Mar 31, 2022

श्री आनंदनाथ महाराजकृत श्री स्वामी समर्थ ध्यान


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः


ध्यान हे तुझें देखतां बरें । रूप तें कसें जाण साजिरें । पूर्ण ब्रह्म तूं विश्वकारणा । सगुण रूप हें जग तारणा ॥१॥ काय गूण ते कवण हे लिला । दिव्य मंचकी स्वामी शोभला । केशर उटी भाळिं चर्चिली । मध्य कस्तुरी रेखिली भली ॥२॥ धनुष्य आकृती भोंवया तरी । मध्य भृकुटी शोभे साजिरी । पद्मनेत्र हो देखतां भले । रूप तें कसें मुख शोभले ॥३॥ कठी ती बरी शोभे साजिरी । रूद्राक्ष तरी मध्य निरंतरी । माळ हे बरी दिसे साजिरी । मूर्ती ही तुझी कैसी गोजिरी ॥४॥ कौपिन कळा कटीसि मेखळा । रंग ना निळा शुभ्र सांवळा । काय रंग तो कोण वर्णिल । वेद वर्णिता मौन्य पावेल ॥५॥ दिनवत्सला स्वामी राजसा । कां न पावसी आजि हो कसा । कोठें गुंतला कवण त्या परी । कवण भक्त हो धरी पदरी ॥६॥ म्हणुनिया तुला वेळ लागला । धांव पाव तूं आजि गा भला । गजेंद्रस्तवनें तूचि धावसी । भक्त-संकटी बापा रक्षिसी ॥७॥ तुजविणें आम्हा कोण हो तरी । आजि धांव गा जाण लौकरी । सर्व सुख तें देखतां तुला । बापा सांभाळी आजि या मुला ॥८॥ मायबाप तूं जाण सोयरा । आमुचा तरी आसरा खरा । भेट देऊनी तोषवी मना । हातिं धरिलें जाण चरणा ॥९॥ स्तोत्र वाचिता दुःख ते सरे । प्रेम धरील्या भव हा तरे । सत्यसंकटी स्वामी सांभाळी । स्तोत्र वाचितां पुरवि आळी ॥१०॥ आनंदनाथ तो बोलला तरी । स्वामी बोलवी जाण वैखरी । म्हणुनि सांगतो तुमच्या हिता । स्तोत्र वाचिता जाईल व्यथा ॥११॥


॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


Mar 30, 2022

श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥  ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ या श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्षाचे ब्रह्मा ऋषी । परमात्मा देवता ॥ गायत्री हा छंद । मूळ पुरुष । वडाचे झाड । दत्तनगर । मूळ मूळ हे अग्नीनारायणयुक्त बीज । आदिमाया शक्ती । सर्व तापहर सप्ताक्षरयुक्त मंत्र हा कीलक ॥ धर्म-अर्थ-काम-मोक्ष या पुरुषार्थ प्राप्तीसाठी जपाचा विनियोग ॥ ॐ लं ॐ हं । ॐ यं ॐ वं । ॐ रं ॐ सं । या बीजाक्षरांसह षडंग न्यास ॥ ॐ नमोजी परब्रह्मा । परमात्मा प्राणदाता । ओंकार स्वरूपा श्री स्वामी समर्था नमो नमो हे कवच ॥ ऐसा हा मंत्र जाणावा ॥ ॐ इह-पर-सुरलोकी ॐ । ॐ श्री स्वामी समर्था नमो नमो । रक्ष रक्ष मज । रक्ष रक्ष मज ॥

तू कर्ता तू धर्ता । तूचि परिपाता । तूचि संहर्ता । या अनंत विश्वाचा ॥

भय मज मरणाचे । भय चिंतातुर जगण्याचे । भय शीलभ्रष्ट या जगताचे । सांभाळी देवा मला ॥

देवा रक्षी मज क्षणोक्षणी । रक्षी मज दिनोदिनी । रक्षी मज निशीदिनी । शरण शरण आलो तुला ॥ ॐ इह-पर-सुरलोकी ॐ ॥ तूचि सत्यज्ञान । सृष्टीचे विज्ञान । तू मूळ कारण । “अहं ब्रह्मास्मि"चे ॥ तू ब्रह्मा विष्णु रुद्र । अग्नी वायु इंद्र । आपो भूमी सूर्य चंद्र । व्योम तू ॥ तू ऋग्वेद यजुर्वेद । तू अथर्व सामवेद । पुराण आणि उपनिषद । सर्वही तूच तू ॥ देवा तू वाङ्मय । तू चिन्मय । अणुरेणू हिरण्मय । ब्रह्ममय तूचि ॥

ॐ इह-पर-सुरलोकी ॐ ॥ सोहं आत्माराम । कोहं मायाभ्रम । दाविशी उत्तम । नामाच्या आदर्शी ॥ ॐ हे एकाक्षरी ब्रह्म । ते तुझेचि निजरूप । प्रकाशे अपरंपार । वर्णिता वर्णवेना ॥ दोन अक्षरी दत्त । स्मर्तृगामी नाथ आर्तांचा आधार । परोपकारी ॥ तीन अक्षरी श्रीपाद । वैराग्य प्रखर । जाळिला विकार । शिव तेजे ॥ नरसिंह अक्षरे चार । आश्रम धर्म । वेदांचा विचार । विवरिला ॥ स्वामी समर्थ पंचाक्षर । मोक्षाचे द्वार । तोडिला आचार । दांभिकांचा ॥ ॐ दत्त । श्रीपाद नरसिंह । स्वामी समर्थ । पंधरा अक्षरी मंत्र हा ॥ जपता निरंतरी । आबाल-थोरी । कोणी असो जरी । प्रपंची विकारी ॥ तयासी सत्वरी । स्वामी दत्त अंतरी । होईल तमारी । उद्धार कर्ता ॥ साऱ्या रोगव्याधी । बाधा मनोव्याधी । घोर कष्ट सर्वांआधी । नष्टतील ॥ अक्काबाईचा फेरा । जाईल माघारा । येईल लक्ष्मी घरा । नित्य पाठे ॥ अभक्ष्य भक्षण । पापाचे कारण । जाईल विरून । अथर्व पाठाने ॥ अपेय पान । दुर्गुण महान । जाईल निरसून । अथर्व पाठाने ॥ अगम्य गमन । नरक दारुण । जाईल जळून । अथर्व पाठाने ॥ व्रात्य संभाषण । बुद्धीचे ग्रहण । जाईल सुटून । अथर्व पाठाने ॥ पंचमहापापे । भस्मसात आपोआपे । अथर्व प्रतापे । होतील पै ॥ सहस्त्रावर्तन । हे सहस्त्रभोजन । वा शतयज्ञाहून । पुण्यदायी ॥ आता येणे होवो आरोग्यवृद्धी- ऐश्वर्यवृद्धी- शांतिवृद्धी- वंशवृद्धी- धनवृद्धी- ज्ञानवृद्धी- योगवृद्धी- कीर्तीवृद्धी । दिगंत पाठकाची ॥ हरि ॐ तत्सत् ॥ ऐसा हा मंत्र जाणावा ॥ इति श्री उपनिषदस्वरूप श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष स्तोत्र संपूर्ण ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ ॥

रचनाकार - श्रीयुत् नागेश करंबेळकर



Mar 24, 2022

स्वप्नांत आले माझ्या गुरुदेव दत्त...


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


रात्रंदिवसा देवा, तुमची मूर्ती ध्यानांत

त्याचा लागे ना अंत, त्याचा लागे ना अंत

स्वप्नांत आले माझ्या गुरुदेव दत्त llधृ.ll

दिव्यस्वरूपी सडा टाकत होते अंगणांत

'अल्लख' म्हणुनी भिक्षा मागत आले दारात दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात ll१ll भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त ll२ll श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात ll३ll भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडावांचा नाद घुमतो माझ्या कानांत 'गुरुदेव दत्त' मंत्र ठेवा, ठेवा ध्यानांत ll४ll



Mar 23, 2022

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय १२


कलियुगाचा कालखंड, जीवमात्रांचे आयुर्मान, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण फलप्राप्ती, अन्नदानाचे महत्त्व, कुलशेखराचे गर्वहरण, आणि भीमास कृपाप्रसाद 

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

श्री सुब्बया श्रेष्ठी मोठे विद्वतप्रचुर आणि व्यासंगी होते. आपल्या ओघवत्या वाणींत ते कितीतरी नवनवीन विषयांची सुलभतेनें ओळख करून देत असत. तें इह-पर कल्याणदायक असे ज्ञानामृत श्रवण केल्यामुळें श्रोत्यांची, साधकांची आत्मोद्धाराच्या प्रगतीपथावर सहजच वाटचाल होत असे. त्यांनी कथन केलेल्या श्रीपाद प्रभूंच्या सर्वच बाललीला ऐकून शंकरभट्ट विस्मित तर होत असतच, मात्र श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार लीलांचे वर्णन करण्याचा आपण केलेला जो संकल्प आहे, त्यास त्या परब्रह्माचा कृपाशीर्वाद आहे, अशीच त्यांची दिवसोंदिवस दृढ श्रद्धा बळावत होती. श्रीपाद अवताराची महती सांगताना श्री सुब्बया श्रेष्ठी म्हणाले. - श्रीपाद श्रीवल्लभ हेच श्री वेंकटेश्वर आहेत. कलियुगांत श्रीपाद प्रभूच कल्की होऊन अवतरित होणार आहेत. सांध्र-सिंधु वेदांतानुसार या कलियुगाची पाच हजार वर्षे सरल्यावर सामान्य प्रलय होईल आणि त्यानंतर सत्ययुगाचा आरंभ होईल. मात्र, वेदश्रुतींच्या कालगणनेनुसार या कलियुगाचा कालखंड चार लाख बत्तीस हजार वर्षे आहे. यांत अंतर्दशा, सूक्ष्मदशा, विदशा यांचा अंतर्भाव होतो. अर्थातच वेदांत जाणणाऱ्याला हे सर्व ज्ञात असते.  या कलियुगांत ब्रह्मदेवाने प्रत्येक जीवमात्रांस एकशेवीस वर्षांचे आयुष्यमान दिले आहे. मात्र, याचा अर्थ प्रत्येक प्राणिमात्र आपापले भौतिक शरीर एकशेवीस धारण करू शकतील असा नव्हे, तर याचा गूढार्थ असा की, सामान्य स्थितींत एकशेवीस वर्षांत घेता येतील इतके श्वास आणि प्रश्वास प्रत्येकांस दिले आहेत. क्रोधिष्ठ, वेगवान जीवन जगू पाहणारे, चिंताग्रस्त अथवा दुष्प्रवृत्तीचे लोक आपले श्वास वेगाने घेऊन कमी  वेळात  संपवून  टाकतात. उदाहरण म्हणून बघायचे झाल्यास, हळूहळू श्वास-प्रश्वास घेणारे महाकाय कासव ३०० वर्षे जगते. तर, चंचल असे मर्कट तेच श्वास-प्रश्वास लवकर घेऊन अल्पकाळच  जिवंत  राहते. तसेच, योगी-मुनीजन अनेक योगासने, वायुंचे  कुंभक आदि क्रियांनी श्वास शरीराच्या अंतर्भागात फिरवत राहतात. परिणामी, त्यांचे अनेक श्वास वाचतात आणि ते दीर्घायुषी होतात. यांविषयी योगशास्त्राचे सखोल ज्ञान असलेले विस्तृतपणें समजावून सांगू शकतील.   मानवी शरीरावर जिवाणूंचादेखील परिणाम होत असतो. त्यामुळे सर्व शरीर, त्यातील अवयव, प्राणशक्ति आणि मनःशक्ती यांत बदल होत राहतात. मनःशक्तीचे अतुलनीय सामर्थ्य दैवीशक्ति, दैवीकृपा यांची अनुभूती देऊ शकते आणि त्याद्वारे साधकाचे मन, प्राण आणि शरीर शुद्ध होऊ लागते. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हे साक्षात त्या परब्रह्माचेच स्वरूप आहे. या दिव्य ग्रंथातील प्रत्येक अक्षरात सिद्धशक्ती आणि योगशक्ती समाविष्ट आहेत. असे प्रासादिक ग्रंथ सश्रद्धेने वाचल्यास प्रत्यक्ष श्रीपाद प्रभूंच्या कृपेची अनुभूती येते. या ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांच्या ऐहिक मनोकामना तर सत्वर पूर्ण होतातच, तसेच परमार्थिक, परलौकिक कल्याणदेखील होते. या परमसिद्ध ग्रंथाचे शास्त्रोक्त पद्धतीने पारायण करावे आणि तदनंतर कमीत कमी अकरा सत्पुरुषांना भोजन द्यावे अथवा कुठल्याही दत्तक्षेत्रीं जाऊन भोजनखर्चाएवढी रक्कम दान करावी. सत्पुरुषांना अन्नदान केल्याने आयुष्यवृद्धी होते. तसेच, सत्पुरुषांच्या आशीर्वादाने शांती, पुष्टी, तुष्टी, समाधान, ऐश्वर्य, भाग्य आदिरूपांत कैकपटीने फळदेखील मिळते. पांडव वनवासात असतांना द्रौपदीने श्रद्धेने अर्पण केलेल्या अन्नाच्या केवळ एका कणाने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि त्या भक्ताभिमानी परमात्म्यानें दुर्वास महर्षी आणि त्यांच्या दहा हजार शिष्यांना उत्तम, सुग्रास भोजन दिले. तसेच, साधकांनी श्रीकृष्ण आणि सुदामा यांचीही कथा सदैव स्मरणांत ठेवावी. सुदामाच्या पत्नीने भक्तिभावाने दिलेले पोहे श्रीकृष्णांनी स्वीकारले आणि त्याबदल्यात अपार ऐश्वर्य, राजवैभवाचे वरदान दिले. कर्मसूत्राची तीव्रता कशी असते आणि त्या परब्रह्माची कृपा झाल्यास त्याचे काय फल प्राप्त होते, हेच या कथेतून विशद होते. श्रीपाद प्रभू आता चार वर्षांचे झाले होते. पीठीकापुरवासी त्यांच्या नित्य नूतन लीला अनुभवीत असत. एके दिवशी, मल्याळ देशातील कुलशेखर नामक एक मल्ल पीठीकापुरांत आला. तो वर्मकलेत निष्णात होता. ही एक प्रकारची मर्मकला होय. आपल्या शरीराच्या अनेक भागांवर नियंत्रण करू शकणारी अशी काही महत्वाची ऊर्जाकेंद्रे असतात, त्यांना मर्मबिंदू असे म्हणतात. या विशिष्ट मर्मबिंदूंवर योग्य पद्धतीने दाब अथवा जोर देऊन शरीराचा कोणताही एखादा अवयव दुर्बल करता येतो किंवा त्यांत वैकल्यही निर्माण करता येते. ही वर्मकला युद्धांत बलशाली शत्रूला नामोहरम करण्यासाठीही वापरत असत. मात्र काही विशेष मर्मस्थाने ज्यांचा रोगचिकित्सा पद्धतीत लोकांच्या वेदना दूर करण्यासाठी किंवा रोगपरिहारार्थ उपयोग करण्यात येतो. शरीरावरील या १२ विशिष्ट मर्मस्थानी प्रचंड प्राणशक्ती अथवा चैतन्य असते, त्यांना ' अडंगल ' असे संबोधतात. वैद्यशास्त्रांत यांचा शोध प्रथमतः प्राचीन, विख्यात वैद्य सुश्रुत यांनी लावला. वैद्यशास्त्राचा सखोल अभ्यास केलेले निपुण वैद्य या वर्मकलेचा उपयोग लोककल्याणासाठी करतात.  हा कुलशेखर मल्ल सप्तगिरी बालाजीचा म्हणजेच वेंकटेश्वराचा भक्त होता. अनेक राज्यांतील प्रबळ मल्लयोद्ध्यांना पराजित करून त्याने विजयपताका प्राप्त केल्या होत्या. आता पीठीकापुरातील मल्लयोद्ध्यांना जिंकण्याचा त्याचा मानस होता. पीठीकापुरातील मल्लदेखिल कुलशेखराचे मल्लकौशल्य जाणून होते. त्या सर्व मल्लांनी एकत्र येऊन असा विचार केला की - या मल्लयुद्धांत कुलशेखरच्या हातून आपला पराभव अथवा मृत्यू निश्चित आहे. त्यांमुळे आपल्या या नगरीची प्रतिष्ठा नक्कीच धुळीस मिळेल. यांवर आता प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंचे अवतार असलेल्या श्रीपादांना शरण जाणे हा एकमेव उपाय दिसत आहे. त्या मल्लांची श्रीपाद प्रभूंवर दृढ श्रद्धा होती. त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंकडे जाण्याचे ठरविले. त्यावेळी श्रीपाद स्वामी वर्मांच्या घरी होते. श्रीयुत वर्मा यांनी बाळ श्रीपादांसाठी खास एक सुंदर चांदीचे जरीकाम केलेली पगडी बनविली होती. ती पगडी मोठ्या कौतुकानें श्रीपादांना घालून ते नेहेमीच आपल्या शेतजमिनी दाखविण्यासाठी त्यांना नेत असत. प्रभूंचा चरणस्पर्श आपल्या भूखंडांना व्हावा, असा त्यांचा श्रद्धाभाव होता. त्या दिवशी मात्र, " आजोबा, आज आपण थोड्या वेळाने आपल्या शेतांत जाऊ या. " असे बाळ श्रीपाद त्यांना म्हणाले.  थोड्याच वेळांत तिथे पीठीकापुरातील सर्व मल्ल आले आणि त्यांनी श्रीपादांकडे कृपायाचना केली. शरणागतवत्सल प्रभूंनी त्यांना अभय दिले. तदनंतर, स्वामींनी भीम नावांच्या एका युवकांस बोलावले. या भीमाचे शरीर आठ ठिकाणी वाकले होते. तो अतिशय अशक्त असून काही काम करू शकत नसे. तरीही त्या कुबड्या युवकास वर्मांनी आश्रय दिला होता. तें त्यास त्याच्या शक्तीनुसार थोडेफार काम करायला सांगत असत आणि त्याच्या उदरनिर्वाहापुरते वेतन देत असत. भीमाची श्रीपादचरणीं दृढ भक्ती होती व आपले व्यंग दूर व्हावें अशी तो प्रभूंना नेहेमी प्रार्थना करीत असे. अंतर्ज्ञानी श्रीपाद स्वामीही त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहत असत. " माझ्या भक्ता, थोडा धीर धर. तुझी प्रार्थना सत्वरच फळांस येणार आहे. " असेच जणू काही ते आपल्या दयार्द्र आणि करुणामय नजरेने भीमास सूचित करत असत. पुढें, बाळ श्रीपाद त्या सर्व मल्लांना म्हणाले, " तुम्ही सर्वजण निश्चिन्त राहा. हा आपला भीम कुलशेखरबरोबर द्वंद्वयुद्ध करेल." श्री दत्तप्रभूंच्या लीला अनाकलनीय आणि अगम्य असतात हेच खरें ! भीमाची श्रीपाद स्वामींवर अढळ श्रद्धा होती. त्यानें क्षणाचाही विलंब न करता प्रभूंचे आज्ञापालन करण्यास होकार दिला. कुक्कुटेश्वर मंदीराच्या जवळच हे मल्लयुद्ध आयोजित करण्यात आले. ही अपूर्व घटना पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमली. ठरल्याप्रमाणें भीम आणि कुलशेखर यांच्यातील मल्लयुद्धास प्रारंभ झाला. कुलशेखर मोठ्या त्वेषानें भीमास मारू लागला. पण काय आश्चर्य ! कुलशेखर ज्या ठिकाणी भीमावर प्रहार करत होता, त्याच ठिकाणी त्याला स्वतःला मार लागून वेदना होत असत.  याऊलट, कुलशेखर करत असलेल्या प्रत्येक वाराबरोबर भीमाचे कुबड नष्ट होऊन त्याचे शरीर अधिकाधिक बलवान होत होते. अखेर, कुलशेखर संपूर्णतः निर्बळ झाला आणि तो श्रीपाद प्रभूंना शरण आला. श्रीपाद स्वामींना अनन्यभावाने त्याने वंदन केले. तेव्हा, श्रीपाद धीर-गंभीर स्वरांत म्हणाले, " कुलशेखरा, मनुष्य शरीरावर असलेल्या १०८ मर्मस्थानांचे तुला सर्वथैव ज्ञान आहे. तर या भीमाची माझ्यावर नितांत श्रद्धा आहे अन मी त्याचे सदैव रक्षण करेन, हा दृढ विश्वास आहे. तू विद्यापारंगत असला तरीही जयपत्रे घेऊन गर्विष्ठ झाला आहेस. यासाठी दंड म्हणून आजपासून या भीमाची संपूर्ण दुर्बलता मी तुला देत आहे. तुला अन्न-वस्त्र आदिंची कमतरता जाणवणार नाही, मात्र यापुढें तू सामर्थ्यहीन होशील. तुझी प्राणशक्ती घेऊन हा भीम अत्यंत बलशाली होईल. अरे, तिरुपतीस्थित वेंकटेश्वर मीच आहे. माझा भक्त असूनही तू या वर्मकलेचा दुरूपयोग केलास. परिणामी, तुझी ही विद्या आजपासून निष्फळ होईल. मात्र, तुझ्या उपासनेचे फलित मी तुला देत आहे." इतके बोलून श्रीपाद प्रभूंनी कुलशेखरला त्याची आराध्यदेवता अर्थात पद्मावतीसह व्यंकटेश्वराच्या रूपात क्षणिक दर्शन दिले.  ही अद्भुत लीला कथन करून श्री सुब्बया श्रेष्ठी शंकरभट्टांस म्हणाले, " वत्सा, श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रकथा कल्पनातीत आहेत. त्या भक्तवत्सल दत्तप्रभूंचा कृपाशीर्वाद प्राप्त करणे, हेच आपल्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे. श्रीपाद स्वामी करुणासागर आहेत, ते निश्चितच आपलें इह-पर कल्याण करतील."

अध्याय फलश्रुती - शरीरारोग्य प्राप्ती

द्वितीय दिवस विश्राम


Mar 21, 2022

श्री शिव माहात्म्य - दाशार्हराजाचे आख्यान


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय


प्रथम ग्रंथारंभी शंकराला प्रणाम करून, व्यासमहाराज ग्रंथाला प्रारंभ करतात. एकदां नैमिषारण्यांत शौनकादि ऋषि पुराणश्रवणाच्या इच्छेनें एकत्र जमले असतां, त्याठिकाणी सूतांचे आगमन झाले. ऋषींनी सूताला अर्घ्यपाद्यादिकांनी आतिथ्य केल्यानंतर प्रश्न केला की, सूता ! आपल्या मुखाने शिवमाहात्म्य श्रवण करावे, अशी आम्हाला इच्छा झाली आहे. असा शौनकादि ऋषींचा प्रश्न ऐकून सूत म्हणतात - शौनकादि मुनिहो ! तुम्हाला मी श्री शंकराचें व शिवभक्तांचे माहात्म्य सांगतो, ऐका. 
पूर्वी मथुरानगरीत दाशार्ह नांवाचा एक राजा होता. त्याची कलावती नांवाची पत्नी होती. एकदा त्याने आपल्या राणीला आलिंगन दिले असता, त्याचा देह पत्नीच्या व्रतप्रभावानें दग्ध होऊ लागला. तेव्हां ती त्याला म्हणाली, “ नाथ, मी व्रतस्थ असल्यामुळे तुम्ही मला स्पर्श केला, त्यायोगें तमची अशी स्थिति झाली. मी शिवमंत्राचा जप करीत असल्यामुळे निष्पाप झाले आहे. आपणही गर्गमुनींकडे जाऊन शिवमंत्राचा उपदेश ग्रहण करावा, त्यामुळे तुम्हीही माझ्याप्रमाणेच निष्पाप होऊन सुखी व्हाल.” आपल्या पत्नीचे हे बोलणें ऐकून दाशार्हराज त्वरित गर्गमुनींकडे गेला आणि त्याने गुरुमुखाने षडक्षरमंत्राचा उपदेश घेतला. 
मुनीवर, सर्व मंत्रामध्ये शिवपंचाक्षरी व शिवषडक्षरी असे दोन मंत्र सर्वश्रेष्ठ आहेत. 'ॐ नमः शिवाय ' हा षडक्षरी मंत्र होय व ' नमः शिवाय ' हा पंचाक्षरी मंत्र होय. षडक्षरीमंत्रांत प्रणव असल्यामुळे, त्याचा द्विजांनीच जप करावा व स्त्रियांनी पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. ह्या मंत्राच्या जपाने सर्व सिद्धी प्राप्त होतात. ह्या मंत्राचा सतत जप करावा. हा मंत्र जपल्यास सर्व पापें नष्ट होतात. 
गुरूंच्या मार्गदर्शनाने केलेल्या त्या उपासनेचे फळ लवकरच त्या दाशार्ह नृपास प्राप्त झाले. त्या राजाच्या शरीरांत असणारी पातकें कावळ्याच्या स्वरूपानें तडफडत बाहेर पडून निघून गेली आणि भस्म झाली. त्या दिवसापासून तो राजा शिवमंत्राचा जप मोठ्या भक्तिभावानें करूं लागला. शिवकृपेमुळे तो निष्पाप होऊन पत्नीसह सुखाने शिवध्यान करीत राहू लागला. 
हे दाशार्हाख्यान श्रवण व पठण करणारे सर्वपापातून मुक्त होतात.

लेखन - पुराणपुरुष नरहर रावजी शास्त्री जोगळेकर 

Mar 20, 2022

ह. भ. प. श्रीदासगणू महाराजकृत अर्वाचीन भक्तलीलामृत - अध्याय ३१ वा ( श्रीसाईबाबा चरित्र )


॥ श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी पंचतुंडा उमापती । जयजयाजी प्रतापज्योती । तुझें बालक मी निश्चिती । माझी उपेक्षा करूं नको ॥१॥ कैलासपर्वत परमरम्य । तें त्वां केलें निवासधाम । प्रदोषकाली पुरुषोत्तम । तुजलागी ध्यातसे ॥२॥ पूर्वी दक्षप्रजापती । तुज अवमानीतां पशुपती । कोपोनि तूं निश्चिती । वीरभद्र प्रकटविला ॥३॥ स्वभक्तांचे करण्या रक्षण । दक्ष अससी तूं पार्वतीरमण । तो तूं मज दयाघन । कां उपेक्षिसी कळेना ॥४॥ काय तुझ्या आले मनीं । की हा पातकी अज्ञानी । म्हणोनि हे शूलपाणी । भेटसी ना अझूनि मज ॥५॥ परी व्याधाचे मनी वृत्त । आणणे हे उमानाथ। मी लेकरुं तुझे सत्य । माझी उपेक्षा करुं नको ॥६॥ असो ईश्वराचे भक्त निर्वाण । कोणत्याही जातीत पावोत जनन । ते साक्षात् होती नारायणे । तेथे शंका घेणे नको ॥७॥ जयांची मुळीच एक जाती । जैसी हृदयांत प्राणज्योती । किंवा जगांत एक विभूती । ईश्वर जैसा साच की ॥८॥ मतें पंथाभिमान । यांतें न ज्यांच्या चिर्ती स्थान । तेथें द्वैत कोठून। करी रिघाव सुज्ञ हो ॥९॥ पूर्वी कमाल कबीर । होऊनि गेले भक्त थोर । त्यांचे जातीसी परमेश्वर । काय पाहता जाहला ॥१०॥ ईश्वर भावाचा भुकेला । हाचि आहे दुष्काळ त्याला । सद्‌भक्तीसी असे विकला । दयाघन पांडुरंग ॥११॥ कोणत्याही जातीत । बा कोणत्याही स्थितीत । निर्माण होवोत भगवद्‌भक्त । ते प्रिय हरीतें ॥१२॥ गंगेचिया दक्षिणेस । ग्राम एक चार कोस । शिरडी नाम विलसे त्यास । कोपरगांवासंनिध ॥१३॥ तया शिरडी ग्रामासी । आले महाराज पुण्यराशी । बाबा साई जयांसी । म्हणती अवघे भक्तजन ॥१४॥ तयांचा तो ठावठिकाण । न कळे कवणालागून । चित्त आनंदमयपूर्ण । जयांचें तें सर्वदा ॥१५॥ कोणी जरी केला प्रश्न । की आपण आलांत कोठून । ठावठिकाण नामाभिधान । काय सांगा आपुले ॥१६॥ ऐसा प्रश्न होतां क्षर्णी । महाराज देती उत्तर झणीं । जेवीं मेघगर्जना होतां गगनीं । धारा अवतरती भूवरी ॥१७॥ आम्हांसी नाही ठावठिकाण । आम्ही मुळीच निर्गुण । कर्मवशे पावूनि बंधन । पिंडाप्रती पावलों ॥१८॥ या पिंडासी देह म्हणती । देहीं आमुचें नांव निश्चितीं । विश्व हेचि गाव निगुती । आमुचे जाणा सर्वथा ॥१९॥ ब्रह्म आमुचा जनिता । माया आमुची माता । यायोगें ती साकारता । आम्ही पावलों शरीर हे ॥२०॥ हेचि तयांचे प्रत्युत्तर । लोकांचिये प्रश्नावर । जग अवघें नश्वर । भावना जयांची सर्वदा ॥२१॥ त्या महाराजें  शिरडींत । चमत्कार केले अगणित । सकल वर्णावया येथ । नाहीं मती दासातें ॥२२॥ आर्धीच ते गांव लहान । त्यांतूनि थोडकी दुकान । तीही असती बहुत सान । हिंगबोजवार विक्रीची ॥२३॥ त्या दुकानदारांपासी । महाराज मागूनि तेलासी । दीप लाविती मशीदीसी । तैसेचि देउळी अगणित ॥२४॥ ऐशीपरी कित्येक वेळां । साईंनी दीपोत्सव केला । नित्य तेल देण्याला । वाणी अवघे कंटाळले॥२५॥ दुकानदार अवघे जन । करिती विचार एकवटून । रोज आणावें कोठून । तेल यांते द्यावया ॥२६॥ ऐसा विचार करुनि मानसी । महाराज येतां दुकानासी । खोटेंचि सांगती तयांसी । तेल नाही म्हणूनियां ॥२७॥ ऐसें उत्तर ऐकतांक्षणी । बाबा चकित झाले मनी । असत्य वदण्या यांलागुनी । कांही न वाटे अवघड ॥२८॥ यानेंचि हे बुडाले जन । दुरावला नारायण । पुढे हे पावती पतन । आपुलिया कर्मवशें ॥२९॥ जो असत्य वदे वाणी । तो पातक्यांचा मुकुटमणी । तयांसी तो चक्रपाणी । न भेटे कदापि ॥३०॥ सत्य वाक्य ज्याचेजवळ । तयासी विकला घननीळ । जपतपादि सकळ । सत्यापुढे बापुडें ॥३१॥ सत्य पुण्याईचा घाट । सत्य ही मोक्षाची वाट । सत्य आनंदनदीचा घाट । तें सत्य न सोडावे ॥३२॥ वाण्यांसी न देतां प्रत्युत्तर । महाराज निघाले सत्वर । कृत्य केलें अघटित थोर । अगाध लीला बाबांची ॥३३॥ मशीदीच्या सभोवार । पणत्या ठेविल्या प्रचुर । कांकडे घातले आंत थोर । कौतुकें लोक पाहती ॥३४॥ जन परस्परें बोलती । तेलवीण कैसे लागती । दीप येथे निश्चिती । वेडा पीर असे हा ॥३५॥ खडकी पेरणे बीजालागुन । अथवा वांझेचे बाळंतपण। करावया सुज्ञ जन । इच्छील काय कधींतरी ॥३६॥ हा वेडयांचा शिखामणी । अज्ञान्यांचा अग्रगणी । दीप तेलावांचूनी । लावावया इच्छीतसे ॥३७॥ तेल होतें टमरेलांत । लावण्यापुरतें सांजवात। ते घेउनि हातांत । गेले बाबा मशीदीसी ॥३८॥ तें नानासाहेब डेंगळे । लोकांसी बोलू लागले । तुम्हीं अंध झाला सगळे । उगी तयासी निंदूं नका ॥३९॥ कोणाची योग्यता कैशापरी । हे एक जाणे श्रीहरी । हिरा पडला जरी गारी । तरी कां गार मानावा ॥४०॥ काही वेळ बसा स्वस्थ । हा फकीर काय करितो येथे । तें पहा हो सावचित्त । वृथा घाई करूं नका ॥४१॥ ऐसें लोकांसी सांगितले । डेंगळे मशीदीसी आले। मौनव्रत धारण केलें । चमत्कार पहावया ॥४२॥ ते काय केलें महाराजांनी । तेलांत घालूनि अर्धे पाणी । आत्मारामालागुनी । अर्पण केले तेधवां ॥४३॥ तेलमिश्रित पाणी प्याले । मग निवळ पाणी घेतलें । पणत्यांमाजी ओतलें । स्नेहाऐवजी तत्क्षणीं ॥४४ ॥ काडी ओढूनि पेटविले । दीप बाबांनी अवघे भले । चकित झाले डेंगळे । पाय धरले जावोनी ॥४५॥ दिवे जाळिले रात्रभर । लोक पाहती चमत्कार । केवढा बाबांचा अधिकार । प्रति-ईश्वर जन्मला ॥ ४६॥ शिरडीचे लोक मिळाले । साईपदीं लीन झाले । म्हणती आम्ही अपराध केले । कोपू नका आम्हांवरी ॥४७ ॥ आम्ही पोरें तुमचीं । तुम्ही आहां माय साची । क्षमा करा अपराधांची । साईमहाराज कृपानिधी ॥४८॥ तुम्ही कृपेचे सागर । तुम्ही ज्ञाननभीचे दिनकर । तुम्हीं सद्गुणांचे सरोवर । शांततेचे मेरु तुम्ही ॥४९॥ तेधवां बाबा अवघ्यांप्रती । बोलू लागले निश्चिती । तुम्ही ऐका रे माझी उक्ती । ये समयी सावचित्तें ॥५०॥ वर्तन ठेवा ऐशापरी । जेणें राजी राहील श्रीहरी । असत्य न वदावी वैखरी । सत्य सदा सांभाळावें ॥५१॥ घातपात कवणाचा । करु नका कधींच साचा । धर्मकर्मी द्रव्याचा । व्यय करावा यथाशक्ती ॥५२॥ तरीच होईल कल्याण । अंतीं भेटेल नारायण । हे माझें सत्य वचन । सदा वागवा मानसीं ॥५३॥ ते मानले अवघ्यांसी । वंदूनि साई चरणांसी । लोक गेले स्थानासी । अति आनंदे आपुल्या ॥५४॥ साईमहाराज योगाभ्यासी । किती वर्णावें तयांसी । त्यांच्या अगम्य लीलांसी । वर्णितां न ये पार कधीं ॥५५॥ हे अखिल वर्तमान । चितांबरां लागून । डेंगळयांनी केले कथन । तेही भाविक म्हणोनियां ॥५६॥ असे शय्या विचित्र बाबांची । एक फळी लांकडाची । रुंदी एक वीत साची । असे लांब चार हात ॥५७॥ तीच त्यांचा स्पंदन । तीच त्यांचे अंथरुण । जीर्ण चिंध्यांनी बांधून । टांगिलीसे मशिदींत ॥५८॥ ती मशीद होती जीर्ण । किलच्याही गेल्या निघून । अगदीं आढयाचे सन्निधान । फळी टांगिली बाबांनी ॥५९॥ नुसतें बैसतां तिच्यावरी । तनू होय धनूपरी । ऐशा विचित्र शय्येवरी । शयन करिती महाराज ॥६०॥ फळीचे उभय बाजूंसी । म्हणजे उशापायथ्यासी । लावूनि दिवे पुण्यराशी । निजती योग बळाने ॥६१॥ नुसता पाय ठेवितां वरी । जी तुटेल निर्धारीं । ऐसी तिची बळकटी खरी । काय वर्णन करावे ॥६२॥ तें असत्य वाटे कित्येकांस । म्हणूनि मुद्दाम रात्रीस । जाऊनि पाहती बाबांस । तों ते निद्रिस्त फळीवरी ॥६३॥ ही मौज पाहण्याप्रती । दाटी होऊ लागली अती । तेणें उपाधी निश्चिती । होऊ लागली सर्वदा ॥६४ ॥ त्या फळीस म्हणूनी । तोडूनि टाकिले एके दिनीं । मोकळे त्रासापासूनी । शीघ्र व्हावयाकारणे ॥६५ ॥ ख्याती झाली लोकांत । बाबा साई महामहंत । नवसही अनंत । करूं लागले तयांप्रती ॥६६॥ शिरडी झाले महाक्षेत्र । वाराणसीसम पवित्र । बाबांमुळे सर्वत्र । नांव झाले तियेचें ॥६७॥ जैसे पुष्पयोगें मृत्तिकेस । किंवा हिऱ्यामुळे कोंदणास । वा सुवर्णामुळे चिंधीस । महत्त्व येतें जैशापरी ॥६८॥ तैसें शिरडीसी बाबांमुळे । भूमंडळी महत्त्व आले । खेड्याचे क्षेत्र बनले। थोर योग्यता साधूची ॥६९॥ असो एके समयासी । मंडळी आली बहुवसी । तया शिरडी ग्रामासी । सिद्धदर्शन घ्यावया ॥७०॥ चांदोरकर कुळभूषण । गोविंदात्मज नारायण । कलेक्टराचा चिटणीस जाण । नानासाहेब म्हणती जया ॥७१॥ दुजे रामदास हरिदास । वास जयांचा वांईस । तिसरे त्यांचे सोबतीस । होते बापू नगरकर ॥७२॥ कानगांवकर ते चौथे । ऐसे जमोनि आले तेथें । सिद्धदर्शन घ्यायातें । शिरडीग्रामीं श्रवण करा ॥७३॥ त्या रामदासी बुवासी । जाणे होतें दुसरे दिवशी । हनुमंताच्या जयंतीसी । सीनातटी नगरांत ॥७४॥ ते तळमळ करूं लागले । म्हणती पाहिजे आतांचि गेलें । दर्शन घेणे पुरे झालें । चला गाडी आटोपा ॥७५॥ तैं महाराज म्हणती चिटणीसासी । प्रथम करुनि भोजनासी । मग जावें वाटे मशीं । तुम्ही नगराकारणे ॥७६॥ या ऐकोनि महाराजवचना । स्तब्ध झाले साहेब नाना । घेऊनि कानगांवकरांना । केली तयारी भोजनाची ॥७७॥ इकडे तो वांईकर । जावया झाला बहुत आतुर । म्हणे अहो बापू नगरकर । काय विचार करणे आतां ॥७८॥ माझी उद्यां आहे कथा । नगरामाजी तत्त्वतां । या वेडयाच्या नादा आतां । लागणे पुरे झालें ॥७९॥ चिटणीसाचे आहे ठीक । घरी पैसा मुबलक । मला मागणे येईल भीक । लागतां नादीं साईंच्या ॥८०॥ येथें न प्राप्ति कवडीची । चला वाट धरुं स्टेशनाची । गाडी पाहिजे आतांची । साधिली आपणां अवश्य ॥८१॥ ऐसे बोलूनि निघाले । उभयतां स्टेशनावरी आले। मागें शिरडीसी राहिले । कानगांवकर व चिटणीस ॥८२॥ महाराज म्हणती चिटणीसासी । पहा जनांची रीत कैसी । सोडोनि साथीदारांसी । दक्ष असती मतलबा ॥८३॥। म्हणोनि ऐसा करावा साथी । जो न सोडी कल्पांतीं । जैसा सुवास सुमनाप्रती । कधींही न विसंबे ॥८४॥ असो झाली भोजनें । आतां तुम्हीही येथूनि जाणें । जें बोललों ते मनीं  धरणें । अवकाश आहे गाडीसी ॥८५॥ तें मानिले चिटणिसांनीं । ठेवूनि मस्तक साईचरणीं । निघते झाले तेथोनी । स्टेशनावरी यावया ॥८६॥ इकडे बापू आणि कथेकरी । बैसले उपाशीं स्टेशनावरी । चडफडत आपुले अंतरी । कांही न मिळे खावया ॥८७॥ चिटणीसांना पाहून । गेले दोघे विरघळून । खाली घालोनियां मान । माती उकरीत बैसले ॥८८॥ चांदोरकर पुसती तयांसी । कां हो न गेलां नगरासी । गाडी न मिळाली वाटते मजसी । तुम्हां जावयाकारणे ॥८९॥ तैं म्हणे तो नगरकर । आज गाडीसी आहे उशीर । तीन घंटे साचार । मेलों उपाशी मात्र आम्ही ॥९०॥ साधूचें नायकिलें । त्याचें हे फळ लाधले । तुम्हीं मात्र बरें केलें । फजीत आम्ही पावलों ॥९१॥ मग अवघे बसूनि गाडींत । आले शहर नगराप्रत । त्रिकालज्ञ बाबा सत्य । नमन माझें तयांसी ॥९२॥ असो शिरडी ग्रामीचा । अप्पा कुळकर्णी होय साचा । शुद्ध भाव जडला त्याचा । साईचिये पदापाशीं ॥९३॥ पूर्वकर्म जैसें असे । तैसी बुद्धि होतसे । त्या अप्पाचिया कर्मवशें । काय घडले तें ऐका ॥९४॥ कांही एके कामांत । अप्पावरी आली आफत । ती खरी अथवा खोटी सत्य । हें ठाऊक ईश्वराला ॥९५॥ गवगवा झाला लोकांत । अप्पा कुळकर्णी लबाड सत्य । तैसेंचि भूपाचे मनांत । आलें असे त्याविषयीं ॥९६॥ कोणी म्हणती तयावरती । खटला होणार हें निश्चितीं । ऐसें ऐकतां चित्तीं । धडकी अप्पाच्या भरली असे ॥९७॥ अप्पासी केले बोलावणे । प्रांताच्या साहेबानें । हुकूम लिहूनि धाडिला त्यानें । यावे तुम्ही जबाबा ॥९८॥ हुकूम पडतां हातांत । अप्पा झाला भयभीत । म्हणे आतां शिरडीप्रत । येणे कशाचे घडते हो ॥९९॥ निघतेवेळी तयांनी । बाबांसी जोडिले दोन्ही पाणी । बोलता झाला गहिंवरुनी । कठिण प्रसंग आला हा ॥१००॥ तुम्ही साधु सत्पुरुष । तुम्ही साक्षात् श्रीनिवास । तुम्ही शास्ते काळास । हे मी जाणतों गुरुराया ॥१०१॥ ही माझेवरची आफत । सत्य आहे किंवा मिथ्य । हे जाणसी तूं समर्थ । त्रिकालज्ञ महाराजा ॥१०२॥ त्याविषयी बोलणें नाहीं । अब्रु राख माझे आई । रडूं लागला धायी धायीं । पायां मिठी घालोनी ॥१०३॥ माझें कांहीं वाईट होतां । आपुलें नांव जाईल समर्था । याचा विचार आणोनि चित्ता । संकट माझें हरावे ॥१०४॥ जवळी असतां कुबेर । कां हिंडावे दारोदार । सोडोनि क्षीरसागर । मीन जाय ओहोळाकडे ॥१०५॥ माझा वशिला तुझे पाय । तुंचि माझी बापमाय । या वेळी साह्य होय । संकट माझें हरावें ॥१०६॥ मजला म्हणती अवघे जन । हा बाबांचा कल्याण । शिक्षा होतां मजलागून । काळोखी लागेल तुम्हांतें ॥१०७॥ कामधेनूचे पोरांनीं । कां लागावें अन्यस्तनीं । कल्पवृक्षाचे फळांनीं । कां पडावे कांटयांत ॥१०८॥ ह्याचा करा विचार । कृपा करा माझेवर । जगांत अवघ्या नाहींतर । निंदा होईल आपुली ॥१०९॥ ऐसें ऐकतां दीन वचन । महाराज द्रवले मनीं पूर्ण । बोलले अप्पालागून । ऐक वचन माझें हें ॥११०॥ नेवाशास प्रांतस्वारी । आहे सांप्रत प्रवरातीरीं । तुवां जावे तेथवरी । भय चित्तीं मानूं नको ॥१११॥ तेथे जगाचा सूत्रधार । मोहिनीरुप परमेश्वर । ज्या नमिता झाला ज्ञानेश्वर । भावार्थदीपिका लिहितांना ॥११२॥ जो दशावतार धरिता । जो अल्लाइलाही तत्त्वता । मूढ जीवांचे उद्धारार्थ । सगुण झाला ज्ञानेश्वर ॥११३॥ तया करुनि नमस्कार । साहेबापुढे व्हावे हजर । पाठ तुझी साचार । तोचि राखील निश्चयें ॥११४॥ तें अप्पानें मानिलें । प्रवरातटासी येणे केलें। मोहिनीराजासी वंदिलें । मग गेले कचेरीस ॥११५॥ हृदयीं बाबांचे स्मरण । जबाब दिला लिहून । तो साहेबानें ऐकोन । सोडून दिले तयातें ॥११६॥ साहेब म्हणे अप्पासी । त्वां न खाल्लें पैशासी । ऐसें खातरीने वाटे मजसी । जा म्यां तुला सोडिलें ॥११७॥ तें ऐकतां हुजूरवचन । आनंदले अप्पाचें मन । शिरडीकडे तोंड करुन । नाचू लागला आनंदें ॥११८॥ हे साईमहाराज कल्पद्रुमा । भक्तजनांचे पूर्णकामा । वैराग्याच्या निवासधामा । केलीस कृपा माझेवरी ॥११९॥ तेणें मी झालों धन्य । या जगामार्जी जाण । अब्रूचें केलें रक्षण । माझ्या तुवां पुण्यवंता ॥१२०॥ अप्पा तेथूनि दुसरे दिवशीं । परत आला शिरडीसी । नमूनि साईपदासी । वर्तमान श्रुत केलें ॥१२१॥ बोलले बाबा त्यावर । कर्ता करविता परमेश्वर । भक्तांसाठी शार्ङ्गधर । जें न घडे तें घडवीतसे ॥१२२॥ पुढे एके समयासी । नारायण कृष्ण पेणशासी । दाखविले चमत्कारासी । कथानक ऐका हो ॥१२३॥ कांता तया पेणशाची । परम भाविक उदार मनाची । तिची इच्छा दर्शनाची । झाली असे बाबांच्या ॥१२४॥ सती विनवी जोडूनि करा । हे मत्सौभाग्यमांडारा । हे मत्सौख्यनभींचे दिनकरा । माझी विनंती ऐका हे ॥१२५॥ कर्णोपकर्णी ऐकिली मात । शिरडी नामक ग्रामांत । बाबा साई महामहंत । योग्य असती दर्शना ॥१२६॥ म्हणूनि वाटते माझ्या मनीं । चला त्या गांवालागुनी । लीन होऊ संतचरणीं । आपण उभयतां प्राणेश्वरा ॥१२७॥ पेणसे म्हणती त्यावरी । ऐक मद्वचना सुंदरी । शिरडी ग्रामभीतरी । कोणी न संत सुशीले ॥१२८॥ तेथें एक मुसलमान । वेडापिसा आहे जाण । बळेचि ढोंग माजवून । जग लुटाया बैसला ॥१२९॥ त्याचा मांडिला देव्हारा । या अज्ञ जनांनी खरा । म्हणोनि ऐकें माझी गिरा । भलता हट्ट घेऊ नको ॥१३०॥ जेथे मुळीच क्षारपण । तेथें मधुरता कोठून । बेगडाचें उत्तम सुवर्ण । होईल कां सांग कांते ॥१३१॥ तूं न पडावे याचें भरी । तो शिरडीमधला भिकारी । तुकडे मागोनि घरोघरीं । पोट आपले भरीतसे ॥१३२॥ साध्वीचे चित्तीं तळमळ । परी लागलीसे प्रबळ । म्हणे कधीं अर्पीन भाळ । त्या महाराजपदीं मी ॥१३३॥ पेणसे पुढे फिरत फिरत । आले शिरडी ग्रामांत । सवें कांता सद्गुणी शांत । नाम माई जियेचें ॥१३४॥ पेणसे सरकारी कामी गुंतले । तों साध्वीनें काय केलें । जावोनि आपुले साधिलें । कार्य तेधवां दर्शनाचें ॥१३५॥ साईपदीं अर्पितां भाळ । निमाली मनाची तळमळ । समाधान झालें सकळ । कौतुकें सांगे पतीसी ॥१३६॥ मी गेले दर्शनासी । तो खराचि आहे पुण्यराशी । तुम्हीं नका निंदूं त्यासी । दर्शन घ्या हो साधूचें ॥१३७॥ कांतेच्या आग्रहावरून । आले दर्शनाकारण । तें महाराज बोलले गर्जोन । येऊ नका कोणी येथें ॥१३८॥ धोंडा घेऊनि हातीं । पुढे येतां मारीन म्हणती । मी आहे ढोंगी अती । माझें दर्शन घेऊं नका ॥१३९ ॥ मी जातीने आहे हीन । वेडा पिसा मुसलमान । तुम्ही उच्चवर्णी ब्राह्मण । बाटाल दर्शन घेतांचि ॥१४०॥ ऐसें बोलतां तयासी । पेणसे विरघळले मानर्सी । म्हणती हा असे ज्ञानराशी । त्रिकालज्ञ महाराज ॥१४१॥ आहीं बोललो उभयतां । ते यां कळलें तत्त्वतां । जैसी वाऱ्याची व्यापकता । तैसी यांच्या ज्ञानाची ॥१४२॥ पेणशांनी विचार केला । लावूनि अप्पाचा वशिला । लाभ करुनि घेतला । सत्पुरुषदर्शनाचा ॥१४३॥ यासी लोटतां कांहीं दिन । काय घडले वर्तमान । तें ऐका हो भाविकजन । श्रवणीं सादर बैसावें ॥१४४॥ एके दिनी सहजगती । महाराज बोलले अप्पाप्रती । आज चोरटे निश्चितीं । आले आपुल्या गांवांत ॥१४५॥ या चोरांची तऱ्हा निराळी । घराचा विक्षभ न करिती मुळी । ऐन मालावरी सगळी । दृष्टी असे तयांची ॥१४६॥ तो करुनि हरण । जाती सवें घेऊन । चोरी करितां न दिसती जाण । ऐसे महाबिलंदर ते ॥१४७॥ त्यांची प्रथमतः होईल स्वारी । आजि वेडया तुझ्यावरी । यास्तव जा कांहीतरी । बंदोबस्त करावया ॥१४८॥ मथितार्थ या गोष्टीचा । अप्पासी न कळला साचा । पहारा बसवूनि भिल्लांचा । लौकिकी बंदोबस्त केला असे ॥१४९॥ गल्लोगल्ली फिरे गस्त । होतां एक प्रहर रात्र । जुलाब उलटया अप्पाप्रत । होऊ लागल्या मरीच्या ॥१५०॥ शरीर झालें अवघें गार । बांबे व्यापिले पदकर । नासिक कळस साचार । झालासे वांकडा ॥१५१॥ खोल खोल डोळे गेले । नाडयांनी स्थान सोडिले । लोक शोकाकुल झाले । पाहूनि स्थिति अप्पाची ॥१५२॥ कांता झाली घाबरी । पाहतां नवऱ्याची स्थिती खरी । धावोनि आली झडकरी । मशीदींत बाबांच्या ॥१५३॥ महाराजांचे धरुनि पाय । रडूं लागली धाय धाय । बाबा माझा पतिराज । सोडूनियां चालिला ॥१५४॥ द्या हो उदी अंगारा । तेणें उतार पडेल जरा । सौभाग्यजहाज सागरा । नका बुडवू महाराजा ॥१५६॥ महाराज म्हणती तियेसी । नको करूं शोकासी। जो जन्मला मृत्यु त्यासी । आहे येणार एके दिनीं ॥१५६॥ जन्ममृत्यु ईश्वरी कळा । तोचि उरला भरुनि सगळा । करुं गेलिया तो वेगळा । कांही न ये हातासी ॥१५७॥ कोणी न जन्मे मरे कोणी । पहा परी ज्ञानचक्षूंनी । तूंही न निराळी त्यापासोनी । येईल हे प्रत्यया ॥१५८॥ जैसी बंडी झालिया जीर्ण । लोक देताती फेंकून । किंवा नावडे म्हणून । त्याग करिती तियेचा ॥१५९॥ तैसे हे शरीरवसन । पांघरलासे बाळे प्राण । तो प्राण नारायण । अक्षय अभंग निर्विकल्प ॥१६०॥ म्हणूनि अंगारे करूं नको । उगीच ठिगळें मारुं नको । आड त्याच्या येऊं नको । जाऊ दे त्यासी मुक्कामा ॥१६१॥ माझ्या आधीच अप्पांनी । बदलावया आपुली कफनी । केली तयारी त्यालागुनी । तूं आड येऊं नको ॥१६२॥ अप्पासी मिळेल सद्‌गती । मोक्ष आला त्याचे हातीं । चर्मचक्षूंच्या आड निश्चितीं । होताहे तो होऊं दे ॥१६३॥ ऐसें निरवूनि तियेसी । लावूनि दिधलें गेहासी । झाला अप्पा स्वर्गवासी । तात्काळ कांहीं वेळाने ॥१६४॥ दुसरे दिवशी गांवांत । दोन तीन लागले लोक सत्य । अवघे झाले भयभीत । विनवू लागले साईंसी ॥१६५॥ बाबा पोत खेळू लागली मरी । ह्याचा विचार कांहीतरी । करा तुम्ही आमुच्या नगरीं । असूनि काय उपयोग ॥१६६॥ महाराज म्हणती त्यांप्रत । जातील माणसें सात । या आपुल्या शिरडींत । मग न राहे मरी ती ॥१६७॥ बोलले तैसें झालें सत्य । मेली माणसे अवघीं सात । केवढे बाबांचे सामर्थ्य । आधींच भाकित केले तिचे ॥१६८॥ आतां ऐका पुढील प्रकार । तुम्ही श्रोते उदार धीर । । दासगणू मी तुमचें पोर । बोबडया शब्दें सांगतसे ॥१६९॥ कोंडया सुतार नामें एक । भक्त होता परम भाविक । त्यावरी बाबांचे प्रेम देख । होते आगळें  सर्वांहुनी ॥१७०॥ बाबा म्हणती कोंडयासी । तुवां जावे खळवाडीसी । आग मधल्या गंजीसी । लागली ति विझवावया ॥१७१॥ कोंडया झाला घाबरा । खळ्यासी गेला करुनि त्वरा । तेथे तपास करुनि पुरा । आलासे तो माघारी ॥१७२॥ बाबा उगीच काहीतरी । सांगूनि मजला त्रास भारी । दिधला दुपारच्या अवसरी । पाय माझे पोळले ॥१७३॥ बाबा म्हणती ऐक जरा । माझी नोहे असत्य गिरा । वळूनि पाहें माघारा । तो पहा धूर निघाला ॥१७४॥ सुड्यांसी सुड्या लागल्या दाट । मधल्या सुडीनें घेतला पेट । गावांत झाला बोभाट । पेटलीसे खळवाडी ॥१७५॥ दिवस होता उन्हाळयाचा । त्यांत समय दुपारचा । प्रभंजन सुटला जोराचा । प्रलयवातासमान ॥१७६॥ कडकडां झाडे मोडती ॥ छपरें गगनीं उडूं पाहती । वावटळीसी नाहीं गणती । दुर्धर प्रसंग ओढवला ॥१७७॥ लोक अवघे घाबरले । साईबाबांकडे आले । घट्ट तयांचे पाय धरिले । रडूं लागले दीनवत ॥१७८॥ हे साईबाबा कृपाराशी । आग लागली खळवाडीसी । आतां आमुची गति कैसी । सांगा होईल महाराजा ॥१७९॥ खळवाडी आमुचा प्राण । खळवाडी आमुचें जीवन । ती अवघी जळाल्या जाण । अन्न न मिळेल आम्हांतें ॥१८०॥ मुले माणसे मरतील जाणं । करुनियां अन्नअन्न । गुरेही सोडतील प्राण । चाऱ्यावांचून दयाळा ॥१८१॥ यासाठी काहीतरी । उपाय सांगा झडकरी । तुम्ही साक्षात् श्रीहरी । भूतभविष्य जाणते ॥१८२॥ त्या जनांच्या विनंतीसी । देऊनि मान पुण्यराशी । गेले त्वरें खळ्यासी । आग विझवायाकारणे ॥१८३॥ गंजी जी होती पेटली । ती महाराजांनी अवलोकिली । धार पाण्याची फिरविली । भोवतालीं गंजीच्या ॥१८४॥ ही एवढीचि जळेल । दुसरीसी न धक्का लागेल । हा अग्नीचा भाग सकल । विझवू नका कोणी इसी ॥१८५॥ जैसें महाराज बोलिले । तैसेंचि पुढे प्रत्यया आलें । जन अवघे आनंदले । थोर महती बाबांची ॥१८६॥ अवघ्या गंजी शेजारच्या । रक्षण केल्या असती साच्या । अंमल आपुला अग्नीच्या- । वरही ज्यांनी चालविला ॥१८७॥ सत्पुरुषाच्या आज्ञेत । पंचभूते वागती सत्य । सच्चिदानंद रमानाथ । सेवे तिष्ठत जयांच्या ॥१८८॥ अस्तमानाचे समयासी । मंडळी आली दर्शनासी । नानासाहेब पुण्यराशी । चिटणीस नगर जिल्ह्याचे ॥१८९॥ चांदोरकर दर्शनासी । गेले बाबांच्या मशीदीसी । आपण होऊनि तयांसी । महाराज बोलले ते ऐका ॥१९०॥ हे माझे गुणनिधाना । गोविंदात्मज नारायणा । चांदोरकरकुलभूषणा । पहा हे लोक मतलबी ॥१९१॥ आणि या भागचंदाची । गंजी जळाली असे साची । पाठ पुरविली त्याने आमुची । तोटा झाला म्हणोनी ॥१९२॥ लाभ-हानी जन्म-मरण । हें ईश्वराचे आधीन । परी हे कैसे अंध जन । विसरताती तयाला ॥१९३ ॥ लाभ होतां आनंदावें । हानि होतां कां रडावें । माझें माझें म्हणावें । अर्थ काय यामध्ये ॥१९४॥ गंजी कोठली मारवाडयाची । ती मुळीच कडब्याची । उत्पत्ति ती तियेची । झालीसे बीजापासूनी ॥१९५॥ तें बीज धरिले भूमीनीं । पाऊस  पाडिला मेघांनीं । रवीनें अमृतकारांनीं । आणिलें त्या आकारा ॥१९६॥ ऐसे याचे मालक तीन । पृथ्वी, सूर्य, सजल घन । हा माझें माझें म्हणोन । उगाचि टिऱ्या बडवीतसे ॥१९७॥ ती अग्नीनें भक्षिली । सूर्याची सत्ता अधिक झाली । पृथ्वी बिचारी होरपळली । मात्र अग्नितापानें ॥१९८॥ मेघासी यांची दाद नाहीं । तो घमेंडानंदन पाहीं । चंचल सौदामिनीठायीं रममाण जाहला ॥१९९॥ जे स्त्रियांशी लंपट अती । असती की मूढमती । ते कधी ना जाणती । आपुल्या लाभहानीतें ॥२०॥ तो त्यामुळे उगीच बैसला । सूर्याने दावा साधिला । भूमीपासूनि हिसकूनि नेला । माल आपुला म्हणोनी ॥२०१॥ जगांत जितुक्या वस्तु असती । त्यांची अशीच उत्पत्ती । मालक तियेचे निश्चितीं । नाही आपण सर्वदा ॥२०२॥ तूं तरी  कांही सांग याला । हा उगीचि करितो दुःखाला । मघांपासूनि त्रास दिला । याने मला अनिवार ॥२०३॥ एक्या हाती ईश्वर देतो । सवेंचि दुसऱ्या हाती नेतो । प्राण सुखदुःखा कारण होतो । अज्ञान  गांठी म्हणोनियां ॥२०४॥ जा शेटजी घरा स्वस्थ । फायदा दुसऱ्या व्यापारांत । होईल तुमचा निश्चित । येईल नुकसान भरुनि हें ॥२०५॥ ऐसा वर्षतां बोधघन । अवघे आनंदले पूर्ण । चिटणीसांनी केले वंदन । सद्गदित जाहले ॥२०६॥ हे भक्तचकोरपूर्णचंद्रा । हे अपरोक्षज्ञानाच्या समुद्रा । द्यावी मातें ज्ञानमुद्रा । जेणे अज्ञान निरसेल ॥२०७॥ देव कोण कैसा असे । तो कोठें वसतसे । काय केलिया भेटतसे । हे सांगा मजप्रती ॥२०८॥ जग हे मुळीच नश्वर । मग कां करावा हा व्यापार । ह्याचे वर्म फोडोनि सत्वर । मजलार्गी सांगावें ॥२०९॥ ऐसे ऐकतां चिटणीसांचे । भाषण बोलले महाराज साचें । विवेचन ह्या गोष्टीचे । करीन पुढे एके दिना ॥२१०॥ जैसे चांदोरकर भक्त पुरे । तैसेचि गणेश विष्णु बेरे। त्यांचे कथानक आदरें । ऐका थोडे सांगतो ॥२११॥ हे जिल्ह्याचे तपासणीदार । असती शेतकी-खात्यावर । ते मुद्दाम शिरडीवर । आले दर्शन घ्यावया ॥२१२॥ बाबांसी करितां वंदन । बोलले त्यांकारण । तुम्हीं आतांचि येथून । निघून जावें शीघ्रगति ॥२१३ ॥ वेळ थोडाही करुं नका । क्षण एकही राहूं नका । भरधाव आपुला तांगा हांका । कोपरगांवा शीघ्र जावें ॥२१४ ॥ ठेवूनि विश्वास महाराजवचनी । बेरे निघाले तेथूनी । त्यांच्या तांग्यामागोनी । येत होता दुसरा तांगा ॥२१५॥ त्या दुसऱ्या तांग्यांत । जे बैसले होते गुहस्थ । ते बोलले बेऱ्यांप्रत । थांबा आम्हां येऊं द्या ॥२१६॥ तांगा चालवा हळूहळू । नका हरिणासारखे पळू । अजूनि आहे बहुत वेळू । स्टेशनावरी गाडीसी ॥२१७॥ बेऱ्यांनी न त्या मान दिला । तांगा भरधांव हांकिला । गोदाप्रवाह ओलांडिला । पोहोंचले असती स्टेशनासी ॥२१८॥ मागोमाग ऐकिली मात । लुटला तांगा रस्त्यांत । चोरटयांनी लवणांत । कोपरगांव रस्त्यावरी ॥२१९॥ मारहाण फार झाली । संपत्ति अवघी लुटोनि नेली । पोलीस मंडळी निघाली । तपासासी तयाच्या ॥२२०॥ हें ऐकतां अशुभ वृत्त । बेरे म्हणती हे सद्गुरूनाथ । संकटांतूनि या पोराप्रत । तुम्ही सत्य वांचविलें ॥२२१॥ एक हिरण्यकेशी ब्राह्मण । वशिष्ठगोत्री ज्ञानसंपन्न । जयाचें तें वसतिस्थान । पुण्यपट्टण जाणा हो ॥२२२॥ तो असे थोर अधिकारी । श्रीमान सदय अंतरीं । निष्ठा ब्रह्मकर्मावरी । जयाची ती अत्यन्त ॥२२३॥ म्हणे घ्यावें धाराग्न । परी कांता पावली मरण । कांतेचियावांचून । अग्निहोत्र कैसें घडे ॥२२४॥ पोटीं नसे संतती । घरीं अगणित संपत्ती । लग्न कराया नेघे मती । पन्नाशी भरली म्हणूनियां ॥२२५॥ त्यासी म्हणती कित्येक जन । करा हो तुम्हीं दुसरे लग्न । प्रयत्नांती नारायण । पावतो ऐसे शास्त्र ॥२२६॥ बागाईताची मनीं आस । परी न खणी विहिरीस । वा न घेई पाटास । मग कैसें घडावे तें ॥२२७॥ म्हणूनि आमुची प्रार्थना । साहेब आपण मनीं आणा । वधू पाहूनि सुलक्षणा । लग्न करुनि घ्यावें हो ॥२२८॥ तैं ते म्हणती हरिपंत । आतां संततीची आस व्यर्थ । हांसें मात्र जगतांत । होईल लग्न करतांचि ॥२२॥ वयासी आली पन्नासी । म्हातारपणीं संततीसी । पाहीन ऐसा पुण्यराशी । मी नव्हें हो खचित ॥२३०॥ जरी एकदां सांगेल संत । मशीं लग्न करण्याप्रत | तरी लग्नाचा योग सत्य । घडूनि येईल निश्चयें ॥२३१॥ ऐसें बोलूनि जनांसी । हरिपंत आले शिरडीसी । जातां साईदर्शनासी । बाबा बोलूं लागले ॥२३२॥ हरीबा तूं सभाग्य नर । लग्न करी रे सत्वर । पुत्र देईल शंकर । इच्छा पुरेल मनींची ॥२३३॥ उगीच शंका न वाहीं मनीं । तुझा सर्वस्वे आहे ऋणी । भोलानाथ शूलपाणी । कर्पूरगौर परमात्मा ॥२३४॥ तें ऐकतां जन हरिखले । म्हणती आतां बरे झालें । संतानुमोदन मिळाले । लग्न दुसरे करावया ॥२३५॥ तरी म्हणती हरिपंत । ज्योतिष्याचे पाहिजे मत । तें मिळाल्या निश्चित । विवाह करीन दूसरा ॥२३६॥ ऐसें बोलूनि नगरांत गेले । तो पुण्याहुनि पत्र आलें । की एक ज्योतिषी येथे भले । आले असती विद्वान ॥२३७॥ एवं च मत ज्योतिष्याचें । पडले तेघवां अनुकूल साचें । लग्न झाले पंतांचे । साईकृपेकरुनी ॥२३८॥ ते स्त्रीपुरुष तरु चूत । साईकृपा हा वसंत । फल त्या वृक्षा येईल सत्य । शंका मुळींच घेणे नको ॥२३९॥ जोंधळा आला पोटरींत । वरी पाऊस पडला बहुत । हवाही शुद्ध अत्यंत । मग कणसाची शंका कां ॥२४०॥ त्या हरिपंत द्विजाची । निष्ठा साईपदीं साची । योग्यता थोर बाबांची । नमन माझें तयांतें ॥२४१॥ बाबा साई कृपाराशी । ज्ञाननभींचा पूर्ण शशी । चिंतामणी भाविकासी । चिंतिले फल देणार ॥२४२॥ नित्य स्मरतां त्या साईपदा । हरतील अवघ्या आपदा । सीता बेदरे त्या तूं कदा । विसरु नको स्वप्नींही ॥२४३ ॥ तरीचि होईल कल्याण । आपुलें उभयतांचे जाण । साईमहाराज कृपाघन । वळंघेल आपणावरी ॥२४४॥ जे या साईचरित्रासी । श्रवण करितील प्रेमेंसी । त्यांसी रक्षील हृषीकेशी । सत्य सत्य त्रिवाचा ॥२४५॥ पुढील अध्यायीं कथा गहन । त्रिवर्गासी उपदेशकथन । तो उपदेश करितां श्रवण । पुरुषार्थ चारी साधतील ॥२४६॥ दास गणूचे बोबडे बोल । तुम्हीं ऐका हो भक्त प्रेमळ । साईचरणी अर्पितां भाळ । इच्छा पुरतील मनींच्या ॥२४॥ याचे जो करी पारायण । त्याचे पाप होय दहन । पाठी राखील नारायण । तयाची ती सर्वदा ॥२४८॥ स्वस्ति श्रीभक्तलीलामृत । रम्य बाबांचे पवित्र चरित्र । हे केवळ परमामृत । सेवा सेवा गणू म्हणे ॥२४९॥

॥ श्री हरिहरार्पणमस्तु । शुभं भवतु ॥ 
॥ इति एकत्रिंशोऽध्यायः समाप्तः॥


Mar 10, 2022

श्री अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


जयदेव जयदेव जय जय अवधुता ।  अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता ॥धृ.॥  तुझे दर्शन होता जाती ही पापे । स्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरिते ।  चरणी मस्तक ठेवुनी मनी समजा पुरिते । वैकुंठीचें सुख नाही यापरते ॥१॥  सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा । कर्णी कुंडल शोभती वक्षस्थळी माळा ।  शरणागत तुज होता भय पडले काळा । तुझे दास करिती सेवा सोज्वळा ॥२॥  मानवरूपी काया दिससी आम्हांस । अक्कलकोटी केला यतिवेषे वास ।  पूर्णब्रह्म तूची अवतरलासी खास । अज्ञानी जीवास विपरित हा भास ॥३॥  निर्गुण निर्विकार विश्वव्यापक । स्थिरचर व्यापुनि अवघा उरलासी एक ।  अनंत रूपे धरिसी करणे मायिक । तुझे गुण वर्णिता थकले विधिलेख ॥४॥  घडता अनंत जन्मी सुकृत हे गांठी । त्याची ही फलप्राप्ती सद्‌गुरुची भेटी ।  सुवर्ण ताटी भरली अमृतरस वाटी । शरणागत दासावरी करी कृपादृष्टी ॥५॥



Mar 1, 2022

श्रीशिवषडक्षरस्तोत्रम्


॥ श्री गणेशाय नमः ॥ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय


ॐकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः । कामदं मोक्षदं चैव ॐकाराय नमो नमः ॥१॥

नमन्ति ऋषयो देवो नमन्त्यप्सरसां गणाः । नरा नमन्ति देवेशं नकाराय नमो नमः ॥२॥

महादेवं महात्मानं महाध्यानं परायणम् । महापापहरं देवं मकाराय नमो नमः ॥३॥

शिवं शान्तं जगन्नाथं लोकानुग्रहकारकम् । शिवमेकपदं नित्यं शिकाराय नमो नमः ॥४॥

वाहनं वृषभो यस्य वासुकिः कण्ठभूषणम् । वामे शक्तिधरं देवं वकाराय नमो नमः ॥५॥

यत्र यत्र स्थितो देवः सर्वव्यापी महेश्वरः । यो गुरुः सर्वदेवानां यकाराय नमो नमः ॥६॥

षडक्षरमिदं स्तोत्रं यः पठेच्छिवसन्निधौ । शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते ॥७॥

इति श्रीरुद्रयामले उमामहेश्वरसंवादे शिवषडक्षरस्तोत्रम् सम्पूर्णम्