Jun 30, 2022

कृपा असू दे या दासावर, सद्‌गुरु वासुदेवानंद


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


कृपा असू दे या दासावर । सद्‌गुरु वासुदेवानंद ॥धृ.॥

तव नामाच्या जयघोषाने लाभे आत्मानंद । सद्‌गुरु वासुदेवानंद ॥

धन्य झाले श्री टेंब्ये कुल । माणगांव हे अति पुण्यस्थल ॥१

तिथे जन्मुनी पसरविलास तू । आपुला किर्ती सुगंध । सद्‌गुरु वासुदेवानंद ॥

मानवदेही जणु परमेश्वर । अवतरलासी या भूमीवर ॥२

भक्तांच्या हृदयात रुजविला । आत्मोन्नतीचा कंद । सद्‌गुरु वासुदेवानंद ॥

तुझे आचरण, दिव्य तपोबल । त्यागी जीवन, चरित्र उज्ज्वल ॥३

श्रवणीं पडता जग मायेचे । तुटोनी जाती बंध । सद्‌गुरु वासुदेवानंद ॥

साहित्याची करुनी सेवा । उद्धरण्यास्तव मानवजीवा ॥४

प्रदान केला, निज ग्रंथातुनी आध्यात्मिक मकरंद । सद्‌गुरु वासुदेवानंद ॥

सुबोध त्यातील अमृतवचनें । जागृत करीती आत्मलोचनें ॥५

पढता पढता ज्ञानी बनले । कितीक तरी मतीमंद । सद्‌गुरु वासुदेवानंद ॥

गरुडेश्वरचा अगाध महिमा । मांगल्याची जिथे पौर्णिमा ॥६

तुझ्या दर्शने पावन होत । भाविक भक्तजनवृंद । सद्‌गुरु वासुदेवानंद ॥

नामस्मरणीं चित्त जडावे । जीवा-शिवाचे ऐक्य घडावे ॥७

सहज सुटावा संसारातील आसक्तीचा छंद । सद्‌गुरु वासुदेवानंद ॥

मी अज्ञानी अनाथ म्हणूनी । हीच प्रार्थना करितो चरणीं ॥८

कृपा ओघ तव माझ्यावरचा । कधी न व्हावा बंद । सद्‌गुरु वासुदेवानंद ॥

॥ नमो गुरवे वासुदेवाय ॥

॥ श्री गुरुदेव दत्त

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा


Jun 27, 2022

श्री मार्तंड महिमा ( श्री नाना महाराज तराणेकर चरित्र ) - अध्याय १९


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ श्री सरस्वत्यै नमः ॥ ॐ श्री गुरूदेव दत्तात्रेयाय नमः ॥ हे अत्रिनंदना योगेश्वरा । अनसूया सतीच्या तपास प्रभुवरा । भुलोनी भुवनीं करूणासागरा । त्रयमूर्ति झालासी आनंदानें ॥१॥ ब्रह्मा-विष्णु-महेशमूर्ती । दत्ताची सगुण सत्कीर्ती । अकारणवत्सल या त्रिजगतीं । भक्तारक्षणा अवतरलेली ॥२॥ काळाप्रमाणे अंगीकारोनी । उचीत सर्वहिताय तें करोनी । कर्मभक्तींच्या संगमी दोन्ही । सरस्वती योगाची राखिली गुप्त ॥३॥ पूर्वी सहस्त्रार्जुनासी । उन्मक्तपणे दिधलें वरासी । राखाया प्रभो अपल्या शब्दासी । दंडिलें परशुधर होऊनियां ॥४॥ अवधुतमिषे आपण हिंडोनि । गुणांचे सार अवघ्यापासौनी । कैसे घ्यावें तें आचरोनी । दाविलें करितां चोविस गुरू ॥५॥ वेद धर्माची गहनगाथा । होऊन प्रत्यक्ष योग तत्वतां । साक्षात् तुम्ही श्रीगुरूदत्ता । वस्तुपाठ झाले जगासाठी ॥६॥ 'श्रीगुरूचरित्र' पुण्यपावन । तुमचेच नाथा कथा-जीवन । आजही त्रिजगीं संजीवन । देत आर्त जीवनासी ॥७॥ वेदाधारा भक्तरक्षका । औदुंबरींच्या दत्तनायका । लीलाविनोदें देहा अनेकां । तुम्हीच वत्सले स्वीकारले ॥८॥ करंजनगरीं, अक्कलकोटी । आळंदीसही देवा तुमची भेटी । गरूडेश्वरास नर्मदातटी । आनंदें रमला योगिराया ॥९॥ नारेश्वरीं, करविरपुरीं । हिमाद्रीच्या, गिरिगव्हरी । सह्याद्रिवासी पावन माहुरी । पवित्र निवासें त्रैलोक्य तुझ्या ॥१०॥ आज माऊले नाना रूपें । दिसती नेत्रांसी जगीं स्वरूपे । अनंत धरोनि नामे गौप्यें । क्रीडा नित्य चाले तुमची ॥११॥ देवाधिदेवा श्रीगुरूदत्ता । कैसें पूजन करू समर्था । हृदयीं दाटून आलें आता । अपार तुम्ही, निःशब्द मीही ॥१२॥ पाणावल्या लोचनांसी । अर्घ्यॆं वाहतो मी चरणांसी । लाजुनी वाणी मौनासी । लपते माझी अंर्तमुख ॥१३॥ मागें पुढें खालीं वरतीं । दयाळे तुझ्याच पाहतों मुर्ति । अससी तयांप्रती । अखंड माझे साष्टांग नमन ॥१४॥ घ्यावें अपराधी मी अनन्य । चरणी लेकरूं करूनी मान्य । दिनार्ताचे मंगल शरण्य । तुम्हीच त्रिवार वंदन प्रभो ॥१५॥ श्रोते गुरूमूर्ति नानांच्या । कथा पुण्य जीवनाच्या । निवेदिल्या मी तयांच्या । प्रेमळ आर्शिवचनें तुम्हा ॥१६॥ आचरले वेळोवेळी जाणा । सदभावे ध्यान पूजना । केल्या अनेक देवतांच्या आराधना । गुरुमूर्ति नानांनी ॥१७॥ पूर्वजीवनी श्रीगणेशा । आराधिलें यथासांग मंगलमूर्तीस । पाठ अखंड अथर्वशीर्ष । करोनी आणिलें ध्यान चित्तीं ॥१८॥ ॐ गं गणपतये नमः । या मंत्रास सतत नाना । जपोनी यथाशास्त्र दर्शना । प्राप्त करिती संकल्पिता ॥१९॥ त्रयोदशाक्षरी प्रभुरामाचा । अहर्निश एके काळीं साचा । जप-यज्ञ करोनि मनाचा । नाना उपासिती सीतापति ॥२०॥ उपासना होतां उत्कट । पाहती नाना रघुवीर निकट । तृप्तावूनी मग अम्बेसी नीट । आराधिती नानागुरू ॥२१॥ स्वप्नी जागृतीं अंबामूर्ति । दृष्टांत होतां पुढे वळती । वसुदेव-देवकी लाडक्याप्रति । निष्ठा मनीं धरोनियां ॥२२॥ तें सुगंधित अमर दर्शन । घडतां मानसीं संतोषून । अखंड नाना करिती ध्यान । श्री दत्तांचे मनोभावें ॥२३॥ 'दत्तप्रबोध', 'दत्तपुराण' । गुरूचरित्राचे अनिवार पठण । दत्तमाहात्म्यही आवडतें पूर्ण । आजही लाडके नानांचें तें ॥२४॥ श्रीदत्तांचे बीजमंत्र । दत्तसुतांची वाणी पवित्र । वाचिती ऐकती क्षणमात्र । नाना तल्लीन मनें अति ॥२५॥ श्रीगायत्रीचे पुरश्चरण । पितयापासोनी व्रताचरण । घेती नाना आपुलें जीवन । तप:शुद्ध करावयासी ॥२६॥ कित्येक वर्षापासूनि नक्त । भोजन एकदां घेती फक्त । देंतां प्रेमें कुणी भक्त । स्विकारिती फराळ रात्री ॥२७॥ मातापित्यांच्या वियोगावरी । न धरिती अंगरखा अंगावरी । शुभ्र उपरणे खांद्यावरी । पायींचे चढाव सोडिती तदा ॥२८॥ वीस वर्षापूर्वी नाना । नव्हतें जाणे कुठेही भोजना । स्वयंपाक सोंवळयांत जाणा । करिती त्रिकाल संध्यापूजा ॥२९॥ पहाटे तीनला उठोनियां । स्नानपूजा आवरोनियां । नानांची थोडी दिनचर्या । सांगेन संक्षेपें तुम्हांलागीं ॥३०॥ हरसिद्धीवरी जरी । आपण गेलां आजही निर्धारीं । शुचिर्भुत नानांची स्वारी । आसनीं डोलत पहाल तुम्ही ॥३१॥ मग माध्यान्हीचे वेळी । घेती भोजन सात्विक थाळी । कसली आवड नाही वेगळी । आनंदे सेविती प्रसाद अन्न ॥३२॥ दुपारी वाचन लहर जैसी । प्रिती 'योगवासिष्ठ' ग्रंथासी । 'अध्यात्म रामायण' भागवतासी । विशेष वाचती आवडीने ॥३३॥ उपनिषदांचे सदा मनन । आत्मदेवाचें अनन्य चिन्तन । दत्त नामाचा अन्तरी पूर्ण । श्वासासवें ध्यास त्यांना ॥३४॥ सायंकाळी उतरता दिन । जाती नेमें बाहेर फिरून । आठापूर्वी पुन्हा परतून । त्रिपदी होई गाभाऱ्यात ॥३५॥ दिवसारात्री उघडी दारें । कोणी न अडवेल कधीच सारे । भक्तांचे संतत हे सोयरे । येती केव्हाही दर्शनास ॥३६॥ गुरूवारी अचूक रात्रीसी । दरबार लाडक्यांचा भजनासी । लयलूट भजनांची धुंद मनेंसी । चाले पहाटे पर्यंत कधीं ॥३७॥ गुरूपौर्णिमा श्रीदत्तजयंती । नागपंचमी भक्त प्रेमें करिती । उत्सव कीर्तन अभंग रीतीं । साजरे होती हरसिद्धीस ॥३८॥ अन्नशांती हा नानांचा । आवडीचा संकल्प मनींचा । पुरवितो मात्र श्रीगुरू त्यांचा । सकळ समृद्धी आनंदानें ॥३९॥ विख्यात जागोजागींचे । संत येती घरीं साचे । आवार आनंद कैवल्यांचें । हरसिद्धीवर नांदे पहा ॥४०॥ सुन मुलगा नातू नानांचे । कन्या जामात आदि निकटचे । छत्र आप्तांवरी हास्यांचें । सकळांवरी धरिती नानागुरू ॥४१॥ प्रापंचिक संकटे त्यांनाही । येती खरीच कधीं गृहीं । प्रसन्न मुद्रेनें सर्वास पाही । शांती क्षमाशील नाना ॥४२॥ चहूं दिशांत संचार त्यांचा । वाढला शिष्ययोग भक्तांचा । होतो दरसाल आमंत्रणाचा । वर्षाव दूर ठिकाणाहूनी ॥४३॥ कधीं रंगांत येती नाना । तेव्हांच कथिती भक्तांना । आनंदें कथांच्या लाटांना । येते भरती सहज मग ॥४४॥ रात्री भजनांचे अवसरीं । वाजविती नाना टाळ साजिरी । पाहतां चकीत होतो अंतरी । उत्कट चपळ तालगति ॥४५॥ उपनेत्र मुळी न लागती । आजही नानांसी वाचण्याप्रती । श्रोते ! दोन तासांची विश्रांती । पुरी वाटें अहर्निशीं ॥४६॥ चालती अखंड सुक्ष्मान्तरीं । किया त्यांच्या साक्ष खरी । देतील कित्येक भक्त तरी । आजही प्रत्यय साक्षात ये ॥४७॥ केव्हाही जा, वत्सलतेनें । भक्तांचे कुशल प्रेमानें । पुसती देती आठवणीनें । विभूती नाना भक्तकरी ॥४८॥ जैसी ज्याची उपासना । तैसेंच वदती त्यासवें नाना । कठोरतेचे कधीही ना । नावहीं दिसे सान्निध्यांत ॥४९॥ दिवसा रात्रीं अवेळीही जावें । तरी आनंद शांत दिसावे । नानागुरूंचे पाय पहावे । तृप्त मानसें भक्तीं अवघ्या ॥५०॥ जुने नवे अवघे संत । असो कोणताही पंथा । नानांसी वाटे प्रेम अमित । नांव काढतां त्यांचे पुढे ॥५१॥ पाठान्तर स्तोत्रांचे, अभंगांचे । हिंदुस्थानीही कितीक पदांचें । वेदपाठ ऐकावे ऋचांचे । मुद्दाम एकदा नानामुखें ॥५२॥ ताल, भाव,  उच्चारण । ऐकता आपण होऊं तल्लीन । वाटे वेदोनारायण । बैसला नाना होऊनियां ॥५३॥ देव पतिपत्नी रतलामींचे । सुभेदार कुटुंब पूर्णचि साचें । भिडे, काळे आदि मुंबईचे । आराध्य अवघ्यांचे नानागुरू ॥५४॥ भैय्या-वहिनी प्रेमळ नानांची । अखंडचि प्रत्यंतरें अंतरीची । कितीक लाडक्या भक्तांची । सांगू नांवे अमित खरें ॥५५॥ पवार आबा मृदंग भजनीं । तिवारी देवता नित्य यांनीं । जिंकिला हा चिंतामणी । अनन्य आपुल्या निष्ठेनेंच ॥५६॥ श्रोते! प्रकार रोज अनिवार । घडती जिथें अथांग सागर । काय वर्णू मी हा अवतार । एकनाथांचा खचित वाटें ॥५७॥ पहावें शुद्धमने येऊन । मुद्दाम इंदुरीं हरसिद्धीलागून । ऐकाल जयजयकार पूर्ण । दत्तप्रभूचा अखंड इथें ॥५८॥ धन्य माझें भाग्य आतां । कळसाध्याय तुम्ही ऐकतां । नानाकृपेनेंच ही गाथा । आली सांगतेस पूर्वभाग्यें ॥५९॥ या ग्रंथांची अवतरणिका । अवघे भक्तहो तुम्ही ऐका । आला श्री गजाननांसारिखा । संतराणा जीवनीं धन्य ॥६०॥ श्रीदत्तजयंतीचे योगावरी । स्फुर्ति गजाननें मला खरी । दिधली आणि संपूर्ण सारी । केली श्रीगुरूनानांनीं ती ॥६१॥ वंदन विनम्र सद्‌गुरूंसी । माझ्या हृदयींच्या गजाननासी । शारदामाता कुलदेवांसी । संतमुर्ति आळविल्या मीं ॥६२॥ नानागुरूंचा कुलवृतांत । सद्‌गुरूंची परंपरा सांगत । माता-पित्याची शुचिर्भुत । जीवनें कशी ती बोलिलों हो ॥६३॥ नागपंचमीचा गुरूवार । अवतरले नाना अवनीवर । बाळपणींच्या आवडी साचार । कथिल्या अवघ्या प्रथमाध्यायीं ॥६४॥ उपनयन अध्ययन नानांचें । उपासनेचे आर्त मनींचे । वेडे कैसे गुरूकृपेचे । द्वितीयाध्यायीं नाना पहा ॥६५॥ कठोरतेनें सप्ताह वाचन । करितां आले दुरूनि धावून । सद्‌गुरुमूर्ति वासुदेव जाण । पावन कथा ही नानांची ॥६६॥ मातोश्री तीर्थरूप देवाघरीं । भार घरांतील नानांवरी। तत्पुर्वी प्रथम लग्नाची घटना सारी । कथिली असे तृतियाध्यायीं ॥६७॥ ज्येष्ठ पुत्रजन्मांनंतरीं । पत्नी दैवें नानांची अंतरली । द्वितीय पत्नीही ये संसारी । अल्प काळचि नानांचिया ॥६८॥ कन्या देऊनि लहान साजिरी । लगेच पुढे तीही निर्वर्तली । संसार माया इथेंच सरली । नानाजीवनींची सदासाठी ॥६९॥ वामनबुवा योगी मंदिरीं । अचानक आले देऊनी । योगानंद सुख गेलेनी । कथा ही चतुर्थासी ॥७०॥ नानागुरूंचा छंद जाणा । जाती एकटे यात्रेस गहना । काशीपुरीस वृंदावना । स्वच्छंदतेने पाहती सर्व ॥७१॥ श्री शंभुची दिव्य विभूति । गोपालाची गोजिरी मूर्ति । भाग्यें नाना दर्शनें घेती । पंचमात या अद्भुत कथा ॥७२॥ जलेरी प्रदक्षिणा नर्मदेचि । विख्यात देवता भूमंडळींची । करिती नाना महंत मठाची । कथा आली षष्ठाध्यायीं ॥७३॥ अथांग सुंदर रेवामाई । काठांनें पहात नाना पायीं । पंथांत शिवमंदिरीं होई । मुक्त ब्रह्मसमंध एक ॥७४॥ थकले नाना परिकमेंत । आली अन्नपूर्णा रेवा सत्य । दुग्धकलशा आणुनी देत । कथा रमणीय सप्तमात ॥७५॥ नाना गेले, बद्रिकेदारी । हिमाद्रीच्या कुशिमाझारी । गुंफेंत सिद्धांची दर्शनें सारी । घडली त्यांना अनिवार ॥७६॥ द्वापारींचे योगी सिद्ध ।गुंफेंत तपस्या करीत शुद्ध । भेटीत नानांचे मानस विशुद्ध-। ज्ञानें भरलें रात्रभरी ॥७७॥ गंगोत्रीस न्यावें विनवितां । गिरीकंदरां निमिषांत तत्वतां । ओलांडुनी नानांस झाले आणितां । गंगेवरी अष्टमांत ॥७८॥ गिरनारी सौराष्ट्र प्रांतांत । आले फिरत फिरत । नाथ दर्शनार्थ चढत । माथा गिरीचा अनोळखी तो ॥७९॥ अवधुतांचे साहाय्य तिथें । अश्वत्थामा अवचित भेटे । साक्षात् अनसूया मातेश्वरीतें । वंदिती नाना यात्रेंत त्या ॥८०॥ श्रीगुरूंचे नव्हतें दर्शन । गरूडेश्वरीं मुद्दाम म्हणुन । निघाले नाना पूर्तता जाण । नवमोध्यायाची होय इथें ॥८१॥ गरूडेश्वरासी पुण्यतिथीस । पोंचले नाना, रम्य खास । वृतांत तो घेती प्रसादास । समाधीवरील पावन-मनें ॥८२॥ गाणगापुरी निवास करिती । सप्ताह साधना चरणीं वाहती । यतिपूजनासी पुजारी नेती । गाभाऱ्यातही नानागुरूंना ॥८३॥ हा अवघा अलौकिक । वृतांत पहावा आणिक । नाना छाबडा नामक । खेडयांत जाती दशमाध्यायीं ॥८४॥ प्रभु राघवांची दिव्यलीला । दिसते मंदिरीं नानालोचनाला । आचार्य यज्ञांचे वैश्वानराला | प्रगट करिती ऐनवेळीं ॥८५॥ शक्तीस्वाहाकार कथा । विश्वासें घडली सर्वथा । मधमाशांची प्रचिती भक्तां । अकराव्यांत आली हो ॥८६॥ संत चैतन्याच्या अवघ्या भेटी । द्वादशाध्यायासी येती । संत भगवंताच्या मूर्ती । जागोजागी विख्यात ज्या ॥८७॥ नानागुरूंसी एकांतीं । पुसतां बोलले कृपामूर्ती । कैवल्य ज्ञान साधन रीती । तेराव्यांत कथिली प्रसन्नपणे ॥८८॥ तोच संवाद विदेही नानांचा । चिदब्रह्माच्या विलासाचा । पुढे चाले कथिती हृदयींचा । शांत भाव चवदाव्यांत ॥८९॥ होळकराच्या आदेशानें । राहिले नाना सोडुनी तराणें । श्रीमंत कार्यार्थ राहणें । घडले त्यांचे बराच काळ ॥९०॥ श्रीमंत तुकोजींनी भली । सदभावें सोय सारी केली । अहिल्येच्या वंशजाघरीं । पंधराव्यांत राहती नानागुरू ॥९१॥ तराण्यासी लागून । नाना उद्वेगले मनांतून । इंदुरासी त्यांचे आगमन I पुढे राहणे भैय्यासवें ॥९२॥ अनसूयामाता सिन्नोरची । तृप्तविलीं अंतरे भक्तांची । अन्नपूर्णाचि होऊनि मार्गीची । कथा ही नाना यात्रेंतील ॥९३॥ नंतर देशपांडे बाळांची । विचित्र भयभीत मनःस्थितीची । ओळख करूनी सोळाव्याची । अखेर होई न पूर्ण कथा । स्थित्यंतर ये अकस्मात । साधना करविती नानागुरू ॥९५॥ यज्ञांतली मांत्रिककथा । बाळांवरी ती ओढवतां । नाना निवारिती संकटा । दिसती यात्रेंस रखमाईस ॥९६॥ चिमणलाल मास्तरांची । माहिती भोळया देवतांची । दुग्धकथा ती कोजागिरीची । वर्णिली श्रोते अठराव्यांत ॥९७॥ अष्टादश या नाना कळांचा । अध्याय सुंदर हा कळसाचा । दिनकम अवघा नानागुरूंचा । संक्षेपे म्यां कथिला इथें ॥९८॥ ही अदभुत नानाकथा । आनंद अनिवार झाला चित्ता । वैखरीस आली धन्यता । प्रसंग इथें परोपरींचे ॥९९॥ बडोद्याहुनी भक्तांनीं । लिहीली नानांस विचारूनी । टांचणे ती मजलागुनि । दिली आणून बाळांनींच ॥१००॥ त्या आधारे ग्रंथ लिहिला । प्रत्येक त्यांतल्या माहितीला । पुसोनी नानांस पक्का केला । कथाभाव अध्यायींचा ॥१०१॥ उपयोग ना केला कल्पनेचा । इतुकाही म्यां येथे साचा । गहन नाना जीवनाचा । अर्थ वदलो माझ्यापरी ॥१०२॥ जे लिहविलें तैसेंच लिहिलें । साक्षी सद्‌गुरूंस सदा ठेविलें । लेखणिनें नानांस सदा ध्यायिलें । लेखनाचे कार्य करितां ॥१०३॥ हा प्रसाद माना नानांचा । आनंद माझ्या जीवनाचा । नित्यासाठी जगीं साचा । होवो आतां मंगलमय ॥१०४॥ सद्‌गुरु माझे गजानन । पाहतों नाना मी साक्षात् पूर्ण । तुमच्यांत, आता या वत्सालागुन । धरावें चरणीं वात्सल्याने ॥१०५॥ आशिर्वाद उदंड द्यावें । वाचितां ग्रंथास मनोभावें । संकटीं भक्तांच्या धावूनी यावें । करूणामया मार्तंडनाथा ॥१०६॥ आदरें करितां पारायण । द्यावें आपुलें प्रसन्न दर्शन । हरावें भवभय निरसोन । भीती भक्त-चित्तांतली ॥१०७॥ रामनवमीच्या नवरात्रांत । शुद्ध सप्तमीच्या तृतिय प्रहरांत । शके अठराशें ब्याण्णवांत । ग्रंथ कळसास आला पहा ॥१०८॥ असो त्रिवार शांती आतां । वंदन तुम्हांसी सद्‌गुरुनाथा । मार्तण्डाची गाथा गातां । विजय लेखणी पावन आज ॥१०९॥ शुभं भवतु ॥ ॥ इति श्री एकोनविंशोऽध्यायः समाप्तः ॥  ॥ पुंडलिक वरदा हरि विठ्ठल ॥ ॥ सीताकांत स्मरण जय जय राम ॥ ॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥ ॥ नर्मदे हर हर हर ॥


सौजन्य : https://shantipurush.org/


Jun 23, 2022

स्मरता जो भक्तां भेटे... श्री दत्तात्रेय ध्यान आणि वाङ्मय संग्रह


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

दत्तभक्तहो, श्रीगुरुचरित्राची प्रासादिकता तर सर्वश्रुत आहेच. श्री प. प. वासुदेवानंद सरस्वतीमहाराजांच्यासारख्या अवतारी, साक्षात्कारी प्रभुतींनी प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंच्या आज्ञेने आणि अर्थातच आशीर्वादाने या परमपवित्र आणि दिव्य ग्रंथाचे संस्कृतमध्ये संक्षिप्त भाषांतर केले. या गीर्वाणवाणीचे वैशिष्ट्य असे की कमीत कमी शब्दांत अधिक आशयपूर्ण आणि रसाळ वर्णन सहजच करता येते. याउपर, सिद्धहस्त रचनाकार श्री प. प. वासुदेवानंद सरस्वतीमहाराज म्हणजे दत्तोपासकांसाठी हा खचितच दुग्ध-शर्करा योग आहे. श्री टेम्ब्ये स्वामीरचित श्रीगुरुचरितं (द्विसाहस्त्री) हा असाच एक भक्तिरसपूर्ण ग्रंथ आहे. या वेदतुल्य अशा दिव्य ग्रंथाचे माहात्म्य अधोरेखित करतांना श्री टेम्ब्ये स्वामीमहाराज लिहितात, ' स एवात्रेयगोत्रोत्थगणेशब्रह्मपुत्रगाः । पुनानोऽर्यो जयत्यत्र ग्रंथात्मा तारकोऽव्ययः ' अर्थात, तोच (नामधारक म्हणजेच सरस्वती गंगाधरलिखित) श्रीगुरुचरित्रग्रंथरूपी परब्रह्मस्वरूप, भक्तवत्सल श्रीदत्तात्रेय या अत्रिगोत्रोत्पन्न गणेशब्राह्मणाच्या पुत्राच्या वाणीचे निमित्त करून इथे पुन्हा प्रगटला आहे. श्रीगुरुचरित्राच्या पठणाने वा श्रवणाने दत्तभक्तांचा इह-पर अभ्युदयच होईल, ही ग्वाहीच जणू श्री प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी दिली आहे.
याच कल्याणकारी ग्रंथातील श्री दत्तप्रभूंचे ध्यानपर काही श्लोक पाहू या. या वरदप्रद श्लोकांचे नित्य पठण करून श्री दत्तात्रेयांच्या ध्यानमूर्तीचे पूजन करावे. हे ध्यान द्विभुज असून श्रीदत्तमहाराजांच्या चरणद्वयांपासून आरंभ करून शेवटी त्यांच्या दिव्य मुखकमलाचे वर्णन केले आहे. स्वामींच्या आराध्यदेवतेचे हे ध्यान दिगंबर असून ह्यांत कोणत्याही वस्त्र, आयुध किंवा आभरणें यांचे वर्णन नाही. श्री टेम्ब्ये स्वामी महाराजविरचित श्रीदत्तात्रेय वज्रकवचांत श्री दत्तप्रभूंचे साधारण असेच स्वरूप-वर्णन आहे. त्यांना श्री दत्तात्रेयांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर केलेले हे वर्णन आहे. अर्थातच याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.   

स त्वं परात्मा पुरुषोत्तम श्रुति-ख्यातः समाविश्य जगत्त्रयं सदा । ईशाव्ययानन्त बिभर्षि दत्त ते पादाब्जयुग्माय नमोऽस्तु सर्वदा ॥१॥  वज्राङ्कुशध्वजाब्जाड़्क-युग्रक्ताब्जाभपत्तलः। गूढगुल्फः कूर्मपृष्ठोल्लसत्पादोपरिस्थलः ॥२॥ जानुपूर्वकजङ्घश्च विशालजघनस्थलः । पृथुश्रोणिश्च काकुत्स्थश्चारुनाभिर्दलोदरः ॥३॥  अररोरा मांसलांसो युगव्यायतबाहुकः । सुचिह्नचिह्नितकरः कम्बुकण्ठः स्मिताननः ॥४॥ 

स्नैग्ध्यधावल्ययुक्ताक्षश्चलत्-पिङ्गजटाधरः। चन्द्रकान्तिः प्रभुः कृष्ण-भ्रूरःश्मश्रुकनीनिकः ॥५॥

भावशुद्धद्विजाकीर्ण-स्वास्याब्जोऽभीवरप्रदः । दत्तात्रेयः स भगवान्सदा वसतु मे हृदि ॥६॥

भावार्थ : सर्वांतर्यामी, क्षर-अक्षर अर्थात सर्व जड-स्थावर-चेतन पदार्थांचा नियंता, वेदश्रुतींनी पुरुषोत्तम असे समर्पक वर्णन केलेला, त्रैलोक्यव्यापी, पालनकर्ता, अव्यय आणि अनंत ईश्वररूपी असा तू परमात्मा आहेस. तुझ्या या भवतारक चरणद्वयांना सतत वंदन असो.  वज्र, अंकुश, ध्वजा आणि पद्म या शुभ चिह्नांनी युक्त, लाल कमळाप्रमाणे आरक्त तळवे, पदांचा वरील भाग कांसवाच्या पाठीसारखा फुगीर आणि टांचा झांकलेले असे ज्याचे चरण आहेत, ज्याने मांडीच्या वरच्या भागावर एक पाय ठेवलेला आहे, स्थिर आणि विशाल बैठकीवर सिद्धासन घालून जो बसलेला आहे, जो दिगंबर आहे, ज्याच्या पिंपळाच्या पानाप्रमाणे पातळ अशा उदरावर (पोटावर ) शोभायमान नाभी आहे, तसेच रुंद छाती असलेला, मांसल आणि विशाल स्नायूयुक्त असे द्विबाहू असलेला, ज्याचे हात शुभचिन्हांनी मंडित आहेत, ज्याचा कंठ एखाद्या शंखाप्रमाणे तीन वलयांनी युक्त आहे, प्रसन्न चेहऱ्यावर मधुर स्मित विलसत आहे, ज्याचे नयन अतिशय तेजस्वी आणि कृपार्द्र आहेत, (ज्याच्या कपाळावर) पिंगट अशा जटा रुळत आहे, चंद्राप्रमाणे ज्याची कांती दिव्य आहे, ज्याच्या भुवया, छाती, दाढीमिशा आणि डोळ्यांतील बुबुळे काळी आहेत, सुंदर अशा दंतपंक्तीने ज्याचे मुखकमल शोभत आहे, आणि आपल्या दोन वरदहस्तांनी, आपल्या भक्तांना सर्वदा अभय तसेच वरदान देणारा तो अत्रि-अनसूयानंदन श्री दत्तप्रभू सदैव माझ्या हृदयांत वास करो. 
श्री दत्तात्रेय-स्वरूप वर्णनपर श्री टेम्ब्ये स्वामीमहाराजविरचित अशीच एक भक्तीरसपूर्ण पदरचना दत्तभक्तांसाठी देत आहोत.      चिंतूं दत्तात्रेया अनसूयातनया । श्रुतिगणगेया ध्येया वंद्या ॥१॥ वराभयकर सिद्धासनावर । बसे निरंतर सुरवर्य ॥२॥ जो खेचरी मुद्रा लावी सोडी तंद्रा । सदा योगनिद्रा मुद्रायुक्त ॥३॥ प्रफुल्ललोचन सुहास्यवदन । दयेचें सदन मनमोहन ॥४॥ स्मरता जो भक्तां भेटे वासुदेव । स्वचित्ती सदैव भावें चिंती ॥५॥ श्री दत्तात्रेय वाङ्मय संग्रह
दत्तभक्तांसाठी अत्यंत अमौलिक असा वाङ्मय संग्रह आतां उपलब्ध झाला आहे. श्री दत्तात्रेयांचे स्वरूप, इतिहास, दत्तचरित्र, श्री दत्तात्रेयांचे अवतार, श्री दत्तोपासना, श्रीदत्तक्षेत्रें, प्रमुख दत्तभक्त आणि त्यांची ग्रंथसंपदा अशा अनेक विषयांचे सुरेख विवेचन आणि दत्तभक्ती वृद्धिंगत करणारे हे संदर्भग्रंथ दत्तभक्तांना नित्य उपयुक्त होतील. श्री दत्तप्रभूंची ही वाङ्मयपूजा त्यांच्याच चरणीं समर्पित!  

दत्तात्रेयः स भगवान्सदा वसतु मे हृदि ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


Jun 21, 2022

श्रीवासुदेवानन्दसरस्वतीस्वामीविरचितं मानसपूजास्तोत्रं


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


ध्यायेत् सद्‌गुरुमासनं मणिमयं पाद्यं सुतीर्थोदकं । अर्ध्यं गंधसुमाल्यमाचमनकं गंगाजलैरर्पितं ॥ स्नानं पौरुषसूक्तरुद्रसलिलै: श्वेतांबरं भूषणं । मुक्ताशुक्तिसुवर्णचंदनमिदं श्वेतं सुपुष्पं वरं ॥१॥ धूपं दीपकमाज्यवर्तिसहितं नैवेद्यकं सुंदरं । भक्ष्यं पंचविधं फलं बहुविधं तांबूलकं दक्षिणां ॥ कर्पूरं सुमनांजलिं भ्रमणकं पादांबुजे वंदनं । भक्त्या गायननृत्यनादरुचिरं राजोपचारादिकं ॥२॥ सर्व मानसकल्पितं सुखनिधे स्वीकृत्य सर्वेश्वर । मच्छोकं जहि बालके कुरु दयां मामुद्धराज्ञानत: ॥ माता त्वं च पिता सखा सुहृदपि स्वामी च त्वं मे गुरो क्षंतव्या: सकलापराधनिवहा: पूजानभिज्ञस्य मे ॥३॥ ॥ इति श्रीपरमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानन्दसरस्वतीस्वामीविरचितं मानसपूजास्तोत्रं सम्पूर्णम् ॥


Jun 16, 2022

॥ आरती दत्तात्रेय प्रभूंची । करावी सद्‌भावें साची ॥


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


आरती दत्तात्रेय प्रभूंची । करावी सद्‌भावें साची ॥धृ.॥

श्रीपद कमळा लाजविती । वर्तुळ गुल्फ रम्य दिसती ॥ कटिस्थित कौपिन ती वरती । छाटी अरुणोदय परि ती ॥ वर्णूं काय तिची लीला ?। हीच प्रसवली । मिष्ट अन्न बहु । तुष्टचि झालें ॥ ब्रह्म-क्षत्र आणि । वैश्य-शूद्रही । सेवुनिया जीची । करावी सद्‌भावें साची ॥१॥ गुरुवर सुंदर जगजेठी । त्याच्या ब्रह्मांडें पोटीं ॥ माळा अवलंबित कंठीं । बिंबफळ रम्य वर्ण ओष्ठीं ॥ अहा ती कुंदरदन शोभा । दंड कमंडलु शंख चक्र करि ।

गदा पद्म धरिं । जटा मुकुट शिरीं । शोभतसे ज्याची ॥ करावी सद्‌भावें साची ॥२॥ रुचिरा सौम्य युग्म दृष्टी । जिनें द्विज तारियला कुष्ठी ॥ दरिद्री ब्राह्मण बहु कष्टी । केला जिनेंच संतुष्टी ॥ दयाळा किती म्हणुनि वर्णूं । वंध्या वृद्धा । तिची सुश्रद्धा ।

पाहुनि विबुधा । पुत्ररत्‍न जिस । देऊनियां सतिची ॥ इच्छा पुरवियली मनिंची ॥३॥ देवा अघटित तव लीला । रजकहि चक्रवर्ति केला ॥ दावुनि विश्वरूप मुनिला । द्विजोदरशूल पळें हरिला ॥ दुभविली वांझ महिषी एक । निमिषामाजीं । श्रीशैल्याला ।

तंतुक नेला । पतिताकरवीं । वेद वदविला ॥ महिमा अशी ज्याची ॥४॥ वळखुनी शूद्रभाव चित्तीं । दिधलें पीक अमित शेतीं ॥ भूसुर एक शुष्क वृत्ती । क्षणार्धें धनद तया करिती ॥ ज्याची अतुल असे करणी । नयन झांकुनी । सवें उघडितां ।

नेला काशीस । भक्त पाहतां ॥ वार्ता अशी ज्याची ॥५॥ दयाकुल औदुंबर मूर्ती । नमितां होय शांत वृत्ती ॥ न देति जनन मरण पुढती । सत्य हें न धरा मनीं भ्रांती ॥ सनातन सर्वसाक्षि ऐसा । दुस्तर हा भव । निस्तरावया ।

जाऊनि सत्वर । आम्ही सविस्तर ॥ पूजा करूं त्याची ॥६॥ तल्लिन हो‍ऊनि गुरुचरणीं । जोडुनि भक्तराज पाणि ॥ मागे हेंचि जनकजननी । आता मजला ठाव देई चरणीं ॥ नको मज दुजें आणिक कांहीं । भक्तवत्सला । दीनदयाळा ।

परमकृपाळा । श्रीपदकमळा । दास नित्य ज्याची ॥ उपेक्षा करूं नको साची ॥७॥


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥


Jun 3, 2022

श्री रंगनाथ स्वामीकृत श्री गुरुगीता (प्राकृत)


मूळ संस्कृतमध्ये असलेली गुरुगीता प्रथमत: भगवान् श्रीशंकरांनी भगवती पार्वतीमातेस सांगितली. श्री. रामचंद्र कृष्ण कामत संशोधित श्रीगुरुचरित्रामध्यें एकोणपन्नासाव्या अध्यायांत तिचा समावेश करण्यात आला आहे. या दिव्य आणि गुरुकृपेची सत्वर अनुभूती देणाऱ्या गुरुगीतेचा श्रीरंगनाथ स्वामींनी अतिशय सुंदर, सुगम आणि रसाळ असा मराठी ओवीबद्ध अनुवाद केला आहे. या गुरुगीतेच्या पठणाने सर्व श्रद्धावंतांस श्रीदत्तप्रभूंचा आशिष सदैव लाभावा, हीच प्रार्थना ! 

॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीसद्‌गुरु निजानंदाय नम: ॥ श्री सद्‌गुरु रंगनाथाय नमः ॥   ॐ नमो सद्‌गुरु परब्रह्म । तूं निर्विकल्प कल्पद्रुम । हरह्रदयविश्रामधाम । निजमूर्ति राम तूं स्वयें ॥१॥ तुझा अनुग्रह जयां घडे । तयां नाही कांही सांकडे । दर्शने मोक्षद्वार उघडे । तुझेनि पडिपाडें तूंचि तूं ॥२॥ कोणे एके दिवशी । श्रीसदाशिव कैलासी । ध्यानस्थ असे तो मानसीं । पुसे तयासी पार्वती ॥३॥ जयजयाची परात्परा । जगद्‌गुरु कर्पूरगौरा । गुरुदीक्षा निर्विकारा । श्रीशंकरा मज देई ॥४॥ कवणे मार्गें जी स्वामी । जीव परब्रह्म होती तें मी ।पुसतसें तरी सांगिजे तुम्ही । अंतर्यामीं कळे ऐसें ॥५॥ कृपा करावी अनाथनाथा । म्हणोनि चरणीं ठेविला माथा ।नासोनिया भवव्यथा । कैवल्य पथा मज दावी ॥६॥ ईश्वर म्हणे वो देवी । तुझी आवडी मातें वदवी । लोकोपकारक प्रश्न पूर्वी । देवी दानवीं जो न केला ॥७॥ तरी दुर्लभ या त्रिभुवनांत । ते तूं ऐके वो सुनिश्चित । सद्‌गुरु ब्रह्म सदोदित । सत्य सत्य वरानने ॥८॥ वेद शास्त्र पुराणा । मंत्रतंत्रादि विद्या नाना । करितां तीर्थव्रत-तप-साधना । भवबंधमोचना न पावती ॥९॥ शैव शाक्त आगमादिकें । अनेक मतें अपभ्रंशकें । समस्त जीवा भ्रांतिदायके । मोक्षप्रापकें नव्हतीच ॥१०॥ जया चाड पराभक्ती । तेणे सद्‌गुरु सेवावा एकांती । गुरुतत्त्व न जाणती । मूढमती जन कोणी ॥११॥ होवोनि नि:संशय । सेवावे सद्‌गुरुपाय । भवसिंधु तरणोपाय । तत्काळ होय जडजीवां ॥१२॥ गूढ अविद्या जगन्माया । अज्ञान संहारित जीवा या । मोहांधकारा गुरुसूर्या । सन्मुख यावया मुख कैंचें ॥१३॥ जीव ब्रह्मात्व त्याचिये कृपा । होती, निरसुनी सर्वपापा । सद्‌गुरु-स्वयंप्रकाशदीपा । शरण निर्विकल्पा रिघावें ॥१४॥ सर्व तीर्थाचें माहेर । सद्‌गुरुचरणतीर्थ निरंतर । सद्‌भावें सच्छिष्य नर । सेवितां परपार पावले ॥१५॥ शोषण पापपंकाचें । ज्ञानतेज करी साचें । वंदितां चरणतीर्थ सद्‌गुरुंचें । भवाब्धीचें भय काय ॥१६॥ अज्ञानमूलहरण । जन्मकर्मनिवारण ।ज्ञानसिद्धीचें कारण । गुरुचरणतीर्थ तें ॥१७॥ गुरुचरणतीर्थ-प्राशन । गुरुआज्ञा उच्छिष्टभोजन । गुरुमूर्तीचें अंतरी ध्यान । गुरुमंत्र वदनीं जपे सदा ॥१८॥ गुरुसान्निध्य तो काशीवास । जान्हवी चरणोदक नि:शेष । गुरु विश्वेश्वर निर्विशेष । तारकमंत्र उपदेशिता ॥१९॥ गुरुचरणतीर्थ पडें शिरीं । प्रयागस्नान तें निर्धारी । गयागदाधर सबाह्यांतरी । सर्वांतरी साधका ॥२०॥ गुरुमूर्ति नित्य स्मरे । गुरुनाम जपें आदरे । गुरुआज्ञापालन करे । नेणिजे दुसरें गुरुविना ॥२१॥ गुरुस्मरण मुखी राहे । गुरुनाम तोचि ब्रह्मरुप पाहे । गुरुमूर्ति ध्यानी बाहें । जैशी कां हें स्वैरिणी ॥२२॥वर्णाश्रमधर्म सत्कीर्ति । वाढवावी सद्वृत्ति । अन्यत्र त्यजोनियां गुंती । सद्‌गुरुभक्ति करावी ॥२३॥ अनन्यभावें गुरुसी भजतां । सुलभ परमपद तत्त्वतां । तस्मात्सर्वप्रयत्नें आतां । सद्‌गुरुनाथा आराधीं ॥२४॥ गुरुमुखीचे महावाक्य-बीज । गुरुभक्तीस्तव लाभे सहज । त्रैलोक्यी नाचे भोज । तो पूज्य होय सुरनरां ॥२५॥ गुकार तो अज्ञानांधकार । रुकार वर्ण तो दिनकर । स्वयंप्रकाश-तेजासमोर । न राहे तिमिर क्षणभरीं ॥२६॥ प्रथम गुकार शब्द । गुणमयी मायास्पद । रुकार तो ब्रह्मानंद । करी विच्छेद मायेचा ॥२७॥ ऐसे गुरुपद श्रेष्ठ । देवां दुर्लभ उत्कृष्ट । गणगंधर्वादि वरिष्ठ । महिमा स्पष्ट नेणती ॥२८॥ शाश्वत सर्वी सर्वदाही । गुरुपरतें तत्त्व नाही । कायावाचामने पाही । जीवित तेंही समर्पावें ॥२९॥ देहादि भुवनत्रय समस्त । इतर पदार्थ नाशिवंत । वंचोनिया विमुख होत । अध:पात घडे तया ॥३०॥ म्हणोनि आराधावा श्रीगुरु । करोनि दीर्घदंड नमस्कारु । निर्लज्ज होऊनिया परपारु । भवसागरु तरावा ॥३१॥ ' आत्मदारादिकं चैव ' । निवेदन करुनि सर्व । हा नाही जयां अनुभव । तयांस वाटे अभिनव वरानने ॥३२॥ जे संसारवृक्षारुढ झाले । पतन नरकार्णवी पावले । ते गुरुरायें उद्धरिले । सुखी केले निजभजनीं ॥३३॥ ब्रह्मा विष्णु सदाशिव । गुरुरुप ते स्वयमेव ।गुरु परब्रह्म सर्वथैव । गुरुगौरव न वर्णवे ॥३४॥ अज्ञानतिमिरें अंध । ज्ञानांजन-शलाका प्रसिद्ध । दिव्य चक्षु शुद्धबुद्ध । महानिधी दाखविला ॥३५॥ अखंड मंडलाकार । जेणे व्यापिले चराचर । तये पदीं केले स्थिर । नमस्कार तया गुरुवर्या ॥३६॥ श्रुतिसार शिरोरत्न । चरणांबुज परम पावन । वेदांत-कमलिनीचिद्‌भानु । तया नमन गुरुवर्या ॥३७॥ ज्याचे स्मरणमात्रें ज्ञान । साधकां होय उत्पन्न । ते निजसंपत्ति जाण । दिधली संपूर्ण गुरुरायें ॥३८॥ चैतन्य शाश्वत शांत । नित्य निरंजन अच्युत । नादबिंदु कलातीत । नमन प्रणिपात गुरुवर्या ॥३९॥ ज्ञानशक्तिसंमारुढ । तत्वमाला-भूषित दृढ । भुक्तिमुक्तिदाता प्रौढ । सद्‌गुरु गूढ सुखदानीं ॥४०॥ अनेक जन्मीचे सुकृत । निरहंकृति निर्हेत । तरीच प्रबोध प्राप्त । जरी श्रीगुरुहस्त मस्तकी ॥४१॥ जगन्नाथ जगद्‌गुरु एक । तो माझा स्वामी देशिक । ममात्मा सर्वभूतव्यापक । वैकुंठनायक श्रीगुरु ॥४२॥ ध्यानमूल गुरुराय । पूजामूल गुरुपाय । मंत्रमूल नि:संशय । मोक्षमूल गुरुकृपा ॥४३॥ सप्तसिंधू अनेक तीर्थी । स्नानेंपाने जे फलप्राप्ती । एक बिंदूसम न पावती । सद्‌गुरुचरणतीर्थाच्या ॥४४॥ ज्ञानेवीण सायुज्यपद । अलभ्य लाभें अगाध । सद्‌गुरुभक्तीने प्रबोध । स्वत: सिद्ध पाविजे ॥४५॥ सद्‌गुरुहूनि परात्पर । नाही नाही वो साचार । ' नेति ' शब्दे निरंतर । श्रुतिशास्त्रे गर्जती ॥४६॥मदाहंकार-गर्वेकरुनी । विद्या तपाबळान्वित होवोनि । संसारकुहरावर्ती पडोनी । नाना योनी भ्रमताति ॥४७॥ न मुक्त देवगणगंधर्व । न मुक्त यक्षचारणादि सर्व । सद्‌गुरुकृपेने अपूर्व । सायुज्यवैभव पाविजे ॥४८॥ ऐके वो देवी ध्यानसुख । सर्वानंदप्रदायक । मोहमायार्णवतारक । चित्सुखकारक श्रीगुरु ॥४९॥ ब्रह्मानंद परमाद्भुत । ज्ञानबिंदुकलातीत ।निरतिशयसुख संतत । साक्षभूत सद्‌गुरु ॥५०॥ नित्य शुद्ध निराभास । नित्यबोध चिदाकाश । नित्यानंद स्वयंप्रकाश । सद्‌गुरु ईश सर्वांचा ॥५१॥ ह्रदयकमळी सिंहासनी । सद्‌गुरुमूर्ति चिंतावी ध्यानीं । श्वेतांबर दिव्यभूषणी । चिद्‌रत्नकिरणीं सुशोभित ॥५२॥ आनंदानंदकर प्रसन्न । ज्ञानस्वरुप निजबोधपूर्ण । भवरोगभेषज जाण । सद्‌वेद्य चिद्घन सद्‌गुरु ॥५३॥ सद्‌गुरुपरते अधिक काही । आहे ऐसा पदार्थ नाही । अवलोकितां दिशा दाही । न दिसे तिहीं त्रिभुवनीं ॥५४॥ प्रज्ञाबळे प्रत्योत्तर । गुरुसि विवादती जे नर । ते भोगती नरक घोर । यावच्चंद्र-दिनमणी ॥५५॥ अरण्य निर्जल स्थानीं । भ्रमती ब्रह्मराक्षस होऊनि । गुरुसी बोलती उद्धट वाणी । एक वचनी सर्वदा जे ॥५६॥ क्षोभतां देव ऋषि काळ । सद्‌गुरु रक्षी न लागतां पळ । दीननाथ दीनदयाळ । भक्तवत्सल सद्‌गुरु ॥५७॥ सद्‌गुरुचा क्षोभ होता । देव ऋषिमुनि तत्त्वतां । रक्षिति हे दुर्वार्ता । मूर्खही सर्वथा नायकती ॥५८॥ मंत्रराज हे देवी । ' गुरु ' ही दोन अक्षरे बरवी । वेदार्थवचने जाणावी । ब्रह्मपदवी प्रत्यक्ष ॥५९॥ श्रुतिस्मृति न जाणती । (परी) गुरुभक्तीची परम प्रीति ।ते संन्यासी निश्चिती । इतर दुर्मति वेषधारी ॥६०॥ नित्य ब्रह्म निराकार । निर्गुणबोध परात्पर । तो सद्‌गुरु पूर्णावतार । दीपासि दीपांतर नाही जैसे ॥६१॥ गुरुकृपा प्रसादें । निजात्मदर्शन स्वानंदे । पावोनिया पूर्ण पदें । पेलती दोंदे मुक्तीसी ॥६२॥ आब्रह्मस्तंभपर्यत । स्थावरजंगमादि पंचभूते । सच्चिदानंदाद्वय अव्यक्त । अच्युतानंद सद्‌गुरु ॥६३॥ परात्परतर ध्यान । नित्यानंद सनातन । ह्रदयीं सिंहासनी बैसवून । चित्ती चिंतन करावे ॥६४॥ अगोचर अगम्य सर्वगत । नामरुपविवर्जित । नि:शब्द जाण निभ्रांत । ब्रह्म सदोदित पार्वती ॥६५॥ अंगुष्ठमात्र पुरुष । ह्रदयी ध्यातां स्वप्रकाश ।तेथे स्फुरती भावविशेष । निर्विशेष पार्वती ॥६६॥ ऐसे ध्यान करितां नित्य । तादृश होय सत्य सत्य ।कीटकी भ्रुकुटीचें निमित्य । तद्रूप झाली ते जैशी ॥६७॥ अवलोकिता तयाप्रति । सर्वसंग-विनिर्मुक्ति । एकाकी नि:स्पृहता शांति । आत्मस्थिती रहावे ॥६८॥ सर्वज्ञपद त्या बोलती । जेणे देही ब्रह्म होती । सदानंदे स्वरुपप्राप्ति । योगी रमती पै जेथे ॥६९॥ उपदेश होतां पार्वती । गुरुमार्गी होय मुक्ति । म्हणोनि करावि गुरुभक्ति । हे तुजप्रति बोलतसे ॥७०॥ जे मी बोलिलो तुज । तें गुजाचें निजगुज । लोकोपकारक सहज । हे तूं बुझ वरानने ॥७१॥ लौकिक कर्म ते हीन । तेथें कैचे आत्मज्ञान । गुरुभक्तासी समाधान । पुण्यपावन ऐकतां ॥७२॥ एवं या भक्तिभावे । श्रवणें पठणें मुक्त व्हावे ।ऐसें बोलतां सदाशिवें । डोलती अनुभवें गुरुभक्त ॥७३॥ गुरुगीता हे देवी । शुद्ध तत्त्व पूर्ण पदवी ।भवव्याधिविनाशिनी स्वभावी । स्वयमेव देवी जपे सदा ॥७४॥ गुरुगीतेचे अक्षर एक । मंत्रराज हा सम्यक ।अन्यत्र मंत्र दु:खदायक । मुख्य नायक हा मंत्र ॥७५॥ अनंत फळे पावविती । गुरुगीता हे पार्वती । सर्वपापविनिर्मुक्ति । दु:खदारिद्र्यनाशिनी ॥७६॥ कालमृत्युभयहर्ती । सर्वसंकटनाशकर्ती । यक्ष-राक्षसी-प्रेत-भूती । निर्भय वृत्ती सर्वदा ॥७७॥ महाव्याधीविनाशिनी । विभूति-सिद्धिदायिनी । अथवा वशीकरण मोहिनी । पुण्यपावनी गुरुगीता ॥७८॥ कुश अथवा दुर्वासन । शुभ्र कंबल समसमान । एकाग्र करुनिया मन । सद्‌गुरुध्यान करावें ॥७९॥ शुक्ल शांत्यर्थ जाण । रक्तासनें वशीकरण । अभिचारी कृष्णवर्ण । पीतवर्ण धनागमीं ॥८०॥ शांत्यर्थ उत्तराभिमुख । वशीकरणा पूर्व देख । दक्षिण मारण उल्लेख । धनागमा सुख पश्चिमे ॥८१॥ मोहन सर्व भूतांसी । बंधमोक्षकर विशेषी । राजा वश्य निश्चयेंसी । प्रिय देवासी सर्वदा ॥८२॥ स्तंभनकारक जप । गुणविवर्धन निर्विकल्प । दुष्कर्मनाशक अमूप । सुखस्वरुप सनातन ॥८३॥ सर्वशांतिकर विशद । वंध्या पुत्रफलप्रद । अवैधव्य सौभाग्यप्रद । अगाध बोध जपतां हे ॥८४॥ आयुष्य आरोग्य ऐश्वर्य । पुत्रपौत्र धैर्योदार्य । विधवा जपतां परमाश्चर्य । मोक्षैश्वर्य पावती ॥८५॥ अवैधव्याची कामना । धरितां पूर्ण होय वासना । सर्व दु:खभयविघ्ना । पासोनि सुजना सोडवी ॥८६॥ सर्वबाधाप्रशमनी प्रत्यक्ष । धर्मार्थकाममोक्ष । जे जे चिंतिलें तो पक्ष । गुरुदास दक्ष पावती ॥८७॥ कामिकां कामधेनु गाय । कल्पिती तया कल्पतरु होय ।चिंतिती त्या चिंतामणीमय । मंगलमय सर्वांसी ॥८८॥ गाणपत्य शाक्त सौर । शैव वैष्णव गुरुकिंकर ।सिद्धी पावती सत्वर । सत्य सत्य वरानने ॥८९॥ संसारमलनाशार्थ । भवबंधपाशनिवृत्त । गुरुगीतास्नाने सुस्नात । शुचिर्भूत सर्वदा ॥९०॥ आसनीं शयनीं गमनागमनीं । अश्व गज अथवा यानीं । जागृती सुषुप्ती स्वप्नीं । पढतां होय ज्ञानी गुरुगीता ॥९१॥ गुरुगीता पढतां भक्त । सर्वदा तो जीवन्मुक्त । त्याच्या दर्शनें पुनीत । पुनर्जन्म न होत प्राणियां ॥९२॥अनेक उदकें समुद्र-उदरीं । नानावर्णां धेनू क्षीर क्षीरीं ।आभिन्नरुपें निर्धारीं । सर्वांतरीं एकचि ॥९३॥ घटाकाश मठाकाश । उपाधिभेदे भिन्न वेष । महदाकाश निर्विशेष । द्वैताचा लेश नाढळे ॥९४॥ भिन्न भिन्न प्रकृति । कर्मवेषें दिसती आकृति । घेऊनि जीवपणाची बुंथी । विविध भासतीं नामरुपें ॥९५॥ नाना अलंकारी सुवर्ण । तैसा जीवात्मा पूर्ण । तेथें नाहीं वर्णावर्ण । कार्यकारणातीत तें ॥९६॥ या स्वानुभवें गुरुभक्त । वर्तती ते जीवन्मुक्त ।गुरुभक्त तें वेदोक्त । जे कां विरक्त सर्वस्वे ॥९७॥ अनन्यभावें गुरुगीता । जपतां सर्व सिद्धी तत्त्वतां । मुक्तिदायक जगन्माता । संशय सर्वथा न धरी तूं ॥९८॥ सत्य सत्य हें वर्म । मी बोलिलों सर्व धर्म । नाही गुरुगीतेसम । तत्त्व परम सद्‌गुरु ॥९९॥ एक देव एक जप । एक निष्ठा परंतप । सद्‌गुरु परब्रह्मस्वरुप । निर्विकल्प कल्पतरु ॥१००॥ माता धन्य पिता धन्य । याति कुल वंश धन्य । धन्य वसुधा देवी धन्य । धन्य धन्य गुरुभक्ति ॥१०१॥ गुरुपुत्र अपंडित । जरी मूर्ख तो सुनिश्चित । त्याचेनि सर्व कार्यसिद्धी होत । हा सिद्धांत वेदवचनीं ॥१०२॥ शरीर इंद्रियें प्राण । दारा-पुत्र-कांचन-धन । श्रीगुरुचरणावरुन । वोवाळून सांडावे ॥१०३॥ आकल्प जन्म कोडी । एकाग्रमनें जपतां प्रौढी । तपाची हे फळजोडी । गुरुसी अर्धघडी विमुख नोहे ॥१०४॥ ब्रह्मादिक देव समर्थ । त्रिभुवनी वंद्य यथार्थ । गुरुचरणोदकावेगळे व्यर्थ । अन्य तीर्थ निरर्थक ॥१०५॥ सर्व तीर्थांत तीर्थ श्रेष्ठ । श्रीगुरुचरणांगुष्ठ । निवारी संसारकष्ट । पुरवी अभीष्ट इच्छिलें ॥१०६॥ हे रहस्यवाक्य तुजपुढें । म्या कथिलें निजनिवाडें । माझेनि निजतत्त्व गौप्य उघडें । करुनि वाडेंकोडें दाखविलें ॥१०७॥ मुख्य गणेशादि वैष्णव । यक्ष-किन्नर-गणगंधर्व । तयासही सर्वथैव । हे अपूर्व न वदें मी ॥१०८॥ अभक्त वंचक धूर्त । पाखंडी नास्तिक दुर्वृत्त । तयांसी बोलणें अनुचित । हा गुह्यार्थ पैं माझा ॥१०९॥सर्व शास्त्रांचें मथित । सर्व वेदांतसमंत । सर्व स्तोत्रांचा सिद्धांत । मूर्तिमंत गुरुगीता ॥११०॥ सकल भुवने सृष्टि । पाहतां व्यष्टि समष्टी । मोक्षमार्ग हा दृष्टी । चरणागुंष्ठीं सद्‌गुरुच्या ॥१११॥ उत्तरखंडीं स्कंदपुराणी । ईश्वर-पार्वती संवादवाणी । गुरुगीता ऐकतां श्रवणी । विश्वतारणी चिद्‌रंगा ॥११२॥ हे गुरुगीता नित्य पढे । तया सांकडें कवण पडे । तत्काळ मोक्षद्वार उघडे । ऐक्य घडे शिवस्वरुपीं ॥११३॥ हे न म्हणावी प्राकृत वाणी । केवळ स्वात्मसुखाची खाणी ।सर्व पुरवी शिराणी । जैसा वासरमणि तम नाशी ॥११४॥ श्रोतयां वक्तयां विद्वज्जनां । अनन्यभावें विज्ञापनां । न्यूनपूर्ण नाणितां मना । क्षमा दीनावरि कीजे ॥११५॥ हे गुरुगीतेची टीका । न म्हणावी जे पुण्यश्लोका । पदपदार्थ पहातां निका । दृष्टी साधकां दिसेना ॥११६॥ आवडीची जाती वेडी । वाचें आलें ते बडबडी । मूळ ग्रंथ कडोविकडी । न पहातां तातडी म्यां केली ॥११७॥ नाहीं व्याकरणी अभिनिवेश । नाही संस्कृती प्रवेश । धीटपणे लिहितां दोष । गमला विशेष मनातें ॥११८॥ परी सलगी केली पायांसवें । ते पंडीतजनीं उपसहावें । उपेक्षा न करुनि सर्वभावें । अवधान द्यावें दयालुत्वें ॥११९॥ विकृतिनाम संवत्सरी । भाद्रपदमासीं भृगुवासरीं । वद्य चतुर्थी नीरातीरीं । ग्रंथ केला समाप्त ॥१२०॥आनंदसांप्रदाय वंशोद्‌भव । माध्यंदिनशाखा अभिनव । गुरुगीतेचा अनुभव । ह्रदयीं स्वयमेव प्रगटला ॥१२१॥ सहज पूर्ण निजानंदें । रंगला तो साधुवृंदें । श्रवण करावा स्वच्छंदें । ग्रंथ निर्द्वंद्व गुरुगीता ॥१२२॥ इति श्री गुरुगीता संपूर्ण । श्रीसद्‌गुरुनिजानंदार्पणमस्तु । श्री सद्‌गुरु रंगनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु । श्रीरस्तु । ॐ तत्सत् । श्रीगुरुदेव दत्त ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥