Dec 15, 2022

संतकवी श्रीविष्णुदासरचित श्रीदत्तात्रेय अष्टक ( शुद्धकामदा )


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


जय नमोस्तुते श्रीदिगंबरा । सद्‌गुरु निरूपाधि तूं बरा । उरुं न देसि दैवाचि बाकि ती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥ १ ॥ सुकुळिं जन्म हा, लाभला मला । जरि तुझा न बा, लाभ लाभला ॥ तरि वृथा कृती, गेलि पंकिं ती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥ २ ॥ तुज म्हणावया, लाज वाटती । मुळिंच चूकलों, मीच वाट ती ॥ परि तुझ्या सुरी, मान ही हतीं । करुं विनंति दत्तात्रया किती ॥ ३ ॥ विषय वीष हे सोमलादिक । खचित वाटतें तें मलाऽधिक ॥ परि नसे दुजी, भक्षितां गती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥ ४ ॥ जरि प्रपंच चिंताग्नि पोळवी । तरिही त्यामधें, मोह लोळवी । विविध ऊठती, कल्पना भिती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥ ५ ॥ कनक द्रव्य लावण्य कामिनी । चटक लागली दिवस यामिनी ॥ विषय ध्यानिं लाचावली मती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥ ६ ॥ षड्विकार कामादि बापुडे । गमति काजवे बा ! तुझ्यापुढें ॥ दिनमणी तुं ये, ऊदयाप्रती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥ ७ ॥ आठवितों तुला, मी ज्यव्हां ज्यव्हां । पळसि दुरचि कां, तूं त्यव्हां त्यव्हां ॥ स्तवन कानचि का न ऐकती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥ ८ ॥ निपट हा करावा विचारची । अनसूया वडीलोपचारची ॥ मनिं आणून दात्याचि नेकि ती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥ ९ ॥ करिसी भक्तिच्या कागदा सही । म्हणुनि प्रार्थितों, विष्णुदासही ॥ मज प्रसन्न हो, ऐकुनी स्तुती । करुं विनंति दत्तात्रया किती ॥ १० ॥


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


संतकवी श्रीविष्णुदासरचित श्रीदत्तात्रेय अष्टक


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


श्रीवक्रतुंड चतुरानन बालिका ही । श्रीलक्ष्मी भगवती महा कालिका ही ॥ गीता वसंततिलकामृततुल्यवृत्त । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥१॥ सिंहाद्रि पर्वत महाभुवनप्रकोटीं । इंद्रादि देव वसती तेहतीस कोंटी ॥ गंधर्व-यक्षगण किन्नर ब्रह्मभूत । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥२॥ श्रीरेणुका, अनसुया, श्रुति वेदधात्री । गाधी, कपील मुनि, भार्गवराम, अत्री । ध्याती समग्र सरिता नवकोटी तीर्थ । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥३॥ श्रीव्यास, वाल्मिक, शुकादिक नारदांही । वाटे तरीच भवसागर पारदा ही । भूकोरि मूळपिठिकाही सर्वोपसंत । श्रीदत्त, दत्त, श्रीगुरुदेवदत्त ॥४॥ कल्पद्रुमा हिणवुनी तरु डोलताती । पक्षी विवीध स्वर मंजुळ बोलताती । अखंड नाम पठणीं करिती अवृत्त । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥५॥ जंबूक, व्याघ्र, हरणें, फिरती समोर । चंडोल, कोकिल, करंडक, हंस, मोर ॥ त्या रम्य काननिं सदा रव कानिं येत । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥६॥ त्राता दिगंबर अगोचर सूर्यचंद्रा । मातापुरीं करि तृणासनि योगनिद्रा ॥ दाता दयार्णव कदापि नव्हे अदत्त । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥७॥ जेव्हा वसंत ऋतु यामिनी शुक्लपक्षीं । नक्षत्रराजमुख लक्षि चकोर पक्षी ॥ तेव्हा कधी म्हणिन त्या वसुनी वनांत । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥८॥ आनंदसिंधु शशिबंधु उदारखाणी । कौपीन, कुंडल, कमंडलु, दंडपाणि ॥ माळा जटामुकुटमंडित आवधृत । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥९॥ होतील प्राप्त म्हणती मुनि ब्रह्मचारी । धर्मार्थकाममोक्षादिक लाभ चारी ॥ उच्चारितांचि वदनी संसारसक्त । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥१०॥ द्यावी सुभक्ति भजनी म्हणे विष्णुदास । आशा धरून एवढी बसलों उदास । केव्हां कृपा करूनि हा पुरवील हेत । श्रीदत्त, दत्त, जय श्रीगुरुदेवदत्त ॥११॥


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Dec 12, 2022

दत्ता दिगंबरा या हो…


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो ।
दत्ता दिगंबरा या हो, सावळ्या मला भेट द्या हो ।
दत्ता दिगंबरा या हो, दयाळा मला भेट द्या हो ॥धृ.॥ 
तापलो गड्या त्रिविध तापे, बहुविध आचरलो पापे ।
मनाच्या संकल्प-विकल्पे, काळीज थरथरथर कापे । कितीतरी घेऊ जन्म फेरे, सावळ्या मला भेट द्या हो ॥१॥ दत्ता दिगंबरा या हो…  तुम्हांला कामकाज बहुत, वाट पाहू कुठवरपर्यंत । प्राण आला कंठागत, कितीतरी पाहशील बा अंत । दीनाची करुणा येऊ द्या हो, नाथा मला भेट द्या हो ॥२॥ दत्ता दिगंबरा या हो…  संसाराचा हा वणवा, कितीतरी आम्ही सोसावा । वेड लागले या जीवा, कोठे न मिळे विसावा । आपुल्या गावा तरी न्या हो, दयाळा मला भेट द्या हो ॥३॥ दत्ता दिगंबरा या हो…  स्वामी मला भेट द्या हो, दयाळा मला भेट द्या हो । सावळ्या मला भेट द्या हो, दत्ता दिगंबरा या हो ।
स्वामी मला भेट द्या हो ॥ 


गायक : श्री. आर. एन. पराडकर


Dec 7, 2022

श्री दत्तजन्माच्या विविध पुराणांत वर्णिलेल्या कथा


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

समस्त दत्तभक्तांना श्री दत्तात्रेय जयंतीच्या भक्तिमय शुभेच्छा !

श्री दत्तात्रेयांच्या अवताराचा हेतु स्पष्ट करतांना ब्रह्मपुराणात म्हटले आहे की, भूयो भूतात्मनो विष्णोः प्रादुर्भावो महात्मनः । दत्तात्रेय इति ख्यातः क्षमया परया युतः ॥ तेन नष्टेषु वेदेषु प्रक्रियासु मखेषु च । चातुर्वर्ण्ये तु संकीर्णे धर्मे शिथिलतां गते ॥ अभिवर्धति चाधर्मे सत्ये नष्टेऽनृते स्थिते । प्रजासु शीर्यमाणासु धर्मे चाकुलतां गते ॥ सहयज्ञक्रिया वेदाः प्रत्यानीता हि तेन वै । चातुर्वर्ण्यमसंकीर्णं कृतं तेन महात्मना ॥  याचा भावार्थ थोडक्यांत असा की, सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा असे ते श्रीहरि विष्णू यांचाच हा दत्तात्रेय नावाचा अवतार होय. अत्यंत क्षमाशील असा हा अवतार असून या अवतारकार्यांत त्यांनी वेदांना पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, यज्ञसंस्थेचे पुनरुज्जीवन केले, चातुर्वर्ण्यातील शिथिलता दूर केली, अधर्माचा व असत्याचा नाश करून क्षीण होत चाललेल्या लोकांत सामर्थ्य निर्माण केले.

  श्री दत्तजन्माच्या वेगवेगळ्या कथा विविध पुराणांत वर्णिल्या आहेत. महर्षी अत्री व महापतिव्रता अनसूया या श्रेष्ठ दांपत्याच्या पोटी श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला असून ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन देवाचे अंश त्यांच्यांत एकवटलेले आहेत. श्री विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी हा एक आहे, असेही काही दत्तभक्तांचे मत आहे. निरनिराळ्या पुराणांतून दत्तात्रेयांच्या जन्मकथा निरनिराळया असल्या तरी ते अत्रि-अनसूयेचा पुत्र व विष्णूचा अवतार यात मात्र एकवाक्यता आढळते.   यापैकी काही जन्मकथांची थोडक्यात ओळख करून घेऊ.

भागवतपुराणातील कथा थोडक्यांत अशी आहे -  ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्री ऋषी श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी होते. ब्रह्मदेवाने त्यांना सृष्टी उत्पन्न करण्याची आज्ञा केली, तेव्हा तपश्चर्या करण्यासाठी ते आपल्या पत्नीसहवर्तमान ऋक्षपर्वतावर गेले. त्या पर्वतावरील एका घनदाट अरण्यात निर्विन्ध्या नावाच्या नदीतीरी, सुखदुःखादी द्वंद्वांचा त्याग करून अत्री ऋषींनी एका पायावर उभे राहून कडक तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला. सुमारे शंभर वर्षेपर्यंत केवळ वायू भक्षण करून व प्राणायामाच्या योगाने आपल्या मनाचा निग्रह करून तपश्चर्या करीत असताना अत्री ऋषी, 'जो कोणी या जगाचा नियंता आहे, त्यालाच मी शरण आलो आहे, तरी त्याने मला आपल्यासारखी संतती द्यावी' असे नित्य चिंतन करीत असत. त्यांच्या या तपोबलाने प्रदीप्त झालेला अग्नी त्रैलोक्याला जाळू लागला. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे तीनही देव अत्री ऋषींच्या आश्रमात आले. नंदी, हंस व गरुड या वाहनांवर बसून आलेल्या व त्रिशूळ, कमंडलू व चक्र अशी आयुधे धारण करणाऱ्या या तीन देवांनी अत्रींना साष्टांग नमस्कार घातला. त्यांची मनोभावे पूजा केली. अत्री ऋषीने त्यांना मनोभावे प्रार्थना करून म्हटले, “ हे त्रिदेवांनो, जगाची उत्पत्ती, पालन व संहार अशी कार्ये करणारे ब्रह्मा, विष्णू व महेश तुम्ही आहात. तुमच्यापैकी ज्या एकाचीच मी आराधना करीत होतो, तो कोण ? मी येथे पुत्रप्राप्तीसाठी तप करीत आहे.”  त्यावर ते तिन्ही देव प्रसन्न होऊन म्हणाले, “ तू ज्या एका तत्त्वाचे ध्यान करीत आहेस त्याचेच आम्ही तिघेजण अंशभूत आहोत. हे मुनिवर्य, तुझे कल्याण असो. आता तुला आमच्या अंशांपासून जगप्रख्यात असे तीन पुत्र होतील आणि ते तुझी कीर्ती जगभर पसरवतील.” या वरदानाचे फलस्वरूप म्हणून यथावकाश अत्री ऋषींना ब्रह्मदेवाच्या अंशापासून सोम, विष्णूच्या अंशापासून योगशास्त्रात निपुण असे दत्त व शंकराच्या अंशापासून दुर्वास असे तीन पुत्र झाले.

ब्रह्मपुराणातील कथेनुसार, ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी अत्री ऋषींनी आराधना केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या त्रिमूर्तींना त्यांनी प्रार्थना केली, “आपण माझ्या 'घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि एक गुणवती व रूपवती कन्या पण द्यावी.”  त्या वरदानस्वरूप अत्री ऋषींस दत्तात्रेय, सोम व दुर्वास हे तीन पुत्र झाले आणि शुभात्रेयी नामक कन्या झाली.

  वायुपुराण, कूर्मपुराण आणि मार्कंडेय पुराणात मात्र अनसूयेच्या सतीत्वाशी व पावित्र्याशी संबंध असलेली एक कथा आहे. प्रतिष्ठान नगरीत कौशिक नावाचा एक ब्राह्मण राहत असे. त्याची पत्नी मोठी पतिव्रता होती. मात्र तो ब्राह्मण नित्य वेश्यागमनी असल्यामुळे आपल्या साध्वी पत्नीकडे दुर्लक्ष करीत असे. काही काळानंतर त्याला महारोग जडला आणि त्याची गात्रे झडू लागली. त्या वेश्येनेही  त्याचा त्याग केल्यावर तो घरी परतला. त्याची पत्नी त्याची मनोभावे सेवा करू लागली. एकदा कौशिक आपल्या पत्नीस म्हणाला, “ मला त्या वेश्येकडे घेऊन चल.” पतीच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी रात्रीच्या अंधारात ती महासती कौशिकपत्नी आपल्या पतीला घेऊन वेश्येकडे निघाली. मार्गांत एक चमत्कार घडला. त्याच नगरात चुकीने चोर समजून सुळी दिलेले मांडव्य ऋषी सुळावर यातना भोगीत होते. त्यांना या कौशिकाचा धक्का बसला. तत्क्षणीं, मांडव्य ऋषींनी कौशिकाला शाप दिला की, “तू सूर्योदयापूर्वी मरण पावशील.” हे शापवचन ऐकताच कौशिकपत्नीने आपल्या पातिव्रत्याच्या प्रभावाने सूर्योदयच थांबविला. त्यामुळे सबंध विश्वचक्रच बिघडले. सर्व देव धावरून गेले. विश्वाला वाचविण्यासाठी ब्रह्मदेवाने सती अनसूयेकडे मध्यस्थी करण्यासाठी विनंती केली. अनसूयेने कौशिकपत्नीला अभय देऊन सूर्योदय घडवून आणला आणि सूर्योदय झाल्यावर मांडव्याच्या शापामुळे मृत झालेल्या कौशिकास आपल्या पातिव्रत्याच्या बलाने पुनः जिवंत केले. अनसूयेवर सर्व देव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला, “तुझ्या पोटी तीन देव जन्म घेतील.” त्या वरदानाचे फलित म्हणून श्री दत्तात्रेयांचा अवतार झाला.


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥


संदर्भ : श्रीदत्तात्रेय-ज्ञानकोश ( लेखक : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी )


Nov 2, 2022

श्री साईनाथ माहात्म्य


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

नमो श्री गजानना । नमो नमो श्री गौरीनंदना । दुःखनिवारक विघ्नहरणा । नमन माझे तव पायीं ॥१॥ मग नमितो सरस्वती माता । जगन्माता विद्यादेवता । चरणीं ठेवोनियां माथा । वंदन माझे तियेसी ॥२॥ तैसेचि नमन श्रीगुरुवर्या । कृपावंता सद्‌गुरुराया । आठवोनि त्या पूज्य पायां । आत्मशुद्धी जाहली ॥३॥ माता, पिता आणि संतजन । भाविक श्रोते सज्जन । तयांसी करोन वंदन । श्री साई माहात्म्य वर्णितो ॥४॥ श्री साईंचे गुणगान । करीत असतां निशिदिन । घडता समाधी दर्शन । दुःख दूर होते हो ॥५॥ तुम्हीही भजा साई-साई । लीन रहा तयाचे पायीं । धांवोनिया संकट समयीं । नाथ माझा येईल हो ॥६॥ जे मागाल तेचि देईल । नौका किनारी नेईल । मनोरथ पूर्ण होतील । साई कृपेने सर्वांचे ॥७॥ शिरडीच माझी पंढरी । साई माझे श्रीहरी । मथुरा, गोकुळ, द्वारापुरी । शिरडी माझे सर्वस्व ॥८॥ साईच माता साईच पिता । साईच माझा असे दाता । मुखी तयाचे नाम येतां । पापें जळती जन्मांची ॥९॥ जगीं देव तेहत्तीस कोटी । परि माझा देव शिर्डीपती । जडलीं साई चरणीं प्रीती । दुजे न च ठावें मजलागी ॥१०॥ जे जे साई चरित्र वाचिले । ते ते हृदयीं रेखाटिले । शिरडीमार्गी जीवन लाविले । सत्य हेच जाणावें ॥११॥ जयें तोषविले संत । तयें मिळविला भगवंत । ऐसे अनेक दृष्टांत । शास्त्र-पुराणीं देखिले ॥१२॥ संतांचा संत थोर । म्हणवी माझा साईश्वर । ऐसे असतां खरोखर । कासयां हिंडू व्यर्थचि ॥१३॥ बाप माझा कृपाळू साई । वसला असतां मम् हृदयीं । मग कशाची कमताई । आहे माझ्या जीवनी ॥१४॥ कोणी म्हणे श्रीराम । कोणी म्हणे घनःश्याम । कोणी म्हणे चारही धाम । साईनाथ आमुचे ॥१५॥ कोणी म्हणे पवनसुत । कोणी म्हणे श्रीदत्त । समजुनि कोणी पंढरीनाथ । पूजा करती साईंची ॥१६॥ नव्हें हिंदु, नव्हें यवन । श्रोतयां आहे हे सत्य जाण । रूप श्रीसाईंचे घेऊन । ब्रह्म उतरले शिरडीत ॥१७॥ कोण पिता, कोण आई । कोणासच ना ठावें काही । अघटित एक नवलाई । घडली शिरडी नगरांत ॥१८॥ निंबचियां वृक्षाखाली । कृपावंत साई माऊली । बालकरूपें प्रगटली । ऐसे ग्रंथीं वर्णिले ॥१९॥ निंबास्थळीं गुरुचे स्थान । आहे ऐसे सांगून । तेथेच वसले निशी-दिन । देवरूपी साई ते ॥२०॥ सदासर्वदा उपकार । करीत राहिले साईश्वर । धन्यविले ते शिरडी नगर । माझ्या साईबाबांनी ॥२१॥ संततीहीनांस संतती । गोर-गरीबां संपत्ती । देत गेले भक्तांप्रती । कीर्ती ऐसी ऐकिली ॥२२॥ भक्तांचिया मदतीसाठी । धावोनि जाई ते जगजेठी । सदाच रक्षा करी संकटी । आपुलियां दासांची ॥२३॥ म्हाळसापती भक्त जाण । बाबांस मानी गुरुसमान । त्यानेच साईबाबा म्हणोन । नाम ठेविलें बाबांचे ॥२४॥ आता सांगतो साईलीला । ज्या ज्या घडल्या शिरडीला । मी जो महिमा श्रवण केला । तोच वर्णितो श्रोतियां ॥२५॥ त्या समयीं गणपतराव कोते । या नावाचे भक्त होते । बायजाबाई पत्नी तयांते । होती बहु भाविक ॥२६॥ कवणें एके शुभ दिवशी । श्री बाबांच्या दर्शनासी । बायजाबाई मशिदीशी । जाऊनियां पोहोचल्या ॥२६॥ ऐका ऐका नवलाई । उभे राहिले बाबा साई । यावें यावें मामीबाई । स्वागत केले बाईंचे ॥२७॥ धन्य धन्य ती माऊली । श्री साईकृपेची सावली । जगतीं तियेसी लाभली । नमन माझें साष्टांगीं ॥२८॥ रोज द्वारकामाईत जाऊन । बाबांसी वाढावे जेवण । बायजाबाईचा नित्यनेम । होऊनियां बैसला ॥२९॥ आधी बाबांना भोजन द्यावे । मग स्वतः ग्रहण करावें । साई पूजावें जीवे-भावें । हाचि धर्म तियेचा ॥३०॥ तोचि नियम आजपर्यंत । रूढ आहे कोते घराण्यांत । आधी नेवैद्य श्रीमंदिरांत । मग जेवावे सर्वांनी ॥३१॥ धन्य धन्य कोते परिवार । तयें लाभला साई निरंतर । साईविना दुजा आधार । नाही ऐसे मानिलें ॥३२॥ ठराविक ऐशा पाच घरीं । बाबा मागत भाकरी । त्यातून अन्न उरलें जरी । खाऊ घालीत श्वानांसी ॥३३॥ ऐसे बाबा परोपकारी । पुजू लागली जनता सारी । श्री साईमूर्ती घरोघरीं । स्थापन झाली तेधवां ॥३४॥ रामनवमींस भरें भक्तमेळा । लाखों भक्त होती गोळा । कैसा वर्णावा तो सोहळा । भाषा पडेल पांगुळीं ॥३५॥ कोणी चढवी पुष्पहार । कोणी आदरें चादर । अखंड चाले जयजयकार । श्री साईनामाचा ॥३६॥ पदर पसरुनियां कोणी । साईचरणीं करी मागणी । केवळ दर्शन घेऊनि कोणी । निरोप घेती बाबांचा ॥३७॥ कोणी रंजला गांजला । जर का शिरडीत पोहोचला । तर साईकृपें त्याजला । शांति मिळे निश्चित ॥३८॥ शांत ठेवोनियां आपुलें चित्त । ऐक श्रोतयां हकिकत । ऐसी घडली शिरडी नगरांत । तीच सांगतो तुजलागीं ॥३९॥ घटना ऐसी अघटित । एकदा घडली शिरडीत । श्रीबाबा पणत्या लावीत । मशिदीमाजी दररोज ॥४०॥ तेल आणावे मागून । त्यांच्या पणत्या लावून । बैसावें आनंदित होऊन । हा नेम होता बाबांचा ॥४१॥ एके दिवशी साईनाथ । कटोरा घेऊन हातांत । तेल मागावया गावांत । सर्व दुकानीं हिंडले ॥४२॥ परी ते सर्व दुकानदार । तेलासाठी देती नकार । काय घडला चमत्कार । शांत चित्ते परिसिजें ॥४३॥ हळूहळू वाढे अंधार । चिंताग्रस्त झाले साईश्वर । भक्त तेव्हा दोन-चार । गोळा जाहलें बाबांचे ॥४४॥ होवोनिया क्रोधायमान । आज्ञा केली भक्तांलागून । विहिरीवरती त्वरित जाऊन । पाणी आणा थोडेसें ॥४५॥ जमल्यापैकी एक भक्त । विहिरीवर गेला धावत । पाणी घेऊन त्वरित । साईचरणीं ठाकला ॥४६॥ सर्व पणत्यांत भरलें पाणी । स्वतः श्री साईबाबांनी । पणत्या जळल्या अखंड रजनी । जनता दंग जाहली ॥४७॥ तेल नाकारणारे व्यापारी । मशिदीत आले झडकरी । लोटांगण श्री चरणांवरी । त्या सर्वांनी घातले ॥४८॥ मग श्रोतयां तदनंतर । कोणी न च करी इन्कार । सर्वांतरीं वसला आदर । श्री साईबाबांविषयीं ॥४९॥ बघा एक दुसरी कथा । सांगतो स्मरुनी साईनाथा । चमत्कार एका भक्ता । कैसा दाविला बाबांनी ॥५०॥ श्री काकासाहेब दीक्षित । बैसले असता ध्यानस्थ । तेव्हा तयांसी साक्षात । दर्शन घडले श्रीहरीचे ॥५१॥ काका करिती विचार । कैसा झाला हा चमत्कार । श्री पांडुरंग येथवर । कैसे येऊनियां पोहोचले ॥५२॥ येईल कैसा भगवान । मज द्यावयां दर्शन । अस्थिर झाले काकांचे मन । काहीच त्यांसी सुचेना ॥५३॥ अखेर धांवत धांवत । काका गेलें मशिदीत । जोडोनियां त्यांनी हात । साईचरणीं ठाकलें ॥५४॥ काका काही न च बोलता । सर्वच कळलें साईनाथा । घाबरलेले काका बघतां । हसू लागले श्रीसाई ॥५५॥ काकांस पुसती श्री साई । पांडुरंग भेटला की नाही? । का बरें धांवत घाई घाई । आलास काका मजपाशी ॥५६॥ पळपुट्या आहे तो देव । घट्ट धरूनि तयां ठेव । नसतो मुळीं निभाव । एके ठायीं तयाचा ॥५७॥ नाही तयाचा भरवसा । केव्हा कुठे जाईल कैसा । पक्षी उडूनि जाई तैसा । देव जातो उडोनि ॥५८॥ बोलणें हे श्रींचे ऐकून । श्री काका चकित होऊन । चरणीं घातले लोटांगण । श्रीसाईबाबांच्या ॥५९॥ तदनंतर दुसरें दिवशी । बाजार होता शिरडीसी । हकिकत घडली ऐसी । चित्त लावुनि ऐकावी ॥६०॥ श्री काकासाहेब दीक्षित । सहज फिरत फिरत । गेले बघा बाजारांत । काय घडलें तेव्हा ॥६१॥ काका एका दुकानावरी । थांबले बघावया तसबिरी । चमत्कार हा खरोखरी । काय पहिले काकांनी ॥६२॥ आदल्या दिवशी जी मूर्ती । ध्यानस्थ असता पाहिली होती । फोटोत त्या दुकानांत पुन्हा ती । दृष्टीं पडली काकांच्या ॥६३॥ काका जाहलें चकित । तसबीर ती घेतली विकत । आणोनियां स्वगृहांत । पूजेसाठी लाविली ॥६४॥ धन्य धन्य ते काका धन्य । जयांस घडलें प्रभूदर्शन । श्री साईचरणीं जीवन । वेचिलें हो जयांनी ॥६५॥ लाखों भक्त ऐसें बोलती । नाना तऱ्हेचे दाखलें देती । गुंग होई आपली मती । साईचरितां ऐकोनि ॥६६॥ एक होते छोटेसे गांव । धूपखेडें तयाचे नांव । तेथे श्रीबाबांनी धांव । ऐका कैसी घेतली ॥६७॥ पाटील तिथला चांदभाई । तयां भेटले कैसे साई । श्रोतयां ही नवलाई । शांत चित्तें परिसावी ॥६८॥ चांदभाईचा घोडा हरवला । तयां निघे शोधायाला । हिंडता हिंडता रानांत गेला । काय तयानें पाहिले ॥६९॥ एका वृक्षाच्या छायेंत । बैसले होते साईनाथ । बघुनि चांदभाईस घाईत । बोलाविले बाबांनी ॥७०॥ कां बरें फिरतोस रानी-वनी । कडक उन्हांत एकटा प्राणी । ऐकुनी ही बाबांची वाणी । चांदभाई बोलला ॥७१॥ हरवलां आहे माझा घोडा । जीव होई थोडा घाबरा । अतिचतुर तयां न जोडा । सबंध जिल्ह्यामाजी या ॥७२॥ मग बोलले सद्‌गुरु । मुळींच नको चिंता करू । बैस आधी चिलीम भरू । घोडा येथेचि येईल ॥७३॥ चिलीम झाली तयार । परंतु नव्हता अंगार । चांदभाईस पडला विचार । आतां काय करावे ॥७४॥ प्रसंग बाबांनी जाणला । चिमटा आदळला धरणीला । तेव्हा अग्नी निर्माण झाला । एक मोठा निखारा ॥७५॥ चिलीम ओढावयां सुरुवात । होते न होते इतक्यांत । चांदभाईचा घोडा धांवत । तयापाशी पोहोचला ॥७६॥ चांदभाई बहु आनंदला । तुम्ही आहांत वल्ली अल्ला । एकदां या आमच्या गांवाला । विनंती आहे माझी ही ॥७७॥ काही कालांतराने । श्री साई गेले धूपखेडें गांवीं । न कळें कैसी वर्णावी । साईलीला अपार ती ॥७८॥ कधी जावें भक्तांघरी । कधी मशिदीभितरीं । बायजाबाईची भाकरी । खावयांस यावें शिरडीत ॥७९॥ कधी रानीं-वनीं फिरतां । कधी भगवंतास स्मरतां । कधी भक्तां आशिष देतां । दर्शन घडे साईंचे ॥८०॥ पुढें परिसावी साईकथा । स्थिर ठेवुनी आपल्या चित्ता । अभिमान होता निजभक्ता । काय केले बाबांनी ॥८१॥ काय घडले श्रोतयां देख । गोष्ट तुजसी सांगतो एक । काशिराम शिंपी भक्तभाविक । शिरडीत रहात असे ॥८२॥ श्रींची सेवा करी दिन रात । सदा मग्न असे भजनांत । पण ‘ग’ ची बाधा त्यास । कशी बाधली तयातें ॥८३॥ शेकडो भक्त येती दर्शना । पण कोणाकडूनही दक्षिणा । पैसा, अधेला अथवा आणा । घेत नव्हते श्री साई ॥८४॥ काशिरामास बाबा प्रसन्न । त्यास झाला अभिमान । बैसला एकदा हट्ट धरून । की दक्षिणा घ्यावी बाबांनी ॥८५॥ सबंध दिवसाची कमाई । श्री साईबाबांच्यापुढे ठेवी । घेत होते बाबाही । पैसा-अधेला त्यांतूनि ॥८६॥ प्रियभक्ताची इच्छा म्हणून । दक्षिणा घेत उचलून । काशिराम जाई फुलून । सांगू लागले लोकांप्रति ॥८७॥ घेत नाहीत कोणाकडूनही । पण माझी दक्षिणा श्रीसाई । बघा घेतात की नाही । ऐसे सांगे गर्वाने ॥८८॥ याचा गर्व नष्ट करावा । सन्मार्गी यासी लावावा । चमत्कार यास दाखवावा । ऐसे ठरविले बाबांनी ॥८९॥ काशिरामें जे पुढे ठेवावे । तितुके सर्व उचलून घ्यावे । आणखी पैसे आणून द्यावे । आज्ञा करिती श्रीसाई ॥९०॥ जितुका मिळवावा पैसा । बाबांसी सगळा द्यावा तैसा । काशिरामाचा नेम ऐसा । काही काळ चालला ॥९१॥ विकले त्याने घर-दार । सारे शेत व शिवार । इकडे श्रींचा आग्रह फार । वाढू लागला मागणीचा ॥९२॥ गेले सर्व, खुंटली कमाई । आता दक्षिणा कोठून द्यावी । काशिरामास सुचेना काही । चिंताग्रस्त जाहला ॥९३॥ अखेर घेतली माघार । पडला जाऊन श्रीचरणांवर । म्हणे दयाळा मजवर । दया आता करावी ॥९४॥ मी जाहलो भिकारी । ओढवली अवदसा भारी । इस्टेट संपली सारी । कैसी दक्षिणा देऊ मी ॥९५॥ काशिरामास आला अनुभव । मी दीन-दुबळा मानव । दक्षिणा देण्याचा हा गर्व । माझेच नडलें मजलागीं ॥९६॥ मानवाची नाही शक्ती । काही देईल देवांप्रति । पण प्रसन्न होती साईमूर्ती । काशिरामावर बहुत ॥९७॥ श्रीबाबांनी आशिष दिधला । तेरा भला करेगा अल्ला । काशिराम तो सुखी झाला । पूर्ववत तैसाचि ॥९८॥ परत मिळाली संपत्ती । टळून गेली आपत्ती । केवळ श्रीचरणांवरती । जीवन गेले तयाचे ॥९९॥ किड्या-मुंग्यांस घाली साखर । भुकेल्यास देई भाकर । जेणेंकरून तो ईश्वर । सुखी ठेवील तुजलागीं ॥१००॥ मुक्ती लाभेल तुजला खास । ऐसा दिधला आशिष । प्रियभक्त काशिरामास । कृपावंत बाबांनी ॥१०१॥ काशिराम झाला धन्य । श्रीचरणीं होऊन अनन्य । फळां आले तयाचे पुण्य । नमन माझे त्यालाही ॥१०२॥ श्री साईंचे भजतो नाम । हाचि माझा नेमधर्म । हेच माझे तीर्थ-धाम । दृढ व्हावें श्रीचरणीं ॥१०३॥ आई-बाप साईश्वर । शिरडी माझे पंढरपूर । गोकुळ, काशी, हरिद्वार । वास जेथे बाबांचा ॥१०४॥ तुकारामांसम संत होऊनि गेले । स्वयें तरूनी इतरां तारीलें । तैसे साईनाथ अवतरलें । उद्धार करण्यां भक्तांचा ॥१०५॥ आत्मसंतोषी, परोपकारी । अंतर्ज्ञानी, तपस्वी भारी । दीनानाथांचे कैवारी । साईनाथ जाहले ॥१०६॥ चिलीम, तंबाखू बरोबर । हातीं कटोरा निरंतर । इतुकाचि असे संसार । माझ्या साईबाबांचा ॥१०७॥ कधी झोपावे मशिदीत । कधी विश्रांती चावडीत । निंबवृक्षास्थळीं बसत । असत श्रीबाबा ॥१०८॥ जवळ ती पेटलेली धुनी । ध्यास प्रभूचा सदा मनीं । अल्ला-मालिक मुखे बोलुनी । उद्धरिलें अनेक भक्तांना ॥१०९॥ मंदिरी चाले आरती । आनंदूनि जाये नभ-धरती । जयजयकार जन करिती । माझ्या साईनाथाचा ॥११०॥ जो साईचरणीं झाला लीन । सुखी झाले त्याचे जीवन । ज्याने धरले साईध्यान । भवसागर तरला तो ॥१११॥ विनवतो तुम्हांला म्हणून । जगीं नरजन्मीं येऊन । एकदा अवश्य घ्यावे दर्शन । साईसमाधीचे ॥११२॥ करां साईंचे नामस्मरण । मनोरथ होतील पूर्ण । दुःख अवघें जाईल टळून । साईकृपें तुमचे ॥११३॥ केले इतुकें गुणगान । देहभान विसरून । बाळ मी तुमचा अज्ञान । क्षमा चुकीची करावी ॥११४॥

इति कवी साहेबराव कोकाटेकृत श्री साईनाथ माहात्म्य संपूर्णम ॥

नमो श्री साईनाथाय नमः ॥

ॐ साई श्री साई जय जय साई ॥

श्री गुरुदेव दत्त ॥


Oct 13, 2022

श्री गणेशवरद स्तोत्र


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


या कलियुगांत 'कलौ चण्डी विनायकौ ।' हे शास्त्रवचन प्रसिद्ध आहे, अर्थात विनायक व चंडी (आदिशक्ती - दुर्गा) यांची उपासना या कलियुगात त्वरित फलदायी होते. श्री गणेशलोकवासी, थोर गणेशभक्त त्र्यंबकराय विठ्ठल सामंत यांच्या कृपाप्रसादाचे फलस्वरूप असे हे श्रीगणेशवरद स्तोत्र रा. रा. नारायण गणेश देशपांडे यांनी रचले आणि ते प्रथम गणेशप्रभावमध्ये प्रकाशित झाले. अनेक श्रीभक्त ऐहिक व पारमार्थिक कल्याणासाठी या परमप्रासादिक स्तोत्राचे पठण करतात. या स्तोत्राचे भक्तिभावपूर्वक अर्थात पूर्ण श्रद्धेनें जमतील तेवढे पाठ केल्यास श्रींच्या कृपेची अनुभूती अवश्य येते.


ॐ नमोजी श्रीगणेशा । ॐ नमोजी बुद्धिप्रकाशा । ॐ नमोजी गुणेशा । सिद्धिदायका तुज नमो ॥१॥ ॐ नमोजी ॐकारा । ॐ नमो चराचरा । ॐ नमो गणेश्वरा । गणपालनतत्परा तुज नमो ॥२॥ ॐ नमो वागेश्र्वरी । ॐ नमो ब्रह्मकुमारी । ॐ नमो वाचाचारी । सर्व सत्ताधारी तुज नमो ॥३॥ ॐ नमो सद्‌गुरुराजा । ॐ नमो अधोक्षजा ।  ॐ नमो कैलासराजा । शंभुदेवा तुज नमो ॥४॥ ॐ नमो दत्तात्रेया । ॐ नमो अत्रि अनसूया । ॐ नमो स्वामी सखया । रामराया तुज नमो ॥५॥ ॐ नमो सकलसंतां । सिद्धसाधु  आणि महंतां । ॐ नमो प्राणनाथा । श्री हनुमंता तुज नमो ॥६॥ ॐ नमो इष्टदेवा । ॐ नमो मोक्षदेवा । ॐ नमो कुलदेवा । कालदेवा तुज नमो ॥७॥ ॐ नमो वास्तुदेवा । ॐ नमो ग्रामदेवा । ॐ नमो मातृदेवा । पितृदेवा तुज नमो ॥८॥ श्री अष्टोत्तर शतमाला । करायाची आज्ञा मला । देऊनी बुद्धि बाळकाला । वरदस्तोत्र घडवावें ॥९॥ ॐ नमो गणेश्वरा । ॐ नमो गतीश्वरा । ॐ नमो गजवरा । गुणगर्वधरा तुज नमो ॥१०॥ ॐ नमो गणेशा । ॐ नमो गणाध्यक्षा । ॐ नमो गुरुदृशा । गुरुपुरुषा तुज नमो ॥११॥ ॐ नमो गुणेश्वरा । ॐ नमो गान चतुरा । ॐ नमो गानपरा । गजरुपधरा तुज नमो ॥१२॥ ॐ नमो गुरुधर्म धुरंधरा । ॐ नमो गुणवत् पोषणकरा । ॐ नमो गणपालन तत्परा । गजासुरयोद्धारा तुज नमो ॥१३॥ ॐ नमो गंधर्वसंशयच्छेत्रा । ॐ नमो गुरुमंत्रगुरुतंत्रा । ॐ नमो गुह्यप्रवरा । गुरुगर्वहरा तुज नमो ॥१४॥ ॐ नमो गणस्वामिना । ॐ नमो गजानना । ॐ नमो गुणसंपन्ना । गानप्राणा तुज नमो ॥१५॥ ॐ नमो गणदुःखप्रणाशना । ॐ नमो गुणवत् शत्रुसूदना । ॐ नमो गजध्वना । हे गुणप्राणा तुज नमो ॥१६॥ ॐ नमो गानज्ञान परायणा । ॐ नमो देव गौणा । ॐ नमो गानध्यान परायणा । गानभूषणा तुज नमो ॥१७॥ ॐ नमो गुरुप्राणा । ॐ नमो गुरुगुणा । ॐ नमो गंधर्वभाजना । गणप्रथितनाम्ना तुज नमो ॥१८॥ ॐ नमो गुरुलक्षण संपन्ना । ॐ नमो गंधर्ववरददर्पघ्ना । ॐ नमो गंधर्व प्रीतिवर्धना । गुरुतत्वार्थदर्शना तुज नमो ॥१९॥ ॐ नमो गणाराध्या । ॐ नमो गुण-हृद्या । ॐ नमो गुरु आद्या । गुण आद्या तुज नमो ॥२०॥ ॐ नमो गुरु शास्त्रालया । ॐ नमो गुरुप्रिया । ॐ नमो गणप्रिया । गणंजया तुज नमो ॥२१॥ ॐ नमो गंधर्वप्रिया । ॐ नमो गकारबीजनिलया । ॐ नमो गुरुश्रिया । गुरुमाया तुज नमो ॥२२॥ ॐ नमो गजमाया । ॐ नमो गंधर्वसंसेव्या । ॐ नमो गंधर्वगानश्रवणप्रणया । गंधर्वस्त्रीभिराराध्या तुज नमो ॥२३॥ ॐ नमो गणनाथा । ॐ नमो गण-गर्भस्था । ॐ नमो गुणिगीता । गुरुस्तुता तुज नमो ॥२४॥ ॐ नमो गणरक्षणकृता । ॐ नमो गणनमस्कृता । ॐ नमो गुणवत् गुणचित्तस्था । गुरुदेवता तुज नमो ॥२५॥ ॐ नमो गंधर्वकुल देवता । ॐ नमो गजदंता । ॐ नमो गुरुदैवता । गंधर्वप्रणवस्वांता तुज नमो ॥२६॥ ॐ नमो गंधर्व गण संस्तुता । ॐ नमो गंधर्व गीत चरिता । ॐ नमो नमो गानकृता । हे गर्जता तुज नमो ॥२७॥ ॐ नमो गणाधिराजा । ॐ नमो देव गजा । ॐ नमो गुरुभुजा । देव गजराजा तुज नमो ॥२८॥ ॐ नमो गुरुमूर्ति । ॐ नमो गुण कृती । ॐ नमो गजपती । गणवल्लभमूर्ती तुज नमो ॥२९॥ ॐ नमो गणपती । ॐ नमो गुरुकीर्ति । ॐ नमो गीर्वाण संपत्ती । गीर्वाण गण सेविती तुज नमो ॥३०॥ ॐ नमो गुरु त्राता । ॐ नमो गण ध्याता । ॐ नमो गणत्राता । गणगर्व परिहर्ता तुज नमो ॥३१॥ ॐ नमो गणदेवा । ॐ नमो गानभुवा । ॐ नमो गंधर्वा । गानसिंधवा तुज नमो ॥३२॥ ॐ नमो गणश्रेष्ठा । ॐ नमो गुरुश्रेष्ठा । ॐ नमो गुणश्रेष्ठा । गणगर्जित संतुष्टा तुज नमो ॥३३॥ ॐ नमो गणसौख्यप्रदा । ॐ नमो गुरुमानप्रदा । ॐ नमो गुणवत् सिद्धिदा । गानविशारदा तुज नमो ॥३४॥ ॐ नमो गुरुमंत्रफलप्रदा । ॐ नमो गुरुसंसारसुखदा । ॐ नमो गुरुसंसारदुःखभिदा । गर्विगर्वनुदा तुज नमो ॥३५॥ ॐ नमो गंधर्वाभयदा । ॐ नमो गणाश्रीदा । ॐ नमो गर्जन्नागयुद्धविशारदा । गानविशारदा तुज नमो ॥३६॥ ॐ नमो गंधर्व भयहारका । ॐ नमो प्रीतिपालका । ॐ नमो गणनायका । गंधर्ववरदायका तुज नमो ॥३७॥ ॐ नमो गुरुस्त्रीगमनें दोषहारका । ॐ नमो गंधर्वसंरक्षका । ॐ नमो गुणज्ञा गंधका । गंधर्वप्रणयोत्सुका तुज नमो ॥३८॥ ॐ नमो गंभीरलोचना । ॐ नमो गंभीर गुणसंपन्ना । ॐ नमो गंभीरगति शोभना । देव गजानना तुज नमो ॥३९॥ हे गणेशस्तोत्र पठण करतां । देहीं नांदे आरोग्यता । कार्यसिद्धि होय तत्त्वतां । संशय मनीं न धरावा ॥४०॥ धनार्थीयाने एकवीस दिन । सुप्रभाती उठोन । करिता स्तोत्र पठण । धनप्राप्ति होय त्यासी ॥४१॥ जो प्रतिदिनी त्रिवार पठत । त्यासी पुत्र, धन, धान्य प्राप्त होत । श्रीगणेश पुरवी इच्छित । यदर्थी संशय न धरावा ॥४२॥ ज्यावरी संकट दुर्धर । तयानें एकादशवेळ स्तोत्र । पठतां त्याचे भयथोर । तात्काळ निरसेल ॥४३॥ त्र्यंबकराय गणेशभक्त । जनदुःखे कष्टी होत । होऊनियां कृपावंत । स्तोत्र बीजयुक्त करविती ॥४४॥ गणेशसुत नारायण । केवळ मूढ अज्ञान । त्यास कैसे असे ज्ञान । वरदस्तोत्र करावया ॥४५॥ कलियुगी नाम वरिष्ठ । साक्ष देती श्रेष्ठ श्रेष्ठ । म्हणोनिया स्तोत्र पाठ । संतमहंत करीताती ॥४६॥ हे स्तोत्र केवळ चिंतामणी । नाम रत्नांची खाणी । स्तोत्र पठोनिया वाणी । साधकें शुद्ध करावी ॥४७॥ स्तोत्र पठणे पुरुषार्थ चारी । साध्य होती घरचे घरीं । म्हणोनिया याचे वरी । शुद्धभाव ठेवावा ॥४८॥ अति सात्त्विक पुण्यवंत । त्यासीच येथें प्रेम उपजत । भावें करीती स्तोत्र पाठ । त्यांसी गणेश संरक्षी ॥४९॥ शके अठराशें साठ । बहुधान्य संवत्सर श्रेष्ठ । श्रीविनायकी चतुर्थी येत । शुक्रवार दिन भाग्याचा ॥५०॥ येच दिनीं हे वरदस्तोत्र । पूर्ण झाले अतिपवित्र । वरदहस्तें गजवक्त्र । पठणें भक्तां सांभाळी ॥५१॥ इति श्री गणेशवरद स्तोत्र । श्रवणें होती कर्ण पवित्र । विजय होईल सर्वत्र । आणि शांती लाभेल ॥५२॥ 

॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥

॥ ॐ शांति: शांति: शांति: ॥


Sep 30, 2022

श्रीदुर्गाद्वात्रिंशत् - नाममाला


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय

॥ ॐ ऐं र्‍हीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॥


प्राचीन काळी ब्रह्मादि देवांनी माहेश्‍वरी दुर्गेची पुष्पादि विविधोपचारांनी विधीवत पूजा केली. त्यामुळे प्रसन्न झालेली आदिशक्ती, दुर्गतिनाशिनी दुर्गा सर्व देवांना म्हणाली, “ सुरांनो, तुमच्या उपासनेने मी प्रसन्न झाले आहे. तुम्हांला हवे ते वरदान मागा. ”   श्री दुर्गेचे हे आशीर्वचन ऐकून सर्व देवगण भक्तिपूर्वक म्हणाले, - ' हे आदिमाये, त्रैलोक्याला त्रास देणाऱ्या आमच्या शत्रूशी, महिषासुराशी तू युद्ध करून त्याचा वध केला आहेस. त्यामुळे हे सर्व जगत निर्भय झाले आहे. तुझ्या कृपेने आम्हांला पुन्हा स्वर्गाचे राज्य परत मिळाले आहे. आपल्या भक्तांचे तू नेहेमीच रक्षण करतेस, तुझ्या वरदानाने त्यांच्या शुभकामना सदैव फलित होतात. तेव्हा, आता तुझी कृपा अशीच आमच्यावर निरंतर राहो, याशिवाय आमचे काहीच मागणे नाही. तरीही, तू जर आम्हांला काही वरदान देऊ इच्छिते, तर एकच प्रार्थना आहे की हे भगवती, तू त्वरित प्रसन्न प्रसन्न होण्यासाठी संकटग्रस्त, दुःखी-कष्टी भक्तांनी तुझी कशी आराधना करावी ? हे परमेश्वरी, अत्यंत गोपनीय अशी ही तुझी कुठली उपासना आहे ?'   देवांची ही लोककल्याणकारी प्रार्थना ऐकून जगदंबा संतुष्ट होऊन म्हणाली, “ माझ्या बत्तीस नामांची ही नामावली सर्व प्रकारच्या संकटांचा सत्वर नाश करणारी आहे. तिन्ही लोकांमध्ये यांसारखे प्रभावी स्तोत्र नाही. हे स्तोत्र पठण करणारा माझ्या कृपेस पात्र होऊन निःसंशयपणे भयमुक्त होतो.”  

ते मी तुम्हाला सांगते. -

दुर्गा दुर्गार्तिशमनी दुर्गापद्विनिवारिणी । दुर्गमच्छेदिनी दुर्गसाधिनी दुर्गनाशिनी ॥  दुर्गतोद्धारिणी दुर्गनिहन्त्री दुर्गमापहा । दुर्गमज्ञानदा दुर्गदैत्यलोकदवानला ॥ दुर्गमा दुर्गमालोका दुर्गमात्मस्वरूपिणी । दुर्गमार्गप्रदा दुर्गमविद्या दुर्गमाश्रिता ॥  दुर्गमज्ञानसंस्थाना दुर्गमध्यानभासिनी । दुर्गमोहा दुर्गमगा दुर्गमार्थस्वरूपिणी ॥  दुर्गमासुरसंहन्त्री दुर्गमायुधधारिणी । दुर्गमाङ्गी दुर्गमता दुर्गम्या दुर्गमेश्वरी ॥ दुर्गभीमा दुर्गभामा दुर्गभा दुर्गदारिणी । नामावलिमिमां यस्तु दुर्गाया मम मानवः ॥  पठेत् सर्वभयान्मुक्तो भविष्यति न संशयः॥ १ दुर्गा, २ दुर्गार्तिशमनी, ३ दुर्गापद्विनिवारिणी, ४ दुर्गमच्छेदिनी, ५ दुर्गसाधिनी, ६ दुर्गनाशिनी, ७ दुर्गतोद्धारिणी,

८ दुर्गनिहन्त्री, ९ दुर्गमापहा, १० दर्गमज्ञानदा, ११दुर्गदैत्यलोकदवानला, १२ दुर्गमा, १३ दुर्गमालोका,

१४ दुर्गमात्मस्वरूपिणी, १५ दुर्गमार्गप्रदा, १६ दुर्गमविद्या, १७ दुर्गमाश्रिता, १८ दुर्गमज्ञानसंस्थाना,

१९ दुर्गमध्यानभासिनी, २० दुर्गमोहा, २१ दुर्गमगा, २२ दुर्गमार्थस्वरूपिणी, २३ दुर्गमासुरसंहन्त्री,

२४ दुर्गमायुधधारिणी, २५ दुर्गमाङ्गी, २६ दुर्गमता, २७ दुर्गम्या. २८ दुर्गमेश्वरी,

२९ दुर्गभीमा, ३० दुर्गभामा, ३१ दुर्गभा, आणि ३२ दुर्गदारिणी

भगवती दुर्गेच्या या बत्तीस नामांचा जो पाठ करतो, तो संकटमुक्त आणि निर्भय होतो, असे आदिमायेचे आशीर्वचन आहे.


॥ श्रीदुर्गार्पणमस्तु


Sep 21, 2022

प. पू. श्री. भाऊ महाराज निटूरकरविरचित श्रीपाद श्रीवल्लभ बावनी - २


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

जय श्री वल्लभ जय श्रीपाद । महिमा तुमचा थोर अगाध ॥१॥ कलियुग येता  महाभयंकर । धर्म डळमळे, पाप भयंकर ॥२॥ सज्जन भोगिती कष्ट अपार । दुष्टदुर्जने भूमीस भार ॥३॥ जाणून पुढचे संकट थोर । अवतरती ते अत्रिकुमार ॥४॥ पिठापुरी एक होता सज्जन । सत्यऋषिश्वर नामे ब्राह्मण ॥ ५॥ त्याची कन्या सद्‌गुणखाण । सुमती नामे होत महान  ॥६॥
ब्राह्मण वंशी अप्पलराज । याजुष गोत्री भारद्वाज ॥७॥ सर्व ही होते सदनी अपार । नव्हती संतती चिंता फार ॥८॥ श्राद्धाचे दिनी माध्यान्ही । भिक्षा मागती दत्तमुनी ॥९॥ सुमती भिक्षा घाली तयां । जाणुन चिंता आली दया ॥१०॥ भिक्षा घेऊन वदले  मुनी । चिंता कसली गे जननी ॥११॥ सुमती बोले दयाकरा । जननी शब्दा सफल करा ॥१२॥ आपण यावे मम उदरी । हेच मागते तुज गा हरी ॥१३॥ म्हणुनी वंदिले श्रीचरणा । तव मुनी बोले मधु-वचना ॥१४॥ येईन मी तव उदरी माते । परि न थांबवी मजला येथे ॥१५॥ षोडश वर्षे पिठापुरी । मग मी राहिन कुरवपुरी ॥१६॥ होईल विश्वाचे कल्याण । देतो माते हे आव्हान ॥१७॥ वचन देऊनी श्री अवधूत । गुप्त जाहले तत्क्षणीं तेथ ॥१८॥ शुद्ध चतुर्थी भाद्रपद मास । अवतरले प्रभु रवि उदयास ॥१९॥ पिठापुरीच्या अगम्य लीला । मोद होतसे वृद्धा-बाला ॥२०॥ शैशव वय परि ज्ञान अपार । सांगे वेदांताचे सार ॥२१॥ नरसावधानी विद्वद्ब्राह्मण । अहंकारी बुडला जाण ॥२२॥ दृष्टीक्षेपे शिखा गळाली । अहंवृत्ती ती नाश पावली ॥२३॥ शंकर भट्टा आज्ञा देउन । त्यांचे करवी चरित्र लेखन ॥२४॥ पळणी स्वामी  कृतार्थ झाले । शंकर माधव चरणी आले ॥२५॥ तिरुमलदासा अगाध ज्ञान । त्वाचि दिधले कृपानिधान ॥२६॥ संत गाडगे बाबा होई । ऐशी आज्ञा दिली जगमाई ॥२७॥ विचित्रपुरची अघटित लीला । चमकाचा गहन अर्थ बोधिला ॥२८॥ शनिप्रदोष महिमा सांगुन । भविष्यवाणी वदली आपण ॥२९॥ व्रत करिता ते शनिप्रदोष । नृसिंह तो मी बहु संतोष ॥३०॥ कारंजासी शैशव लीला । गाणगापुरीचा वैभव सोहळा ॥३१॥ कर्दळीवनीची समाधी सोडुन । अक्कलकोटी आले आपण ॥३२॥ स्वामी समर्थ घेउन नाम । भक्ता दावी ते सुखधाम ॥३३॥ सबुरी श्रद्धा वागाया जन । साईबाबा होऊन येईन॥३४॥ शिरडी भक्तजनांचे धाम । विश्वामध्ये  होईल नाम ॥३५॥ माझा बंधु श्रीधर राज । रामदास हो विश्व सुकाज ॥३६॥ होईल  शेगावीचा  देव । ख्यात गजानन तो भूदेव ॥३७॥ रामराज तो बंधु लहान  । होईल श्रीधर  जो भगवान ॥३८॥ नामानंदा कृपा  लाभली। भाग्यवल्ली ही उदया आली ॥३९॥ वेलु प्रभूचा गर्व परिहार । केला सुशिलेचा उद्धार ॥४०॥ बंगारप्पा सुंदरराम । हे ही पावले तव सुखधाम ॥४१॥ रवीदास तो  कृतार्थ केला । पुढील जन्मी राजा केला ॥४२॥ विकलांग त्या भीमाकरवी । कुलशेखर या मल्ला हरवी  ॥४३॥ सुब्बय्या चिंतामणिचे बोल । केले जीवन ते अनमोल ॥४४॥ ज्यांचे सदनी चरित्र ग्रंथ । आपण रहाता सदैव तेथ ॥४५॥ भाविक जन जे पठती ग्रंथ । नांदे लक्ष्मी मिळे सुपंथ ॥४६॥ करिती जे जे जन पारायण । तेथे तिष्ठे मी रात्रंदिन ॥४७॥ पिशाच्च आणि भूत प्रेत । राहू न शकती कदापि तेथ  ॥४८॥ श्रद्धेने दस बार आवर्तन । जारण मारण न चले  कंदन ॥४९॥ रोग व्याधी दृष्टिदोष । जाऊन होईल ते निर्दोष ॥५०॥ श्रीपादांची दत्तबावनी । कल्याणाची ही खाणी ॥५१॥ श्रीपादांचा महिमा फार । दासहरी  हा करी जयकार ॥५२॥ ॥ श्रीपादांचा जयजयकार ॥ ॥ श्रीपादांचा जयजयकार ॥ ॥ श्रीपादांचा जयजयकार

रचनाकार - प. पू. श्री. भाऊ महाराज निटूरकर

श्रीपाद श्रीवल्लभ बावनी - १


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार । भक्तांसाठी झाला परब्रह्म साकार ॥१॥ देशकालातीत श्रीपाद असती । सुमती उदरी पीठापुरी अवतरती ॥२॥ अनन्यभावे शरण तुज यावे । आनंदाने भवसिंधु तरावे ॥३॥ चक्रवर्ती अनंत
ब्रह्मांडराज । वंदू अप्पळराज आत्मज ॥४॥ 
अनादि,अनाकलनीय श्रीपाद । नमन वारंवार, महिमा अगाध ॥५॥ श्रीपाद सकल देव स्वरूप । धरी दिव्य तेज बहुरूप ॥६॥ नाम घेता सकल अभीष्ट पूर्ण । श्रीपाद श्रीदत्तावतार सम्पूर्ण ॥७॥  सवितृकाठकचयन पुण्यफल श्रीपाद । प्रसन्न होई, देता आर्त भावे साद ॥८॥ बापन्नार्य तनयासुत ज्योतिस्वरूप । अनंत भक्त उद्धरी श्रीदत्तस्वरूप ॥९॥ पीठापुरी आज ही भिक्षा घेती । वेद ही म्हणती तुज नेति नेति ॥१०॥ श्रीपाद ॐकार मूळ स्वरूपातीत । श्रीवल्लभ अपरिमित, त्रिगुणातीत ॥११॥ श्रीपाद राजं शरणम प्रपद्ये । महामंत्र हा मंत्रांमध्ये ॥१२॥ जाती भेद नसे, वात्सल्यमूर्ती । अनंत सृष्टी व्यापली तव कीर्ती ॥१३॥ शक्तीस्वरूप श्री अनघालक्ष्मी । अर्धनारीनटेश्वर, अन्तर्यामी ॥१४॥ सोळा कला परिपूर्ण तू असे । चरण कमळ भक्त हृदयी वसे ॥१५॥ सतत श्रीपाद ध्यान जो करी । त्याचे कर्म प्रभू भस्म करी ॥१६॥ कर्ता, करविता तू असतां । तुज भक्ता येई निर्भयता ॥१७॥ दत्त आदिगुरु साराचे सार । भक्ति लाभे, संसार असार ॥१८॥ दो चौपाती देव लक्ष्मी बोधियले । सन्मार्ग दाविण्या श्रीपाद अवतरले ॥१९॥ महाशून्य, कृपाळू, परमेश्वर । चराचर सर्व व्यापी सर्वेश्वर ॥२०॥ दोष निवारी, समाधान मिळे । त्वरा करी हा जीव तळमळे ॥२१॥ श्रीपाद रक्षक, सौभाग्य देती । मंगलरूपा, कुरवपुरी येती ॥२२॥ सृष्टी संचलन तुज महासंकल्प । श्रीपादाविण नोहे दुजा विकल्प ॥२३॥ जन्मस्थान झाले महासंस्थान । राजमांबा हलवा भरवी प्रेमानं ॥२४॥ जीवन धनैश्वर्य प्रदान करी । गणेश चतुर्थीस अवतरला भूवरी ॥२५॥ चित्रा तुझे जन्म नक्षत्र । गूढ़, निराळे श्रीपाद तंत्र ॥२६॥ थोरले बंधु समर्थ रामदास झाले । गोदान करूनी नरसिंह शिवाजी झाले ॥२७॥ अक्षर-सत्य कथन तयांचे । अतर्क्य काज श्रीपाद प्रभूंचे ॥२८॥ दत्तपुराण विष्णु-सुशीला दंपत्ती । कलियुगी झाले अप्पळ-सुमती ॥२९॥ श्रीदत्त यती वेषांत आले । श्राद्ध-भोज करूनी प्रसन्न झाले ॥३०॥ पुत्र रूपे येण्याचे वर दिधले । श्रीदत्त श्रीपाद रूपे अवतरले ॥३१॥ सनातन धर्म- रक्षण कराया । येती आत्मस्वरूप प्रभुराया ॥३२॥ अजन्मा, अनंता, दिगंबरा । श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥३३॥ कुणी अन्य न तया सारखे । नित्यानंदा, भक्तांसी पारखे ॥३४॥ स्वर्ण पीठापुरी तो विहारी । देई संजीवन, भक्तांसी तारी ॥३५॥ षड्रिपु असुर तू संहारी । श्रीपाद नाम हे अतिसुखकारी ॥३६॥ सतत घडे विलक्षण लीला । मनी मातृभाव ये उदयाला ॥३७॥ दिव्य चरित्र श्रीपादांचे असे । बालरूप सदा हृदयी वसे ॥३८॥ निजभक्तां अन्न भरवितो मायाळू । भक्तांचे कष्ट झेलतो हा दयाळू ॥३९॥ तव अनुग्रहे, हो अमृतवृष्टी । श्रीपाद नामे गर्जती सृष्टी ॥४०॥ द्वैत-अद्वैतातीत श्रीपाद अससि । परमसत्य श्रीपाद तत्वमसि ॥४१॥ परमानंदकंद अजानुबाहो । कृपादृष्टी सदा आम्हांवर राहो ॥४२॥ सर्वस्व माझे श्रीपाद देवाधिदेव । अगम्य तू, अद्वितीय, एकमेव ॥४३॥ मार्ग दावी, कुरवपुरातुनी झाला गुप्त । आत्मज्ञाने केले जागृत, सुप्त भक्त ॥४४॥ अत्रि-अनसूया तनय कल्याणकारी । विश्वात्मक चैतन्य, भवक्लेश हारी ॥४५॥ श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ महान । भागवी मुमुक्षूंची क्षुधा तहान ॥४६॥ श्रीपाद काशायवस्त्र, दण्ड, कमंडलधारी । श्रीनृसिंह सरस्वती रूपे आले गाणगापुरी ॥४७॥ साई तूचं, श्री स्वामी समर्थ । पादुका स्थापिल्या लोकोद्धार प्रीत्यर्थ ॥४८॥ नित्य बावन्नी पाठ जो करी । श्रीपाद नेई तयां मोक्ष द्वारी ॥४८॥ मनोभावे हा बावन्नी पाठ करावे । शांतमूर्ती श्रीपादांसी स्मरावे ॥५०॥ लागो छंद तुझा श्रीपाद नित्य । श्रीपाद बावन्नी असे अक्षर सत्य ॥५१॥ आमुचे हेचं मागणे श्रीपाद दिगंबरा । स्मर्तृगामी, पदी आश्रय दे जगदाधारा ॥५२॥ ॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥ रचनाकार - सौ. मीनल विंझे, इंदूर 


Sep 15, 2022

परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडेविरचित श्रीदत्तभावांजली 


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


श्रीगजानना गौरीनंदना ज्ञानभास्करा नमोस्तुते ।  द्या स्फूर्ती दत्त-सुयश गाया कल्याणप्रद मजला ते ॥  मतिप्रदे शारदे मला दे नवप्रतिभेची चार फुले। श्रवता जे सत्काव्य सुमंगल जीवमात्र नादात डुले ॥  श्रीवामनगुरु झरू देत शिरावर मधुधारा तव करूणेच्या ।  तेणे माझ्या काव्यी फुलतील नवबागा कैवल्याच्या ॥


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
विश्ववंद्य अवधूत निरंजन, श्रीदत्तात्रेय तुम्हीच ना । अनन्यभावे शरणागत मी, भवभयवारण तुम्हीच ना ॥१॥ युगायुगी निजभक्त रक्षणा, अवतरता प्रभु तुम्हीच ना । बालोन्मत्त पिशाच्चवृत्ती, धारण करता तुम्हीच ना ॥२॥ महासतीचे सत्व पाहण्या, भूवरी आला तुम्हीच ना । अत्रि-अनसूयाश्रमी प्रकटला, दत्त म्हणुनी तुम्हीच ना ॥३॥ नवनारायण सनाथ करूनी, गिरी उभविला तुम्हीच ना । मच्छिंद्रादि प्रवृत्त करूनी, मार्ग दाविला तुम्हीच ना ॥४॥ स्नान काशीपुरी, चंदन पंढरी, संध्या सागरी तुम्हीच ना । करूनी भिक्षा करवीरी, भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना ॥५॥ कुरवपुरी आचमन, सुनिद्रा माहुरनगरी तुम्हीच ना । शांत समाधीमग्न निरंतर, गिरनारी प्रभू तुम्हीच ना ॥६॥ प्रथम दर्शनी विचित्र रूपे, भय दाखविले तुम्हीच ना । श्रद्धा पाहुनी दर्शन दिधले, कार्तवीर्या तुम्हीच ना ॥७॥ राज्य देऊनी सिद्धी दिधल्या, सहस्त्रार्जुना तुम्हीच ना । मस्ती त्याची शमल्यावरती, मुक्ति दिधली तुम्हीच ना ॥८॥ मदालसासुत अलर्क याच्या, भ्रमा निरसिले तुम्हीच ना । अंती त्यासी ज्ञान देऊनी, कृपे तारिले तुम्हीच ना ॥९॥ अवधूत बनुनी गुरू मानिले, चोवीस दत्ता तुम्हीच ना । एक एक गुण त्यांचा घेऊन, भक्त रक्षिले तुम्हीच ना ॥१०॥ आयुनृपाची सेवा बघुनी, प्रसन्न झाला तुम्हीच ना । नहुषासम सत्पुत्र देऊनी, तृप्त केले तुम्हीच ना ॥११॥ विष्णुदत्त कर्मठ मीमांसक, पंक्ति घेतला तुम्हीच ना । सकलशास्त्रगत मर्म कथुनी, पूर्ण केले तुम्हीच ना ॥१२॥ परशुराम माता सहगमनी विधी कथियला तुम्हीच ना । जमदग्नी-रेणुका गौरवून, देवत्व दिधले तुम्हीच ना ॥१३॥ सोमकीर्ति राजास कथियली, आन्हिककर्मे तुम्हीच ना । नित्यकर्म-सद्‌धर्म शिकवुनी, मार्गी लाविले तुम्हीच ना ॥१४॥ नामधारका दर्शनध्यासे, तळमळवियला तुम्हीच ना । आर्त प्रार्थना ऐकून त्याची, दर्शन दिधले तुम्हीच ना ॥१५॥ कली-ब्रह्मा संवाद कथियला सिद्धमुखातुनी तुम्हीच ना । कृत-त्रेता-द्वापार कलीते, साग्र वर्णिले तुम्हीच ना ॥१६॥ अंबरिषाकारणे प्रभुवरा जन्म घेतले तुम्हीच ना । कृपा कार्य हे महान करिता, भक्त तारिले तुम्हीच ना ॥१७॥ ज्ञान लोपले असे पाहुनी, तळमळला मनी तुम्हीच ना । गिरनाराहुनी थेट निघाला, जनउद्धारा तुम्हीच ना ॥१८॥ श्राद्धाचे दिनी भिक्षा केली, पीठापुरी तुम्हीच ना । अपळराज-सुमतीच्या पोटी, जन्म घेतला तुम्हीच ना ॥१९॥ अंध-पंगु बंधु उद्धरिले, मातेसाठी तुम्हीच ना । गोकर्ण क्षेत्री वास केला, श्रीपादवल्लभ तुम्हीच ना ॥२०॥ दशाननाची पाहुनी भक्ति, लिंगही दिधले तुम्हीच ना । गणेश हस्ते लिंग स्थापिले, गोकर्णासी तुम्हीच ना ॥२१॥ चांडाळणीच्या करे बिल्वदल, फेकियले प्रभु तुम्हीच ना । पतिता असुनी पवित्र केले, शिवरात्रीदिनी तुम्हीच ना ॥२२॥ मंदमती त्या शास्त्रीकुमारा, ज्ञानी केले तुम्हीच ना । त्याच्या आईस शनिप्रदोष हे, सुव्रत कथिले तुम्हीच ना ॥२३॥ रजकाच्या सेवेस तुष्टुनी, दिले राज्यपद तुम्हीच ना । कुरवपुरी राहुनी गुप्तरूप, भक्त रक्षिता तुम्हीच ना ॥२४॥ चोरा वधुनी भक्त रक्षिला, वल्लभेश द्विज तुम्हीच ना । त्याचे हातुनी समाराधना, करूनी घेतली तुम्हीच ना ॥२५॥ विप्रस्त्रियेच्या वचनी गुंतला, पीठापुरी तुम्हीच ना । अंबा-माधवपोटी जन्मला, करंजनगरी तुम्हीच ना ॥२६॥ जन्मताच ओंकार गर्जुनी, मौन पाळिले तुम्हीच ना । मौजिबंधनी वेदोच्चारणी, चकीत केले तुम्हीच ना ॥२७॥ कृष्णसरस्वती सद्‌गुरु करूनी, काशीस वसला तुम्हीच ना । रक्षण करण्या वैदिक धर्मा, दीक्षा दिधल्या तुम्हीच ना ॥२८॥ संचारूनी सर्वत्र पुनरपि, मातेस भेटला तुम्हीच ना । पोटशुळाची व्यथा हरविली, ब्रह्मेश्वरस्थळी तुम्हीच ना ॥२९॥ वासरक्षेत्री सायंदेवा, अनुग्रह दिधला तुम्हीच ना । यवनापासुनी रक्षण करूनी, अभयही दिधले तुम्हीच ना ॥३०॥ बालसरस्वती कृतार्थ केला, आश्रम देऊनी तुम्हीच ना । उपदेशुनी सद्धर्मरक्षणा, प्रवृत्त केले तुम्हीच ना ॥३१॥ गुरु माहात्म्यविन्मुख विप्राते, बोध पाजिला तुम्हीच ना । शिष्यासह केलात वास, वैजनाथ क्षेत्री तुम्हीच ना ॥३२॥ भिल्लवडीसी जिव्हा छेदण्या, भाग पाडिले तुम्हीच ना । औदुंबरी ज्ञानवंत केले, विप्रसुतासी तुम्हीच ना ॥३३॥ अमरापुरासी भिक्षा केली, सद्विजसदनी तुम्हीच ना । वेल उपटुनी हेमकुंभही, दिला स्वभक्ता तुम्हीच ना ॥३४॥ गंगानुज कृषिवल भक्ताची, त्रिस्थळी केली तुम्हीच ना । जनउद्धारा दीक्षा दिधली, नृसिंहक्षेत्री तुम्हीच ना ॥३५॥ पिशाच्चपीडा सहज दवडिली, शिरोळग्रामी तुम्हीच ना । विप्रस्त्रियेच्या भक्तिसाठी, सुपुत्र दिधले तुम्हीच ना ॥३६॥ शिरोळग्रामी मृतपुत्रासी जीवन दिधले तुम्हीच ना । मातेकडुनी औदुंबराची, सेवा घेतली तुम्हीच ना ॥३७॥ वांझ महिषिसी दुग्ध निर्मुनी, भिक्षा केली तुम्हीच ना । दैन्य नाशुनी श्रीमंत केले, त्या विप्रासी तुम्हीच ना ॥३८॥ राजानिर्मित मठी राहिला, गाणगापुरी तुम्हीच ना । अश्वत्थाच्या ब्रह्मराक्षसा, उद्धरिले गुरु तुम्हीच ना ॥३९॥ कुमसी ग्रामी शिबिकेमधुनी, मिरवित गेला तुम्हीच ना । संशयरूपी त्रिविक्रमासी, कृतार्थ केले तुम्हीच ना ॥४०॥ म्लेंच्छाईत उन्मत्त ब्राह्मणा, धडा शिकविला तुम्हीच ना । वादविवादी जिंकुनी त्यासी, राक्षस केले तुम्हीच ना ॥४१॥ चार वेद उपशाखासहिते कथन केले तुम्हीच ना । शूद्राकरवी वादामध्ये लज्जित केले तुम्हीच ना ॥४२॥ सात रेखा उलंघून त्यासी, ब्राह्मण केला तुम्हीच ना । भस्म लाविता स्मरणहि दिधले, गतजन्माचे, तुम्हीच ना ॥४३॥ त्रिविक्रमा कर्मविपाक सकल सांगितला प्रभु तुम्हीच ना । शूद्राकडुनी वाद जिंकुनी, गर्व जिरविला तुम्हीच ना ॥४४॥ त्रिविक्रम भारतीसी कथिला विभूतीमहिमा तुम्हीच ना । उद्धरिले वामदेवहस्ते, ब्रह्मराक्षसा तुम्हीच ना ॥४५॥ गोपीनाथसुत दत्तमृतासी, कृपे उठविले तुम्हीच ना । त्याच्या पत्नीस ज्ञान बोधुनी, उद्धरिले गुरु तुम्हीच ना ॥४६॥ अगस्तीबृहस्पती संवादाचे, मर्म कथियले तुम्हीच ना । स्त्रीधर्माची महती कथिली, पतिव्रतेसी तुम्हीच ना ॥४७॥ सहगमनविधी, विधवा धर्मही, वर्णन केला तुम्हीच ना । भस्म आणि रुद्राक्ष श्रेष्ठपण, कथिले दत्ता तुम्हीच ना ॥४८॥ वैश्यरूप घेऊनिया गेला, नंदीग्रामी तुम्हीच ना । महानंदेच्या भक्तिसाठी, गाव तारिले तुम्हीच ना ॥४९॥ रूद्राभिषेक, रूद्राध्याय-माहात्म्य कथिले तुम्हीच ना । राजकुमारा सजीव करूनी, धर्म पढविला तुम्हीच ना ॥५०॥ कच देवयानी आख्यानाचे, मर्म दाविले तुम्हीच ना । मंत्रशास्त्रा स्त्री अनाधिकारी, दाखविले गुरु तुम्हीच ना ॥५१॥ परान्नलोभी विप्र स्त्रीला, अद्दल घडविली तुम्हीच ना । श्वानशूकरासहित भोजन तिसी करविले तुम्हीच ना ॥५२॥ परान्न म्हणजे अशुद्ध याचे, मर्म पटविले तुम्हीच ना । गार्हस्थ्यधर्म कथुनी ब्राह्मणा, उद्धरिले प्रभु तुम्हीच ना ॥५३॥ अल्पशिधा घेऊनी आणिला, भास्कर ब्राह्मण तुम्हीच ना । तेव्हढ्यातहि चार सहस्रा, भोजन दिधले तुम्हीच ना ॥५४॥ वांझ स्त्रियेसी कुमार, कन्या दिधली, दत्ता तुम्हीच ना । अश्वत्थाची सेवा घडविली तिचे हातूनी, तुम्हीच ना ॥५५॥ नंदी नामक कुष्ठी ब्राह्मण, निर्मळ केला तुम्हीच ना । शुष्ककाष्ठ पल्लवित करूनी, नवल घडविले तुम्हीच ना ॥५६॥ सायंदेवाकडुनी घेतली अवघड सेवा तुम्हीच ना । गुरुसेवेचे निधान देऊनी कृतार्थ केला तुम्हीच ना ॥५७॥ काशीयात्रा विधान कथिले त्वष्ट्यालागी तुम्हीच ना । तीच कथा संपूर्ण कथियली सायंदेवा तुम्हीच ना ॥५८॥ कौंडिण्याचे हस्ते केले अनंत सुव्रत तुम्हीच ना । त्याही व्रताचे माहात्म्य कथिले सायंदेवा तुम्हीच ना ॥५९॥ गाणगापुराहून क्षणार्धे तंतुक नेला तुम्हीच ना । श्रीशैल्याची यात्रा करूनी, परत आणिला तुम्हीच ना ॥६०॥ कल्लेश्वर-मी एकच आहे, असे दाविले तुम्हीच ना । नरकेसरीसी ज्ञान देऊनी, उद्धरिले प्रभु तुम्हीच ना ॥६१॥ सात रूपे घेऊन गेला, सप्तग्रामी तुम्हीच ना । रूप आठवे घेऊन होता गाणगापुरी तुम्हीच ना ॥६२॥ भक्तिसाठी शेत कापिले, शूद्राकरवी तुम्हीच ना । प्रसन्न होऊनी त्यासी दिधले, धान्य अपरिमित तुम्हीच ना ॥६३॥ दाखविली प्रभु भीमेमधली, आठही तीर्थे तुम्हीच ना । त्या तीर्थांचा महिमा कथिला, श्रीगुरुदत्ता तुम्हीच ना ॥६४॥ बेदरनगरी राज्य दिधले, रजकसुभक्ता तुम्हीच ना । स्फोटकविकार निमित्त्य करूनी, दर्शन दिधले तुम्हीच ना ॥६५॥ कली मातला असे जाणुनी, गुप्त जाहला तुम्हीच ना । पुष्प आसनी बसुनी गेला, श्रीशैल्यासी तुम्हीच ना ॥६६॥ कर्दळीवनीचा करूनी बहाणा, गाणगापुरी तुम्हीच ना । निर्गुणचरणे दृश्य ठेऊनी, गुप्तमठी प्रभु तुम्हीच ना ॥६७॥ नृसिंहवाडी औदुंबरीहि वास्तव्य असे गुरु तुझेच ना । भीमा अमरजा संगमी रमला गाणगापुरी तुम्हीच ना ॥६८॥ स्वामी जनार्दन, एकनाथ, तरी कृतार्थ केले तुम्हीच ना । नाथसदनीचे चोपदार हो, श्रीगुरुदत्ता तुम्हीच ना ॥६९॥ दासोपंतागृही रंगला, परमानंदी तुम्हीच ना । माणिकप्रभु, श्रीसमर्थ स्वामी, टेंब्येस्वामी तुम्हीच ना ॥७०॥ मम गुरु वामन बनुनी जगती, अवतरला प्रभु तुम्हीच ना । कृतार्थ केले जीवन माझे चिन्मय दाते तुम्हीच ना ॥७१॥ तुम्हीच सद्‌गुरु, वामनमूर्ती सद्‌गुणकीर्ति तुम्हीच ना । दत्तसुता प्रवृत्त करूनी, सेवा घडविता तुम्हीच ना ॥७२॥ अनंतकोटी ब्रह्मांडनायका, दासा रक्षिता तुम्हीच ना । अनंत अपराध पोटी घालुनी, भक्त उद्धरिता तुम्हीच ना ॥७३॥ तुम्हीच ब्रह्मा, तुम्हीच विष्णु, श्रीशिवशंकर तुम्हीच ना । माझे तर सर्वस्वच तुम्ही, सुखप्रदाते तुम्हीच ना ॥७४॥ तुम्हीच माता पिताही तुम्ही, माझे सारे तुम्हीच ना । तुम्हावाचुनी शरण कुणाला जावे सांगा तुम्हीच ना ॥७५॥ कुरवपुरी मज चरण दाविले, कृष्णेमाजी तुम्हीच ना । दिले चरण मज, सर्वस्व दिले, माझे झाला तुम्हीच ना ॥७६॥ सर्व हरविले आणि बसविले, साम्राज्यपदी तुम्हीच ना । तुम्हीच ना - तुम्हीच ना - तुम्हीच ना - तुम्हीच ना ॥७७॥
॥ इति श्रीदत्तभावांजलीस्तोत्रम् समाप्तम् ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥


Aug 24, 2022

श्रीगुरुचरितम् भक्तिरसामृत - १


श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


ज्ञान, ऐश्वर्य, बल, तेज, वीर्य आणि वैराग्य आदि वैभवाने युक्त अशा विष्णु, शिव, गणेश, सूर्य, देवी (शक्ति) तसेच इंद्र, अग्नि (आदि) मूर्ति जे आपल्या मायेच्या सामर्थ्याने धारण करतात, पण तत्त्वतः जे अनादि आणि अनंत असतात ते सद्‌गुरु दत्तभगवान् नित्य माझ्या हृदयमंदिरी स्थित असो. मी श्री दत्तप्रभूंना भक्तिपूर्वक नमन करतो. 
दत्तात्रेय जन्मरहित, अनंत, निर्गुण, निरिच्छ, एकमेवाद्वितीय, अक्रिय परब्रह्म आहेत. त्यांनी आपल्या योगमायेने विराट पुरुषरूप धारण करून विश्व निर्माण केले. अनंत पाय आणि अनंत शिरे असलेले भगवंताचे ते दिव्य स्वरूप केवळ सिद्धपुरुष आपल्या ज्ञानचक्षूंनी पाहू शकतात. त्यांच्यापासूनच पातालादि लोकांचा विस्तार झाला आहे. हा मायाध्यक्ष ह्या अखिल चराचर सृष्टीचे सृजन करतो. संत आणि धर्म यांच्या रक्षणासाठी मनुष्यरूपाने अवतरलेल्या त्या भगवंताला सामान्य जन मात्र ओळखू शकत नाहीत.
स्वतःचेच दान करून आपले दत्त हे नाम सार्थक केलेला अनसूया आणि अत्रीचा हा पुत्र दत्तात्रेय साक्षात ईश्वरस्वरूप आहे. केवळ स्मरणमात्रेच संतुष्ट होणाऱ्या या परमानंदस्वरूप दत्तप्रभूंचे श्रद्धेने नित्य पूजन करावे. मानसपूजा ही सर्वथैव श्रेष्ठ मानली आहे. तेव्हा या अचिंत्य, अव्यक्त आणि लीलाविग्रही अशा या परमात्म्याने आपल्या भक्तांसाठी नरदेह धारण केला आहे, अशी कल्पना करावी. परमेश्वर हा शुद्ध भक्तीचा भुकेला आहे, त्यामुळे अनन्यभावानें - मनांत कुठलाही किंतु न आणता त्याचे पूजन करावे. 
श्री दत्तात्रेयांची मानसपूजा विविध उपचारांनी करता येते. इथे श्री टेम्ब्ये महाराजांनी षोडशोपचार पूजाविधी वर्णन केला आहे. 
प्रथमतः प्रार्थना करावी - हे भक्तवत्सला ही मानसपूजा आपण स्वीकारावी. श्री दत्तात्रेया आपण माझ्या चित्तात वास करावा.  
ध्यान - सिद्धासनस्थित खेचरी मुद्रेतील श्री दत्तप्रभूंची द्विभुज मूर्ती डोळ्यांसमोर आणावी. आपल्या भक्तांना, शरणागतांना अभय आणि शुभाशिष देण्यासाठी त्यांनी आपला एक हात वर केलेला आहे.  अशा त्या सद्‌गुरु श्रीदत्तांचे मी ध्यान करतो. 
आवाहन - श्रीदत्तात्रेयांना त्याच्या परिवारासह मी श्रद्धेने आणि भक्तीने आवाहन करतो. हे सर्वव्यापी दिगंबरा, आपण शीघ्र या ध्यानमूर्तीत यावे आणि माझी मानसपूजा स्वीकारावी अशी मी आपणांस प्रार्थना करीत आहे. 
आसन - हे दत्तप्रभू, मी आपल्यासाठी हे रत्नजडित असे सुवर्ण सिंहासन कल्पिलेले आहे. त्यावर विराजमान व्हावे. 
पाद्य - चंदन, कापूर आणि केशर यांनी युक्त अशा या सुवासिक, मधुर जलाने मी आपले हे दिव्य चरण धूत आहे. 
अर्घ्य - हे प्रभो, गंध, अक्षता, आणि बेल-तुलसी-शमी आदि विविध पर्ण व कमळ यांनी सुवासित असे हे सुवर्णपात्रांतील जल आपण ग्रहण करा. 
आचमन - हे श्रीपादा, आपल्या आचमनासाठी या सुवर्ण कलशातील हे मधुर जल मी आणले आहे. तुम्ही आचमन करून हा मधुपर्क घ्यावा, अशी मी प्रार्थना करीत आहे. .
स्नान - हे दत्तात्रेया, अनेक प्रकारच्या सुगंधित फुलांचे अर्कमिश्रित असे हे तेल आपल्या अंगाला लावून मी  पंचामृताने आणि अत्यंत पवित्र गंगोदकाने आपल्याला स्नान घालत आहे.
वस्त्र - हे दिगंबरा, स्नानोत्तर हे भगवे वस्त्र आणि मृगचर्म आपण धारण करावे. 
यज्ञोपवीत - हे जगदीशा, मी कल्पनेने केलेले हे नऊ तंतूंचे दिव्य यज्ञोपवीत धारण करावे.
गंधाक्षता - हे नरहरि, भस्म-मृत्तिका-कस्तूरी आणि केशरयुक्त चंदनाचे लेपन मी आपल्या सर्वांगास करत आहे. तदनंतर ह्या रत्नमय अक्षतांनी आपण अलंकृत व्हावे.
पुष्प - हे स्वामी दत्तराज, शमी, बिल्व आणि तुलसी यांच्या पानांनी आणि नानाविध सुगंधित पुष्पांनी मी मनोमन आपले पूजन करीत आहे.
धूप - लाख, अभ्रक, श्रीवास (वृकधूप), चंदन, अगरु आणि गुग्गुळ यांच्यापासून बनवलेला सुगंधी धूप मी जाळीत आहे. त्याचा आपण स्वीकार करावा.
दीप - हे स्वयंप्रकाश प्रभो, गोघृतात भिजवलेल्या वातींनी प्रज्ज्वलित दीप आणि कापूर यांनी मी आपली आरती करत आहे.
नैवेद्य - हे अनसूयानंदना, या सुवर्णाच्या ताटांत मी आपणास ( मधुर, खारट, तिखट, कडू, आंबट आणि तुरट या ) षड्रसयुक्त पक्वान्ने वाढली आहेत. या भोजनाचा आपण स्वीकार करावा, अशी मी अभ्यर्थना करीत आहे. 
फल-तांबूल-दक्षिणा - हे अत्रितनया, भोजनोत्तर हात प्रक्षालन करून हे पुन्हा आचमन घ्यावे आणि ही मधुर फळे, विडा, आणि सुवर्ण दक्षिणा स्वीकारावी. 
आरती-प्रदक्षिणा - हे दत्ता, रत्नजडित नीरांजनाने मी आपली आरती करून नमन करतो आणि तुझ्या लीलांचे स्मरण करीत तुझ्याभोवती प्रदक्षिणाही करतो.
मंत्रपुष्प-राजोपचार - हे दयाळा, मंगल वाद्ये-वेदमंत्रघोषासहित ही पुष्पांजली आपल्या चरणीं अर्पण करतो. 
समर्पण - माझ्या आराध्य देवा, तू सर्वांतर्यामि आहेस. तुझ्याच कृपाप्रसादाने केलेल्या या मानसपूजेचा आपण स्वीकार करावा. तुझा वरदहस्त सतत माझ्या मस्तकी असावा.
विसर्जन - हे दत्तसखया, माझ्या हृदयमंदिरी आपण सदैव स्थित असावे. माझी भक्ती दिवसोंदिवस वृद्धिंगत व्हावी. तुझ्या कृपेला मी नेहेमीच पात्र ठरावे. हे देवाधिदेवा, तू मला हे वरदान दे.

श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त


Aug 18, 2022

श्रीहरिविजय - बलराम-श्रीकृष्ण जन्म कथा


श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥


जय जय अनंतब्रह्मांडनायका । चतुराननाचिया निजजनका । चोघांसीही नव्हे आवांका । तुझें स्वरूप वर्णावया ॥
हे अनंतकोटी ब्रह्मांडनायका, ब्रह्मदेवाच्या जनका तुझ्या स्वरूपाचे वर्णन करतांना चारही वेद थकले. हे प्रभो, एक वेळ या पृथ्वीचे वजन, समुद्रातील जल, भूमीवरील तृणांकुर, आकाशाची भव्यता इत्यादिकांची गणती करता येईल, परंतु तुझे माहात्म्य कथन करणे कदापि शक्य नाही.
क्रूर कंसाने देवकीचे सहा गर्भ मारले, गाई-ब्राह्मणांस अपार कष्ट दिले, तेव्हां क्षीरसागरवासी भगवान श्रीविष्णू शेषास म्हणाले," आता आपण अवतार घेऊन दुष्टांचा निःपात करूं चला." अनंताचे ते वचन ऐकून शेष म्हणाला, " मी पूर्वावतारात सौमित्र होऊन फार कष्ट भोगिले, आता मी अवतार घेणार नाही. हे श्रीहरि, तुम्हीच अवतार घेऊन गाई ब्राह्मण, साधुजन यांचा प्रतिपाळ करावा." त्यावर रमाधव कौतुकाने त्याला म्हणाले, " तूं माझा प्राणसखा । समरभूमीचा पाठिराखा ॥ - मग मी तुझ्याशिवाय अवतार कसा घेऊ ? तरी तूं जाऊन माझा वडील बंधु, बळिभद्र होऊन देवकीच्या गर्भी जाऊन राहा, मी तुझी आज्ञा पाळीन. मी योगमायेसी लवलाहीं । पाठवितो तुजमागें ॥ कंसाने यापूर्वीच्या सर्व गर्भांना मारले असले तरी, तुला माझी योगमाया गोकुळांत नेऊन रोहिणीच्या गर्भात ठेवील. माया स्वतः यशोदेच्या पोटीं जाईल. मग मी मथुरापुरास देवकी-वसुदेव पुत्र म्हणून अवतार घेईन व उपजतांच गोकुळांत येईन. तिथे आपण दोघेजण, गोरक्षमिषें संपूर्ण । दैत्य तेथील संहारूं ॥. नारायणाचे हे बोलणे ऐकून संकर्षणाने त्यांना साष्टांग नमन केले आणि त्यांच्या आज्ञेनुसार देवकीच्या पोटी सातव्या गर्भात जाऊन राहिला. पुढे एके दिवशी वसुदेवास देवकी म्हणाली, " नाथ, मी यापूर्वी सहावेळा गर्भिणी झाले. परंतु या गर्भावस्थेतील माझे डोहाळे काही वेगळेच, नवलाईचे आहेत." वाटे पृथ्वी उचलीन । कीं आकाशा धीर देईन । सप्त समुद्र सांठवीन । नखाग्रीं मज वाटतसे ॥ हातीं घेऊन नांगर-मुसळ । मीच मर्दीन कंसदळ । दैत्य मारावे समूळ । मनामाजी वाटतसे ॥ पत्नीचे हे बोल ऐकून वसुदेव म्हणाला, " ईश्वराची करणी कोणास कळली आहे ? हे बालक तरी वांचून विजयी होवो, एव्हढीच माझी प्रार्थना आहे." लवकरच, देवकीस सातवा महिना लागला. एके रात्री ती निद्रिस्त असतांना, त्या श्रीहरिच्या मायाराणीनें एक अगम्य लीला केली. तंव ती हरीची योगमाया । तिची ब्रह्मांदिकां न कळे चर्या । तिनें देवकीचा गर्भ काढूनी । गोकुळासी पैं नेला ॥ गोकुळांत वसुदेवाची पत्नी रोहिणी कंसाच्या धाकानें नंदगृहांत लपून राहिली होती, ती निद्रिस्त असतां त्या योगमायेने देवकीचा गर्भ काढून तिच्या पोटांत नेऊन घातला. निजले ठायीं गर्भ । पोटांत घातला स्वयंभ । परम तेजस्वी सुप्रभ । सूर्य जैसा तेजस्वी ॥ रोहिणी जागी होताच ती सात महिन्यांची गर्भिणी आहे, याची तिला जाणीव झाली आणि ती चिंताग्रस्त झाली. ही वार्ता नंद-यशोदेस कळताच, तेही अचंबित झाले. इतक्यांत आकाशवाणी झाली की, “ रोहिणी, तू वृथा चिंता करूं नको, हा वसुदेवाचा गर्भ असून, पृथ्वीचा भार उतरण्याकरितां शेषाने अवतार घेतला आहे." ती देववाणी ऐकून सर्वच आनंदित झाले. अशा रीतीने, लोकापवाद सर्व हरला । चिंतेचा डाग धुतला । तों बळिराम जन्मला । नवमास भरतांचि ॥ नंदाने त्या बालकाचे जातक वर्तवून बळिभद्र असे नाव ठेविलें. तों यशोदा जाहली गरोदर । हरिमायेनें अवतार । तेथें घेतला तेधवां ॥ इकडे देवकी जागी झाली. आपल्या पोटांत गर्भ नाही, हे लक्षांत येताच ती अतिशय घाबरली आणि दुःखी स्वरांत वसुदेवास म्हणाली, " नाथा, गर्भ धरणीवर न पडतां पोटांत जिरून गेला." तिचे सांत्वन करीत वसुदेव तिला म्हणाला, " ईश्वराची करणी अगाध आहे. कंसाच्या धाकानें गर्भ कदाचित जिराला असेल !" ही बातमी कंसास कळतांच, त्याने सेवकांस आज्ञा केली, " आतां आठव्याची आठवण विसरू नका." - देवकी होतांचि गर्भिण । जागा नेत्रीं तेल घालून । आठव्याची आठवण । विसरूं नका सर्वथा ॥ देवकीच्या गर्भातील आठव्या बालकाचाच ध्यास कंसाला लागला. त्याला जिकडे तिकडे आठवा दिसू लागला. अर्थात्, आठव्यानें व्यापिलें त्यासी । दिवसनिशीं आठवा ॥ इकडे क्षीरसागरीं श्रीहरीने लक्ष्मीस आज्ञा केली की, तूं वैदर्भ देशांतील भीमक राजाचे पोटी अवतार घे. श्रीविष्णूंचे वचन ऐकून, तात्काळ चालली कमळजा । नमस्कारूनि हरीतें ॥ जगद्वंद्य श्रीविष्णू मथुरापट्टणांत देवकीच्या गर्भी येऊन राहतांच अपूर्व असे तेज तिच्या सभोवती दिसू लागले. पोटा आला विदेही हरी । देवकी नाहीं देहावरी । जनीं वनीं दिगंतरीं । अवघा मुरारी दिसतसे ॥ देवकीस आता सदैव अतीव सुखावस्थेची अनुभूती येऊ लागली. ते पाहून वसुदेव देवकीस म्हणाला, " तुला आपल्या आठव्या बाळाची चिंता वाटत नाही का?" त्यावर, देवकी भुजा पिटोनि बोले वचन । कंसास मारीन आपटोन । मुष्टिकचाणूरांचा प्राण । क्षणमात्रें घेईन मी ॥ हांक फोडोन गर्जे थोर । उतरीन पृथ्वीचा भार । करूनि दैत्यांचा संहार । बंदिशाळा फोडीन मी ॥ आणीं वेगें धनुष्यबाण । युद्ध करीन मी दारुण । जरासंध रथीं बांधोन । सत्रा वेळां आणीन मी ॥ भस्म करीन कालयवन । रचीन द्वारकापट्टण । सकळ नृपां शिक्षा लावून । पट्टराणी आणीन मी ॥ हांक फोडिली क्रोधें थोर । जिवें मारीन भौमासुर । निवटीन कौरवभार । निजभक्तकैवारें ॥ मी भक्तांचा सारथी होईन । दुष्ट सर्व संहारीन । मी ब्रह्मानंद परिपूर्ण । अवतरलों पृथ्वीवर ॥ देवकीचे हे आवेशपूर्ण बोल ऐकून वसुदेवास काळजी वाटू लागली. तिचे हे बोलणे कंसाच्या दूतांनी ऐकले तर अनर्थ होईल, अशी भीती त्याला वाटली. तो देवकीस समजावित म्हणाला, " देवकी ! आतां तू शांत राहा." तत्क्षणीं देवकी गर्जली, मी असें ब्रह्म सनातन । मीच सगुण मीच निर्गुण । देव दैत्य निर्मून ।कर्ता हर्ता मीचि पैं ॥ मी सर्वद्रष्टा अतींद्रिय । मी अज अव्यय निरामय । अजित अपार निष्क्रिय । आनंदमय वर्तें मी ॥ मी प्रळयकाळाचा शास्ता । मी आदिमायेचा नियंता । मी चहूं वाचांपरता । मायानिर्मिता मीच पैं ॥ असें बोलून देवकी स्तब्ध झाली. तोंच देवांनी आकाशात दुंदुभीचा गजर केला; भगवंत आता लवकरच अवतरेल असा विचार करून समस्त सुरवर मथुरेत गुप्तरूपाने आले आणि जय हरे नारायणा गोविंदा । इंदिरावर आनंदकंदा । सर्वेशा मुकुंदा परमानंदा । परमपुरुषा परज्ञा ॥ सर्वतीता सर्वज्ञा । गुणसागरा गुणज्ञा । आम्ही सकळ सुर तवाज्ञा । पाळोनियां राहतों ॥ अशी हस्त जोडून देवकीच्या गर्भाची स्तुति करून अंतर्धान पावले. कंसाला आता सतत आठव्याचाच ध्यास लागला होता. त्याने एका दासीस विचारले, " गर्भास किती महिने झाले ?" त्यावर दासीने नऊ महिन्यांस थोडाच अवधी आहे असे उत्तर दिले. तेव्हा, कंसासुर देवकीपुढे येऊन उभा राहिला, परंतु देवकीस अवघी सृष्टी कृष्णमय दिसत होती. परमानंदात तृप्त असलेल्या त्या देवकीस अणुमात्र चिंता नव्हती. तिला न्याहाळून पाहतांना त्या कंसाला अचानक तिथे तंव तें चतुर्भुज रूपडें । शंख-चक्रयुक्त दिसे ॥ न दिसे स्त्रियेची आकृती । परम देदीप्यमान विष्णुमूर्ती । आरक्तनेत्र सुदर्शन हातीं । ऊर्ध्व करूनि उभी असे ॥ त्याबरोबर कंसाच्या हातांतील शस्त्रे गळाली, अन त्याची बोबडी वळली आणि भयग्रस्त होऊन तो आपली सर्व शस्त्रें आपटू लागला. "आठव्यानें मज व्यापिलें । त्यासी मी गिळीन सगळें ।" असे रागारागांत बोलू लागला. यथावकाश श्रीकृष्णाचा जन्मकाळ जवळ आला असें जाणून आकाशांत देवांच्या विमानांची दाटी झाली. श्रावण वद्य अष्टमीस, बुधवारी रोहिणी नक्षत्र असतांना मध्यरात्री देवकी निद्रिस्त असतांना आठ वर्षांची चतुर्भुज मूर्ती तिच्यापुढे उभी राहिली. तोच देवकीने जागृत होऊन, बालकावरून जिवाचे लिंबलोण केले आणि म्हणाली, आनंद न माये अंबरीं । म्हणे भक्तवत्सला श्रीहरी । तूं माझिया निजोदरीं । पुत्र होवोनि अवतरें ॥ तेव्हा प्रसन्न होऊन श्रीहरी वदला, " मी पुन्हा बालक होतो, परंतु मला गोकुळांत घेऊन जावे. तेथे माझा ज्येष्ठ बंधु बळिभद्र आहे. तो आणि मी लवकरच तुमच्या दर्शनास येऊ." आणि आपल्या योगमायेने देवकीस मोहवून तो सच्चिदानंद घननीळ तिच्यापुढे बालक स्वरूपात प्रकट झाला. त्यावेळी त्या बंदिशाळेत असंभाव्य असे तेज प्रगटले. मग देवकीने वसुदेवास उठवले आणि तों हळूच बोले देवकी बोला । हा अयोनिसंभव पुतळा । यास नेऊन घाला गोकुळा । भय तुम्हांला कदा नाहीं ॥ तेव्हा, वसुदेव तिला म्हणाला," माझ्या पायांत बेड्या आहेत. बाहेर दारांत रक्षक असून सर्वत्र कुलपे लावलेली आहेत. त्यांत पर्जन्यामुळे यमुनेस पूरही आला आहे, यांतून मी बाहेर कसा जाऊं ? असा तो वसुदेव जाहला सद्गद । हृदयीं धरिला ब्रह्मानंद । चैतन्यघन श्रीकृष्ण ॥ त्या मनमोहनाचे मुखकमल पाहताच त्याच्या पदीं शृंखला तुटून गेल्या. तो प्रकार पाहून वसुदेवास नवल वाटले. ज्यांचे करितांच स्मरण । भावबंधन निरसे पैं ॥हेच सर्वथा सत्य नव्हे काय ? मग तो वसुदेव, त्या बाळ श्रीकृष्णास घेऊन चालला, तो देवकीच्या नेत्रांतून आंसवांच्या धारा सुरू झाल्या. तेव्हां श्रीकृष्णाने आपल्या मातेकडे पाहून हास्यवदन केले. त्यावेळी श्रीकृष्णाने दरवाज्यांस पायांचा स्पर्श करितांच, सर्व द्वारे आपोआप उघडली. कंसाचे रक्षक निद्राधीन झाले. वसुदेव सत्वर गोकुळाकडे निघाला. वर्षती पर्जन्याच्या धारा । तों फणींद्र धांविन्नला त्वरा । विशाळ फणा ते अवसरा । कृष्णावरी उभारिला ॥ लवकरच तो यमुनातीरी पोहोचला, त्यावेळी यमुनेस महापूर आला होता तरी तो तसाच यमुनेच्या पाण्यात शिरला. जों जों उचली कृष्णातें । तों तों जीवन चढे वरुतें । स्पर्शावया जगज्जीवनातें । यमुनेतें आल्हाद ॥ अखेर वासुदेवाने, " हे कमळाधवा, वैकुंठपति माझे रक्षण करा." अशी प्रार्थना केली. मग कृष्णाने उजव्या पायानें यमुनेस स्पर्श केला; परमसुखें यमुना सवेग । तात्काळ जाहली दोन भाग । मग वसुदेव लवकरच नंदभुवनीं आला. इकडे त्याचवेळी यशोदा प्रसूत होऊन तिला कन्या झाली; ते योगमाया हरीची पूर्ण । तिनें निद्रिस्त केले सकळ जन । यशोदेशी न कळे वर्तमान । कन्यारत्‍न पुढें तें ॥ त्याचवेळी वसुदेव अंतर्गृही प्रवेशला आणि त्याने यशोदेजवळ श्रीकृष्णास ठेवून ती कन्या उचलून घेतली. कृष्णा ठेवूनि लवलाही । कन्या वेगें उचलिली । पुत्र ठेवूनि कन्या नेली । कोणासी न कळे गोकुळीं ॥ आणि मग तो वसुदेव तेच वेळीं । बंदिशाळे पातला ॥ तेव्हां दरवाजे पूर्ववत बंद झाले. सर्व सेवक पुनःश्च जागृत झाले. इकडे बंदिशाळेत ती कन्या रडूं लागली. तिचे रडणे ऐकून सेवकांनी देवकी प्रसूत झाल्याचे वर्तमान कंसास कळविले. त्याबरोबर कंस धावतच बंदिशाळेत आला आणि माझा आठवा अरी म्हणजे शत्रू कोठे आहे ? असे उच्च स्वरांत विचारू लागला. देवकी रडत विनवणी करत म्हणाली, " बंधुराया ! एवढा वध करूं नकोस रे!" पण तिचे बोलणे ऐकून न घेता त्या दुष्टाने तिच्या मांडीवरील बालकास ओढले. ते शिशु बालक, पुत्र किंवा कन्या आहे तेंही न पाहता रागाने त्याने शिळेवर आपटण्यासाठी गरगर फिरविले. तंव ते महाशक्ति झडकरी । गेली अंबरी निसटूनियां । सहस्र कडकडती चपला । तैसा प्रलय तेव्हां वर्तला ॥ हा अवचित प्रकार पाहून, " आपला वैरी हातातून गेला. " असे वाटून कंस भयभीत झाला. तेव्हां ती तेजस्वी शक्ति त्याला आकाशांत दिसली. कंस जंव वरतें पाहे । तंव ते महाशक्ति तळपत आहे । तेज अंबरीं न समाये । बोले काय कंसासी ॥ अरे मूढा दुराचारा । महामलिना खळा निष्ठुरा । तुझा वैरी पामरा । पृथ्वीवरी वाढतसे ॥ आणि ती अदृश्य झाली. त्या महाशक्तीची वाणी ऐकून कंसाचे मन भयभीत झाले. तो तावातावाने राजगृहात निघून गेला. वसुदेव-देवकी तटस्थ झाली. श्रीहरिचा आठवा अवतार भूतलावर अवतरला होता, श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.

श्रीकृष्णार्पणमस्तु
॥ श्री गुरुदेव दत्त