Feb 11, 2022

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय १२


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय असो बच्चुलाल अग्रवाला । होता एक आकोल्याला । धन-कनक-संपन्न भला । मनाचाही उदार जो ॥१॥ त्यानें हकिकत कारंज्याची । म्हणजे लक्ष्मणपंत घुड्याची । कर्णोपकर्णी ऐकिली साची । तेणें साशंक जहाला ॥२॥ तें खरें खोटें पहाण्यास । विचार करी चित्तास । तों एके समयास । महाराज आले अकोल्याला ॥३॥ येऊन बच्चुलाला घरीं । बैसते झाले ओट्यावरी । कीं गजानन साक्षात्कारी । भक्त आपुला जाणून ॥४॥ बच्चुलाला आनंद झाला । तो समर्थांसी ऐसें वदला । आज गुरुराया वाटतें मला । आपली पूजा करावी ॥५॥ ऐसें ऐकतां भाषण । समर्थे तुकविलीं मान । जें साक्षात् असें चिन्ह । श्रोते संमती दिल्याचें ॥६॥ बच्चुलालानें तयारी । तात्काळ केली ओट्यावरी । षोडशोपचारे अत्यादरीं । पूजन त्यानें आरंभिलें ॥७॥ प्रथमतः घातलें मंगलस्नान । नानाविध उटणीं लावून । मग करविलें परिधान । वस्त्र पीतांबर जरीचा ॥८॥ शालजोडी अंगावरीं । बहुमोल घातली काश्मिरी । एक जरीचा रुमाल शिरीं । अभ्रेस्मी आणून बांधिला ॥९॥ गोफ घातिला गळ्यांत । सलकडीं तीं हातांत । कराच्या दाही बोटांत । मुद्रिका घातल्या नानापरी ॥१०॥ बहुमोल हिर्‍याची । वामकरी घातिली पौची । रत्नजडित कंठ्याची । कंठीं शोभा विशेष ॥११॥ जिलबी राघवदास पेढे । नैवेद्यास ठेविलें पुढें । त्रयोदश गुणी ठेविलें विडे । एक्या लहान तबकांत ॥१२॥ अष्टगंध अर्गजा अत्तर । सुवासिक लाविलें फार । त्यानें अवघ्या अंगभर । गुलाबपाणी शिंपडीलें ॥१३॥ एका सुवर्णाच्या ताटीं । दक्षिणा ठेविली शेवटीं । ती होती फार मोठी । रुपये होन मोहोरांची ॥१४॥ बेरीज करता दहा हजार । येईल ती साचार । ऐशी दक्षिणा होती थोर । किती वर्णन करूं तिचें ॥१५॥ श्रीफळ पुढें ठेवून । विनये केलें भाषण । महाराज माझें इच्छी मन । राममंदिर बांधावया ॥१६॥ या माझ्या ओट्यावरी । अडचण होतसे भारी । मंडप तो घातला जरी । उत्सवासी गुरुराया ॥१७॥ त्या माझ्या मनोरथा । पूर्ण करी ज्ञानवंता । ऐसे म्हणून ठेविला माथा । अनन्यभावें पायांवरी ॥१८॥ त्यावरी साधु गजानन । देते झाले आशीर्वचन । श्रीजानकीजीवन । तुझा करील पूर्ण हेतू ॥१९॥ असो, आज तूं हें काय केलें ? । मला पोळ्याचा बैल बनविलें । हे अलंकार घालून भलें । त्याचें काय कारण ? ॥२०॥ ऐसें म्हणून काढिले । दागिने अंगावरचे भले । चहूं बाजूंस फेकियले । वस्त्रांचीही तीच गती ॥२१॥ दोन पेढे खाऊन । निघून गेले गजानन । हा प्रकार अवलोकून । केला शोक अकोल्यांत बहुतांनीं ॥२२॥ त्यांत कांहीं कारंज्याचे । लोक हजर होते साचें । ते म्हणती आपुल्या वाचें । अभागी आमुचा लक्ष्मण ॥२३॥ त्यानें बच्चुलालापरी । पूजन केलें आपुल्या घरीं । परी कचरला अंतरीं । मोह धनाचा धरून ॥२४॥ हा बच्चुलाल धन्य धन्य । जैसें केलें भाषण । तैसेंच ठेविलें वर्तन । जवाहून न आगळें ॥२५॥ आतां याच्या वैभवाला । ओहोट हा ना शब्द उरला । संतकृपा झाली ज्याला । तो सुखीच राहातसे ॥२६॥ असो एक पितांबर नांवाचा । शिष्य शिंपी जातीचा । होता गजानन महाराजांचा । शेगांवीं मठामध्यें ॥२७॥ त्यानें सेवा बहुत केली । तपश्चर्या फळा आली । एके दिनीं ऐसी झालीं । गोष्ट ऐका मठांत ॥२८॥ फाटकें तुटकें धोतर । नेसला होता पितांबर । तें पाहून गुरूवर । ऐशा रीतीं बोलले ॥२९॥ अरे तुझें नांव पितांबर । नेसण्या न धडकें धोतर । ढुंगणास पाहाती नारीनर । तें तरी झांक वेड्या ! ॥३०॥ तेंच नेसून बैससी । ढुंगण जगाला दाविसी । हा घे दुपेटा देतो तुसी । नेसावयाकारणें ॥३१॥ पितांबरा दुपेटा नेसला । हें असह्य झालें इतरांना । भाऊच घातकी भावाला । होतो स्वार्थ दृष्टीनीं ॥३२॥ त्यापरीच होते येथें । त्यांच्या शिष्यमंडळींते । काहीं शिष्य पितांबरातें । टोचूं लागले निरर्थक ॥३३॥ हेंच कां तुझें शिष्यपण । वस्त्र करिसी परिधान । जें कां समर्थांकारण । ल्यावयाच्या उपयोगी ॥३४॥ तैं पितांबर म्हणाला । मी न गुरूचा अपमान केला । उलट मान ठेविला । आज्ञा ऐकून तयांची ॥३५॥ वस्त्र हें मज त्यांनीं दिलें । नेसावया सांगितलें । तेंच मी हो परिधान केलें । ही कां झाली अवज्ञा ? ॥३६॥ ऐसी भवति न भवति झाली । शिष्यांत तेढ माजली । ती मिटवावया माव केली । ऐशा रीतीं गजाननें ॥३७॥ पितांबरास म्हणती गुरुवर । तूं येथून जावें दूर । जाणतें मूल झाल्यावर । आई त्याला दूर ठेवी ॥३८॥ माझी कृपा आहे खरी । हे पितांबरा तुजवरी । जा हिंडून भूमीवरी । पदनतासी तारावें ॥३९॥ डोळ्यांत आसवें आणून । करूनिया साष्टांग नमन । मागे पाहें फिरफिरून । सोडून जातां मठासी ॥४०॥ पितांबर आला कोंडोलीसी । बसला वनांत आंब्यापासी । चिंतन चालले मानसी । निजगुरुचें सर्वदा ॥४१॥ तेथें होता रात्रभर । उदया येतां दिनकर । जाऊन बसला झाडावर । मुंगळ्यांचिया त्रासानें ॥४२॥ अवघ्या आम्रवृक्षावरी । मुंग्या मुंगळे होते भारी । लहान थोर फांद्यांवरी । आला पितांबर जाऊन ॥४३॥ परी निर्भय ऐसे सांपडेना । स्थान तयासी बसण्या जाणा । हेंच कृत्य गुराख्यांना । कौतुकास्पद वाटलें ॥४४॥ लहान सान फांदीला । निर्भयपणें फिरून आला । परी नाहीं खाली पडला । हेंच आहे आश्चर्य ! ॥४५॥ दुसरा म्हणाला यांत कांहीं । आश्चर्य वाटण्याजोगें नाहीं । श्रीगजाननाच्या शिष्यांठायीं । ऐसे सामर्थ्य असते रे ॥४६॥ यावरून हा त्यांचा । शिष्य असावा खचित साचा । चला हा येथ आल्याचा । वृत्तांत सांगू गांवात ॥४७॥ गोपमुखें वृत्त कळलें । कोंडोलीचे लोक आले । आम्रवृक्षापासीं भले । कोण आलें तें पहावया ॥४८॥ एक मनुष्य पुढे झाला । पितांबरासी पुसूं लागला । तूं कोण कोठील कशास आला ? । गुरू तुझा कोण असे ? ॥४९॥ पिंतांबर बोले त्यावर । मी शेगांवचा राहणार । मी शिंपी पितांबर । शिष्य गजानन स्वामींचा ॥५०॥ त्यांची आज्ञा मजलागून । करण्या झाली पर्यटन । म्हणून येथें येऊन । वृक्षापाशी बैसलो ॥५१॥ ऐसें ऐकतां तद्भाषण । लोक कोपले दारूण । अरे मोठ्याचें नांव सांगून । चेष्टा ऐशा करूं नको ॥५२॥ देशमुख त्या गांवींचा । शामराव नामें साचा । तो बोलला ऐसी वाचा । अरे सोंगाड्या ऐक हें ॥५३॥ स्वामी समर्थ गजानन । प्रत्यक्ष आहे भगवान । त्यांचें नांव सांगून । बट्टा त्यांना लावूं नको ॥५४॥ अरे वेड्या एक्या काळीं । त्यांनीं ऐसी कृति केली । ऋतु नसतां आणवलीं । फळें आम्रवृक्षाला ॥५५॥ त्यांनीं फळें आणवली । तूं नुसतीं पानें आण भलीं । नाहीं तरी या स्थलीं । तुझी न धडगत लागेल ! ॥५६॥ हा बळीराम पाटलाचा । वृक्ष वठलेला आंब्याचा । तो पर्णयुक्त करी साचा । आमच्या देखत ये काळीं ॥५७॥ नको करूं उशीर । हा आंबा करी हिरवागार । तें ऐकतां पितांबर । गेला असे घाबरून ॥५८॥ बोलला ऐसें नाडूं नका । माझी सारी कथा ऐका । एका खाणींत निघती देखा । हिरे आणि गारा हो ॥५९॥ गारेवरून खाणीस । नाही येत जगीं दोष । मी निज गुरूच्या नांवास । चोरून कैसें ठेवावें ? ॥६०॥ शामराव म्हणे त्यावर । नको करूं चरचर । संकट शिष्यांस पडता थोर । ते धांवा करिती सद्‌गुरुंचा ॥६१॥ मग तो शिष्य त्यांचा जरी । नसला कृतीनें अधिकारी । तरी सद्‌गुरुंचा प्रभाव करी । साह्य त्या आपुल्या शिष्यास ॥६२॥ निरुपाय होऊनी अखेर । पितांबरानें जोडिले कर । स्तवन मांडिलें अपार । आपुल्या सद्‌गुरुरायांचें ॥६३॥ हे स्वामी समर्थ गजानना ! । ज्ञानांबरीच्या नारायणा । पदनताच्या रक्षणा । धांव आतां ये काळीं ॥६४॥ माझ्यामुळें दोष तुला । येऊं पहातो भक्तपाला । आपुल्या ब्रीदासाठी पाला । आणीव आम्रवृक्षासी ॥६५॥ आतां न माझा अंत पाही । गुरुराया ! धांव घेई । या वठलेल्या वृक्षाठायीं । आणी पर्णे कोमल ॥६६॥ लोकांस म्हणे पीतांबर । करा सद्‌गुरुंचा नामगजर । जय जय गजानन साधुवर । शेगांवच्या अवलिया ॥६७॥ लोक अवघे गजर करिती । तों पालवी फुटली वृक्षाप्रती । जन नयनी पाहती । त्या अगाध कौतुकाला ॥६८॥ काही चिमटे घेऊन पाहाती । तों निमाली स्वप्नभ्रांति । यावरी कोणी ऐसे म्हणती । ही नजरबंदी असेल ! ॥६९॥ तोही भ्रम निमाला । तोडून पहातां पर्णाला । फांदीवाटें तात्काळ आला । चीक शुभ्रसा बाहेर ॥७०॥ मग मात्र खात्री झाली । वाळल्या वृक्षा पालवी फुटली । श्रीगजानन माऊली । खरीच आहे महासंत ॥७१॥ आतां पितांबराविशीं । शंका न धरणें मानसीं । चला घेऊन गांवासी । हा त्यांचा शिष्य असे ॥७२॥ याच्यायोगें करून । कधीं तरी गजानन । येतील कोंडोलीकारण । वांसरासाठीं गाय जैसी ॥७३॥ तें अवघ्यांसी मानवलें । पितांबरासी मिरवीत नेलें । ऐसें जेव्हां दिव्य झालें । तेंव्हा भाव उदेला ॥७४॥ श्रोते अजूनपर्यंत । तो आंबा आहे कोंडोलीत । इतरांपेक्षां असंख्यांत । फळे येती तयाला ॥७५॥ मठ पितांबराचा । कोंडोलींत झाला साचा । आणि अंतही तयाचा । ते ठायीं झाला हो ॥७६॥ आतां इकडे शेगांवांत । महाराज आपुल्या मठांत । एके दिनीं उद्विग्न चित्त । होऊनिया बैसले ॥७७॥ तैं महाराज वाणी निघाली । तुमच्या गांवांत आहे दुफळी । मला कोणाची जागा मुळीं । नको येथें रहावया ॥७८॥ जी कोणाची नसेल । ऐसी जागा जरी द्याल । तरीच राहणें होईल । माझें या शेगांवीं ॥७९॥ ऐसी गोष्ट ऐकिली । तेव्हां मंडळीं चिंतावली । समर्थांनीं आज्ञा केली । मोठ्या पेंचाची आपणां ॥८०॥ कोणाच्या जागेंत । राहाण्या तयार नाहींत । सरकार यांच्या प्रीत्यर्थ । जागा ती देईल कशी ? ॥८१॥ समर्थें केलें भाषण । काय हें तुमचें अज्ञान । जमिनीची मालकी पूर्ण । आहे सच्चिदानंदाची ॥८२॥ जागा मिळेल प्रयत्न करितां । पुढें नका बोलूं आतां । हरी पाटलाच्या हातां । यश येईल निःसंशय ॥८३॥ हरी पाटलाकडे आली । मंडळी ती अवघी भली । त्याच्या सल्ल्यानें मागितली । जागा अर्ज करून ॥८४॥ बुलढाण्याचा सर्वाधिकारी । साहेब होता नामें ' करी ' । त्यानें एक एकर जागा खरी । अर्जावरून दिली असे ॥८५॥ आणि ऐसें म्हणाला । तुम्ही दोन एकरास्तव अर्ज केला । परी मी तूर्त तुम्हांला । एक एकर देतसे ॥८६॥ तुम्ही एक वर्षात । जागा केल्या व्यवस्थित । तुमचा मी पुरवीन हेत । जागा आणिक देऊनिया ॥८७॥ मग हरी पाटील, बंकटलाला । निघते झाले वर्गणीला । द्रव्यनिधी क्षणांत जमला । आणि काम झाले सुरूं ॥८८॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति द्वादशोध्यायः समाप्तः ॥

No comments:

Post a Comment