Jan 13, 2024

श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचित श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


आज पौष शुद्ध द्वितीया, कलियुगातील द्वितीय श्रीदत्तावतार, भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची जयंती ! पूर्वावतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी वचन दिल्याप्रमाणे अंबा-माधव या शिवभक्त दांपत्यापोटी पौष शुद्ध द्वितीयेला, शनिवारी माध्यान्हकाळी करंजनगरी श्री नृसिंह महाराजांच्या स्वरूपात अवतार घेतला.

समस्त दत्तभक्तांना श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या जयंतीच्या भक्तिमय शुभेच्छा !


शांतदांत इंदुकोटिकांदीप्त अत्रिनंदना । देंववृंदवंद्यपाद दत्त भक्तचित्तरंजना ॥

पापतप्ततापभंजना सनातना जनार्दना । मायिकांधकारसूर्य दत्त भक्तचित्तरंजना ॥  दत्त कृत्तकामरोष वेषधारि भिक्षु तूं जना । इष्ट देसि धर्म पासि दत्त भक्तचित्तरंजना ॥

राग द्वेष दोष वारिं, तारिं सूर्यचंद्रलोचना । भक्तकामधेनु तूंची दत्त भक्तचित्तरंजना ॥  हस्तिंदण्ड कुंडि घेसि देसि जीव वीतजीवना । रक्तपद्मपत्रनेत्र दत्त भक्तचित्तरंजना ॥ तूंचि विश्वहेतु मंतु सोसि होसि मायबाप ना । नित्य शुद्ध बुद्ध मुक्त दत्त भक्तचित्तरंजना ॥

तूंचि देव योगि होसि नासिं दैन्यदुःखकानना । न्यासि होसि कृष्णावासि दत्त भक्तचित्तरंजना ॥ ब्रह्मवस्तु तूं अनादिमध्यनाश खास वासना । वारिं, भक्ति देयिं तारिं दत्त भक्तचित्तरंजना ॥

प. प. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती महाराजरचित श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे हे स्तवन वाचताच त्या भगवंताची मूर्ती आपल्या डोळ्यांसमोर अवचित उभी राहते. श्री टेम्ब्ये स्वामींच्या प्रश्नावलीतील आठवे सूचित साधन अर्थात श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार या ग्रंथातील हे स्तोत्र आहे. थोरल्या महाराजांनी रचलेल्या प्रत्येक ग्रंथात अथवा स्तोत्रांत नेहेमीच त्यांची असामान्य प्रतिभा, तीव्र बुद्धीमत्ता आणि उत्कट दत्तभक्ती यांचा प्रत्यय येतो. अर्थातच, श्री सप्तशतीगुरुचरित्रसार ग्रंथही त्यास अपवाद नाही. या प्रासादिक ग्रंथाची महती वर्णतांना प. पू. सद्‌गुरु योगिराज श्री. गुळवणी महाराज लिहितात - सप्तशतीगुरुचरित्र म्हणजे सातशें ओव्यांत संपूर्ण गुरुचरित्र संक्षेपाने दिलेलें आहे. यांतही मूळ प्राकृत गुरुचरित्राप्रमाणें एकावन्न अध्याय केले आहेत. मूळ गुरुचरित्र हें ब्राह्मणांनी स्नानसंध्या करून सोवळ्यांनी वाचण्याचा संप्रदाय सर्वत्र आहे. शिवाय त्यांतील ओवीसंख्याही बरीच आहे. करितां ज्यांना मूळ गुरुचरित्र वाचण्याची शक्यता नाही अशा सर्व स्त्रीपुरुषांनाही गुरुचरित्र वाचनाचें श्रेय मिळावें व त्यांचेकडूनही शास्त्रानुसारी वाङ्मय तप घडावें या उद्देशानें सप्तशतीगुरुचरित्र हा ग्रंथ श्रीमहाराजांनी निर्माण केला असावा. यांत दुसरा एक चमत्कार असा दिसून येईल की, प्रत्येक ओवीतील तिसरें अक्षर क्रमानें वाचीत गेल्यास श्रीमद्भगवद्गीतेंतील पंधरावा अध्याय तयार होतो. म्हणजे या ग्रंथाचे वाचनानें पंधराव्या अध्यायाच्या पठणाचेंही श्रेय सहज मिळणारे आहे. अल्प वेळांत श्रीगुरुचरित्र वाचनाचे फळ देणाऱ्या या दिव्य ग्रंथाबद्दल " कर्ता करविता दत्त । वासुदेव निमित्त येथ । तत्पदीं अर्पिला ग्रंथ । तोच येथ आदिमध्यांतीं ॥" अशी ग्वाही स्वतः थोरल्या महाराजांनी दिली आहे. श्रीमद्भगवद्गीतेंतील पंधरावा अध्याय अधोरेखित करण्यासाठी या ग्रंथाच्या बहुतेक आवृत्तीत तिसरे अक्षर शब्दविग्रह करून दाखविले जाते, मात्र त्यांमुळे या पोथीचे पारायण अथवा वाचन करतांना मूळ शब्द सलग वाचता येत नसल्याने तो शब्द आणि त्या अनुषंगाने एकूणच त्या पदाचा/ओवीचा अर्थ लगेच लक्षांत येत नाही. यासाठी दत्तभक्तांसाठी सलग शब्द ठेवून ही पाठावृत्ती तयार केली आहे. समस्त दत्तभक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.


॥ श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचित श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार ॥


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

 

No comments:

Post a Comment