॥ ॐ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
समस्त दत्तभक्तांना श्री दत्तात्रेय जयंतीच्या भक्तिमय शुभेच्छा !
श्री दत्तात्रेयांच्या अवताराचा हेतु स्पष्ट करतांना ब्रह्मपुराणात म्हटले आहे की, भूयो भूतात्मनो विष्णोः प्रादुर्भावो महात्मनः । दत्तात्रेय इति ख्यातः क्षमया परया युतः ॥ तेन नष्टेषु वेदेषु प्रक्रियासु मखेषु च । चातुर्वर्ण्ये तु संकीर्णे धर्मे शिथिलतां गते ॥ अभिवर्धति चाधर्मे सत्ये नष्टेऽनृते स्थिते । प्रजासु शीर्यमाणासु धर्मे चाकुलतां गते ॥ सहयज्ञक्रिया वेदाः प्रत्यानीता हि तेन वै । चातुर्वर्ण्यमसंकीर्णं कृतं तेन महात्मना ॥ याचा भावार्थ थोडक्यांत असा की, सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा असे ते श्रीहरि विष्णू यांचाच हा दत्तात्रेय नावाचा अवतार होय. अत्यंत क्षमाशील असा हा अवतार असून या अवतारकार्यांत त्यांनी वेदांना पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, यज्ञसंस्थेचे पुनरुज्जीवन केले, चातुर्वर्ण्यातील शिथिलता दूर केली, अधर्माचा व असत्याचा नाश करून क्षीण होत चाललेल्या लोकांत सामर्थ्य निर्माण केले.
श्री दत्तजन्माच्या वेगवेगळ्या कथा विविध पुराणांत वर्णिल्या आहेत. महर्षी अत्री व महापतिव्रता अनसूया या श्रेष्ठ दांपत्याच्या पोटी श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला असून ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन देवाचे अंश त्यांच्यांत एकवटलेले आहेत. श्री विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी हा एक आहे, असेही काही दत्तभक्तांचे मत आहे. निरनिराळ्या पुराणांतून दत्तात्रेयांच्या जन्मकथा निरनिराळया असल्या तरी ते अत्रि-अनसूयेचा पुत्र व विष्णूचा अवतार यात मात्र एकवाक्यता आढळते. यापैकी काही जन्मकथांची थोडक्यात ओळख करून घेऊ.
भागवतपुराणातील कथा थोडक्यांत अशी आहे - ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्री ऋषी श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी होते. ब्रह्मदेवाने त्यांना सृष्टी उत्पन्न करण्याची आज्ञा केली, तेव्हा तपश्चर्या करण्यासाठी ते आपल्या पत्नीसहवर्तमान ऋक्षपर्वतावर गेले. त्या पर्वतावरील एका घनदाट अरण्यात निर्विन्ध्या नावाच्या नदीतीरी, सुखदुःखादी द्वंद्वांचा त्याग करून अत्री ऋषींनी एका पायावर उभे राहून कडक तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला. सुमारे शंभर वर्षेपर्यंत केवळ वायू भक्षण करून व प्राणायामाच्या योगाने आपल्या मनाचा निग्रह करून तपश्चर्या करीत असताना अत्री ऋषी, 'जो कोणी या जगाचा नियंता आहे, त्यालाच मी शरण आलो आहे, तरी त्याने मला आपल्यासारखी संतती द्यावी' असे नित्य चिंतन करीत असत. त्यांच्या या तपोबलाने प्रदीप्त झालेला अग्नी त्रैलोक्याला जाळू लागला. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे तीनही देव अत्री ऋषींच्या आश्रमात आले. नंदी, हंस व गरुड या वाहनांवर बसून आलेल्या व त्रिशूळ, कमंडलू व चक्र अशी आयुधे धारण करणाऱ्या या तीन देवांनी अत्रींना साष्टांग नमस्कार घातला. त्यांची मनोभावे पूजा केली. अत्री ऋषीने त्यांना मनोभावे प्रार्थना करून म्हटले, “ हे त्रिदेवांनो, जगाची उत्पत्ती, पालन व संहार अशी कार्ये करणारे ब्रह्मा, विष्णू व महेश तुम्ही आहात. तुमच्यापैकी ज्या एकाचीच मी आराधना करीत होतो, तो कोण ? मी येथे पुत्रप्राप्तीसाठी तप करीत आहे.” त्यावर ते तिन्ही देव प्रसन्न होऊन म्हणाले, “ तू ज्या एका तत्त्वाचे ध्यान करीत आहेस त्याचेच आम्ही तिघेजण अंशभूत आहोत. हे मुनिवर्य, तुझे कल्याण असो. आता तुला आमच्या अंशांपासून जगप्रख्यात असे तीन पुत्र होतील आणि ते तुझी कीर्ती जगभर पसरवतील.” या वरदानाचे फलस्वरूप म्हणून यथावकाश अत्री ऋषींना ब्रह्मदेवाच्या अंशापासून सोम, विष्णूच्या अंशापासून योगशास्त्रात निपुण असे दत्त व शंकराच्या अंशापासून दुर्वास असे तीन पुत्र झाले.
ब्रह्मपुराणातील कथेनुसार, ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी अत्री ऋषींनी आराधना केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या त्रिमूर्तींना त्यांनी प्रार्थना केली, “आपण माझ्या 'घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि एक गुणवती व रूपवती कन्या पण द्यावी.” त्या वरदानस्वरूप अत्री ऋषींस दत्तात्रेय, सोम व दुर्वास हे तीन पुत्र झाले आणि शुभात्रेयी नामक कन्या झाली.
वायुपुराण, कूर्मपुराण आणि मार्कंडेय पुराणात मात्र अनसूयेच्या सतीत्वाशी व पावित्र्याशी संबंध असलेली एक कथा आहे. प्रतिष्ठान नगरीत कौशिक नावाचा एक ब्राह्मण राहत असे. त्याची पत्नी मोठी पतिव्रता होती. मात्र तो ब्राह्मण नित्य वेश्यागमनी असल्यामुळे आपल्या साध्वी पत्नीकडे दुर्लक्ष करीत असे. काही काळानंतर त्याला महारोग जडला आणि त्याची गात्रे झडू लागली. त्या वेश्येनेही त्याचा त्याग केल्यावर तो घरी परतला. त्याची पत्नी त्याची मनोभावे सेवा करू लागली. एकदा कौशिक आपल्या पत्नीस म्हणाला, “ मला त्या वेश्येकडे घेऊन चल.” पतीच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी रात्रीच्या अंधारात ती महासती कौशिकपत्नी आपल्या पतीला घेऊन वेश्येकडे निघाली. मार्गांत एक चमत्कार घडला. त्याच नगरात चुकीने चोर समजून सुळी दिलेले मांडव्य ऋषी सुळावर यातना भोगीत होते. त्यांना या कौशिकाचा धक्का बसला. तत्क्षणीं, मांडव्य ऋषींनी कौशिकाला शाप दिला की, “तू सूर्योदयापूर्वी मरण पावशील.” हे शापवचन ऐकताच कौशिकपत्नीने आपल्या पातिव्रत्याच्या प्रभावाने सूर्योदयच थांबविला. त्यामुळे सबंध विश्वचक्रच बिघडले. सर्व देव धावरून गेले. विश्वाला वाचविण्यासाठी ब्रह्मदेवाने सती अनसूयेकडे मध्यस्थी करण्यासाठी विनंती केली. अनसूयेने कौशिकपत्नीला अभय देऊन सूर्योदय घडवून आणला आणि सूर्योदय झाल्यावर मांडव्याच्या शापामुळे मृत झालेल्या कौशिकास आपल्या पातिव्रत्याच्या बलाने पुनः जिवंत केले. अनसूयेवर सर्व देव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला, “तुझ्या पोटी तीन देव जन्म घेतील.” त्या वरदानाचे फलित म्हणून श्री दत्तात्रेयांचा अवतार झाला.
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
संदर्भ : श्रीदत्तात्रेय-ज्ञानकोश ( लेखक : डॉ. प्रल्हाद नरहर जोशी )
No comments:
Post a Comment