Feb 28, 2017

कावडीबाबा विरचित श्रीदत्तप्रबोध - श्री दत्त उपासना


।। श्री गणेशाय नमः ।।

।।ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ।। 


।।श्री दत्त ध्यान ।।

बाळार्कमूर्ति प्रभायमान । गौर श्याम कर्पूरवर्ण । जटाभार भस्मोद्धारण । भीमासुरवदनत्रय कमळ ॥१॥

कमलदलाक्ष आकर्ण विराजित । श्याम कुरळपत्रें भ्रूकुटी विराजित । सोज्वळ षड्रसतेज लखलखित । 

लाल श्वेत सुनीळ चक्रें ॥२॥

भाळ विशाळ सुंदर । त्यावरी तिलक रेखिले नागर । सुनीळ वरीं कुरळभार । तेजाकार मुगुटशोभा ॥३॥

जडित कादण मुगुटासी । मणीफणीवरी तेजोराशी । मकरकेयूर कुंडलांसी । श्रवणीं मुद्रेसी शोभविलें ॥४॥

आजानबाहू दंड सरळ । रक्तपाणी सुकोमळ । अतिदिव्य हृदयस्थळ । कंठनाळ तयावरी ॥५॥

त्रिवळी शोभे उदरावरी । नाभी वर्तुळ साजिरी । जानुजंघा कर्दळीपरी । गुल्फेवरी पदांच्या ॥६॥

पाउलें द्वय सकुमार । जें शरणागताचें तारुं थोर । तयावरी शोभे तोडर । नाद गंभीर पावनाचा ॥७॥

सुंदर शोभती मेखळा । वनमाळा शोभते गळा । कासे पितांबर पिंवळा। सोनसळा लखलखित ॥८॥

यज्ञोपवीत शोभायमान । दंडी ब्रीद्राचें भूषण । मणिमय करी दिव्य कंकण । उत्तरीवसन मुद्रांगुली ॥९॥

शंक चक्र गदां पाणी । त्रिशूल डमरु वाद्यरंजनी । दंडकमंडलू कौपिनी । मालास्मरणी कमळ तें ॥१०॥

शार्दूलचर्म सुंदर । तया आसनीं तो दिगंबर । कामधेनु सवें निरंतर । झोळीपात्र कनकाचें ॥११॥

पादुका चरणीं मिरवीत । आनंददृष्टीं अवलोकित । विदेहवृत्ति सदा शांत । स्वानंदीं रमत सर्वदा ॥१२॥

ऐसें हृदयीं धरोनि ध्यान । मानसीं करावें नित्य पूजन । षोडशोपचार करोनि अर्पण । पुढतीं स्तवन आरंभावें ॥१३॥


॥श्री दत्तात्रेय मानसपूजा ॥

|| श्रीगणेशायनमः |। 

|| श्रीगुरुभ्यो नमः ।|

प्रथम होवोनि सुस्नात । मन करुनिया पवित्र । आसनी बैसावें स्वस्थचित्त । श्रीगुरुमानसपूजेसी ॥१॥

सिद्धासनारुढ ध्यानीं । खेचरी मुद्रा धारणीं । तूंचि तारक आम्हां लागुनी । हरि स्वरुपी दत्तगुरु ॥२॥

मानसपूजें कारणें । परिवारासह तुम्ही येणें । उतावीळ मी दर्शनाकारणे । ऐसी प्रार्थना करावी ॥३॥

सुवर्णयुक्त रत्‍नजडित । देवतामय सुंदर खचित । सिंहासन मी कल्पिलें येथ । बैसावें जी सद्‌गुरु मूर्ती ॥४॥

कर्पुर चंदन मिश्रित तेलें । पादप्रक्षालना जल कल्पिलें । स्वीकार कर हो येवेळें । तव चरण प्रक्षाळितों ॥५॥

गंधतुलसी बिल्वपत्र । उदक अक्षता शमी पवित्र । यांनीं भरलें हें सुवर्णपात्र । सुवास तयांचा घ्याहो स्वामी ॥६॥

सुवासिक जल मनांत आणिलें । सुवर्णपात्रीं मग तें भरलें । भक्तीनें तुम्हा अर्पण केलें । आचमन मधुपर्क दिगंबरा ॥७॥

सुगंधित सुंदर तेलें । स्नानालागीं मी कल्पियलें । पंचामृतें गंगोदकें न्हाणिलें । स्वीकारजी देवराया ॥८॥

दिगंबराहो आचां त्यजलें । भक्तीनें तुम्हां अभिषेकिलें । भगवें वस्त्र मृगचर्म अर्पिलें । स्वीकार करा हीच प्रार्थना ॥९॥

बहू सूत्रांनीं असे युक्त । ऐसें हे ब्रह्मसुत्र । म्हणूनी देवतामय सूत्र । धारण करा गुरुवर्या ॥१०॥

भस्म कस्तुरी आणि केशर । चंदनयुक्त परिकर । रत्‍नाक्षता असती तयार । अलंकृत तुम्हां करितसें ॥११॥

तुळसीगंध शमिबिल्वपत्र । सुवासिक नानापुष्पें येथ । मनात कल्पिलीं म्यां बहूत । अर्पिली ती सद्‌गुरुचरणी ॥१२॥

लाक्षासिता अभ्रक श्रीवास । श्रीखंड अगरु गुग्गुल खास । युक्तअग्नींत धूपास । घातलासे यतिराया ॥१३॥

सुवर्णपात्र मी कल्पिलें । तयांमध्यें दीप लाविले । कर्पुरयुक्त प्रज्वाळिलें । स्वीकाराहो दत्तप्रभू ॥१४॥

षड्‌रसाचें पक्वान्न परिकर । गोरसयुक्त मिष्टान्न साचार । सुवर्णपात्रीं ठेविलें सत्वर । भक्षण जलपान करावें ॥१५॥

हस्तमुख प्रक्षालून । सवेचि आचमन करुन । तांबुल दक्षिणादिफलेन । संतुष्ट व्हावें स्वामिया ॥१६॥

रत्‍नदीपांची आरती लावून । आणि आपणा नमस्कार करुन । करितों तवगुण वर्णन । प्रदक्षिणा सहितपैं ॥१७॥

दिगंबराहो तव मस्तकीं । अर्पिली मंत्रपुष्पांजली कीं । गायन वादन नर्तनादि । उपचार षोडश अर्पिले ॥१८॥

तव प्रेरणेनें प्रेरित । अज्ञान पामर मी खचित । पूजा केलीहो त्वरित । प्रेरक तुम्हीं संतुष्ट व्हावें ॥१९॥

मग घालोनि प्रदक्षिणा । करितों साष्टांग नमना । करद्वय जोडोनि जाणा । तव प्रार्थना करीतसें ॥२०॥

जयजयाजी दिगंबरा । जयजयाजी अत्रीकुमरा । ब्रह्मा विष्णू महेश्वरा । सांभाळावें बालकांसी ॥२१॥

तूं दीनांचा कैवारी । अवतरलासी अनुसूयोदरीं । तुझी भक्ती जो निरंतरीं । प्रतिपाळिसी वरदहस्तें ॥२२॥

ऐसी प्रार्थना करुन । मागतसें तुजलागुन । या मानसपूजेचें पठण । करितां दुःखें हरावीं ॥२३॥

भक्तांची व्हावी कामना पूर्ण । पिशाच्चादि बाधा निरसन । अनेक संकटांपासून । मुक्त व्हावे भक्तानें ॥२४॥

येणेंपरी मागतां वर । प्रसन्न झाला यतिवर । जो भक्तिभावें पठण करील नर । संकटें त्याचीं दूरी पळती ॥२५॥

विश्वास धरील जो मानसीं । त्यासी कृपा करील औदुंबरवासी । न म्हणाहो असत्य यासीं । अनुभवें कळों येईल ॥२६॥

इति श्री दत्तदास विरचितं दत्तात्रेय मानसपूजास्तोत्रं संपूर्णम् ।


।। श्री दत्त स्तवन ।।

जयजयाजी अविनाशा । निर्गुण निरामया परेशा । मायातीता तू सर्वेशा । अनंतवेषा नमो तुज ॥१॥

जयजय निखिल ब्रह्म सनातना । सर्वात्मका सर्वभूषणा । षड्‌गुण ऐश्वर्यसंपन्ना । दयाघना नमो तुज ॥२॥

जय सर्वसाक्षी सर्वज्ञा । जयजयाजी गुणप्रज्ञा । सकळातीता सर्व सुज्ञा । भक्तवरज्ञा नमो तुज ॥३॥

जयजय सगुणवेषा सुंदरा । जय रजोगुणा सृष्टीविस्तारा । जय सृष्टीपालना सत्त्वधीरा । सृष्टीसहारा तामसा नमो ॥४॥

जयजयाजी अत्रिनंदना । जय अनसूयात्मजा कुलभूषणा । त्रिगुणात्मका त्रितापहरणा । भवभंजना नमो तुज ॥५॥

जयजय सिंहाचलनिवासिया । मायापुरवासी करुणालया । जयजय भक्तवत्सला दत्त सदया । प्रेमें तव पायां प्रणम्य ॥६॥

जयजय सिद्धा योगेश्वरा । पापमोचका कृपासागरा । जीवपालका जगदुद्धारा । अचल अगोचरा नमो तुजा ॥७॥

जय त्रिगुणात्मक त्रिवदना । जय षट्‌कमलराजीवनयना । जय शंकरमंडित भस्मविलेपना । भूषित भूषणा नमो तुज ॥८॥

जय शंखचक्रगदाधरा । सर्वोत्तमा दुष्टसंहारा । अज्ञानछेदका दिगंबरा । अपरंपारा नमो तुज ॥९॥

जय त्रिशूल डमरुं खड्‌ग धारणा । अनन्यप्रिया भयवारणा । जय सकलनियंता कार्यकारणा । अगा सच्चिद्धना नमो तुज ॥१०॥

जय ब्रह्मचर्यव्रत संपादका । दंडकंमडलुकौपीनधारका । जय शार्दूलचर्मविराजका । सुखदायका नमो तुज ॥११॥

जयतटि प्रियवासा । आनंदरुपालक्ष्मी निवासा । चतुर्थाश्रम पर विलासा । पंचमभूषा नमो तुज ॥१२॥

जयजय पावना परमानंदा । जय ब्रह्ममूर्ते आनंदकंदा । जय भेदातीता तूं अभेदा । अद्वयबोधा नमो तुज ॥१३॥

जय जगद्‌गुरु अविनाशा । निश्चळ निर्मळा वंद्य सुरेशा । अनंता अभंगा सकळाधीशा । परात्परपरेशा नमो तुज ॥१४॥

अगा दीनोद्धारणा दीनबंधू । तूतें ध्याती सुरवृंदू । स्तुतिस्तवनाचा संवादू । सिद्धमुनिसाधू करिताती ॥१५॥

तुज ध्याती सकल लोक । देव अमर ब्रह्मादिक । मूर्ति पाहोनि हरिहरात्मक । पूजिती आवश्यक ध्याति मुनी ॥१६॥

श्यामसुंदर सुहास्य रुप देखोन । अनन्ययोगें सर्व शरण । म्हणती दाता तूं जगत्पावन । कृपादान दे आम्हां ॥१७॥

तूं सदय आणि उदार । अनंत सिद्धिऋद्धींचें भांडार । द्वय कामधेनु निरंतर । सकळ सार तुजपाशीं ॥१८॥

तूं भुक्तिमुक्तीचा दाता । तूं सदयपणें जीव रक्षिता । तूं चुकविसी सकळ आघाता । इच्छित पदार्था देसी तूं ॥१९॥

तूं सदा शांत सुप्रसन्न । अनन्या पाळिसी कृपें करुन । आवडीचें भातुकें देसी पूर्ण । भवबंधन तोडिसी ॥२०॥

तूं सकळ देवांचाहि देव । तूं सकळ सिद्ध योगियांचा राव । अनंतब्रह्मांडींची ठेव । तूंचि जीव जीवाचा ॥२१॥

तूं आम्हां सकळांचा अधिपती । ज्ञेय ज्ञान ज्ञाता निश्चिती । तुझ्या कृपेविण कैचि गती । मूढमती जीव सर्व ॥२२॥

तरि आतां होवोनि सुप्रसन्न । दत्ता दीजे स्तवनीं मान । तुझें नाम पतितपावन । करी कल्याण सकळांचें ॥२३॥

अमंगळ सकळ हरावें । सुमंगल दान वरदीं द्यावें । अनन्यातें तोषवावें । अंगीकारावे सकळही ॥२४॥

यापरी ऋषि मुनि सुरवर । यक्षगण गंधर्व किन्नर । मानव आणि विद्याधर । स्तवन अपार करिताती ॥२५॥

मुख्य नारद भृगुविरचित । स्तवन करिती अत्यद्‌भुत । हें परिसोनी देवदत्त । कृपावंत अभय दे ॥२६॥

ते अभ्यवरदवाणी । स्तोत्रीं स्थापिली मुनींनीं । तेचि या ग्रंथीं विवरोनी । तुम्हां निरोपणी निवेदितों ॥२७॥

मुख्य येथें धरोनि भाव । ध्यान प्रथम करावें अपूर्व । मानसपूजा विधि सर्व । सारोनि स्तव करावा ॥२८॥

या स्तोत्राचें पठण । करावें वीस आवर्तन । एवं सहस्त्र संख्येचें आवर्तन पूर्ण । करितां प्रसन्न दत्त होय ॥२९॥

भूत पिशाच्च समंधभय । जे नाना परींचे अपाय । ते निवटोनि करी उपाय । रक्षी काय सकृपें ॥३०॥

यशदायक कीर्तिवर्धन । पुत्र पौत्रं दे धनधान्य । क्षेम आयुरारोग्य कल्याण । जयश्री पूर्ण प्राप्त होय ॥३१॥

राजप्रजादि सकळिक । वश्य होती आवश्यक । श्रेष्ठपणीं सकळ लोक । वंदिती अनेक सेविती ॥३२॥

क्षय अपस्मारादि रोग जाती । कूष्मांड डांकिणी यक्ष पळती । यंत्र मंत्र तंत्र न बाधती । संरक्षिती अवधूत ॥३३॥

ग्रहपीडा नाना उपाधी । तुटती अवघ्या आधिव्याधी । वन जळ अग्निसंधीं । कुपानिधी तारील ॥३४॥

वितळोनि जाय अज्ञान । प्राप्त होय इच्छित ज्ञान विद्या होय आयुष्यवर्धन । भुक्ति मुक्ति पूर्ण लाभावी ॥३५॥

प्रतिकार्या नेमिल्या नेमा । आचरण कीजे सोसोनि श्रमा । फळ पावे पूर्ण कामा । तया उत्तमा दया उपजे ॥३६॥

मनीं नाणावें विपरीत । अनुष्ठानीं बैसावें निवांत । परान्न प्रतिग्रह शय्यारत । विवर्जित असावें ॥३७॥

एवं साधितां निश्चयेंसी । त्वंरित पावे अविनाशी । नाचरतां जो यातें दूषी । तो रवरवासी पावेल ॥३८॥

जो व्रतस्थें करील पठण । तया शत्रु होतील शरण । इच्छित कामना होतील पूर्ण । दत्तदर्शन लाभेल ॥३९॥

हे मुनीचे भाष्यार्थी । वरप्रदानें दिधलीं असती । तेचि निवेदिले प्राकृती । मिळवोनि संमत्ति श्रोतिया ॥४०॥

त्या कृपेच्या प्राप्तीसाठीं । योगी सोशिती कचाटी । जीवप्राणें आटाटी । भोगिती कपाटी बैसोनी ॥१॥

तैसी अबला वृद्ध जना । न घडेचि या अवघड कारणा । म्हणोनि स्वल्प हे धारणा । निवडोनि प्रेरणा केला ग्रंथीं ॥२॥

परि यासि पाहिजे भक्ति दृढभाव । इंद्रियनेमें करी उपाव । ध्यान स्तोत्र जें अपूव । क्रम सर्व जाणावा ॥३॥

निवेदिल्या ऐसें । पठण कीजे अनन्य तैसें । मग तो पावेल करुणारसें । दृढ भरवसें साधकां ॥४॥

हें नोहे अप्रमाण । नारदभृगूचें सत्य वचन । पंरी एकाग्रे करोनि मन । करा पठण ऐसें ॥५॥

लोकोपकारासाठीं । निवेदिली ग्रंथीं हातवटी । प्रेमभावें धरोनि पोटीं । साधा गोष्टी आवडीची ॥६॥

या धारणेच्या साधनीं । अनुभव आला मजलागुनी । म्हणोनि ग्रंथीं ठेविलें लिहोनी । अर्थिक जनीं स्वीकारिजे ॥७॥

।इति कावडीबाबा विरचित श्रीदत्तप्रबोधग्रंथ ।

।।श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु ।। 

।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।