Showing posts with label श्री गोंदवलेकर महाराज. Show all posts
Showing posts with label श्री गोंदवलेकर महाराज. Show all posts

Dec 29, 2021

हेचि मागणे गुरूराया...


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

श्रीराम समर्थ


सदगुरूराया तुजपाशी । आलो काही मागावयासी । ठाव देई चरणापाशी । हेचि मागणे गुरूराया ॥१ कान तुझी कथा ऐको । नेत्र तुझे रूप देखो । जिव्हा नामस्मरणी टिको । हेचि मागणे गुरुराया ॥२ मत्सर कोणाचा न व्हावा । मनी ताठा नुपजावा । नम्रता येवो स्वभावा । हेचि मागणे गुरूराया ॥३ कोणाचीही नको निंदा । लबाडीचा नको धंदा । भजनाच्या लावी छंदा । हेचि मागणे गुरूराया ॥४ उपजोनी सात्विक भावा । नरदेह सार्थकी लावावा । सोलीव आनंद लुटावा । हेचि मागणे गुरुराया ॥५ दोषाची मी असे खाण । परी तुझा म्हणवितो जाण । कृपेची न पडो वाण । हेचि मागणे गुरूराया ॥६ देह तूचि देही तूच । जगत्रयी अवघा भरला तूच । चित्तास देई चिंतन हेच । हेचि मागणे गुरूराया ॥७ पुढे तूचि मागे तूच । आत बाहेरी अससी तूच । आता आणी प्रचितीस । हेचि मागणे गुरूराया ॥८ आता करितो तुजसी नमन । नमना वीण काही न आन । नमन 'न मन' नामस्मरण । हेचि मागणे गुरूराया ॥९


घडो मजसि संगती सतत सज्जनांची हरी जडो मन पदी पडो तव कथा ही कानावरी

असोच रसना सदा रत तुझ्या सुनामामृती करोत कर सर्वदा भजन हे तुझें निश्चिती

- जय जय रघुवीर समर्थ -


श्री महाराज म्हणतात -

राम नाम, अन्नदान, सगुणाची भक्ती । हीच परमार्थ साधण्याची युक्ती

मुखात नाम, हाती काम, कर्ता राम । हेच साधनात साधन जाण


श्रीराम श्रीराम श्रीराम


सौजन्य :- चैतन्योपासना, श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर (संस्थान)

Dec 30, 2020

श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर पुण्यतिथी महोत्सव २०२०-२१


|| श्रीराम समर्थ ||

ब्रह्माला चैन पडेना म्हणून चैतन्यरूपाने खाली आले ते श्रीब्रह्मचैतन्य ! 

श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर संस्थान, गोंदवले यांच्या विश्वस्तांतर्फे श्रींचा १०७वा पुण्यतिथी दि. ३१ डिसेंबर २०२० ते ८ जानेवारी २०२१ या कालावधीत श्रीक्षेत्र गोंदवले येथे साजरा झाला. 

संस्थानच्या अधिकृत वेबसाईट लिंकवर आपण दर्शनाचा लाभ दररोज घेऊ शकता.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर १०७वा पुण्यतिथी महोत्सव  

श्री सद्-गुरु श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे ओवीबद्ध चरित्र :

संपूर्ण श्री सद्-गुरुलीलामृत 

श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरविरचित श्रीरामपाठ

हाचि सुबोध गुरूंचा ...

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति


Aug 20, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजविरचित श्रीराम पाठ


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीराम समर्थ ॥ श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा । ध्यातों तुझी राजस योगमुद्रा । नेत्रीं न ये रे तुजविण निद्रा । कैं भेटसी बा मजला सुभद्रा ॥ जयाचा जनीं जन्म नामार्थ झाला । जयानें सदा वास नामांत केला । जयाच्या मुखीं सर्वदा नामकीर्ति । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ॥ श्रीराम श्रीराम श्रीराम ॥ ॐ नमो जी सद्गुरुनाथा । तुझे चरणी ठेविला माथा । पूर्ण करी मनोरथा । विनंती माझी परिसावी ॥१॥ रामपाठाचा उच्चार । मम हृदयी करी उद्धार । हेचि मागणे वारंवार । तुजलागी दयाळा ॥२॥ व्यास वाल्मिकी नारदमुनी । शुकसनकादिक ज्याचे ध्यानी । तो श्रीराम चापपाणि । मम वाणी वदो का ॥३॥ अयोध्यावासी नगरजन । रामासी भजती अनुदिन । तो कौसल्यानंदन । मम हृदयी वसावा ॥४॥ सद्गुरू म्हणे ऊठ लवलाही । ज्ञानदीपाचे प्रकाशे पाही । वस्तु आपली शोधून घेई । मग पावसी निजसुखा ॥५॥ सद्गुरू राजवैद्य पूर्ण । रामनामाचे रसायन । स्वहस्ते मम मुखी पाजून । केले सावध स्वरूपी ॥६॥ नेत्री घातले बोधांजन । भवरोग काढिला मुळीहून । मूर्ती दाविली सगुण । ते रूप वर्णिले न जाय ॥७॥ चतुर्भुज मेघश्याम सावळा । कांसे पीतांबर पिवळा । गळा वैजयंतीमाळा । मुक्ताहार डोलती ॥८॥ अंगी चंदनाची उटी । केशर कस्तुरी लल्लाटी । अमूल्य रत्ने शोभती मुकुटी । कर्णी कुंडले तळपती ॥९॥ क्षुद्रघंटा वाजती कटी । दशांगुली मुद्रिकांची दाटी । बाहुभूषणे शोभती मनगटी । सुवर्णपादुका चरणकमली ॥१०॥ शंख चक्र चाप बाण । वरद हस्त उदार वदन । विशाळ भाळ आकर्ण नयन । ऐसा भगवान देखिला ॥११॥ गुप्त ठेविले निर्गुण । प्रकट केले स्वरूप सगुण । श्रीराम अवतार घेऊन । धर्म स्थापिला स्वहस्ते ॥१२॥ अयोध्या पुण्यपावन नगरी । तेथे श्रीराम राज्य करी । तपोनिधी महाक्षत्री । सिंहासनी विराजे ॥१३॥ शेषे धरिले छत्र । भरतशत्रुघ्न धरिती चामर । भक्त प्रार्थिती वारंवार । जयजयकारे गर्जती ॥१४॥ नळ नीळ जांबुवंत । अंगद सुग्रीव बिभीषण भक्त । निरिच्छ वायुसुत । सदा निमग्न रामरूपी ॥१५॥ वसिष्ठ विश्वामित्र ऋषी । दत्त दिगंबर तापसी । ब्रह्मचारी कित्येक संन्यासी । रामनामी लुब्धले ॥१६॥ रामनाम हृदयी धरून । ध्यानी बैसले योगीजन । यम इंद्र अग्नि वरुण । पंचवदन तप करी ॥१७॥ रामनामाची अपरिमित शक्ती । शेषाची वर्णिता खुंटली मती । वेदाची न चले गति । शास्त्रे लज्जित बैसली ॥१८॥ अनंत अवतारांचा महिमा । तोही रामनामी तुळेना । ऐशिया रामाच्या सद्गुणा । मी मानव काय वर्णू ॥१९॥ रामी रंगले त्रिभुवन । जडमूढ काष्ठ पाषाण । घटमठांत सर्वांत परिपूर्ण । त्याहून वेगळा राहिला ॥२०॥ पिंडब्रह्मांडाची रचना । तू निर्मिली रघुनंदना । जगव्यापका आत्मारामा । शोधिता ठायी न पडे कोठे ॥२१॥ तुझे स्वरूपाची व्हावी प्राप्ती । यालागी कित्येक तप करिती । कित्येक पंचाग्निधूम्रपान साधिती । तयांसी अंत न लागे तुझा ॥२२॥ तेथे मी अज्ञान मूढमती । करू नेणे तुझी भक्ती । परि संतमुखे ऐकिली कीर्ती । शरणागता उद्धरी तू ॥२३॥ माझ्या भाग्यासी नाही मिती । तू भेटलासी जगज्ज्योती । आता कळेल तैशा रीती । उद्धारगति करी माझी ॥२४॥ तुझे ब्रीदाचे महिमान । कित्येक उद्धरिले पापीजन । विरोधभक्तीने रावण । वैकुंठपदी पावविला ॥२५॥ सात्विक भक्त थोर थोर । तुलसीदास कमाल कबीर । रामदास वायुकुमर । त्यांचा किंकर मज करी ॥२६॥ मी न मागे धनसंपत्ती । मज न लगे वैकुंठप्राप्ती । परी तुझ्या भक्तांची संगती । मज घडो सर्वदा ॥२७॥ कोट्यानुकोटी जन्म घेईन । करीन तुझे पादसेवन । अवतारलीला मुखाने गाईन । ऐसे मज देई सर्वथा ॥२८॥ तुझ्या अवतारलीला बहुत । व्यास बोलिले संस्कृत । ते अज्ञानासी न होय प्राप्त । यास्तव प्राकृत वर्णिले ॥२९॥ सद्गुरूने निर्मिला हा ग्रंथ । रामपाठ केवळ अमृत । श्रवणद्वारे पाजूनि यथार्थ । तृप्त केले भक्तजन ॥३०॥ ज्यासी वैकुंठपदाची गोडी । त्याने रामपाठ भजावा आवडी । त्याचे संकटी घालूनि उडी । श्रीराम रक्षी निजांगे ॥३१॥ ज्ञानदेव करी हरिपाठ । ब्रह्मचैतन्य करी रामपाठ । भक्तजनी मानावे दोन्ही श्रेष्ठ । ग्रंथ वरिष्ठ प्रभूंचा ॥३२॥ मज काही ज्ञान नसे किंचित् । हृदयी प्रकटला जानकीकांत । त्याचा त्याने लिहून ग्रंथ । भक्तासी अर्पिला प्रीतीने ॥३३॥
॥ जानकीजीवनस्मरण जय जय राम ॥ ॥ श्रीराम श्रीराम श्रीराम ॥  


Dec 21, 2019

श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सव २०१९



स्वामी माझा पाहिला या माणगंगातीरी । सद्गुरु तो देखिला या माणगंगातीरी ll माणगंगातीरी प्रभु हा गोंदवले पुरी ll स्वामी माझा पाहिला या माणगंगातीरी ll धृ. ll

ब्रह्मचैतन्याचा गाभा । प्राप्त नोहे कमलनाभा । भोळ्या भाविक भक्तांलाभा । धाऊनिया आला । या माणगंगातीरी ll १ ll

गौरवर्णकांती । मूर्तीमंत शांती । दया क्षमा शोभे चित्ती । रामनामी रंगला। या माणगंगातीरी ll २ ll

केशरी त्रिपुंडभाळा । गळा तुळशीच्या माळा । कफनी टोपी शोभे ज्याला । पादुका पायाला ll या माणगंगातीरी ll ३ ll

गाई ब्राह्मण अनाथांचा । कैवारी तो दिनांचा । विश्वास या नामाचा । जगी वाढविला ll या माणगंगातीरी ll ४ ll

भवभार फार झाला । जीव तळमळु लागला । सगुणरुपे धावत आला । अभयवर दिला ll या माणगंगातीरी ll ५ ll

आनंदसागर दास दीन । पदी घेतसे लोळण । तुझे रुप हे सगुण । सदा राहो डोळा ll या माणगंगातीरी ll ६ ll

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll


Dec 31, 2018

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति


महारुद्र जे मारूती रामदास ।

कलीमाजिं जे जाहले रामदास ।|

जनां उद्धराया पुन्हा प्राप्त होती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १॥


महाराष्ट्री या माणगंगातीरातें ।

असे पुण्य गोंदवले क्षेत्र तेथें ।|

यजुर्वेदी विप्रगृहीं जन्म घेती

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ २॥


न लिंपे कदा बालक्रीडाउपाधी ।

विवेके सदा ज्ञान वैराग्य साधी ।।

जया सद्गुरुभेटिची होय स्फूर्ती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ३॥


समर्थानुयायी तुकाराम सिद्ध ।

जया पूर्ण वैराग्य अध्यात्मबोध ॥

तया प्रार्थुनी राममंत्रासी घेती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ४॥


तपें तोषिला सद्गुरू ज्ञानियांचा ।

वदे वाढवीं पंथ या राघवाचा ।।

कलीमाजी मंदावली धर्मभक्ती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ५॥


विदेहापरी चालवोनी प्रपंचा ।

मुमुक्षूजनांलागीं अध्यात्मचर्चा ।।

करोनी बहु लोक ते मेळवीती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ६॥


जशी माऊली ग्रास देते मुलाला ।

तसे बोधुनि ज्ञान पाजी जनांला ।।

धरेसारिखी ज्यां वसे नित्य शांति ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ७॥


किती प्रार्थिती कामना पूर्ण व्हावया ।

किती भाविती देहव्याधी हराया ।।

कृपादृष्टीनें त्यांसि आनंद देती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ८ ॥


जयें गोधना संकटीं रक्षियेलें ।

किती जीव अन्नोदकें तृप्त केलें ।।

बहू मंदिरें स्थापिलीं धन्य कीर्ती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ९॥


बहू अज्ञ जीवांप्रती उद्धरीलें ।

तसे नास्तिकां सत्पथा लावियेलें ।।

समस्तामुखें नाम हे बोलवीती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १०॥


तनू जीर्ण झाली, बहू कार्य केलें ।

रघूनायके शीघ्र पाचारियेलें ।।

तदा रामरूपीं समाधिस्थ होती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ११॥


समाधी पहातां समाधान होते ।

तनू कष्टवी त्यासि आनंद देते ।।

मनी भाविता कामना पूर्ण होती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १२॥


मुखें बोलवी सद्गुरू बुद्धीदाता ।

अहंभार हा वागवी कोणा माथा ।।

जडो भावना रामदासी सदा ती ।

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १३॥


हाचि सुबोध गुरूंचा ...


नाम सदा बोलावे, गावे भावे, जनांसि सांगावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, नामापरते न सत्य मानावे ॥१॥


नामात रंगुनीया व्यवहारी सर्व भोग सेवावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे ॥२॥


आंनदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे ॥३॥


गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्वलोकप्रिय व्हावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे ॥४॥


स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे ॥५॥


’माझा राम सखा, मी रामाचा दास’ नित्य बोलावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, रामपाशी अनन्य वागावे ॥६॥


यत्न कसून करिन मी, यश दे, रामा, न दे तुझी सत्ता ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मानावा राम सर्वथा कर्ता ॥७॥


आचार संयमाने युक्त असा नीतिधर्म पाळावा ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, खेळाएसा प्रपंच मानावा ॥८॥


दाता राम सुखाचा, संसारा मान तू प्रभूसेवा ।

हाचि सुबोध श्रीगुरुंचा, संतोषा सर्वादा मनी ठेवा ॥९॥


स्वार्थ खरा साधा रे, नित्य तुम्ही नामगायनी जागा ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मीपण जाळोनिया जगी वागा ॥१०॥


अभिमान शत्रु मोठा सर्वाना जाचतो सुखाशेने ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मारावा तो समूळ नामाने ॥११॥


राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धन मान ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भंगावे ना कदा समाधान ॥१२॥


प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगामाजी ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची ॥१३॥


II  जानकीजीवनस्मरण जय जय राम II  


II श्री अनंतकोटी ब्रह्माण्डनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय II 


II जय जय रघुवीर समर्थ II