Dec 25, 2023

संत एकनाथमहाराजकृत श्रीदत्तात्रय जन्मकथन आख्यान


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

समस्त दत्तभक्तांना श्री दत्तात्रेय जयंतीच्या भक्तिमय शुभेच्छा !


ऐका दत्तात्रय आख्यान । पार्वतीस सांगे त्रिलोचन । सकळ पतिव्रतांमाजी पूर्ण । अनुसूया जाण पतिव्रता ॥१॥ ऐकोनी शिवाची वाणी । गदगदां हांसे भवानी । आम्हां तीघींवरती त्रिभुवनीं । श्रेष्ठ कोणी असेना ॥ २ ॥ गर्व देखोनी पार्वतीचा । बोले त्रिलोचन तेव्हां वाचा । नारद सांगेल महिमा तिचा । तेव्हां तुज कळेल ॥३॥ ऐकोन पार्वती मनांत । नारदाची मार्गप्रतिक्षा करीत । तव तो मुनी अकस्मात् । पावला तेथें ते क्षणीं ॥४॥ देखोनियां नारद मुनि । षोडशोचारे पूजीं भवानी । आम्हां तिघींवरती त्रिभुवनीं । आणिक कोणी अमेना ॥५॥ ऐकोनी हांसला नारदमुनी । ऐके पार्वती चित्त देउनी । अनुसूया अत्रीपत्नी । तुम्हां तिघींहुनि पतिव्रता ॥६॥ तुम्हां तिघींचे पुतळे करुनी । बांधिले असे वामनचरणीं । असंख्य सामर्थ्य त्रिभुवनीं । समतुल्य कोणी असेना ॥७॥ तो पार्वती झाली चिंताग्रस्त । नारदातें उपाय पुसत । तो म्हणे प्रार्था विश्वनाथ । तो तेथवरी जाईल ॥८॥ नग्न होऊनि घालीं भिक्षा भोजन । तेणें होईल तिचें छळण । ब्रिदें तुमचें देईल सोडून । मग गर्व सहजची गळेल ॥९॥ पार्वतीसी ऐसें सांगोनी । स्वयें वैकुंठासी येत तत्क्षणीं । देखोनी लक्ष्मी संतुष्ट मनीं । मग पूजी आदरें तयातें ॥१०॥ कर जोडोनी करी विनंती । कांहीं नवल सांगा स्थिती । मागे झाली जे रितीं । वदला मती विनोदें ॥११॥ म्हणे धन्य अनुसूया पतिव्रता । तुम्हां तिघींहुनी समर्था । तुमचे पुतळे तत्त्वतां । तिनें तोडरीं बांधिलें ॥१२॥ ऐकोनी तटस्थ झाली रमा । आता काय करूं पुरुषोत्तमा । मजह्रुनी वाढ ऐसी सीमा । ते कैसेनी निरसेल ॥१३॥ नारद म्हणे उपाय एक । तेथें पाठवा वैकुंठनायक । नग्न भोजन मागा ते देख । तेणें ते छळेल ॥१४॥ सांगोनी ऐसा वृत्तांत । सत्य लोकांसी गेला ब्रह्मसुत । सावित्री पुसे त्वरित । कांहीं अपूर्व वर्तलें ॥१५॥ मग तो म्हणे सावित्रीसी । अनुसूया ऐसी गुणराशी । सामर्थ्य अधिक तियेपाशी । पदा तिघींसी वांधिलें ॥१६॥ सावित्री म्हणे नारदामतें । कैसा उपाय करावा तीतें । जेणें भंगेल गर्वातें । शरण आम्हांतें येईल ॥१७॥ पाहतां आम्हांपासूनि उत्पत्ति । एवढी काय तिची स्थिती । टिटवी काय समुद्राप्रती । शोषूं शके ॥१८॥ आम्हांहूनि काय चाड । ऐसें पीडिलें महागूढ़ । आतां उपाय सांगा दृढ । जेणें गर्व भंगेल तिचा ॥१९॥ मग ती म्हणे नारदासी । काय करावा तिशीं । तंव तो म्हणे सावित्रीशी । एक तुजसी सांगेन ॥२०॥ प्रार्थुनिया चतुरानना । पाठवावें अत्रिभुवना । जाये तूं आतां याच क्षणां । अवश्य वचन बोलवी ॥२१॥ म्हणावें दे नग्न भोजन । तेणें होईल तिचे छळण । मग यावें सत्व घेऊन । ब्रीद जाण तुटेल ॥२२॥ ऐसा नारद सांगून गेला । मग तिघी प्रार्थिती तिघांला । श्रुत करोनि नारद गेला । म्हणवूनि विनविती ॥२३॥ ऐकुनी ऐसें वचनीं । तिघें निघाले तत्क्षणी । स्त्रियांची करुणा देखुनी मनीं । कृपा झाली तयांची ॥२४॥ मग पवनवेगें ते अवसरीं । तिथे प्रवेशले आश्रमाभीतरीं । वाहनें ठेवूनिया दूरी । माध्यानकाळीं पैं आले ॥२५॥ मग तंव ते म्हणती तिघेजण । आम्हांस घेणें अनुसूयादर्शन । ऋपीने आज्ञा करून । दारा बाहेर पाठविली ॥२६॥ तें देखोनी अत्रिऋषीनें । तिघांचें केलें सांग पूजन । मग म्हणे येणें काय कारणें । आवश्यक पैं झालें ॥२७॥ तंव द्वारा बाहेर तिन्ही मूर्ति । ब्रह्मा शिव कमलापती । नमस्कार झालीया पुसती । काय आज्ञा तें सांगिजे ॥२८॥ ते म्हणे अनुसूयेसी । तूं पतिव्रतेमाजी श्रेष्ठ म्हणविसी । तरी मागतों तें देई आम्हांसी । म्हणोनि भीकेसी गोविलें ॥२९॥ मग म्हणे ती तयांप्रती । तुमचें देणें त्रिजगतीं । आणि तुम्हीं मागतां मजप्रती । इच्छा जैशी मागिजे ॥३०॥ देव म्हणती होऊनि नग्न । आम्हांशी घालावें भोजन । अनुसूया अवश्य म्हणे । मग काय करिती जाहली ॥३१॥ ठेवूनिया तिघांचे मस्तकीं कर । तंव ते तिघे झाले कुमर । मग नग्न होउनि सत्वर । करवी स्तनपान तयातें ॥३२॥ करुनि तयांची उदरतृप्ती । वसन नेसली शीघ्रगती । मग घालूनी पालखाप्रति । गाती झाली तेधवां ॥३३॥ मग म्हणे चतुरानना । जो जो जो जो रे सगुणा । उत्पन्न करुनि त्रिभुवना । बहु श्रम पावलासी ॥ ३४॥ या कारणें केलें बाळ । आतां राहिलें कर्तृत्व सकळ । स्तनपान करोनि निर्मळ । सुखें निद्रा करावी ॥३५॥ जो जो जो जो रे लक्ष्मीपती । तुझी तव अगाध कीर्ति । अवतार धरुनि पंक्ति । दुष्ट संहार पैं केला ॥३६॥ ते श्रम पावलासी थोर । निद्रा करावी बा सत्वर । म्हणोनि केला कुमर । विश्रांती सुख पावावया ॥३७॥ जो जो जो जो रे बा शंकरा । महादेवा पार्वतीवरा । करोनि दुष्ट संहारा। बहु श्रम पावलासी ॥३८॥ तरी आतां सुखें निद्रा करी । कुमारकत्व पावलें यापरी । आतां क्लेश नाहीं तरी । पालखीभीतरी पहुडावें ॥३९॥ आसे आखेद स्तनपान । पालखात निजवी बाळकें पूर्ण । नित्य गीतगायन । भक्ती ज्ञान वैराग्य ॥४०॥ ऐसे बहुत दिवस । मार्ग नाहीं जावयास । न सुटे बाळपणाचा वेश । सामर्थ्य विशेष अनुसूयेचें ॥४१॥ उमा रमा सावित्रीतें । थोर गर्व होतां तिघींतें । तो निरसावयातें । विंदान केलें नारदें ॥४२॥ मागुती सांगे तिघींप्रती । काय निश्चित बैसल्याती । बालकें करूनि तिघांप्रती । अनुसूया सती खेळवितसे ॥४३॥ नित्य करवी स्तनपान । षण्मासांचे बाळें करून । पाळण्यामाजी निजवून । गीत गायन करीतसे ॥४४॥ पाहतां ऋषीपत्नी जाण । तिचें तुळणें न पुरे त्रिभुवन । आतां जाणें शरण तियेसी ॥४५॥ तंव त्या तिघीजणीं बोलती । आम्ही तरी आदिशक्ती । आमचे सामर्थ्य त्रिजगतीं । प्राणी वर्तती एकसरें ॥४६॥ सुरनर गंधर्व किन्नर । पशुपक्षी अपार । आमच्या सामर्थ्या थोर । चराचर नांदत ॥४७॥ तरी आमचे आम्हींच पती । सोडवू आपले सामर्थ्यी । अनुसूया ते बापुडी किती । काय तिची कीर्ति आपुल्यापुढें ॥४८॥ ऐसें बोलोनी अभिमानी । तिघी निघाल्या त्या क्षणीं । लगबग आल्या धांवुनी । अनुसूयाभुवनीं तत्काळ ॥४९॥ ते देखोनिया ऋषीश्वरे । तिघी पूजिल्या पोडशोपचारें । काय आज्ञा पुसे त्वरें । ते प्रत्योत्तरे सांगीजे ॥५०॥ त्या तिघीजणी बोलती । पाठवावें अनुसूयाप्रती । येरें आज्ञा करूनी शीघ्रगती । स्त्रियांप्रती आणविले ॥५१॥ तंव ते पातलीसे त्वरें । केला तिघींसी नमस्कार । आज्ञा पुसे सत्वर । भाग्य थोर आलेती ॥५२॥ तिघी म्हणती आमुचे पती । आणून देई शीघ्रगती । तंव त्या बाळकाच्या मूर्ती । पुढें क्षीतीं ठेविल्या ॥५३॥ तंव ते सारखे बाळ तिन्ही । बोलं नेणती वचनीं । तिघी चकीत झाल्पा मनीं । परि कोण्हा न लक्षवेना ॥५४॥ सर्वही सामर्थ्य वेचलें । अभिमान धैर्य गळालें । पण लोटांगण घातलें । चरण वंदिले सतीचे ॥५५॥ अनुसूया थोर तुं पतिव्रता । धन्य धन्य तुझी सामर्थ्यता । आम्ही लीन जाहलों पाहतां । नको निष्ठुरता करूं माये ॥५६॥ जैसे होते आमुचे पती । तेसे करावे पुढती । अगाध धन्य तुझी कीर्ति । पूर्ण सती पतिव्रता ॥५७॥ ऐकोनी सतीत्रयींचें वचन । तिघांचें मस्तकीं स्पर्शे करून । कृपायुक्त अवलोकून । पूर्व चर्या ते आणिले ॥५८॥ तिघांचीं स्वरूपें जैसीं होतीं । तैशा केल्या तिन्हीं मूर्ति । देव अंतरिक्ष कौतुक पहाती । वृष्टी करिती पुष्पांची ॥५९॥ दुंदुभि वाजविल्या भेरी । आनंद झाला सर्वांतरी । बोलिले सत्वरीं । अनुसूया पतिव्रता ॥६०॥ त्रय देव म्हणती धन्य माते । अगाध सामर्थ्य तुझें सत्य । प्रसन्न झालों मागा वरातें । मनोरथ पूर्ण करा हो ॥६१॥ मग ते बोले करुणावचन । अपूर्व तुमचें दर्शन । भावें न गमे तुम्हांविण । अर्धक्षण जाणिजे ॥६२॥ तरी तिघे रूप असावें । एवढें मज वरदान द्यावें । आणीक नलगे स्वभावें । म्हणोनी भावें  प्रार्थितसें ॥६३॥ मग देवत्रयाची मूर्ति । करकमळीं आली शीघ्रगती । दत्तात्रय नामें ऐसी ख्याती । तिहीं लोकांप्रती विशेष ॥६४॥ वर देऊनी स्वस्थाना । शक्तीसहीत आरूढले वाहना । सर्व देव समुदाय जाणा । स्वर्ग भुवना पातले ॥६५॥ येरीकडे दत्तात्रयमूर्ति । बालरूपें अनुसूयेप्रती । पुढें व्रतबंध झाले निश्चिती । अभ्यासिल्या सकळ कला ॥६६॥ एका जनार्दन म्हणे । दत्तात्रय जन्मकथन । भावें करितां श्रवण । मनोरथ पूर्ण श्रोतियांचे ॥६७॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

अवश्य वाचावे असे काही -

*** श्रीदत्तजन्म आख्यान ***


एका जनार्दनीं दत्त पाळण्यांत घातिला...


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

समस्त दत्तभक्तांना श्री दत्तात्रेय जयंतीच्या भक्तिमय शुभेच्छा !


पैठणचे संत एकनाथ महाराज हे थोर दत्तकृपांकित जनार्दन स्वामींचे शिष्य ! ते दौलताबाद येथे त्यांच्याकडे मंत्रादि वेदाध्ययन शिकण्यासाठी राहत होते. आपल्या सद्‌गुरुचरणीं एकनाथ महाराजांची दृढ निष्ठा होती. एकदा जनार्दनपंतांनी त्यांना जवळ बोलावले आणि म्हणाले, " एका, उद्यापासून त्या समोरच्या टेकडीवरील झाडाखाली बसून अध्ययन करीत जा." श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार एकनाथ महाराज दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या झाडाखाली जाऊन बसले. तिथे छान एकांत होता, त्यांना ती जागा फार आवडली. तिथे बसून ते अध्ययन करू लागले. पण काही वेळांतच तिथे प्रखर ऊन तापू लागले. एकनाथ महाराजांच्या घशास कोरड पडली. पण तिथे ओढा, तळं असे पाण्याचे कुठलेच साधन नव्हते ना तिथे जवळपास कुणाचे घर होते. एकनाथ महाराज तहानेने फारच व्याकुळ झाले, त्यांना काय करावे हे समजेना.
इतक्यात तिथे एक गवळी आला, आणि मोठ्या ममत्वानें त्यांना म्हणाला, " बाळा, तुला फार तहान लागलेली दिसतेय! हे दूध पी. हे अगदी उत्तम नि ताजं आहे. तुला बरें वाटेल आणि मग तू एकाग्रतेने अध्ययन करू शकशील." त्यावर एकनाथ महाराज विनंती करीत म्हणाले," महोदय, पण माझ्याजवळ पैसे नाहीत! तुम्हांला उद्या पैसे दिले तर चालेल का ?"  " अरे, पैशाची काळजी करू नकोस. उद्या दिलेस तरी हरकत नाही. " तो गवळी उत्तरला.   संध्याकाळी एकनाथ महाराज जनार्दनस्वामींकडे परतले. स्वामींनी विचारले," कसे झाले आजचे अध्ययन ?"  " फारच उत्तम ! मी उद्याही तिथेच जाईन ! " एकनाथ महाराज म्हणाले. दुसन्या दिवशीही पुन्हा तोच प्रकार घडला. तोच गवळी पुन्हा आला नि दूध देऊन गेला. तेव्हा मात्र एकनाथ महाराज संकोचून म्हणाले, " महोदय, मी काल स्वामींजवळ पैसे मागायला विसरलो. उद्या मात्र मी तुम्हांस नक्की पैसे देईन!" मग त्यादिवशी संध्याकाळी स्वामींपाशी येऊन एकनाथ महाराज म्हणाले, " आजही माझे छान ध्यान लागले. पण काल मी तुम्हांला एक गोष्ट सांगायचीच विसरलो."  " कुठली गोष्ट ? " जनार्दन स्वामींनी विचारले. " गेले दोन दिवस एक गवळी मला अगदी ताजं ताजं दूध आणून देत आहे. त्याला देण्यासाठी मला पैसे हवे आहेत!" नाथ म्हणाले. " काही नकोत पैसे द्यायला... तो आपलाच आहे रोजचा !", जनार्दनपंत मंद स्मित करत म्हणाले. " आपल्याकडे दूध घालणारा हाच का गवळी ? त्याला एकदम महिन्याचे पैसे द्यायचे का ?" एकनाथ महाराजांनी पुन्हा प्रश्न केला.   " अरे एका, कधी-मधी माझ्या शेजारी येऊन बसतात ते...." जनार्दन स्वामी हसत म्हणाले. " म्हणजे? श्रीदत्त गुरु?", एकनाथ महाराजांनी सदगदित होऊन विचारले.   " हो, तीच भक्तवत्सल गुरुमाऊली !" जनार्दन स्वामी उत्तरले.  एकनाथ महाराजांनी जनार्दनपंतांना आपणांसही श्रीदत्तात्रेय दर्शन व्हावे, अशी प्रार्थना केली. त्यावर जनार्दन स्वामी आश्वासक स्वरांत म्हणाले," एका, तुझी उपासना पूर्ण झाली आणि योग्य वेळ आली की दत्त महाराज तुला आपणहून दर्शन देतील." आणि लवकरच जनार्दनपंतांनी एकनाथ महाराजांना दत्तदर्शनाचा लाभ घडविला. फकीर वेशांतील श्रीदत्तगुरूंची ओळख जनार्दन स्वामींनी नाथांना करून दिली. इतुकेच नव्हें तर त्रिगुणात्मक स्वरूपातीलही दत्तप्रभूंचे दर्शन एकनाथ महाराजांना झाले. पुढे, दत्तप्रभूंच्या आदेशानुसार त्यांनी आपल्या आवडत्या शिष्याला अर्थात एकनाथ महाराजांना सर्व गुह्यज्ञान देऊन अद्वयत्वाची, अभेदतत्त्वाची जाणीव करून दिली.    धन्य ती गुरु-शिष्याची जोडी, ज्यांच्यावर श्रीदत्तात्रेय प्रभूंनी कृपानुग्रह केला. 
श्रीदत्तजन्माचे संत एकनाथ महाराजांनी रचलेले हे काही सुरेख अभंग : धरी अवतार विश्व तारावया । अत्रीची अनूसुया गरोदर ॥१॥ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी । शुक्लपक्ष दिनीं पूर्णतिथी ॥२॥ तिथि पूर्णिमा मास मार्गशीर्ष । गुरु तो वासर उत्सवकाळ ॥३॥ एका जनार्दनीं पूर्ण अवतार । निर्गुण निराकार आकारलें ॥४॥ अव्यक्त परब्रह्मा न्हाणी पायांवरी । अभेद नरनारी मिळोनियां ॥१॥ पीतांबर पदरें पुशिला घननीळा । निजविला निर्मळ पालखांत ॥२॥ निंब कातबोळ त्रिगुण त्रिखुंडी । प्रेमाचे आवडी सेवी माय ॥३॥ एका जनार्दनीं दत्त पाळण्यांत घातिला । हालविती त्याला अनुसुया ॥४॥ जो जो जो जो रे निज आया । हालविती अनुसुया ॥धृ.॥ पालख पुरुषार्थ चौकोनी । भक्तिनाडी गुंफोनी । दोरी प्रेमाची लाउनी । शांती गाती गाणीं ॥१॥ करितां उत्पत्ति शिणलासी । विश्रांति आलासी । निज रे ब्रह्माया तपलासी । कमळोद्भव जालासी ॥२॥ लक्ष्मीपति निज हो घनःश्यामा । सांडोनि वैकुंठधामा । प्रतिपाळ करी हो जीव नामा । दर्शन दिलें आम्हां ॥३॥ पार्वतीरमण शिवा निज आतां । संहारक जीवजंता । निजरुप निगमा हो आदिनाथा । एका जनार्दनीं दाता ॥४॥        
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

Dec 24, 2023

श्रीदत्त चिंतामणी स्तोत्र


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


श्रीदत्तात्रेयप्रभू हे महानुभाव पंथियांनादेखील परम पूज्य आहेत. 'श्रीदत्तात्रेय प्रभूंचा चतुर्युगी अवतारु' असे श्रीचक्रधर स्वामींचे वचन आहे. अर्थात परमेश्वराचे दुसरे अवतार श्रीदत्तात्रेयप्रभू हे कृत, त्रेता, द्वापार, आणि कली या चारही युगात विद्यमान आहेत. तसेच गुरुपरंपरेच्या दृष्टीनेही स्वामींनी 'श्रीदत्तात्रेय प्रभु आदिकारण' मानले आहे. श्री दत्तात्रेय प्रभूंचे दर्शन अमोघ आहे, अशी महानुभाव पंथियांची दृढ श्रद्धा आहे. या पंथांतील श्रीदत्त चिंतामणी स्तोत्र हे अतिशय प्रभावी मानले जाते. यांत सहा श्लोकांमध्ये अत्रिनंदन श्रीदत्तात्रेय प्रभूंची विशेष अशा चोवीस नामांनी स्तुती केली आहे. अनसूयात्मज दत्तप्रभू हे अमोघदर्शी आहेत. भक्तिभावाने केवळ स्मरण केले असता प्रसन्न होणाऱ्या या दैवताचे अखंड चिंतन भक्तांचे इहपर कल्याण साधते, म्हणूनच त्यांना 'चिंतामणी' असेही म्हणतात. या चिंतामणी स्तोत्राचा कर्ता अज्ञात असून याचे श्रद्धापूर्वक आवर्तन केल्यास वांच्छित फल प्राप्त होते अशी ग्वाही स्तोत्रकाराने यात दिली आहे.

श्रीदत्त: अनसूयासुत: अत्रिपुत्रो ऋषिवर: । ऋषिवंशो जटाधारी चिरायुर्वेषदिगम्बर: ॥१॥
अमोघरुप: भिक्षूश्च सिंहशृंगनिवासि च । व्याघ्ररुप: सदारम्य: नमो द्वादश नाम्ने ॥२॥
वाक्वरद: सत्यवाणी ब्रह्मचारीसदागुढ: । नित्याटन: पिशेद्वाही उद्घारो मुक्तीदायक: ॥३॥
नित्यमुक्तो गुरुरुप: श्वापदारि: सुखावह: । इति द्वादश नामानि चतुर्विशंति सर्वेश: ॥४॥
इति चिंतामणीस्तोत्रं अत्रिसुतमहात्मनं । चतुर्विशंति पाठेन अत्रिपुत्रो भवेद्वशी ॥५॥
दिनेशुक्रकृते स्नाने एकाग्र मनसा पठेत् । आवर्तेन सहस्त्रेण लभते वांच्छितं फलम् ॥६॥
    
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


 

Dec 18, 2023

श्री भीष्मकृत श्रीसाईनाथचिंतन


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥ ॐ श्री साईनाथाय नमः

अभंग 

मनोहर ध्यान किती हें साईचें । पाठीशीं चांदीचें सिंहासन ॥ सिंहासन गादी उशांचे सहित । सछत्र शोभत प्रभावळी ॥  प्रभावळीमाजी कुंजवनशोभा । शोभेचा हा गाभा मुरलीधर ॥ मुरली धरिली सुंदर हो हातीं । वाजवूनियां ती धेनू पाळी ॥  पाळीव पक्ष्याचे समान मयूर । करिती विहार वनामध्यें ॥ वनामध्यें हरी नित्य हा क्रीडत । रवि स्थिरावत आनंदानें ॥  आनंदाने दोघे गरुड हनुमंत । जोडोनियां हात उभे सेवे ॥ सेवेकरी मोदें मोर्चेल चवरी । धरिती स्वामीवरी प्रेमभावें ॥  भावें धावूनियां येती भक्तजन । करिती पूजन एकनिष्ठें ॥ एकनिष्ठ मेघा करितां आरती । स्वामी खुणवीती आत्मबोध ॥  बोध करूनियां भक्तावरी दृष्टी । करिताती वृष्टी सुप्रेमाची ॥ सुप्रेमाची मना आवडी लागली । म्हणूनी गुंफली भावें माला ॥  माला ही गुरूची गुरूला वाहिली । पावन ती झाली गुरूचे पायीं ॥ पायीक या माना कृष्णा साईनाथा । जडो पद माथा मनोहर ॥१॥ मानसपूजा  श्रीमत्साई परेश मूर्ति हृदयीं आणोनियां पाहिली । तों ती सुंदर वस्त्रवेष्टित शिरीं भासावया लागली ॥ पाहें जों निरखोनि अंगि कफनी सिंहासनाचे पुढें । बैसे आसन घालुनि सकलही ने जो लया सांकडें ॥१॥  आपाद मस्तक निहाळुनियां गुरूला । भावें पदीं नमुनि मस्तक ठेवियेला ॥ ठेवियला वरदहस्त शिरीं गुरूनें । केलें पुढें स्वमनिं पूजन तत्कृपेनें ॥२॥  प्रथम गुरुपदांघ्री अर्पिलें प्रेमवारी । त्रिभुवनपथगामी पाप ज्याचेनि वारी ॥ ग्रहण करुनियां तत्प्रेमतीर्थोदकातें । पुनित करूनि देहा पूजिलें सद्‌गुरुतें ॥३॥ भावें केशरयुक्त चंदन मनें पादांगुलीं लाविलें । पुष्पें सुंदर अक्षता तुलसिही वाहोनियां अर्चिलें ॥ केलें वंदन पादमार्जन शिरीं पुष्पें सुगंधीजलें । भालीं लावुनि गंध पुष्प तुलसी बिल्वाक्षतें पूजिलें ॥४॥ कर्णासि कंठासि उर:स्थळाला । लावूनियां चंदन दो करांला ॥ पुष्पाक्षता वाहुनि पुष्पमाला । गुंफोनियां अर्पिलि सद्‌गुरुला ॥५॥ देवाचिया हस्तिं सुगंधिपुष्प । अर्पियले नंतर धूप दीप ॥ काल्पी करीं देउनियां गुरूला । दक्षिणा विडा नंतर अर्पियेला ॥६॥  करोनियां ऐसें यजन मग मीं दीप धरुनी । तुला ओंवाळुनि मुखकमल तें नेत्र भरुनीं ॥ पहातां तूं केली मजवरि कृपावृष्टि नयनीं । अहाहा त्या सौख्या किति वदुं गुरू अल्पवदनीं ॥७॥ गादी पाट उशा समस्त उचला साई असें सांगुनि । काढिती खिचडी शिरा सकळ जें भक्तें दिलें आणुनि ॥ वांटोनि सगळें यथोचित पुढें देती प्रसादीं उदी । ती मीं घेउनि हस्तिं भाल नमुनि ठेवियला तत्पदीं ॥ ८ ॥  घेवोनि उदी दूर राहुनि उभा जैं सद्‌गुरु पाहिला । तेव्हां जोडुनि श्रीहरी समपदें वाटे उभा राहिला ॥ होवोनि अति सुप्रसन्न नयनीं सुप्रेमवृष्टि करी । दे जी सद्गुरु साइनाथ उदि ती आशीच भक्तावरी ॥९॥  प्रभो साईनाथा ग्रथित कवनीं मानसपुजा । करूनि केला हा गरिब अपुला दास समजा ॥ सदा गाऊनी ही करिति गुरुची मानसपुजा । तया कृष्णस्वामी वरदत्रिदिवेशस्तरुजवा ॥१०॥


॥ श्री साईसमर्थ

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Dec 14, 2023

श्रीगुरुचरित्र नित्यपाठ


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

भक्तांच्या कल्याणासाठी पदोपदी तळमळणाऱ्या त्या दत्तमाऊलीच्या लीलांचे किती वर्णन करावे बरें ? महाप्रसादिक श्रीगुरुचरित्र हा सिद्धमंत्ररूप आणि वरदग्रंथ आहे. त्यांमुळे मंत्राच्या अनुष्ठानविधीचे सर्व नियम या ग्रंथाचे पारायण करतांना विशेष पाळावे लागतात. मात्र आपल्यासारख्या अतिसामान्य दत्तभक्तांनाही हा परमलाभ प्राप्त व्हावा, यासाठी - " सर्वजनसुलभ अशी श्रीगुरुचरित्राची पाठावृत्ती करावी." असा श्रीदत्तात्रेय प्रभूंचा प. पू. सद्‌गुरु श्री. मामा महाराजांना आदेश झाला. दत्तमहाराजांच्या या आज्ञेनुसार प. पू. श्री. मामांनी श्रीगुरुचरित्राच्या प्रकाशित पोथ्या, विविध हस्तलिखिते आणि प. प. श्री. टेम्ब्ये स्वामी महाराजांचे 'समश्लोकी गुरुचरित्र' अशा अनेक उपलब्ध साहित्याचा आधार घेऊन पाठभेद निश्चित केला आणि श्रीगुरुचरित्र नित्यपाठ कसा तयार करायचा, याचे संकलन केले.

प्रत्यक्ष दत्तप्रभूंचा कृपाप्रसाद असलेल्या श्रीगुरुचरित्र नित्यपाठ या ग्रंथाच्या मनोगतात श्री. शिरीष शांताराम कवडे लिहितात - अनेक साधकांनी, भाविकांनी, श्रीदत्तभक्तांनी मुक्तकंठाने या नित्यपाठाची महती मान्य करून अनुभवलेली आहे. मूळ श्रीगुरुचरित्राची नित्य पारायणे करणाऱ्या अनेकांनी, नित्यपाठाचीच पारायणे करणे सुरू केलेले आहे; इतके हे संस्करण पारायण - सुलभ झालेले आहे. या नित्यपाठामुळे अनेकजण श्रीगुरुचरित्राच्या अमृतगंगेत सुस्नात होऊन धन्यता अनुभवू शकले आहेत; श्रीगुरूंच्या अपार कृपेची अनेक प्रकारे अनुभूती घेऊन कृतार्थ होत आहेत. ही सगळी भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या प. पू. सद्‌गुरु श्री. मामांवर असलेल्या पूर्णकृपेचीच प्रचिती आहे.

वेदतुल्य अशा श्रीगुरुचरित्र वाचनाचे पूर्णत: समाधान अन अनुभूती देणाऱ्या या नित्यपाठाचे वैशिष्ट्य असे की - प्रत्येक अध्यायातील काही निवडक ओव्या घेऊन त्या त्या अध्यायाचे पूर्ण सार आणि कथानके, आख्याने संक्षिप्त रूपांत वर्णिली आहेत. द्विरुक्ती असलेला अथवा धर्मशास्त्रीय चर्चा, कर्मकांड निरूपणाचा भाग वगळलेला आहे. वेदतुल्य, मंत्ररूप ग्रंथराज अशा श्रीगुरुचरित्रातील केवळ निवडक २७३३ ओव्या असलेला ( मूळ श्रीगुरुचरित्र ओवीसंख्या ७४९१ आहे.) हा नित्यपाठ मूळ ग्रंथाइतकाच प्रासादिक आहे, हे निःसंशय !

मागील काही काळ हा ग्रंथ सहज उपलब्ध नव्हता. मात्र प. पू. सद्‌गुरु योगिराज श्री. गुळवणी महाराजांच्या आशीर्वादस्वरूप आणि दत्तभक्तांच्या मागणीनुसार श्रीगुरुचरित्र नित्यपाठ या ग्रंथाची आता चतुर्थ आवृत्ती राजसंस्करण स्वरूपांत प्रकाशित झाली आहे. श्रीवामनराज प्रकाशनाच्या या प्रासादिक ग्रंथाचे मूल्य केवळ दोनशे रुपये आहे. शक्य झाल्यास सर्व दत्तभक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

श्रीवामनराज प्रकाशनाच्या अधिकृत संस्थळावर या ग्रंथाविषयी अधिक माहिती मिळू शकेल.

अर्थात श्रीगुरुचरित्र हा वरदग्रंथही असल्याने म्हणजेच प्रत्यक्ष श्रीगुरुंचा वर या ग्रंथास प्राप्त झाला असल्याने तो सर्वथैव सिद्धीप्रद आहे. या ग्रंथाच्या केवळ वाचनानेही भगवान दत्तप्रभूंच्या कृपेची अनुभूती निश्चितच येते.

भगवान दत्तमहाराजांची कुठल्या ना कुठल्या रूपांत सतत सेवा घडावी, व त्या भक्ताभिमानी, शरणागतवत्सल परब्रह्मानेही ही सेवा त्यांच्या दिव्य चरणीं रुजू करून घ्यावी, आणि आपल्या सर्वांवर त्यांची सर्वमंगला कृपादृष्टी व्हावी, हीच नित्य प्रार्थना !

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Nov 16, 2023

श्रीगुरुचरित्र अध्यायमालिकेचा मेरुमणि अर्थात श्रीगुरुचरित्र अध्याय - १४


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

श्रीदत्त संप्रदायांतील सर्वच अधिकारी विभूतींनी श्री सरस्वती गंगाधर विरचित श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे माहात्म्य पुन्हा पुन्हा अधोरेखित केले आहे. तर असंख्य दत्तभक्तांनीदेखील या वेदतुल्य ग्रंथाचे नित्यपाठ वाचन, पारायण करून श्रीदत्तमहाराजांच्या कृपेची प्रचिती अनुभवली आहे. ज्या दत्तभक्तांना काही कारणास्तव समग्र गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य होत नाही, त्यांनी निदान काही विशिष्ट अध्यायांची यथाशक्ती, भक्तिपूर्वक पारायणे करावीत, असे अनेक अधिकारी संतमहात्म्यांनी सांगितले आहे. त्यांतीलच एक अध्याय म्हणजे चौदावा अध्याय - आकस्मिक अरिष्ट निवारणार्थ हा अध्याय अवश्य वाचावा. गुरुकृपा किती प्रभावी असते हे सांगणारा हा अध्याय या श्रीगुरुचरित्र अध्यायमालिकेचा मेरुमणि आहे. मेरुमणि म्हणजेच एखाद्या माळेंतील मोठा, मध्यवर्तिमणि किंवा मुख्य आधारस्तंभ ! क्रुरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नामक या अध्यायचेही असेच महत्व आहे. ' न मे भक्त: प्रणश्यति ' अर्थात माझा भक्त कधीही नाश पावत नाही, असे भगवंतांचे वचन आहे. याच वचनांची, श्रीगुरूंच्या भक्तवात्सल्यतेची पूर्णतः अनुभूती देणाऱ्या या अध्यायाच्या चिंतनाचा हा अल्प प्रयास ! ही यथामति केलेली वाङ्मयसेवा कृपामूर्ती श्रीदत्तमहाराजांनी त्यांच्या दिव्य चरणीं रुजू करून घ्यावीं, हीच अंतःकरणपूर्वक प्रार्थना !!


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥      नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका । प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्ते परियेसा ॥१॥ जय जयाजी योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसागरा । पुढील चरित्र विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ॥२॥ उदरव्यथेच्या ब्राह्मणासी । प्रसन्न जाहले कृपेसी । पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारावे आम्हांप्रति ॥३॥  श्री सिद्धांनी सांगितलेल्या श्रीगुरूंच्या लीला ऐकून नामधारक भक्तिरसांत रंगून गेला. त्याने मोठ्या उत्सुकतेने सिद्धांना प्रश्न केला, " हे योगीश्वरा, मला श्रीगुरुंचे पुढील चरित्र विस्तारपूर्वक सांगा. पोटशूळ असलेल्या त्या ब्राह्मणांवर श्रीगुरुंनी कृपा केली आणि त्याला व्याधिमुक्त केले. त्यानंतर काय घडले ? "     ऐकोनि शिष्याचे वचन । संतोष करी सिद्ध आपण । श्रीगुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारे ॥४॥ ऐक शिष्या शिखामणि । भिक्षा केली ज्याचे भुवनी । तयावरी संतोषोनि । प्रसन्न जाहले परियेसा ॥५॥ गुरुभक्तीचा प्रकारु । पूर्ण जाणे तो द्विजवरू । पूजा केली विचित्रु । म्हणोनि आनंद परियेसा ॥६॥ तया सायंदेव द्विजासी । श्रीगुरू बोलती संतोषी । भक्त होय रे वंशोवंशी । माझी प्रीति तुजवरी ॥७॥  शिष्याचा हा भाव पाहून सिद्धांना संतोष झाला आणि त्यांनी कामधेनूस्वरूप श्रीगुरुचरित्र सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, " हे शिष्योत्तमा, त्या दिवशी ज्याच्या घरी भिक्षा घेतली होती, त्या सायंदेव नामक ब्राह्मणावर श्रीगुरु प्रसन्न झाले. त्याची श्रीगुरुचरणीं अनन्य भक्ति दृढ झाली होती, गुरुभक्ती कशी करावी हे तो जाणत होता.

सायंदेव व त्याची पत्नी जाखाई हिने ज्या उत्कट भक्तिभावाने श्री नृसिंह सरस्वती महाराजांची षोडशोपचारे पूजा केली, त्याचे सुरेख वर्णन गुरुचरित्रकारांनी तेराव्या अध्यायांत केले आहे. दत्तभक्तांसाठी ते श्रीगुरुपूजेचे विधान इथे थोडक्यांत देत आहोत. - समस्त शिष्यगण आणि तो उदरव्यथा असलेला ब्राह्मण यांसह श्रीनृसिंहसरस्वती महाराज सायंदेवाच्या घरी भोजनासाठी गेले. तेव्हा त्याने सर्व घर सुशोभित केले होते, सुंदर पंचवर्णी रांगोळ्या काढल्या होत्या. सायंदेव आणि त्याची पत्नी यांनी सर्वांचे योग्य स्वागत केले. श्रीगुरुंना बसण्यासाठी एक अतिशय सुंदर आसन मांडले होते. त्याचप्रमाणे सर्व शिष्यमंडळींसाठीही आसने तयार केली होती. प्रथमतः सायंदेवाने सपत्नीक मंडलार्चन विधी करून श्रीगुरुमहाराजांना पुष्प-गंधाक्षता वाहिल्या. श्रद्धापूर्वक शास्त्रोक्त संकल्प करून श्रीगुरुचरणांवर मोठ्या भक्तिभावाने मस्तक ठेवून साष्टांग नमन केले. श्रीगुरूंचे भवतारक चरण अतीव पूज्यभावानें आपल्या सर्वांगावरून फिरविले. तदनंतर पंचामृतादि स्नान, रुद्रसूक्तासह अभिषेक करून श्रीगुरुचरणांची षोडशोपचारे पूजा केली. त्या चरणतीर्थाचेही त्याने मोठ्या भक्तिभावाने यथासांग पूजन केले. त्यावेळी गीतवाद्यांच्या गजरात नीरांजन ओवाळीत आरती केली. अनेक प्रकारचे गायन करून त्या दाम्पत्याने श्रीगुरुमहाराजांना मोठ्या श्रद्धापूर्वक नमनही केले. या विशेष श्रीगुरुपूजनानंतर सर्व शिष्यवर्गाचाही योग्य आदरसत्कार करून त्यांचेही यथाविधी पूजन केले. सर्वांना वंदन केले. त्यानंतर नमनभावें सर्वांसाठी भोजनाची पानें मांडली. पानांभोवती सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या, अष्टदल कमल होते. प्रत्यक्ष श्रीगुरुमहाराज भिक्षेला येणार होते, त्यांमुळे त्या मंगल प्रसंगी जाखाईने खास रांधलेलें अनारसें, उडदाचे पदार्थ आणि अष्टविध पक्वान्नें वाढले. त्या भाविक दाम्पत्याचे उत्तम आदरातिथ्य स्वीकारून श्रीगुरुनाथांनी आपल्या शिष्यांसह प्रीतीपूर्वक भोजन केले. तो पोटशूळ असलेला ब्राह्मणदेखील पोटभर जेवला. श्रीगुरूंच्या कृपादृष्टीने त्याची व्याधी समूळ नष्ट झाली. असा त्यावेळी मोठा आनंदसोहळा झाला. त्याचा हा भक्तिभाव पाहून श्रीगुरु संतुष्ट होऊन त्याला म्हणाले, " मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्या वंशात माझे भक्त होतील."    
ऐकोनि श्रीगुरुंचे वचन । सायंदेव विप्र करी नमन । माथा ठेवूनि चरणी । न्यासिता झाला पुनःपुन्हा ॥८॥ जय जया जगद्‌गुरु । त्रयमूर्तींचा अवतारू । अविद्यामाया दिससी नरु । वेदां अगोचर तुझी महिमा ॥९॥ विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी । धरिला वेष तूं मानुषी । भक्तजन तारावया ॥१०॥ तुझी महिमा वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी । मागेन एक आता तुम्हांसी । तें कृपा करणे गुरुमूर्ति ॥११॥ 
श्रीगुरुंचे हे आशीर्वचन ऐकून सायंदेवाला अत्यानंद झाला. त्याने पुन्हा पुन्हा श्रीगुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांची स्तुती केली. तो म्हणाला, " हे जगदगुरो, तुमचा जयजयकार असो. तुम्ही प्रत्यक्ष त्रयमूर्तींचे अवतार आहात. परंतु आमच्या अज्ञानामुळे तुम्ही आम्हांला मानवरूपांत दिसता. तुमचा महिमा वेदांनाही कळलेला नाही. तुम्हीच विश्वव्यापक असून साक्षात ब्रह्मा-विष्णु व महेश आहात. आपण भक्तजनांना तारण्यासाठीच हा मानववेष धारण केलेला आहे. तुमचे माहात्म्य वर्णन करणे आम्हांस कदापिही शक्य नाही. हे कृपामूर्ती, माझे एक मागणें तुम्ही पूर्ण करावे. - माझे वंशपारंपरी । भक्ति द्यावी निर्धारी । इह सौख्य पुत्रपौत्री । उपरी द्यावी सद्‌गती ॥१२॥  
ऐसी विनंति करुनी । पुनरपि विनवी करुणावचनी । सेवा करितो द्वारयवनी । महाशूरक्रुर असे ॥१३॥ प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी । घात करितो जीवेसी । याचि कारणे आम्हांसी । बोलावीतसे मज आजि ॥१४॥ जातां तया जवळी आपण । निश्चये घेईल माझा प्राण । भेटी जाहली तुमचे चरण । मरण कैचे आपणासी ॥१५॥ 
अशी प्रार्थना करून सायंदेवाने पुन्हा एकदा श्रीगुरुंची करुणा भाकली. गुरुकृपेचे कवच लाभण्यासाठी परोपरीची विनवणी करत तो म्हणाला," मी येथे ज्या यवन अधिकाऱ्याच्या सेवेत आहे, तो अत्यंत क्रूर आहे. तो यवन दरवर्षी एका विप्राला ठार मारतो, आज मला त्याने केवळ याच कारणासाठी बोलावले आहे. मी तिथे गेलो तर तो माझे प्राण निश्चितच घेईल. पण या भवतारक श्रीगुरुचरणांचे दर्शन झाल्यावर मला असे मरण कदापिही येणार नाही.   
संतोषोनि श्रीगुरूमूर्ति । अभयंकर आपुले हाती । विप्रमस्तकी ठेविती । चिंता न करी म्हणोनिया ॥१६॥ भय सांडूनि तुवां जावे । क्रुर यवना भेटावे । संतोषोनि प्रियभावे । पुनरपि पाठवील आम्हांपाशी ॥१७॥ जंववरी तू परतोनि येसी । असो आम्ही भरंवसी । तुवां आलिया संतोषी । जाऊ आम्हीं येथोनि ॥१८॥ निजभक्त आमुचा तू होसी । पारंपर-वंशोवंशी । अखिलाभीष्ट तू पावसी । वाढेल संतति तुझी बहुत ॥१९॥ 
सायंदेवाचा असा दृढभाव पाहून श्रीगुरुमहाराज प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या मस्तकावर आपला अभयहस्त ठेवला आणि त्या भक्तास ग्वाही देत म्हणाले," तू अगदी निर्भय होऊन त्या क्रूर यवनाकडे जा. तो तुझा आदर-सत्कार करून तुला आमच्याकडे परत पाठवील. तू सुखरूप परत येईपर्यंत आम्ही येथेच राहू, हे आमचे अभिवचन आहे. त्यानंतरच आम्ही येथून गमन करू. तू आमचा अत्यंत प्रिय भक्त आहेस. तुझ्या वंशास गुरुभक्तीचे वरदान असेल. तुझे सर्व अभीष्ट कल्याण होईल. तुला उत्तम संततिसुख लाभेल." दत्तभक्तहो, अशी ग्वाही केवळ सद्‌गुरुच देऊ शकतात.
तुझे वंशपारंपरी । सुखे नांदती पुत्रपौत्री । अखंड लक्ष्मी तयां घरी । निरोगी होती शतायुषी ॥२०॥ स्वयं श्रीदत्तमहाराजांनी वरस्वरूप दिलेले असे अनेक शुभाशिष - श्रीदत्ताशिष - तुझे पूर्वज सायंदेव यास लाभले.     
ऐसा वर लाधोन । निघे सायंदेव ब्राह्मण । जेथे होता तो यवन । गेला त्वरित तयाजवळी ॥२१॥ कालांतक यम जैसा । यवन दुष्ट परियेसा । ब्राह्मणाते पाहतां कैसा । ज्वालारूप होता जाहला ॥२२॥ विमुख होऊनि गृहांत । गेला यवन कोपत । विप्र जाहला भयचकित । मनीं श्रीगुरूसी ध्यातसे ॥२३॥ कोप आलिया ओळंबयासी । केवी स्पर्शे अग्नीसी । श्रीगुरूकृपा होय ज्यासी । काय करील क्रुर दुष्ट ॥२४॥ गरुडाचिया पिलीयांसी । सर्प तो कवणेपरी ग्रासी । तैसे तया ब्राह्मणासी । असे कृपा श्रीगुरुची ॥२५॥ कां एखादे सिंहासी । ऐरावत केवीं ग्रासी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी । कलिकाळाचे भय नाही ॥२६॥ 
श्रीगुरुकृपेचे असे अमोघ वरदान प्राप्त करून सायंदेव त्या यवनाकडे सत्वर निघाला. यमासारखा भयंकर असा तो यवन राजा अत्यंत दुष्ट होता. सायंदेवाला पाहताच तो क्रोधाने अग्निज्वाळांसारखा लालेलाल झाला. आता कुठल्याही क्षणीं हा आपल्याला मारणार, अशी भीती सायंदेवास वाटली. तोच एक नवल घडलें! तो यवन तिथून तोंड फिरवून घरांत गेला. सायंदेव जरी भयभीत झाला होता, तरी तो श्रीगुरुंचे मनोमन ध्यान करून प्रार्थना करू लागला - वाळवीला कितीही राग आला तरी ती अग्नीस स्पर्शही करू शकत नाही. त्याचप्रमाणे गुरुकृपेचे अभेद्य कवच लाभलेल्यास दुष्ट कधीही इजा करू शकत नाही. गरुडाच्या पिल्लांना का कधी सर्प खाऊ शकेल ? किंवा मग ऐरावतसारखा महाकाय हत्ती असला तरी तो सिंहाला कधी खातो का ? तसेच गुरुकृपा ज्यावर होते, त्याला कलिकाळाचेही भय नसते. गुरुमहाराजांचा वरदहस्त ज्याच्या मस्तकी आहे, त्याला अपमृत्यूची भीती बाळगण्याचे कारणच काय? - ज्याचे हृदयीं श्रीगुरुस्मरण । त्यासी कैंचे भय दारुण । काळमृत्यु न बाधे जाण । अपमृत्यु काय करी ॥२७॥ ज्यासि नांही मृत्यूचे भय । त्यासी यवन असे तो काय । श्रीगुरुकृपा ज्यासी होय । यमाचे मुख्य भय नाही ॥२८॥ श्रीगुरुकृपेचा हा असा प्रभाव आहे.  
ऐसेपरी तो यवन । अन्तःपुरांत जाऊन । सुषुप्ति केली भ्रमित होऊन । शरीरस्मरण त्यासी नाही ॥२९॥ हृदयज्वाळा होय त्यासी । जागृत होवोनि परियेसी । प्राणांतक व्यथेसी । कष्टतसे तये वेळी ॥३०॥ स्मरण असे नसे कांही । म्हणे शस्त्रे मारितो घाई । छेदन करितो अवेव पाही । विप्र एक आपणासी ॥३१॥ स्मरण जाहले तये वेळी । धांवत गेला ब्राह्मणाजवळी । लोळतसे चरणकमळी । म्हणे स्वामी तूंचि माझा ॥३२॥ येथे पाचारिले कवणी । जावे त्वरित परतोनि । वस्त्रे भूषणे देवोनि । निरोप दे तो तये वेळी ॥३३॥
इकडे तो यवन अधिकारी जो शयनगृहांत गेला तो एखाद्या भ्रमिष्टासारखा अस्वस्थ झाला. त्याला अचानक निद्रा येऊ लागली. काही वेळांतच तो जागा झाला, तेव्हा त्याला हृदयशूळ होऊन प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. आपल्याला काय होत आहे, आपण कुठे आहे हेच त्याला कळेना. त्यावेळी त्याला कशाचेच भान राहिले नाही. एक तेजस्वी विप्र शस्त्रांचे प्रहार करून आपले सर्व अवयव तोडीत आहे, असा त्याला भास होऊ लागला. काही क्षणांतच त्याला देहभान आले आणि एकदम आठवले की त्याने आज सायंदेवाला बोलावले होते व तो बाहेर उभा आहे. हे स्मरण होताच तो यवन आपल्या शयनगृहांतून लगेचच धावत बाहेर आला आणि त्या सायंदेव ब्राह्मणाच्या पायांवर लोळण घेत म्हणाला," तूच माझा स्वामी आहेस. तुला येथे कोणी बोलावले ? आता तू सत्वर परत जा."
दत्तभक्तहो, वास्तविकता अशी होती की त्या यवन अधिकाऱ्याकडे सायंदेव विप्र चाकरी करत होता, मात्र श्रीगुरुकृपेमुळे त्या यवन अधिकाऱ्याची बुद्धी पालटली होती. एव्हढेच नव्हें तर त्याने वस्त्रें-भूषणें देऊन सायंदेवाचा आदर-सत्कार केला आणि त्याला घरी परत जाण्यास सांगितले. श्रीगुरूंच्या वचनांची प्रचिती त्या शिष्योत्तमास आली होती. खरोखरच, त्या यवन अधिकाऱ्याने मोठ्या प्रेमाने सायंदेवाला निरोप देऊन घरी पाठविले होते.    
संतोषोनि द्विजवर । आला ग्रामा वेगवक्त्र । गंगातीरी असे वासर । श्रीगुरुंचे चरणदर्शना ॥३४॥ देखोनिया श्रीगुरूसी । नमन करी तो भावेसी । स्तोत्र करी बहुवसी । सांगे वृत्तांत आद्यंत ॥३५॥
सायंदेवाची त्यावेळी काय मनःस्थिती झाली असेल, त्याचे वर्णन करणे सर्वथा अशक्य आहे. समोर मृत्युभय दिसत असतांना केवळ श्रीगुरुवचनांवर दृढ श्रद्धा ठेवून हा गुरुभक्त यवन अधिकाऱ्याकडे आला होता. त्याच्या गुरुसेवेचे फळ त्याला मिळाले होते, त्याचे गंडांतर टळले होते. त्याच्या चित्तांत अत्यंत कृतज्ञभाव दाटला होता. कधी एकदा श्रीगुरुचरणांचे दर्शन होईल ? असा विचार करीत तो शीघ्र प्रवास करत होता. अतिशय आनंदाने तो सायंदेव गोदाकाठी असलेल्या 'वासर' नामक आपल्या गावी परतला. तेथे श्रीगुरुमहाराज होतेच. सायंदेवाने अनन्यभावानें त्यांच्या चरणकमळांवर मस्तक ठेवले आणि अनेक प्रकारे गुरुस्तुती केली. नंतर यवन अधिकाऱ्याकडे घडलेला सर्व वृत्तांतही सांगितला.       
संतोषोनि श्रीगुरूमूर्ति । तया द्विजा आश्वासिती । दक्षिण देशा जाऊ म्हणती । स्थान-स्थान तीर्थयात्रे ॥३६॥ ऐकोनि श्रीगुरुंचे वचन । विनवीतसे कर जोडून । न विसंबे आतां तुमचे चरण । आपण येईन समागमे ॥३७॥ तुमचे चरणाविणे देखा । राहो न शके क्षण एका । संसारसागर तारका । तूंचि देखा कृपासिंधु ॥३८॥ उद्धरावया सगरांसी । गंगा आणिली भूमीसी । तैसे स्वामी आम्हासी । दर्शन दिधले आपुले ॥३९॥ भक्तवत्सल तुझी ख्याति । आम्हा सोडणे काय नीति । सवे येऊ निश्चिती । म्हणोनि चरणी लागला ॥४०॥ 
त्रिकालज्ञानी श्रीगुरुंना सर्व ज्ञात होतेच, सायंदेवाचा भाव पाहून ते संतुष्ट झाले. " शरणागता अभीष्ट सकळा । देता होय कृपाळू ।" असे ते गुरुमहाराज पुन्हा एकदा त्याला अभयवचन देऊन म्हणाले," आता आम्ही दक्षिणेकडील तीर्थयात्रा करण्याकरिता येथून निघू." आपल्यावर नुकतेच आलेले प्राणघातक संकट केवळ श्रीगुरुकृपेमुळे टळले, हे सायंदेवाला पुरतें उमगले होते. ' खोटी ही प्रपंचमाया । आलें आज कळोनीया ।' ही उपरती त्याला झाली होती. त्यामुळे श्रीगुरुंचा विरह त्याला सहन होईना, तो हात जोडून प्रार्थना करीत त्यांना म्हणाला," महाराज, आतां परते न लोटा या । दीना अर्भकाकारणें ।.. हे तुमचे हे दिव्य चरण सोडून मी आता कोठेही जाणार नाही. मीही तुमच्याबरोबर तीर्थयात्रेला येतो. हे कृपासिंधो, या भवसागरातून तारणारे केवळ तुम्हीच आहांत. पूर्वी भगीरथाने सगरपुत्रांच्या उद्धारासाठी गंगा भूमीवर आणली. तसेच तुम्ही प्रत्यक्ष त्रिमूर्तीस्वरूप स्वामी असून आमच्या उद्धारासाठी मनुष्यरूप धारण करून या भूतलांवर अवतरीत झाला. भक्तवत्सल अशी तुमची ख्याति आहे, आता ते ब्रीद सोडणें योग्य आहे का ? मी तुमच्याबरोबर येणारच." आणि अनन्य शरणागत होऊन त्याने गुरूंचे पाय धरले.  
येणेपरी श्रीगुरूसी । विनवी विप्र भावेसी । संतोषोनि विनयेसी । श्रीगुरू म्हणती तये वेळी ॥४१॥ कारण असे आम्हा जाणे । तीर्थे असती दक्षिणे । पुनरपि तुम्हां दर्शन देणे । संवत्सरी पंचदशी ॥४२॥ आम्ही तुमचे गांवासमीपत । वास करू हे निश्चित । कलत्र पुत्र इष्ट भ्रात । मिळोनी भेटा तुम्ही आम्हां ॥४३॥ न करा चिंता असाल सुखे । सकळ अरिष्टे गेली दुःखे । म्हणोनि हस्त ठेविती मस्तके । भाक देती तये वेळी ॥४४॥ 
सायंदेवाने आपला सर्वस्वभाव श्रीगुरुचरणीं अर्पून अशी विनवणी केली, तेव्हा गुरुमहाराज त्याच्यावर प्रसन्न झाले आणि  " सांप्रत आम्हांला दक्षिणेकडील तीर्थयात्रा करणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही तुला पंधरा वर्षांनी पुन्हा दर्शन देऊ. त्यांवेळी आम्ही तुझ्या गावाजवळच राहू. त्यावेळी तू तुझी पत्नी-मुले आणि इतर नातेवाईकांसह मला भेट. तू निःशंक होऊन सुखाने राहा, तुझी सर्व संकटे व दुःखे गेलीच म्हणून समज." असे म्हणत त्या सायंदेवाच्या मस्तकावर हात ठेवून श्रीगुरुंनी त्याला आशीर्वचन दिले. 
ऐसेपरी संतोषोनि । श्रीगुरू निघाले तेथोनि । जेथे असे आरोग्यभवानी । वैजनाथ महाक्षेत्र ॥४५॥ समस्त शिष्यांसमवेत । श्रीगुरू आले तीर्थे पहात । प्रख्यात असे वैजनाथ । तेथे राहिले गुप्तरूपे ॥४६॥ नामधारक विनवी सिद्धासी । काय कारण गुप्त व्हावयासी । होते शिष्य बहुवसी । त्यांसी कोठे ठेविले ॥४७॥ गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्र कामधेनु । सिद्धमुनि विस्तारून । सांगे नामकरणीस ॥४८॥ पुढील कथेचा विस्तारू । सांगता विचित्र अपारु । मन करूनि एकाग्रु । ऐका श्रोते सकळिक हो ॥४९॥
सिद्ध म्हणतात - त्यानंतर त्याचा निरोप घेऊन श्रीगुरु समस्त शिष्यांसोबत तिथून निघाले. अनेक तीर्थे पाहात ते वैजनाथ नामक क्षेत्रीं आले. आरोग्यभवानीचे स्थान असलेले हे अतिशय प्रख्यात असे तीर्थ आहे. श्रीक्षेत्र वैजनाथ येथे श्रीगुरुंनी काही काळ गुप्त रूपाने राहायचे ठरविले. त्यावर नामधारकाने मोठ्या कुतूहलाने विचारले," श्रीगुरुंना गुप्त होण्याचे कारण काय ? मग त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेल्या शिष्यपरिवारांस कोठे जाण्यास सांगितले ?" कामधेनूस्वरूप गुरुचरित्रातील पुढील कथा अतिशय अद्भुत आहे. श्रोतें हो, तुम्ही ती मन एकाग्र करून ऐका.    
॥ इति श्रीगुरूचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रुरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोSध्यायः ॥

दत्तभक्तहो, केवळ ४९ ओव्यांचा हा चौदावा अध्याय तुम्ही विशेष पाठांत ठेवावा. तो श्रीगुरुचरित्र अध्यायमालिकेचा मेरुमणि आहे. याचे भक्तिभावाने पारायण व चिंतन केल्यास दुर्धर संकटांचा नाश होतो, असे अनेक थोर पुरुषांचे वचन आहे. 
पोटशूळ असलेल्या त्या ब्राह्मणाचे कसे निमित्त झाले आणि सायंदेवावर श्रीगुरुंची कृपा कशी झाली, हा कथाभाग या अध्यायात आलेला आहे. यांत विशेष लक्षांत घेण्यासारखा मुद्दा असा की सायंदेवांकडून प्रथम श्रीगुरुंनी प्रामुख्याने १)परोपकार २)अन्नदान ३)गुरुसेवा-गुरुभक्ती अशी तीन प्रकारची सेवा करून घेतली आणि सर्वात महत्वाची ४)गुरुवाक्य प्रमाण ही श्रद्धा - अशी कसोटीही घेतली. तदनंतरच त्याचे प्राणसंकटातून रक्षण केले. प्रथमतः त्या उदरव्यथेच्या ब्राह्मणास घरी भोजनासाठी बोलाविण्यास तो साशंक होता. कारण भोजन करून जर त्या पोटशूळाची व्याधी असलेल्या ब्राह्मणाचा जीव गेल्यास आपल्याला ब्रह्महत्येचे पातक लागेल, अशी भीती सायंदेवास होती. मात्र प्रथमभेटीतच त्याने श्रीगुरुंच्या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवून उदरव्यथेच्या ब्राह्मणास भोजनास आपल्या गृहीं बोलाविले. पुढें पूजन करणे, भिक्षान्न भोजन देणे ही सेवा करतांना सायंदेव व त्याची पत्नी जाखाई यांचा जो उत्कट भक्तिभाव होता, त्यांमुळेच श्रीगुरु प्रसन्न झाले.

' न करा चिंता असाल सुखे । सकळ अरिष्टे गेली दुःखे ।... ' अशी भाक प्रत्यक्ष त्या परब्रह्माकडून सायंदेवाला मिळाली, त्याच्या भाग्याचे काय अन किती वर्णन करावे बरें ? वरद-कृपाघन श्रीनृसिंहसरस्वती महाराजांनी कडगंची इथे त्याच्या घरी भिक्षा घेतलीच, अन तद्-नंतर गाणगापुर येथे श्रीगुरु असतांनादेखील पुनःश्च स्वगृहीं यथासांग श्रीगुरुपूजन आणि मोठी समाराधना करण्याचे महद्भाग्य या सद्‌भक्तास अन त्याच्या संपूर्ण परिवारास लाभले. भक्तकामकल्पद्रुम दत्तमहाराज किमान दोनदा तरी या शिष्योत्तमाच्या घरीं गेले होते, असा श्रीगुरुचरित्रांत स्पष्ट उल्लेख आहे. तसेच, पुढें पंधरा वर्षांनी नित्य श्रीगुरुदर्शन, सेवा, सान्निध्य, काशीयात्रापुण्यफळ आणि प्रत्यक्ष श्रीगुरुदेवांच्या उपस्थितीत अनंतव्रत पूजन असे अनेक परमलाभ सायंदेवास प्राप्त झाले. अर्थात त्याचा जो अनन्यभाव श्रीगुरुचरणीं स्थिर झाला होता, त्याचेच हे वरदानस्वरूप फळ होते.

' कांहीं मला सेवनही न झालें । तथापि तेणें मज उद्धरीलें ।... ' या उक्तीची प्रचिती असंख्य दत्तभक्तांनी आजपर्यंत नित्य अनुभवली आहे. तेव्हा आपणही - " श्रीगुरुकृपेची त्वरित प्रचिती देणाऱ्या या मेरुमणि अध्यायाचे नित्य स्मरण-पठण घडावें आणि गुरुमहाराजांच्या ठायीं सायंदेवाचा जो उत्कट भक्तिभाव होता, त्याच्या किमान एक कोट्यांश भक्तिभाव तरी दत्तमहाराजांची ही अत्यल्प सेवा करतांना आपल्या मनांत दृढ व्हावा !", हीच त्या भक्तवत्सल, शरणागत-तारक आणि भवभय-वारण अशा श्रीदत्तप्रभूंच्या चरणीं प्रार्थना करू या !

   

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

Nov 9, 2023

श्रीपादश्रीवल्लभस्तोत्रम्


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥













ब्राह्मण्यै यो मंक्षु भिक्षान्नतोऽभूत्प्रीतस्तस्या यः कृपार्द्र: सुतोऽभूत् । 

विस्मृत्यास्मान् किं स गाढं निदद्रौ श्रीपादद्रौ वापदाहानिद्रौ ॥१॥ भावार्थ : जे सुमतीनामक ब्राह्मणीने दिलेले भिक्षान्न स्वीकारून तिच्यावर त्वरित प्रसन्न झाले, आणि कृपाप्रसाद म्हणून स्वतः तिचे पुत्र झाले. ते भक्तांच्या आपदा तत्काळ निवारण करणारे श्रीपाद श्रीवल्लभ आम्हांला विसरून दूर एखाद्या पर्वतावर अथवा औदुंबर वृक्षातळीं गाढ निद्रिस्त झाले आहेत का ?      आश्वास्याम्बां प्रव्रजन्नग्रजान्यः कृत्वा स्वङ्गान् संचचारार्यमान्यः ।  विस्मृत्यास्मान् किं स गाढं निदद्रौ श्रीपादद्रौ वापदाहानिदद्रौ ॥२॥ भावार्थ : ज्यांनी (साधुजनांना दीक्षा देण्यासाठी) तीर्थाटनाला जातांना (केवळ आपल्या हस्तस्पर्शाने) ज्येष्ठ बंधुंच्या व्यंगाचा परिहार करून मातेला आश्वस्त केले, जे सर्व विद्वज्जनांना पूजनीय आहेत आणि जे भक्तजनांच्या कल्याणासाठी या भूमीवर संचार करू लागले, ते तत्काळ संकट निवारण करणारे श्रीपाद श्रीवल्लभ आम्हांला विसरून एखाद्या पर्वतावरील एकांत स्थळीं अथवा औदुंबर वृक्षातळीं गाढ निद्रिस्त झाले आहेत का ?      सार्भा मर्तुं योद्यता स्त्रीस्तु तस्या दुःखं हर्तुं त्वं स्वयं तत्सुतः स्याः ।   विस्मृत्यास्मान् किं स गाढं निदद्रौ श्रीपादद्रौ वापदाहानिदद्रौ ॥३॥ भावार्थ : मंदमती मुलासह जी स्त्री प्राणत्याग करण्यास निघाली होती, तिचे दुःख दूर करण्यासाठी जे श्रीगुरु स्वतः तिचे पुत्र झाले, तेच भक्तांची अरिष्टे तत्काळ दूर करणारे श्रीपाद श्रीवल्लभ आम्हांला विसरून एखाद्या पर्वतावर अथवा औदुंबर वृक्षातळीं गाढ निद्रिस्त झाले आहेत का ?  राज्यं योऽदादाशु निर्णेजकाय प्रीतो नत्या यः स्वगुप्त्यै नृकायः ।   विस्मृत्यास्मान् किं स गाढं निदद्रौ श्रीपादद्रौ वापदाहानिदद्रौ ॥४॥ भावार्थ : भक्तिभावाने केलेल्या केवळ नमस्काराने प्रसन्न होऊन ज्यांनी एका परिटाला राज्याचे वरदान दिले, आणि लौकिकदृष्ट्या अदृश्य होऊनही, जे अजूनही गुप्तरुपें लीलादेह धारण करून भक्तजनांच्या कामना पूर्ण करतात, ते भक्तांच्या आपदा तत्काळ निवारण करणारे श्रीपाद श्रीवल्लभ आम्हांला विसरून दूर एखाद्या पर्वतावर अथवा औदुंबर वृक्षातळीं गाढ निद्रिस्त झाले आहेत का ?   प्रेतं विप्रं जीवयित्वाऽस्तजूर्ति यश्चक्रे दिक्शालिनीं स्वीयकीर्तिम् ।  विस्मृत्यास्मान् किं स गाढं निदद्रौ श्रीपादद्रौ वापदाहानिदद्रौ ॥५॥ भावार्थ : ज्यांनी (वल्लभेश) ब्राह्मणाला जिवंत करून त्याचे ऐहिक आणि पारलौकिक कल्याण केले, ज्यांची कीर्ती अखिल दिगंतात पसरली आहे, तेच तत्काळ संकट निवारण करणारे श्रीपाद श्रीवल्लभ आम्हांला विसरून एखाद्या पर्वतावर अथवा औदुंबर वृक्षातळीं गाढ निद्रिस्त झाले आहेत का ?  ॥ श्री.प.प.श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीपादश्रीवल्लभस्तोत्रं संपूर्णम् ॥


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥


Oct 27, 2023

यतिवेशे प्रगटले, श्रीगुरू भीमरथी गंधर्वपुरी


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

दत्त महाराजांची राजधानी म्हणून विख्यात असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीला पौर्णिमेच्या दिवशी पालखीपुढे म्हटले जाणारे हे दत्तभक्त नारायणसुतरचित पद !


माहूरपुरीची सतीसावित्री, रोगी पतीसी घेउनिया ।

सद्‌भावें शरणागत आली, गाणगापुरी निज ठाया ॥ स्थानिक लोकां सती म्हणतसे, दावा सद्‌गुरुचे पाया । भीमाsमरजा संगम ठायी, अनुष्ठान विधी सांगुनिया ॥ येतील तेव्हा सांगा आम्हा, दीनावरती करा दया । श्यामल सुंदर रूप तेधवा, पाहीन नरहरी यतिराया ॥ ग्रामीचे जन म्हणती सतीला, गुरुवर येतील दो प्रहरी । यतिवेशे प्रगटले, श्रीगुरू भीमरथी गंधर्वपुरी ॥१॥ प्राणपतीसी पाहता अधिक, त्रिलोक जमला ते समयी । अंतकाळ जाहला पतीचा, सती घाबरली ते पायी ॥ आक्रोशाने म्हणे, आता मी काय करू दत्ता बाई । कीर्ती ऐकुनी, वीस योजने सौभाग्यास्तव या ठायी ॥ आले परंतु नरहरी राया, सार्थक त्वां केले नाही । देह काय कामाचा भोगुनी, म्हणुनी घेते ठायी सुरी

यतिवेशे प्रगटले श्रीगुरू भीमरथी गंधर्वपुरी ॥२॥ रुद्राक्षांचे हार गळ्यामध्ये, भस्मांकित श्यामल काया । धरुनी प्रगटले म्हणती, सतीला का दुःखी होसी वाया ॥ भक्ति पाहुनी, पतिव्रतेचा आचार सर्वही सांगुनिया । सहगमनाते फार चांगले जाई, म्हणे ती निज ठाया ॥ शोक मोह त्यागुनी तेधवा, पतीसवे स्वर्गां जाया । सर्व तयारी केली, सतीची आनंद जलमय झाली काया ॥ वाणे देती पाहण्यासाठी, दाटी झाली भीमातीरी । यतिवेशे प्रगटले श्रीगुरू भीमरथी गंधर्वपुरी ॥३॥ अवधूताचे आज्ञा अन्वये, संगमठायी गुरुमूर्ती । पाहुनी येते मग संस्कारी, म्हणुनी विप्राते प्रार्थी ॥ अश्वत्थातळी पाहुनी गुरुवर, नमस्कार प्रेमें करें ती । सौभाग्ये ध्रुव नांदे, सतीला हास्यमुखे गुरुवर वदती ॥ प्रेत आणुनी, तीर्थ शिंपुनी, अमृतदृष्टीने पाहती गुरु । सजीव करुनी ब्राह्मण, दिधले सौभाग्या सावित्रीप्रति ॥ नारायणसुत गातो प्रेमें, सद्‌गुरुचे यश परोपरी । यतिवेशे प्रगटले श्रीगुरू भीमरथी गंधर्वपुरी ॥४॥


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥


Oct 20, 2023

श्री प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं अथ देव्यपराधक्षमापनस्तोत्रम्


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ ऐं र्‍हीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॥


नमोस्तु ते देवि जगन्निवासे । सच्चिद्विलासे सुमनोज्ञहासे ।
या सेवकाची परिसे विनंति । धरोनि कारुण्यलवासि चित्तीं ॥१॥ ब्रह्मांड हे निर्मिसी तूं महेशी । चित्शक्ति तूं हेतु न केवि होशी ।
उत्पत्तिरक्षाप्रलयादिहेतु । ती तूं करी हा मम पूर्ण हेतु ॥२॥ उपासना नित्य तुझी घडावी । त्वत्पादभक्ति हृदयीं जडावी ।
मुखीं तुझें नाम वसो सदैव । जे शीघ्र वारी भजतां कुदैव ॥३॥ मी पापि आहें जरि कां कुबुद्धि । तरी मला देउनी तूं सुबुद्धि ।
बुद्धिप्रकाशे मज तारि ईशे । धीशे शिरीं हस्त धरीं त्र्यधीशे ॥४॥ पापत्रया तूं निववी भवानि । तापत्रया तूं शमवी मृडानि ।
शर्वाणि शर्वार्ति हरी सदैव । रुद्राणि माझें शमवी कुदैव ॥५॥ रुद्राणि हृद्रोग हरी अशेष । शर्वाणि आपत्ति हरी अशेष ।
दारिद्र्यदुःखौघ भया निवारी । अरिष्ट वारोनि अमित्र मारी ॥६॥ वारी उभे दुर्व्यसना सनातनि । तारी भवाब्धीतुनी तूं चिरंतनी ।
कुसंग वारी मज देई सन्मति । सुसंगयोगें मज देइ सद्‌गती ॥७॥ न लाभ मागे न विजया मी मागे । न उत्कर्ष मागे न सुकीर्ति मागे ।
मागे तुझें पाद हृदयीं असावे । त्वत्पादि मच्चित्त सदा वसावे ॥८॥ कृपाकटाक्षे पाहतां न तोटा । तुझा मला होइल लाभ मोठा ।
तेव्हां कृपादृष्टिलवे शिवे तूं । मला निरीक्षी हरी जन्महेतु ॥९॥ 
ll इति श्री प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं देव्यपराधक्षमापनस्तोत्रम् संपूर्णम् ll 

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


अवश्य वाचावे असे काही -


*** उपासना आदिशक्तीची - श्री दुर्गा सप्तशती, श्री देवी माहात्म्य ***


ll श्री प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्री तुलजापुरवासिनी स्तोत्रम् ll


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ ऐं र्‍हीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॥ 


नमोऽस्तु ते महादेवि शिवे कल्याणि शाम्भवि। प्रसीद वेदविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते ll१ll हे प्रभू शिवशंकरांची शक्ति असलेली आदिमाया महादेवी, अखिल विश्वाचे कल्याण करणारी कल्याणी, शंभुची पत्नी शाम्भवि तुला माझे नमन असो. हे आदिशक्ति, सकल वेदही तुझी प्रार्थना करतात. तुझ्या कृपाप्रसादाचा लाभ मला प्राप्त व्हावा, हीच तुझ्या चरणीं प्रार्थना ! हे जगदम्बे, तुला माझा नमस्कार असो. जगतामादिभूता त्वं जगत्त्वं जगदाश्रया । एकाप्यनेकरूपाऽसि जगदम्ब नमोऽस्तु ते ll२ll या जगताचे मूळ स्वरूप असलेली तू आदिमाया आहेस. तू विश्वव्यापक असून या सर्व चराचर सृष्टीचा आश्रय आहेस. तू परमात्म्याची शक्ति असून अनेक रूपांत प्रगट होत असते. हे जगदम्बे, तुला मी नमन करतो.    सृष्टिस्थितिविनाशानां हेतुभूते मुनिस्तुते । प्रसीद देवविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते ll३ll हे महामाये, केवळ तुझ्याच संकल्पमात्रें या सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि विनाश या प्रक्रिया होत असतात. हे भगवती, सर्व ऋषीमुनी तुझेच नित्य स्तवन करतात. सर्व देवही तुझ्या कृपेची प्रार्थना करतात. हे जगन्माते, माझ्यावर कृपादॄष्टी कर. हे जगदम्बे, तुला माझा नमस्कार असो.        सर्वेश्वरि नमस्तुभ्यं सर्वसौभाग्यदायिनि । सर्वशक्तियुतेऽनन्ते जगदम्ब नमोऽस्तु ते ll४ll हे आदिशक्ति, तू सर्व चराचराची परमेश्वरी असून भक्तांना सर्व सौभाग्य प्रदान करणारी आहेस. तूच सर्व शक्तिस्वरूपिणी आहेस. हे जगदम्बे, तुला मी नमन करतो.      विविधारिष्टशमनि त्रिविधोत्पातनाशिनि । प्रसीद देवि ललिते जगदम्ब नमोऽस्तु ते ll५ll हे भगवती, केवळ तुझ्या कृपादृष्टीनें सर्व अरिष्टांचे शमन होते आणि त्रिविध तापांचा नाश होतो. हे ललितादेवी, मला तुझा कृपाप्रसाद दे. हे जगदम्बे, तुला माझा नमस्कार असो.    प्रसीद करुणासिन्धो त्वत्तः कारुणिका परा । यतो नास्ति महादेवि जगदम्ब नमोऽस्तु ते ll६ll हे जगज्जननी, तू करुणासागर आहेस. हे महादेवी, तू परमश्रेष्ठ असून तुझ्याइतके कृपाळू इतर कोणीही नाही. हे जगदम्बे, तुला मी नमन करतो.  

शत्रून्जहि जयं देहि सर्वान्कामांश्च देहि मे । भयं नाशय रोगांश्च जगदम्ब नमोऽस्तु ते ll७ll हे भगवती, तुझ्या कृपेने आमच्या सर्व शत्रूंचा नाश होऊन आम्हांला जय प्राप्त व्हावा. आमच्या सकल अभीष्ट मनोकामना पूर्ण व्हाव्यात. तसेच भय आणि रोग यांचा नाश होऊ दे.(असे तू आम्हांस वरदान दे.) हे जगदम्बे, तुला माझा नमस्कार असो.  जगदम्ब नमोऽस्तु ते हिते जय शम्भोर्दयिते महामते । कुलदेवि नमोऽस्तु ते सदा हृदि मे तिष्ठ यतोऽसि सर्वदा ll८ll हे जगन्माते तुला नमन असो. हे सकल विश्वाचे कल्याण करणारी महादेवांची मूळ प्रकृति शाम्भवी, तुझा जयजयकार असो. हे कुलस्वामिनी आदिशक्ति तुला मी नमस्कार करतो. माझ्या हृदयात तुझा नित्य वास राहो, हीच प्रार्थना !   तुलजापुरवासिन्या देव्याः स्तोत्रमिदं परम् । यः पठेत्प्रयतो भक्त्या सर्वान्कामान्स आप्नुयात् ll९ll तुळजापूरवासिनी भवानी देवीचे हे स्तोत्र अतिशय श्रेष्ठ असून जो भक्तिभावाने पठण करेल, त्याच्या सर्व मनोकामना श्री भगवतीच्या कृपेने निश्चितच पूर्ण होतील. ll इति श्री प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीतुलजापुरवासिन्या देव्याः स्तोत्रं संपूर्णम् ll

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


Oct 3, 2023

श्री स्वामी समर्थ ऋणमोचनी स्तोत्र


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


नमस्ते देव देवेश नमस्ते जगदीश्वरा । विघ्नहर्ता महाबाहू ऋणमुक्ती त्वरे करा ॥१॥ महामुनी महावीरा महेंद्रा मनमोहना त्रिमूर्ते त्रिपादूर्ध्वा ऋणमुक्ती त्वरे करा ॥२॥

अकारा अक्षरा ब्रह्मा ब्रह्मरुपा सुदर्शना नमस्ते आनंदरुपा ऋणमुक्ती त्वरे करा ॥३॥

शुक्लांबरा शुक्लवर्णा शुक्लगंधानुलेपना सर्व शुक्लमया स्वामी ऋणमुक्ती त्वरे करा ॥४॥

ताम्रओष्ठा ताम्रवर्णा ताम्रगंधानुलेपना ताम्रपुष्पप्रिया स्वामी ऋणमुक्ती त्वरे करा ॥५॥

कृष्णांबरा कृष्णवर्णा कृष्णगंधानुलेपना कृष्णपुष्पप्रिया स्वामी ऋणमुक्ती त्वरे करा ॥६॥

पीतांबरा पीतवर्णा पीतगंधानुलेपना पीतपुष्पप्रिया स्वामी ऋणमुक्ती त्वरे करा ॥७॥

नीलांबरा नीलवर्णा नीलगंधानुलेपना नीलपुष्पप्रिया स्वामी ऋणमुक्ती त्वरे करा ॥८॥

धूम्रांबरा धूम्रवर्णा धूम्रगंधानुलेपना धूम्रपुष्पप्रिया स्वामी ऋणमुक्ती त्वरे करा ॥९॥

श्रीपाद वल्लभा स्वामी दत्तरुपा दिगंबरा स्वामी समर्थ नृसिंहभानू ऋणमुक्ती त्वरे करा ॥१०॥

योगीवर्या यतिश्रेष्ठा सद्‌गुरु गुरुमाऊली शरण शरण आलो मी ऋणमुक्ती त्वरे करा ॥११॥


॥ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


रचनाकार - श्रीयुत् नागेश करंबेळकर