊन उमलते. त्यावेळीं सभोवतालचा परिसर एका अद्भूत सुवासाने भरून जातो. या ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पातकांचा, सिद्धमार्गांतील विघ्नांचा नाश होऊन साधकांस उच्च स्थिती प्राप्त होते. ज्या उच्चकोटी भक्तांच्या भाग्यात या ब्रह्मकमळाच्या दर्शनाचा योग असतो, त्या सर्व सिद्धांचे दर्शन घेऊन झाल्यावर हे कमळ अंतर्धान पावते.''

थोडा वेळ ध्यानमग्न होऊन श्री पळनीस्वामी अत्यंत शांत, गंभीर स्वरांत बोलू लागले, " माझ्या या देहाचे वय तीनशे वर्षे असून, श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार लवकरच मी हा देह त्यागून दुसऱ्या तरुण देहात प्रवेश करणार आहे. शंकरा, मी पुढील दहा दिवस समाधीमग्न असणार आहे, त्या काळांत माझे दर्शनार्थी भक्त आल्यास तुम्ही त्यांना दुरूनच माझे दर्शन घडवा. जेणेकरून माझा समाधीभंग होणार नाही. तसेच या काळांत कुणीही जर सर्पदंशानें मृत झाले तर तो मृतदेह नदीच्या प्रवाहात अथवा भूमींत पुरून ठेवावा, अशी माझी आज्ञा आहे, हे त्यांना सांगावे."

त्यानंतर श्री पळनीस्वामी सिद्धासनात बसले, त्यांची दृष्टी नासाग्रीं स्थिर झाली आणि ते हळूहळू समाधी अवस्थेत गेले. ही वार्ता त्या परिसरांत पसरताच अनेक भाविक भक्त स्वामींचे दर्शन घेण्यास येऊ लागले. स्वामींच्या आज्ञेनुसार, शंकरभट्ट आणि माधव विप्र दुरूनच त्या भक्तांस दर्शन घेण्यास सांगत होते. दर्शनास आलेल्या काही भक्तांनी शिधासामग्री आणली होती. माधव ब्राह्मणानें ते साहित्य वापरून स्वयंपाक करण्याचे ठरविले. त्याने काही दगड रचून चूल बनविली. त्याला जवळच पडलेले एक शुष्क, मोठे नारळाच्या झाडाचे पान दिसले. तेच आता सरपण म्हणून वापरावे, असा विचार करून ते पान त्याने उचलले, पण त्या पानाखाली विश्रांती घेत असलेल्या एका सर्पाने त्यास दंश केला. त्या सर्पाचे विष एवढे दाहक होते की माधव नंबुद्री काही क्षणांतच काळा-निळा होऊन जमिनीवर कोसळला आणि मृत झाला. तिथे जमलेल्या दोघा-तिघा भक्तांनी त्याचे मृत शरीर गुहेजवळ आणले. ते दृश्य पाहून, शंकरभट्ट अत्यंत भयभीत झाले. मात्र पुढच्याच क्षणी स्वामींच्या आज्ञेचे त्यांना स्मरण झाले आणि त्यानुसार एक मोठा खड्डा खणून त्यात माधवाचा मृत देह ठेवला. अत्यंत खिन्न मनाने शंकरभट्ट गुहेत येतच होते, तेवढ्यांत जवळच्या गावांतील कांही लोकांनी सर्पदंश झालेल्या एका युवकास आणले. दिवसभरांतील ही दुसरी दुर्दैवी घटना पाहून शंकरभट्टांस दुःखाने अश्रू अनावर झाले. त्यांनी गावकऱ्यांना स्वामींची आज्ञा सांगताच, गावकऱ्यांनी त्या गुहेजवळच अजून एक खड्डा खणून त्यात त्या मृत युवकाचा देह पुरला. शंकरभट्ट अतिशय खिन्न झाले होते, मात्र स्वामींची आज्ञा प्रमाण मानून ते पुढील काही दिवस दर्शनाला येणाऱ्या भाविकांची व्यवस्था पहात होते.

अकराव्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावरच श्री पळनीस्वामी समाधीतून बाहेर आले आणि ' माधवा ! माधवा !' असे पुकारू लागले. शंकरभट्टांनी विषण्ण होऊन माधवाचा वृत्तांत स्वामींना सांगितला. तो ऐकून स्वामींनी योगदृष्टीने त्यांच्याकडे बघताच शंकरभट्टांच्या सर्व वेदना नष्ट झाल्या, नंतर स्वामी गंभीर स्वरांत बोलू लागले, " शंकरा, या माधव विप्राच्या प्रारब्धात श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन त्याच्या ह्या स्थूल शरीराने होणार नव्हते. त्यामुळे त्याचे सूक्ष्म शरीर गेल्या दहा दिवसांपासून कुरवपुरांस श्रीपाद प्रभूंच्या सानिध्यात होते. त्याला पुन्हा एकदा ह्या स्थूल शरीरात आणण्याचे कार्य प्रभूंनी मजवर सोपविले आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला जाणण्यास आपण असमर्थ आहोत, हेच खरें ! " त्यानंतर, स्वामींच्या आदेशानुसार माधवचा मृतदेह तिथे आणला. दक्षिण दिशेस असलेल्या त्या ताडाच्या वृक्षाजवळ जाऊन स्वामी उच्च स्वरांत म्हणाले, “ या माधवास दंश करणाऱ्या नागराजा, तू पळनीस्वामींच्या जवळ यावे, अशी श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे.” त्यावेळीं स्वामींनी आपल्या वस्त्रातून चार कवडया काढल्या व त्या माधवाच्या देहाच्या चारी बाजूस ठेवल्या. कांही क्षणातच त्या कवड्या आकाशात चार दिशांना उडाल्या. थोड्याच वेळांत उत्तरेकडून एक विशाल सर्प फूत्कार टाकीत तिथे आला, त्या चार कवडया त्याच्या फण्यात रुतून बसल्या होत्या. स्वामींच्या आदेशानुसार, त्याने माधवाच्या शरीरातील विष शोषून घेतले. श्री पळनीस्वामींनी आपल्या आराध्य देवतेचे, श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण केले आणि त्या सर्पावर मंत्रोदक शिंपडले. तो सर्प स्वामींच्या त्यांना तीन प्रदक्षिणा घालून नमस्कार करून निघून गेला.

हा चमत्कार पाहून शंकरभट्ट दिग्मूढ झाले होते. तेव्हा श्री पळनीस्वामी म्हणाले, " पूर्वजन्मीं हा सर्प एक स्त्री होता. त्या जन्मांतील कर्मभोगांनुसार तिला सर्पयोनींत जन्म घ्यावा लागला. मात्र गेल्या जन्मात एका दत्तभक्ताला भोजन दिल्याचे पुण्य तिच्या गाठीशी होते, ह्या अल्पसेवेनेच तिला मुक्ती मिळाली. माधवाचीही पूर्वजन्मीच्या पातकांमुळेच अशी ही मरणासन्न अवस्था झाली होती. मात्र श्रीदत्तप्रभू अल्पसंतुष्टी आहेत. ते भक्तांच्या थोडया सेवेवर प्रसन्न होऊन अमाप फळ देतात. दहा दिवस जमिनीत पुरुनही माधवच्या शरीरास कांही झाले नाही, ही तर श्री दत्तात्रेयांचीच कृपा होय. श्रीपाद श्रीवल्लभांचे केवळ नामस्मरण केले असता लक्ष्मी, धन, ऐश्वर्य, समाधान विनासायास प्राप्त होतात. त्यांचा अनुग्रह झालेल्या भक्तांच्या भाग्याचे काय वर्णन करावे बरें !" ह्या दोन भक्तांचा असा पूर्वजन्म वृत्तांत स्वामी सांगतच होते, एवढ्यात माधवामध्ये पुन्हा चैतन्य येऊ लागले आणि तृषार्त होऊन तो थोडे पाणी मागू लागला. मात्र पळनीस्वामींनी त्याला प्रथम तूप पिण्यास दिले. काही वेळानें थोडा फळांचा रसदेखील दिला आणि त्यानंतरच पाणी देण्यास अनुमती दिली. अशा रितीने, माधव पुनर्जिवित झाल्याचे पाहून शंकरभट्टांच्या हर्षाला पारावार राहिला नाही.

माधवही आता बराच पूर्ववत झाला होता. त्याने आपला अनुभव सांगण्यास प्रारंभ केला. " मी सूक्ष्म शरीराने कुरवपुरांस पोहोचलो. तिथे मला आजानुबाहु, विशाल नेत्र असलेल्या श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले. श्रीवल्लभांनी मला '' कुरवपुरातील त्या द्वीपाच्या मध्यभागी जा.'' असे अतिशय दयार्द्र स्वरांत सांगितले. मी स्वामींना नमन केले आणि नामस्मरण करत करत त्या स्थानी गेलो. अनेक भव्य प्रासाद, दालनें असलेला तो नक्कीच पाताळलोक असावा. तेथे नाग जातीचे लोक होते. त्यातील कांहीना हजार फणे होते, तर कांहींच्या शिरावर दिव्य मणी होते. ते त्यांच्या इच्छेनुसार कुठलेही रूप धारण करू शकत होते. भगवान श्रीविष्णु जसे शेषनागावर शयन करतात, तसेच श्रीपाद श्रीवल्लभ तेथील एका सहस्त्र फण्याच्या नागावर शयन करीत होते. तेथे असलेले काही महासर्प प्रभूंकरिता वेदगायन करीत होते. त्या दिव्य लोकांतील एका महासर्पाने मला श्रीदत्तप्रभूंचा जन्म, महिमा आणि त्यांचे अवतारकार्य आदिंविषयीं विस्तृत कथन केले. तो महासर्प आपल्या दिव्य वाणींत बोलू लागला, " माधवा, आम्हाला ' कालनाग ऋषिश्वर ' असे म्हणतात. महर्षी अत्री आणि महासती अनसूयेचा पुत्र म्हणून या जगतांत प्रख्यात असलेले श्री दत्तात्रेय पूर्वायुगांत या पृथ्वीतलांवर अवतरले. त्यांचे अवतारकार्य अविरत सुरु असून ते सूक्ष्मरूपांत निलगिरी शिखर, श्रीशैल शिखर, शबरगिरी शिखर, सहयाद्री, गिरनार आदि क्षेत्रीं संचार करीत असतात. कार्तवीर्य, परशुराम, गोरक्षनाथ, ज्ञानेश्वरादि त्यांचे असंख्य शिष्योत्तम असून दत्तसंप्रदायाचा इतिहास फार प्राचीन आहे. हजारो वर्षें या पृथ्वीतलाचे परिपालन केल्यानंतर त्यांनी यापुढे गुप्तरूपांत कार्य करण्याचे ठरविले. ते या नदींत अदृश्य झाल्यावर आम्ही त्यांच्या पुनर्दर्शनासाठी तप करण्यास सुरुवात केली. काही काळाने, प्रसन्न होऊन श्री दत्तात्रेयांनी अनघालक्ष्मी देवीसमवेत आम्हांला दर्शन दिले. पुनरपि ह्या भूमीवर प्रभूंनी अवतार घ्यावा, अशी आम्ही त्यांची प्रार्थना केली असता श्री दत्तात्रेयांनी पीठिकापुरात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतला. दत्तप्रभू ज्या ठिकाणी अदृश्य झाले, ती जागा म्हणजेच हे आजचे परम पवित्र कुरवपुर आहे.'' मी त्या महासर्पास नमस्कार केला आणि परत पाण्यातून वर येऊन कुरुगड्डीस श्रीपाद प्रभूंचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले."

त्यावेळीं माधव पुन्हा एकदा मनानें कुरवपुरांस प्रभुचरणीं पोहोचला होता. पुढे तो सांगू लागला - यानंतर श्रीपाद प्रभू मला म्हणाले “ वत्सा, तुला झालेले हे दिव्य भव्य दर्शन म्हणजे मोठा अलभ्य योगच आहे. ज्या महासर्पानें तुला हे माहात्म्य कथन केले, तो येणाऱ्या शताब्दीमध्ये ' ज्योती रामलिंगेश्वर स्वामी' या नावाने अवतार घेईल तर दुसरा महासर्प ‘सदाशिव ब्रह्मेंद्र’ या नावाने अवतार घेऊन अनेक लीला करेल. पिठीकापुरम येथील माझ्या जन्मस्थानीं म्हणजे माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल. तू आता श्री पीठिकापुरातील माझ्या पादुकास्थानजवळील पाताळात जा आणि तेथील तपोनिष्ठ कालनागांची भेट घेऊन ये.” प्रभूंचे ते भाषण ऐकून मी अनन्य भावानें त्यांच्या चरणीं नतमस्तक झालो.

माधवाचे हे इत्यंभूत कथन ऐकून शंकरभट्ट अतिशय रोमांचित झाले. आपल्या भाग्यांत श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचा योग कधी येणार ? असा ते विचार करू लागले. तेव्हा मंदहास्य करीत श्री पळनीस्वामी म्हणाले, " माधवा, पीठिकापुरातील कालनागांचा वृत्तांत तू आम्हांस थोड्यावेळानें सांग. आता आपण स्नान-संध्या करून ध्यानांस बसावे, अशी श्रीपाद श्रीवल्लभांची आज्ञा आहे."

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय फलश्रुती - नागदोष निवारण, संतान-प्रतिबंधक-दोष निवारण


Nov 6, 2020

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय २


योगीन्द्र मुनींचे दर्शन, कदंब वनातील शिवलिंग माहात्म्य आणि विचित्रपुरातील कसोटी   

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥ 

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे नामस्मरण करत, तर कधी त्यांच्या लीलांचे मनन करीत शंकरभट्ट कुरवपुराकडे मार्गक्रमण करीत होते.  त्यांचा हा प्रवास अतिशय सुखकर होत होता. मार्गांत त्यांना अनेक सिद्धपुरुषांचे दर्शन, संत-महात्म्यांचे मार्गदर्शन आदिंचा लाभ अगदी अकल्पितरित्या होत होता. इतकेच नव्हें तर भोजनप्रसाद, निवारा यांचीही सहजच व्यवस्था होत होती. एके दिवशी प्रवास करत करत ते कदंब वनांत पोहोचले. विश्रांतीसाठी आसरा शोधत असतांना एक प्राचीन, जीर्ण शिवालय त्यांच्या दृष्टीस पडले. त्या शिवलिंगाचे दर्शन घेऊन त्यांनी तिथे काही काळ विसावा घेतला. त्यानंतर त्यांनी परत वाटचाल सुरु केली. काही वेळ चालल्यानंतर शंकरभट्टांना एक सुंदर आश्रम दिसला. अधिक चौकशी करता तो योगींद्र नामक महान तपस्वी मुनींचा असल्याचे कळले. त्यांच्या दर्शनार्थ ते तात्काळ आश्रमांत पोहोचले आणि त्या सिद्धपुरुषांच्या चरणीं नतमस्तक होऊन प्रार्थना केली. त्या अंतर्ज्ञानी योग्यांनी शंकरभट्टांस '' श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु '' म्हणजेच लवकरच तुला श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या दर्शनाचा लाभ होईल, असा आशीर्वाद दिला. 

शंकरभट्टांनी त्या सिद्धांस त्या पुण्यक्षेत्राचे, तसेच शिवलिंगाचे माहात्म्य कथन करण्याची विनवणी केली. तेव्हा ते योगी म्हणाले, " पूर्वी देवराज इंद्राने महापराक्रम करून अनेक राक्षसांचा वध केला. परंतु, एक दानव मात्र पळून गेला आणि त्याने महादेवाची आराधना करत तप आरंभिले. इंद्राला हे समजताच तो तिथे पोहोचला आणि तो दैत्य ध्यानस्थ असतांनाच इंद्राने त्यास निर्दयतेने ठार केले. त्या हीन कर्मामुळे इंद्राच्या सर्व शक्ती, तेज लोप पावले व तो दुर्बल झाला. देवगुरूंनी त्यास या पापक्षालनार्थ तीर्थयात्रा करण्यास सांगितले. अनेक पवित्र तीर्थांचे दर्शन घेत घेत तो कदंब वनांत पोहाचला आणि काय आश्चर्य ! त्या पवित्र स्थानीं येताच तो पूर्वीसारखा कांतीमान, तेजस्वी दिसू लागला. अतिशय आनंदित होऊन तो ह्या पुण्यक्षेत्री कुठले इतके जागृत स्थान असावे, याचा शोध घेऊ लागला. तेव्हा इंद्रास ह्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले. अत्यंत भक्तिपूर्वक त्याने त्या स्वयंभू महादेवाचे पूजन केले. तसेच जनकल्याणासाठी ह्या जागृत स्थानीं, स्वयंभू लिंगावर त्यानें एक सुंदर देवालयही बांधले. शंकरभट्टा, इंद्राने प्रतिष्ठापना केलेले हे शिवलिंग अतिशय दिव्य, मंगलदायक असून केवळ दर्शनमात्रें समस्त पातकांचा नाश होतो. केवळ पुण्यवंतांसच आणि श्री दत्तप्रभूंची कृपा झालेल्या सद्भक्तानांच ह्याच्या दर्शनाचा लाभ घडतो. तेव्हा, त्या अति दुर्लभ अशा शिवलिंगाचे तू पुन्हा एकदा दर्शन घेऊन ये." सिद्धांची आज्ञा शिरसावंद्य मानून शंकरभट्ट त्यांना नमन करून पुन्हा एकदा कदंब वनांत पोहोचले. त्या अति पावन क्षेत्राचे माहात्म्य ऐकून त्यांचे अष्टभाव जागृत झाले होते. तिथे असलेल्या शिवालयांत ते दर्शनासाठी गेले खरें, पण काही काळापूर्वी ज्या शिवलिंगाचे त्यांनी दर्शन घेतले होते, ते हे शिवमंदिर नव्हतेच ! 

शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेले हे मंदिर पाहून शंकरभट्टांना श्रीमीनाक्षी-सुंदरेश्वराच्या मंदिराचीच आठवण आली. अत्यंत जागृत अशा त्या शिवलिंगाचे त्यांनी श्रद्धेने पूजन करून भक्तिपूर्वक दर्शन घेतले. त्यानंतर ते परत योगीन्द्रमुनींच्या आश्रमाकडे निघाले. मात्र शिवमंदिरातून बाहेर पडल्यावर तो परिसर त्यांना पूर्णतः अनोळखी भासला. विस्मयचकित झालेले शंकरभट्ट योगीन्द्रमुनींच्या आश्रमाचा शोध घेऊ लागले. परंतु, सूर्यास्तापर्यंत खूप शोधूनही त्यांना तो आश्रम काही सापडला नाही. अखेर, अतिशय थकलेल्या अवस्थेतच त्यांनी पुढील प्रवास करण्याचे ठरविले.  श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करत करत ते अंधारातून मार्गक्रमण करत होते. इतक्यांत, त्यांच्या पाठीमागून अचानक प्रकाशाचा झोत आला, त्यांनी दचकून मागे वळून पहिले अन समोरील दृश्य पाहून ते अत्यंत भयभीत झाले. तो प्रकाश एका सर्पाच्या मस्तकावर असलेल्या मण्यांतून येत होता. त्याहून अचंबित करणारी गोष्ट म्हणजे त्या सर्पास तीन मस्तकें होती आणि प्रत्येक मस्तकावर एक-एक दिव्य मणी होता. ते पाहूनच शंकरभट्टांची भीतीने गाळण उडाली , ते श्रीपाद स्वामींचा जीवाच्या आकांताने धावा करत वेगांत चालू लागले अन काय आश्चर्य ! मण्यांच्या त्या दिव्य प्रकाशात त्यांना योगीन्द्रमुनींचा आश्रम दिसू लागला. ते पाहून त्यांना हायसे वाटले. धावत-पळतच ते आश्रमांत शिरले, अन त्या क्षणींच तो दिव्य सर्प व तो प्रकाश अदृष्य झाला.   

योगीन्द्रमुनींनी त्यांचे छान स्वागत केले आणि भाजलेल्या चण्यांचा प्रसादही दिला. अतिशय थकलेल्या आणि भुकेने व्याकुळ झालेल्या शंकरभट्टांनी तो प्रसाद अगदी पोटभर खाल्ला. मात्र अजूनही भीतीने त्यांचे हृदय धडधडतच होते, त्यांनी त्या दिव्य सर्पविषयी योगींद्रमुनींस सांगताच, त्या सिद्धपुरुषाने आपला कृपाहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवताच एक अनामिक दैवी अनुभूती शंकरभट्टांना आली. ते थोर तपस्वी बोलू लागले, " ज्या दोन शिवालयांचे तू आज दर्शन घेतलें, ती दोन्ही मंदिरें वेगवेगळी नाहीत.मात्र दुसऱ्यांदा तू त्या दिव्य शिवमंदिरात जे काही अनुभवले, ते प्रभू दत्तप्रभूंच्या कृपेचे फलित होते. श्रीपाद स्वामींनी तुला कालप्रवास घडवला. तू तेव्हा साक्षात देंवेंद्राने प्रतिष्ठापना केली त्या काळातील त्या दिव्य शिवलिंगाचे, त्या परिसराचे दर्शन घेतलेस. ह्या सृष्टीची उत्पति, स्थिती व लय ज्यांच्या संकल्पमात्रे होतो, असे तेच श्री दत्तात्रेय सगुण रूपात पीठिकापुरम या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतरले आहेत. श्री श्रीपाद वल्लभांची तुझ्यावर पूर्ण कृपादृष्टी असल्यामुळेच केवळ तू येथे येऊ शकलास. पूर्वी ह्या शिवलिंगाचा महिमा धनंजय नामक व्यापाऱ्याने आपला राजा कुलशेखर यास सांगितला आणि त्या धर्मरत राजाने ह्या स्थानाचा जीर्णोद्धार केला. पुढे ह्या पुण्यक्षेत्रीच त्या राजाचा मलयध्वज नामक पुत्राने संतानप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्याचेच फलित म्हणून मीनाक्षीदेवीचा जन्म झाला आणि तिचा विवाह पुढे सुंदरेश्वराबरोबर अत्यंत थाटामाटात संपन्न झाला.या विवाहात प्रत्यक्ष श्रीहरी विष्णुंनी कन्यादान केले होते. महादेवांच्या जटेमधून प्रगट झालेली वेगवती नदी या मधुरानगरीतून वहात होती व तिच्या तीरावरील हा सर्व प्रदेश अत्यंत समृद्ध होता." प्रभूंची ही लीला ऐकून शंकरभट्टांचा कंठ आनंदाने दाटून आला आणि त्यांनी योगीन्द्रांना भावपूर्ण नमस्कार केला. त्या भावावस्थेतच त्यांना निद्रा लागली. 

सूर्योदय होताच शंकरभट्ट जागे झाले अन पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाले. ज्या आश्रमांत त्यांनी रात्री भोजन केले, वास्तव्य केले होते, तो योगीन्द्रमुनींचा आश्रम तिथे नव्हताच, तर ते एका निर्जन परिसरात, उंचश्या टेकडीवर असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली होते. आपण जे अनुभवले, ते सत्य होते वा एखादे स्वप्न होते हे काहीच त्यांना कळेना. नाना शंका- कुशंकांनी त्यांचे मन ग्रासून गेले. अखेर, आपलें सामान आवरून कुरवपुराच्या दिशेने त्यांनी पुन्हा एकदा आपला प्रवास सुरु केला. नामस्मरण आणि काल दिवसभरांत घडलेल्या घटनांचा विचार करत करत शंकरभट्ट वाटचाल करत होते. साधारण माध्यान्हीं ते एका छोट्याशा गावांत पोहोचले. प्रचंड थकवा आणि भुकेचीही जाणीव यांमुळे त्यांनी तिथेच थोडा वेळ विश्रांती घेण्याचे ठरविले. शंकरभट्टांचा एक नियम होता - ते ब्राह्मणांच्याशिवाय इतर  कोणाच्याही घरी अन्न ग्रहण करीत नसत. थोडा शोध केल्यावर त्यांना समजले की ते एक गिरीजन लोकांचे गाव असून तिथे एकसुद्धा ब्राह्मणाचे घर नव्हते. ग्रामप्रमुखानें त्यांना मध आणि काही फळें आणून दिली. क्षुधेनें व्याकुळ झालेले शंकरभट्ट ती फळे खाणार इतक्यात एक कावळा त्यांच्या डोक्यावर येऊन बसला आणि चोचीने त्यांच्या डोक्याला टोचू लागला. ते त्या कावळ्याला हाकलण्याचा प्रयत्न करतच होते, पण आणखी चार-पाच कावळे तिथे उडत आले आणि ते शंकरभट्टांच्या हातावर, खांद्यावर बसून इजा करू लाले. त्या पक्ष्यांच्या हल्ल्याने पुरते जखमी झालेले शंकरभट्ट अखेर ती फळे आणि मध तेथेच टाकून पळू लागले. ते सर्व कावळेही त्यांचा सारखा पाठलाग करू लागले. शेवटी त्यांनी मनोमनी श्रीपाद प्रभूंची या अकल्पित संकटातून सुटका करण्याची प्रार्थना केली.

थोड्या अंतरावर शंकरभट्टांस एक औदुंबराचा वृक्ष दिसला. त्या झाडाखालीच थोडा वेळ थांबावे, असा त्यांनी विचार केला. त्यावेळीं आपल्या शरीरास एक प्रकारची दुर्गंधी येत आहे, असे त्यांना जाणवले. त्या वासामुळे जवळपासच्या  वारुळातून अनेक साप बाहेर आले आणि त्यांनी शंकरभट्टांस दंश करण्यास प्रारंभ केला. सर्पांच्या जहाल विषप्रभावानें  त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला, ह्रदयाचे ठोके मंदावले आणि त्यांची शुद्ध हरपली.  सुदैवानें, त्याच वेळी एक धोबी तिथून जात होता. त्याने शंकरभट्टांना आपल्या गाढवावर बसवून गावातील चर्म वैद्याकडे नेले. त्यांची ती मृतप्राय अवस्था पाहून त्या निष्णात वैद्याने त्यांच्यावर तात्काळ औषधोपचार सुरु केले. त्या वनौषधींमुळे शंकरभट्टांच्या विषाचा प्रभाव बराच कमी झाला, मात्र असह्य वेदनांनी ते पुरतें त्रासून गेले. काही काळानंतर, त्या वैद्याच्या उपचारांनी विष पूर्णपणे उतरले आणि त्यांस पुरते बरे वाटू लागले. त्या वैद्याने त्यांना पूर्ण रात्र तिथेच ठेवून घेतले. तो वैद्य श्रीदत्त प्रभूंचा भक्त होता. रात्री आपल्या कुटुंबियांसह तो श्रीदत्त प्रभूंचे भजन अतिशय मधुर स्वरांत गाऊ लागला. त्या पवित्र, श्री दत्तभक्तीरसपूर्ण वातावरणांत शंकरभट्टांची भावसमाधी लागली. भजन संपल्यावर तो वैद्य त्यांच्याकडे आला, शंकरभट्टांनी त्याचे अत्यंत कृतज्ञतेने आभार मानले. तेव्हा तो वैद्य त्यांस म्हणाला, " माझे नांव वल्लभदास असून, मी येथील चर्मकारांचा वैद्य आहे. आपले नाव शंकरभट्ट असून आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनास निघाला आहात, हे मी जाणतो. तुम्हाला कावळ्यांचा त्रास आणि सर्पदंश का झाला तेसुद्धा मला ज्ञात आहे." वल्लभदासाने त्यांच्याविषयी इतकी अचूक माहिती सांगताच शंकरभट्ट अवाक झाले. कदाचित वैद्यकशास्त्राबरोबरच ह्याला ज्योतिषशास्त्राचेही ज्ञान असावे, असे त्यांस वाटले. 

त्यांच्या मनांतील विचार जाणून वल्लभदास पुढे म्हणाले, " मी ज्योतिषी नाही. मात्र मी श्रीपाद श्रीवल्लभांचा भक्त आहे. हे कावळे, ते सर्प पूर्वजन्मीचे पिठापुरम येथील महाअहंकारी पंडित होते. त्या अहंकाराच्या गर्तेत पडून त्यांनी श्रीपाद प्रभूंचे सत्य स्वरूप जाणले नाही आणि प्रभूंना त्रास दिला. मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती होऊनही त्यांच्या दुष्कर्मांमुळे त्यांना पशु योनींत जन्म घ्यावा लागला. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपापात्र भक्ताचे रक्त प्राशन केल्यावरच त्यांना उत्तम गती मिळणार होती. त्यामुळेच त्यांनी तुझ्यावर हल्ला केला.” इतकी कहाणी सांगून वल्लभदास शंकरभट्टांना म्हणाला, " तू लहानपणी विष्णूमूर्तीच्या “ शुक्लांबरधरं विष्णू चतुर्भुजम| प्रसन्न वदनं ध्यायेत सर्व विघ्नोऽपशांतये ” या ध्यानश्लोकाचे पठण करतांना विनोदाने त्या श्लोकाचा चूकीचा अर्थ आपल्या मित्राना सांगत होतास. तुझे हे आचरण श्री दत्तप्रभूंना आवडले नाही. तो कर्मभोग नष्ट व्हावा यासाठीच धोबी लोकांनी तुला गाढवावर बसवून माझ्याकडे आणले. अर्थात या सर्व घटनांमुळे श्रीपाद प्रभूंचा तुला बोधप्राप्ती व्हावी आणि तुझ्यातील अहंकार नाहीसा व्हावा असाच मानस होता. त्या दयाळू परमेश्वराची प्रत्येक क्षणी आपल्या भक्तांवर दृष्टी असते, ही गोष्ट नेहेमी ध्यानांत ठेव.”

वल्लभदासाचे हे ज्ञानयुक्त कथन ऐकून शंकरभट्ट कृतार्थ झाले. त्यांचा आपण  ब्राह्मण असल्याचा अहंकार पूर्णपणे गळून गेला. वल्लभदासाने त्यांना आग्रहाने तिथे राहण्याची विनंती केली. पुढे दोन-चार दिवस त्याचा अगत्यपूर्ण पाहुणचार घेऊन ते पुढे चिदंबर क्षेत्री जाण्यास निघाले. त्या प्रवासादरम्यान त्यांना विचित्रपूर नांवाचे एक गांव लागले. नांवाप्रमाणेच त्या ग्रामीचा राजा विचित्र वर्तन करणारा होता. ब्राह्मणांनी यज्ञ कर्मलोप केल्यानेच आपला राजपुत्र मुका झाला आहे, अशी त्या राजाची दृढ धारणा होती. त्यांमुळे तो ब्राह्मणांचा सतत अपमान करून त्यांना गाढवावर बसवून त्याची मिरवणूक काढीत असे. राज्यांतील सर्व विद्वान ब्राह्मणांस राजाने मूक व्यक्तींबरोबर संवाद साधण्यासाठी हातांच्या विशिष्ट हालचालींवर आधारित मूक भाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार अनेक ब्राह्मण अशी भाषा विकसित करण्याचे संशोधन करीत होते. अशा त्या विचित्रपूर नामक नगरीत शंकरभट्ट प्रवेशताच राजाच्या शिपायांनी त्यांना “ तुम्ही ब्राह्मण आहात काय?” असा प्रश्न विचारला. होकारार्थी उत्तर येताच ते सैनिक त्यांना घेऊन त्वरीत राजदरबारात पोहोचले.  

राजासमोर येताच शंकरभट्टांना भीतीने कंप सुटला. त्यांनी मनोमन श्रीपाद प्रभूंचे ध्यान करून या संकटातून आपल्याला सोडवावे अशी आळवणी केली. राजाने शंकरभट्टांस पहिला प्रश्न विचारला, “ तेवढ्यास एवढे तर एवढ्याला किती?” त्यावर त्यांनी अत्यंत शांत स्वरांत “ एवढ्याला एवढेच ” असे उत्तर दिले. या उत्तराने राजाचे समाधान झाले आणि त्याने “ महात्मन आपण मोठे पंडित आहात." असे म्हणत आपल्या पूर्वजन्माच्या संबंधित दुसरा प्रश्न विचारला. तो राजा गतजन्मी दिलेल्या राजगिऱ्याच्या भाजीच्या दानाच्या कैकपट दान या जन्मी राजा म्हणून देत  होता. भविष्यात या अचाट दानाचे फळ त्याला काय मिळेल ? याविषयीं त्याला जाणून घ्यावयाचे होते. त्यावर शंकरभट्ट उत्तरले,  '' महाराज, राजगिऱ्याची भाजी आपण दान करत असता, तर तीच भाजी शंभर पटीने आपणास पुढील जन्मांत मिळेल.  मात्र आपण राज्यकर्ता असल्याने रत्न, अमूल्य मणि, सोने आदि सत्पात्रीं दान करावे आणि पुण्यसंचय करावा.'' त्यांच्या त्या प्रगल्भ उत्तराने राजास अतिशय आनंद झाला.     

पुढील प्रश्न मूकभाषेशी संबंधित होता. राजगुरुंनी शंकरभट्टांस दोन बोटे दाखविली आणि खुणेनेच एक का दोन ? असे विचारले. शंकरभट्टांनी विचार केला की ते एकटेच आले आहेत का आपल्या सोबत कोणी आहे ? अशा अर्थाने प्रश्न विचारीत आहेत. उत्तरादाखल त्यांनी एक बोट दाखवून आपण एकटेच आलो आहोत, असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर राजगुरुंनी तीन बोटे दाखविली. तीन संख्या पाहताच शंकरभट्टांस त्रैमूर्ति श्रीदत्तप्रभूंचे स्मरण झाले. “ तुम्ही भक्त आहात काय?” अशी पृच्छा राजगुरू करत असावेत असे वाटून त्यांनी आपली मुठ बंद करून दाखविली. या कृतीचा अर्थ ' भक्ती ही गुप्त असावी.' असा त्यांना अभिप्रेत होता. यानंतर राजगुरुनी मिठाईचे भांडारच देत असल्याचा अविर्भाव केला. शंकरभट्टांनी ते दृढपणें नाकारले आणि स्वतःजवळ असलेल्या पुरुचुंडीतील पोहे काढून दाखविले. त्या मिठाईपेक्षा साधे पोहेच आपल्याला अधिक प्रिय आहेत, हे त्यांना सांगावयाचे होते. शंकरभट्टांच्या त्या सर्व समर्पक आणि उचित उत्तरांनी राजगुरू अतिशय प्रसन्न झाले. ते राजास म्हणाले, " महाराज, हा विद्वान ब्राह्मण मुक्यांच्या भाषेचाही विशेषज्ञ आहे." अशा प्रकारे शंकरभट्ट त्या दोघांच्या परिक्षेत सफल झाले होते. त्यांनी मनोमन श्रद्धापूर्वक श्रीपादांचे स्मरण करून अशीच कृपा आपल्यावर राहावी अशी प्रार्थना केली.   

अर्थात, तिसरी आणि सर्वात कठीण कसोटी शंकरभट्टांना अजूनही द्यायची होती. राजगुरुनी त्यांस रुद्राभिषेकातील चमक पाठामधील एक एक श्लोक वाचून त्याचा अर्थ सभेस समजावून सांगावा, असे सांगितले. आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून शंकरभट्टांनी एक श्लोक वाचला आणि अत्यंत स्पष्ट स्वरांत ते बोलू लागले, ‘एकाचमे’ म्हणजे एक. ‘तीस्त्रश्च्मे’ म्हणजे एक आणि तीन यांची बेरीज चार येते, तर चार या संख्येचे वर्गमूळ दोन येते. ‘पंचचमे’ म्हणजे चार या संख्येत पाच ही संख्या मिळून नऊ होतात आणि त्याचे वर्गमूळ तीन येते. “सप्तचमे” वर आलेल्या नऊ आणि सात या दोन संख्यांची मिळवणी केल्यास सोळा येतात व त्याचे वर्गमूळ चार येते. “नवचमे” म्हणजे वरील सोळा आणि नऊ एकत्र केले असता पंचवीस येतात आणि त्याचे वर्गमूळ पाच येते." अशाप्रकारे शंकरभट्टांनी चमकातील प्रत्येक श्लोक वाचून त्याचा अर्थ स्पष्ट करून सांगितला. त्यांचे ते सुलभ स्पष्टीकरण ऐकून खरे तर ते स्वतःच आश्चर्यचकित झाले होते. त्यांचे ते भाषण म्हणजे या सर्व सृष्टीच्या परमाणुचे रहस्य होते. ते केवळ कणाद ऋषींनाच माहित होते. अर्थात ही सर्व श्रीपाद प्रभूंचीच लीला आहे, हे शंकरभट्ट पुरतें जाणून होते.     

शंकरभट्टांचे ते विद्वत्तापूर्ण, शास्त्रसंमत वक्तव्य सर्वांनाच आवडले. अशा प्रकारें राजाच्या सर्व कसोट्या पार करून शंकरभट्ट सुरक्षितपणे, विनासायास राजदरबारातून आणि विचित्रपूर नगरीतून बाहेर पडले. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेची त्यांना पुन्हा एकदा अनुभूती आली होती. 

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय फलश्रुती - मन:क्लेश निवारण


Nov 4, 2020

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय १


व्याघ्रेश्वर शर्माची भक्तीगाथा 

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

श्री शंकरभट्ट नावाचे भारद्वाज गोत्रांतील देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे समकालीन असून प्रभूंचे भक्त होते. शंकरभट्टांनी अखिल ब्रह्मांडनायक श्री दत्तमहाराजांचे कलियुगातील प्रथम अवतार, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या लीलांचे वर्णन करण्याचा संकल्प केला होता. या कलियुगांत अनसूया-अत्रिनंदन भगवान दत्तात्रेयांचा प्रथम अवतार आंध्र प्रदेशातील पीठिकापुरम् या गावी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने झाला होता.

परंपरेनुसार, श्रीवल्लभ चरित्रामृताच्या प्रारंभी मंगलाचरण करतांना ते श्री महागणपती, श्री महासरस्वती,  श्रीकृष्ण भगवान,  सर्व चराचरवासी  देवी-देवता आणि सकल गुरु परंपरेचे स्मरण करून मनःपूर्वक नमन करतात. एकदा शंकरभट्ट ' उडपी ' या तीर्थस्थानी भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्या मनोहारी द्वारकाधीशानें त्यांना कन्याकुमारीस जाऊन कन्यका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. तदनुसार त्यांनी कन्याकुमारीस प्रयाण केले. तिथे अंबामातेची भक्तिपूर्वक पूजा करून प्रार्थना केल्यावर, देवीने प्रसन्न होऊन त्यांना कुरवपूरांस जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे असा दृष्टांत दिला. शंकरभट्ट तात्काळ कुरवपुरास निघाले. प्रवासा दरम्यान ते मरुत्वमलै या स्थानी पोहोचले. या पवित्र ठिकाणी अनेक गुहा असून अनेक सिद्धपुरुष गुप्तपणे तिथे तप:श्चर्या करीत असतात, असा या स्थानाचा महिमा आहे. 

शंकरभट्ट सहजच एका गुहेत शिरले असता, तिथे त्यांना आत एक वाघ  शांत  बसलेला  दिसला. त्या वाघाला पाहताच शंकरभट्ट अतिशय भयभीत झाले आणि त्यांनी '' श्रीपाद  !  श्रीवल्लभा  !'' अशी अत्यंत व्याकुळतेने साद घातली. त्या निर्जन गुहेत त्यांच्याच आरोळीचा पडसाद उमटला. त्या आवाजाने एक वृद्ध तपस्वी त्या गुहेतून बाहेर आले आणि म्हणाले, "श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम घेणारा तू त्यांचा भक्त असावास. ह्या वाघाबद्दल किंचितही भय तू मनात आणू नकोस. हा वाघ  एक  ज्ञानी  महात्मा  आहे. त्याला नमस्कार कर." तेव्हा, शंकरभट्टांनी अत्यंत  नम्रभावाने  त्या  वाघास  नमस्कार  केला असता त्या  वाघाने उच्चस्वरांत ॐ काराचा  उच्चार  केला.  त्या  आवाजाने  सारा  मरुत्वमलै  पर्वत  दुमदुमला. क्षणार्धात त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य पुरुष प्रगट झाला आणि त्या वृद्ध तपस्व्यास वंदन करून अंतर्धान पावला. त्यानंतर ते वृद्ध तपस्वी शंकरभट्टांना गुहेत घेऊन गेले. तिथे त्यांनी संकल्पमात्रें अग्नी तसेच आहुतीसाठी लागणारे सर्व साहित्यही निर्माण केले आणि वैदिक मंत्रोच्चारांसह आहुती देऊ लागले. त्यानंतर त्यांनी ' या  यज्ञाचे  फल  स्वरूप  म्हणून  तुला  श्रीपाद  श्रीवल्लभ  स्वामींचे  प्रत्यक्ष दर्शन  होईल.' असा शंकरभट्टांस आशीर्वाद दिला. 

अत्यंत सदगदित होऊन शंकरभट्टांनी त्या तेजस्वी सिद्धपुरुषांस प्रणिपात करत आपला सर्व वृत्तांत कथन केला. तसेच ते व्याघ्ररूपी महात्मा कोण होते ? आणि श्री दत्तप्रभू, श्रीपाद श्रीवल्लभ यांची महती विस्तारपूर्वक सांगावी अशी प्रार्थना केली. त्यावर अत्यंत संतुष्ट होऊन ते वृद्ध तपस्वी त्या व्याघ्ररूपी महात्म्यांची पूर्वकथा सांगू लागले. 

आंध्रप्रदेशातील गोदावरी नदीच्या तीरावर अत्री मुनींची तपोभूमी आहे. त्या स्थानास आत्रेयपूर असेही संबोधतात. तिथेच एक काश्यप गोत्रीय अत्यंत विद्वान, आचारसंपन्न ब्राह्मण राहत होता. त्यास परमेश्वराच्या कृपेने एक पुत्र झाला खरा, परंतु तो पुत्र मतिमंद  होता.  ब्राह्मण पती-पत्नींनी त्याचे  नांव व्याघ्रेश्वर असे ठेवले. व्याघ्रेश्वराचे व्रतबंधांस योग्य वय झाले तरी तो संध्यावंदनही करू शकत नसे. त्याच्या पित्याने त्याला गायत्री मंत्र, वेदाध्ययन आदि शिकवण्याचे  खूप  प्रयत्न  केले.  परंतु व्याघ्रेश्वर ते काहीच आत्मसात करू शकला नाही. एवढया विद्वान ब्राह्मणाचा एक अज्ञानी पुत्र अशीच गावातील लोक त्याची थट्टा, उपेक्षा करीत असत. गावकऱ्यांचे ते अपमानजनक बोलणें ऐकून व्याघ्रेश्वर अतिशय दुःखी होत असे आणि अत्यंत दुःखी-कष्टी होत ईश्वराची निरंतर प्रार्थना करीत असे. एके दिवशी, ब्राह्ममुहूर्तावर त्यास स्वप्नदृष्टांत झाला. त्याला स्वप्नांत एका दिव्य बालकाचे दर्शन  झाले. ते बालक आकाशातून खाली येत होते. त्याचे चरणकमल भूमीस लागताच, भूमीसुद्धा दिव्य आणि कांतीमान झाली. ते बालक हळू हळू पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे  आले आणि त्यास म्हणाले,  " बाळा, मी असताना तुला भय कशाचे ? या आत्रेयपूर ग्रामाचे व माझे प्राचीन ऋणानुबंध आहेत. तू  हिमालयातील बदरिकारण्यात जा. तेथे तुझे सारे शुभ होईल." त्या अति तेजस्वी बालमूर्तीला व्याघ्रेश्वर सद्गदित होऊन वंदन करीतच होता, तेव्हढ्यांत त्याला जागृती अली. त्या दृष्टांतानुसार, व्याघ्रेश्वर शर्माने हिमालयातील बदरीकारण्याकडे लवकरच प्रयाण केले. श्री दत्तप्रभूंच्या कृपेनें , त्याला प्रवासमार्गात काहीही त्रास झाला नाही. योग्य स्थानी आसरा, अन्न, जल आणि पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन सहजच विनासायास मिळत गेले. मार्गक्रमण करीत असतांना एक कुत्रा सतत त्याच्याबरोबर येऊ लागला.  अगदी बदरीवनापर्यंतच्या प्रवासांत त्या श्वानाची व्याघ्रेश्वरास सोबत मिळाली. तिथे आल्यावर, उर्वशी कुंडात त्याने स्नान केले. त्याच वेळी एक तपस्वीही आपल्या शिष्यांसह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले होते. व्याघ्रेश्वराने त्या गुरुवर्यांना साष्टांग नमस्कार केला आणि आपला शिष्य म्हणून स्वीकार करावा, अशी अत्यंत नम्र स्वरांत त्यांची प्रार्थना केली. त्यावर त्या तेजस्वी यतींनी व्याघ्रेश्वरास शिष्य करून घेण्याचे मान्य केले. अन काय आश्चर्य व्याघ्ररेश्वरासोबत आलेले ते श्वान तात्काळ अंतर्धान पावले. तेव्हा ते तपस्वी वदते झाले, “ अरे व्याघ्रेश्वरा, तुझ्या बरोबर आलेला तो श्वान म्हणजे तुझ्या पूर्व जन्मातील केलेल्या पुण्याचे प्रतीक होते. त्या पुण्यरूपी श्वानाने तुला आमच्या स्वाधीन केले आणि अंतर्धान पावले. ही सर्व श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचीच लीला आहे. केवळ त्यांच्या कृपेनेच तू या नर-नारायणांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या तपोभूमीत आला आहेस. 

अत्यंत सद्गदित होऊन व्याघ्रेश्वर शर्माने त्या तेजस्वी माहात्म्यास वंदन केले आणि म्हणाला, “ गुरुवर्य, श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू कोण आहेत? त्यांनी माझ्यासारख्या मतिमंद विप्रपुत्रावर एवढी कृपा का केली बरें ?” त्यास दत्तगुरूंची महती सांगतांना ते यती म्हणाले “ अरे, श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्त प्रभूच आहेत. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी “सावित्री काठक चयन” नांवाचा महायज्ञ श्रीक्षेत्र पिठीकापुरम येथे संपन्न केला होता. त्या दिव्य यज्ञाचे फलित म्हणून  पिठीकापुरम येथे श्रीपादप्रभूंनी अवतार घेतला. त्यांची तुझ्यावर पूर्ण कृपादृष्टी आहे.” त्यानंतर त्यांनी व्याघ्रेश्वरास ज्ञानोपदेश केला आणि “ मी लवकरच माझ्या श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी प्रस्थान करीन व पुन्हा एका वर्षाने परत येईन. तोपर्यंत, तू ह्या गुहेत बसून तपश्चर्या कर. श्रीपादांच्या आशीर्वादाने तुला लवकरच आत्मज्ञान प्राप्ती होईल." असे सांगून ते गुरूवर द्रोणागिरी पर्वताकडे प्रयाण करते झाले. 

गुरूंच्या आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या गुहेत तपश्चर्येस बसला. परंतु, तप करतांना त्याचे सर्व ध्यान व्याघ्ररुपाकडे असल्याने त्यास वाघाचे रूपच प्राप्त झाले. आपल्या गुरूंवर दृढ निष्ठा ठेवून त्याची अशी तपश्चर्या एक वर्षभर सुरूच होती. यथावकाश गुरुवर्यांचे तिथे आगमन झाले. ते तेजस्वी महात्मा आपल्या सर्व शिष्यांच्या साधनास्थितीचे अवलोकन करू लागले. परंतु या सर्वांमध्ये त्यांना व्याघ्रेश्वर कोठेच दिसला नाही, तेव्हा त्यांनी अंतर्ज्ञानाने आपल्या शिष्याचा शोध घेतला. त्यानुसार ते एका गुहेत प्रवेशले आणि एक ध्यानस्थ वाघ पाहून हाच आपला शिष्य व्याघ्रेश्वर आहे, हे त्या तपस्व्यांनी क्षणार्धात ओळखले. अत्यंत प्रसन्न होऊन त्यांनी व्याघ्रेश्वरास आशीर्वाद दिला आणि ओंकार मंत्राचे ज्ञान दिले. तसेच, “ श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये ” हा गुरुमंत्रही जपण्यास सांगितला. गुरूंच्या उपदेशानुसार, त्याने मंत्रसाधना सुरु केली. 

पुढें, गुरूंच्या आज्ञेनुसार वाघाच्या रुपातच त्याने कुरुगड्डीस प्रयाण केले. लवकरच तो कुरुगड्डी येथील कृष्णा नदीच्या अलीकडील तीरावर येऊन पोहोचला. तिथेच तो “श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये” या मंत्राचा जप करू लागला. त्यावेळी श्रीपाद प्रभू आपल्या शिष्यांसह कुरुगड्डी ग्रामीं वार्तालाप करीत बसले होते. ते तात्काळ उठले आणि माझा परम भक्त मला हाक मारतो आहे, असे म्हणून ते स्मर्तुगामी नदीच्या पाण्यावरून चालत पैलतीरावर गेले. आपल्या इष्टदेवतेच्या प्रत्यक्ष दर्शनाने सदगदित झालेल्या व्याघ्रेश्वराने श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरणांवर आपले मस्तक टेकवून अत्यंत भक्तीपूर्वक नमन केले. श्रीपाद श्रीवल्लभांनी आपला कृपाहस्त त्या वाघाच्या मस्तकावर ठेवताच त्याचे अष्टभाव जागृत झाले आणि तो भक्तिरसात रंगून गेला. त्यानंतर प्रभू त्या वाघावर स्वार होऊन कृष्णा नदी पार करीत कुरुगड्डीस पोहोचले. श्रीपाद श्रीवल्लभांना अशा प्रकारे वाघावर बसून आलेले पाहून त्यांच्या शिष्यांसहित सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्यांनी प्रभूंचा जयजयकार केला. 

श्रीपादस्वामी वाघावरून उतरता क्षणीच, त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला. त्या तेजस्वी पुरुषाने व्याघ्राजीन काढले. त्यानंतर, श्रीपाद श्रीवल्लभांना श्रद्धापूर्वक नमन करून त्या व्याघ्राजीनाचा त्यांनी आसन  म्हणून स्वीकार करावा अशी प्रार्थना केली. त्यावेळी आत्मानंदी तल्लीन झालेल्या त्या भक्ताच्या नेत्रांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्या अश्रूंनी तो जणू प्रभूंच्या अत्यंत पावन चरणकमलांवर अभिषेकचं करत आहे, असाच भाव तेथे असलेल्या सर्व शिष्यांठायी होता. अत्यंत वात्सल्यतेनें श्रीपाद स्वामींनी आपल्या लाडक्या भक्तास उठविले, आणि मृदू स्वरांत ते बोलू लागले, “ अरे व्याघ्रेश्वरा, पूर्वजन्मात तू अत्यंत बलशाली मल्ल होतास. त्यावेळी तू वाघांशी द्वंद्व करून त्यांना अत्यंत क्रूरपणे त्रास देत होतास. त्या मूक पशूंस जड साखळीने बांधून लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवीत होतास. तसेच, त्यांना पुरेसे अन्न,पाणीही देत नव्हतास. तुझ्या या दुष्कर्मांमुळे तुला अनेक नीच योनींत जन्म घ्यावा लागला. परंतु, माझ्या अनुग्रहाने तुझे पूर्वसंचित नष्ट झाले आहे. तू दीर्घ काळ व्याघ्ररुपात माझी उपासना केल्यामूळे तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल. तुझी योगमार्गांत उत्तरोत्तर प्रगती होऊन तू अत्यंत प्रज्ञावंत होशील. हिमालयातील अनेक गुहांमधून कित्येक हजारो वर्षांपासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे तुला दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील." प्रभूंचे ते आशीर्वचन ऐकून व्याघ्रेश्वर शर्मा अत्यंत कृतार्थ झाला. 

व्याघ्रेश्वर शर्माची ही भक्तीगाथा सांगून ते वृद्ध तपस्वी शंकरभट्टास म्हणाले, " तू पाहिलेला वाघ अन्य कोणी नसून व्याघ्रेश्वर शर्माच होता. श्रीपादांच्या कृपाप्रसादानें हे व्याघ्ररूप धारण करून येथील गुहेत तपश्चर्या करणाऱ्या असंख्य सिद्धपुरुषांचे तो रक्षण करीत होता. तसेच त्यांचे परस्पर वर्तमान कळविण्याचे कार्यसुद्धा करीत होता. खरोखर,  श्रीपाद प्रभूंच्या लीलांचे वर्णन करण्यास कोण समर्थ आहे बरें ?" 

पुढें, शंकरभट्टांनी त्या वृद्ध संन्याशाचा निरोप घेतला. आज त्यांना श्रीपाद प्रभूंच्या एका श्रेष्ठ भक्ताचे दर्शन झाले होते आणि त्या आनंदातच त्यांनी कुरवपुराकडे प्रयाण केलें.               

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय फलश्रुती - सुखप्राप्ती, घरात शांती नांदते. 


*** श्री दत्तप्रभूंचा प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची आरती ***


Nov 2, 2020

श्रीगुरुचरित्र अध्याय - १०


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ ऐकोनि सिद्धाचे वचन । नामधारक विनवी जाण । कुरवपुरींचे महिमान । केवी जाहले म्हणतसे ॥ १ ॥ म्हणसी श्रीपाद नाही गेले । आणिक सांगसी अवतार झाले । विस्तार करोनियां सगळे । निरोपावे म्हणतसे ॥ २ ॥ सिद्ध सांगे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा काय पुससी । अंनतरुपें होतीं परियेसीं । विश्वव्यापक परमात्मा ॥ ३ ॥ पुढें कार्यकारणासी । अवतार झाला परियेसीं । राहिला आपण गुप्तवेषीं । तया कुरवक्षेत्रांत ॥ ४ ॥ पाहें पा भार्गवराम देखा । अद्यापि स्थिर-जीविका । अवतार जाहला आपण अनेका । तयाचेनि परी निश्चयावें ॥ ५ ॥ सर्वां ठायीं वसे आपण । मूर्ति एक नारायण । त्रिमूर्तीचे तीन गुण । उत्पत्ति-स्थिति-लयासी ॥ ६ ॥ भक्तजन तारावयासी । अवतरतो ह्रषीकेशी । शाप दिधला दुर्वासऋषीं । कारण असे तयाचे ॥ ७ ॥ त्रयमूर्तीचा अवतार । त्याचा कवणा कळे पार । निधान तीर्थ कुरवपुर । वास तेथे गुरुमूर्ति ॥ ८ ॥ जें जें चिंतिले भक्तजनीं । लाधती श्रीगुरुदर्शनी । श्रीगुरु राहती जया स्थानीं । कामधेनु असे जाणा ॥ ९ ॥ श्रीपादश्रीवल्लभस्थान-महिमा । वर्णावया मी किमात्मा । अपार असे सांगतां तुम्हां । एखादा सांगेन दृष्टांत ॥ १० ॥ तुज सांगावया कारण । गुरुभक्ति वृथा नव्हे जाण । सर्वथा न करी तो निर्वाण । पाहे वास भक्तांची ॥ ११ ॥ दृढ भक्ति असावी मनीं स्थिर । गंभीरपणे असावे धीर । तोचि उतरे पैलपार । इह सौख्य परलोक ॥ १२ ॥ याचि कारणें दृष्टांत तुज । सांगेन ऐक वर्तले सहज । काश्यपगोत्री होता द्विज । नाम तया 'वल्लभेश' ॥ १३ ॥ सुशील द्विज आचारवंत । उदीममार्गे उदर भरीत । प्रतिसंवत्सरी यात्रेस येत । तया श्रीपाद-क्षेत्रासी ॥ १४ ॥ असतां पुढे वर्तमानीं । वाणिज्या निघाला तो उदिमी । नवस केला अतिगहनीं । संतर्पावे ब्राह्मणांसी ॥ १५ ॥ उदीम आलिया फळासी । यात्रेसि येईन विशेषीं । सहस्र वर्ण-ब्राह्मणांसी । इच्छाभोजन देईन म्हणे ॥ १६ ॥ निश्चय करोनियां मानसीं । निघाला तो द्विज उदीमासी । चरण ध्यातसे मानसीं । सदा श्रीपादश्रीवल्लभाचे ॥ १७ ॥ जे जे ठायीं जातां देखा । अनंत संतोष पावे निका । शतगुणें जाहला लाभ अधिका । परमानंदे परतला ॥ १८ ॥ लय लावूनि श्रीपादचरणीं । यात्रेसि निघाला तत्क्षणीं । करावया ब्राह्मणसंतर्पणी । द्रव्य घेतले समागमे ॥ १९ ॥ द्रव्य घेऊनि द्विजवर । निघतां देखती तस्कर । कपटरुप होऊनि संगतीकर । तेही तस्कर निघाले ॥ २० ॥ दोन-तीन दिवसवरी । तस्कर आले संगिकारी । एके दिवशी मार्गी रात्री । जात होते मार्गस्थ ॥ २१ ॥ तस्कर म्हणती द्विजवरासी । आम्ही जातो कुरवपुरासी । श्रीपादश्रीवल्लभ दर्शनासी । प्रतिवर्षी नेम असे ॥ २२ ॥ ऐसें बोलत मार्गेसीं । तस्करीं मारिलें द्विजासी । शिर छेदूनि परियेसी । द्रव्य घेतले सकळिक ॥ २३ ॥ भक्तजनांचा कैवारी । श्रीपादराव कुरवपुरीं । पावला त्वरित वेषधारी । जटामंडित भस्मांगी ॥ २४ ॥ त्रिशूळ खड्ग येरे हातीं । उभा ठेला तस्करांपुढतीं । वधिता झाला तस्करां त्वरिती । त्रिशूळेंकरुनि तयेवेळीं ॥ २५ ॥ समस्त तस्करांसि मारितां । एक येऊनि विनविता । कृपाळुवा जगन्नाथा । निरपराधि आपण असें ॥ २६ ॥ नेणे याते वधितील म्हणोन । आपण आलो संगी होऊन । तूं सर्वोत्तमा जाणसी खूण । विश्वाचे मनींची वासना ॥ २७ ॥ ऐकोनि तस्कराची विनंति । श्रीपाद त्यातें जवळी बोलाविती । हाती देऊनियां विभूति । प्रोक्षी म्हणती विप्रावरी ॥ २८ ॥ मान लावूनि तया वेळां । मंत्रोनि लाविती विभूति गळां । सजीव जाहला तात्काळा । ऐक वत्सा एकचित्तें ॥ २९ ॥ इतुके वर्तता परियेसीं । उदय जाहला दिनकरासी । श्रीपाद जाहले अदृश्येसी । राहिला तस्कर विप्राजवळी ॥ ३० ॥ विप्र पुसे तस्करासी । म्हणे तूं कां माते धरिलेसी । कवणे वधिले या मनुष्यांसी । म्हणोनि पुसे तया वेळी ॥ ३१ ॥ तस्कर सांगे द्विजासी । जाहले अभिनव परियेसीं । आला होता एक तापसीं । वधिलें यांते त्रिशूळें ॥ ३२ ॥ मातें राखिले तुजनिमित्त । धरोनि बैसविले अतिप्रीत । विभूति मंत्रोनि तूंते लावीत । सजीव केला तुझा देह ॥ ३३ ॥ उभा होता आतां जवळी । अदृश्य जाहला तत्काळी । न कळे कवण मुनि बळी । तुझा प्राण राखिला ॥ ३४ ॥ होईल ईश्वर त्रिपुरारि । भस्मांगी होता जटाधारी । तूं भक्त होशील निर्धारी । म्हणोनि आला ठाकोनियां ॥ ३५ ॥ ऐकोनि तस्कराचे वचन । विश्वासला तो ब्राह्मण । तस्करापाशील द्रव्य घेऊन । गेला यात्रे कुरवपुरा ॥ ३६ ॥ नानापरी पूजा करी । ब्राह्मणभोजन सहस्र चारी । अनंतभक्ती प्रीतिकरीं । पूजा करी श्रीपादगुरुपादुकांची ॥ ३७ ॥ ऐसे अनेक भक्तजन । सेवा करिती श्रीपादस्थान । कुरवपुर प्रख्यात जाण । अपार महिमा परियेसा ॥ ३८ ॥ सिद्ध म्हणे नामधारकासी । संशय न धरीं तूं मानसीं । श्रीपाद आहेति कुरवपुरासी । अदृश्य होऊनियां ॥ ३९ ॥ पुढे अवतार असे होणे । म्हणोनि गुप्त, न दिसे कवणा । अनंतरुप नारायण । परिपूर्ण असे सर्वां ठायीं ॥ ४० ॥ श्रीपादश्रीवल्लभमूर्ति । लौकिकी ऐक्य परमार्थी । झाला अवतार पुढे ख्याती । श्रीनरसिंहसरस्वती ॥ ४१ ॥ म्हणे सरस्वती-गंगाधर । पुढील कथेचा विस्तार । ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्ट साधती ॥ ४२ ॥ ॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे कुरवपुरक्षेत्रमहिमावर्णनं नाम दशमोऽध्यायः ॥ ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥