Aug 13, 2019

श्रीस्वामी समर्थ गुरूकथामृत - अध्याय ५



श्रीगणेशाय नमः । श्रीशारदादेव्यै नमः । श्रीलक्ष्मीनृसिंहाय नमः । भक्त प्रल्हाद नमोस्तुते ॥१॥

मागील कथेचे अनुसंधान । राखोनि ऐका पुढील कथन । जगन्नाथपुरी ती सोडून । स्वामी निघाले तात्काळ ॥२॥

कीं या जगदुद्धारा कारणे । स्वामींस लागे सर्व करणे । चालेल कैसे जग त्याविणे । ना तरी होय सर्वनाश ॥३॥

संत, महंत पृथ्वीचे पाठीं । यास्तव चाले जगरहाटी । नाठाळांसी हाणिती काठी । निर्भय असती सिंहापरी ॥४॥

कुटील जनांची नित्य रीती । दुर्बळां, सज्जनां सदा छळिती । जगणे तयां अशक्य करिती । नित्य आसुरी कृत्यांनी ॥५॥

मेघ वर्षती पर्जन्य । तयांपारिस हे संतजन । नातरी होते जग स्मशान । यास्तव साधू आवश्यक ॥६॥

संत देवांचे अवतार । येत हराया पृथ्वीचा भार । माजतां पातके अनिवार । अवतार घेती पुनःपुन्हा ॥७॥

पाप म्हणजे दुराचार । सभ्यतेचा ना विचार । स्वार्थ साधणे कृत्य थोर । परहितासी जाणती ना ॥८॥

स्वार्थांधवृत्ती बळावता । धर्म लाथाडिती परता । नीतिन्याय विवेक नसता । सौख्य कैचेनि लाभेल ॥९॥

बसवावया जगाची घडी । दुर्जनांची मोडण्या खोडी । सत्कर्माची लावण्या गोडी । सिद्ध सर्वत्र संचरती ॥१०॥

स्वामी येती हरिद्वारी । रविबिंब येतां वरी वरी । गंगाकिनारी घाटावरी । विप्र करिती स्नान, संध्या ॥११॥

नाना स्तोत्रें नाना गीतें । भक्त मंदिरीं गात होते । झांजा, मृदंग तालावरी ते । नर्तन करिती आनंदे ॥१२॥

शंख, घंटा निनादती । मंदिरीं चाले काकडारती । गुलाल,पुष्पें ते उधळिती । गायन करिती मनोहर ॥१३॥

झांजा, टाळ, तास, मृदंग । वादनीं, भजनीं चढे रंग । भक्तवृंद तो होय गुंग । चाले सोहळा भक्तीचा ॥१४॥

वृक्षीं स्वगांचा किलबिलाट । नरनारींनी फुलले घाट । जलपूर्ण घेऊनी डोई घट । स्त्रिया चालती गृहापती ॥१५॥

रम्य ऐशा प्रभातकाळीं । गोधन घेउनी जात गवळी । हार, पुष्पे घेऊनी माळी । मंदिरांसन्निध बैसले ॥१६॥

जय जय गंगे भागीरथी । ऐसी गर्जना थोर करिती । प्रसाद घ्यावया पुढे सरती । थाट मोठा अपूर्व ॥१७॥

पुण्यक्षेत्र हरिद्वार । लोक वर्तती धर्मानुसार । परंतु तेथे अनाचार । सदैव करिती मल्ल द्वय ॥१८॥

तये मांडिला हाहाकार । लोक संत्रस्तले फार । मल्लां कराया तडीपार । शक्ती कोणांही नसे ॥१९॥

सुंदोपसुंद ते जणू गमती । तापत्रये जन शापिती । परंतु त्यांना त्याची क्षिती । अल्पस्वल्पही असेना ॥२०॥

मनसोक्त ऐसे ते वर्तती । धनधान्य ते उद्‌ध्वस्त करिती । उद्दंडपणे गृहीं घुसती । अन्न भक्षिती सर्वस्वी ॥२१॥

द्रव्यास्तव वाटमारी । जीव घेती ते अघोरी । कामांधपणे ते परनारी । नेती ओढुनी फरफरा ॥२२॥

अनेक वर्षे जनां छळिले । दीन, दुर्बळां अति गांजिले । शुंभ-निशुंभ कीं अवतरले । सर्व भ्रष्ट करावया ॥२३॥

हरिद्वार हे पुण्यक्षेत्र । महीवरती ना अन्यत्र । धर्मपरायण जन सर्वत्र । नांदताती अहर्निश ॥२४॥

देवदुर्लभ क्षेत्र ऐसे । देवांदिकांसी लाविले पिसे । परंतु तेथे शांती न वसे । मल्ल दैत्य ते म्हणोनिया ॥२५॥

श्रीगंगेचे भव्य मंदिर । अथांग सरिता वाहे समोर । स्नान करिता, महाघोर । राक्षस पापी उद्धरती ॥२६॥

मल्लां ग्रासिले कुबुद्धीने । विख्यात जाहले कुकर्माने । अद्वातद्वा अश्लील वचनें । नरनारींसी बोलती ॥२७॥

दुष्कार्माची होय सीमा । द्यावयासी नसे उपमा । भ्रष्ट केल्या अनेक भामा । महानीच त्या दैत्यांनी ॥२८॥

लोक प्रार्थिती जनार्दना । धावा, सोडवा दयाघना । उपाय नुरला, तुमच्याविना । यावे आता सत्वरी ॥२९॥

मल्लद्वयांचे माजले बंड । संत्रस्तले ते जन उदंड । करावया या उग्र दंड । अंत आमुचा न बघावा ॥३०॥

सर्व जनांची ही प्रार्थना । ऐकू आली नारायणा । वाटे अस्वस्थ मल्लांना । रोग जडता देहासी ॥३१॥

दिवसामागून दिवस जाती । फिरे मल्लांची काळगती । फुटाया लागे रक्तपिती । तेणे जाहले गर्भगळित ॥३२॥

महाव्यथेने कळा गेली । विद्रूपता मल्लांस आली । कर-चरणांची अग्रे गळाली । नासिकाग्रही गेले ते ॥३३॥

अन्न मागती दारोदारी । हिंडता रडती वरचेवरी । अन्न न देता तयां दुरी । हेटाळिती सर्वही जन ॥३४॥

मलिन वस्त्रे हीन काया । अन्न जाहले दुर्मीळ तयां । ऊन, पाऊस झोडी जयां । तयां न आश्रय कोणाचा ॥३५॥

ताडिती हस्ते निज शिरासी । वैतागले ते अतिशयेसी । मरण देवा दे आम्हासी । नको नको हे परि जीवन ॥३६॥

हांसत-नाचत कर्म केले । त्याचे पाहिजे फळ भोगिले । लोकशाप ते फळा आले । आता कासया रडतासी ॥३७॥

जनमुखींचे शब्द बाण । सोसू न शकती मल्ल दोन । गाईहुनी ते हीन-दीन । होऊन करिती गयावया ॥३८॥

दया परंतु कोणी न करी । कंकर, फत्तर मारिती वरी । तळमळ करिती मार्गावरी । महा अघोरी मल्लद्वय ॥३९॥

यातना सोशितां व्याकूळले । लोक वदती भले झाले । दुष्टांसि प्रायश्चित्त दिधले । कुकर्मांचे इहजन्मीं ॥४०॥

काळ ऐसा जात असता । अवचित उठली एक वार्ता । सर्व जनांचा दुःखहर्ता । यतिवर्य येथे आलेती ॥४१॥

नृसिंहस्वामी तिथे येतां । समुदाय दाटे तयां भवता । व्याकूळ मनें दुःख वदता । आक्रंदती कित्येक ॥४२॥

कुणासि अंगारा, तीर्थ देती । सज्जनां आशीर्वाद देती । मंत्र जपाया कुणा वदती । भक्तांनुसार नाना तर्‍हा ॥४३॥

अपायांसी उपाय कथिती । आगतांचे हित साधिती । जनां प्रेमे बोध करिती । एकमेकां साह्य करा ॥४४॥

कुष्ठपीडित मल्ल येती । समर्थ चरणी शिर ठेविती । दुर्धर दुःखे आक्रोशती । व्याधिमुक्तहो आम्हां करा ॥४५॥

स्वामींस तदा जन वदले । मल्लद्वयांनी आम्हां छळिले । द्रव्याकारणे ठार केले । नरनारींसी कित्येक ॥४६॥

यांच्या कृत्यांचे वर्णन । करावया इच्छी न मन । क्रोधायमान ते व्हाल आपण । श्रवणीं पडतां दुष्कृत्ये ॥४७॥

असंख्य कृत्ये अनन्वित । स्वामी सांगती मल्लांप्रत । नरजन्मं मिळोनी तुम्हांप्रत । साधन केले नरकाचे ॥४८॥

मल्ल घेती पदीं लोळण । वाचवा हो आमुचे प्राण । व्याधिमुक्त केलियाविण  । देवा, आपण नच जावे ॥४९॥

सत्य तेची सांगती जन । असत्य त्यांचे नसे वचन । पातके केली अति महान । करु नये ती सर्वही ॥५०।

होय आम्हांसि पश्चात्ताप । व्यर्थ दिला सज्जना ताप । तयांचे हे भोगतो शाप । आता परंतु वाचवा आम्हां ॥५१॥

प्रार्थोनि ऐसे आक्रंदती । चरण ह्रदयी कवटाळिती । नेत्रांश्रूंनी पद न्हाणिती । यतींद्र तेणे द्रवले की ॥५२॥

वत्सल हस्ते गोंजारिती । पुरे पुरे उठा म्हणती । पश्चात्तापे पालटे मती । हेचि आम्हा हवे असे ॥५३॥

वदोनि ऐसे श्रीदयाळे । भस्म तयांचे मुखी घातले । महाव्याधींतुनी मोकळे । व्हाल चिंता न करावी ॥५४॥

ऐसा लाभता आशीर्वाद । हर्ष झाला, गेला विषाद । सांगाल तैसे निर्विवाद । वर्तू आम्ही या जगीं ॥५५॥

स्वामी सांगती अखिल जना । करतील हे हो देवभजना । सिद्ध असती जनरक्षणा । संशय जनहो न धरावा ॥५६॥

ऐकतां सर्वासि आनंद । रोगियां होय परमानंद । स्वामी प्रत्यक्ष ब्रह्मानंद । आनंदी आनंद निर्मिला ॥५७॥

जनसंमर्दी काढीत वाट । आला पुढे विप्र उद्धट । स्वामींस पुसे प्रश्न थेट । कोण कोठले आपण हो ॥५८॥

जादूटोण, मंत्र-तंत्र । पूजावया देतसा यंत्र । अज्ञ जनां फसविता मात्र । हे न वर्तन चांगले ॥५९॥

विद्या आपणाम काय येते । भूत, भविष्य सांगता ते । स्वामी जाहले तया वदते । सांगतो तुम्हा सर्व काही ॥६०॥

विप्रवर्गी थोर महती । विद्वान म्हणोनी असे कीर्ति । वागता परी अधम रीती । तुम्हा न शोभे विप्रवरा ॥६१॥

विद्वान आपणा कां म्हणविता । पापकर्मी  नित्य रमता । आढ्यतेने जगीं मिरविता । लांच्छनास्पद तुम्हासि हे ॥६२॥

विप्र असुनी गाय वधिली । गोमांस खाया जीभ धजली । कृष्णकृत्ये करोनि असली । जनीं मिरविता श्रेष्ठपण ॥६३॥

जी आपणा प्रसवली माय । परलोकीं ती म्हणेल काय । लज्जास्पद हे कर्म होय । धिक्कार तुमचा शतवार ॥६४॥

स्वामींचे ते तप्त भाषण । ऐकता ह्रदयीं शिरे बाण । तात्काळ घेई पदीं लोळण । थर थर कांपे विप्र पहा ॥६५॥

महादाश्चर्ये सर्व बघती । वधायासी त्यां धावती । स्वामी लोकां निवारिती । थांबा,थांबा म्हणोनी ॥६६॥

अधम विप्रा काय केले । गोमांस खाया मन भुकेले । वेदपुरुष कीं म्हणविता भले । कैसी कापिली गोमाता ॥६७॥

अरे राक्षसा म्हणावे काय । न रक्षिता मारिली गाय । घोर आता या उपाय । प्राणदंड की या द्यावा ॥६८॥

क्रोधे उसळला जनसागर । आकांत करी तो विप्रवर । ऐसे पाप ते भयंकर । करणार नाही पुनश्च की ॥६९॥

समर्थ वदती सर्व लोकां । क्रोधे ऐसे खवळू नका । जे जे होईल ते ते देखा । विवेके आपुले आवरा मन ॥७०॥

समर्थ सांगती विप्रासी । गाय मारिली त्या स्थलासी । चला घेऊनी आम्हांसी । विलंब आता न करावा ॥७१॥

समर्थांसवे लोक निघती । विप्र चालला सांगाती । येतां एका स्थलाप्रती । द्दश्य देखिले भयंकर ॥७२॥

गोरक्ताचे जाहले कुंड । गाय पडली वासुनी तोंड । कापली होती अर्धीच मुंड । पाहतां सर्व हे गहिंवरले ॥७३॥

स्वामी आता काय करिती । लक्षपूर्वक जन देखती । समर्थ पुसती विप्राप्रती । नाम सांगणे गायीचे ॥७४॥

नाम तियेचे गोदावरी । सांगता ब्राह्मण शोक करी । कृत्य हे केले मी अघोरी । धनी मात्र मी नरकाचा ॥७५॥

जलपात्र घेवोनिया स्वकरीं । तीर्थं सिंचिले गाईवरी । कर फिरविला प्रेतावरी । ऐसे समर्थ कनवाळू ॥७६॥

अये गोदे उठी सत्वरी । इतुकी निद्रा घेणे न बरी । कोपू नकोस विप्रावरी । आलो स्वयें मी उठवाया ॥७७॥

अति लडिवाळे पाचारिती । गोदे, गोदे ऊठ म्हणती । गाय उठतां हंबरे ती । चाटु लागली श्रीचरणां ॥७८॥

अपूर्व ऐसे द्दश्य बघता । पुनर्जीवन तीस मिळता । स्तंभित झाली सर्व जनता । विश्वास नेत्रीं न बसे की ॥७९॥

यतिवर्य वदती विप्रासी । येणे आम्हा तव गृहासी । सकल तुझिया कुटुंबासी । शुद्ध करणे असे आम्हां  ॥८०॥

गोमांस तुम्ही हो भक्षिले । हे न वाटते आम्हा भले । प्रायश्चित्त ते घेणे भले । सहकुटुंब ऐशा समयाला ॥८१॥

मंत्रोनिया ते गोमुत्र । गृहीं शिंपिले सर्वत्र । अखंड जपा गायत्री मंत्र । वेदपठणही नित्य करा ॥८२॥

लोकक्षोभास हो कारण । ते न करणें अकारण । आपण करिता धर्मपालन । लोक वर्तती तैसेची ॥८३॥

सामान्य नव्हे समर्थ सत्ता । उठवितो जे मृत गोमाता । दत्तावतार हे गमे चित्ता । निःसंशय की सर्व जनां ॥८४॥

स्वामींस घालिती दंडवत । साश्रुनयने त्यां प्रार्थित । कृपा असावी अखंडित । हीच प्रार्थना तुम्हांसी ॥८५॥

यापुढे हो चिंता न करणे । धर्मशास्त्रानुसार असणे । दुःखित जनां साह्य देणे । ज्ञानदानही नित्य करा ॥८६॥

कैसे करावे वेदपठण । स्वामी दाविती स्वयें म्हणून । स्वर उच्चार स्पष्ट करुन । अर्थ सांगती ऋचांचाही ॥८७॥

उपनिषदें, संहिता, गीता । यांची वर्णिती अति श्रेष्ठता । व्युत्पन्न व्हाया अति शुद्धता । निज आचरणीं असावी ती ॥८८॥

जगीं विप्रा भूदेव वदती । अत्यादरे जन वंदिती । अनेक विद्यांचे अधिपती । मानुनी वागती नम्रत्वे ॥८९॥

ऐशी द्विजांची महत्तता । सर्वावरी तयांची सत्ता । आचरण परी भ्रष्ट होता । सन्मान कैसा होईल ॥९०॥

समर्थ सांगती तळमळुनी । असा परस्पर प्रेम करुनी । कलह तंटा व्यर्थ करुनी । वैर-वन्ही न चेतवा ॥९१॥

ऐसे ममत्वे उपदेशिती । जनीं सद्‌भाव जागविती । तुम्ही असावे सदैव सुखी । यांत आम्हांसि आनंद ॥९२॥

लोक करिती जयजयकार । भरले नादें गगन थोर । पुष्पे, फळे सुगंधी हार । यांनी पूजिले स्वामीसी ॥९३॥

आग्रहे पूजा स्वीकारिती । तीर्थ, विभुती सर्वांस देती । सकल कामना पूर्ण करिती । लोक जाहले संतुष्ट ॥९४॥

जनहो आम्हां असे जाणे । तीर्थयात्रा पूर्ण करणे । निरोप द्यावा या कारणे । येतो तुम्ही सुखी असा ॥९५॥

आम्हां टाकुनी कुठे जाता । तुम्हाविणे ना अम्हा त्राता । कुडीतूनी कीं प्राण जाता । होईल आमुची तैशी स्थिती ॥९६॥

बहुत लोके आक्रोशे केला । कवटाळिले श्रीपदकमलां । मथुरेस नेता श्रीकृष्णाला । तेवि जाहला आकांत ॥९७॥

स्वामी सांगती पुनः पुन्हा । गमन करणे अवश्य आम्हां । तुमच्या स्वीकारितो प्रेमा । निरोप द्यावा आम्हांसी ॥९८॥

साश्रु नयने निरोप दिधला । येणार केव्हा या पुरीला । तुम्हाविणे ना सुख आम्हांला । शपथपूर्वक सांगतो ॥९९॥

सर्वांस करिती श्री प्रणाम । आम्हांस गाठणे असे धाम । अखंड घ्याहो प्रभुचे नाम । आग्रहे कथुनी निघती त्वरे ॥१००॥

लोकसमुदाय मागुती लोटे । स्वामींस बघतां दिसती न कोठे । जन परतले आलिया वाटे । दुःख जाहले अपार ॥१०१॥

असा यतिंचा अपूर्व महिमा । धन्य, जयांनी साधिले कामा । तयांच्या भाग्या नसे सीमा । दर्शन दुर्लभ स्वामींचे ॥१०२॥

स्मरतां स्वामींच्या दिव्य पदां । हरती सर्वाच्या आपदा । नैराश्य, कुबुद्धी अति तापदा । स्पर्शो न कुणा भक्तांसी ॥१०३॥

ऐसे प्रार्थुनी स्वामीराया । शरण रिघतो सद्‌गुरु पायां । गोड अध्याय पुढिल गाया । कवित्व शक्ती मज द्यावी ॥१०४॥

इति श्रीस्वामीगुरुकथामृत । अध्याय त्यांतला पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥१०५॥

॥ श्रीस्वामी समर्थ की जय ॥


सौजन्य : https://www.transliteral.org/


Aug 1, 2019

श्री स्वामी मठ उपासना


श्री स्वामी मठ, मालवीय नगर, खामला, नागपूर  येथील श्री स्वामी सेवा :


उपासना पुस्तिका