Showing posts with label श्रीगजानन विजय नित्यपाठ. Show all posts
Showing posts with label श्रीगजानन विजय नित्यपाठ. Show all posts

Sep 2, 2025

स्वामी माधवानंदविरचित श्रीगजानन-विजय भक्तिरसास्वाद


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ ॐ नमो भगवते श्रीगजानन महाराजाय


श्रीगजानन विजय - शेगांवनिवासी संतवर श्री गजानन महाराजांची साक्षात वाङ्मय मूर्ती ! संतकवी श्री दासगणु महाराजांनी सिद्धावस्थेत रचलेला हा प्रासादिक ग्रंथ आहे. या दिव्य ग्रंथाचे वाचन, पारायण केले असता भाविकांना श्रीगजानन महाराजांची प्रचिती निश्चितच येते, इतुकेच नव्हें तर " जो या ग्रंथीं ठेवील भाव । त्यासी पावेल स्वामीराव । संकटीं त्याच्या घेईल धांव । रक्षण त्याचें करावया ॥" असे या प्रभावशाली ग्रंथाचे सामर्थ्य आहे. असंख्य गजाननभक्तांनी याची अनुभूती घेतली आहे.

याच दिव्य पोथीचे विवरण करणारा स्वामी माधवानंदलिखित श्रीगजानन-विजय भक्तिरसास्वाद हा ग्रंथ श्रीगजानन महाराजांच्या असंख्य लीलांचे, सद्‌गुरु श्रीगजाननांच्या उपदेशपर शिकवणीचे आणि समर्थांच्या भक्तांच्या भावपूर्ण अंतःकरणाचे अनेक विलोभनीय पैलू उलगडून दाखवतो. गजाननभक्तांनी हा ग्रंथ आवर्जून वाचावा, त्यातील सूक्ष्म अर्थांचे नित्य मनन-चिंतन करावे जेणेकरून श्रीगजानन विजय पोथीवाचन केवळ वाचनमात्र न राहता, भाविकांना आंतरिक समाधान तर निश्चित लाभेलच, तसेच महाराज सदैव आपल्यासोबतच आहेत अशी दृढ धारणादेखील होईल.

स्वामी माधवानंद म्हणजेच पूर्वाश्रमीचे डॉ. माधव बाळकृष्ण नगरकर. हे आदिनाथ, श्रीदत्तात्रेय, श्रीमच्छिंद्रनाथ, श्रीगोरक्षनाथ, श्रीजालंदरनाथ यांच्यापासून सुरु झालेल्या आणि पुढे श्रीज्ञानेश्वर महाराज तसेच स्वामी स्वरूपानंद (पावस), स्वामी माधवनाथ (पुणे) यांच्यापर्यंत चालत आलेल्या नाथसंप्रदायाच्या परंपरेतील ध्यानयोगप्रधान शाखेचे एक उत्तराधिकारी होते. अनेक संत-महात्मे यांचे वाङ्मय तसेच विविध पौराणिक कथा व स्तोत्र यांवर त्यांनी निरूपणपर लेखन केले आहे. त्यांतून व्यक्त होणारा बोध, भावार्थ आणि वाचकांना मनन करण्यास प्रेरित करणारे सोदाहरण विश्लेषण हे स्वामी माधवानंदलिखित साहित्याचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.

श्रीगजानन-विजय भक्तिरसास्वाद हा ग्रंथदेखील याला अपवाद नाही. या ग्रंथाविषयी स्वामी माधवानंद लिहितात - गजानन महाराजांच्या भक्तांच्या अंतःकरणाची विलोभनीयता आणि महाराजांना द्यायची असलेली शिकवण यांवर विशेष प्रकाशझोत टाकून, चमत्कारांनी दिपलेल्या डोळ्यांना हे सर्व दिसेल, माणूस त्यांतून स्वतःसाठी योगज्ञानाच्या प्रेरणा आणि 'श्रीगजानन विजय' ग्रंथातील भक्तिरसाचा आस्वाद घेऊ शकेल यासाठी श्रीगजानन महाराजांनी हा ग्रंथ त्याच्या नावाच्या स्फुरणासह प्रकट केला अशी माझी प्रामाणिक धारणा आहे.

  स्वामी माधवानंदलिखित श्रीगजानन-विजय भक्तिरसास्वाद हा विवरण ग्रंथ इथे ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहे. सर्व गजाननभक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

  " देवा, उपासना तुझी आहे. तुझ्या इच्छेने, तुझ्या प्रेरणेने आणि तुझ्या शक्तीनेच ही चालली आहे. कर्ता आणि करविता तूच आहेस. या उपासनेतून हे देवा, तू मला तुझ्या दर्शनासाठी योग्य करून घ्यावेस. याशिवाय दुसरी कोणतीही इच्छा नाही. ऐहिक गोष्टींच्या बाबतीत जी तुझी इच्छा तीच माझी इच्छा !", याच ग्रंथातील ही अनन्यशरणागत भावयुक्त प्रार्थना करून ही लेखनसेवा श्रीगजानन महाराजांच्या दिव्य चरणीं रुजू व्हावी, हेच मागणे गुरुवरा !

श्रीगजानन महाराजार्पणमस्तु   

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Jul 29, 2024

॥ म्हणे गजानन ॥ - श्री. गणेश वि. रामदासीकृत श्रीगजानन विजय ग्रंथाचे निरूपण


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय


श्रीगजानन विजय - शेगांवनिवासी संतवर श्री गजानन महाराजांची साक्षात वाङ्मय मूर्ती ! संतकवी श्री दासगणु महाराजांनी सिद्धावस्थेत रचलेला हा प्रासादिक ग्रंथ आहे. या दिव्य ग्रंथाचे वाचन, पारायण केले असता श्री गजानन महाराजांची प्रचिती निश्चितच येते, इतकेच नव्हें तर " जो या ग्रंथीं ठेवील भाव । त्यासी पावेल स्वामीराव । संकटीं त्याच्या घेईल धांव । रक्षण त्याचें करावया ॥ जेथें हा राहील ग्रंथ । तेथें न कदा येई भूत । लाग न साधे यत्किंचित । तेथें ब्रह्मसमंधाचा ॥" असे या प्रभावशाली ग्रंथाचे सामर्थ्य आहे. असंख्य गजानन भक्तांनी याची अनुभूती घेतली आहे.

" म्हणे गजानन " या स्वरमालिकेतून श्री. गणेश वि. रामदासी यांनी या श्रीगजानन विजय ग्रंथाचे निरूपण अत्यंत रसाळ वाणींत केले आहे. अतिशय सुमधुर असे हे मनन प्रत्येक गजानन भक्ताने आवर्जून श्रवण करावे, असेच झाले आहे.



॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Feb 13, 2023

गजाननाच्या अद्‌भुत लीला...


॥ ॐ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय ॥

सतेज दुसरा रवि हरीसमान यांचे बल  
वशिष्ठ-सम सर्वदा त्वदिय चित्त ते निर्मल  
असें असुनिया खरे, वरिवरि पिसा भासतो  
तया गुरु गजाननां प्रति सदा गणू वंदितो  संतशिरोमणी श्री गजानन महाराजांचे, संतकवी श्रीदासगणू महाराजांनी केलेले हे वर्णन किती यथार्थ आहे. जगत्कल्याणासाठी, सामान्य जनांच्या उद्धारासाठी तो निर्गुण, निराकार परमात्मा संत-महात्मे, सत्पुरुष यांच्या स्वरूपांत सगुण साकार रूप घेऊन या भूतलावर अवतरीत होतो. विदेहि संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज असेच साक्षात् ब्रह्मस्वरुप होते, हे निर्विवाद सत्य आहे. त्यांच्या जीवनचरित्रातील अनेक लीला याची साक्ष देतात.  संतकवी श्रीदासगणूविरचित ‘ श्री गजानन विजय ' या प्रासादिक ग्रंथातील अठराव्या अध्यायात श्री गजानन महाराजांनी आपला सद्‌भक्त बापुना काळे यांस साक्षात विठ्ठलरूपांत दर्शन दिले, ही कथा वर्णन केली आहे. भगवंताच्या भेटीसाठी आपल्या या भक्ताची तळमळ, ध्यास पाहून त्या कृपाळू माऊलीने प्रत्यक्ष विठ्ठल-दर्शनाचा लाभ त्यास घडवला. अशा अनेक भक्तांना त्यांनी त्यांच्या इष्टदेवतेच्या स्वरूपांत दर्शन दिले आणि त्यांची श्रद्धा दृढ केली.  श्री गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त, त्यांची अशीच एक लीला आज आपण पाहू या. शेगांवचे परशुराम देशमुख परम भाविक गृहस्थ होते. त्यांची श्री गजानन महाराजांवर अतिशय दृढ श्रद्धा होती. एकदा गजानन स्वामी आपल्या काही भक्तांसह विटखेड येथील श्री दत्तप्रभूंच्या जागृत स्थानाच्या दर्शनासाठी निघाले. दत्तभक्त असलेले परशुराम देशमुखही त्यावेळी महाराजांच्या सोबत होते. भक्तवत्सल दत्तमहाराज आपल्या भक्तांसाठी कसे धावून येतात, याची प्रचिती देणारे विटखेड हे पवित्र क्षेत्र आहे. या स्थानाची महती अशी - शेगांवातील पाटील घराण्यांत एक थोर दत्तभक्त होते. ते नित्यनियमाने दत्तप्रभूंच्या क्षेत्राची वारी करत असत. हा क्रम कित्येक वर्षे चालू होता. पुढें, वृद्धापकाळ आला, शरीरही थकले. त्यादरम्यानच्या अशाच एका वारीत त्यांनी अत्यंत करुणाभावानें दत्तमाऊलीला प्रार्थना केली, “ हे प्रभो, गेली अनेक वर्षे आपण माझ्याकडून ही वारीची सेवा करवून घेतली. आता, वृद्धावस्थेमुळे पुढील वारी होईल होईल, असे वाटत नाही. हे अत्रिसुता, तुम्ही अंतर्यामी आहात. तुमच्या दर्शनाचा लाभ मला अखंड लाभो, हेच तुझ्या चरणीं मागणे !” त्याच रात्री दत्तप्रभूंनी त्या भक्ताला स्वप्नदृष्टांत दिला. दत्तमहाराज स्वतः तिथे प्रकटले आणि त्या दत्तभक्तास अत्यंत प्रसन्नतेने म्हणाले, “ वत्सा, तुझ्यावर माझी कृपा नेहेमीच राहील. ही दत्तमूर्ती घे, अन तुझ्या पूजेत नित्य ठेव. यापुढें तुझ्या घरीच तुला सदैव माझे दर्शन होईल. तुला आता ही वारी करण्याची आवश्यकता नाही. मात्र, घरी जाईपर्यंत ही मूर्ती तू कोठेही भूमीवर ठेवू नकोस.” आपल्या इष्टदेवतेचा हा कृपाप्रसाद मिळाल्याने ते दत्तभक्त अतिशय आनंदित झाले आणि ती सुरेख अशी दत्तमूर्ती घेऊन सत्वर शेगांवी येण्यास निघाले. दत्तात्रेयांच्या आज्ञेचे पालन करीत त्यांनी ती दत्तमूर्ती कोठेही भूमीवर ठेवली नाही. मात्र, विटखेड इथे येताच त्यांना या गोष्टीचे पूर्णतः विस्मरण झाले आणि काही कारणाकरिता अगदी अनावधानाने त्यांनी ती दत्तमूर्ती जमिनीवर ठेवली. ‘ईश्वरेच्छा बलियसी !’... हेच खरें, अर्थात त्या भगवंतांच्या लीलेला कोण बरें जाणू शकणार ? पाटलांनी ती दत्तमूर्ती भूमीवर ठेवताच ती मूर्ती जमिनीत गुप्त झाली. ते पाहताच, त्या दत्तभक्तांना दुःखावेगाने अश्रू अनावर झाले अन ते पुनः पुनः दत्तप्रभूंची करुणा भाकू लागले. करुणासागर दत्तात्रेयांनी पुन्हा एकदा त्यांना दर्शन दिले आणि अत्यंत वत्सलतेने बोलू लागले, “ अरे तू दुःखी होऊ नकोस. मी सदैव या स्थानीं वास करेन. तू दररोज इथे येऊन माझे दर्शन घेत जा.” एव्हढें बोलून दत्तमहाराज गुप्त झाले. आजही या ठिकाणी दत्तभक्तांना महाराजांच्या कृपेची अनुभूती येते.  तर अशा या जागृत क्षेत्राचे दर्शन घेण्यासाठी श्री गजानन महाराज बैलगाडीत बसून आपल्या भक्तांसह निघाले. तिथे पोहोचताच दत्तस्थानापासून काही अंतरावरच त्या सर्वांनी बैलगाड्या लावल्या, अन ते अनसूयानंदनाच्या दर्शनास पायीं निघाले. परशुराम देशमुख यांस महाराजांना तिथे एकटे सोडून दर्शनास जाणे योग्य वाटले नाही. त्यांमुळे श्री गजानन समर्थांनी वारंवार आग्रह करूनही ते इतर भक्तांसोबत गेले नाही अन हात जोडून महाराजांना म्हणाले, “ हे सद्‌गुरो, माझ्यासाठी तुम्हीच दत्तप्रभू आहात. तुमचे केलेले नित्य पूजन, तुम्हांला मनोभावें केलेले नमन श्री दत्तात्रेयांच्या चरणीं रुजू होते, अशी माझी दृढ श्रद्धा आहे.” परशुराम देशमुखांचा तो निर्मळ भाव जाणून श्री गजानन महाराजांनी त्यांना साक्षात श्री दत्तात्रेयांचे सगुण दर्शन घडवले. “शेगावकर श्री संत चरित्रामृत” या ग्रंथात या प्रसंगाचे वर्णन करतांना ग्रंथकार लिहतात - “ तो तेथे द्‌भुत लीला जाहली जोगीवेशी अकस्मात मूर्ती आली  ... हेच ते गंगापूरचे दत्त म्हणुनी नमस्कार घाल सद्‌गुरुस ”  त्यावेळी, दत्तमहाराजांच्या सोबत चार श्वानही होते. परम भाग्यवंत अशा परशुराम देशमुखांनी दत्तप्रभूंच्या चरणीं मोठ्या भक्तिभावाने माथा टेकला अन अत्यंत श्रद्धेने आपल्या आराध्यदेवतेचे दर्शन घेतले. पुढे, श्री दत्तात्रेय अन दोन श्वान अदृश्य झाले. उरलेले दोन श्वान श्री गजानन महाराजांबरोबर शेगांवास आले. त्यापैकी एकाला महाराज ‘मोतीराम’ म्हणून हाक मारीत असत अन तो समर्थांचा अत्यंत लाडका होता. आजही, श्री गजानन महाराज त्यांच्या भक्तांना दर्शन देतात, प्रचिती देतात मात्र त्यासाठी आपला भावही निर्मळ हवा. श्री गजानन बावनीमधील, ‘गजाननाच्या द्‌भुत लीला । अनुभव येती आज मितीला ’ या ओव्यांचा अनुभव असंख्य भक्तांनी खरोखर घेतला आहे.

संदर्भ : श्रीगजानन आचार्यपीठ 
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

अवश्य वाचावे असे काही -


Feb 11, 2022

श्रीगजानन विजय नित्यपाठ


*** श्री गजानन महाराज प्रगट दिन विशेष ***

गण गण गणात बोते
अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त-प्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सद्‌गुरु श्री गजानन महाराज की जय जय

ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय नमः

🔷🔶🔷 श्रीगजानन विजय नित्यपाठ - PDF इथे उपलब्ध आहे.
***॥ श्री गजानन महाराजार्पणमस्तु ॥***

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय २१


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय श्रोते आतां सावधान । हा कळसाध्याय परिसा पूर्ण । तुमचें भाग्य धन्य धन्य । संतकथा ऐकतसां ॥१॥ एकविधा निष्ठा ज्याची । जडली गजाननपदीं साची । त्याच्या दुःखसंकटांची । होळीच होते निःसंशय ॥२॥ बांधीत असतां मंदिर । काम करीत शिखरावर । एक होता मजूर । हाताखालीं गवंड्यांच्या ॥३॥ तो धोंडा देतां मिस्तरीला । एकाएकी झोंक गेला । तीस फुटांवरुन पडला । खालीं घडीव दगडावर ॥४॥ तो पडतां लोकांनीं पाहिला । जन म्हणती मेला मेला । उंचावरुन खालीं पडला । आतां कशाचा वांचे तो ? ॥५॥ परी घडलें अघटित । कोठें न लागलें त्याप्रत । जैसा चेंडू झेलितात । तैसें त्याचें जाहलें ॥६॥ मजूर म्हणे लोकांला । माझा जेव्हां झोक गेला । तेव्हां एकानें धरलें मला । पडतां पडतां करास ॥७॥ पाय भूमीसी लागतां क्षणीं । तो न दिसला मजलागुनी । हें वृत्त ऐकुनी । लोक अवघे आनंदले ॥८॥ अभिश्राप कोणाचा । समर्थ ना घेती साचा । हा योग पडण्याचा । दैवानेंच आला तुज ॥९॥ या तुझ्या पडण्यानें । स्पर्श केला समर्थानें । तुझ्या कराकारणें । ऐसें भाग्य कोणाचें ? ॥१०॥ असो एक बाई रजपुताची । जयपुराहून आली साची । बाधा होती भूताची । तया अबलेकारणें ॥११॥ तिसी जयपूर ग्रामाला । दत्तात्रयांचा दृष्टान्त झाला । तूं या रामनवमीला । जाईं शेगांवाकारणें ॥१२॥ तेथें संत जागती ज्योत । श्रीगजानन सद्‌गुरुनाथ । ते या तुझ्या पिशाच्याप्रत । मुक्ति देतील निःसंशयें ॥१३॥ या दृष्टान्तेंकरुन । आपुल्या दोन मुलांसी घेऊन । रामनवमीसाठीं जाण । बाई आली शेगांवा ॥१४॥ प्रतिपदेपासून भला । उत्सवासी आरंभ झाला । अफाट समुदाय मिळाला । नवमीस श्रोते शेगांवीं ॥१५॥ काम सभामंडपाचें । चाललें होतें तेथ साचें । खांब मोठमोठे दगडाचे । उभे केले असती ॥१६॥ उत्सवाच्या निमित्त भलें । काम भक्तांनीं बंद केलें । खांब होते बसविलेले । नुसते मात्र ते ठाईं ॥१७॥ श्रीरामाचा जन्म झाला । प्रसादासाठीं लोटला । जनांचा तो समुदाय भला । तो न मसी वर्णवे ॥१८॥ त्या गर्दीत ही बाई । उभी खांबास एक्या पायीं । होती तिला सोसली नाहीं । गर्दी ती यत्किंचित ॥१९॥ म्हणून खांबाच्या आश्रया । गेली निर्भय व्हावया । गर्दी ती चुकवावया । परी झालें विपरीत ॥२०॥ तोच खांब कोसळला । तिच्या शरीरा पडला । तो पहातां लोकांला । ऐसें वाटूं लागलें ॥२१॥ तिचा बहुतेक गेला प्राण । ही बाई कोठील कोण ? । लहान मुलें दिसतीं दोन । खांबाखालीं येधवां ॥२२॥ दहावीस जणांनीं । खांब काढिला अंगावरुनी । पाणी मुखांत घालोनी । डॉक्टर लोबोकडे पाठविले ॥२३॥ तिनें ह्या रजपुतीणीला । रीतीप्रमाणें उपचार केला । लोबो म्हणे ना लागला । मार इला कोठेंच ॥२४॥ आश्चर्य वाटलें लोकांला । प्राण बाईचा वांचला । हा जो कांहीं प्रकार झाला । तो घडला इतुक्यास्तव ॥२५॥ खांब पाडून अंगावरी । भूत जें होतें शरीरीं । त्या भूतास मुक्ति खरी । दिधली त्या गजाननें ॥२६॥ बाई होऊन पूर्ववत । गेली जयपूर शहराप्रत । नांदूं लागली आनंदांत । ऐसा प्रभाव स्वामींचा ॥२७॥ ऐसेंच एका उत्सवासी । नाईक नवर्‍याच्या मस्तकासी । सोडीत असतां मंडपासी । लाकडी गोल पडला हो ॥२८॥ तोही गोल थोर होता । परी स्वामींची अगाध सत्ता । कोठेंही ना आघात होतां । नाईक नवरा वांचला ॥२९॥ पुत्र कृष्णाजी पाटलाचा । रामचंद्र नांवाचा । परमभक्त समर्थांचा । एक असे शेगांवीं ॥३०॥ एके दिवशीं त्याच्या घरीं । येते झाले साक्षात्कारी । ऐन दुपारच्या अवसरीं । गोसाव्याच्या रुपानें ॥३१॥ भूक लागली मला देखा । अन्न कांहीं देतां कां ? । ऐसें म्हणून मारिली हांका । रामचंद्र पाटलातें ॥३२॥ निरखून पाहातां गोसाव्यासी । तों ते असावे पुण्यराशी । स्वामी गजानन निश्चयेंसी । ऐसें त्याला वाटलें ॥३३॥ गोसाव्याचा धरुन हात । आला घेऊन घरांत । दिला बसण्यास पाट । पूजा केली पायांची ॥३४॥ गोसावी म्हणे पाटलाला । आज मी मुद्दाम आलों मुला । कांहीं तुज सांगण्याला । तें तूं ऐके मनापून ॥३५॥ आण ताट वाढून । सुग्रास देईं भोजन । मर्जी असल्या पांघरुण । घाल एखादें अंगावरी ॥३६॥ पूजा अन्न दक्षिणा । याचकांसी दिल्या जाणा । तें पावतें नारायणा । येविषयीं शंका नसे ॥३७॥ आणलें ताट वाढूनी । गोसावी जेवला प्रेमानीं । पांच रुपये पाटलांनीं । दक्षिणा ठेविली त्याच्या करां ॥३८॥ तैं गोसावी म्हणाला । ही दक्षिणा नको मला । तूं पाहिजे कारभार केला । गजाननाच्या मठांत ॥३९॥ तीच दक्षिणा मागण्यासी । मी आलों तुझ्यापासीं । ती आनंदें देईं मसी । म्हणजे कल्याण होईल ॥४०॥ समर्थसेवेची दक्षिणा । देऊन तुष्टवी माझ्या मना । योग्य मनुष्य तुझ्याविणा । कोणी न येथें सांप्रत ॥४१॥ तुझी कांता आजारी । वरचेवरी पडते जरी । तीही होईल बापा परी । ही दक्षिणा दिल्यानें ॥४२॥ बोलाव तुझ्या पुत्राप्रत । त्याच्या कंठीं एक ताईत । बांधितों म्हणजे चेटूकभूत । याची न बाधा होय त्यासी ॥४३॥ मी तुझ्या पाठीस । आहे जाण रात्रंदिवस । ताईत बांधून कंठास । गोसावी जाऊं लागला ॥४४॥ दाराबाहेर जातां भला । अंतर्धान पावला । पाहातां पाहातां झाला । दिसेनासा रस्त्यांत ॥४५॥ पाटील अवघ्या दिवसभर । मानसीं करी विचार । श्रीगजानन स्वामी साचार । आले उपदेश करायाला ॥४६॥ रात्रीं स्वप्नीं येऊन । संशय केला निरसन । ऐसें स्वामी गजानन । भक्तवत्सल खरोखरी ॥४७॥ श्रीगजानन चरित्र । तारक असोनी परमपवित्र । अनुभव येण्या मात्र । सबळ निष्ठा पाहिजे ॥४८॥ या ग्रंथाची अवतरणिका । देतों आतां ही तुम्ही ऐका । वेळ उगा दवडूं नका । पूर्ण व्हावें सावधान ॥४९॥ प्रथमाध्यायीं मंगलाचरण । देवगुरुचें वंदन । केलें पुढें निवेदन । गजाननाच्या पूर्वचरिता ॥५०॥ माघमासीं सप्तमीसी । समर्थ आले शेगांवासी । देवीदासाच्या सदनापासी । दिसते झाले प्रथमतः ॥५१॥ बंकटलाल दामोदर । दोन होते चतुर नर । त्यांनीं परीक्षा अखेर । केली गजाननाची ॥५२॥ कथा द्वितीयाध्यायांत । येणेंपरी आहे सत्य । गोविंदबुवाच्या कीर्तनांत । महाराज येऊन बैसले ॥५३॥ पितांबर शिंप्याला । रस्त्यांत चमत्कार दाविला । बंकटलालाच्या घराला । महाराज गेले शेवटीं ॥५४॥ कथा तृतीयाध्यायाला । गोसाव्यानें नवस केला । गांजाचा श्रीसमर्थांला । पाजण्याचा विबुध हो ॥५५॥ त्याची इच्छा पुरविली । प्रथा गांजाची पडली । तेथपासोनी भली । शेगांवचे मठांत ॥५६॥ जानराव देशमुखाचें । गंडांतर टाळिलें साचें । देऊन तीर्थ पायांचें । आपुलें तें स्वामींनीं ॥५७॥ मृत्यूचे तें प्रकार । तेथें कथिले सविस्तर । विठोबासी दिला मार । ढोंग करितो म्हणोनी ॥५८॥ कथा चतुर्थाध्यायाठायीं । येणें रीतीं असे पाही । जानकीरामें दिला नाहीं । विस्तव चिलमीकारणें ॥५९॥ किडे पडले चिंचवण्यांत । अन्न गेलें वायां सत्य । सोनारानें जोडून हात । केली विनंती समर्थांला ॥६०॥ त्याचा अपराध क्षमा केला । पूर्ववत्‌ केले चिंचवण्याला । जानकीराम भक्त झाला । ते दिवसापासून ॥६१॥ होते दोन कान्होले । उतरंडीसी ठेविलेले । तेच समर्थें मागितले । खाया चंदू मुकिंदासी ॥६२॥ चिंचोलीच्या माधवाला । यमलोक दावून मुक्त केला । शिष्याहातें करविला । थाट वसंतपूजेचा ॥६३॥ कथा पंचमाध्यायांत । महाराज पिंपळगांवांत । बसले शंकराच्या मंदिरांत । पद्मासन घालोनिया ॥६४॥ गुराख्यांनीं पूजा केली । गांवची मंडळी तेथें आली । महाराजांसी घेऊन गेली । पिंपळगांवाकारणें ॥६५॥ हें कळलें बंकटलाला । तो पिंपळगांवास गेला । महाराजांसी आणण्याला । परत शेगांवाकारणें ॥६६॥ समर्थांसी आणिलें परत । कांहीं दिवस राहून तेथ । पुन्हां गेले अकोलींत । भास्करासी तारावया ॥६७॥ कोरड्या ठणठणीत विहिरीला । जिवंत झरा फोडीला । एका क्षणांत आणिलें जला । त्या कोरड्या विहिरीठायीं ॥६८॥ भास्कराची उडवली भ्रांती । घेऊन आले तयाप्रती । शेगांवास गुरुमूर्ति । ही कथा पंचमांत ॥६९॥ षष्ठाध्यायीं ऐसी कथा । बंकटलालें सद्‌गुरुनाथा । मक्याचीं कणसें खाण्याकरितां । नेलें आपुल्या मळ्यांत ॥७०॥ गांधीलमाशा उठल्या तेथ । लोक होऊन भयभीत । पळूं लागले असती सत्य । जीव आपुला घेऊनी ॥७१॥ बाधा गांधीलमाश्यांची । महाराजा न झाली साची । घेतली असे शिष्यत्वाची । परीक्षा बंकटलालाची ॥७२॥ नरसिंगजीस भेटण्याला । स्वामी गेले अकोटाला । जो नरसिंगजी होता भला । शिष्य कोतशा अल्लीचा ॥७३॥ कांहीं दिवस राहिले । अकोटामाजी भले । नरसिंगजीसी हितगुज केलें । बंधु आपुला म्हणून ॥७४॥ चंद्रभागेच्या तीरीं । शिवरग्रामाभीतरीं । कृपा व्रजभूषणावरी । केली असे जाऊन ॥७५॥ मारुतीच्या मंदिरांत । श्रावणमासाच्या उत्सवांत । समर्थ आले राहण्याप्रत । येथें षष्ठमाची पूर्तता ॥७६॥ गांवीची पाटील मंडळी । अवघी आडदांड होती भली । हमेश होई बोलाचाली । त्यांची समर्थांबरोबर ॥७७॥ हरि पाटलासवें भले । महाराज कुस्ती खेळले । मल्लविद्येचें दाविलें । प्रत्यंतर बहुतांला ॥७८॥ ऊंसाचा चमत्कार । दाऊनिया साचार । अभिमानाचा परिहार । केला पाटील मंडळींच्या ॥७९॥ भिक्यानामें दिला सुत । खंडू कडताजी पाटलाप्रत । आम्रभोजनाचें व्रत । चालविण्यास कथिलें पाटलाला ॥८०॥ ऐशा कथा सप्तमाध्यायीं । कथन केल्या आहेत पाही । निष्ठा समर्थांच्या ठायीं । जडली पाटील मंडळींची ॥८१॥ कथा आहे अष्टमांत । दुफळी पाटील देशमुखांत । अर्ज दिधला सरकारांत । महारांनीं विरुद्ध पाटलाच्या ॥८२॥ खंडूवरी बालंट आलें । तें समर्थांनीं नासिलें । निर्दोष सुटते झाले । खंडू पाटील खटल्यांतून ॥८३॥ तेलंगी ब्राह्मणाला । वेद म्हणून दाखविला । आपण कोण हा कळविला । सहज लीलेनें समाचार ॥८४॥ कृष्णाजीच्या मळ्याशीं । महाराज राहिले छपरासी । मंदिराच्या सान्निध्यासी । चंद्रमौळी हराच्या ॥८५॥ ब्रह्मगिरी गोसाव्याला । अभिमानरहित केला । "नैनं छिन्दन्ति" श्लोकाला । रहस्यासह सांगून ॥८६॥ जळत्या पलंगाच्यावर । महाराज बसते झाले स्थिर । न जाळे वैश्वानर । केव्हांही खर्‍या संताला ॥८७॥ कथा नवमाध्यायाला । द्वाड घोडा शांत केला । खूण नवस करणाराला । दिली असे गांजाची ॥८८॥ दासनवमीचे उत्सवासी । समर्थ बाळापुरासी । घेऊन आपल्या शिष्यांसी । बाळकृष्णाच्या घरां गेले ॥८९॥ बाळकृष्णालागून । करविलें समर्थांचें दर्शन । संशयरहित केलें मन । तया रामदास्याचें ॥९०॥ दशमाध्यायीं सुरेख । उमरावतीचें कथानक । उपरति झाली पुरी देख । तेथें बाळाभाऊला ॥९१॥ गणेश आप्पा चंद्राबाई । यांनीं अर्पिला संसार पायीं । भावभक्तीनें लवलाही । श्रीगजाननस्वामींच्या ॥९२॥ गणेश दादा खापर्ड्याला । शुभ आशीर्वाद दिधला । छत्रीनें मारुन बाळाला । परीक्षा त्याची घेतली ॥९३॥ द्वाड गाय सुकलालाची । अति गरीब केली साची । दांभिक भक्ति घुड्याची । कशी ती कथन केली ॥९४॥ एकादशाध्यायीं कथन । भास्करासी डसला श्वान । आले त्र्यंबकेश्वरीं जाऊन । गोपाळदासा भेटले ॥९५॥ झ्यामसिंगाच्या विनंतीसी । देऊन मान अडगांवासी । येते झाले पुण्यराशी । श्रीगजाननमहाराज ॥९६॥ निजधामा भास्कर गेला । त्याचा देह ठेविला । द्वारकेश्वरा सन्निध भला । सतीबाईंचे शेजारीं ॥९७॥ आज्ञा केली कावळ्यांला । तुम्ही न यावें या स्थला । वांचविलें गणु जवर्‍याला । सुरुंग उडतां विहिरींत ॥९८॥ शेट बचुलालाची । कथा द्वादशाध्यायीं साची । मूर्ति निरिच्छपणाची । प्रत्यक्ष होते महाराज ॥९९॥ स्वामींचें वस्त्र नेसला । पितांबर शिंपी कोंडोलीला । स्वइच्छेने येता झाला । परमभक्त होता जो ॥१००॥ पितांबरानें कोंडोलीसी । बळिरामाच्या शेतासी । वठलेलिया आंब्यासी । पानें फळें आणविली ॥१०१॥ पितांबर राहिला कोंडोलींत । तेथेंच झाला समाधिस्थ । नव मठ झाला स्थापित । शेगांवीं समर्थ इच्छेनें ॥१०२॥ विचार करुनी मानसीं । बसून रेतीच्या गाडीसी । महाराज नव्या मठासी । आले जुन्या मठांतून ॥१०३॥ झ्यामसिंगानें मुंडगांवाला । नेलें गजाननस्वामीला । पर्जन्यानें घोटाळा । भंडार्‍याचा केला असे ॥१०४॥ झ्यामसिंगानें आपुली । इस्टेट समर्था अर्पिली । पुंडलीकाची निमाली । गाठ प्लेगाची श्रीकृपें ॥१०५॥ कथाभाग तेराव्याचा । महारोग गोसाव्याचा । हरण गंगाभारतीचा । केला असें गजाननें ॥१०६॥ बंडुतात्यासी भाग्य आलें । भूमींत धन सांपडलें । कर्जापासून मुक्त केलें । समर्थानें निजकृपें ॥१०७॥ नर्मदेच्या स्नानास । सोमवती अमावास्यास । नौका फुटतां छिद्रास । हात लाविला नर्मदेनीं ॥१०८॥ विडा माधवनाथाला । शिष्याहातीं पाठविला । या कथा चवदाव्याला । वर्णिल्या असती साकल्यें ॥१०९॥ अध्याय तो पंधरावा । शिवजयंतीचा आहे बरवा । आले अकोलें नामक गांवा । टिळक बाळ गंगाधर ॥११०॥ भाकरी प्रसाद पाठविला । कोल्हटकराचे हस्तें भला । मुंबईंत लोकमान्याला । ग्रहण कराया कारणें ॥१११॥ श्रीधर गोविंद काळ्यास । करिते झालें उपदेश । नको जाऊं विलायतेस । येथेंच आहे सर्व कांहीं ॥११२॥ कथा ऐशा सोळाव्यासी । पुंडलीक अंजनगांवासी । जातां निवारिले त्यासी । येऊनिया स्वप्नांत ॥११३॥ पादुकांचा प्रसाद त्याला । झ्यामसिंगहस्तें पाठविला । कवराच्या भाजीभाकरीला । ग्रहण केलें आनंदें ॥११४॥ छरा तुकारामाचा । कानामधून पडला साचा । ह्या अशा कथांचा । समावेश सोळाव्यांत ॥११५॥ सतराव्यांत कथा सुरस । विष्णूसाच्या घरास । जाया मलकापुरास । समर्थ निघाले गाडींतून ॥११६॥ नग्न फिरती म्हणूनी । खटला भरला पोलिसांनीं । केवळ अहंपणानीं । सत्पुरुषासी त्रास द्याया ॥११७॥ महेताबशा सांईला । पाठवून दिलें पंजाबाला । हिंदुयवनांविषयीं केला । कळकळीचा बोध त्यासी ॥११८॥ बापुरावाच्या कांतेसी । भानामती न मानी साची । भेट गंगाभागीरथीसी । झाली अकोटीं विहिरींत ॥११९॥ कथा बायजा माळणीची । अठराव्यामाजीं साची । कवर डॉक्‍टरच्या फोडाची । कथा यांत ग्रंथित असे ॥१२०॥ महाराज गेले पंढरीला । घेऊन अवघ्यां लोकांला । तेथें बापुना काळ्याला । दर्शन हरीचें करविलें ॥१२१॥ कवठे बहादुरचा वारकरी । मरीनें झाला आजारी । त्यास घटकेमाझारीं । समर्थानें बरें केलें ॥१२२॥ एक्या कर्मठ ब्राह्मणाला । श्वान उठवून मेलेला । दावून त्याचा गलित केला । कर्माभिमान श्रोते हो ॥१२३॥ कथा एकोणविसाव्यासी । दिला काशीनाथपंतासी । आशीर्वाद तो अतिहर्षी । तो येतां दर्शना ॥१२४॥ गोपाळ मुकिंद बुटी भला । नागपुरासी घेऊन गेला । श्रीगजाननस्वामीला । आपुल्या गेहाकारणें ॥१२५॥ त्याच्या मनीं ऐसा हेत । महाराज ठेवावें नागपुरांत । परी हरि पाटलांनीं परत । आणिले समर्थ शेगांवीं ॥१२६॥ धार कल्याणचे रंगनाथ । साधु आले भेटण्याप्रत । समर्थांसी शेगांवांत । ऐसे आणि कितीतरी ॥१२७॥ श्रीवासुदेवानंद सरस्वती । जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ति । दृष्टादृष्ट होतां नुसती । आनंद झाला उभयतांतें ॥१२८॥ तेव्हां बाळाभाऊला । जो कां होता संशय आला । तो समर्थांनीं निवटिला । करुनिया उपदेश ॥१२९॥ साळुबाई भक्तीण मठांत । आहे अजूनपर्यंत । घेऊनी डाळ पीठ । स्वयंपाक करी अहोरात्र ॥१३०॥ प्रल्हादबुवा जोशाला । होता कृपेचा योग आला । तो न तया फलद झाला । तयाचिया दुर्दैवें ॥१३१॥ शेवटीं समर्थांचेपाशीं । आत्माराम राहिला आदरेंसी । जलंब गांवचा रहिवासी । प्रत्यहीं सेवेकारण ॥१३२॥ स्वामी दत्तात्रय केदार । दुसरा नारायण जामकर । दुधाहारी बुवा - दुधाचा ज्यांचा आहार । तिघेजण स्वामीचे भक्त निर्वाण ॥१३३॥ केलें खळ्याचें संरक्षण । गाढवांचेपासून । समर्था मारितां आलें मरण । नारायणासी बाळापुरी ॥१३४॥ गजाननाचें कृपे भलें । जाखड्याचें लग्न झालें । कपीलधारेसी दिधलें । दर्शन निमोणकराला ॥१३५॥ तुकारामें आपुला । पुत्र समर्था वाहिला । नारायण नामें भला । सेवा करावयाकारणें ॥१३६॥ पंढरीतें जाऊन । विठ्ठलातें विचारुन । महाराज आले परतून । शेगांवाकारणें ॥१३७॥ पुढें भाद्रपदमासासी । ऋषिपंचमीच्या पुण्य दिवशीं । आधुनिक कालाचा हा ऋषि । समाधिस्थ जहाला ॥१३८॥ विसाव्यामाजीं इतर । श्रींची समाधि झाल्यावर । जे का घडले चमत्कार । त्यांचें वर्णन केलें असे ॥१३९॥ गणपतराव कोठाड्याने । पूजन केलें आनंदानें । दसर्‍याच्या त्या मुहूर्तानें । अभिषेक करून समाधीस ॥१४०लक्ष्मण हरी जांजळासी । अवधूत जयराम खेडकरासी । भेटते झाले पुण्यराशी । संन्याशाच्या वेषानें ॥ १४१संत असामान्य गजानन । ब्रह्मवेत्ता करूणाघन । महापुरामाजीं केलें रक्षण । निजभक्त माधव जोश्याचे ॥१४२यादव गणेश सुभेदारासी । भेटलें भिक्षेकरीरूपें वर्ध्यासी । फायदा झाला त्यास व्यापारासी । श्रीगजानन योगीराजकृपेनें ॥१४३व्यतिपातीं न जाऊं दिलें । शेगांवासी परत आणिले । प्रसाद ग्रहण करण्यासी भलें । भाऊ राजाराम कवराला ॥ १४४रतनसाच्या बालकाला । सोबणीचा रोग झाला । परी तो आरोग्यवंत झाला । समर्थकृपा झाल्यावर ॥१४५॥ कन्या रामचंद्र पाटलाची । चंद्रभागा नांवाची । व्याधिमुक्त झाली साची । हें महत्त्व श्रींच्या तीर्थअंगार्‍याचें ॥१४६॥ तैसेचि रामचंद्राची अंगना । जानकाबाई सुलक्षणा । वातविकार जाऊनियां । निर्दोष ती जाहली ॥१४७॥ राजा नामें पुत्र दादा कोल्हटकराचा । आहे प्रसाद समर्थांचा । श्रीगजाननलीलांचा पार न लागायाचा । संतकृपा अमोल असें खरी ॥१४८॥ जे जे भाविक भक्त कोणी । त्यांना त्यांना अजुनी । दर्शन देती कैवल्यदानी । त्यांच्या इच्छा पुरवून ॥१४९॥ वर्गणीच्या जोरें भलें । समाधीचें काम झालें । मनापासून भक्त झटले । वर्गणी गोळा कराया ॥१५०॥ असंख्य दानशूरांनीं । मोठमोठया रकमा देऊनि । केली मठाची उभारणी । भक्तिस्तव समर्थांच्या ॥१५१धर्मकृत्यें किती तरी । झालीं समर्थांसमोरी । खरे खरेच साक्षात्कारी । श्रीगजाननमहाराज ॥१५२माझा स्वामी गजानन । येऊं न देई कदा विघ्न । भक्तांचें करण्या संरक्षण । मुळींच बसला येथें तो ॥१५३॥ तरी अवघ्या जनांनीं । श्रीगजाननाच्या चरणीं । पूर्ववत् निष्ठा ठेवूनी । सुखालागीं अनुभवावें ॥१५४॥ एकदां तरी वर्षांतून । घ्यावें गजाननाचें दर्शन । एकदां तरी पारायण । करा गजाननचरित्राचें ॥१५५॥ श्रीगजाननस्वामी-चरित । जो नियमें वाचील सत्य । त्याचे पुरतील मनोरथ । गजाननकृपेनें ॥१५६॥ जो या ग्रंथीं ठेवील भाव । त्यासी पावेल स्वामीराव । संकटीं त्याच्या घेईल धांव । रक्षण त्याचें करावया ॥१५७॥ हा ग्रंथ केवळ चिंतामणी । चिंतिलें फळ देईल जाणी । दृढतर विश्वास असल्या मनीं । हें मात्र विसरुं नका ॥१५८॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । नौका होवो भाविकांप्रत । भवसिंधु तरावया ॥१५९॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति एकविंशोऽध्यायः समाप्तः ॥
॥ पुंडलीक वरदा हरिविठ्ठल ॥
॥ सीताकांतस्मरण जयजय राम ॥
॥ पार्वतीपते हरहर महादेव ॥
॥समाप्त॥

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय २०


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय असो समाधिस्थ झाल्यावर । श्रीगजानन साधुवर । म्हणूं लागले नारीनर । आतां काय ह्या शेगांवीं ॥१॥ आतां खेपा शेगांवांत । करणें आहे कीं निमित्त ? । देव नसतां देव्हार्‍यांत । माळा बांधणें व्यर्थची ॥२॥ ऐसें कित्येक बोलती । परी ती असे साच भ्रांती । महाराजांची दिव्य ज्योति । अदृश्य आहे तेच ठायां ॥३॥ जेवीं इंद्रायणीचे तीरीं । ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी । ते आहेत भेटले परी । तेंच ठायीं भाविकां ॥४॥ तैशीच शेगांवांत । श्रीगजाननस्वामी समर्थ । ऐसा जयांचा सिद्धांत । दर्शन त्यांना तेथ होतें ॥५॥ ते विषयींची एक कथा । सांगतों मी येथ आतां । गणपत कोठाडे नामे होता । एक भाविक गृहस्थ ॥६॥ अस्तमानीं प्रति दिवशीं । यावें त्यानें मठासी । बैसोनियां समाधीपासीं । स्तवन करावें एकनिष्ठें ॥७॥ एकदां ऐसें वाटलें त्यास । अभिषेक करून समाधीस । उद्यांच्या विजयादशमीस । ब्राह्मणभोजन घालावें ॥८॥ केली सर्व तयारी । अभिषेकाची साजिरी । शिधा मठाभीतरीं । धाडिला मोठ्या प्रमाणांत ॥९॥ तैं कांता म्हणे हो प्राणनाथा ! । हें तुम्ही काय करितां । हाड नाहीं तुमच्या हातां । खर्च करण्याच्या बाबतींत ॥१०॥ उद्यां आहे विजयादशमी । म्हणून पोरांबाळांसी । कपडे अलंकार अंगासी । करून घाला कांही तरी ॥११॥ हें कांतेचें भाषण । गणपतरावा न रुचलें जाण । तो म्हणे प्रपंचाहून । श्रेष्ठ परमार्थ वाटे मला ॥१२॥ तोच त्याच्या कांतेसी । स्वप्न पडलें रात्रीसी । उगे न छळी पतीसी । तो करतो तें करूं दे ॥१३॥ अभिषेक ब्राह्मणभोजन । हें पारमार्थिक आहे पुण्य । त्याच्यासाठीं वेंचितां धन । तें न जाय अनाठायीं ॥१४॥ पेरलेल्या बीजापरी । त्याची स्थिती होते खरी । म्हणून सांगतों तुला पोरी । अडथळा त्या करूं नको ॥१५॥ ऐशा पाहून स्वप्नास । सांगती झाली पतीस । तेणें गणपतरावास । हर्ष झाला विबुध हो ॥१६॥ आले का हें प्रत्यंतर । महाराज येथेंच साचार । सोडून द्यावा कुविचार । आजपासून कांहीं तरी ॥१७॥ असो गणपतरावानें । पूजन केलें आनंदानें । त्या दसर्‍याच्या मुहूर्तानें । खर्चही केला अत्युतम ॥१८॥ या गणपतरावाची । निष्ठा समर्थपदीं साची । जडली शुद्ध स्वरूपाची । होती पहिल्यापासून ॥१९॥ लक्ष्मण हरी जांजळाला । ऐसाच अनुभव एक वेळां । बोरीबंदरावरी आला । तो ऐका सांगतों ॥२०॥ कांहीं कामानिमित्त । लक्ष्मण गेला मुंबईत । हा समर्थांचा होता भक्त । पहिल्यापासून विबुध हो ॥२१॥ असो बोरीबंदरावरी । लक्ष्मण आला जाया घरीं । तों आगगाडीच्या धक्क्यावरीं । एक भेटला परमहंस ॥२२॥ आजानुबाहु उंच बांधा । दृष्टि नासाग्रासी सदा । ओंकाराचा सर्वदा । जप चालला त्याच्या मुखीं ॥२३॥ तो बोलला लक्ष्मणास । तूं गजाननाचा आहेस शिष्य । ऐसें असून हताश । कां होतोस कळेना ? ॥२४॥ तूं आपुल्या जेव्हां घरीं । पुण्यतिथि केलीस खरी । चारशें पानांची तयारी । करून अमरावतीला ॥२५॥ पुत्रशोक बापटासी । झाला असून प्रसादासीं । तो तुझ्या गेहासी । आला होता ना सांग तें ॥२६॥ पेठकराचे ब्राह्मण भले । सांग कशानें राहिले ? । अरे गजाननस्वामी गेले । त्या उभयतांच्या स्वप्नांत ॥२७॥ उपदेश करून दोघांस । आणिले होतें प्रसादास । हें कैसें विसरलास ? । सांग मला ये वेळीं ॥२८॥ खुणेच्या गोष्टी ऐकून । साशंक झाला लक्ष्मण । म्हणे हा असावा कोण । हें कांहीं कळत नसे ॥२९॥ लक्ष्मणें त्या संन्याशाला । आदरें नमस्कार केला । तो पाहातां पाहातां गुप्त झाला । बोरीबंदर स्टेशनासी ॥३०॥ मग लक्ष्मण येऊन घरीं । वागूं लागला पहिल्यापरी । प्रतिवर्षी आपुल्या घरीं । पुण्यतिथीचा प्रारंभ केला ॥३१॥ अवधूत जयराम खेडकरासी । राहीत साहीत गांवांसी । भेटते झाले पुण्यराशी । संन्याशाच्या वेषानें ॥३२॥ एक माधव मार्तंड जोशी । होता रेव्हेन्यु ऑफिसर । त्याचा गजानन साधुवर । पूर्ण होता भरवंसा ॥३३॥ कळंबासी दिवसभर मोजणी केली । पुढें त्यास इच्छा झाली । अस्तमानाचे समयां भली । शेगांवास जाण्याची ॥३४॥ आज गुरुवारचा आहे दिन । घेऊं समर्थांचें दर्शन । ऐसा विचार करून । आज्ञा केली शिपायाला ॥३५॥ जोड आपुली वेगें दमणी । जाऊं शेगांवालागूनी । रात्र तेथें काढूनी । येऊं सकाळीं परत पुन्हां ॥३६॥ तईं तो शिपाई कुतुबुद्दीन । बोलला कर जोडून । आभाळ आलें भरून । याचा विचार करावा ॥३७॥ जोशी म्हणाले त्यावर । अरे आतां होऊं नदीपार । जा दमणी करी तयार । उगीच सबबी सांगूं नको ॥३८॥ शिपायानें जोडिली दमणी । आला लगेंच घेऊनी । जोशी आंत बैसोनी । जाऊं लागले शेगांवा ॥३९॥ दमणी घातली नदींत । तों पाणी आलें अकस्मात । जाण्या बैल तटाप्रत । अवसर नाहीं राहिला ॥४०॥ झंझावात बळावला । कडकडाट करी चपला । मन नदीला पूर आला । क्षणामाजीं भयंकर ॥४१॥ शिपाई म्हणे कुतुबुद्दीन । साहेब येथेंच आलें मरण । तुम्हां आम्हांलागून । उपाय यासी आतां नसे ॥४२॥ तईं माधव मार्तंड जोशी । घाबरे झाले निजमानसीं । बाहूं लागले समर्थांसी । करुणायुक्त वचानें ॥४३॥ हे समर्थ गजानना । रक्षणा आमुच्या करी प्राणां । अशा संकटीं तुझ्याविणा । त्राता न कोणी आम्हांतें ॥४४॥ जोशी म्हणाले समर्था । अगाध आहे तुझी सत्ता । वाटेल तें करी आतां । तारी अथवा मारी आम्हां ॥४५॥ तो ऐशा महापुरांतूनी । पैल तटा पावली दमणी । उभी राहिली येऊनी । सडकेवरी शेगांवाच्या ॥४६॥ ऐसा प्रकार पाहतां । आनंदले उभयतां । पाहा केवढीं अगाध सत्ता । आहे अवलीया बाबांची ॥४७॥ पुरामाजीं रक्षण केलें । निज भक्तां ना बुडूं दिलें । जोशी शेगांवाप्रती आले । एक घटका रात्रीस ॥४८॥ वंदन केलें समाधीला । पालखीचा पाहिला सोहळा । दुसरे दिवशीं बहुत केला । दानधर्म जोशांनीं ॥४९॥ साकल्य कथिलें वर्तमान । केली विनंती बाळाभाऊलागुन । हे नवसाचे ब्राह्मण । तुम्ही घाला माझ्यास्तव ॥५०॥ एक यादव गणेश सुभेदार । होता हिंगणीचा राहाणार । हा करीतसे व्यापार । वर्‍हाडांत कापसाचा ॥५१॥ यांस एके सालीं भला । दहा हजार तोटा आला । त्या चिंतेनें क्षीण झाला । कांहीं न सुचे मानसीं ॥५२॥ हा एकदां वर्ध्यांत । आला कांहीं कामानिमित्त । उतरण्या गेला घरांत । विनायक असिरकराच्या ॥५३॥ तों इतक्यात तेथें आला । एक भिकारी बुध हो भला । भिक्षां कांहीं मागण्याला । असिरकराच्या घरांत ॥५४॥ पोषाख अवघा मराठी । करामाजीं भव्य काठी । डोईस होती टोपी मोठी । बनातीची मळकट ॥५५॥ कंपवायुनें शरीर । कांपत होतें वरच्यावर । त्यास पाहातां असिरकर । चित्तीं परम कोपले ॥५६॥ जा बेट्या मागल्या द्वारीं । तेथें मिळेल भिक्षा खरी । नको चढूंस पायरी । ओसरीची ये वेळां ॥५७॥ परी हे बोल त्याचे । भिक्षेकरी न मानी साचे । येऊनी वरती ओसरीचे । यादवासन्निध बैसला ॥५८॥ घाल भिक्षा कांहीं तरी । असें म्हणून पुढें करी । भिक्षापात्र भिकारी । यादव सुभेदाराच्या ॥५९॥ त्यातें पाहातां न्याहाळून । तईं तो भासला गजानन । सुभेदाराकारण । शेगांवचा राजयोगी ॥६०॥ तेज मुद्रा बोलणें । होतें समर्थाप्रमाणें । तें पाहून ऐसें म्हणे । सुभेदार निज चित्तीं ॥६१॥ कांहीं असो पैसे दोन । देऊं भिकार्‍याकारण । श्रीगजानन समजून । ऊहापोह ज्याचा नको ॥६२॥ पैसे घेतले भिकार्‍यानें । आणिक कांहीं देई म्हणे । श्रीगजाननाकारणें । शेरणी वाट गुळाची ॥६३॥ ते वायदे करिसी वरचेवर । ते मी न आतां मानणार । तोटा दहा हजार । तुज व्यापारीं आला ना ? ॥६४॥ पुन्हां रुपये काढिले । भिकार्‍यासी अर्पिले । तों इतुक्यांत घरांत गेले । विनायकराव असिरकर ॥६५॥ यादवराव एकटा बसला । होता असिरकराच्या ओसरीला । तें पाहून बोलला । सुभेदारासी येणें रीतीं ॥६६॥ तुझ्या अवघ्या अंगावर । दृष्टि पडूं देई एकवार । माझीं तेणें होईल दूर । व्याधि तुझी यादवा ॥६७॥ रुपये घेऊन भिक्षेकरी । गेला द्वाराच्या बाहेरी । यादवानें बहुतापरी । तपास केला गांवांत ॥६८॥ सुभेदार म्हणे मानसीं । हे समर्थ असल्या आज दिवशीं । फायदा होईल व्यापारासी । कांहींतरी निःसंशय ॥६९॥ तों सुभेदाराच्या । गाड्या आल्या कापसाच्या । विकावयासाठीं साच्या । वर्ध्याचिया बाजारीं ॥७०॥ विक्री होतां किंमत । येती झाली तया बहुत । तेणें यादव चित्तांत । समाधान पावला ॥७१॥ आणि निश्चय ऐसा केला । जो भिकारी भेटला । तो होता समर्थ भला । श्रीगजानन योगीराज ॥७२॥ समर्थ आपुल्या भक्तांसी । रक्षण करती अहर्निशीं । निष्ठा मात्र त्यांचेविषयीं । दृढतर पाहिजे मनांत ॥७३॥ भाऊ राजाराम कवर । खामगांवीं होता डॉक्टर । त्याची तेल्हार्‍यावर । बदली असे जाहली ॥७४॥ म्हणून तेथें जाण्याला । खामगांवाहून निघाला । सहकुटुंब मठांत आला । घ्याया श्रींचें दर्शन ॥७५॥ गाडी केली तेल्हार्‍याची । तयारी केली निघण्याची । वेळ अस्तमानाची । असती झाली ते वेळां ॥७६॥ बाळाभाऊ मठाधिपती । तो त्या बोलला येणें रीति । अहो ऐका माझी विनंती । प्रसाद घेऊन जावें तुम्हीं ? ॥७७॥ ह्यांतून आहे व्यतिपात । हें आणावें मनांत । कवर सांगें त्याप्रत । मला निकड आहे बहु ॥७८॥ बोलल्याप्रमाणें निघाला । तेल्हार्‍यासी डॉक्टर भला । घेऊन मुलांमाणसांला । दमणीमाजीं बसून ॥७९॥ तों चमत्कार ऐसा झाला । तेल्हार्‍याचा रस्ता चुकला । कोणी न भेटे पंथाला । विचारावें कोणा जरी ॥८०॥ गाडी अरुंद रस्त्यावर । दोही बांजूस कांटे फार । गाडी उभी कांठावर । एका भव्य तलावाच्या ॥८१॥ म्हणतां झाला गाडीवाला । साहेब रस्ता आहे चुकला । हें ऐकून कवराला । आश्चर्य वाटलें मानसीं ॥८२॥ तूं तेल्हार्‍याचा म्हणून । तुझी गाडी केली जाण । आडमार्गें आणून । आम्हां कैसें सोडिलें ? ॥८३॥ ऐसें कवर बोलतां । गाडीवाला जोडी हातां । कां हो मजला शिव्या देतां ? । म्यां न अपराध केला कीं ॥८४॥ बैलही ना कोठें वळले । तें नीट येथेंच आले । तलाव पाहातां स्तब्ध झाले । हा न रस्ता तेल्हार्‍याचा ॥८५॥ मग कवर समजला मनांत । हें समर्थाचें आहे कृत्य । प्रसाद घेतल्याविरहित । कां कीं मी निघालों ॥८६॥ बाळाभाऊच्या विनंतीला । मीं नाहीं मान दिला । म्हणून माझा रस्ता चुकला । आतां वाट गवसे कशी ? ॥८७॥ हें भयंकर कानन । येथें मशी त्राता कोण । गजानना ! तुजवांचून । रक्षण माझें कराया ॥८८॥ तों तळ्याच्या दुसर्‍या बाजूला । घांगरमाळांचा आवाज झाला । डॉक्टराच्या कानीं पडला । तेणें आला थोडा धीर ॥८९॥ गाडीवाल्यासी म्हणे कवर । रस्ता नाहीं फार दूर । या चाहुलीचा सुमार । धरून गाडी हाण आतां ॥९०॥ तों हें शेगांवचें शिवार । आहे समजलें साचार । मग म्हणाला डॉक्टर । चाल शेगांवीं परत आतां ॥९१॥ सूर्योदयाचे समायाला । शेगांवासी कवर आला । वृत्तांत बाळाभाऊला । केला सर्व निवेदन ॥९२॥ मग बाळाभाऊ म्हणाले । हेंच आज बरें झालें । व्यतिपातीं न जाऊं दिलें । समर्थांनीं तुम्हांस ॥९३॥ संतांच्या जे असेल मनीं । तेंच येईल घडोनी । भरंवसा त्यांचे चरणीं । ठेवून स्वस्थ असावें ॥९४॥ दुसरे दिवशीं प्रसादासी । घेऊन गेला तेल्हार्‍यासी । आतां पुढील गोष्टीसी । अवधान द्यावें श्रवणातें ॥९५॥ एक रतनसा नामें नर । होता जातीनें भावसार । तयाचा मुलगा दिनकर । होता एक वर्षाचा ॥९६॥ त्यासी सोबणीचा रोग झाला । कोणी म्हणती सटावला । बालक अवघा सुकून गेला । रक्त न राहिलें अंगांत ॥९७॥ वैद्य म्हणती रतनसासी । आतां औषध न देईं यासी । हा तुझ्या हातासी । लागणें आहे अशक्य ॥९८॥ ऐसें ऐकून रतनसा । रडूं लागला ढसढसां । शेवटीं विचार त्यानें ऐसा । केला आपुल्या मानसीं ॥९९॥ येवींतेवी मरतें पोर । माझें आतां साचार । पाहूं करून एकवार । उपाय हा शेवटचा ॥१००॥ हातपाय गार झाले । नेत्रतेज मंदावलें । मनगटाचें सोडिलें । ठिकाण पाहा नाड्यांनीं ॥१०१॥ ऐशा स्थितिमाझारी । रतनसानें पुत्र करीं । घेऊन ठेविला असें द्वारीं । नेऊनिया समर्थांच्या ॥१०२॥ आणि केला त्यांसी नवस । पुत्र माझा उठल्यास । शेरणी वांटीन तुम्हांस । मी पांच रुपयांची ॥१०३॥ तुम्ही पावले अवघ्यांला । त्याचा अनुभव द्यावा मला । मीही आहे आपुला । माझी उपेक्षा करूं नका ॥१०४॥ माझें मूल द्वारांत । तुझ्या जरी झालें मृत । तरी अवघ्या वर्‍हाडांत । तुझी होईल नाचक्की ॥१०५॥ अमृततुल्य तुझी दृष्टि । त्याची करावी आज वृष्टि । नको करूंस मला कष्टी । महापुरुषा गजानना ! ॥१०६॥ त्यास कांहीं वेळ झाला । तों प्रकार ऐसा घडून आला । मूल हातापायांला । हालवावया लागलें ॥१०७॥ नाडी आली ठिकाणीं । रुदन करूं लागलें जाणी । तों प्रकार पाहूनी । लोक सारे आनंदले ॥१०८॥ समर्थकृपा झाल्यावर । राहील कोठून त्या दर ? । सूर्याचिया समोर । तमाचा तो पाड नसे ॥१०९॥ दिनकर थोडे दिवसांत । होता झाला पूर्वतत । नवस असला श्रद्धायुक्त । तो फळे हा न्याय असे ॥११०॥ दादा कोल्हटकरांचा । पुत्र राजा नांवाचा । आहे प्रसाद समर्थांचा । संतकृपा अमोल खरी ॥१११॥ कन्या रामचंद्र पाटलाची । चंद्रभागा नांवाची । ज्वान अठरा वर्षांची । लाडेगांव सासर जिचें ॥११२॥ लाडेगांवाहून माहेरीं । चंद्रभागा आली खरी । प्रसूतीस्तव निर्धारी । जनरीतीप्रमाणें ॥११३॥ मोठ्या कष्टानें प्रसूती । झाली तिची निश्चिती । तोंच चंद्रभागेवरती । ज्वरें अंमल बसविला ॥११४॥ तो होतां नवज्वर । थकून गेले डॉक्टर । औषधउपचार केले फार । आपुल्या मुलीस पाटलांनीं ॥११५॥ थोडाबहुत गुण आला । व्याधि तितक्यापुरता दबला । परी नव्हता मुळींच झाला । नामशेष देहांतूनी ॥११६॥ चंद्रभागा आजारी । पडूं लागली वरच्यावरी । मग पाटलानें केला विचार अंतरी । आतां वैद्य गजानन ॥११७॥ तारो अथवा मारो इसी । अंगारा लावा प्रतिदिवसीं । तीर्थ द्यावें प्यावयासी । समर्थांच्या पायांचें ॥११८॥ पिता मोठा निष्ठावंत । समर्थांवरी अवघा हेत । हळुंहळूं त्या पोरीप्रत । गुण येता जाहला ॥११९॥ तिला उठवत नव्हतें शय्येसी । तीच आली दर्शनासी । पायीं चालत मठासी । हें महत्त्व अंगार्‍याचें ॥१२०॥ निष्ठावंत ज्याचा भाव । तयाशीं पावे देव । उपास्यापदीं भाव । उपासकें ठेवावा ॥१२१॥ रामचंद्राची अंगना । जानकाबाई सुलक्षणा । परी दैवयोग सुटेना । तो भोगल्यांवाचुनी ॥१२२॥ वाताचा झाला विकार । जानकाबाईस साचार । पोट दुखे वरच्यावर । कांहीं उपाय चालेना ॥१२३॥ औषध देतां दबे वात । पुनः उठे पूर्ववत । ऐसा क्रम दिवस बहुत । चालला होता श्रोते हो ॥१२४॥ औषध उपाय बहुत केले । जाणतेही आणविले । गंडे बहुत बांधिले । करीं जानकाबाईच्या ॥१२५॥ पाटील बिचारा सारें करी । कांता बरी न होय परी । विचार त्यानें अखेरीं । ऐशा रीतीं ठरविला ॥१२६॥ वैद्य आतां गजानन । जाणता आतां गजानन । देव ऋषि आतां गजानन । तो जें वाटेल तें करो ॥१२७॥ माझी बायको सून त्याची । ही भावना माझी साची । आतां अन्य उपायांची । गरज नाहीं आम्हांला ॥१२८॥ तूं उद्यांपासून । प्रातःकाळीं करी स्नान । मठामाजीं जाऊन । घाली प्रदक्षिणा समाधीसी ॥१२९॥ तें तिनें पतीचें वचन । सर्वथैव केलें मान्य । समर्थ समाधीलागून । घालूं लागली प्रदक्षिणा ॥१३०॥ गेल्या न त्या मात्र वायां । दया आली सद्‌गुरुराया । वातविकार जाऊनियां । निर्दोष ती जाहली ॥१३१॥ खर्‍या खर्‍या संतांची । सेवा न जाई वायां साची । परी निष्ठा मानवाची । जडणें तेथें अशक्य ॥१३२॥ समर्थांच्या नंतर । बाळाभाऊ गादीवर । बसले त्यांचे चमत्कार । कांहीं थोडे जाहले ॥१३३॥ हे वैशाख वद्य षष्ठीसी । शेगांवीं गेले वैकुंठासी । त्यांच्यामागून गादीसी । बसले येऊन नारायण ॥१३४॥ कांहीं दिवस यांनींही । अधिकार चालविला ते ठायीं । यांची समाधि झाली पाही । चैत्र शुद्ध षष्ठीला ॥१३५॥ पूर्वसुकृतावांचून । संतसेवा न घडे जाण । संतसेवेचें महत्पुण्य । त्या पुण्या पार नसे ॥१३६॥ श्रीगजाननलीलेचा । पार कधीं न लागायाचा । अंबरीच्या चांदण्यांचा । हिशेब कोणा न लागे कधीं ॥१३७॥ त्यानें जें जें वदविलें । तें तें मीं कथित केलें । लेखणीनें अक्षर लिहिलें । परी तें न तिचें सामर्थ्य ॥१३८॥ त्यांच्या कृपेंकरून । मीं हें केलें लेखन । येथें माझें मोठेपण । कांहींच नाहीं विबुध हो ! ॥१३९॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति विंशोऽध्यायः समाप्तः ॥

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय १९


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय महाराज असतां शेगांवांत । विप्र एक काशिनाथ । जो खंडेरावाचा होय सुत । गर्दे उपनांव जयाचें ॥१॥ तो आला दर्शना । समर्थांच्या वंदिले चरणां । मूर्ति पाहून त्याच्या मना । आनंद झाला अतिशय ॥२॥ माझें भाग्य धन्य धन्य । म्हणून हें पाहण्या चरण । आलों खामगांवाहून । त्याचें सार्थक झालें कीं ॥३॥ तों समर्थांनीं लीला केली । कोपरखिळी मारिली । काशीनाथाच्या पाठीस भली । आपुल्या परमकृपेनें ॥४॥ जा तुझा हेत पुरला । वाट पाहे तारवाला । या भाषणें घोंटाळला । काशिनाथ मानसीं ॥५॥ त्याचें गूढ कळेना । पुसण्या छाती होईना । निमुटपणें वंदून चरणा । गेला निघून खामगांवीं ॥६॥ तों तारवाला शिपाई । उभा दारांत होता पाही । तार घेतली घाई घाई । कशाची ती बघण्यास ॥७॥ तारेंत हा मजकूर । तुमचा केला तक्‍रुर । मुनसफीच्या हुद्द्यावर । मोर्शी तालुक्याकारणें ॥८॥ तें पाहतां आनंदला । कोपरखिळीचा अर्थ कळला । त्या काशिनाथपंताला । पहा संतांचें ज्ञान कैसें ? ॥९॥ असो एकदां नागपुरीं । समर्थांची गेली स्वारी । गोपाळ बुटीचीया घरीं । त्याच्या अति आग्रहानें ॥१०॥ बुटीचा ऐसा विचार । या सीताबर्डीवर । महाराज ठेवावे निरंतर । जाऊं न द्यावें शेगांवा ॥११॥ शेगांव पडलें भणभणीत । अवघे लोक दुःखित । विनविती हरी पाटलाप्रत । महाराज येथें आणा हो ॥१२॥ तुम्हीं नागपुराप्रती जावें । समर्थांसी घेऊन यावें । आम्हां अवघ्यांस सुखवावें । हीच आहे विनंति ॥१३॥ इकडे बुटीच्या घरांत । आजुर्दे राहिले संत । जेवीं हस्तिनापुरांत । कृष्ण नाहीं आनंदला ॥१४॥ महाराज म्हणती बुटीसी । जाऊं दे मज शेगांवासी । या आपुल्या भव्य सदनासी । ठेवून आम्हां घेऊं नको ॥१५॥ तें बुटी मुळींच मानीना । समर्था जाऊं देईना । अनागोंदीचा रामराणा । बुटी वाटे निःसंशय ॥१६॥ बुटी भाविक होता जरी । अहंता नव्हती गेली खरी । श्रीमंतीचा गर्व भारी । त्याच्या ठाईं वसतसे ॥१७॥ रोज ब्राह्मणभोजन । समर्थांपुढें सदा भजन । परी शेगांवचे येत जन । बंदी त्या तो करीतसे ॥१८॥ शेगांवचे लोक भले । जरी आणावया गेले । परी न कांहीं उपाय चाले । गेले तसेंच आले परत ॥१९॥ इकडे भक्त पाटील हरी । कांहीं मंडळीं बरोबरी । घेऊन निघाला नागपुरीं । समर्थांसी आणावया ॥२०॥ बसला अग्निरथांत । त्याच वेळीं वदले संत । त्या गोपाळ बुटीप्रत । येणें रीति तें ऐका ॥२१॥ अरे गोपाळा ! पाटील हरी । निघाला यावया नागपुरीं । तो येण्याच्या आंत परी । मला येथून जाऊं दे ॥२२॥ तो येथें आल्यावर । शांतता नाहीं राहणार । तो पडला जमेदार । याचा विचार करावा ॥२३॥ हरी पाटील तेथें आला । शिपायानें अटकाव केला । परी तो न त्यानें मानिला । प्रवेश केला सदनांत ॥२४॥ गोपाळ बुटीचिया घरीं । पंगत होती थोर खरी । पाटील आल्याच्या अवसरीं । आले ब्राह्मण भोजना ॥२५॥ असो हरी पाटील सदनांत । आले समर्था नेण्याप्रत । तों महाराज निघाले धांवत । द्वारीं त्यास भेटावया ॥२६॥ चाल हरी शेगांवासी । येथें मुळीं न राहणें मसी । तूं आलास न्यावयासी । हें फार बरें झालें ॥२७॥ समर्थ जाऊं लागले । तें गोपाळाने पाहिलें । अनन्यभावें चरण धरिले । समर्थांचे येऊन ॥२८॥ विक्षेप माझा गुरुराया ! । नका करुं या समया । दोन घांस घेऊनियां । इच्छित स्थला मग जावें ॥२९॥ तैसेंच बुटी पाटलासी । बोलूं लागले विनयेसी । तुम्ही घेऊन प्रसादासी । जावें हेंच मागणें ॥३०॥ येथें न रहाती महाराज । हें समजून आलें आज । पंक्तित माझी राखा लाज । तुम्हीच पाटील येधवां ॥३१॥ आत्तांच समर्थ गेले जरी । लोक उपाशी उठतील तरी । आणि अवघ्या नागपुरीं । टीका माझी होईल पहा ॥३२॥ भोजनें होईपर्यंत । महाराज राहिले तेथ । शेगांवची समस्त । मंडळी पंक्तीस जेवली ॥३३॥ भोजनोत्तर तयारी । निघण्याची ती झाली खरी । दर्शनाची भीड भारी । झाली बुटीच्या वाड्यांत ॥३४॥ कुटुंब गोपाळ बुटीचें । जानकाबाई नांवाचें । परम भाविक होते साचें । गृहलक्ष्मीच होती जी ॥३५॥ तिनें केली विनवणी । महाराजांचे चरणीं । माझा हेतु मनींच्या मनीं । बसूं पहातो गुरुराया ! ॥३६॥ तईं महाराज बोलले । तुझ्या मना मीं जाणीतलें । ऐसें म्हणून लाविलें । कुंकूं तिच्या कपाळास ॥३७॥ आणखी एक पुत्र तुला । परम सद्‌गुणी होईल भला । अंती जाशील वैकुंठाला । सौभाग्यासह बाळे तूं ॥३८॥ ऐसा आशीर्वाद देऊन । निघते झाले दयाघन । त्या सीताबर्डीहून । आले रघूजीच्या घरीं ॥३९॥ हा भोसला राजा रघूजी । उदार मनाचा भक्त गाजी । ज्यानें ठेविला राम राजी । आपुल्या शुद्ध वर्तनें ॥४०॥ त्याचें लौकीकीं राज्य गेलें । जें अशाश्वत होतें भलें । शाश्वत स्वरुपाचें आलें । सद्‌गुरुभक्तीचें राज्य घरा ॥४१॥ उत्तम प्रकारचा आदर । केला राजानें साचार । त्याचा घेऊन पाहुणचार । रामटेकासी गेले पुढें ॥४२॥ तेथें रामाचें दर्शन । घेऊन आले परतून । शेगांवच्या मठा जाण । हरी पाटलासमवेत ॥४३॥ धार-कल्याणचे रंगनाथ । जे थोर साधु मोंगलाईंत । होते ते भेटण्याप्रत । समर्था आले शेगांवीं ॥४४॥ अध्यात्माचीं बोलणीं । सांकेतिक केलीं दोघांनीं । त्याचा भावार्थ जाणण्या कोणी । तेथें नव्हता समर्थ ॥४५॥ श्रीवासुदेवानंदसरस्वती । कर्ममार्गीं ज्याची प्रीति । कृष्णातटाका ज्यांची महती । माणगांवीं जन्म ज्यांचा ॥४६॥ ते येण्याचे अगोदर । बाळाभाऊस साचार । बोलते झाले गुरुवर । स्वामी गजानन सिद्धयोगी ॥४७॥ अरे बाळा उदयिक । माझा बंधु येतो एक । मजलागीं भेटण्या देख । त्याचा आदर करावा ॥४८॥ तो आहे कर्मठ भारी । म्हणून उद्यां पथांतरीं । चिंध्या न पडूं द्या निर्धारी । अंगण स्वच्छ ठेवा रे ॥४९॥ ऐसें बाळास आदलें दिवशीं । सांगते झाले पुण्यराशी । तों एक प्रहर दिवसासी । स्वामी पातले ते ठायां ॥५०॥ एकमेकांसी पाहतां । दोघे हंसले तत्त्वतां । हर्ष उभयतांच्या चित्ता । झाला होता अनिवार ॥५१॥ स्वामी जेव्हां मठांत आले । तेव्हां गजानन होते बैसले । आपल्या पलंगावरी भले । चिटक्या करानें वाजवीत ॥५२॥ स्वामी येतां चिटकी थांबली । दृष्टादृष्ट दोघां झाली । तैं स्वामींनीं विचारिली । आज्ञा परत जावया ॥५३॥ फार बरें म्हणून । गजाननें तुकविली मान । स्वामी गेले निघून । बाळास कौतुक वाटलें ॥५४॥ बाळा म्हणे गुरुराया । हें दृश्य पाहूनियां । संशय उपजला चित्ता ठायां । त्याची निवृत्ति करा हो ॥५५॥ त्यांचा मार्ग अगदीं भिन्न । तुमच्या ह्या मार्गाहून । ऐसें साच असून । तुमचा बंधु कसा तो ? ॥५६॥ ऐसा प्रश्न ऐकिला । समर्थ देती उत्तर त्याला । बरवा प्रश्न बाळा केला । त्वां हा आज आम्हांतें ॥५७॥ ईश्वराकडे जाण्याचे । तीन मार्ग असती साचे । हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे । गांवा जाऊन मिळतात ॥५८॥ स्वरुपें त्यांचीं भिन्न भिन्न । दिसतीं पाहणारांकारण । तेणें घोटाळा वरितें मन । पाहाणारांचें राजसा ! ॥५९॥ सोंवळें ओंवळें संध्यास्नान । व्रत उपोषणें अनुष्ठान । या कृत्यांलागून । अंगें म्हणावीं कर्माचीं ॥६०॥ हीं अंगें जो आचरी । निरालसपणें खरीं । तोच समजावा भूवरी । ब्रह्मवेत्ता कर्मठ ॥६१॥ अधिक न्यून येथें होतां । कर्ममार्ग न ये हातां । म्हणून विशेष तत्परता । ठेविली पाहिजे आचरणीं ॥६२॥ आतां भक्तिमार्गाचें । ऐक हें लक्षण साचें । भक्तिपंथानें जाणाराचें । मन पाहिजे शुद्ध अती ॥६३॥ मलीनता मनाठायीं । अंशेंही राहिल्या पाही । त्याच्या हातां येत नाहीं । भक्तिरहस्य बापा रे ! ॥६४॥ दया प्रेम लीनता । अंगीं पाहिजे तत्त्वतां । श्रवणीं पूजनीं आस्था । पाहिजे त्याची विशेष ॥६५॥ मुखामाजीं नामस्मरण । करणें हरीस जाणून । ऐशीं अंगें असतीं जाण । या भक्तिमार्गाला ॥६६॥ या अंगासह जो भक्ती करी । त्यालाच भेटे श्रीहरी । भक्तिमार्गाची न ये सरी । त्याचा विधी सोपा असे ॥६७॥ परी तो करण्या आचरण । कर्माहून कठीण जाण । जेवीं गगनाचें जवळपण । नेत्रालागीं दिसतसे ॥६८॥ आतां योगमार्ग तिसरा । सांगतों मी ऐक खरा । या योगमार्गाचा पसारा । दोघांपेक्षां जास्त असे ॥६९॥ परी हा पसारा निश्चयेंसी । आहे ज्याचा त्याचे पासीं । योगमार्ग साधण्यासी । बाहेरचें न कांहीं लागे ॥७०॥ जेवढें आहे ब्रह्मांडांत । तेवढें आहे पिंडांत । त्या पिंडांतील साहित्य । घेऊन योग साधावा ॥७१॥ आसनें रेचक कुंभक । इडापिंगलेचे भेद देख । धौती मुद्रा त्राटक । कळलें पाहिजे मानवां ॥७२॥ कुंडली आणि सुषुम्ना । यांचें ज्ञान पाहिजे जाणा । आधी योग करणारांना । तरीच तो साधेल ॥७३॥ या तिन्ही मार्गांचें । अंतिम फळ ज्ञान साचें । परी तें ज्ञान प्रेमाचें । वीण असतां कामा नये ॥७४॥ मुक्कामास गेल्यावर । मार्गांचा न उरें विचार । जो मार्गी चालतो नर । महत्त्व त्याचें त्यास वाटे ॥७५॥ या तिन्ही मार्गांचे ते पांथ । मुक्कामीं पोंचल्या होती संत । मग तयांच्या संबंधांत । द्वैत नसे एतुलेंही ॥७६॥ वसिष्ठ, वामदेव, जमदग्नी । अत्री, पाराशर, शांडिल्य मुनी । हे कर्ममार्गाच्या सेवनीं । मुक्कामासी पोंचले ॥७७॥ व्यास, नारद, कयाधू-कुमर । मारुती, शबरी, अक्रूर । उद्धव, सुदामा, पार्थ, विदूर । हे गेले भक्तिमार्गें ॥७८॥ श्रीशंकराचार्य गुरुवर । मच्छिंद्र, गोरख, जालंदर । हे चढले जिना थोर । या योगमार्गाचा ॥७९॥ जो वसिष्ठा लाभ झाला । तोच विदुराच्या पदरीं पडला । तोच मच्छिंद्रानें भोगिला । फळामाजीं फरक नसे ॥८०॥ आम्ही हीं भावंडें सारीं । येतें झालों भूमीवरी । कैवल्याच्या मार्गावरी । भाविक आणून सोडावया ॥८१॥ जें ज्याला आवडेल । तिकडे तो जाईल । आणि मोक्षरुपी भोगील फल । त्या त्या पंथा आचरोनी ॥८२॥ आतां नको पुसूंस कांहीं । हें न कोणा सांगे पाही । निवांत बसूं दे ये ठायीं । पिसेंपणाच्या पासोडीनें ॥८३॥ ज्याची निष्ठा बसेल । वा, जो माझा असेल । त्याचेंच कार्य होईल । इतरांची ना जरुर मला ॥८४॥ ऐसा उपदेश ऐकिला । बाळाभाऊच्या नेत्रांला । प्रेमाश्रूंचा लोटला । पूर तो न आवरे त्या ॥८५॥ मौनेंच केला नमस्कार । श्रीगजानन साधु थोर । वर्‍हाड प्रांताचा उद्धार । करावयासी अवतरला ॥८६॥ साळुबाई नांवाची । एक असे कण्व शाखेची । ती होती महाराजांची । मनापासून भक्तिण ॥८७॥ तिला महाराज एके दिनीं । ऐशा परी वदले वाणी । डाळ पीठ घेऊनी । स्वयंपाक करी अहोरात्र ॥८८॥ जे येतील तयांना । साळु घाल भोजना । येणेंच तूं नारायणा । प्रिय होशील निःसंशय ॥८९॥ प्रल्हादबुवा जोशाला । होता कृपेचा योग आला । तो न तया फलद झाला । तयाचिया दुर्दैवें ॥९०॥ खामगांवच्या सान्निध्यासी । जलंब गांव परियेसीं । त्या गांवचा रहिवासी । तुळसीराम एक असे ॥९१॥ पुत्र हा तुळसीरामाचा । आत्माराम नांवाचा । होता तैलबुद्धीचा । वेदाध्ययनीं प्रेम ज्याचें ॥९२॥ हा धर्मपीठ वाराणसी । जी भागीरथीच्या तटा काशी । तेथें गेला अध्ययनासी । वेदवेदांग स्मृतीच्या ॥९३॥ प्रत्यहीं भागीरथीचें स्नान । माधुकरीचें सेवी अन्न । गुरुगृहातें जाऊन । करी अध्ययन श्रुतीचें ॥९४॥ स्वदेशीं येतां शेगांवासी । गेला असे अति हर्षी । हजिरी ती द्यावयासी । श्रीगजाननमहाराजा ॥९५॥ तो वेदविद्येचा जाणता । गजानन केवळ ज्ञानसविता । आत्माराम वेद म्हणतां । कोठें कोठें चुकतसे ॥९६॥ त्या चुकीची दुरुस्ती । करुं लागले सदगुरुमूर्ती । आत्मारामाचे संगतीं । वेद म्हणती महाराज ॥९७॥ ऐकतां त्यांचें वेदाध्ययन । तन्मय होती विद्वान । शेवटीं समर्थांचे सेवेकारण । आत्माराम राहिला आदरेंसी ॥९८॥ प्रत्यहीं सेवेकारण । यावें त्यानें जलंबाहून । चुकविला ना एकही दिन । ऐसा एकनिष्ठ भक्त तो ॥९९॥ समर्थांच्या पश्चात । हाच होता मठांत । पूजा अर्चा करण्याप्रत । सद्‌गुरुंच्या समाधीची ॥१००॥ मोबदला न घेतां भली । एकनिष्ठ सेवा केली । शेवटीं त्यानेंच अर्पिली । इस्टेट आपली महाराजा ॥१०१॥ इस्टेट अल्प साचार । एक जमीन एक घर । येथें न दृष्टि किंमतीवर । देणें आहे भाग पहा ॥१०२॥ स्वामी दत्तात्रय केदार । दुसरा नारायण जामकर । निवळ दुधाचा ज्यांचा आहार । तो दुधाहारी बुवा ॥१०३॥ ऐसे श्रोते तिघेजण । स्वामीचे भक्त निर्वाण । ज्यांनीं आपुलें तनमन । समर्थचरणीं अर्पिलें ॥१०४॥ मोरगांव भाकरे नांवाचा । गांव बाळापूर तालुक्याचा । तेथील मारुतीपंत पटवार्‍याचा । वृत्तान्त ऐका थोडासा ॥१०५॥ श्रोते ! त्या मोरगांवांत । मारुतीपंताच्या शेतांत । पिकाचें रक्षण करण्याप्रत । तिमाजी नामें माळी होता ॥१०६॥ तो माळी खळ्याभीतरीं । निजला निशीच्या अवसरीं । गाढ झोंप लागली खरी । ते अवसरीं तयाला ॥१०७॥ उलटून गेले दोन प्रहर । कुंभाराचे दहावीस खर । खळ्यांत येऊनी दाण्यावर । पडले असती पांड्याच्या ॥१०८॥ हा पांड्या मारुतीपंत । महाराजांचा होता भक्त । म्हणून सद्‌गुरुरायाप्रत । लीला करणें भाग आलें ॥१०९॥ क्षणांत जाऊनी मोरगांवासी । हांक मारिली तिमाजीसी । अरे ! जागा होई त्वरेंसी । रासेसी गाढवें पडलीं ना ॥११०॥ ऐसें मोठयानें बोलून । तिमाजीस जागे करुन । महाराज पावले अंतर्धान । खळ्यामधून तेधवां ॥१११॥ तिमाजी उठून पाहतां । गाढवें दिसलीं तत्त्वतां । म्हणे काय करुं आतां । मालक रागे भरेल कीं ॥११२॥ तो विश्वासला माझ्यावर । मी निजता झालों निसूर । रास ही निम्यावर । खाऊन टाकली गाढवांनीं ॥११३॥ कांहीं असो चुकीची । माफी मागितली पाहिजे साची । उदार बुद्धि मारुतीची । आहे तो क्षमाच करील ॥११४॥ ऐसें मनाशीं बोलून । उदयास येतां नारायण । तिमाजी गांवांत येऊन । पाय धरी पंताचे ॥११५॥ गाढवांनी रास खाल्ली । नुकसानी पाहिजे पाहिली । खळ्यामाजीं जाऊनि भली । म्हणजे मज वाटेल बरें ॥११६॥ मारुती म्हणाले त्यावर । खळ्यांत यावया साचार । वेळ ना मला तिळभर । मी निघालों शेगांवा ॥११७॥ दर्शन घेऊन सद्‌गुरुचें । त्या गजानन महाराजांचें । उद्यां सकाळीं धान्याचें । काय झालें तें पाहीन ॥११८॥ ऐसें बोलून शेगांवाला । मारुतीपंत येतां झाला । दर्शनासाठीं मठांत गेला । दहा अकराचे सुमारास ॥११९॥ मारुतीनें दर्शन । घेतां केलें हास्यवदन । तुझ्यासाठीं मजकारण । त्रास झाला रात्रीसी ॥१२०॥ तुम्ही माझे भक्त होतां । मला राखण्या लावितां । झोपाळू नोकर ठेवितां । आणि आपण निजतां खुशाल घरीं ॥१२१॥ ऐसी खूण पटतांक्षणीं । मारुतीनें जोडून पाणि । मस्तक ठेवूनियां चरणीं । ऐसें वचन बोलला ॥१२२॥ ब्रह्मांडाचें संरक्षण । आपण करितां येथून । लेंकरासाठीं त्रास पूर्ण । माता सोसी वरच्यावरी ॥१२३॥ मी लेंकरुं आपुलें । म्हणूनियां आपण केलें । खळ्यांत तें जाऊन भलें । मोरगांवीं संरक्षण ॥१२४॥ ऐसीच कृपा निरंतर । स्वामी असावी माझ्यावर । आतांच जाऊन करितों दूर । नोकरीवरुन तिमाजीला ॥१२५॥ ऐसें बोलतां मारुती । कौतुक वाटलें समर्थांप्रती । आणि भाषण केलें येणें रीतीं । तें आतां अवधारा ॥१२६॥ छे ! छे ! वेड्या ! तिमाजीस । नको मुळींच काढूंस । नोकरीवरुन खास । तिमाजी नोकर इमानी ॥१२७॥ ऐसें गुरुवचन ऐकिलें । मारुतीसी चोज जहालें । पहा संतांचें कर्तृत्व भलें । कैसें आहे अगाध ॥१२८॥ शके अठराशें सोळासी । महाराज बाळापुरासी । असतां गोष्ट झाली ऐसी । ती थोडकी सांगतों ॥१२९॥ तेथें सुखलाल बन्सीलालाची । एक बैठक होती साची । त्या बैठकीसमोर महाराजांची । स्वारी बैसली आनंदांत ॥१३०॥ मूर्ति अवघी दिगंबर । वस्त्र नव्हतें तिळभर । त्या पाहून भाविक नर । नमन करुन जात होते ॥१३१॥ तो होता हमरस्ता । बाजारपेठेचा तत्त्वतां । त्या पंथानें जात होता । एक पोलिस हवालदार ॥१३२॥ नांव त्या हवालदाराचें । नारायण आसराजी होतें साचें । समर्था पाहून डोकें त्याचें । फिरुन गेलें तात्काळ ॥१३३॥ तो म्हणे हा नंगा धोत । मुद्दाम बसला पंथांत । साधू ना हा भोंदू सत्य । त्याची उपेक्षा न करणें बरी ॥१३४॥ ऐसें बोलून जवळीं गेला । अद्वातद्वां बोलूं लागला । लाज कैसी नाहीं तुजला । नंगा बसतोस रस्त्यावरी ॥१३५॥ हे घे त्याचें प्रायश्चित्त । तुला मी देतों आज येथ । ऐसें बोलून स्वामीप्रत । मारुं लागला छडीनें ॥१३६॥ वळ पाठपोटावरी । उठते झाले निर्धारी । परी ना हवालदार आवरी । मारता हात आपुला ॥१३७॥ ऐसें तेधवां पाहून । एक गृहस्थ आला धांवून । आपुल्या दुकानामधून । हुंडीवाला नाम ज्याचें ॥१३८॥ तो म्हणे हे हवालदार । तूं विचार कांहीं कर । उगेंच सत्पुरुषावर । हात टाकणें बरें नव्हे ॥१३९॥ कां कीं, संतांचा कैवारी । एक आहे श्रीहरी । वळ त्यांच्या पाठीवरी । उठले ते कां न दिसले तुला ? ॥१४०॥ हें तूं आज केलें । हें न कांहीं बरें झालें । अजून तरी उघडी डोळें । माफी माग गुन्ह्याची ॥ १४१॥ हवालदार म्हणे माफीचें । कारण मसीं न मागण्याचें । कावळ्याचे शापें साचें । काय ढोरें मरतील ! ॥ १४२॥ तेंच पुढें सत्य झालें । हवालदार पंचत्व पावले । त्या बाळापूर नगरींत भले । आपण केलेल्या कृत्यानें ॥ १४३॥ एका पंधरवड्यांत । हवालदाराचे अवघे आप्त । होते झाले भस्मीभूत । एका साधूस मारल्यानें ॥१४४॥ नगर जिल्ह्यांत संगमनेर । प्रवरा नदीचे कांठावर । तेथें हरी जाखडी असे विप्र । ऐका त्याचा वृत्तान्त हा ॥१४५॥ हा हरी जाखडी माध्यंदिन । होता यजुर्वेदी ब्राह्मण । गांवोगांव फिरुन । पोट आपुलें भरीतसे ॥१४६॥ तो फिरत फिरत शेगांवासी । आला समर्थ दर्शनासी । बसतां झाला पायांपासीं । श्रीगजानन स्वामींच्या ॥१४७॥ तईं हरी म्हणे चित्तासी । हा केवढा ज्ञानरासी । येऊनियां पायांपासीं । विन्मुख जाणें भाग मला ॥१४८॥ संग्रहासी नाहीं धन । शेतवाडा मळा जाण । मी ना मुळींच विद्वान । मला कन्या कोण देईल ? ॥१४९॥ हे स्वामी गजानना । सच्चिदानंदा दयाघना ! । संसारसुखाची वासना । जहालीं मनीं बलवत्तर ॥१५०॥ ऐसें जो इच्छी मनांत । तोंच त्याच्या अंगावर्त । थुंकते झाले सद्‌गुरुनाथ । इच्छेस त्याच्या जाणूनी ॥१५१॥ पहा जगाची रीत कैसी । अवघेच इच्छिती संसारासी । सच्चिदानंद श्रीहरीसी । पहाण्या न कोणी तयार ॥१५२॥ ऐसें आपणासी बोललें । पुन्हां जाखड्यासी पाहिलें । जें जें तूं इच्छिलें । सांप्रतकालीं मनांत ॥१५३॥ तें तें अवघें होईल पूर्ण । पुत्रपौत्र तुजलागून । होतील संग्रहासी धन । तेंही थोडकें राहील ॥१५४॥ जा आतां परत घरा । सुखें करी संसारा । करीत असावा परमेश्वरा । आठव वेड्या ! विसरुं नको ॥१५५॥ ऐसें तयासी बोलून । प्रसाद म्हणून थोडकें धन । दिलें हरी जाखड्याकारण । लग्न स्वतःचें करावया ॥१५६॥ हरी जाखड्या संगमनेरीं । सुखी जहाला संसारीं । महाराजाची वाणी खरी । ती कोठून खोटी होईल ॥१५७॥ ऐसाच एक निमोणकर । गोविंदाचा कुमार । रामचंद्र नामें साचार । ओव्हरसिअरच्या हुद्यावरी ॥१५८॥ असो एक्या पर्वणीसी । निमोणकर गेले कपिलधारा तीर्थासी । योगाभ्यास थोडा यासी । येत होता विबुध हो ॥१५९॥ तो पूर्ण व्हावा म्हणून । इच्छित होतें त्याचें मन । गोसावी बैराग्यालागून । पुसूं लागला तेथल्या ॥१६०॥ नाहीं नाहीं माहीत मात । ऐकूं येई सर्वत्र । तेणें निमोणकर चित्तांत । हताश पूर्ण जहाला ॥१६१॥ काय करुं देवा आतां । मला योगाभ्यास शिकवितां । कोठें भेटेल तत्त्वतां । ती कृपा करुन सांगणें ॥१६२॥ तो कपीलधारेवरी । एक पुरुष देखिला अधिकारी । ज्याचे हात गुडघ्यावरी । येऊन सहज लागले ॥१६३॥ उंच बांधा मुद्रा शांत । बैसला होता ध्यानस्थ । त्यास घातले दंडवत । निमोणकरानें अष्टांगेंसी ॥१६४॥ बराच वेळ झाला जरी । योगी न कांहीं बोले परी । अस्तमानाची वेळ खरी । समीप येऊं लागली हो ॥१६५॥ तैं निमोणकर म्हणे समर्था ! । अंत माझा किती पहातां । ठाऊक असल्या योगगाथा । मशीं कांहीं शिकवा हो ॥१६६॥ तो अखेर अस्तमानीं । बोलते झाले कैवल्यदानी । हा चित्रपट घेऊनी । जा आपुलें काम करी ॥१६७॥ षोडशाक्षरी त्यावर । मंत्र लिहिला आहे थोर । त्याचा वाणीनें निरंतर । जप आपुला करावा ॥१६८॥ मंत्रप्रभावें थोडा बहुत । योग येईल तुजप्रत । योगमार्ग हा अत्यंत । कठीण सर्व योगामध्यें ॥१६९॥ नेटाचा केला यत्‍न । ब्रह्मचर्य संभाळून । येतील दहापांच आसन । धौती नौती केल्यावरी ॥१७०॥ जा पुढें न विचारी मला । हा घे देतों प्रसाद तुला । ऐसें बोलून उचलिला । एक तांबडा खडा करें ॥१७१॥ तो देऊनियां मजसी । गुप्त झालें पुण्यरासी । तेंच पुढें नाशिकासी । गंगेवरी भेटले त्या ॥१७२॥ महाराज माझा कंटाळा । कांहो ! आपणच कां केला ? । आपुल्या नांव गांवाला । न सांगतांच गेला कीं ॥१७३॥ महाराज डोळे वटारुन । बोलते झाले त्याकारण । तांबडा खडा देऊन । नांव माझें कथिलें म्या ॥१७४॥ नर्मदेचा गणपती । तांबडा असतो निश्चिती । तूं मूळचाच मूढमती । रहस्य त्याचें न जाणिलें ॥१७५॥ म्हणून त्याचें गूढ तुला । पडतें झालें जाण मुला ! । मी रहातों शेगांवाला । गजानन हें नांव माझें ॥१७६॥ धुमाळ सदनापर्यंत । चाल माझ्या समवेत । ऐसें बोलूनी झाले गुप्त । चहूंकडे पाहूं लागले निमोणकर ॥१७७॥ कंटाळून अखेरी । धुमाळाच्या आले घरीं । तों गजानन महाराज ओसरीवरी । बसले ऐसें पाहिले ॥१७८॥ मौनेंच करुन वंदन । कथिलें धुमाळाकारण । कपीलधारेपासून । जें कां झालें इथवरी ॥१७९॥ तें ऐकून धुमाळाला । अतिशय आनंद जहाला । तो म्हणे योगीराजाला । वाण कशाची सांग मज ॥१८०॥ जो तांबडा खडा तुसी । दिला तो ठेवून पाटासी । करणें पूजा अर्चेसी । सद्भावें निरंतर ॥१८१॥ योगाभ्यास ही समोरी । त्या खड्याच्या आदरें करी । त्याच्या कृपेनें कांहीं तरी । योगाभ्यास येईल ॥१८२॥ तेंच पुढें झालें सत्य । योगाभ्यास थोडाबहुत । आला निमोणकराप्रत । श्रीगजाननकृपेनें ॥१८३॥ एक शेगांवचा रहिवासी । तुकाराम कोकाटे परियेसी । त्याची संतति यमसदनासी । जाऊं लागली उपजतांच ॥१८४॥ म्हणून त्यानें समर्थांला । एकदां नवस ऐसा केला । जरी देशील संततीला । दीर्घायुषी गुरुराया ॥१८५॥ तरी एक मुलगा त्यांतून । तुसी करीन अर्पण । मनोरथ त्याचें पूर्ण । केले श्रीगजाननस्वामींनें ॥१८६॥ दोन तीन मुलें झालीं । परी नवसाची न राहिली । आठवण तुकारामा भली । संततीच्या मोहानें ॥१८७॥ तो थोरला मुलगा नारायण । रोग झाला त्याकारण । औषधोपचार केलें जाण । परी न आला गुण कांहीं ॥१८८॥ नाडी बंद होऊं लागली । नेत्रांची ती दृष्टि थिजली । धुगधुगी मात्र उरली । होती त्याच्या छातीला ॥१८९॥ ती स्थिती पाहून । तुकारामा झाली आठवण । नवस केल्याची ती जाण । एकदम त्या समयाला ॥१९०॥ तुकाराम म्हणे गुरुराया । हा पुत्र माझा वांचलिया । अर्पण करीन सदया । सेवा तुमची करण्यास ॥१९१॥ ऐसा वचनबद्ध होतां क्षणीं । नाडी आली ठिकाणीं । हळुहळुं नेत्र उघडोनी । पाहूं लागला बाल तो ॥१९२॥ व्याधि बरी झाल्यावर । तो नारायण नामे कुमार । आणून सोडला मठावर । नवस आपला फेडावया ॥१९३॥ तो नारायण अजूनी । आहे तया ठिकाणीं । बोलिलेला नवस कोणी । महाराजांचा चुकवूं नये ॥१९४॥ असो पुढें आषाढमासीं । महाराज गेले पंढरीसी । घेऊन हरी पाटलासी । विठ्ठलासी भेटावया ॥१९५॥ जो जगदाधार जगत्पति । वेद ज्याचे गुण गाती । जो संतांच्या वसे चित्तीं । रुक्मिणीपती दयाघन ॥१९६॥ पंढरीस आले गजानन । चंद्रभागेचें केलें स्नान । गेलें घ्याया दर्शन । पांडुरंगाचें राऊळीं ॥१९७॥ हे देवा पंढरीनाथा । हे अचिंत्या अद्वया समर्था । हे भक्तपरेशा रुक्मिणीकांता । ऐक माझी विनवणी ॥१९८॥ तुझ्या आज्ञेनें आजवर । भ्रमण केलें भूमिवर । जे जे भाविक होते नर । त्यांचे मनोरथ पूर्ण केले ॥१९९॥ आतां अवतारकार्य संपलें । हें तूं जाणसी वहिले । पुंडलीक वरदा विठ्ठले । जाया आज्ञा असावी ॥२००॥ देवा ! मी भाद्रपदमासीं । जावया इच्छितों वैकुंठासी । अक्षय्यीचे रहावयासी । तुझ्या चरणांसन्निध ॥२०१॥ ऐसी करुन विनवणी । समर्थांनीं जोडिले पाणि । अश्रु आले लोचनीं । विरह हरीचा साहवेना ॥२०२॥ हरी पाटील जोडून हातां । पुसूं लागला पुण्यवंता । अश्रु कां हो सद्‌गुरुनाथा । आणिले लोचनीं ये वेळां ? ॥२०३॥ महाराज म्हणाले त्यावर । हरी पाटलाचा धरुन कर । सांगितले तरी न कळणार । त्याचें वर्म बापा तुला ॥२०४॥ तो विषय खोल भारी । तूं न पडावें त्या भीतरीं । इतकेंच सांगतों श्रवण करी । संगत माझी थोडी असे ॥२०५॥ चाल आतां शेगांवाला । तूं आपल्या ठिकाणाला । तुमच्या पाटील वंशाला । कांहीं न कमी पडेल ॥२०६॥ पंढरीचें मावंदें केलें । शेगांवामाजी भलें । चित्त चिंतेनें व्याप्त झालें । मात्र हरी पाटलाचें ॥२०७॥ पुढें श्रावणमास गेला । क्षीणता आली तनूला । पुढें भाद्रपदमास आला । काय झालें तें ऐका ॥२०८॥ गणेश चतुर्थीचे दिवशीं । महाराज म्हणाले अवघ्यांसी । आतां गणपती बोळवण्यासी । यावें तुम्हीं मठांत ॥२०९॥ कथा गणेशपुराणांत । ऐशापरी आहे ग्रंथित । चतुर्थीच्या निमित्त । पार्थिव गणपती करावा ॥२१०॥ त्याची पूजा अर्चा करुन । नैवेद्य करावा समर्पण । दुसरे दिवशीं विसर्जून । बोळवावा जलामध्यें ॥२११॥ तो दिवस आज आला । तो साजरा पाहिजे केला । या पार्थिव देहाला । तुम्ही बोळवा आनंदें ॥२१२॥ दुःख न करावें यत्किंचित । आम्हीं आहों येथें स्थित । तुम्हां सांभाळण्याप्रती सत्य । तुमचा विसर पडणें नसे ॥२१३॥ हें शरीर वस्त्रापरी । बदलणें आहे निर्धारी । ऐसें गीताशास्त्रांतरीं । भगवान् वदला अर्जुना ॥२१४॥ जे जे ब्रह्मवेत्ते झाले । त्यांनीं त्यांनीं ऐसेंच केले । शरीरवस्त्रांसी बदलिलें । हें कांहीं विसरुं नका ॥२१५॥ चतुर्थीचा अवघा दिवस । आनंदामाजीं काढिला खास । बाळाभाऊच्या धरिलें करास । आसनीं आपल्या बसविलें ॥२१६॥ मी गेलों ऐसें मानूं नका । भक्तींत अंतर करुं नका । कदा मजलागीं विसरुं नका । मी आहे येथेंच ॥२१७॥ ऐसें भाषण करुन । योगें रोधिला असे प्राण । दिला मस्तकी ठेवून । त्या महात्म्या पुरुषानें ॥२१८॥ शके अठराशें बत्तीस । साधारणनाम संवत्सरास । भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवारी प्रहर दिवसाला ॥२१९॥ प्राण रोधितां शब्द केला । ’जय गजानन’ ऐसा भला । सच्चिदानंदीं लीन झाला । शेगांवामाझारीं ॥२२०॥ देहाचें तें चलनवलन । पार गेलें मावळोन । स्वामी समाधिस्थ पाहून । लोक हळूहळूं लागले ॥२२१॥ पुकार झाली गांवांत । स्वामी झाले समाधिस्थ । ऐसी ऐकतां मात । हृदय पिटती नारीनर ॥२२२॥ गेला गेला साक्षात्कारी । चालता बोलता श्रीहरी । गेला गेला कैवारी । आज दीनजनांचा ॥२२३॥ अहो गजाननस्वामी समर्था ! । आतां आम्हांस कोण त्राता ? । कां रे इतक्यांत पुण्यवंता । गेलास आम्हां सोडून ? ॥२२४॥ मार्तंड पाटील, हरी पाटील । विष्णुसा, बंकटलाल । ताराचंद प्रेमळ । भक्त स्वामींचा जो असे ॥२२५॥ श्रीपतराव कुळकर्णी । मठामाजीं जमले जाणी । विचार केला अवघ्यांनीं । ऐशा रीतिं श्रोते हो ॥२२६॥ आज आहे पंचमीचा दिवस । समाधि न द्या स्वामीस । हाळोपाळीच्या लोकांस । येऊं द्या हो दर्शना ॥२२७॥ ज्यांच्या नशिबीं असेल । तयांना दर्शन घडेल । नका करुं आतां वेळ । जासूद धाडा चोहींकडे ॥२२८॥ गोविंदशास्त्री डोणगांवचे । एक विद्वान् होते साचे । ते बोलिले आपुल्या वाचें । सर्व लोकांस येणें रीतिं ॥२२९॥ त्यांच्या आवडत्या भक्तांसी । ते दर्शन देतील निश्चयेंसी । तोंपर्यंत प्राणासी । मस्तकीं धारण करतील ॥२३०॥ त्याची प्रचीति पहावया । नको कोठें लांब जाया । पहा लोणी ठेवूनियां । येधवां मस्तकीं स्वामींच्या ॥२३१॥ लोणी ठेवितां शिरावरी । तें पघळूं लागलें निर्धारीं । जो तो त्याचें कौतुक करी । बल हें योगशास्त्राचें ॥२३२॥ तो प्रकार पहातां । गोविंदशास्त्री झाला बोलतां । एक दिवसाची काय कथा । हे राहतील वर्षभर ॥२३३॥ निःसंशय ऐशा स्थितींत । परी हें करणें अनुचित । आवडते अवघे आलिया भक्त । समाधि द्या स्वामीला ॥२३४॥ तें अवघ्यांस मानवलें । स्वामींपुढें आदरें भलें । भजन त्यांनीं मांडिलें । हजार टाळ जमला हो ॥२३५॥ दूरदूरच्या भक्तांप्रत । स्वामी जाऊन स्वप्नांत । आपुल्या समाधीची मात । कळविते झाले विबुध हो ॥२३६॥ तया ऋषिपंचमीला । अपार मेळा मिळाला । लोकांचा तो शेगांवाला । घ्याया दर्शन स्वामींचें ॥२३७॥ रथ केला तयार । दिंड्या आल्या अपार । सडे घातले रस्त्यावर । गोमयाचे बायांनी ॥२३८॥ मूर्ति ठेविली रथांत । मिरवणूक निघाली आनंदात । रात्रभरी शेगांवांत । तो ना थाट वर्णवे ॥२३९॥ तुळशी बुक्का गुलाल फुले । भक्त उधळूं लागले । फुलांखाली झाकून गेले । श्रीगजानन महाराज ॥२४०॥ बर्फी पेढ्यांस नाहीं मिती । लोक वांटिती खिरापती । कित्येकांनी रथावरती । रूपये पैसे उधळीले ॥२४१॥ ऐशी मिरवणूक रात्रभर । शेगांवी निघून अखेर । उदयास येता दिनकर । परत आली मठांत ॥२४२॥ समाधीच्या जागेवरी । मूर्ति नेऊन ठेविली खरी । रूद्राभिषेक केला वरी । अखेरचा देहाला ॥२४३॥ पूजा केली पंचोपचार । आरती उजळली अखेर । भक्तांनी केला नामगजर । गजाननाचे नांवाचा ॥२४४॥ जय जय अवलिया गजानना ! । हे नरदेहधारी नारायणा ! । अविनाशरूपा आनंदघना ! । परात्परा जगत्पते ॥२४५॥ ऐशा भजनाभीतरीं । मूर्ति ठेविली आसनावरी । उत्तराभिमुख साजिरी । शास्त्रमार्गाप्रमाणें ॥२४६॥ अखेरचे दर्शन । अवघ्यांनी घेतले जाण । ’जय स्वामी गजानन’ । ऐसें मुखें बोलोनी ॥२४७॥ मीठ अर्गजा अबीर । यांनी ती भरली गार । शिळा लावूनी केलें द्वार । बंद भक्तांनी शेवटीं ॥२४८॥ दहा दिवसपर्यंत । समाराधना चालली तेथ । घेऊन गेले असंख्यात । लोक स्वामींच्या प्रसादा ॥२४९॥ खरोखरीच संतांचा । अधिकार तो थोर साचा । सार्वभौम राजाचा । पाड नाही त्यांच्या पुढे ॥२५०॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति एकोनविंशोऽध्यायः समाप्तः ॥