ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय ॥ बाळकृष्णाच्या सदनासी । समर्थ आले दुसरे वर्षी । त्या बाळापुरासी । दासनवमीकारणें ॥१॥ या वेळीं बरोबर । होते पाटील भास्कर । बाळाभाऊ, पितांबर । गणू, जगदेव, दिंडोकार ॥२॥ उत्सव दासनवमीचा । सांग झाला तेथ साचा । दैवयोग भास्कराचा । तेथेंच आला ओढवून ॥३॥ एक कुत्रें पिसाळलेलें । भास्करा येऊन चावलें । तेणें लोक इतर भ्याले । म्हणती आतां हा पिसाळेल ॥४॥ भास्कर म्हणे ते अवसरीं । वैद्याची ना जरुर खरी । माझा डॉक्टर आसनावरी । बैसला आहे गजानन ॥५॥ त्याचकडे मजला न्यावें । वृत्त अवघें कळवावें । ते सांगतील तें ऐकावें । आपला हेका करुं नका ॥६॥ गजाननाचे समोर । आणिला पाटील भास्कर । बाळाभाऊनें समाचार । अवघा समर्थांस श्रुत केला ॥७॥ तो अवघा ऐकून । महाराज वदले हासून । हत्या, वैर आणि ऋण । हें कोणासी चुकेना ॥८॥ हें कुत्रें निमित्त झालें । तुझें आयुष्य मुळींच सरलें । आतां पाहिजे प्रयाण केलें । तूं या सोडून मृत्यूलोकां ॥९॥ पूर्वजन्मीचें उर्वरित । भास्कराचें न उरलें सत्य । तो अवघ्यापून झाला मुक्त । मोक्षास जायाकारणें ॥१०॥ आतां मी इतकेंच करितों । दोन महिने वांचवितों । याला न पिसाळूं देतों । श्वानविषापासून ॥११॥ तें न मीं केलें जरी । हा जन्मास येईल पुन्हां परी । दोन महिने भूमिवरी । उरलें आयुष्य भोगावया ॥१२॥ भास्कर बोले त्यावरी । मी अजाण सर्वतोपरी । जें असेल अंतरीं । आपुल्या तेंच करावें ॥१३॥ ऐसें ऐकतां भाषण । संतोषले गजानन । खर्याप्रती समाधान । खरें बोलतां होतसे ॥१४॥ ऐसें ज्ञान ऐकिलें । तें कित्येकांस नाहीं पटलें । मात्र बाळाभाऊ आनंदले । त्या बोधातें ऐकुनी ॥१५॥ भास्करा, तूं धन्य धन्य । संतसेवा केलीस पूर्ण । चुकलें तुझें जन्ममरण । काय योग्यता वानूं तुझी ? ॥१६॥ ऐसा प्रकार झाल्यावरी । मंडळी आली शेगांवनगरीं । भास्कर बोले मधुरोत्तरीं । महाराजांच्या भक्तगणां ॥१७॥ बाळापूरची हकीकत । सांगे प्रत्येका इत्थंभूत । माझी विनंती जोडून हात । हीच तुम्हां भास्कर म्हणे ॥१८॥ महाराज लाधलें शेगांवा । याचा विचार करावा । या कीर्तीचा अमोल ठेवा । सांभाळा स्मारक करुन ॥१९॥ त्यांना स्मारकाची जरुर नाहीं । ते पुढीलांसाठीं पाही । तें स्मारक साक्षी देई । त्यांच्या अमोल साधुत्वाची ॥२०॥ संतसेवा कधींही । अनाठायीं जाणार नाहीं । इच्छा जयाची ज्या ज्या होई । ती ती संत पुरविती ॥२१॥ ऐसेंच स्मारक करण्याची । शपथ वाहा समर्थांची । ही विनंती अखेरची । माझी ती मान्य करा ॥२२॥ तें अवघ्यांनीं कबूल केलें । भास्कराचें स्थिरावलें । यायोगें तें चित्त भलें । रुखरुख मनाची संपली ॥२३॥ उत्तरोत्तर आनंदवृत्ती । भास्कराची वाढत होती । जैसीं लेंकुरें आनंदती । पुढील सणाच्या आशेनें ॥२४॥ माघ वद्य त्रयोदशीस । महाराज वदले भास्करास । चाल त्र्यंबकेश्वरास । जाऊं आपण शिवरात्रीला ॥२५॥ तो त्र्यंबकराजा कर्पूरगौर । भवभवांतक भवानीवर । जो आहे झाला स्थिर । गोदावरीच्या तटातें ॥२६॥ त्या ब्रह्मगिरीवर स्थित । आहेत पहा गहिनीनाथ । ज्यांना आहेत अवगत । गुणधर्म औषधींचे ॥२७॥ भास्कर म्हणे गुरुनाथा । आतां औषधी कशाकरतां ? । तुमची आहे अगाध सत्ता । औषधीहून आगळी ॥२८॥ आपुल्या कृपेनें भलें । विष बाळापुरींच निमालें । आयुष्याचे आहेत उरले । दोन महिनेच आतां कीं ॥२९॥ गोदावरी तुमचे चरण । तेथेंच मी करी स्नान । अन्य तीर्थांचें प्रयोजन । मला न आतां राहिलें ॥३०॥ ऐसी ऐकतां त्याची वाणी । समर्थ वदले हांसोनी । हें जरी खरें जाणी । तरी तीर्थमहिमा मानावा ॥३१॥ चाल नको करुं उशीर । पाहूं तो त्र्यंबकेश्वर । बाळाभाऊ, पितांबर । यांसही घे बरोबरी ॥३२॥ मग ती मंडळी निघाली । शेगांवाहून भलीं । शिवरात्रीस येती झाली । त्र्यंबकेश्वराकारणें ॥३३॥ कुशावर्ती केलें स्नान । घेतलें हराचें दर्शन । गंगाद्वारां जाऊन । पूजन केलें गौतमीचें ॥३४॥ वंदिली माय निलांबिका । तेवीं गहिनीनाथ देखा । तेथून आले नाशिका । गोपाळदासास भेटावया ॥३५॥ गोपाळदासास आनंद झाला । बोलले जवळच्या मंडळीला । आज माझा बंधु आला । वर्हाडांतून गजानन ॥३६॥ नारळ आणि खडीसाखर । ठेविली स्वामींसमोर । ती पाहून गुरुवर । ऐसें बोलले भास्कराला ॥३७॥ माझें येथील काम झालें । आतां नाशकाचें राहिलें । म्हणून पाहिजे तेथें गेले । धुमाळ वकीलाच्या घरा ॥३८॥ तेथें राहून कांहीं दिवस । महाराज आले शेगांवास । तो अडगांवीं नेण्यास । झ्यामसिंग पातला ॥३९॥ त्यानें आग्रह केला फार । समर्थें दिलें उत्तर । रामनवमी झाल्यावर । येऊं आम्ही अडगांवा ॥४०॥ तो आला तैसा परत गेला । आपुल्या त्या अडगांवाला । पुन्हां श्रोते येतां झाला । रामनवमीस शेगांवीं ॥४१॥ उत्सव करुन शेगांवांत । समर्थांना शिष्यांसहित । आला घेऊन अडगांवांत । हनुमानजयंतीकारणें ॥४२॥ अडगांवीं असतां समर्थस्वारी । चमत्कार झाले नानापरी । एके दिवशीं दोन प्रहरीं । भास्कर लोळविला फुपाट्यांत ॥४३॥ छातीवरी बैसून । भास्करा केलें ताडन । लोक पहाती दुरुन । परी जवळी कोणी जाईना ॥४४॥ बाळाभाऊ जवळ होता । तो म्हणाला सद्गुरुनाथा । भास्करासी सोडा आतां । बेजार झाला उन्हानें ॥४५॥ तैं म्हणाला भास्कर । बाळाभाऊ न जोडा कर । माझा हा साक्षात् ईश्वर । काय करील तें करुं दे ॥४६॥ लोकांसी वाटती चापटया दिल्या । मला होतात गुदगुल्या । अनुभवाच्या गोष्टी भल्या । अनुभवीच जाणती ॥४७॥ पुढें घेऊन भास्करासी । महाराज आले बिर्हाडासी । त्या अडगांव ग्रामासी । उतरलेल्या ठिकाणास ॥४८॥ बाळाभाऊस बोलले । अवघे आतां दोन उरले । भास्कराचे दिवस भले । पंचमीला जाईल तो ॥४९॥ तुजला या भास्करानीं । मारविलें होतें छत्रीनीं । शेगांवीं माझ्या करांनीं । तें आहे कां ध्यानांत ? ॥५०॥ तें क्रियमाण नासावया । त्यास मारिलें ये ठायां । ह्या एकाच गोष्टीवांचूनिया । अन्य नव्हता हेत कांहीं ॥५१॥ उत्सवाचा काला झाला । वद्य पंचमी दिवस आला । एक प्रहर दिवसाला । समर्थ म्हणती भास्करासी ॥५२॥ भास्करा तुझें प्रयाण । आज दिवशीं आहे जाण । पद्मासन घालून । पूर्वाभिमुख बैसावें ॥५३॥ चित्त अवघें स्थिर करी । चित्तीं सांठवावा हरी । वेळ आली जवळ खरी । आतां सावध असावें ॥५४॥ इतर जनांकारण । म्हणूं लागले करा भजन । "विठ्ठल विठ्ठल नारायण" । ऐसें उच्च स्वरानें ॥५५॥ हा तुमचा बंधु भला । जातो आज वैकुंठाला । त्याच्या करा पूजनाला । माळबुक्का वाहून ॥५६॥ भास्करें घातलें पद्मासन । नासाग्रीं दृष्टि ठेवून । वृत्ति अवघ्या केल्या लीन । अंतर्मुख होऊनियां ॥५७॥ भजन झालें एक प्रहर । माध्यान्हीस आला दिनकर । महाराजांनीं ’ हरहर ’ । शब्द केला मोठयानें ॥५८॥ त्यासरसा प्राण गेला । भास्कराचा वैकुंठाला । संतांनीं हातीं धरिलें ज्याला । तो पाहुणा हरीचा ॥५९॥ लोक पुसती महाराजांस । कोठें करणें समाधीस । या भास्कराच्या शरीरास । कोठें न्यावें ठेवावया ? ॥६०॥ समर्थ अवघ्यांस सांगती । द्वारकेश्वर जो पशुपती । ज्याच्या सन्निध आहे सती । तेथे ठेवा भास्कराला ॥६१॥ सांगविधि समाधीचा । ते ठायीं झाला साचा । लोक म्हणती महाराजांचा । परमभक्त गेला हो ॥६२॥ दुसरे दिवसापासून । समाधीच्या सन्निध जाण । होऊं लागलें अन्नदान । गोरगरीबांकारणें ॥६३॥ दहा दिवस अन्नदान । झालें याचें वर्णन । तुम्ही नुकतेंच केलें श्रवण । संतभंडारा नांव ज्याचें ॥६४॥ चिंचवृक्षांच्या सावलींत । जेवाया बसे पंगत । तयीं कावळे अतोनात । त्रास देऊं लागले ॥६५॥ काव काव ऐसें करिती । द्रोण पात्रींचे उचलून नेती । मलोत्सर्ग तोही करिती । जेवणारांच्या अंगावर ॥६६॥ त्या योगें लोक त्रासले । कावळ्यांस हाकूं लागले । भिल्लांनीं ते तयार केले । तीरकमटे त्या मारावया ॥६७॥ तईं बोलले गजानन । अवघ्या लोकांलागून । नका मारुं त्याकारण । अपराध त्यांचा कांहीं नसे ॥६८॥ या भंडार्यांत येण्याचा । हेतु इतकाच आहे त्यांचा । प्रसाद आपणा भास्कराचा । इतरांपरीच मिळावा ॥६९॥ आत्मा या भास्कराचा । मुळींच मुक्त झाला साचा । तो पाहुणा वैकुंठीचा । झाला आहे येधवां ॥७०॥ जयाला न ऐसी गती । त्याच्यासाठीं पिंड देती । कावळ्यांची वाट पाहाती । पिंड ठेवून कलशावर ॥७१॥ म्हणून कावळे रागावले । त्यांनीं हें जाणीतलें । भास्करानें गमन केलें । एकदम वैकुंठ लोकाला ॥७२॥ म्हणून आम्हां प्रसाद त्यांचा । मिळूं द्या या भंडार्याचा । ऐसा विचार कावळ्यांचा । दिसतो या कृतीनें ॥७३॥ तुम्ही त्यांस मारुं नका । मीच तया सांगतों देखा । अहो जिवांनो माझें ऐका । गोष्ट आतां सांगतों जी ॥७४॥ तुम्ही उद्यांपासोन । वर्ज्य करा हें ठिकाण । ना तरी भास्करालागून । येईल माझ्या कमीपणा ॥७५॥ आज प्रसाद घेऊन । तुम्ही तृप्त व्हा अवघे जण । मात्र उद्यांपासोन । या स्थळासी येऊं नका ॥७६॥ काही कुत्सित एकमेकांलागुनी । म्हणते झाले हांसोनी । ही गजाननानें केली वाणी । अस्थानीं कीं निरर्थक ॥७७॥ दुसरे दिवशीं ते कुत्सित । मुद्दाम पाहाया आले तेथ । तों एकही ना दृष्टीप्रत । पडला त्यांच्या कावळा ॥७८॥ मग मात्र चकित झाले । समर्थांसी शरण आले । बारा वर्षें तेथ भले । कावळे न आले श्रोते हो ॥७९॥ चौदा दिवस झाल्यावरी । गजानन फिरले माघारीं । येते झाले शेगांव नगरीं । आपल्या उर्वरित शिष्यांसह ॥८०॥ श्रोते त्या शेगांवांत । एक गोष्ट घडली अघटित । ती ऐका सावचित्त । सांगतों मी येधवां ॥८१॥ होतें साल दुष्काळाचें । म्हणून एका विहिरीचें । काम चाललें खोदण्याचें । सुरुंगातें लावून ॥८२॥ विहीर दोन पुरुषांवर । गेली खोल साचार । खडक काळा लागला थोर । गती खुंटली पहारीची ॥८३॥ म्हणून भोकें करुन । आंत दारु ठांसून । सुरुंगाच्या साह्ये करुन । काम फोडण्याचें सुरुं झालें ॥८४॥ चारी बाजूंस भोकें चार । केलीं पहारीनें तयार । दारु ठासिली अखेर । आंत दोर्या घालुनी ॥८५॥ एरंड पुंगळ्या पेटवून । सोडल्या चारी दोर्यांतून । तो मध्येंच बैसल्या अडकून । दोऱ्यांचीया गांठीवरी ॥८६॥ तैं कामावरचा मिस्तरी । विचार करी अंतरीं । सुरुंगास लागल्या वारी । सुरुंग वायां जाईल कीं ॥८७॥ म्हणून गणू जवर्याला । मिस्तरी तो बोलला । तूं उतरुन विहिरीला । पुंगळ्या थोड्या सरकीव ॥८८॥ त्या पुंगळ्या सरकावण्यासी । कोणी न धजे जावयासी । म्हणून या गणू जवर्यासी । मिस्तरीनें दटाविलें ॥८९॥ या गणू जवर्याची । निष्ठा समर्थांवरी साची । आज्ञा होतां मिस्तरीची । गणू आंत उतरला ॥९०॥ एक पुंगळी सरकविली । ती तात्काळ तळा गेली । दारुप्रती जाऊन भिडली । गणू आंत सांपडला ॥९१॥ दुसरीस जों घाली हात । पुंगळी सरकवण्याप्रत । तों पहिला सुरंग उडाला सत्य । मग काय विचारतां ? ॥९२॥ गणू म्हणे विहिरींतून । समर्था ये धांवून । माझें आतां रक्षण । तुझ्यावीण कोण करी ? ॥९३॥ तों गणू जवर्या भली । कपार हाती लागली । त्या कपारींत बैसली । स्वारी गणू जवर्याची ॥९४॥ एकामागून एकांनीं । पेट घेतला सुरुंगांनीं । उडाले सुरुंग ऐसे तिन्ही । दगड अपार निघाले ॥९५॥ लोक जे कां होते वरती । ते बोलले ऐशा रिती । बहुधा मिळाली असेल मुक्ती । विहिरीमाजी गणूला ॥९६॥ असा जो शब्द ऐकिला । आंतून गणू बोलला । अहो मिस्त्री नाहीं मेला । गणू आहे विहिरींत ॥९७॥ गजाननाच्या कृपेनीं । मी वांचलों या ठिकाणीं । बसलों आहे दडोनी । या पहा कपारींत ॥९८॥ परी कपारीच्या तोंडाला । धोंडा एक मोठा पडला । त्यामुळें बाहेर मला । येतां येत नाहीं कीं ॥९९॥ गणूचे शब्द ऐकिले । लोक अवघे आनंदले । लोक खालीं उतरले । तो धोंडा काढावया ॥१००॥ दहापांच जणांनीं । धोंडा सरकविला पहारींनीं । गणूस बाहेर काढूनी । घेऊन आले वरते त्या ॥१०१॥ वरतीं येतांच गांवांत । गणू गेला पळत पळत । समर्थांच्या मठांत । दर्शन त्यांचें घ्यावया ॥१०२॥ गणू दर्शना येतांक्षणीं । बोलले त्या कैवल्यदानी । गण्या कपारींत बैसोनी । किती धोंडे उडविलेस ? ॥१०३॥ जा तुझें गंडांतर । आज निमालें साचार । गणूप्रती पाहाया इतर । लोक आले गांवींचे ॥१०४॥ गणू म्हणे सद्गुरुनाथा । सुरुंग चारी पेटतां । तूंच मला देऊन हातां । कपारींत बैसविलें ॥१०५॥ म्हणून मी वांचलों । तुझे पाय पाहाया आलों । ना तरी असतों मेलों । विहिरीमाजीं गुरुराया ! ॥१०६॥ ऐसें गजाननकृपेचें । महिमान आहे थोर साचें । तें साकल्य वर्णण्याचें । मसीं नाहीं सामर्थ्य ॥१०७॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति एकादशोऽध्यायः समाप्तः ॥
No comments:
Post a Comment