Jan 31, 2019

परी भक्तप्रेमालागी सकाम...


आज श्री दत्तप्रभूंची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री नृसिंहवाडी येथें श्री नृसिंहसरस्वती महाराजांनी एक तप वास्तव्य केलें होतें. कृष्णा - पंचगंगा संगमस्थानी वसलेल्या ह्या पवित्र स्थळीं भगवान दत्तप्रभूंचा द्वितीय अवतार, श्री नृसिंहसरस्वती महाराज एका विशाल औंदुंबर वृक्षाखाली गुप्तपणें बारा वर्षे तप करीत होते. श्री गुरुचरित्रात वर्णिलेल्या अमरापुर माहात्म्य, वेदाभ्यासी द्विज दैन्यहरण, औदुंबर माहात्म्य, गंगानुज नावाड्यावर श्रीगुरुंची कृपा आणि त्याची त्रिस्थळीं यात्रा, योगिनींची कथा, ब्राह्मण स्त्रीचा ब्रह्मसमंध परिहार आणि मृतपुत्र - संजीवन कथा नृसिंहवाडी इथें घडलेल्या आहेत. तसेच मनोहर पादुका स्थापना, भैरव द्विज वरदान कथा आणि शिरोळच्या भोजनपात्राची कथा ह्या गुरुचरित्रात उल्लेख नसलेल्या लीला ह्याच पवित्र स्थानीं श्री स्वामींनी दाखविल्या आहेत. 

पुढें श्री गुरूंनी गाणगापूरला गमन केल्यावरही, कधी कोणाला ह्या स्थानी आराधना करून प्रचिती आली का? असे नामधारकाने विचारले असता सिद्धांनी त्याला एका ब्राह्मण स्त्रीला कसे दृष्टांत झाले त्या कथा विसाव्या आणि एकविसाव्या अध्यायांत सांगितल्या आहेत. त्या स्त्रीनें पूर्वजन्मी एका ब्राह्मणाचे कर्ज घेतले होते व ते परत दिले नाही. त्या द्रव्यलोभी माणसाने आत्महत्या केली, तो पिशाच्च झाला व त्या स्त्रीची संतती मारून तिला छळू लागला. ती स्त्री औदुंबर क्षेत्री आली व तिने संगमस्थानी श्री गुरूंची पूजा करून व्रताचरण केले. त्या विप्र स्त्रीचा श्री नृसिंह महाराजांवरील दृढ विश्वास आणि त्यामुळे श्री गुरूंनी केलेला समंधाचा प्रतिकार म्हणजे गुरुनिष्ठेचे फळ काय असते व महाराजांचे भक्तवात्सल्य व भक्त-पक्षपात कसा असतो, ह्याचेच उदाहरण आहे. पुढें ह्याच विप्रस्त्रीला वर देऊन दोन पुत्र दिले व पुत्रशोक झाल्यावर सिद्धरूपांत येऊन आत्मज्ञानोपदेशही केला. तसेच आपलें वरदान खरे करण्यासाठी, गुरूपादुकांवर डोके आपटून शोकग्रस्त असलेल्या त्या विप्र मातेच्या मुलाला पुन्हा जिवंत केले. तीन वेळां स्वप्नांत आणि एकदा ब्रह्मचारी रूपांत असा श्री गुरु महाराजांच्या दर्शनाचा व कृपेचा लाभ ज्या विप्र स्त्रीस प्राप्त झाला, तिच्या भाग्याचे काय वर्णन करावे बरें ? खरोखर भक्तवत्सल श्री दत्तगुरुंचा महिमा काय वर्णावा ? 

श्री. शरद उपाध्यें यांनी ही कथा सुरेख वर्णन केली आहे.



Jan 17, 2019

भास्करभट्टांची (अ)पूर्वकथा


।। श्री गुरुदेव दत्त ।।


अष्टत्रिंशीं भास्कर ब्राह्मण I तिघांपुरतें शिजवी अन्न I जेविले बहु ब्राह्मण I आणि गांवचे शूद्रादि I I गुरुचरित्र  अवतरणिका ,ओवी ५६ I I

श्री गुरुचरित्रातील अडतिसाव्या अध्यायांत काश्यप गोत्राच्या भास्कर नावाच्या एका ब्राह्मणाची कथा आहे.  श्री गुरूंच्या वचनावर विश्वास ठेऊन भास्कराने केवळ तीन माणसांना पुरेल एवढ्या शिधा सामग्रीचा स्वयंपाक केला असतांना, त्या दिवशी चार हजार लोकांचे भोजन मठांत श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या कृपेनें पार पडलें. 

ऐसें तया दिवसीं विचारिती । सहस्र चारी झाली मिति । भूमीवरी झाली ख्याति । लोक म्हणती आश्चर्य ॥ गुरुचरित्र अध्याय ३८, ओवी  ७१

भक्ताची दृढ श्रद्धा असेल तर श्री गुरूंची कृपा नक्की होते. श्री गुरुचरित्रात याचे अनेक दाखले आहेत. भास्कर ब्राह्मणांकडे अशी भक्तिभावना होती, म्हणूनच भक्तवत्सल श्री गुरूंच्या वरदानास तो पात्र झाला. आज जे गाणगापुरांत पुजारी वर्ग आहेत,ते ह्याच भास्कर ब्राह्मणाचे वंशज आहेत. 

श्री गुरुचरित्रात काही भक्तांच्या पूर्वजन्माचा उल्लेख आहे. आठव्या अध्यायांत श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी कुरवपूरच्या कृष्णानदीत जीव द्यायला आलेल्या एका दुर्भागी स्त्रीला, पुढील जन्मी उत्तम पुत्र होण्यासाठी शनिप्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले होते. तीच स्त्री पुढील जन्मी कारंजा गावी जन्माला आली आणि पूर्वावतारात दिलेल्या आशीर्वादानुसार, भगवान श्रीदत्तप्रभूंच  तिच्या उदरी श्री नृसिंह सरस्वती रूपात अवतरले. तसेच नवव्या अध्यायांत श्रीपाद श्रीवल्लभ यांनी दिलेल्या वरदानाने रजकाने पुढील जन्मी यवन राजा होऊन राजैश्वर्य उपभोगले व श्रीपाद श्रीवल्लभ ह्यांचे श्री नृसिंह सरस्वती रूपांत त्यांस पुनर्दर्शनही झाले. 

सदगुरुंवर आत्यंतिक निष्ठा असणाऱ्या भास्कर ब्राह्मणाच्या पूर्वजन्मीची ही कथा ' श्री गुरुचरित्र परमकथामृतम ' ग्रंथाच्या नवव्या अध्यायात आलेली आहे. दत्तभक्तांनी ही श्रीदत्तसंप्रदायातील थोर विभूती, प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांच्या संपन्न व प्रासादिक लेखणीतून अवतरलेली  कथा अवश्य वाचावी. 



श्रीगुरुंच्या लीला खरोखर अपार आहेत.

Jan 11, 2019

श्री गुरुचरित्र अध्याय १४ - श्री सायंदेव प्रत


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ नामधारक शिष्य देखा I विनवी सिद्धासी कवतुका I प्रश्न करी अतिविशेखा I एकचित्ते परियेसा II१II जय जयाजी योगीश्वरा I सिद्धमूर्ति ज्ञानसागरा I पुढील कथा विस्तारा I ज्ञान होय आम्हांसी ऐसी II२II उदरव्यथेच्या ब्राह्मणासी I प्रसन्न झालें श्री गुरुकृपेसी I पुढे कथा वर्तली कैसी I विस्तारावे आम्हांप्रति II३II ऐकोनि शिष्याचे वचन I संतोषें सिद्ध आपण I गुरुचरित्र कामधेनु जाण I सांगता जाहला विस्तारोनी II४II ऐक शिष्या शिरोमणि I भिक्षा केली ज्याचे भुवनी I तयावरी संतोषोनि I प्रसन्न जाहले परियेसा II५II गुरुभक्तीचा प्रकार I पूर्ण जाणे द्विजवर I पूजा केली विचित्र I म्हणोनि आनंदे परियेसा II६II तया सायंदेव द्विजासी I श्रीगुरू बोलती संतोषी I भक्त व्हावें वंशोवंशी I माझी प्रीति तुजवरी II७II ऐकोनि श्रीगुरुचे वचन I सायंदेव नमन करून I माथा चरणी ठेवून I नमिता झाला पुनः पुन्हा II८II जय जयाजी सद्‌गुरु I त्रिमूर्तींचा अवतारू I अविद्यामाये दिससी नरु I वेदां अगोचरु तुझा महिमा II९II विश्वव्यापक तूंचि होसी I ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी I धरिलें स्वरूप तू मानवासी I भक्तजन तारावया II१०II तव महिमा वर्णावयासी I शक्ति कैंची आम्हांसी I मागतो एक तुम्हांसी I कृपा करणे गुरुमूर्ति II११II माझे वंशपारंपरी I भक्ति द्यावी निर्धारी I इहे सौख्य पुत्रपौत्री I अंती द्यावी सद्गति II१२II ऐसी विनंति करुनी I पुनरपि विनवी करुणावचनी I सेवा करितो द्वारी यवनी I महाक्रुर असे तो II१३II प्रतिसंवत्सरी ब्राह्मणांसी I घात करितो जो बहुवसी I याचि कारणे आम्हांसी I बोलावीतसे परियेसा II१४II जातां तया जवळी आपण I निश्चये घेईल माझा प्राण I भेटी झाली तुमची म्हणोन I मरण कैचे आम्हांसी II१५II संतोषोनि श्रीगुरूमूर्ति I अभय देती तयाप्रती I विप्रमस्तकी हस्त ठेविती I चिंता न करी म्हणोनिया II१६II भय सांडूनि त्वां जावे I क्रुर यवनातें भेटावे I संतोषोनि प्रियभावे I पुनरपि पाठवील आम्हांप्रती II१७II जोवरी परतोनि तू येसी I असो आम्ही भरंवसी I तू आलिया संतोषी I जाऊ मग येथोनिया II१८II निजभक्त आमुचा तूचि होसी I परंपरी-वंशोवंशी I अखिलाभीष्ट तू पावसी I वाढेल संतति तुझी बहुत II१९II तुझे वंशपरंपरी I सुखे नांदती पुत्रपौत्री I अखंड लक्ष्मी तुझें घरी I निरोगी शतायु नांदाल II२०II ऐसा वर लाधोन I निघे सायंदेव ब्राह्मण I जेथे होता तो यवन I गेला त्वरित तयाजवळी II२१II कालांतक यम देखा I यवन दुष्ट परियेसा I ब्राह्मणाते पाहतां कैसा I ज्वालारूप होता जाहला II२२II विन्मुख होऊनि गृहांत I गेला यवन कोपात I विप्र जाहला भयचकित I मनीं श्रीगुरू ध्यातसे II२३II कोप आलिया ओळंबयासी I केवी स्पर्शे अग्नीसी I श्रीगुरूकृपा असे ज्यासी I काय करील यवन दुष्ट II२४II गरुडाचिया पिलीयांसी I सर्प कैसा डंसी I तैसी तया ब्राह्मणासी I असे कृपा श्रीगुरुची II२५II कां एखादे सिंहासी I ऐरावत केवीं ग्रासी I श्रीगुरुकृपा ज्यासी I कळीकाळाचे भय नाही II२६II ज्याचे हृदयीं श्रीगुरुस्मरण I भय कैंचे तयां दारुण I काळमृत्यु न बाधे जाण I अपमृत्यु काय करील II२७II ज्यासि नांही मृत्यूचे भय I त्यासी यवन करील काय I श्रीगुरुकृपा ज्यासी होय I यमाचे भय नाही तयां II२८II ऐसियापरी तो यवन I गृहीं निघाला भ्रमें करून I दृढ निद्रा लागतां जाण I शरीरस्मरण नाही त्यासी II२९II हृदयज्वाळा होऊनी त्यासी I जागृत होवोनि परियेसी I प्राणांतक व्यथेसी I कष्टतसे तये वेळी II३०II स्मरण नसे कांही I म्हणे शस्त्रे मारितो घाई I छेदन करितो अवेव पाही I विप्र एक आपणासी II३१II स्मरण जाहले तये वेळी I धांवत गेला ब्राह्मणाजवळी I लोळतसे चरणकमळी I म्हणे स्वामी तूंचि माझा II३२II तूतें पाचारिले येथे कवणी I जावे त्वरित परतोनि I वस्त्रे भूषणे देवोनि I निरोप देत तये वेळी II३३II संतोषोनि द्विजवर I आला ग्रामीं सत्वर I गंगातीरी जाय लवकर I श्रीगुरुचे दर्शनासी II३४II देखोनिया श्रीगुरूसी I नमन करी भावेसी I स्तोत्र करी बहुवसी I सांगे वृत्तांत आद्यंत II३५II संतोषोनि श्रीगुरूमूर्ति I तया द्विजा आश्वासिती I दक्षिणदिशें जाऊ म्हणती I स्थान तीर्थयात्रेसी II३६II ऐकोनि श्रीगुरुंचे वचन I विनवीतसे कर जोडून I न विसंबे आतां तुमचे चरण I आपण येईन समागमे II३७II तुमचे चरणाविणे देखा I राहो न शके क्षण एका I संसारसागर तारका I तूंचि देवा कृपासिंधु II३८II उद्धरायां सगरांसी I गंगा आली भूमीसी I तैसा स्वामी आम्हासी I स्पर्शनें उद्धार आपुल्या II३९II भक्तवत्सल तुझी ख्याति I आम्हा सांडणे काय नीति I सवेचि येऊ हें निश्चिती I म्हणोनि चरणी लागला II४०II येणेपरी श्रीगुरूसी I विनवी विप्र भावेसी I संतोषोनि विनयेसी I श्रीगुरू म्हणती तये वेळी II४१II कारण असे आम्हा जाणे I तीर्थे असती दक्षिणे I पुनरपि तुम्हां दर्शन देणे I संवत्सरी पंचदशी II४२II आम्ही तुमचे ग्रामांसमीपत I वास करू हे निश्चित I कलत्र पुत्र इष्ट भ्रात I तुम्ही आम्हां भेटावें II४३II न करी चिंता असा सुखे I सकळ अरिष्टे गेली दुःखे I म्हणोनि हस्त ठेवीं मस्तकी I भाक देती तये वेळी II४४II ऐसेपरी सांगोनि I श्रीगुरू निघाले तेथोनि I जेथे असे आरोग्यभवानी I वैजनाथ महाक्षेत्र तें II४५II समस्त शिष्यांसमवेत I श्रीगुरू आले तीर्थे पहात I प्रख्यात असे वैजनाथ I तेथे राहिले गुप्तरूपे II४६II नामधारक विनवी सिद्धासी I कारण काय गुप्त व्हावयासी I होते शिष्य बहुवसी I त्यांसी कोठे ठेविले II४७II गंगाधराचा नंदन I सांगे गुरुचरित्र वर्णन I सिद्धमुनि विस्तारून I सांगे नामधारकासी II४८II पुढील कथेचा विस्तार I सांगतसे अपरंपार I मन करूनि एकाग्र I ऐका श्रोते सकळिक II४९II वास सरस्वतीचे तीरी I सायंदेव साचारी I तया गुरुतें निर्धारी I वस्त्रें भूषणें दिधलीं II५०II गुरुचरित्र अमृत I सायंदेव आख्यान येथ I यवन भय रक्षित I थोर भाग्य तयाचें II५१II II इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे दुष्टयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोSध्यायः II श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु II

II श्रीगुरुदेवदत्त II श्रीगुरुदेवदत्त II श्रीगुरुदेवदत्त II II दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा II दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा II

II दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा II

श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचित श्रीदत्तात्रेय कवचम्


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ 


श्रीपादः पातु मे पादावूरु सिद्धासनस्थितः ।

पायाद्दिगंबरो गुह्यं नृहरिः पातु मे कटिं ॥ १ ॥

श्री म्हणजे लक्ष्मी, ज्याच्या पायाचा आश्रय निरंतर करुन राहते तो श्रीपाद दत्तात्रय माझ्या पायांचे रक्षण करो. सिद्धासनस्थ असलेला दत्त माझ्या मांड्यांचे रक्षण करो. दिगंबर म्हणजे दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे असा दत्तात्रेय माझ्या गुद व जननेंद्रिय यांचे रक्षण करो. माझ्या कंबरेचे रक्षण नृहरि दत्तात्रेय करो.


नाभिं पातु जगतस्त्रष्टोदरं पातु दलोदरः ।

कृपालुः पातु हृदयं षड्भुजः पातु मे भुजौ ॥ २ ॥

सर्व जगाला निर्माण करणारा म्हणजे ब्रह्मदेव हे रुप धारण करणारा दत्तात्रेय माझ्या नाभीचे रक्षण करो. पिंपळाच्या पानाप्रमाणे पातळ उदर असलेला दत्तात्रेय माझ्या उदराचे रक्षण करो. कृपाळू दत्तात्रेय माझ्या हृदयाचे रक्षण करो. सहाभुजा असलेला दत्तात्रेय माझ्या भुजांचे रक्षण करो. 


स्त्रक्कुंडी-शूल-डमरु शंख-चक्र-धरः करान् ।

पातु कंठं कंबुकंठः सुमुखः पातु मे मुखम् ॥ ३ ॥

माला, कमंडलु, त्रिशूल, डमरु, शंख व चक्र धारण करणारे दत्तात्रेय माझ्या हातांचे रक्षण करोत. कंबू म्हणजे शंख त्याच्याप्रमाणे ज्यांचा कंठ आहे असे दत्तात्रेय माझ्या कंठाचे रक्षण करोत. सुंदर मुख असलेले दत्तात्रेय माझ्या मुखाचे रक्षण करोत.


जिह्वां मे वेदवाक् पातु नेत्रे मे पातु मे दिव्यदृक् ।

नासिकां पातु गंधात्मा पातु पुण्यश्रवाः श्रुती ॥ ४ ॥

सर्व वेद ज्या विराटस्वरुप दत्तात्रेयाचे वागिंद्रिय आहे असे दत्तात्रेय माझ्या जिभेचे रक्षण करोत. ज्यांची दृष्टी दिव्य आहे असे दत्तात्रेय माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करोत. ज्यांचे शरीर सर्वदा व स्वभावतःच सुगंधी आहे आणि जे गंधरुप आहेत असे दत्तात्रेय माझ्या नाकाचे रक्षण करोत. ज्याच्या स्वरुपाचे व गुणांचे श्रवण पुण्यकारक आहे असे दत्तात्रेय माझ्या कानांचे रक्षण करोत. 


ललाटं पातु हंसात्मा शिरः पातु जटाधरः ।

कर्मेन्द्रियाणि पात्वीशः पातु ज्ञानेन्द्रियाण्यजः ॥ ५ ॥

हंसरुप दत्तात्रेय माझ्या ललाटाचे रक्षण करोत. जटा धारण करणारे दत्तात्रेय माझ्या मस्तकाचे रक्षण करोत. सर्वांचा ईश असलेला दत्तात्रेय माझ्या वाणी, जननेन्द्रिय, गुद, हात व पाय अशा पांच कर्मेंद्रियांचे रक्षण करो. ज्याला जन्म नाही असा म्हणजे जन्मानंतरचे विकार नसलेला दत्त डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा या पांच ज्ञानेद्रियांचे रक्षण करो.


सर्वान्तरोन्तःकरणं प्राणान्मे पातु योगिराट् ।

उपरिष्टादधस्ताच्च पृष्ठतः पार्श्वतोऽग्रतः ॥ ६ ॥

सर्वांच्या चित्तात राहणारा दत्त माझ्या अंतःकरणाचे रक्षण करो. सर्व योग्यांचा राजा माझ्या प्राणापानादि दशवायूंचे रक्षण करो. वरती, खाली, पाठीमागे, डाव्या उजव्या दोन्ही बाजूंना व पुढच्या बाजूला अशा दश दिशांना दत्तात्रेय माझे रक्षण करोत.


अन्तर्बहिश्च मां नित्यं नानारुप धरोऽवतु ।

वर्जितं कवचेनाव्यात्स्थानं मे दिव्यदर्शनः ॥ ७ ॥

नानारुप धारण करणारा दत्त आत-बाहेर म्हणजे घराच्या किंवा शरीराच्या आत व बाहेर माझे रक्षण करो. ज्या स्थानांना कवच लागले नाही त्या स्थानांचेही दिव्यदृष्टी असणारा दत्तात्रेय रक्षण करो.


राजतः शत्रुतो हिंस्त्राद्दुष्प्रयोगादितोऽघतः ।

आधि-व्याधि-भयार्तिभ्यो दत्तात्रेयः सदावतु ॥ ८ ॥

राजापासून, शत्रूपासून, हिंस्त्र प्राण्यांपासून जारण-मारणापासून दुष्ट प्रयोगांपासून, पापांपासून, मानसिक व्यथेपासून, शारीरिक व्यथेपासून तसेच इतर भयांपासून व पीडांपासून गुरु दत्तात्रेय माझे सदा रक्षण करोत.


धन-धान्य-गृह-क्षेत्र-स्त्री-पुत्र-पशु-किंकरान् ।

ज्ञातींश्च पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः ॥ ९ ॥

माझ्या पैशाचे, धान्याचे, घराचे, शेताचे, स्त्रीचे, मुलांचे, पशुंचे सेवकांचे व इतर सर्व कुटुंबाचे अनसुयेचा आनंद वाढविणार्‍या मुलाने म्हणजेच श्रीदत्तात्रेयाने रक्षण करावे.


बालोन्मत्त पिशाचाभोद्युनिट्संधिषु पातु माम् ।

भूत-भौतिक-मृत्युभ्यो हरिः पातु दिगंबरः ॥ १० ॥

केंव्हां केव्हां लहान मुलासारखा वागणारा केंव्हां केव्हां उन्मत्त होणारा श्रीगुरुदेव दत्त दिवसा, रात्री व दिवसरात्रीच्या संधीत पंचमहाभूते व त्यापासून उत्पन्न झालेल्या पदार्थापासून व मृत्यु पासून माझे रक्षण करो.


य एतद्दत्तकवचं संनह्याद्भक्तिभावितः ।

सर्वानर्थविनिर्मुक्तो ग्रहपीडाविवर्जितः ॥ ११ ॥

हे दत्तकवच जो कोणी भक्तीने युक्त होऊन जपेल व पाठ करेल तो सर्व अनर्थांतून मुक्त होईल. तसेच सर्व ग्रहांच्या पीडेपासून मुक्त होईल.


भूतप्रेतपिशाचद्यैर्देवैरप्यपराजितः ।

भुक्त्वात्र दिव्य भोगान् स देहांतेतत्पदंव्रजेत् ॥ १२ ॥

भूत, प्रेत व पिशाच्च यांचे हे कवचधारण करणारापुढें काहीही चालणार नाही. देवसुद्धा त्याला पराजित करु शकणार नाहीत. या लोकांत स्वर्गांत असलेल्या सुखांप्रमाणे सर्व सुखे मिळतील. देहान्ती कवच जपणारा दत्तस्वरुपास प्राप्त होईल. 

॥ इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितं श्रीदत्तात्रेय कवचं संपूर्णम् ॥

अशारीतीने हे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वतीनीं रचिलेले श्रीदत्तात्रेय कवच संपूर्ण झाले.




मराठी अनुवाद  कै. जेरेशास्त्री यांनी केलेला आहे.


Jan 8, 2019

श्रीगुरुचरित्र अध्याय - ११



श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ 

नामधारक म्हणे सिद्धासी । पुढें अवतार जाहले कैसी । विस्तारोनियां आम्हांसी । सांगा स्वामी कृपामूर्ति ॥ १ ॥ सिद्ध म्हणे ऐक वत्सा । अवतार झाला श्रीपाद हर्षा । पूर्वी वृतांत ऐकिला ऐसा । कथा सांगितली विप्रस्रियेची ॥ २ ॥ शनिप्रदोषीं सर्वेश्वरासी । पूजित होती गुरु-उपदेशीं । देहवासना असतां तियेसी । पंचत्व पावली तयेवेळी ॥ ३ ॥ झाला जन्म पुढें तिसी । कारंज-नगर उत्तरदेशीं । वाजसनीय शाखेसी । विप्रकुळी जन्मली ॥ ४ ॥ जातक वर्तले तियेसी । नाम ' अंबा-भवानी ' ऐसी । आरोपिलें स्नेहेसीं । मातापितरी परियेसा ॥ ५ ॥ वर्धता मातापित्यागृही । वाढली कन्या अतिस्नेही । विवाह करिती महोत्साही । देती विप्रासी तेचि ग्रामी ॥ ६ ॥  शिवव्रती असे तो ब्राह्मण । नाम तया ' माधव ' जाण । त्यासी दिधली कन्या दान । अतिप्रीतीकरुनि ॥ ७ ॥ तया माधवविप्राघरी । शुभाचारें होती नारी । वासना तिची पूर्वापरी । ईश्वरपूजा करीतसे ॥ ८ ॥ पूजा करी ईश्वरासी । दंपती उभयवर्ग मनोमानसी । प्रदोषपूजा अतिहर्षी । करिती भक्तिपुरस्सर ॥ ९ ॥ मंदवारी त्रयोदशीसी । पूजा करिती अतिविशेषी । तंव वत्सरें झाली षोडशीं । अंतर्वत्नी झाली ऐका ॥ १० ॥ मास तृतीय-पंचमेसी । उत्साह करिती अनेक हर्षी । उत्तम डोहाळे होती तियेसी । ब्रह्मज्ञान बोलतसे ॥ ११ ॥ करिती उत्साह मास-सातीं । द्विज करी सीमंती । अक्षवाणें वोंवाळिती आरती । सुवासिनी मिळूनियां ॥ १२ ॥ ऐसें क्रमितां नवमासीं । प्रसूत झाली शुभ दिवशीं । पुत्र जाहला म्हणून हर्षी । निर्भर होती मातापिता ॥ १३ ॥ जन्म होतांचि तो बाळक । ' ॐ 'कार शब्द म्हणतसे अलोलिक । पाहूनि झाले तटस्थ लोक । अभिनव म्हणोनि तयेवेळीं ॥ १४ ॥ जातककर्म करी तो ब्राह्मण । विप्रांसी देत दक्षणा दान । ज्योतिषी सांगती सुलक्षण । लग्न सत्वर पाहोनियां ॥ १५ ॥ सांगती ज्योतिषी त्या द्विजासी । मुहूर्त बरवा असे विशेषी । कुमर होईल कारणिक पुरुषी । गुरु होईल सकळिकां ॥ १६ ॥ याचा अनुग्रह होईल ज्यासी । तो वंद्य होईल विश्वासी । याचें वाक्य होईल परिस । चिंतामणि याचे चरण ॥ १७ ॥ अष्टही सिद्धि याचे द्वारीं । वोळगत राहतील निरंतरीं । नव निधि याच्या घरी । राहती ऐक द्विजोत्तमा ॥ १८ ॥ न होती यासी गृहिणी-सुत । पूज्य होईल त्रिभुवनांत । याचे दर्शनमात्रे पतित । पुनीत होतील परियेसी ॥ १९ ॥ होईल हा अवतार-पुरुषी । आम्हां दिसतसे भरंवसी । संदेह न धरावा मानसी । म्हणोनि करिती नमस्कार ॥ २० ॥ म्हणती समस्त द्विजवर । सांगती जनकासी उत्तर । याचेनि महादैन्य हरे । भेणे नलगे कळिकाळा ॥ २१ ॥ तुमचे मनी जे जे वासना । सर्व साधेल निर्गुणा । यातें करावें हो जतना । निधान आले तुमचे घरा ॥ २२ ॥ ऐसे जातक वर्तवोन । सांगता झाला विद्वज्जन । जनक जननी संतोषोन । देती दान वस्राभरणे ॥ २३ ॥ सांगोनि गेले ब्राह्मणस्तोम । मातापिता अति प्रेम । दृष्टि लागेल म्हणून विषम । निंबलोण वोवाळिती ॥ २४ ॥ व्यवस्था फांकली नगरांत । अभिनव आजि देखिले म्हणत ।उपजतां बाळ ' ॐ ' कार जपत । आश्चर्य म्हणती सकळ जन ॥ २५ ॥ नगरलोक इष्टमित्र । पहावया येती विचित्र । दृष्टि लागेल म्हणोनि मात्र । माता न दाखवी कवणासी ॥ २६ ॥ मायामोहे जनकजननी । बाळासी दृष्टि लागेल म्हणोनि । अंगारा लाविती मंत्रोनि । रक्षा बांधिती कृष्णसुतें ॥ २७ ॥ परमात्मयाचा अवतार । दृष्टि त्यासी केवी संचार । लौकिकधर्म ममत्कार । मातापिता संरक्षिती ॥ २८ ॥ वर्ततां बाळ येणेंपरी । दिवस दहा झालियावरी । नामकरण पुरःसरी । ठेविता झाला जनक द्विजोत्तम ॥ २९ ॥ ' शालग्रामदेव ' म्हणत । जन्मनाम झालें ख्यात । नाम ' नरहरी ' ऐसे म्हणत । उच्चार केला धर्मकर्में ॥ ३० ॥ ममत्व थोर बाळकावरी । प्रतिपाळ करिती प्रीतिकरीं । माता म्हणतसे येरी । न पुरे क्षीर बाळकासी ॥ ३१ ॥ पतीसी म्हणे तये वेळां । स्तनीं दूध थोडे बाळा । एखादी मिळवा कां अवळा । स्तनपान देववूं ॥ ३२ ॥ अथवा आणा मेषी एक । आपुले स्तनें न शमे भूक । ऐकोनि हांसे बाळक । स्पर्श करी स्तनासी सव्यकर ॥ ३३ ॥ स्तनीं स्पर्श होतांचि कर । बत्तीस धारा वाहे क्षीर । वस्र भिजोनि विचित्र । वाहों लागे भूमीवरी ॥ ३४ ॥ विस्मय करिती जनकजननी । प्रगट न करिती गौप्यगुणी । नमन करिती बाळकाचरणी । माता होय खेळविती ॥ ३५ ॥ पाळण्या घालूनि बाळकासी । पर्यदें गाय अति हर्षी । न राहे बाळक पाळणेसी । सदा खेळे महीवरी ॥ ३६ ॥ वर्धे बाळ येणेंपरी । मातापिता-ममत्कारी । वर्धतां झाला संवत्सरीं । न बोले बाळ कवणासवें ॥ ३७ ॥ माता बोलवी कुमरासी । बोले शब्द ॐकारेसीं । चिंता करीतसे मानसीं । मुकें होईल म्हणोनि ॥ ३८ ॥ पुसती जाण ज्योतिष्यासी । म्हणे बोल नये काय यासी । उपाय असेल यास विशेषी । म्हणोनि पुसे वेळोवेळी ॥ ३९ ॥ सांगती जाण ज्योतिषी । आराधावे कुलदेवतेसी । अर्कवारी अश्वत्थपर्णेसी । अन्न घालावे तीनी वेळां ॥ ४० ॥ एक म्हणती होईल मुकें । यासि शिकवावे बरव्या विवेके । बाळ बोल बोलूं शिके । म्हणोनि सांगती विनोदें ॥ ४१ ॥ हांसोनि ॐकार उच्चारी बाळ । आणिक नेणे बोल केवळ । विस्मय करिताति लोक सकळ । ॐकार शब्द ऐकोनि ॥ ४२ ॥ एक म्हणती नवल झालें । सर्व ज्ञान असे भलें । श्रवणीं ऐकतो बोल सकळ । जाणूनि न बोले कवण्या गुणें ॥ ४३ ॥कांही केलिया न बोले सुत । चिंता करिताति मातापिता । पुत्रासी जाहली वर्षे सात । मुका झाला दैवयोगें ॥ ४४ ॥ सातवें वर्ष कुमरासी । योग्य झाला मुंजीसी । पुसताति समस्त ब्राह्मणांसी । केवीं करावें म्हणोनियां ॥ ४५ ॥ विप्र म्हणती तया वेळां । संस्कारावें ब्राह्मणकुळा । उपनयनावें केवळा । अष्ट वरुषें होऊ नये ॥ ४६ ॥ मातापिता चिंता करिती । उपदेशावें कवणे रीतीं । मुका असे हा निश्चितीं । कैसे दैव झालें आम्हां ॥ ४७ ॥ कैसें दैव जाहलें आपुलें । ईश्वरगौरी आराधिले । त्रयोदशीं शिवासी पूजिलें । वायां झालें म्हणतसे ॥ ४८ ॥ ईश्वरें तरी दिधला वरु । सुलक्षण झाला कुमरु । न बोले आतां काय करुं । म्हणोनि चिंती शिवासी ॥ ४९ ॥ एकचि बाळ आमुचे कुशीं । आणिक न देखो स्वप्नेसीं । वेष्टिलों होतो आम्ही आशी । आमुते रक्षील म्हणोनि ॥ ५० ॥ नव्हेच आमुचे मनींचा वास । पुत्र झाला निर्वाणवेष । काय वर दिधला त्या महेशें । शनिप्रदोषीं पूजितां म्यां ॥ ५१ ॥ ऐसे नानापरी देखा । जननी करी महादुःखा ।जवळी येवोनि बाळक । संबोखीत मातेसी ॥ ५२ ॥ घरांत जाऊनि तये वेळा । घेऊनि आला लोखंड सबळा । हातीं धरितांचि निर्मळा । झालें सुवर्ण बावन्नकशी ॥ ५३ ॥ आणोनि देतसे मातेसी । विस्मय करी बहुवसीं । बोलावूनियां पतीसी । दाविती झाली तयेवेळीं ॥ ५४ ॥ गौप्य करिती तये वेळां । मंदिरांत नेलें तया बाळा । पाहती त्याची बाळलीला । आणिक लोह हातीं देती ॥ ५५ ॥ अमृतदृष्टीं पाहातां स्वामी । समृद्धि झाली सर्व हेमी । विश्वास धरिती मनोधर्मी । होईल पुरुष कारणिक ॥ ५६ ॥ मग पुत्रातें आलिंगोनी । विनविताति जनकजननी । तूं तारका शिरोमणि । कारणिक पुरुष कुळदीपका ॥ ५७ ॥तुझेनि सर्वस्व लाधलें । बोलतां आम्ही नाही ऐकिलें । अज्ञान-मायेनें वेष्टिलें । मुकें ऐसें म्हणों तुज ॥ ५८ ॥ आमुचे मनींची वासना । तुवां पुरवावी नंदना । तुझे बोबडे बोल आपणा । ऐकवावे पुत्रराया ॥ ५९ ॥हास्यवदन करी बाळ । यज्ञोपवीत दावी गळां । कटी दावी मौजीस्थळा । म्हणोनि दाखवी मातेसी ॥ ६० ॥ संज्ञा करोनि मातेसी । दावी बाळक संतोषीं । मुंजी बांधितांचि आपणासी । येईल म्हणे बोल सकळ ॥ ६१ ॥ मातापिता संतोषती । विद्वांस ज्योतिषी पाचारिती । व्रतबंधमुहूर्त-लग्न पाहती । सर्व आयती करिते झाले ॥ ६२ ॥ केली आयती बहुतांपरी । रत्नखचित अळंकारीं । मायामोहें प्रीतीकरीं । समारंभ करिताति ॥ ६३ ॥ चतुर्वेदी ब्राह्मण येती । शाखापरत्वें वेद पढती । इष्ट सोयरे दाईज गोत्री । समस्त आले तया भवना ॥ ६४ ॥ नानापरीचे श्रृंगार । उभारिले मंडपाकार । आनंद करीतसे द्विजवर । अपार द्रव्य वेंचीतसे ॥ ६५ ॥ नगरलोक विस्मय करिती । मूक पुत्रासी एवढी आयती । द्विजा लागली असे भ्रांति । वृथा करितो द्रव्य आपुलें ॥ ६६ ॥ इतुकें वेंचूनि पुत्रासी । व्रतबंध करील परियेसीं । गायत्री केवीं उपदेशी । करील आचार कवणेपरी ॥ ६७ ॥ एक म्हणती हो कां भलतें । मिष्टान्न आम्हांसि मिळतें । देकार देतील हिरण्य वस्रें । चाड नाहीं त्याचे मंत्रा ॥ ६८ ॥ ऐसे नानापरीचे लोक । विचार करिती अनेक । मातापित्या अत्यंत सुख । देवदेवक करिताति ॥ ६९ ॥ चौलकर्म येरे दिवसीं । भोजन चौलमणीसी । पुनरभ्यंग करुनि हर्षी । यज्ञोपवीत धारण केलें ॥ ७० ॥ मंत्रपूर्वक यज्ञोपवीत । धारण करविती द्विज समस्त ।सहभोजन करावया माता । घेऊनि गेली मंदिरांत ॥ ७१ ॥ भोजन करोनि मातेसवें । निरोप घे तो एकभावें । मुंजीबंधन असे करावें । म्हणोनि आला पित्याजवळी ॥ ७२ ॥ गृह्योक्तमार्गे मौंजी देखा । बंधन केले त्या बाळका ।सुमुहूर्त आला तत्काळिका । मंत्रोपदेश करिता झाला ॥ ७३ ॥ गायत्रीमंत्र अनुक्रमेसीं । उपदेश देती परियेसीं । बाळ उच्चारी मनोमानसीं । व्यक्त न बोले कवणापुढें ॥ ७४ ॥ गायत्रीमंत्र कुमरासी होतां । भिक्षा घेऊनि आली माता । वस्रभूषणें रत्नखचिता । देती झाली तया वेळीं ॥ ७५ ॥ पहिली भिक्षा घेऊनि करीं । आशीर्वचन दे ती नारी । बाळ ऋग्वेद म्हणोन उच्चारी । आचारधर्में वर्ततसे ॥ ७६ ॥ पहिली भिक्षा येणेंपरी । देती झाली प्रीतिकरीं । ' अग्निमीळेपुरोहितं ' उच्चारी । ब्रह्मचारी तया वेळीं ॥ ७७ ॥ दुसरी भिक्षा देतां माता । उच्चार केला यजुर्वेद ' इषेत्वा- '। लोक समस्त तटस्था । माथा तुकिती तये वेळीं ॥ ७८ ॥ तिसरी भिक्षा देतां माता । म्हणे सामवेद पढे आतां । ' अग्नआयाहि- ' गायन करीत । तीन्ही वेद म्हणतसे ॥ ७९ ॥ सभा समस्त विस्मय करी । पहाती हर्षनिर्भरीं । मुके बोले वेद चारी । म्हणती होईल कारणिक ॥ ८० ॥ यातें म्हणों नये नर । होईल देवाचा अवतार । म्हणोनि करिती नमस्कार । जगद्गुरु म्हणोनिया ॥ ८१ ॥ इतुक्यावरी तो बाळक । मातेसी म्हणतसे ऐक । तुवां उपदेश केला एक । भिक्षा माग म्हणोनि ॥ ८२ ॥ नव्हती बोल तुझें मिथ्या । निर्धार राहिला माझिया चित्ता । निरोप द्यावा आम्हां त्वरिता । जाऊं तीर्थें आचरावया ॥ ८३ ॥ आम्हां आचार ब्रह्मचारी । भिक्षा करावी घरोघरीं । वेदाभ्यास मनोहरी । करणें असे परियेसा ॥ ८४ ॥ ऐकोनि पुत्राचे वचन । दुःखे दाटली अतिगहन । बाष्प निघताति लोचनीं । आली मूर्च्छना तये वेळीं ॥ ८५ ॥ निर्जीव होऊनि क्षणैक । करिती झाली महाशोक । पुत्र माझा तूं रक्षक । म्हणोनि केली आशा बहु ॥ ८६ ॥ आमुतें रक्षिसी म्हणोनि । होती आशा बहु मनीं । न बोलसी आम्हांसवे याचि गुणीं । मुकें म्हणविसी आपणासी ॥ ८७ ॥ न ऐकों कधीं तुझे बोल । आतां ऐकतां संतोष होईल । ईश्वरपूजा आले फळ । म्हणोनि विश्वास केला आम्ही ॥ ८८ ॥ ऐसें नानापरी देखा । पुत्रासी म्हणे ते बाळिका । आलिंगोनि कुमारका । कृपा भाकी तयेवेळीं ॥ ८९ ॥ ऐकोनि मातेचे वचन । बाळक सांगे ब्रह्मज्ञान । नको खेदवूं अंतःकरण । आम्हां करणे तेंचि असे ॥ ९० ॥ तूंतें आणखी पुत्र चारी । होतील माते निर्धारी । तुझी सेवा परोपरी । करितील मनोभावेसी ॥ ९१ ॥ तुवां आराधिला शंकर । जन्मांतरीं पूर्वापार ।म्हणोनि मस्तकीं ठेविती कर । मग तिसी जाहले जातिस्मरण ॥ ९२ ॥ पूर्वजन्मींचा वृतांत । स्मरता जाहली विस्मित । श्रीपादश्रीवल्लभ स्वरुपांत । दिसतसे तो बाळक ॥ ९३ ॥ देखोनि माता तये वेळां । नमन केलें चरणकमळां । श्रीपाद उठवूनि अवलीळा । सांगती गौप्य अवधारीं ॥ ९४ ॥ ऐक माते ज्ञानवंती । हा बोल करी वो गुप्ती । आम्ही संन्यासी असों यति । अलिप्त असों संसारीं ॥ ९५ ॥याचिकारणें आम्ही आतां । हिंडू समस्त तीर्थयात्रा । कारण असे पुढे बहुता । म्हणोनि निरोप मागती ॥ ९६ ॥ येणेंपरी जननियेसी । गुरुमूर्ति सांगे विनयेसीं । पुनरपि विनवी पुत्रासी । ऐका श्रोते एकचित्तें ॥ ९७ ॥ पुत्रासी विनवी तये वेळ । मातें सांडूनि तुम्हां जरी जाल । आणिक कधीं न देखों बाळ । केवीं वांचूं पुत्रराया ॥ ९८ ॥ धाकुटपणीं तुम्ही तापस- । धर्मी कवण आहे हर्ष । धर्मशास्रीं ख्याति सुरस । आश्रम चारी आचरावे ॥ ९९ ॥ ब्रह्मचर्य वर्षें बारा । त्यावरी गृहस्थधर्म बरा । मुख्य असे, वानप्रस्थ तदनंतरा । घडती पुण्यें अपरांपर ॥ १०० ॥मुख्य आश्रम असे गृहस्थ । आचरतां होय अतिसमर्थ । मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ । धर्मशास्र येणेपरी ॥ १०१ ॥ ब्रह्मचर्यमार्ग ऐका । पठण करावें वेदादिकां । विवाह होतां गृहस्थें निका । पुत्रादिक लाधावे ॥ १०२ ॥ यज्ञादिक कर्म साधोनियां । तदनंतर संन्यास करणें न्याया । येणेविधि संन्यास असे मुख्या । अग्राह्य संन्यास बाळपणीं ॥ १०३ ॥ समस्त इंद्रियें संतुष्टवावीं । मनींची वासना पुरवावी । तदनंतर तपासी जावें । संन्यास घेतां मुख्य असे ॥ १०४ ॥ ऐकोनि मातेचें वचन । श्रीगुरु सांगती तत्त्वज्ञान । ऐक नामधारका सुमन । म्हणोनि सांगे सिद्धमुनि ॥ १०५ ॥ गंगाधराचा नंदन । विनवीतसे नमून । तें परिसा श्रोते जन । श्रीगुरुचरित्र विस्तार ॥ १०६ ॥ पुढें वर्तलें अपूर्व ऐका । सिद्ध सांगे नामधारका । महाराष्ट्रभाषेंकरुनि टीका । सांगतसे सरस्वती-गंगाधर ॥ १०७ ॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे श्रीगुरुनरहरिबाळचरित्रलीलावर्णनं नाम एकादशोऽध्यायः ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥




Jan 6, 2019

श्री नृसिंह सरस्वती अष्टकं


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

इंदुकोटितेज करुणासिंधु भक्तवत्सलं। 

नंदनात्रिसूनु दत्त, इंदिराक्ष श्रीगुरुम् । 

गंधमाल्याक्षतादि-वृंददेववंदितम् । 

वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम ॥ १ ॥ 

मायपाश-अंधकारछायदूरभास्करं । 

आयताक्ष पाहि श्रियावल्लभेश-नायकम् । 

सेव्य भक्तवृंद वरद, भूय भूय नमाम्यहं । 

वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥ २ ॥ 

चित्तजादिवर्गषट्क-मत्तवारणांकुशम् । 

तत्त्वसारशोभितात्मदत्त श्रियावल्लभम् । 

उत्तमावतार भूत-कर्तृ भक्तवतसलं । 

वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥ ३ ॥ 

व्योमरापवायुतेज-भूमिकर्तुमीश्वरम् । 

कामक्रोधमोहरहित सोमसूर्यलोचनम् । 

कामितार्थदातृ भक्त-कामधेनु श्रीगुरुम् । 

वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥ ४ ॥ 

पुंडरिक-आयताक्ष, कुंडलेंदुतेजसम् । 

चंडदुरितखंडनार्थ दंडधारि श्रीगुरुम् । 

मंडलीकमौलि मार्तंडभासिताननम् । 

वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥ ५ ॥ 

वेदशास्त्रस्तुत्यपाद, आदिमूर्ति श्रीगुरुम् । 

नादबिंदुकलातीत, कल्पपादसेव्ययम् । 

सेव्यभक्तवृंदवरद भूय भूय नमाम्यहम् । 

वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥ ६ ॥ 

अष्टयोगतत्त्वनिष्ठ, तुष्ट ज्ञानवारिधिम् । 

कृष्णावेणितीरवास-पंचनदीसंगमम् । 

कष्टदैन्यदूरिभक्त-तुष्टकाम्यदायकम् । 

वंदयामि नारसिंह-सरस्वतीश पाहि माम् ॥ ७ ॥ 

नारसिंहसरस्वती-नाम अष्टमौक्तिकम् । 

हारकृत शारदेन गंगाधर-आत्मजम् । 

धारणीक-देवदीक्ष गुरुमूर्तितोषितम् । 

परमात्मानंदश्रियापुत्रपौत्रदायकम् ॥ ८ ॥ 

नारसिंहसरस्वतीय अष्टकं च यः पठेत् । 

घोरसंसारसिंधुतारणाख्यसाधनम् । 

सारज्ञानदीर्घआयुरोग्यादिसंपदम् । 

चारुवर्गकाम्यलाभ वारंवार यज्जपेत् ॥९ ॥