Jan 28, 2022

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - गोकर्णमहाबळेश्वरप्रतिष्ठापन


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार षष्ठोऽध्यायः

कथा असी परिसून । नामधारक करी प्रश्न । म्हणे सर्व क्षेत्रें त्यजून । ये गोकर्णक्षेत्रीं कां हा ॥१॥ शैव धर्में रावणमाता । कैलासाची धरुनि चिंता । मृण्मयलिंग पूजितां । ये श्रीमत्ता सुता खेद ॥२॥ तो आश्‍चर्य मानून । म्हणे कैलास आणून । देतों, दे ही माती त्यजून । असें म्हणून चालिला ॥३॥ बळें मूळासह कैलासा । उचलितां हाले सहसा । भिऊनी गौरी वदे गिरिशा । प्रळय कसा हा वारीं ॥४॥ तैं कैलासा चेपी हर । खालीं रगडे निशाचर । मरणोन्मुख हो करीं स्तोत्र । तेणें हर प्रसन्न हो ॥५॥ त्वदन्य न मला त्राता । तूंचि माझा प्राणदाता । दयाळू तूं राखें आतां । असें म्हणतां सोडी शंभू ॥६॥ त्वां अनुमान न करितां । शिवा सोडविलें आतां । असें म्हणूनी तो गीता । गाता झाला सप्तस्वरें ॥७॥ गायी संम्यक्‌ रागरागिणी । निजशिर छेदुनि । त्याचा वीणा करुनी । काल साधुनि प्रेमानें ॥८॥ शिव तयाच्या गाण्यासी । भुलोनी ये तयापाशीं । आत्मलिंग देऊनि त्यासी । म्हणे होसि तूंचि शंभू ॥९॥ ये हाता अमरता । तीन वर्षें हें पूजितां । लंका कैलासचि ताता । होईल आतां निःसंशय ॥१०॥ अवनिवरी मध्यें जरी । ठेवितां न ये करीं । येणेंपरी नेई पुरीं । काय करिसी कैलासा ॥११॥ शिवा करुनी नमन । पुरा जाई रावण । त्वरें नारद जाऊन । करी कथन सर्व इंद्रा ॥१२॥ अधर्मा त्या जाणून । इंद्र ब्रम्ह्या दे सांगून । तोही विष्णूसी कथून । ये घेऊन शिवाप्रती ॥१३॥ त्या अनुचितकर्मे हर । पश्चात्तापें म्हणे विसर । पडला झाला पाव प्रहर । गेला क्रूर येथोनियां ॥१४॥ देव बंदींत पडले । विष्णू म्हणे तुज कळलें । तरी कां हें असें केलें । जड ठेलें पुढें मज ॥१५॥ जो आधी मारी जीव । तया केला चिरंजीव । वरदान सांगे शिव । म्हणे उपाय करीं तूं ॥१६॥ ऐसें निगुती ऐकून । नारदा दे पाठवून । विष्णू करावया विघ्न । धाडी विघ्नविनायकांते ॥१७॥ मुनी मनोवेगें तया । गांठुनी लोटी काळ वायां । धाडी संध्या करावया । गणराया तंव आला ॥१८॥ त्या मानुनी ब्रह्मचारी । तो न घेतां त्याचे करीं । रावण दे लिंग तरी । अवधारी म्हणे बटू ॥१९॥ स्वपोष्य मी अतिदीन । तीन वार बोलावीन । जड होतां खालीं ठेवीन । दोष ने मग मला ॥२०॥ स्वर्गलोकीं सुर पाहतां । बोलावी त्या अर्घ्य देतां । तीन वेळ तो न येतां । तो स्थापिता झाला लिंग ॥२१॥ त्यानें केलें तें स्थापन । रावणा न हाले म्हणून । महाबळी हो गोकर्ण । क्षेत्र जाण भूकैलास ॥२२॥
॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे गोकर्णमहाबळेश्वरप्रतिष्ठापनं नाम षष्ठोऽध्यायः ॥

सिद्धमुनींनी दत्तप्रभूंच्या प्रथम अवताराची अर्थात श्रीपादांची जन्मकथा नामधारकांस सांगितली. कथेच्या अखेरीस, जनकल्याणार्थ अनेक तीर्थक्षेत्रयात्रा करीत, तसेच अधिकारी शिष्यांना दीक्षा देत देत श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्ण क्षेत्रास आले हे ही सविस्तर सांगितले. हा कथाभाग ऐकून, नामधारकास उत्सुकता वाटली आणि त्याने सिद्धमुनींना प्रश्न विचारला," स्वामी, त्रिमूर्ती दत्तावतार अनेक तीर्थक्षेत्रीं गेले. मात्र, गोकर्ण क्षेत्राचे विशेष असे काय महात्म्य आहे ? इतर अनेक अतिपावन तीर्थे असतांना, तिथे न राहतां श्रीपाद गोकर्णक्षेत्रींच का आले ? हे मला सविस्तर सांगा." आपल्या शिष्याच्या या प्रश्नाने संतोष पावलेले सिद्धमुनी गोकर्ण क्षेत्राचा महिमा सांगू लागले. - गोकर्ण क्षेत्रीं प्रत्यक्ष श्रीशंकरांचे आत्मलिंग आहे आणि त्याची प्रतिष्ठापना गणपतीने केली आहे, त्यांमुळे त्रैमूर्तींचे निर्गुण स्वरूपांत तिथे वास्तव्य असते. या अतिपवित्र स्थानाच्या उत्पत्तीचे आख्यान असे की लंकाधिपती रावणाची माता कैकसी (श्री गुरुचरित्राध्यायात हिचा उल्लेख कैकया असा आला आहे.) ही परम शिवभक्त होती. नित्य शिवलिंग पूजनाचे तिचे व्रत होते, शिवार्चन होईपर्यंत ती अन्नग्रहण करीत नसे. एकदा, शिवलिंग न मिळाल्यामुळे तिने मृत्तिकेचे लिंग तयार केले आणि मोठ्या भक्तिभावाने ती त्याचे पूजन करू लागली. तेव्हा, दशमुख रावण आपल्या मातेच्या दर्शनासाठी तिथे आला होता. लंकेसारख्या अत्यंत समृद्ध राज्याचे आपण सार्वभौम अधिपति आहोत, आणि तरीही आपली आई एका मृण्मय शिवलिंगाचे पूजन करत आहे, हे पाहून रावणास विषाद वाटला. आपल्या वैभवाचा, पराक्रमाचा रावणाला अत्यंत गर्व होता. त्याने कैकसीला वंदन केले आणि म्हणाला, " माते, या शिवलिंगाच्या पूजनाने काय फलप्राप्ती होते ? " त्यावर, " मी कैलासपदाच्या प्राप्तीसाठी हे व्रत करत आहे." असे कैकसी उत्तरली. आपल्या मातेची ही काम्यव्रत उपासना ऐकून रावणाने अहंकारयुक्त स्वरांत प्रतिज्ञा केली, " एव्हढेच ना ! तू उगाच कष्ट का करतेस ? मी कैलासासह उमा-शंकर आपल्या लंकेत घेऊन येतो. यापुढे, तू या मृत्तिकालिंगाचे पूजन करू नकोस. " असे म्हणून तो क्रूर असुर त्वरेनें तेथून निघाला. मनोवेगाने तो थेट कैलास पर्वतापाशी आला आणि आपल्या वीस बाहूंचे बळ लावून, धवलगिरी कैलास क्रोधाने हलवू लागला. आपली दहा शिरें कैलासाला टेकून, त्याने तो पर्वत उचलला. तेव्हा, वैकुंठ, सप्तपाताळे, स्वर्गादि इतर लोक डळमळू लागले. सर्व शिवगण, सूर भयभीत झाले. जगन्माता गिरिजाही भयचकित होऊन श्री महादेवांकडे गेली आणि म्हणाली, " हे कैलासनाथा, इथे जणू काही प्रलयकालच आला आहे, असे भासत आहे. हे शूलपाणी, तुम्ही तत्काळ या अनर्थाचे निवारण करा. आमचे रक्षण करा." उमेची ही विनवणी ऐकून महादेवांनी आपल्या डाव्या हाताने कैलास पर्वताला दाब दिला. त्यामुळे रावणाची दहाही मस्तकें आणि वीस बाहू त्या महाकाय पर्वताखाली अडकले. अशा अतीव कष्टदायी स्थितीत अडकलेला, मरणोन्मुख रावण सदाशिवास पूर्णपणे शरण आला, आणि स्वतः रचलेले शिवस्तुतीपर स्तोत्र तो अत्यंत आर्ततेने गाऊ लागला. त्याने श्री शंकरांची, ' हे पिनाकपणे, मी तुला अनन्य शरण आलो आहे. तुझ्याशिवाय मला अन्य कोणीही त्राता नाही. सर्व जगताचे रक्षण करणाऱ्या श्री शंकरा, तूच माझे सर्वस्व आहेस. तुझ्या या भक्ताला मरण कसे येईल बरें ? हे दयाळा, या दीन शरणागतास अभय दे.' अशी प्रार्थना केली. भोळा चक्रवर्ती शम्भोमहादेव प्रसन्न झाला. त्याने डाव्या हाताचा दाब काढून टाकला आणि कैलासखाली अडकलेल्या रावणाची सुटका केली. आपण अक्षम्य अपराध केला असतांनादेखील कैलासपतीने आपल्याला जीवदान दिले, हे पाहून रावणाने शंकरांची अपार स्तुती केली. त्याने आपले एक मस्तक कापून त्याला आपल्या आतड्याचे तंतू जोडले. असे पूर्ण समर्पणभावाने तयार केलेले ते तंतुवाद्य तो वाजवू लागला आणि गण, रस आणि सप्तस्वरयुक्त असे गायन करू लागला. पार्वतीपती श्रीशंकराची भक्ती निर्वाणरुप कशी आहे, हे तो लंकानाथ छत्तीस राग-रागिण्यांमध्ये गाऊ लागला. त्याच्या भावभक्तीमुळे प्रसन्न झालेला शिव, पंचमुख-दशवदन या स्वरूपांत रावणासमोर प्रगट झाला आणि त्याने वर मागण्यास सांगितले. तेव्हा, शंकरास साष्टांग प्रणिपात करून रावण म्हणाला, " हे ईश्वरा, कैलासप्राप्तीसाठी तुझी नित्य पूजा करण्याचे माझ्या मातेचे व्रत आहे. त्यासाठी हा कैलास पर्वत मला लंकेस घेऊन जाता यावा." रावणाचे ते मागणे ऐकून चंद्रमौळी म्हणाला," भक्ता, माझ्या पूजनासाठी मी तुला माझे प्राणलिंग देतो. याची त्रिकाळ पूजा केल्यास तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या दिव्य आत्मलिंगाची जर तू तीन वर्षे पूजा केलीस, तर तुला ईश्वरस्वरूप अर्थात माझे स्वरूप प्राप्त होईल. तुला अमरत्व येईल आणि निःशंकपणे लंकानगरीच कैलासासमान होईल. मात्र तुझ्या नगरीत पोहोचेपर्यंत हे दिव्य लिंग कोठेही भूमीवर ठेवू नकोस. या आत्मलिंगाच्या पूजनाचे एव्हढे फळ मिळणार असेल तर आता हा कैलास नेण्याचे कष्ट का घेतोस ?" शिवाचे ते आत्मलिंग प्राप्त झाल्यामुळे रावण अत्यानंदित झाला, त्याने शंकरांस पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार केला आणि तात्काळ, तो लंकानगरीकडे प्रयाण करता झाला. ही सर्व वार्ता देवर्षी नारदमुनींना कळली आणि जगत्कल्याणासाठी, अत्यंत त्वरेनें त्यांनी ती देवराज इंद्रास सांगितली. श्रीशंकरांच्या वरदानामुळे रावण अजरामर होऊ शकतो, लंकानगरीच कैलासासम होईल, हा अधर्म आहे, हे लक्षांत घेऊन इंद्राने हे वृत्त लगोलग ब्रह्मदेव आणि श्रीहरी विष्णुंस कथन केले. मग, नारद, इंद्रादि सुरगणांसहित ब्रह्मदेव आणि विष्णू कैलास पर्वतावर आले. व्यथित झालेले नारायण शंकरास म्हणाले, " महादेवा, रावण हा एक क्रूर दैत्य आहे. सर्व देव-देवता त्याच्या बंदिवासात आहेत. आता जर तुमच्या आत्मलिंग पूजनाच्या फलस्वरूप तो ईश्वर झाला तर मी रामावतारात त्याचा वध कसा करू शकेन ? त्या दुष्ट दैत्याचे निर्दालन करण्याऐवजी तुम्ही त्याला चिरंजीव होण्याचे वरदान दिले. या सृष्टीची घडी आता बिघडून जाईल." तेव्हा शंकर म्हणाले, " त्याच्या भावभक्तीला मी भुललो आणि हे अनुचित कृत्य माझ्या हातून घडले. तो दैत्य प्रबळ आणि अमर झाला तर मोठाच अनर्थ होईल, याचा मला विसर पडला. तो क्रूर दैत्य जाऊन आता साधारण पाव प्रहर झाला असेल. अजूनही तो लंकेत पोहोचला नसेल. तेव्हा हे ऋषिकेशा, हे वरदान निष्फळ होईल, अशी काहीतरी तू उपाययोजना कर." हे शिववचन ऐकून, श्रीविष्णूंनी त्वरित नारदाला बोलावले आणि " देवर्षी, रावणास लंकेत पोहोचण्यास विलंब होईल, एव्हढे कार्य तुम्ही करा. मी माझ्या सुदर्शनचक्राने सूर्यास झाकतो, म्हणजे संध्याकाळ झाली आहे असे वाटेल. तुम्ही रावणास गाठून सायंसंध्या करण्यास सांगा." असे सांगितले. ते ऐकून नारद त्वरेने लंकाधीशाच्या शोधार्थ निघाले. त्यानंतर, श्रीविष्णूंनी विघ्न करण्यासाठी गणेश्वराला पाठवले. लगोलग, गौरीहरपुत्र बटूचा वेष घेऊन निघाला. इकडे, नारदमुनींनी रावणास गाठले आणि त्याला प्राप्त झालेल्या शिव आत्मलिंगाचे माहात्म्य सांगू लागले. तोवर श्रीहरीने सुदर्शन चक्र सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. रावणासही लवकरांत लवकर लंकेस पोहोचायचे होते, त्यामुळे त्यांनी नारदाची अनुज्ञा मागितली. तेव्हा, नारद म्हणाले, " आता सूर्यास्ताची वेळ झाली आहे. दशानना, तू तर वेदज्ञानी ब्राह्मण आहेस. तू सायंसंध्या करणार नाहीस का ? ब्राह्मणाने शक्यतो संध्येची वेळ चुकवू नये. मी तर माझे संध्यावंदन आणि नित्यकर्मे उरकून येतो." असा निरोप घेऊन देवर्षी स्नान-संध्येसाठी निघून गेले.
नारदमुनींचे बोलणे ऐकून रावणही आज आपला व्रतभंग होईल, म्हणून थोडा चिंतीत झाला. ' आपले नित्य त्रिकाळ संध्या करण्याचे व्रत आहे, आणि आता तर संध्येची वेळ झाली आहे. मात्र, शंकरांनी हे लिंग भूमीवर न ठेवण्याविषयी सांगितले आहे. आता काय करावें बरे ?' असा तो विचार करू लागला. तेव्हढ्यात बालबटूच्या वेषांतील श्रीगणेश त्याला दिसला. हा बालब्रह्मचारी आपला विश्वासघात करणार नाही, आपण हे शिवलिंग काही काळ त्याच्या हातात देऊन स्वस्थचित्तानें संध्या करावी, असे ठरवून रावणाने त्या बटुवेषधारी गणेशाला जवळ बोलावले आणि संध्यावंदन होईपर्यंत हे लिंग हातात धरण्यास सांगितले. त्यावर श्री गणेश म्हणाला, " मी वनवासी ब्रह्मचारी आहे. मी तर एक लहान बालक असून स्वतःचे पालन-पोषणही करण्यास असमर्थ आहे. हे दिव्य लिंग जड असेल, जर हे माझ्या हातातून खाली पडले तर ?" पण रावणाने त्याची अनेक प्रकारें समजूत घातली. तेव्हा, बालबटू गणपती निर्धारपूर्वक म्हणाला," हे लिंग जर जड झाले तर मी तुम्हांला तीन वेळा हाक मारीन. तरी तुम्ही आला नाही तर मग हे लिंग मी जमिनीवर ठेवीन आणि त्याचा मला दोष लागणार नाही." ते मान्य करून रावणाने ते प्राणलिंग बालगणेशाच्या हाती दिले आणि तो संध्या करण्यासाठी नदीतीरावर गेला. त्यावेळी, सर्व सुरवर विमानांत बसून ही गंमत मोठ्या कौतुकाने पाहत होते. इकडे रावण अर्घ्य देत होता, तोच श्रीगणेशाने त्याला आवाज दिला, " हे लिंग फार जड आहे, मी ते फार वेळ हातात धरू शकणार नाही. तू लवकर परत ये." न्यासपूर्वक अर्घ्य घेतांना रावणाने हातानेच खूण करून मी येतोच आहे, असे त्याला सांगितले. काही काळ वाट पाहून, त्या बटूने दोनदा रावणाला बोलावले आणि " हे आत्मलिंग अतिशय जड झाले असून, यापुढें एक क्षणही ते मी हातांत धरू शकत नाही." असे मोठ्या स्वरांत म्हणाला. त्यावेळीं रावण ध्यानस्थ होता, त्याने गणेशाला काहीच प्रतिसाद दिला नाही. तेव्हा, श्रीहरींचे स्मरण करून, समस्त देवादिकांच्या साक्षीने श्रीगणेशाने आपल्या हातातील स्वतःच्या पित्याचे ते दिव्य, आत्मलिंग भूमीवर ठेवले. सर्व सुरवरांनी हर्षोल्हासानें पुष्पवृष्टी केली. लवकरच, लंकेश्वर सांयसंध्या आटपून त्वरेनें तिथे आला. तेव्हा, त्याला महादेवाचे आत्मलिंग भूमीवर स्थित झालेले दिसले. संतप्त झालेल्या त्या महाबली रावणाने प्रचंड जोर लावून ते आत्मलिंग उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु ते जमिनीत अढळपणे स्थिरावले होते. त्या प्रचंड बळानें त्या आत्मलिंगाला गायीच्या कानाचा आकार प्राप्त झाला, पण अथक प्रयत्न करूनसुद्धा ते शिवलिंग रावणाच्या हातात आले नाही. याच कारणांमुळे, ते शिवलिंग ' गोकर्ण महाबळेश्वर ' म्हणून प्रख्यात झाले. खिन्न, निराश झालेला रावण रिक्तहस्तेंच लंकेस परतला. या क्षेत्रीं महादेवाचा अक्षय्य वास असल्याने भूलोकीचे कैलास असा या तीर्थाचा महिमा आहे.
॥ प. प. श्रीद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः
॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

Jan 24, 2022

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - श्रीपादावतारकथन


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार पंचमोऽध्यायः ॥

ये श्राद्धा हीं विप्राघरीं । उत्तरदेशीं भिक्षा करी । श्राद्धापूर्वीं द्विजनारी । दान करी श्राद्धान्नाचें ॥१॥ दत्त विप्रस्त्रीचा भाव । पाहुनी सुत स्वयमेव । झाला श्रीपादराव । गृहभाव स्वीकारीना ॥२॥ विशेष विद्याभिज्ञ झाला । तात आरंभी विवाहाला । पुत्र म्हणे योगश्रीला । वरीं, अबला सर्व माता ॥३॥ निश्चय हा ते ऐकून । खिन्न होती त्यां दावून । त्रिमूर्तीरुप, आश्वासून । बंधू दोन पंग्वंध जे ॥४॥ करी प्रभू त्यांवरी डोळा । चालूं लागला पांगळा । पाहूं लागला आंधळा । अतर्क्य लीला श्रीपादाची ॥५॥ आशीर्वाद देई तयां । काशीपुरा जाऊनिया । बदर्याश्रम पाहुनियां । श्रीपाद ये गोकर्णासी ॥६॥ विमलाः कीर्तयो यस्य । श्रीदत्तात्रेय एव सः । कलौ श्रीपादरुपेण । जयति स्वेष्टकामधुक् ॥७॥ ॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे श्रीपादावतारकथनं नाम पंचमोऽध्यायः ॥ पीठापूर येथे आपळराज नरसिंह राजशर्मा नामक आपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण रहात होता. त्याच्या पत्नीचे नाव सुमती महाराणी होते. ते दाम्पत्य मोठे सदाचरणी आणि भक्तिपरायण होते. त्यांना अनेक पुत्र झाले, पण दुर्दैवाने त्यापैकी केवळ दोनच पुत्र जगले. जे जगले, त्यातील एक जन्मांध तर दुसरा पांगळा होता. या दुःखाचा परिहार व्हावा, व आपल्याला एखादा ज्ञानी, सद्गुणी पुत्र व्हावा यासाठी ते पती-पत्नी ईश्वराची सश्रद्धेने उपासना करीत होते. एकदा महालय अमावास्येच्या दिनीं त्यांच्या घरीं पितृश्राद्ध होते. त्यावेळीं, श्रीदत्तात्रेय अतिथीवेषात त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले आणि त्यांनी ' भवति भिक्षां देहि ' अशी साद दिली. घरीं श्राद्धाला बोलाविलेले ब्राह्मण अद्यापि जेवायचे होते, तरीही माध्यान्हकाळी आलेल्या त्या अतिथीला सुमतीने श्राद्धान्नाची भिक्षा वाढली व भक्तिभावाने नमस्कार केला. तिचा अभ्यागत-सेवाभाव पाहून अवधूत प्रसन्न झाले. आपले त्रिमूर्तींचे गूढ रूप प्रगट करून तिला म्हणाले," माग माते जे इच्छिसी । जे जे वासना तुझे मन पावसी । पावसी त्वरित म्हणतसे ॥ अर्थात, " माते, तुझें काही मागणे असेल तर तू मला सांग. तुझ्या इष्ट कामना अवश्य पूर्ण होतील." तेव्हा, पुन्हा एकदा श्री दत्तप्रभूंना चरणवंदन करून सुमती म्हणाली, " प्रभू, तुम्ही मला आई म्हणून हाक मारली, हेच आपले वचन सिद्ध करा. मला तुमच्यासारखा विश्ववंद्य, तेजस्वी, आणि परमज्ञानी पुत्र व्हावा." तिची ही प्रार्थना ऐकून दत्त महाराजांनी स्मित केले आणि तथास्तु असा आशीर्वाद देत म्हणाले, " तुला एक तपस्वी, तुमच्या कुळाचा उद्धार करणारा पुत्र होईल. एक मात्र सदैव लक्षात ठेव - असावें तुम्हीं त्याचिया बोलीं, अर्थात तुम्ही तो जे काही सांगेल, त्याप्रमाणेच वागा." आणि प्रभू अंतर्धान पावले. यथावकाश, श्री दत्तप्रभूंनी आपले वरदान सत्य केले. सुमतीला एके शुभदिनी ( भाद्रपद शुक्ल चतुर्थी ) पुत्र झाला, प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय आपळराज-सुमती यांच्या कुळात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेते झाले. श्रीपादांच्या बाललीलांनी त्यांचे माता-पिता सुखावले. श्रीपाद सात वर्षांचे झाल्यावर आपळराजाने त्यांचे यथाशास्त्र मौंजीबंधन केले. असामान्य, प्रगल्भ बुद्धिमत्ता असलेले श्रीपाद वेदपठण, तसेच मीमांसा, तर्क आदि शास्त्रांत लवकरच पारंगत झाले. पुढें, तें सोळा वर्षांचे झाल्यावर त्यांचे पिता, आपळराज श्रीपादांचा विवाह करण्याचा विचार करू लागले. तेव्हा, श्रीपाद म्हणाले, "तात, मी तापसी व ब्रह्मचारी आहे. योगश्री म्हणजेच वैराग्य हीच माझी पत्नी आहे. माझे नावच श्रीवल्लभ आहे. इतर सर्व स्त्रिया मला मातेसमान आहेत. मी आता तप करण्यासाठी उत्तर दिशेला जाणार आहे." श्रीपादांचा, आपल्या पुत्राचा हा निश्चय ऐकून आपळराज-सुमती दोघेही खिन्न झाले. पुत्रस्नेहाने ते व्याकुळ झाले. तत्क्षणीं, सुमतीला श्रीदत्तप्रभूंचे वचन आठवले. स्वतःला अति कष्टाने सावरत ती म्हणाली," पुत्रा, तू आमचा प्रतिपाळ करशील, अशी आम्हाला आशा होती. पण आम्ही तुला अडवणार नाही." आणि आता पुत्रवियोग होणार या दुःखाने तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हा, श्रीपादांनी आपल्या माता-पित्यास त्रिमूर्ती स्वरूपांत दर्शन दिले आणि आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृतमय दृष्टीने पहिलें अन काय आश्चर्य ! पांगळा बंधू चालू लागला व आंधळ्या भावास दृष्टी प्राप्त झाली. श्रीपादांची लीला खरोखर अनाकलनीय होती. श्रीपादांनी आपल्या सहोदरांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्यांना शुभाशीर्वाद दिला. त्यानंतर, आपल्या माता-पित्याची अनुमती मागत ते म्हणाले, " माझी अवज्ञा न करता मला निरोप द्या." पुढें, श्रीपाद श्रीवल्लभ काशीक्षेत्री गेले. तेथून बदरिकाश्रमात जाऊन त्यांनी तेथे श्रीनारायणाचे दर्शन घेतले. त्यानंतर आपले ज्ञानमार्गाचे अवतार कार्य करण्यासाठी ते तीर्थस्थानी भेट देऊ लागले. अनेक भक्तांना दीक्षा देत देत, ते गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रीं आले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचे अवतार वर्णन करतांना श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराज म्हणतात - दिगंत कीर्तिमान आणि शुद्ध सत्त्वमय श्री दत्तात्रेयच या कलीयुगात आपल्या भक्तांच्या इष्ट मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ रुपाने प्रगटले आहेत. संत-सज्जनांचे रक्षण करण्यासाठी, दुर्जनांचा विनाश करण्यासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे धर्माची पुन्हा नीट घडी बसविण्यासाठी भगवंताचे अवतार होतात. दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवंत जेव्हा अवतरित होतात, त्या अवतारांत रजोगुणाचा अंश येतो. मात्र श्री दत्तप्रभूंच्या अवतारांचे वैशिष्ट्य असे की साधक, उपासक, योगीपुरुष, तसेच भक्त यांची साधनामार्गातील प्रगती करून देण्याचे कार्य दत्तावतारी अवधूत करतात. याचकरिता, श्री दत्तात्रेयांचे स्वरूप शुद्धात शुद्ध असे मानले जाते.
श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरित्रग्रंथ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत. या अक्षरसत्य ग्रंथामध्ये श्रीपाद स्वामींच्या जन्माचे विस्तृतपणें वर्णन केले आहे. आपळराज आणि सुमती यांच्या पूर्वजन्मीच्या दत्तभक्तीचे, पुण्यकर्मांचे फलित म्हणूनच त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांचे माता-पिता होण्याचे सद्भाग्य लाभले होते. त्या सत्शील दाम्पत्याचा पूर्वजन्म वृत्तांत थोडक्यात असा - पूर्वयुगीं सह्य पर्वताजवळील माहूर गांवी विष्णुदत्त नामक कर्मनिष्ठ ब्राह्मण रहात होता. तो श्री दत्तप्रभूंचा भक्त होता. त्याची पत्नी सोमदेवम्मा ( श्री दत्तमाहात्म्यात हिचे नाव सुशीला असे आले आहे.) थोर पतिव्रता होती. साक्षात श्री दत्तात्रेय त्या ब्राह्मणाच्या गृही दर्श श्राद्धदिनीं भोजन करण्यासाठी आले होते. त्या पंक्तीला श्री सूर्यनारायण आणि अग्निदेवही यांनीही भोजन स्वीकारले होते. त्यावेळीं, या तीनही देवतांचे उत्तमोत्तम आशीर्वाद त्या धर्मपरायण ब्राह्मण पती-पत्नीस मिळाले होते आणि त्यांच्या पितरांनाही सद्गती प्राप्त झाली होती. पुढें, याच पती-पत्नींनी पीठापुरी आपळराज आणि सुमती म्हणून पुन्हा जन्म घेतला होता. सुमतीचे अहोभाग्य असे की या जन्मींदेखील सुमतीला पुनःश्च श्री दत्तप्रभूंचे दर्शन घडले होते आणि भक्तकामकल्पद्रुम श्री दत्तात्रेय, आपळराज-सुमती यांचा पुत्र म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेते झाले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थी रोजी सूर्योदयाच्या वेळी झाला. या अवताराचे वेगळेपण अथवा असाधारणत्व असे की श्रीपादांचा जन्म मातेच्या उदरातून सामान्य मुलासारखा न होता, दिव्य ज्योतीरूपाने झाला. त्यावेळी प्रसूतिगृहात मंगल वाद्ये वाजू लागली. पवित्र अशा वेदमंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला. त्यांच्या जन्मानंतर सतत नऊ दिवस, तीन फणा असलेला नाग त्यांच्या मस्तकी छत्र धरीत असे. भक्तजनरक्षणार्थ श्रीगुरुनाथ या भूतलावर अवतरला होता. 

॥ प. प. श्रीद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः
॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

Jan 22, 2022

विश्वव्यापी परात्मा यो नानारूपधरोsप्यज:


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥ श्री नृसिंहसरस्वत्यै नमः

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


दत्तात्रेयगुरु श्रीपादश्रीवल्लभ पुढे रुप श्री नृसिंहमुनि । तेचि श्रृंखला अवतरली रुपे अक्कलकोट स्वामी अर्थात अत्रि-अनसूया यांच्या पुत्ररूपांत अवतरित झालेले श्री दत्तात्रेय जगत्कल्याणासाठी पुन्हा श्रीपादश्रीवल्लभ, श्री नृसिंहसरस्वती आणि श्री स्वामी समर्थ महाराज ( अक्कलकोट ) म्हणून प्रकट झाले, अशी दत्तभक्तांची दृढ श्रद्धा आहे. पूर्वावतारांच्या चरित्रग्रंथांचे पठण, चिंतन केल्यानंतरच श्री स्वामींच्या लीलांचा खरा अर्थ उमगतो. भगवान दत्तात्रेयांच्या भक्तांची अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ आणि श्री नृसिंह सरस्वती महाराज एकच असल्याची दृढ श्रद्धा आहे. श्री नरसिंह सरस्वती हिंदू कालगणनेनुसार १३०० साली, (इ. स. १३७८) प्रकट झाले. आपले अवतारकार्य समाप्त झाल्यावर त्यांनी साधारण १३८० साली (इ. स. १४५९) श्री शैल्यगमन केले. श्री शैल्य पर्वताच्या रम्य परिसरांत, ते तीनशे वर्षे समाधी अवस्थेत होते. त्यानंतर, त्यांचे प्रथम प्रगटीकरण कर्दळीवनात झाले. पुढें, त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रीं भ्रमण केले तरी ' गाणगापूर आपले मुख्य स्थान आहे, यास्तव त्याचेच नजीक वास करून अवतारकार्य पूर्ण करावे.' याच संकल्पूर्तीसाठी श्री स्वामी समर्थ यांनी अक्कलकोटी वास केला. श्री स्वामी समर्थ पूर्ण दत्तावतार होते, याची अनेक दत्तभक्तांना अनुभूती आली आहे.  
श्रीस्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये असताना, त्यांची कीर्ती ऐकून एक युरोपियन वकिल त्यांच्या दर्शनासाठी आला. त्यावेळी, त्या वकिलाचा एक पारशी मित्र अक्कलकोट येथे होता. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी अक्कलकोट स्वामी महाराजांना विचारले, “ स्वामी, तुमचे मूळ स्थान कुठले आहे ? " त्यावर श्रीस्वामी महाराजांनी उत्तर दिले, “ सर्वप्रथम मी श्रीशैल पर्वतावरील कर्दळीवन येथे प्रगट झालो. या पृथ्वीतलावर तीर्थाटन करत करत कोलकता या शहरात गेलो. बंगालमध्ये भटकत असताना मला काली मातेचा आशीर्वाद मिळाला. त्यानंतर, गंगामातेच्या तीरावर भटकत मी हरिद्वार, केदारनाथ, गंगोत्री, बद्रीनाथ, अयोध्या, द्वारका अशा असंख्य पवित्र क्षेत्रांना भेट दिली. पुढें, मी गोदावरी नदीच्या काठी पोहोचलो. त्यानंतर मी हैदराबादला येथे आलो. तिथे काही काळ राहून मी मंगळवेढा येथे प्रयाण केले. मंगळवेढ्यास मी बरेच वर्षे वास्तव्य केले. मग पंढरपूर, बेगमपूर, व सोलापूर फिरून मोहोळ गावात पोहोचलो. काही दिवसांनी मी इथे या अक्कलकोट नगरीत आलो. तेव्हापासून माझे इथेच वास्तव्य आहे."
साधारण असाच प्रश्न पुणे येथील कर्वे नावाच्या एका भाविकाने विचारला असता, त्यावेळी अक्कलकोटवासी श्री स्वामी समर्थ उत्तरले, “ मी काश्यप गोत्री, यजुर्वेदी ब्राह्मण आहे. माझे नाव नरसिंहभान असून आमची रास मीन आहे. "
गाणगापूर हे श्री नृसिंह सरस्वतींचे प्रमुख स्थान आहे. एकदा गाणगापूरचा एक भक्त अक्कलकोटला आला असता, श्रीस्वामी समर्थांनी त्याला विचारले, “ तू कोणत्या देवाची आराधना करतोस? " त्यावर तो भक्त अतीव श्रद्धेने म्हणाला, “ माझे आराध्य दैवत श्री क्षेत्र गाणगापूरस्थित श्री नृसिंह सरस्वती आहेत. ” त्याचे ते उत्तर ऐकून श्रीस्वामी हसत म्हणाले, " माझेही नाव नरसिंहभान आहे, बरं का ?"
असेच एकदा श्री नरसिंह सरस्वतींच्या दीर्घकाळ वास्तव्याने पावन झालेले आणि दत्तसंप्रदायातील जागृत पुण्यक्षेत्र, श्रीनृसिंहवाडी येथील काही लोक श्री स्वामी समर्थांचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी अक्कलकोटला आले होते. तेव्हा, त्यांनी विचारले, “ स्वामी, तुम्ही कोण आहात ?" त्यावर स्वामींनी उत्तर दिले, “ मूळपुरुष, वटवृक्ष, दत्तनगर ! ” विशेष नवलाईची गोष्ट ही की स्वत: श्री नृसिंह सरस्वती यांनीच आपल्या या भक्तांना दृष्टांत देऊन अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाण्यास सांगितले होते. 
मुंबईत श्रीकृष्णबुवा ऊर्फ ठाकूरदासबुवा नावाचे एक दत्तोपासक होते. प्रारब्धयोगानें, त्यांना कुष्ठरोग झाला. अनेक वर्षे उपाय करूनही व्याधीस उतार पडला नाही. अखेर निराश होऊन यापुढें आपण काशीक्षेत्री वास करावा, असा त्यांनी निश्चय केला. तत्पूर्वी, आपल्या आराध्यदैवताचे, श्री दत्तपादुकांचे गाणगापूर येथे जाऊन अखेरचे दर्शन घ्यावें म्हणून ते श्री क्षेत्र गाणगापुरांस आले. श्री नरसिंह सरस्वतींच्या निर्गुण पादुकांवर अर्पण करण्यासाठी उत्तम कस्तुरी त्यांनी आपल्याबरोबर आणली होती. दर्शन घेऊन त्यांनी पादुकांचे यथासांग पूजनही केले. मात्र, त्यावेळीं बुवा कस्तुरी अर्पण करण्यास विसरले. त्याच रात्री त्यांना, " अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यावे, म्हणजे तू व्याधीमुक्त होशील " असा श्री दत्तप्रभूंचा स्वप्नदृष्टांत झाला. त्यानुसार, ते अक्कलकोटला आले. श्री स्वामी समर्थांच्या चरणी मस्तक ठेवून बुवांनी दर्शन घेतलें. तत्क्षणीं, श्रीस्वामी महाराज बुवांकडे पाहून म्हणाले, “ हमारी कस्तुरी अभी के अभी लाव !” अशारितीने, श्री स्वामी समर्थांनी अंत:साक्षित्वाची प्रचिती ठाकूरदासबुवास दिली.   
गोविंदराव टोळ नावाचे एक गृहस्थ पोटशूळाच्या व्याधीने अतिशय त्रस्त होते. त्यांचे वडील चिंतोपंत टोळ हे श्री स्वामी समर्थांचे भक्त होते. आपल्या पित्याच्या आग्रहास्तव ते अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी आले खरें, मात्र गोविंदरावांची श्रीस्वामी समर्थांवर श्रद्धा नव्हती. त्यामुळे, स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी गाणगापूरला जाण्याचे ठरविले होते. अनेक श्री समर्थभक्तांनी परोपरीने सांगूनही ते गाणगापूरला गेले. तेथे सुमारें अडीच वर्षे राहून त्यांनी श्री नृसिंह सरस्वती महाराजांची उपासना केली. अखेर, श्री दत्तप्रभूंचा दृष्टांत झाल्यावर ते अक्कलकोटला परतले आणि श्री स्वामी समर्थांची भक्तिभावाने सेवा करू लागले. पुढें, लवकरच त्यांची व्यथा दूर झाली. 
एकदा, गोविंदराव यांनी श्रीस्वामींना विचारले, “ भीमा-अमरजा संगमावरही आपले वास्तव्य असते का? " त्यावर प्रसन्नपणे स्मित करत श्रीस्वामी वदले, “ होय, मी त्याक्षेत्रीही आहे. ” त्यानंतर काही दिवसातच गोविंदरावांना शुभ स्वप्न पडले. त्यांना गाणगापूर येथील निर्गुण पादुकांच्या स्थानीं श्री स्वामी समर्थ दिव्यरुपांत विराजमान आहेत आणि त्यांनी श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका धारण केल्या आहेत, असे दिसले.

दत्तभक्तहो, श्रीगुरुमहिमा काय पुससी । अंनतरुपें होतीं परियेसीं । विश्वव्यापक परमात्मा ॥ या वेदवचनाचीच ही प्रचिती नव्हें काय ?

श्री स्वामी समर्थार्पणमस्तु
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ श्री गुरुदेव दत्त ॥

Jan 21, 2022

श्रीमत् आद्यशङ्कराचार्यविरचितं नर्मदाष्टकं


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥ नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

॥ हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे


सबिन्दुसिन्धुसुस्खलत्-तरङ्ग-भङ्गरञ्जितं । द्विषत्सु पापजातजातकादिवारिसंयुतम् ॥ कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे । त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥१॥ त्वदम्बुलीनदीनमीनदिव्यसम्प्रदायकं । कलौ मलौघभारहारिसर्वतीर्थनायकम् ॥ 

सुमत्स्यकच्छनक्रचक्रवाकचक्रशर्मदे । त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥२॥
महागभीरनीरपूरपातधूतभूतलं । ध्वनत्समस्तपातकारिदारितापदाचलम् ॥ जगल्लये महाभये मृकण्डुसूनुहर्म्यदे । त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥३॥ गतं तदैव मे भयं त्वदम्बु वीक्षितं यदा । मृकण्डुसूनुशौनकासुरारिसेवितं सदा ॥ पुनर्भवाब्धिजन्मसम्भवाब्धिदुःखवर्मदे । त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥४॥ अलक्ष्यलक्षकिन्नरामरासुरादिपूजितं । सुलक्षनीरतीरधीरपक्षिलक्षकूजितम् ॥ वसिष्ठशिष्टपिप्पलादिकर्दमादिशर्मदे । त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥५॥


सनत्कुमारनाचिकेतकश्यपात्रिषट्पदैः धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदैः  
रवीन्दुरन्तिदेवदेवराजकर्मशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥६॥

अलक्षलक्षलक्षपापलक्षसारसायुधं
। ततस्तु जीवजन्तुतन्तुभुक्तिमुक्तिदायकम् ॥ विरिञ्चिविष्णुशंकरस्वकीयधामवर्मदे । त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥७॥ अहो धृतं स्वनं श्रुतं महेशिकेशजातटे । किरातसूतवाडवेषु पण्डिते शठे नटे ॥ दुरन्तपापतापहारि सर्वजन्तुशर्मदे । त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥८॥ इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा । पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा ॥ सुलभ्यदेहदुर्लभं महेशधामगौरवं । पुनर्भवा नरा न वै विलोकयन्ति रौरवम् ॥९॥

॥ इति श्रीमत् आद्यशङ्कराचार्यविरचितं नर्मदाष्टकं सम्पूर्णम् ॥



Jan 16, 2022

॥ श्री आनंदनाथ महाराजकृत श्रीस्वामीचरित्र स्तोत्र ॥


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः


श्रीस्वामीचरित्रस्तोत्र प्रारंभः । आधीं नमूं श्रीसद्‌गुरुनाथा । भक्तवत्सल कृपावंता । तुजवांचूनि या जगीं त्राता । अन्य आतां नसेचि ॥१अवतार घेतला समर्थ । नाम शोभे कृपावंत । पाप जाळूनियां सत्य । भार उतरिला जगतींचा ॥२ मूळ स्वरूप निर्गुण । निराकार नित्य ध्यान । अघटित लीला करूनि जाण । तारिलें जना कौतुकें ॥३ म्हणूनि नमन तुझे पायीं । तुजविण अन्य दाता नाहीं । विश्वव्यापक तूंच पाहीं । ध्याती हृदयीं साधुजन ॥४ रूपारूपासी वेगळा । गुणगुणाच्या निराळा । परी अघटित जगीं कळा । सूत्र हातीं वागवित ॥५ स्वस्वरूपीं निपुण । सादर कराया जगतीं पालन । स्वामीनाम सगुण । उद्धराकारण धरियेलें ॥६ तो दिगंबरवेष द्वैतरहित । दत्तदिगंबर हाची सत्य । भार उतरावया यथार्थ । कलियुगीं समर्थ अवतरला ॥७ दीन जनांचिया पोटीं । पाप जाळूनि तारी संकटीं । नाम जयाचें धरितां कंठीं । मग सृष्टीं भय नाहीं ॥८ ॐ आदिस्वरूपरूपा । ओंकार निर्गुणरूपा । जगव्याप्यव्यापककौतुका । दाखविता सखा तूंचि खरा ॥९ कोण करील तुझी स्तुति। शेष शिणला निश्चितीं । तेथें मानव बापुडे किती । अल्पमती निर्धारें ॥१० सुख करा स्वामिराया । भक्तवत्सला करुणालया । जगतारका तुझ्या पायां । नमन माझें सर्वदा ॥११ मी अन्यायी थोर । परी तूं कृपेचा सागर । जग तारावया निर्धार । सगुण अवतार धरियेला ॥१२ जयजयाजी गुरुनाथा । भक्तवत्सला समर्था । तुजवांचूनि अन्य त्राता । मज आतां पाहतां नसेचि ॥१३ सर्व सुख सगुण । अवतार हाचि पूर्णब्रह्म जाण । जग तारावया कारण । अवतार जाण धरियेला ॥१४ अनंत ब्रह्मांडांचा नायक । तूंचि सखा माझा देख । तुजवांचूनि अन्य कौतुक । नको नको मजलागीं ॥१५ कैसी करावी तुझी स्तुति । हें मी नेणें बा निश्चितीं । चरणीं जडो तुझ्या प्रीती । ऐसें आतां करावें ॥१६ दीन दयाळा गुरुराया । भावें वंदिलें तुझ्या पायां । सोडिली समूळ मोहाची माया । आतां मज वायां दवडू नको ॥१७ हें स्तोत्र तुझें लघुस्थिती । तूंचि बोलविता निश्चितीं । भक्त तारावया गुरुमूर्ती । अवतारस्थिती दाविली ॥१८ दीनवत्सला स्वामिराया । अगाधतेजा करुणालया । अघटित जगतीं तव माया । लीला कौतुक निर्धार ॥१९ निरंजन स्वरूपरूपा । विश्वरूपा आदिरुपा । अक्कलकोटीं दावूनि कौतुका । जगसुखा राहिला ॥२० अक्कलकोटीं जरी जन । अवचित कोणी जातां जाण । उद्धार तया कारण । स्वामिकृपें होय खरा ॥२१ अवधूतवेष निर्धारी । निर्गुण निराकारी । तेज पाहतां थरारी । काळ पोटीं बापुडा ॥२२ वेदीं रूप वर्णिलें निर्धार । तैसी लीला दाविली साहाकार । विश्वविश्वंभर गुरुवर । सद्‌गुरुनाथ स्वामी माझा ॥२३ चरण पाहतां सुकुमार । कैसें पूजावें निर्धार । ठेऊनि प्रेम गादीवर । सत्य सादर पूजावें ॥२४ प्रेम गंगा यमुना सरस्वती । सिंधु कावेरी भागीरथी । तयासी प्रार्थावें निश्चितीं । स्नानालागीं समर्थांच्या ॥२५ मन कलश घेऊनि निर्धार । प्रेम गंगा जलसागर । स्नान घालूनि उत्तरोत्तर । पूजन प्रकार करावा ॥२६ आवडी अक्षता निर्धारीं । सुमन संगती घेऊनि वरी । सद्‌गुरुनाथ पुजावा अंतरी । प्रेमभरी होऊनियां ॥२७ भक्तिची ती साण । वरी नामाचा चंदन । शांती केशर मिळवून । गंध अर्चन समर्थांचे ॥२८ क्षमा धूप दीप निर्धारीं । प्रेम नैवेद्य वरी । भावें समर्पोनि निर्धारीं । सद्गदित अंतरीं होऊनियां ॥२९ क्रोध कापूर जाळावा । प्रेमें स्वामी आळवावा । आवडीचा तो ध्यानीं पहावा । शुद्ध चित्त करूनियां ॥३० ऐसी पूजा झालियावरी । मग प्रार्थावा निजांतरी । हृदयीं उठती प्रेमलहरी । ऐशापरी आळवावा ॥३१ जयजयाजी गुरुराया । जयजयाजी करुणालया । भक्ता दाऊनियां पायां । भवभया निवारिलें ॥३२ जयजयाजी अनंतरूपा । जयजयाजी आदिरुपा । चुकवा चुकवा जन्मखेपा । मार्ग सोपा दाऊनियां ॥३३ जयजयाजी त्रिगुणा । जयजयाजी अवतारसगुणा । पुरवावया मनकामना । जनीं वनीं फिरियेला ॥३४ जयजयाजी दिगंबरा । जयजयाजी सर्वेश्वरा । मज सांभाळा लेंकरा । तुजविण आसरा नाहीं नाहीं ॥३५ जयजयाजी समर्था । स्वामिराया कृपावंता । । तुजविण आम्हां त्राता । नाहीं नाहीं जगत्रयीं ॥३६ शुद्धतेजा तेजरुपा । दिव्य स्वरूपरूपा । चुकवा चुकवा जन्म खेपा । आदिरुपा जगद्गुरू ॥३७ जयजयाजी यतिरुपा । जयजयाजी अघटित स्वरूपा । निर्गुण सगुणरूपा । सच्चिदानंद जगद्गुरू ॥३८ जयजयाजी त्रिगुणरहिता । जयजयाजी त्रिदोषहारका । जयजयाजी ब्रह्मांडनायका । निजभक्त सख्या स्वामिराया ॥३९ जयजयाजी दत्तात्रेया । जयजयाजी करुणालया । जयजयाजी विश्वमाया । संशयभयहारका स्वामिराया ॥४० जयजयाजी आनंदविलासा । जयजयाजी पापतमनाशा । जयजयाजी अवधूतवेषा । भवभयपाश निवारका ॥४१ जयजयाजी निजभक्तपालका । जयजयाजी विश्वव्यापका । निज दासासी सखा । कलियुगीं देखा तूं एक ॥४२ जयजयाजी विराटस्वरूपा । जयजयाजी आदिरूपरूपा । जयजयाजी विश्वव्याप्यव्यापका । मायबापा गुरुराया ॥४३ त्रिलोकीं तूं समर्थ । अवतार तुझाचि यथार्थ । तारक भक्तांलागीं सत्य । गैबीरूप दाऊनि ॥४४ तूं पूर्णब्रह्म जाण । निर्विकार निर्गुण । निरंजनी सदा ध्यान । लीला कौतुक दाविलें ॥४५ तेज पाहतां थरारे । कली मनीं सदा झुरे । विश्वव्यापक व्यापूनि उरे । तारक खरे पतितासी ॥४६ तुजविण आणिक आधार नाहीं । कलियुगीं दुजा आम्हां पाहीं । सद्‌गुरुनाथ तूंचि खरा तोही । अवताररूपें नटलासी ॥४७ लीला दाविली अगाध । शेषा न करवे त्याचा शोध । जें तुम्ही केलें विविध । ज्ञानरूपें जाणविलें ॥४८ अक्कलकोटमहापुरीं । वास केला निर्धारीं । पवित्रक्षेत्र करूनि तारी । पाय ठेऊनि जगतासी ॥४९ तरी जनीं सत्य आतां । अक्कलकोटीं जावें तत्वतां । हित साधावया यथार्था । पवित्र भूमी पैं केली ॥५० हें वचन निर्धार । समर्थांचें असे साचार । बोल बोलवितां उत्तर । स्वामी माझा निर्धारीं ॥५१ अक्कलकोटीं करितां अनुष्ठान । हें स्तोत्र वाचितां एक मास तेरा दिन । शुद्ध चित्त करून । ध्यान सदा समर्थांचें ॥५२ भिक्षान्न निर्धारीं । पवित्र राहे सदा अंतरी । षण्मास वाचितां तरी । महाव्याधी दूर होय ॥५३ एक संवत्सर अनुष्ठान । वटछायेसी करितां जाण । तयासी होईल पुत्र संतान । वचन सत्य समर्थांचें ॥५४ तेरा मासी जोडे धन । चतुर्दश मासीं लक्ष्मीवंत जाण । प्रेमभावें करितां अनुष्ठान । सत्य वचन निर्धार ॥५५ वटपूजा आवडी पूर्ण । तेथेंचि पादुका स्थापून । प्रेमभावें करितां अनुष्ठान । मनोरथ पूर्ण होतील ॥५६ कलियुगीं तारक निर्धारीं । स्वामी माझा सगुण अवतारी । जग तारावया निर्धारीं । सृष्टीवरीं पैं आला ॥५७ तरी सादर सादर मन । ठेऊनि वंदा आतां चरण । पुढें न मिळे ऐसें निधान । मायाबंधन तोडावया ॥५८ नाम घेतां निर्धारीं । स्वामी माझा कैवारी । भवामाजीं पार करी । वचन निर्धारीं सत्य हो ॥५९ आनंद म्हणे तरी आतां । स्वामीराया जी समर्था । भक्तवत्सला कृपावंता । वाचितां जगव्यथा चुकवावी ॥६० हाच देऊनि प्रथम वर । भक्तिपंथ वाढवावा निर्धार । आणिक काहीं ना मागणें साचार । तुजपाशीं दयाळा ॥६१ परोपकार हाचि एक । तुझ्या नामें तारावे लोक । आणिक मागणें तें कौतुक । नाहीं नाहीं सर्वथा ॥६२ विश्व विश्वाकारी । विश्वरूप तूंचि निर्धारीं । चालविता तुजविण तरी । कोण आहे दयाळा ॥६३ तूंचि सर्व सुखदायक । तूंचि कृपा नायक । तुजवांचूनि जगा तारक । नाहीं कोणी सर्वथा ॥६४ आतां न करीं निष्ठुर चित्ता । माय जाणे बालकाची व्यथा । तुजवांचूनि अन्य सर्वथा । माय दुजी न जाणो ॥६५ तूंचि मातापिता सर्वेश्वरू । जगतारक जगदगुरू । नको नको अव्हेरुं लेंकरुं । दीना उदारु तूं एक ॥६६ दीनदयाघन नाम । तुमचें असे हो उत्तम । जग तारावया कारण । स्वामी समर्थ धरियेलें ॥६७ महापूर बोरी पायीं उतरला । मैदर्गीहुनी येतां सोहळा देखिला । अक्कलकोटस्थ जनीं डोळां पाहिला । अघटित लीला समर्थांची ॥६८ प्रेत उंदीर सजीव केला । मुक्यासी वाचा देऊनि बोलविला । अंधासी रत्नें पारखविला । अघटित लीला जगीं तुझी ॥६९ अघटित केलें चमत्कार । किती लिहावे साचार । ग्रंथ वाढेल निर्धार । या भेणें सादर लेखणी आवरिली ॥७० स्वामीचरित्र ग्रंथ निर्धार । पुढें स्वामिराज बोलविल सादर । भक्त तारावया निर्धार । कली जोर मोडोनियां ॥७१ म्हणुनियां आतां लघुचरित्र । स्वामीनाम नामाचें स्तोत्र । जग तारावया पवित्र । लघुस्तोत्र वर्णिलें ॥७२ अक्कलकोटीं बहु लीला । ज्यानें दाखविली अघटित कळा । कोटीमदनमदनाचा पुतळा । स्वरुपीं जयाच्या तुळेना ॥७३ बहु वर्षें एकभूमी वस्ती । एक विचार एक स्थिती । अघटित रूप तें निश्चितीं । जगतालागीं तारावया ॥७४ हे निर्जीव पाटावरी । पादुका उठल्या कलिमाझारी । अजूनि भुली कैशी जगांतरी । तरणोपाया चुकती हे ॥७५ नाम घेतां प्रेमभरीं । हृदय शुद्ध आधीं करीं । दया ठेऊनि अंतरीं । वाच निर्धारीं स्वामिलीले ॥७६ स्वामिपादुकापूजन । नामस्तोत्र भजन । तेणें वंश उद्धारे जाण । कलीमाझारी निर्धार ॥७७ म्हणूनियां आतां । स्वामिनाम आठवावें सर्वथा । तयावीण अन्य वार्ता । तारक नाहीं जगांत ॥७८ अहा सुंदरस्वरूपनिधान । अहा भक्तवत्सल अगम्य ध्यान । सच्चिदानंद आनंदघन । स्वामी माझा दयाळू ॥७९ या प्रपंचमोहाचे काठीं । बुडोनियां जातां रे निकटी । तुम्हां तरावया सुलभ गोष्टी । स्वामिनाम पोटीं धरा ॥८० स्वामिनामाचा प्रताप । पाप जाळूनि करी राख । अपूर्व दाविलें कौतुक । कलीमाजी तरावया ॥८१ तरी आतां शुद्ध करूनि मन । हेंचि जाण संध्यास्नान । दया क्षमा शांती पूर्ण । गुणवर्णन समर्थांचें ॥८२ खोट्याचा जाणूनि सर्व पसारा । तोडी तोडी मायेच्या व्यवहारा । न भुले ह्या दुर्गतीच्या बाजारा । मोहपसारा दूर करोनी ॥८३ मूळबिंदु हा प्रमाण । तेथोनि वाढविता कोण । कोणी केलें हो रक्षण । पिंडालागीं जाण पां ॥८४ कैंची माया कैंचा मोह । कोठें आहे तुझा ठाव । तो आधीं शोधुनी पहा हो । भुलूं नको मानवा ॥८५ मूळ बिंदुरूप प्रमाण । देह झाला बीजा कारण । वाढवोनि करचरण । दीनानाथें अर्पिले ॥८६ तेथें झाली जीवशिवाची वस्ती । तीन गुण गुणांची प्राप्ती । सहा विकारांची स्थिती । मायेसंगती खेळोनिया ॥८७ दया क्षमा शांती विचार । विवेक ज्ञान जागृतीसार । अविद्येची गती निर्धार । सोडोनि भवपार करीतसे ॥८८ धरितां स्वामी नावाची आवडी । घेतां भवामाजीं घाली उडी । नेवोनि भक्तां पैलथडी । पार करी दयाळू ॥८९ नाम जगीं तारक । काय सांगू नामाचें कौतुक । नामें तारिले कितीएक । महापापी कलियुगीं ॥९० नाम घेतां संकट हरे । वारी केल्या पाप सरे । सेवा करितां भवांत तरे । चुकती फेरे चौऱ्यांशीचें ॥९१ अक्कलकोटीं न जातां तरी । वटछायेसी अनुष्ठान करी । तयासीं तारक निर्धारीं । दृष्टांतरूपें स्वामी माझा ॥९२ स्वामींची मूर्ति मनोहर । प्रेमें घेऊनि अयन्यावर । भावें मांडोनि गादीवर । पूजन करावें प्रेमभावें ॥९३ भजनपूजनाच्या रीती । कलीमाजीं जग उद्धरती । प्रेम ठेऊनियां चित्तीं । स्वामी कृपामूर्ति आठवावा ॥९४ काय न करी श्रीगुरुनाथ । सत्य होती शरणागत । भक्ततारक अवतार समर्थ । कलियुगीं यथार्थ अवतरला ॥९५ विश्वव्यापक विश्वंभरू । त्यासी कैंची समाधी निर्धारु । जगीं जगप्रकार दाखवणें साचारु । लीला थोरु समर्थांची ॥९६ द्वैत नाहीं तिळभरी । आशा कैंची अंतरीं । योगमाया दवडिली दुरी । अवतार निर्धारीं स्वामी माझा ॥९७ भक्तांकारणे अक्कलकोटीं । वास केला हो निकटीं । पाय दाऊनियां सृष्टीं । पतित उद्धार करविला ॥९८ अघटित कळा अघटित लीला । पूर्णतेज तेजाचा पुतळा । अगम्य ज्याची अवतार लीला । कलीचा सोहळा मोडावया ॥९९ तरी नामाची संगती । प्रेम ठेऊनी सदा चित्तीं । स्वामी आठवा दिवसरात्रीं । भवामाजी तरावया ॥१०० स्वामीनामाचा सोहळा । धाक पडे कलिकाळा । निजदासासी सांभाळी वेळोवेळां । अवतार सोहळा करूनियां ॥१०१ कलिमाजी तारक । भक्तांसी एकचि नाम देख । स्वामिरायाविण कौतुक । आणिक नको सर्वथा ॥१०२ स्वामिनामाचें कीर्तन । सप्रेमें पादुकापूजन । करितां कलीमाजी जाण । जन उद्धरे निर्धारें ॥१०३ स्वामीपंथ तारक । भव नाशील हा सत्य देख । कलीमाजीं जगतारक । परमसुखदायक उद्भवला ॥१०४ म्हणूनि जनीं आपुल्या हिता । शरण जावें श्रीगुरूनाथा । मुखीं धरोनि स्वामिवार्ता । जन्मव्यथा चुकवावी ॥१०५ ऐसी भुललिया सोय । पुढें नाहीं रें उपाय । भवाचा हा भय । दूर कराया निर्धारीं ॥१०६ तरी सुंदर मानवाची काया । नेवोनि लावा स्वामिपाया । सुखें निवारा भवभया । मोहमाया तोडोनियां ॥१०७ समर्थें दिधलें अभय वचन । जो हें स्तोत्र करील पठण । तयाचे मनोरथ पूर्ण । होतील जाण मज कृपें ॥१०८ येथें धरितां संशय । तयासी भवामाजी भय । पुढें नाहीं ऐशी सोय । सत्य सत्य त्रिवाचा ॥१०९ हें लघुस्तोत्र समर्थांचें । मनोभावें करितां पठण याचें । अर्थ पूर्ण होतील अर्थिकांचे । परमार्थकांसी मोक्षपद ॥११० आनंद म्हणे तरीं आतां । स्वामिचरणीं ठेऊनि प्रीति सर्वथा । प्रेमभावें स्तोत्र गातां । मोक्ष हातां येईल ॥१११ इति श्रीस्वामी प्रार्थनास्तोत्र । हें जगतारक पवित्र । जपामाजिं महामंत्र । अर्थ सादर पुरवावया ॥११२ इति श्रीगुरुस्वामिचरणारविंदार्पणमस्तु राजाधिराज योगीराज श्रीस्वामी समर्थ महाराज की जय

श्रीरस्तु शुभं भवतु