Sep 14, 2026

श्रीपंचश्लोकिगणेशपुराणम्


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये

सर्व दत्तभक्तांना श्री गणेश चतुर्थी आणि 'श्रीदत्तप्रभूंचे संपूर्ण योगावतार' या नांवाने जगतविख्यात असलेले, श्री भगवान दत्तात्रेयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा !!



मयूरेशा, लंबोदरा खळखळू दे मांगल्य झरा
हरी अवकृपा तिमिरा  बा, गजानना, हेरंबा वक्रतुंडा जगन्नायका


श्रीविघ्नेशपुराणसारमुदितं व्यासाय धात्रा पुरा,      तत्खण्डं प्रथमं महागणपतेश्चोपासनाख्यं यथा । संहर्तुं त्रिपुरं शिवेन गणपस्यादौ कृतं पूजनम्,      कर्तुं सृष्टिमिमां स्तुतः स विधिना व्यासेन बुद्ध्याप्तये ॥१॥ भावार्थ - पूर्वी ब्रह्मदेवाने व्यासमुनींना श्रीविघ्नेश अर्थात श्रीगणेश पुराणाचे सार सांगितले होते. श्रीमत महागणपतीच्या पूजेच्या अर्थाचा हा पहिला खंड आहे. त्रिपुराचा नाश करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी प्रथम गणपतीची पूजा केली. तसेच ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण करण्यासाठी आणि तदनंतर व्यासमुनींनी ज्ञानप्राप्तीसाठी श्रीगणरायाची यथोचित स्तुती केली.  सङ्कष्ट्याश्च विनायकस्य च मनोः स्थानस्य तीर्थस्य वै,      दूर्वाणां महिमेति भक्तिचरितं तत्पार्थिवस्यार्चनम् । तेभ्यो यैर्यदभीप्सितं गणपतिस्तत्तत्प्रतुष्टो ददौ,      ताः सर्वा न समर्थ एव कथितुं ब्रह्मा कुतो मानवः ॥२॥  भावार्थ - संकष्टी आणि विनायक चतुर्थी, श्रीगणेशाचे मंत्र, स्थान, तीर्थ, दुर्वांकुर यांचे माहात्म्य तसेच श्रीगणेशाच्या पार्थिव मूर्तीच्या पूजनाचे माहात्म्य वर्णन करणारे हे भक्तिचरित्र आहे. श्रीगणेशभक्तांच्या उपासनेने प्रसन्न झालेल्या गणरायाने त्यांच्या सर्व अभीष्ट मनोकामना पूर्ण करून त्यांना संतुष्ट केले. त्याच्या कृपावैभवाचे पूर्ण वर्णन प्रत्यक्ष ब्रह्मदेवही करू शकत नाही, मग तिथे सामान्य मानवाचा काय निभाव लागणार ?    क्रीडाकाण्डमथो वदे कृतयुगे श्वेतच्छविः काश्यपः,      सिंहाङ्कः स विनायको दशभुजो भूत्वाथ काशीं ययौ । हत्वा तत्र नरान्तकं तदनुजं देवान्तकं दानवम्,      त्रेतायां शिवनन्दनो रसभुजो जातो मयूरध्वजः ॥३॥ भावार्थ - आता मी श्रीगणेशाच्या क्रीडाकांडाचे वर्णन करतो. सत्ययुगात दहा भुजा असलेले, श्वेतकांतिमान, सिंहध्वज असलेले कश्यपपुत्र विनायक अर्थात महोत्कट काशीनगरांत गेले. तेथे त्यांनी नरांतक आणि त्याचा धाकटा भाऊ देवांतक या असुरांचा वध केला. पुढे त्रेतायुगात षड्बाहू शिवपुत्र मयूरध्वज या रूपात ते अवतरित झाले. हत्वा तं कमलासुरं च सगणं सिन्धुं महादैत्यपम्,      पश्चात् सिद्धिमती सुते कमलजस्तस्मै च ज्ञानं ददौ । द्वापारे तु गजाननो युगभुजो गौरीसुतः सिन्दुरम्,      सम्मर्द्य स्वकरेण तं निजमुखे चाखुध्वजो लिप्तवान् ॥४॥ भावार्थ - श्रीगणेशाने कमलासुर आणि महादैत्यपती सिंधूचा त्याच्या सैन्यासहित वध केला. त्यानंतर ब्रह्मदेवाने त्यांना सिद्धी आणि बुद्धी नावाच्या आपल्या दोन कन्या दिल्या तसेच ज्ञानही दिले. पुढे द्वापारयुगात ते गौरीपुत्र आणि विशाल बाहु असलेल्या गजाननरूपांत अवतरित झाले. मूषकध्वज धारण करणाऱ्या गजाननाने आपल्या हातांनी सिंदुरासुराचा वध केला आणि (सिंदुर) स्वतःच्या मुखाला/अंगाला लावला.  गीताया उपदेश एव हि कृतो राज्ञे वरेण्याय वै,      तुष्टायाथ च धूम्रकेतुरभिधो विप्रः सधर्मर्धिकः । अश्वाङ्को द्विभुजो सितो गणपतिर्म्लेच्छान्तकः स्वर्णदः,      क्रीडाकाण्डमिदं गणस्य हरिणा प्रोक्तं विधात्रे पुरा ॥५॥ भावार्थ - श्रीगणेशाने संतुष्ट होऊन राजा वरेण्य यास गणेश-गीतेचा उपदेश केला. पुढे, म्हणजेच कलियुगात श्रीगणपती द्विभुज, धर्मशील विप्ररूपांत धुम्रकेतू म्हणून अवतरित होतील. त्यांच्या ध्वजावर अश्वचिन्ह असेल. हा अवतार म्लेच्छांचा नाश करणारा आणि सुवर्ण प्रदान करणारा म्हणून वर्णिला आहे. श्रीगणपतीच्या या क्रीडाकांडाचे माहात्म्य पूर्वी भगवान श्रीहरि विष्णूंनी ब्रह्मदेवांना कथन केले होते. एतच्छ्लोकसुपञ्चकं प्रतिदिनं भक्त्या पठेद्यः पुमान् । निर्वाणं परमं व्रजेत् स सकलान् भुक्त्वा सुभोगानपि ॥ भावार्थ - जो मनुष्य दररोज या पाच श्लोकांचे श्रद्धापूर्वक पठण करेल, त्याच्या सर्व अभीष्ट मनोकामना पूर्ण होऊन त्याचे इह-परत्र परमकल्याण होईल.    ॥ इति श्रीपंचश्लोकिगणेशपुराणम् ॥


॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


अवश्य वाचा :

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - श्रीपादावतारकथन


Aug 26, 2026

श्रीस्वामीभक्त सखाराम बाळकृष्ण सरनाईककृत श्रीस्वामीसमर्थाष्टक


॥ श्री गणेशाय नमः ॥
ॐ  द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
ॐ श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-श्रीस्वामीसमर्थमहाराजाय नमः ॥
॥ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
















स्वयंभू मुखांभोरु हा दिव्यकांती । विराजित जे शुद्ध चैतन्यज्योती । 
स्वदासां सदा सार निःसार दावी । महाराज श्रीस्वामीमूर्ती नमावी ॥१॥  निराकार साकार झाले पहा हो । विदेही सुदेहाकृतीतें वरी हो । चिदानंद आनंद कैवल्य दावी । महाराज श्रीस्वामीमूर्ती नमावी ॥२॥  शिरी टोपी भाळीं टिळा गंधरेखा । सुकंठीं दिसे मुक्तमाला सुरेखा ।  सुमुक्ता हृदयीं वास सर्वांस दावी । महाराज श्रीस्वामीमूर्ती नमावी ॥३॥  दिसे अंगुली मुद्रिकायुक्त जी ती । नखाग्रीं वसे कोटी कंदर्पदीप्ती ।  सभक्तां खुणा व्यक्त अव्यक्त दावी । महाराज श्रीस्वामीमूर्ती नमावी ॥४॥  दिसे साजिरे गोजिरें रूप कैसे । करी दर्शनें शांत नेत्रां अपैसें ।  अभोगीपणें भोग संभोग दावी । महाराज श्रीस्वामीमूर्ती नमावी ॥५॥ सुदेहावरी वृत्ति देहावरी ना । कृती ते करी प्रकृती स्वीकरीना ।  असंभाव्य रूपांतरीं भक्ति दावी । महाराज श्रीस्वामीमूर्ती नमावी ॥ ६ ॥  जगदोद्धारणीं कारणीभूत व्हावें । अजानुकरा स्वीकरीलें स्वभावें ।  असाधारणें धारणाशक्ति दारी । महाराज श्रीस्वामीमूर्ती नमावी ॥७॥ स्वयें दत्त हा सांडुनी स्वात्मतेला । करी भक्तकाजीं अनातर्क्य लीला ।  भला लाभला लाभ भक्तां सुदैवी । महाराज श्रीस्वामीमूर्ती नमावी ॥८॥  सदा स्वांतरीं भ्रांति संमोहविते । वदा अष्टका नित्य मृत्युंजयातें ।  न बाधेल ती ही 'सखा' खूण दावी । महाराज श्रीस्वामीमूर्ती नमावी ॥९॥
॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

आवडे दत्तभक्तांसी ...


Jul 6, 2026

कृष्णातीरिंच्या वसणाऱ्या । ये औदुंबरीं बसणाऱ्या


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

 

प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती अर्थात थोरले महाराज यांची सर्वच वाङ्मयसंपदा वैशिष्ट्यपूर्ण आहे. या समग्र प्रासादिक रचनेचे श्रेष्ठत्व सांगताना प. पू. नारायणकाका महाराज ढेकणे म्हणतात - श्रीस्वामीमहाराजांना श्रीदत्तप्रभूंच्या सतत आज्ञा होत व अन्य देवदेवता, नदीतीर्थे व क्षेत्रपशक्तींची प्रत्यक्ष दर्शने होऊन संवादही होत असे आणि त्यांचें यथार्थ शब्दांकन या पदे / स्तोत्रे / आरत्यांमधून अनुभवास येते. 

प. प. श्री टेम्ब्ये महाराजरचित ' कृष्णातीरिंच्या वसणाऱ्या ' हे असेच एक अतिशय रसाळ, भक्तिमय पद आहे. हे पद वाचतांना / ऐकतांना साक्षात त्या परब्रह्माची सगुण मूर्ती आपल्या मनःचक्षुंपुढे उभी राहते. त्याचा भावार्थ जाणून घेण्याचा हा अल्प प्रयत्न दयाघन श्रीदत्तप्रभूंच्या चरणीं रुजू व्हावा, हीच प्रार्थना !

कृष्णातीरिंच्या वसणाऱ्या । ये औदुंबरीं बसणाऱ्या ॥ध्रु.॥  काषायांबर घेणाऱ्या । पायिं पादुका घालणाऱ्या ॥१॥  भस्मोद्धूलन करणाऱ्या । दंडकमंडलु घेणाऱ्या ॥२॥  स्वभक्तसंगें असणाऱ्या । भक्ताभीप्सित करणाऱ्या ॥३॥  स्मरतां दर्शन देणाऱ्या । वासुदेवाच्या कैवाऱ्या ॥४॥ श्रीस्वामी महाराजांना श्रीनृसिंहवाडी या क्षेत्राविषयी उपजतच परमप्रेम आहे. आपल्या सद्‌गुरूंचा आर्त धावा करतांना श्रीस्वामी महाराज म्हणतात, कृष्णातीरिंच्या वसणाऱ्या । ये औदुंबरीं बसणाऱ्या ॥  हे कृष्णातीरावर औदुंबरतळवटी ध्यानस्थ बसलेल्या श्रीसद्‌गुरूराया तुम्ही मजकडे धावत या ! थोरल्या महाराजांनी श्रीनृसिंहसरस्वती महाराजांना अतिशय कळवळून आवाहन केलेले आहे, त्यांचे अत्यंत आर्ततेने स्मरण केलेले आहे.

दुसऱ्या चरणात श्रीदत्तस्वरूप सद्‌गुरूंचे वर्णन केले आहे. काषायांबर घेणाऱ्या । पायिं पादुका घालणाऱ्या ॥ औदुंबरतळवटी बसलेले श्रीसद्‌गुरुंनी काषाय वस्त्र म्हणजेच भगवे वस्त्र धारण केले आहे आणि त्यांच्या पायांत दिव्य अशा पादुका आहेत. श्रीस्वामी महाराज पुढे म्हणतात - भस्मोद्धूलन करणाऱ्या । दंडकमंडलु घेणाऱ्या ॥

श्रीनृसिंहसरस्वती महाराजांनी सर्वांगी भस्म चर्चिलेले आहे, त्यांची तनु भस्मांकित आहे, तसेच त्यांच्या हाती दंड आहे. त्यांनी समोरच बाजूला आपला कमंडलूही ठेवलेला आहे.

दत्तप्रभू हे सर्व जीवांचे नियामक असून भक्तवत्सल आणि दयाळू आहेत. त्यांच्या भक्तांच्या संरक्षणासाठीच त्यांनी दंड हाती घेतला आहे. त्यांचे भक्त जेव्हा वेदविहित मार्ग सोडून मोहादि विकारांना बळी पडतात आणि त्यांचा अधःपात होऊ लागतो, तेव्हा त्यांना अटकाव करण्यासाठी, तसेच प्रसंगी दुष्टांना शासन करण्यासाठी हा दंड आहे. 

प. पू. श्रीमामा महाराज देशपांडे म्हणत असत - “ श्रीभगवंतांचा कमंडलू हे त्यांचे 'हृदयतीर्थ' आहे. त्यांचे अत्यंत कनवाळू व प्रेमळ असे हृदयच त्यांनी कमंडलूच्या रूपाने त्यांच्यासमोर ठेवलेले असते. म्हणूनच ते प्रसंगी मृताला जिवंत करताना म्हणजेच त्याला संजीवन देताना आणि शुष्क काष्ठाला पर्णयुक्त करतांना ह्याच कमंडलूतील पाणी शिंपडून ते आपले विलक्षण कार्य संपन्न करतात. आपल्या हृदयातील वात्सल्याने ते भक्तांचे जणू संजीवन करत असतात !” यापुढील दोन चरणांत श्रीमहाराजांनी आपल्या सद्‌गुरूंच्या अलौकिक कार्याची महती अतिशय मार्मिकतेने गायली आहे. 

स्वभक्तसंगें असणाऱ्या । भक्ताभीप्सित करणाऱ्या ॥  स्मरतां दर्शन देणाऱ्या । वासुदेवाच्या कैवाऱ्या ॥ भक्तवत्सल, भक्ताभिमानी भगवान श्रीदत्तात्रेय प्रभूंचे,' माझ्या भक्तांचा मी कधीही नाश होऊ देणार नाही.' हे ब्रीद आहे. त्यांमुळे ते सदासर्वदा भक्तांच्या नित्य सान्निध्यातच असतात. अर्थात ते सर्वव्यापी आहेत. ते जसे बाहेर आहेत तसेच ते भक्तहृदयातदेखील अखंड प्रतिष्ठितही आहेत. जणू काही त्या करुणाघनाने स्वतःला भक्तहृदयामध्ये स्थापित करून ठेवलेले असते. आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी पदोपदीं तळमळणारी ती माऊली आहे. ते सदैव भक्तांच्या इष्ट मनोकामना सहजच पूर्ण करतात.  दत्तमहाराज स्मर्तृगामी आहेत, अर्थात ' स्मरण करताक्षणी आमच्या सद्‌गुरूंचे दर्शन होते.', अशी श्रीस्वामी महाराज इथे ग्वाही देतात.  थोरल्या महाराजांचा हा धावा शेवटी भक्तीच्या अतिशय उच्च पातळीवर येतो, ते आता सद्‌गुरूंचे, श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीमहाराज, श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामीमहाराज यांचे हृदयपूर्वक स्मरण करून अत्यंत तळमळीने आवाहन करतात, हे श्रीदत्तप्रभू तुम्ही वासुदेवाचे (श्री टेम्ब्ये महाराजांचे) कैवारी आहात, तेव्हा हे कृष्णातीरावर औदुंबरतळवटी ध्यानस्थ बसलेल्या श्रीसद्‌गुरूराया तुम्ही माझ्याकरितां धावत या ! या भक्तिरसमय पदाशीच साधारण साधर्म्य राखणारे आणि श्रीदत्तप्रभूंच्या दिनचर्येचे वर्णन करणारे स्वामी महाराजांचे हे पुढील पदही अतिशय सुरेख आहे. कृष्णातीरीं वसणा-या । ये औदुंबरिं बसणा-या ॥ध्रु.॥ स्वभक्तचित्ती असणा-या । भक्तसंग्रह करणा-या ॥१॥ सह्यगिरीवर असणा-या । प्रत्यहिं माहुरिं निजणा-या ॥२॥ करविरिं भिक्षा करणा-या । सारापुरी जेवणा-या ॥३॥ काशीक्षेत्रीं न्हाणा-या । भक्तसंकटीं धांवणा-या ॥४॥


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


Mar 20, 2026

भावार्थ श्रीगुरुलीलामृत - महीवरी संचरती गुरुनाथ


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ  द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-श्रीस्वामीसमर्थमहाराजाय नमः ॥
जनानुग्रहार्थ घेतीं अवतार । साधूंच्या परित्राणार्थ साचार । नरहरि दत्तात्रेय गुरुवर । परोपकारार्थ सोसिती कष्ट ॥  या पृथ्वीतलावर समस्त प्राणिमात्रांच्या नित्य कल्याणार्थ श्रीदत्तगुरु पुन्हा पुन्हा अवतरीत होत असतात. एकदा हिमालय पर्वतावर श्रीमन्नृसिंह यतिवर्य जगदुद्धारासाठी स्वेच्छाचारें संचार करीत होते. त्या पावन स्थानी अनेक योगी, मुनी, जपी, ब्रह्मचारी सतत अनुष्ठान करीत असतात. त्यांच्या या थोर तपाचे फल-वरदान देण्यासाठीच श्रीगुरुस्वामी तिथे प्रत्यक्ष प्रगटले होते. त्यावेळीं चीन देशांतील एक दाम्पत्य वनौषधी शोधण्यासाठी तिथे आले होते. भगवी वस्त्रें धारण केलेल्या श्रीस्वामींना पाहून ते चिनी स्त्री-पुरुष त्यांची कुचेष्टा करू लागले. हे रिकामे सोंग काय । वृत्ति दिसते पिशाच्चमय । समर्थांची अशी निंदा करीत ते दोघेही पोट धरून हसू लागले. हिमालयातील मनोहर निसर्ग पाहून त्यांच्या मनांत कामोद्भव झाला अन ते तिथेच प्रणयक्रीडा करू लागले. तोच एक विपरीत घडले, त्या पुरुषाचे सुंदर, सावयवी स्त्रीत रूपांतर झाले अन त्याची पत्नी पुरुषावयवसकट नररूप झाली. एकमेकांची अशी अवस्था पाहून ते दोघेही अत्यंत भयभीत झाले. अचानक हे संकट काय ओढवले बरें, असा विचार करत असतांना अचानक त्यांचे लक्ष गुहेतील तपस्वी नृसिंहसरस्वती महाराजांकडे गेले. श्रीस्वामी समर्थांना पाहून ते दोघेही अतिशय लज्जित झाले आणि ' ही यतींद्राचीच माया खरी । सुरनरां अगम्य ।' हे त्या दोघांनीही ओळखले.  श्रीनृसिंहस्वामींची उन्मत्तपणे निंदा केल्याचेच हे फळ आहे, याची त्या पती-पत्नीला पूर्णतः जाणीव झाली. आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होऊन ते दोघेही स्वामींना अनन्य शरण गेले आणि ' क्षमा करा जी अपराध । शरणागतां रक्षावें ।' अशी वारंवार प्रार्थना करत म्हणाले, " महाराज, पूर्वजन्मीचे किंचित सुकृत होते, म्हणूनच तुमचे दिव्य चरण दृष्टीस पडले. मात्र अज्ञान आणि तामसीपणामुळे आम्ही तुम्हांस ओळखले नाही. हे सद्‌गुरुनाथा, आमचे अपराध क्षमा करा अन हे परस्परांचे विपरीत देह पूर्ववत करा." त्या दोघांनीही केलेली शुद्धांत:करणपूर्वक अभ्यर्थना ऐकून सदगुरु दयाघन कळवळले आणि त्यांनी केवळ कृपादृष्टीनें अवलोकन करताच त्या चिनी पती-पत्नीची काया तात्काळ पूर्ववत झाली. स्वामींचा कृपाप्रसाद प्राप्त झाल्याने ते दाम्पत्य अतिशय आनंदले आणि त्यांना पुनः पुनः नमस्कार करू लागले. मग समर्थांनी त्यांना अनेक शुभाशीर्वाद दिले अन चीन देशी परतण्याची आज्ञा केली. पुढें मग ते पती-पत्नी अहर्निश गुरुपदांचे चिंतन करीत जीवन कंठू लागले. यथावकाश त्यांना पुत्रप्राप्तीही झाली अन गुरुभक्तीमुळे त्यांचे वंशपारंपरी इहपर कल्याण झाले.                         
त्या हिमालय पर्वतावर दुसऱ्या प्रांतातील चार शिकारी मृगयेसाठी आले होते. ते उदरपूर्तीसाठी सतत शिकार करीत असत. एकदा श्री स्वामी समर्थांची स्वारी आम्रवृक्षातळीं बसली होती, त्यावेळीं अतिशय घाबरलेले एक हरणाचे पाडस समर्थांच्या आश्रयास आले. हे चार पारधी त्या पाडसाची शिकार करण्यासाठी पाठलाग करीत होते. वृक्षाखालीं बसलेल्या समर्थांजवळ ते मृग पाडस पाहून ते व्याध क्रोधानें बंदुकीचे बार अन अनेक तीर त्या पाडसावर मारू लागले. परी त्या मृगवत्सासह । वृद्ध नृसिंहसरस्वती निःस्पृह । स्वानंदी निमग्न पितामह । निर्भयें स्वस्थ बैसले ॥ त्या शिकाऱ्यांनी कितीतरी बंदुका झाडल्या, मात्र स्वामींच्या नखालाही अणुमात्र धक्का लागला नाही. तो अवचित प्रकार पाहून ते शिकारी भांबावून गेले. तोच समर्थांनी त्या व्याधांकडे पाहून दोन खडे फेकले अन काय आश्चर्य ! ते चारही व्याध तटस्थ झाले. त्यांची शरीरें, बंदुका आणि तीर यांची हालचाल बंद झाली. सुमारें दोन याम त्या चौघांचीही देहस्मृति नाहीशी झाली, अन अखेर सानुतापें ते स्वामींना शरण गेले. कृपावलोकनें तात्काळीं । चौघांची तटस्थता गेली । देहशुद्धी बरवी आली । गुरुमाऊली वळल्यानें ॥  श्रीगुरुस्वामींचे ते अतुल सामर्थ्य पाहून व्याध त्यांचे स्तवन करू लागले. समर्थांनीही 'सर्वभूती अविरोध प्रेम । संरक्षूनि सत्य स्वधर्म ।' अशी त्यांना आज्ञा दिली. श्रीगुरुदर्शनाचा थोर महिमा अनुभवून ते सर्व शिकारी योगक्षेम पावले. परम कृपाळू श्रीगुरुमहाराज हिंसक-दुष्ट यांचाही उद्धार करतात आणि यथार्थ भक्ति, ज्ञान देऊन सकल जनांचे इहपर कल्याण करतात. पुढें एक अपूर्व नवल वर्तले. ते चार शिकारी पाठलाग करत असतांना ते मृग पाडस अन त्याच्या कुटुंबियांची ताटातूट झाली होती. आपल्या वत्साचा शोध घेत घेत हरिणी अन मृग त्या आम्रवृक्षाजवळ आले. तिथे योगिराजांसमवेत आपले पाडस बघून ते दोघेही आनंदले. तयासि पाहून नृसिंहयति । प्रसन्नवदनें हांसती । वदती का रे विप्रा आम्हांप्रति । नोळखिसी सांप्रत ॥  " अरे, आम्ही गाणगापुरांत असतांना तू आमचा भक्त होतास. तू रोगग्रस्त झाला असता आमची सेवा करून तू व्याधिनिर्मुक्त झाला. तुझी पत्नी शुद्ध पतिव्रता होती, तुम्ही पुत्रपौत्रश्रियायुक्त होता. मात्र एकदा तुम्ही सत्पुरुषास छळले, त्या पातकाचे फळ म्हणून हा मृगजन्म तुम्हांस घ्यावा लागला. " श्री समर्थांचे हे वचन ऐकून त्यांना पूर्वजन्मस्मृती आली. त्या मृग-मृगीने नृसिंहसरस्वती महाराजांना साष्टांग नमन केले. स्वामीदर्शनमात्रें त्या उभयतांना तात्काळ वाचा फुटली - बहुत जन्मांचे सुकृत । आजि फळलें आम्हांप्रत । देखिले पुन्हा श्रीगुरुदत्त । झालो पावन गुरुराया ॥ अशी प्रार्थना करून ते पूर्वजन्मवृत्तांत कथन करू लागले. माझा पहिला जन्म रोगी ब्राह्मण, दुसरा वृषभ, तृतीय जन्मी शूद्र तर चतुर्थ जन्म हा काशी क्षेत्रीं तंतुकार म्हणून झाला. त्या पुण्यतीर्थी व्यभिचार घडल्याने पाचवा जन्म खराचा, तर सहाव्या जन्मांत हस्तिनापुरी सुवर्णकार झालो. त्या जन्मांत माझी पतिव्रता पत्नी साधु-संत-माहात्म्यांना मूठ मूठभर पीठाचे दान करीत असे. त्या पुण्याईने हा मृगाचा जन्म लाभला. आज व्याधहस्तें कुलक्षय योग होता, मात्र पदरीं काही पूर्वपुण्यसंचय होता म्हणूनच समर्थांच्या दिव्य चरणांचे दर्शन झाले. पुरे झाल्या जन्मखेपा । आतां सोडवा मायबापा । दीनबंधो व्हावी कृपा । त्रिविध तापां निरसावें ॥ त्यांचे असे करुणावचन ऐकून श्रीस्वामी प्रसन्न झाले अन " तुम्हांस सद्धर्माचारी, पुण्यशील अशा ब्राह्मणवंशी पुढील जन्म प्राप्त होईल, आम्ही महाराष्ट्र दक्षिणदेशी आमच्या स्वक्षेत्रीं वास करू तेव्हा तुम्हांस पुन्हा दर्शनलाभ होईल." असा शुभाशीर्वाद देऊन स्वामींनी त्या तिन्ही मृगांच्या मस्तकीं आपला अभयहस्त ठेवला.  त्या हिमालयांतील दुर्गम गुहांमध्ये जप-तप, अनुष्ठान करणारे तपस्वी, ऋषीमुनी वास करीत होते. ते या श्रीमददत्तात्रेयप्रभू आणि मूक पशु यांच्यातील संवादाचे प्रत्यक्षदर्शी होते. त्या परमपुरुष, परमहंसाची ही अघटित लीला पाहून त्या सर्वांनी स्वामींचा जयजयकार केला आणि ' चलावें गुहेंतील आश्रमास । संध्यासमय जाहला ।' अशी प्रार्थना केली. 
॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
क्रमश:

आवडे दत्तभक्तांसी ...


Mar 9, 2026

श्रीमृत्युञ्जयस्तोत्रं



॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
ॐ नमः शिवाय ॥

मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे ।
अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः ॥१॥

कालेश्वरं महाकालं कालञ्जरनिवासिनम् ।
कालकृत्कालवेत्तारं प्रणतोऽस्मि सदा शिवम् ॥२॥

नमस्ते बोधरूपाय कालान्तक नमोऽस्तु ते ।
कालाधिप नमस्तेऽस्तु सर्वकालप्रवर्तक ॥३॥

कलासकलरूपेण कलाभिर्विश्वरूपधृत् ।
विश्वेश्वर नमस्तेऽस्तु आदिकालप्रवर्तक ॥४॥

जय श्वेतनिमित्तोग्र मृत्युदेहनिपातन ।
जयाशेषसुरावास काममोहित शैलज ॥५॥
इति श्रीमृत्युञ्जयस्तोत्रं सम्पूर्णम्

॥ ॐ नम: शिवाय ॥ श्री पार्वतीपरमेश्वरार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥