Showing posts with label श्री शिवलीलामृत. Show all posts
Showing posts with label श्री शिवलीलामृत. Show all posts

Mar 21, 2022

श्री शिव माहात्म्य - दाशार्हराजाचे आख्यान


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय


प्रथम ग्रंथारंभी शंकराला प्रणाम करून, व्यासमहाराज ग्रंथाला प्रारंभ करतात. एकदां नैमिषारण्यांत शौनकादि ऋषि पुराणश्रवणाच्या इच्छेनें एकत्र जमले असतां, त्याठिकाणी सूतांचे आगमन झाले. ऋषींनी सूताला अर्घ्यपाद्यादिकांनी आतिथ्य केल्यानंतर प्रश्न केला की, सूता ! आपल्या मुखाने शिवमाहात्म्य श्रवण करावे, अशी आम्हाला इच्छा झाली आहे. असा शौनकादि ऋषींचा प्रश्न ऐकून सूत म्हणतात - शौनकादि मुनिहो ! तुम्हाला मी श्री शंकराचें व शिवभक्तांचे माहात्म्य सांगतो, ऐका. 
पूर्वी मथुरानगरीत दाशार्ह नांवाचा एक राजा होता. त्याची कलावती नांवाची पत्नी होती. एकदा त्याने आपल्या राणीला आलिंगन दिले असता, त्याचा देह पत्नीच्या व्रतप्रभावानें दग्ध होऊ लागला. तेव्हां ती त्याला म्हणाली, “ नाथ, मी व्रतस्थ असल्यामुळे तुम्ही मला स्पर्श केला, त्यायोगें तमची अशी स्थिति झाली. मी शिवमंत्राचा जप करीत असल्यामुळे निष्पाप झाले आहे. आपणही गर्गमुनींकडे जाऊन शिवमंत्राचा उपदेश ग्रहण करावा, त्यामुळे तुम्हीही माझ्याप्रमाणेच निष्पाप होऊन सुखी व्हाल.” आपल्या पत्नीचे हे बोलणें ऐकून दाशार्हराज त्वरित गर्गमुनींकडे गेला आणि त्याने गुरुमुखाने षडक्षरमंत्राचा उपदेश घेतला. 
मुनीवर, सर्व मंत्रामध्ये शिवपंचाक्षरी व शिवषडक्षरी असे दोन मंत्र सर्वश्रेष्ठ आहेत. 'ॐ नमः शिवाय ' हा षडक्षरी मंत्र होय व ' नमः शिवाय ' हा पंचाक्षरी मंत्र होय. षडक्षरीमंत्रांत प्रणव असल्यामुळे, त्याचा द्विजांनीच जप करावा व स्त्रियांनी पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. ह्या मंत्राच्या जपाने सर्व सिद्धी प्राप्त होतात. ह्या मंत्राचा सतत जप करावा. हा मंत्र जपल्यास सर्व पापें नष्ट होतात. 
गुरूंच्या मार्गदर्शनाने केलेल्या त्या उपासनेचे फळ लवकरच त्या दाशार्ह नृपास प्राप्त झाले. त्या राजाच्या शरीरांत असणारी पातकें कावळ्याच्या स्वरूपानें तडफडत बाहेर पडून निघून गेली आणि भस्म झाली. त्या दिवसापासून तो राजा शिवमंत्राचा जप मोठ्या भक्तिभावानें करूं लागला. शिवकृपेमुळे तो निष्पाप होऊन पत्नीसह सुखाने शिवध्यान करीत राहू लागला. 
हे दाशार्हाख्यान श्रवण व पठण करणारे सर्वपापातून मुक्त होतात.

लेखन - पुराणपुरुष नरहर रावजी शास्त्री जोगळेकर 

Feb 28, 2022

श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा - महाशिवरात्री माहात्म्य


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय

जेथें सर्वदा शिवस्मरण । तेथें भुक्ति मुक्ति सर्वकल्याण । नाना संकटें विघ्ने दारुण । न बाधती कालत्रयीं ॥१॥ संकेतें अथवा हास्येंकरुन । भलत्या मिसें घडो शिवस्मरण । न कळतां परिसासी लोह जाण । संघटतां सुवर्ण करी कीं ॥२॥ न कळतां प्राशिलें अमृत । परी अमर करी की यथार्थ । औषधी नेणतां भक्षित । परी रोग सत्य हरी कीं ॥३॥ शुष्कतृणपर्वत अद्भुत । नेणतां बाळक अकस्मात । अग्निस्फुलिंग टाकीत । परी भस्म यथार्थ करी कीं ॥४॥ तैसें न कळतां घडे शिवस्मरण । परी सकळ दोषां होय दहन । अथवा विनोदेंकरुन । शिवस्मरण घडो कां ॥५॥ हे कां व्यर्थ हांका फोडिती । शिव शिव नामें आरडती । अरे कां हे उगे न राहती । हरहर गर्जती वेळोवेळां ॥६॥ शिवनामाचा करिती कोल्हाळ । माझें उठविलें कपाळ । शिव शिव म्हणतां वेळोवेळ । काय येतें यांच्या हाता ॥७॥ ऐसी हेळणा करी क्षणोक्षणीं । परी उमावल्लभनाम ये वदनीं । पुत्रकन्यानामेंकरुनी । शिवस्मरण घडो कां ॥८॥ महाप्रीतीनें करितां शिवस्मरण । आदरें करितां शिवध्यान । शिवस्वरुप मानूनि ब्राह्मण । संतर्पण करी सदां ॥९॥ ऐसी शिवी आवडी धरी । त्याहीमाजी आली शिवरात्री । उपवास जागरण करी । होय बोहरी महत्पापा ॥१०॥ ते दिवशीं बिल्वदळें घेऊन । यथासांग घडलें शिवार्चन । तरी सहस्त्रजन्मींचे पाप संपूर्ण । भस्म होऊनी जाईल ॥११॥ नित्य बिल्वदळें शिवासी वाहत । त्याएवढा नाहीं पुण्यवंत । तो तरेल हें नवल नव्हे सत्य । त्याच्या दर्शनें बहुत तरती ॥१२॥ प्रातःकाळी घेतां शिवदर्शन । यामिनीचें पाप जाय जळोन । पूर्वजन्मींचें दोष गहन । माध्याह्नीं दर्शन घेतां नुरती ॥१३॥ सायंकाळीं शिव पाहतां सप्रेम । सप्तजन्मींचें पाप होय भस्म । शिवरात्रीचा महिमा परम । शेषही वर्णू शकेना ॥१४॥ कपिलाषष्ठी अर्धोदय संक्रमण । महोदय गजच्छाया ग्रहण । इतुकेही पर्वकाळ ओंवाळून । शिवरात्रीवरुन टाकावे ॥१५॥ शिवरात्री आधींच पुण्यदिवस । त्याहीवरी पूजन जागरण विशेष । त्रिकाळपूजा आणि रुद्रघोष । त्याच्या पुण्यासी पार नाहीं ॥१६॥ वसिष्ठ विश्वामित्रादि मुनीश्वर । सुरगण गंधर्व किन्नर । सिद्ध चारण विद्याधर । शिवरात्रिव्रत करिताती ॥१७॥ यदर्थीं सुरस कथा बहुत । शौनकादिकां सांगे सूत । ती श्रोतीं ऐकावी सावचित्त । अत्यादरें करुनियां ॥१८॥ तरी मासामाजी माघमास । ज्याचा व्यास महिमा वर्णी विशेष । त्याहीमाजी कृष्णचतुर्दशीस । मुख्य शिवरात्र जाणिजे ॥१९॥ विंध्याद्रिवासी एक व्याध । मृगपक्षिघातक परमनिषिद्ध । महानिर्दय हिंसक निषाद । केले अपराध बहुत तेणें ॥२०॥ धनुष्यबाण घेऊनि करीं । पारधीस चालिला दुराचारी । पाश वागुरा कक्षेसी धरी । कवच लेत हरितवर्ण ॥२१॥ करीं गोधांगुलित्राण । आणिकही हातीं शस्त्रसामुग्री घेऊन । काननीं जातां शिवस्थान । शोभायमान देखिलें ॥२२॥ तंव तो शिवरात्रीचा दिन । यात्रा आली चहूंकडून । शिवमंदिर शृंगारुन । शोभा आणिली कैलासींची ॥२३॥ शुद्धरजततगटवर्ण । देवालय झळके शोभायमान । गगनचुंबित ध्वज पूर्ण । रत्नजडित कळस तळपताती ॥२४॥ मध्यें मणिमय शिवलिंग । भक्त पूजा करिती सांग । अभिषेकधारा अभंग । विप्र धरिती रुद्रघोषें ॥२५॥ एक टाळ मृदुंग घेऊन । सप्रेम करिती शिवकीर्तन । श्रोते करटाळी वाजवून । हरहर शब्दें घोष करिती ॥२६॥ नाना परिमळद्रव्यसुवास । तेणें दशदिशा दुमदुमिल्या विशेष । लक्ष दीपांचे प्रकाश । जलजघोष घंटारव ॥२७॥ शशिमुखा गर्जती भेरी । त्यांचा नाद न माये अंबरीं । एवं चतुर्विध वाद्यें नानापरी । भक्त वाजविती आनंदें ॥२८॥ तों तेथें व्याध पातला । समोर विलोकी सर्व सोहळा । एक मुहूर्त उभा ठाकला । हांसत बोलिला विनोदे ॥२९॥ हे मूर्ख अवघे जन । येथें द्रव्य काय व्यर्थ नासोन । आंत दगड बाहेर पाषाण । देवपण येथें कैंचे ॥३०॥ उत्तम अन्न सांडून । व्यर्थ कां करिती उपोषण । ऐसिया चेष्टा करीत तेथून । काननाप्रती जातसे ॥३१॥ लोक नामें गर्जती वारंवार । आपणही विनोदें म्हणें शिव हरहर । सहज सव्य घालूनि शिवमंदिर । घोर कांतार प्रवेशला ॥३२॥ वाचेसी लागला तोचि वेध । विनोदें बोले शिव शिव शब्द । नामप्रतापें दोष अगाध । झडत सर्व चालिले ॥३३॥ घोरांदर सेवितां वन । नाढळतीच जीव लघुदारुण । तों वरुणदिग्वधूचें सदन । वासरमणि प्रवेशला ॥३४॥ निशा प्रवर्तली सबळ । कीं ब्रह्मांडकरंडां भरलें काजळ । कीं विशाळ कृष्णकंबळ । मंडप काय उभारिला ॥३५॥ विगतधवा जेवीं कामिनी । तेवीं न शोभे कदा यामिनी । जरी मंडित दिसे उडुगणीं । परी पतिहीन रजनी ते ॥३६॥ जैसा पंडित गेलिया सभेंतून । मूर्ख जल्पती पाखंडज्ञान । जेवीं अस्ता जाता सहस्त्रकिरण । उडुगणें मागें झळकती ॥३७॥ असो ऐसी निशा दाटली सुबुद्ध । अवघा वेळ उपवासी निषाद । तों एक सरोवर अगाध । दृष्टीं देखिलें शोधितां ॥३८॥ अनेक संपत्ती सभाग्यसदनीं । तेवीं सरोवरीं शोभती कुमुदिनी । तटीं बिल्ववृक्ष गगनीं । शोभायमान पसरला ॥३९॥ योगभ्रष्ट कर्मभूमीस पावती जनन । तेवीं बिल्व डहाळिया गगनींहून । भूमीस लागल्या येऊन । माजी रविशशिकिरण न दिसे ॥४०॥ त्यांत तम दाटलें दारुण । माजी बैसला व्याध जाऊन । शरासनीं शर लावून । कानाडी ओढोनि सावज लक्षी ॥४१॥ दृष्टीं बिल्वदळें दाटली बहुत । तीं दक्षिण हस्तें खुडोनि टाकीत । तों तेथें पद्मजहस्ते स्थापित । शिवलिंग दिव्य होतें ॥४२॥ त्यावरी बिल्वदळें पडत । तेणें संतोषला अपर्णानाथ । व्याधास उपवास जागरण घडत । सायास न करितां अनायासें ॥४३॥ वाचेसी शिवनामाचा चाळा । हर हर म्हणे वेळोवेळां । पापक्षय होत चालिला । पूजन स्मरण सर्व घडलें ॥४४॥ एक याम झालिया रजनी । तों जलपानालागीं एक हरिणी । आली तेथें ते गर्भिणी । परम सुकुमार तेजस्वी ॥४५॥ व्याध तिणें लक्षिला दुरुन । कृतांतवत परम दारुण । आकर्ण ओढिला बाण । देखोनिया हरिणी बोलतसे ॥४६॥ म्हणे महापुरुषा अन्यायाविण । कां मजवरी लाविला बाण । मी तव हरिणी आहे गर्भिण । वध तुवां न करावा ॥४७॥ उदरांत गर्भ सूक्ष्म अज्ञान । वधितां दोष तुज दारुण । एक रथभरी जीव वधिता सान । तरी एक बस्त वधियेला ॥४८॥ शत बस्त वधितां एक । वृषभहत्येचें पातक । शत वृषभ तैं गोहत्या देख । घडली शास्त्र वदतसे ॥४९॥ शत गोहत्यांचें पातक पूर्ण । एक वधिता होय ब्राह्मण । शत ब्रह्महत्येचें पातक जाण । एक स्त्री वधिलिया ॥५०॥ शत स्त्रियांहूनि अधिक । एक गुरुहत्येचे पातक । त्याहूनि शतगुणी देख । एक गर्भिण वधिलिया ॥५१॥ तरी अन्याय नसतां ये अवसरीं । मज मारिसी कां वनांतरीं । व्याध म्हणे कुटुंब घरीं । उपवासी वाट पहात ॥५२॥ मीही आजी निराहार । अन्न नाहींच अणुमात्र । परी मृगी होऊनि सुंदर । गोष्टी वदसी शास्त्रींच्या ॥५३॥ मज आश्चर्य वाटतें पोटीं । नराऐशा सांगसी गोष्टी । तुज देखोनियां दृष्टीं । दया हृदयीं उपजतसे ॥५४॥ पूर्वी तूं होतीस कोण । तुज एवढें ज्ञान कोठून । तूं विशाळनेत्री रुपलावण्य । सर्व वर्तमान मज सांगे ॥५५॥ मृगी म्हणे ते अवसरीं । पूर्वी मंथन करितां क्षीरसागरीं । चतुर्दश रत्नें काढिलीं सुरासुरीं । महाप्रयत्नें करुनियां ॥५६॥ त्यांमाजी मी रंभा चतुर । मज देखोनि भुलती सुरवर । नाना तपें आचरोनि अपार । तपस्वी पावती आम्हांतें ॥५७॥ म्यां नयनकटाक्षजाळें पसरुन । बांधिले निर्जरांचें मनमीन । माझिया अंगसुवासा वेधून । मुनिभ्रमर धांवती ॥५८॥ माझें गायन ऐकावया सुरंग । सुधापानीं धांवती कुरंग । मी भोगीं स्वर्गीचे दिव्य भोग । स्वरुपें न मानी कोणासी ॥५९॥ मद अंगीं चढला बहुत । शिवभजन टाकिलें समस्त । शिवरात्री सोमवार प्रदोषव्रत । शिवार्चन सांडिलें म्यां ॥६०॥ सोडोनियां सुधापान । करुं लागलें मद्यप्राशन । हिरण्यनामा दैत्य दारुण । सुर सोडोनि रतलें त्यासीं ॥६१॥ ऐसा लोटला काळ अपार । मृगयेस गेला तो असुर । त्या दुष्टासंगे अपर्णावर- । भजनपूजन विसरलें ॥६२॥ मनास ऐसें वाटलें पूर्ण । असुर गेला मृगयेलागुन । इतुक्यांत घ्यावें शिवदर्शन । म्हणोनि गेलें कैलासा ॥६३॥ मज देखतां हिमनगजामात । परम क्षोभोनि शाप देत । तूं परम पापिणी यथार्थ । मृगी होई मृत्युलोकीं ॥६४॥ तुझ्या सख्या दोघीजणी । त्या होतील तुजसवें हरिणी । हिरण्य असुर माझिये भजनीं । असावध सर्वदा ॥६५॥ तोही मृग होऊनि सत्य । तुम्हांसीच होईल रत । ऐक व्याधा सावचित्त । मग म्यां शिव प्रार्थिला ॥६६॥ हे पंचवदना विरुपाक्षा । सच्चिदानंदा कर्माध्यक्षा । दक्षमखदळणा सर्वसाक्षा । उःशाप देईं आम्हांतें ॥६७॥ भोळा चक्रवर्ती दयाळ । उःशाप वदला पयःफेनधवल । द्वादश वर्षें भरतां तात्काळ । पावाल माझिया पदातें ॥६८॥ मग आम्हीं मृगयोनीं । जन्मलों ये कर्मअवनीं । मी गर्भिणी आहें हरिणी । प्रसूतकाळ समीप असे ॥६९॥ तरी मी आपुल्या स्वस्थळा जावोन । सत्वर येतें गर्भ ठेऊन । मग तूं सुखें घेईं प्राण । सत्य वचन हें माझें ॥७०॥ ऐसी मृगी बोलली सावचित्त । त्यावरी तो व्याध काय बोलत । तूं गोड बोलसी यथार्थ । परी विश्वास मज न वाटे ॥७१॥ नानापरी असत्य बोलोन । करावें शरीराचें संरक्षण । हें प्राणिमात्रास आहे ज्ञान । तरी तूं शपथ वदे आतां ॥७२॥ महत्पापें उच्चारुन । शपथ वदें यथार्थ पूर्ण । यावरी ते हरिणी दीनवदन । वाहात आण ऐका ते ॥७३॥ ब्राह्मणकुळीं उपजोन । जो न करी वेदशास्त्राध्ययन । सत्यशौचवर्जित संध्याहीन । माझें शिरीं पातक तें ॥७४॥ एक वेदविक्रय करिती पूर्ण । कृतघ्न परपीडक नावडे भजन । एक दानासी करिती विघ्न । गुरु निंदाश्रवण एक करिती ॥७५॥ रमावर-उमावरांची निंदा । त्या पापाची मज होय आपदा । दान दिधलें जें ब्रह्मवृंदा । हिरोनी घेती माघारें ॥७६॥ एक यतिनिंदा करिती । एक शास्त्रें पहाती द्वैत निर्मिती । नाना भ्रष्टमार्ग आचरती । स्वधर्म आपुला सांडूनियां ॥७७॥ देवालयामाजी जाऊनी । हरिकथापुराणश्रवणीं । जे बैसती विडा घेउनी । ते कोडी होती पापिये ॥७८॥ जे देवळांत करिती स्त्रीसंभोग । कीं स्त्री-भ्रतारांसी करिती वियोग । ते नपुसंक होवोनि अभाग्य । उपजती या जन्मीं ॥७९॥ वर्मकर्में निंदा करीत । तो जगपुरीषभक्षक काग होत । शिष्यांसी विद्या असोनि न सांगत । तो पिंगळा होत निर्धारें ॥८०॥ अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती । त्यानिमित्तें गंडमाळा होती । परक्षेत्रींच्या गाई वळोनि आणिती । ते अल्पायुषी होती या जन्मीं ॥८१॥ जो राजा करी प्रजापीडण । तो या जन्मीं व्याघ्र कां सर्प होय दारुण । वृथा करी साधुछळण । निर्वंश पूर्ण होय त्याचा ॥८२॥ स्त्रिया व्रतनेम करीत । भ्रतारासी अव्हेरित ।  धनधान्य असोनि वंचित । त्या वाघुळा होती या जन्मीं ॥८३॥ पुरुष कुरुप म्हणोनियां त्यागिती । त्या या जन्मीं बालविधवा होती । तेथेंही जारकर्म करिती । मग त्या होती वारांगना ॥८४॥ ज्या भ्रतारासी निर्भर्त्सिती । त्या दासी किंवा कुलटा होती । सेवक स्वामीचा द्रोह करिती । ते जन्मा येती श्वानाच्या ॥८५॥ सेवकापासून सेवा घेऊन । त्याचें न दे जो वेतन । तो अत्यंत भिकारी होऊन । दारोदारीं हिंडतसे ॥८६॥ स्त्री-पुरुष गुज बोलतां । जो जाऊनि ऐके तत्वतां । त्याची स्त्री दुरावे हिंडतां । अन्न न मिळे तयातें ॥८७॥ जे जारण मारण करिती । ते भूत प्रेत पिशाच्च होती । यती उपवासें पीडिती । त्यांतें दुष्काळ जन्मवरी ॥८८॥ स्त्री रजस्वला होऊनी । गृही वावरे जे पापिणी । पूर्वज रुधिरीं पडती पतनीं । त्या गृही देव-पितृगण न येती ॥८९॥ जे देवाच्या दीपाचें तेल नेती । ते या जन्मीं निपुत्रिक होती । ज्या रांधितां अन्न चोरोनी भक्षिती । त्या मार्जारी होती या जन्मीं ॥९०॥ ब्राह्मणांस कदन्न घालून । आपण भक्षिती षड्रसपक्वान्न । त्यांचे गर्भ पडती गळोन । आपुलिया कर्मवशें ॥९१॥ जो मातापित्यांसी शिणवीत । तो ये जन्मीं मर्कट होत । सासू-श्वशुरां स्नुषा गांजीत । तरी बाळक न वांचे तियेचें ॥९२॥ मृगी म्हणे व्याधालागून । जरी मी न ये परतोन । तरी ही महत्पापें संपूर्ण । माझ्या माथां बैसोत ॥९३॥ हे मिथ्या गोष्ट होय साचार । तरी घडो शिवपूजेचा अपहार । ऐसी शपथ ऐकतां निर्धार । व्याध शंकला मानसीं ॥९४॥ म्हणे पतिव्रते जाई आतां । सत्वर येईं निशा सरतां । हरिणी म्हणे शिवपदासी तत्वतां । पुण्यवंता जाशील ॥९५॥ उदकपान करोनि वेगीं । निजाश्रमा गेली ते कुरंगी । इकडे व्याध दक्षिणभागीं । टाकी बिल्वदळें खुडूनियां ॥९६॥ दोन प्रहर झाली यामिनी । द्वितीय पूजा शिवें मानूनी । अर्धपाप जळालें मुळींहुनी । सप्तजन्मींचें तेधवा ॥९७॥ नामीं आवड जडली पूर्ण । व्याध करी शिवस्मरण । मृगीमुखें ऐकिलें निरुपण । सहज जागरण घडलें तया ॥९८॥ तों दुसरी हरिणी अकस्मात । पातली तेथें तृषाक्रांत । व्याधें बाण ओढितां त्वरित । करुणा भाकी हरिणी ते ॥९९॥ म्हणे व्याधा ऐक ये समयीं । मज कामानळें पीडीलें पाहीं । पतीसी भोग देवोनि लवलाही । परतोनि येतें सत्वर ॥१००॥ व्याध आश्चर्य करी मनांत । म्हणे शपथ बोलोनी जाई त्वरित। धन्य तुमचें जीवित्व । सर्व शास्त्रार्थ ठाऊका ॥१०१॥ वापी तडाग सरोवर । जो पतित मोडी देवागार । गुरुनिंदक मद्यपानीं दुराचार । तीं पापें समग्र मस्तकीं माझ्या ॥१०२॥ महाक्षत्रिय आपण म्हणवित । समरांगणीं मागें पळत । वृत्ति हरी सीमा लोटीत । ग्रंथ निंदित महापुरुषांचे ॥१०३॥ वेदशास्त्रांची निंदा करी । संत-भक्तांसीं द्वेष धरी । हरि-हर चरित्रें अव्हेरी । माझें शिरीं तीं पापें ॥१०४॥ धनधान्य असोनि पाहीं । पतीलागीं शिणवी म्हणे नाहीं । पति सांडोनि निजे परगृहीं । तीं पापें माझिया माथां ॥१०५॥ पुत्र स्नुषा सन्मार्ग वर्ततां । त्यांसी व्यर्थचि गांजिती जे न पाहता । ते कुरुप होती तत्वतां । हिंडतां भिक्षा न मिळेचि ॥१०६॥ बंधु-बंधु जे वैर करिती । ते या जन्मीं मत्स्य होती । गुरुचें उणें जे पाहती । त्यांची संपत्ती दग्ध होय ॥१०७॥ जे मार्गस्थांचीं वस्त्रें हरिती । ते अतिशूद्र प्रेतवस्त्रें पांघरती । आम्ही तपस्वी म्हणोनियां अनाचार करिती । ते घुले होती मोकाट ॥१०८॥ दासी स्वामीची सेवा न करी । ती ये जन्मीं होय मगरी । जो कन्याविक्रय करी । हिंसकयोनीं निपजे तो ॥१०९॥ स्त्री भ्रताराची सेवा करीत । तीस जो व्यर्थचि गांजित । त्याचा गृहभंग होत । जन्मजन्मांतरीं न सुटे ॥११०॥ ब्राह्मण करी रसविक्रय । घेतां देतां मद्यपी होय । जो ब्रह्मवृंदा अपमानिताहे । तो होय ब्रह्मराक्षस ॥१११॥ एकें उपकार केला । जो नष्ट नाठवी त्याला । तो कृतघ्न जंत झाला । पूर्वकर्में जाणिजे ॥११२॥ विप्र श्राद्धीं जेवुनी । स्त्रीभोग करी ते दिनीं । तो श्वानसूकरयोनीं । उपजेल निःसंशयें ॥११३॥ व्यवहारी दहांत बैसोन । खोटी साक्ष देई गर्जोन । पूर्वज नरकीं पावती पतन । असत्य साक्ष देतांचि ॥११४॥ दोघी स्त्रिया करोन । एकीचेंच राखी जो मन । तो गोचिड होय जाण । सारमेयशरीरीं ॥११५॥ पूर्वजन्मीं कोंडी उदक । त्याचा मळमूत्रनिरोध देख । करितां साधुनिंदा आवश्यक । सत्वरदंत भग्न होती ॥११६॥ देवालयीं करी भोजन । तरी ये जन्मीं होय क्षीण । पृथ्वीपतीची निंदा करितां जाण । उदरीं मंदाग्नि होय पैं ॥११७॥ ग्रहणसमयीं करी भोजन । त्यासी पित्तरोग होय दारुण । परबाळें विकी परदेशीं नेऊन । तरी सर्वांगी कुष्ठ भरे ॥११८॥ जी स्त्री करी गर्भपातन । ती उपजे वंध्या होऊन । देवालय टाकी पाडोन । तरी अंगभंग होय त्याचा ॥११९॥ अपराधाविण स्त्रीसी गांजिता हे । त्याचें ये जन्मीं एक अंग जाये । ब्राह्मणाचे अन्न हरिती पापिये । त्यांचा वंश न वाढे कधीं ॥१२०॥ गुरु संत माता पिता । त्यांसी होय जो निर्भत्सिता । तरी वाचा जाय त्तवतां । अडखळे बोलतां क्षणक्षणां ॥१२१॥ जो ब्राह्मणांसी दंड मारी । त्यासी व्याधितिडका लागती शरीरीं । जो संतांसी वादविवाद करी । दीर्घ दंत होती त्याचे ॥१२२॥ देवद्वारींचे तरुवर । अश्वत्थादि वृक्ष साचार । तोडितां पांगुळ होय निर्धार । भिक्षा न मिळे हिंडता ॥१२३॥ जो सूतकअन्न भक्षित । त्याचे उदरी नाना रोग होत । आपणचि परिमळद्रव्य भोगी समस्त । तरी दुर्गंधी सत्य सर्वांगीं ॥१२४॥ ब्राह्मणाचे ऋण न देतां । तरी बाळपणीं मृत्यु पावे पिता । जलवृक्षछाया मोडितां । तरी एकही स्थळ न मिळे त्यातें ॥१२५॥ ब्राह्मणासी आशा लावून । चाळवी नेदी कदा दान । तो ये जन्मी अन्न अन्न । करीत हिंडे घरोघरीं ॥१२६॥ जो पुत्रद्वेष करीत । आणि दरिद्रियाचें लग्न मोडित । तरी स्त्रीसी सल राहे पोटांत । वंध्या निश्चित संसारीं ॥१२७॥ जेणें ब्राह्मण बांधिले निग्रहून । त्यासी सांडसें तोडी सूर्यनंदन । जो नायके कथाग्रंथ पावन । बधिर होय जन्मोजन्मीं ॥१२८॥ जो पीडी माता-पितयांस । त्याचा सर्वदा होई कार्यनाश । एकास भजे निंदी सर्व देवांस । तरी एकचि पुत्र होय त्यासी ॥१२९॥ जो चांडाळ गोवध करी । त्यासी मिळे कर्कशा नारी । वृषभ वधितां निर्धारीं । शतमूर्ख पुत्र होय त्यासी ॥१३०॥ उदकतृणेंविण पशु मारीत । तरी मुक्याच प्रजा होती समस्त । जो पतिव्रतेसी भोगूं इच्छित । तरी कुरुप नारी कर्कशा मिळे ॥१३१॥ जो पारधी बहु जीव संहारी । तो फेंपरा होय संसारीं । गुरुचा त्याग जो चांडाळ करी । तो उपजतांचि मृत्यु पावे ॥१३२॥ नित्य अथवा रविवारी मुतें रवीसमोर । त्याचे बाळपणीं दंत भग्न केश शुभ्र । जे मृत बाळासाठीं रुदती निर्धार । त्यांस हांसतां निपुत्रिक होय ॥१३३॥ हरिणी म्हणे व्याधालागून । मी सत्वरी येतें पतीसी भोग देऊन । न ये तरी हीं पापें संपूर्ण । माझ्या माथां बैसोत पैं ॥१३४॥ व्याध मनांत शंकोन । म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान । सत्वर येईं गृहासी जाऊन । सत्य संपूर्ण सांभाळीं ॥१३५॥ जलपान करोनि वेगीं । आश्रमा गेली ते कुरंगी । तो मृगराज तेच प्रसंगीं । जलपानार्थ पातला ॥१३६॥ व्याधें ओढिला बाण । तों मृग बोले दीनवदन । म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण । त्यांसी पुसोन येतों मी ॥१३७॥ शपथ ऐकें त्वरित । कीर्तन करिती प्रेमळ भक्त । तो कथारंग मोडितां निर्वंश होत । पाप सत्य मम माथां ॥१३८॥ ब्रह्मकर्म वेदोक्त । शुद्र निजांगें आचरत । तो अधम नरकीं पडत । परधर्म आचरतां ॥१३९॥ तीर्थयात्रेसी विघ्नें करी । वाटपाडी वस्त्र द्रव्य हरी । तरी सर्वांगीं व्रण अघोरीं । नरकीं पडे कल्पपर्यंत ॥१४०॥ शास्त्रकोशीं नाहीं प्रमाण । कूटकविता करी क्षुद्र लक्षून । हरिती ब्राह्मणांचा मान । तरी संतान तयांचें न वाढे ॥१४१॥ हरिदिनीं शिवदिनीं उपोषण । विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण । तरी हस्त पाद क्षीण । होती त्याचे निर्धारें ॥१४२॥ एक शिवहरीप्रतिमा फोडिती । एक भगवद्भक्तां विघ्नें करिती । एक शिवमहिमा उच्छेदिती । नरकीं होती कीटक ते ॥१४३॥ मातृद्रोही त्यासी व्याधी भरे । पितृद्रोही पिशाच विचरे । गुरुद्रोही तत्काळ मरे । भूतप्रेतगणीं विचरे तो ॥१४४॥ विप्र आहार बहुत जेविती । त्यांसी जो हांसे दुर्मती । त्याचे मुखीं अरोचकरोग निश्चिती । न सोडिती जन्मवरी ॥१४५॥ एक गोविक्रय करिती । एक कन्याविक्रय अर्जिती । ते नर मार्जार मस्त होती । बाळें भक्षिती आपुलीं ॥१४६॥ जो कन्या भगिनी अभिलाषी । कामदृष्टीं न्याहाळी पतिव्रतेसी । प्रमेहरोग होय त्यासी । कीं खडा गुह्यांत दाटत ॥१४७॥ प्रासादभंग लिंगभंग करी । देवांचीं उपकरणें अलंकार चोरी । देवप्रतिष्ठा अव्हेरी । पंडुरोग होय ॥१४८॥ एक मित्रद्रोह विश्वासघात करिती । मातृपितृहत्या गुरुसी संकटीं पाडिती । ब्रह्मवध गोवध न वारिती । अंगी सामर्थ्य असोनियां ॥१४९॥ ब्राह्मण बैसवोनि बाहेरी । उत्तमान्न जेविती गृहांतरीं । सोयर्‍ऱ्यांची प्रार्थना करी । संग्रहणी पोटशूळ होती तया ॥१५०॥ एक कर्मभ्रष्ट पंचयज्ञ न करिती । एक ब्राह्मणांची सदनें जाळिती । एक दीनासी मार्गी नागविती । एक संतांचा करिती अपमान ॥१५१॥ एक करिती गुरुछळण । एक म्हणती पाहों याचें लक्षण । नाना दोष आरोपिती अज्ञान । त्यांचें संतान न वाढे ॥१५२॥ जो सदा पितृद्वेष करी । जो ब्रह्मवृदांसी अव्हेरी । शिवकीर्तन ऐकतां  त्रासे अंतरी । तरी पितृवीर्य नव्हे तो ॥१५३॥ शिवकीर्तनीं नव्हे सादर । तरी कर्णमूळरोग निर्धार । नसत्याच गोष्टी जल्पे अपार । तों दर्दुर होय निर्धारें ॥१५४॥ शिवकीर्तन किंवा पुराणश्रवण । तेथें शयन करितां सर्प होय दारुण । एक अतिवादक छळक जाण । ते पिशाचयोनी पावती ॥१५५॥ एकां देवार्चनीं वीट येत । ब्राह्मण पूजावया कंटाळत । तीर्थप्रसाद अव्हेरीत । त्यांच्या आखुडती अंगशिरा ॥१५६॥ मृग म्हणे ऐसीं पापें अपार । मम मस्तकीं होईल परम भार । मग पारधी म्हणे सत्वर । जाई स्वस्थाना मृगवर्या ॥१५७॥ व्याध शिवनामें गर्जे ते क्षणीं । कंठ सद्गदित अश्रु नयनीं । मागुती बिल्वदळें खुडोनी । शिवावरी टाकीतसे ॥१५८॥ चौंप्रहरांच्या पूजा चारी । संपूर्ण झाल्या शिवजागरीं । सप्तजन्मींचीं पापें निर्धारीं । मुळींहूनी भस्म झालीं ॥१५९॥ तों पूर्वदिशा मुख प्रक्षाळित । सुपर्णाग्रज उदय पावत । आरक्तवर्ण शोभा दिसत । तेंचि कुंकुम प्राचीचें ॥१६०॥ तों तिसरी मृगी आली अकस्मात । व्याध देखिला कृतांतवत । म्हणे मारुं नको मज यथार्थ । बाळासी स्तन देऊन येतें मी ॥१६१॥ व्याध अत्यंत हर्षभरित । म्हणे ही काय बोलेल शास्त्रार्थ । तो ऐकावया म्हणत । शपथ करुनि जाय तूं ॥१६२॥ यावरी मृगी म्हणे व्याधा ऐक । जो तृणदाहक ग्रामदाहक । गो ब्राह्मणांचें कोंडी उदक । क्षयरोग त्यासी न सोडी ॥१६३॥ ब्राह्मणांची सदनें हरिती देख । त्यांचे पूर्वज रौरवीं पडती निःशंक । मातृ-पुत्रां बिघडती एक । स्त्रीपुरुषां बिघड पाडिती ॥१६४॥ देवब्राह्मण देखोन । खालती न करिती कदा मान । निंदिती बोलती कठोर वचन । यम करचरण छेदी तयांचे ॥१६५॥ परवस्तु चोरावया देख । अखंड लाविला असे रोख । साधुसन्मानानें मानी दुःख । त्यासी नेत्ररोगतिडका न सोडिती ॥१६६॥ पुस्तकचोर ते मुके होती । रत्नचोरांचे नेत्र जाती । अत्यंत गर्वी ते महिष होती । पारधी निश्चिती श्येनपक्षी ॥१६७॥ भक्तांची जो निंदा करीत । त्याचे मुखीं दुर्गंधी घाणित । जो माता-पितयांसी ताडित । लुला होत यालागीं ॥१६८॥ जो अत्यंत कृपण । धन न वेंची अणुप्रमाण । तो महाभुजंग होऊन । धुसधुसीत बैसे तेथें ॥१६९॥ भिक्षेसी यतीश्वर आला । तो जेणें रिता दवडिला । शिव त्यावरी जाण कोपला । संतति संपत्ति दग्ध होय ॥१७०॥ ब्राह्मण बैसला पात्रावरी । उठवूनि घातला बाहेरी । त्याहूनियां दुराचारी । दुसरा कोणी नसेचि ॥१७१॥ ऐसा धर्माधर्म ऐकोन । पारधी सद्गद बोले वचन । स्वस्थळा जाई जलपान करोन । बाळांसी स्तन देऊन येईं ॥१७२॥ ऐसें ऐकोनि मृगी लवलाह्या । गेली जलप्राशन करुनियां । बाळें स्तनीं लावूनियां । तृप्त केलीं तियेनें ॥१७३॥ वडील झाली प्रसूत । दुसरी पतीची कामना पुरवित । मृगराज म्हणे आतां त्वरित। जाऊं चला व्याधापासीं ॥१७४॥ मृग पाडसांसहित सर्वही । व्याधापासीं आली लवलाही । मृग म्हणे ते समयीं । आधीं मज वधी पारधिया ॥१७५॥ मृगी म्हणे हा नव्हे विधी । आम्हीं जाऊं पतीच्या आधीं । पाडसें म्हणती त्रिशुद्धी । आम्हांसी वधीं पारधिया ॥१७६॥ त्यांचीं वचनें ऐकतां ते क्षणीं । व्याध सद्गद झाला मनीं । अश्रुधारा लोटल्या नयनीं । लागे चरणीं तयांच्या ॥१७७॥ म्हणे धन्य जिणें माझे झालें । तुमचेनि मुखें निरुपण ऐकिलें । बहुतां जन्मींचे पाप जळालें । पावन केले शरीर ॥१७८॥ माता पिता गुरु देव । तु्म्हीच आतां माझे सर्व । कैंचा संसार मिथ्या वाव । पुत्रकलत्र सर्व लटकें ॥१७९॥ व्याध बोले प्रेमेंकरुन । आतां कधीं मी शिवपद पावेन । तों अकस्मात आलें विमान । शिवगण बैसले त्यावरी ॥१८०॥ पंचवदन दशभुज । व्याघ्रांबर नेसलें महाराज । अद्भुत तयांचे तेज । दिक्चक्रामाजी न समाये ॥१८१॥ दिव्य वाद्यें वाजविती किन्नर । आलाप करिती विद्याधर । दिव्य सुमनांचे संभार । सुरगण स्वयें वर्षती ॥१८२॥ मृगें पावली दिव्य शरीर । व्याध करी साष्टांग नमस्कार । मुखें म्हणे जय जय शिव हर हर । तों शरीरभाव पालटला ॥१८३॥ परिसीं झगडतां लोह होय सुवर्ण । तैसा व्याध झाला दशभुज पंचवदन । शिवगणीं बहुत प्रार्थून । दिव्य विमानीं बैसविला ॥१८४॥ मृगें पावलीं दिव्य शरीर । तींही विमानीं आरुढली समग्र । व्याधाची स्तुती वारंवार । करिती सुरगण सर्वही ॥१८५॥ व्याध नेला शिवपदाप्रती । तारामंडळी मृगें राहती । अद्यापि गगनीं झळकती । जन पाहती सर्व डोळां ॥१८६॥ सत्यवतीहृदयरत्नखाणी । रसभरित बोलिला लिंगपुराणीं । तें सज्जन ऐकोत दिनरजनीं । ब्रह्मानंदेकरुनियां ॥१८७॥ धन्य ते शिवरात्रीव्रत । श्रवणें पातक दग्ध होत । जे हें पठण करिती सावचित्त । धन्य पुण्यवंत नर तेचि ॥१८८॥ सज्जन श्रोते निर्जर सत्य । प्राशन करोत शिवलिलामृत । निंदक असुर कुतर्कीं बहुत । त्यांसी प्राप्त कैचें हे ॥१८९॥ कैलासनाथ ब्रह्मानंद । तयाचें पदकल्हार सुगंध । तेथें श्रीधर अभंग षट्पद । रुंजी घालीत शिवनामें ॥१९०॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड । द्वितीयाध्याय गोड हा ॥१९१॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥


Feb 14, 2022

शिवोपासना - प्रदोष व्रत, श्रीशिवलीलामृत अध्याय पाचवा


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय

 

शिवोपासनेत प्रदोष व्रताचे विशेष माहात्म्य आहे. चैत्र-वैशाखादि मासांतील शुद्ध आणि वद्य पक्षातील त्रयोदशीस प्रदोष व्रत केले जाते. प्रदोष म्हणजे त्रयोदशीचा सूर्यास्तापूर्वीचा तीन घटकांचा ( साधारण ७२ मिनिटे ) काळ ! प्रदोषकाळी यक्ष, किन्नर, गंधर्व, सिद्ध, सर्व सुरवर, अप्सरा आणि शिवगण श्री शंकरांच्या दर्शनार्थ येतात. त्यामुळे, शिवपूजनासाठी ही वेळ अत्यंत शुभदायक मानली जाते.

या दिवशी सूर्यास्तापूर्वी स्नान करावे. अष्टदल कमळावर शिवलिंगाची स्थापना करावी. पार्वती-परमेश्वरासहित सकल शिवपरिवारास आमंत्रित करावे. श्रीशंकरांना संकल्प सांगावा आणि माझ्या यथामति-यथाशक्ति केलेल्या पूजेचा आपण स्वीकार करावा, अशी प्रार्थना करावी. त्यानंतर, त्यांचे श्रद्धापूर्वक यथासांग पूजन करावे. दीप, धूप लावावा. महादेवांची आवडती फुले, बिल्वपत्रें अवश्य अर्पण करावी. प्रत्येक उपचार अर्पण करतांना ' ॐ नमः शिवाय ' हा महामंत्र म्हणावा.

आवाहन - ॐ नमः शिवाय । आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि । असे म्हणून अक्षता वाहाव्यात.

स्नान - बिल्वपत्राने शिवलिंगावर जल शिंपडावे. पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करतांना, ॐ श्री शंकराय नमः । ॐ श्री कैलासपतये नमः । ॐ श्री पार्वतीपतये नमः । ॐ श्री शांतिसागराय नमः । ॐ श्री सुखदाताय नमः । ॐ श्री विघ्नहर्त्रे नमः । ॐ शांतिः शांतिः शांतिः हा मंत्र जपावा. त्यानंतर, शुद्ध जलाने स्नान घालावे. त्यानंतर वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, फुले, बिल्वपत्रें अर्पण करावीत. दीप, धूप दाखवावा.

नैवेद्यं समर्पयामि असे म्हणून दूध, पेढे यांचा नैवेद्य दाखवावा. पूगीफलं, तांबूलं समर्पयामि असे म्हणून महादेवांस विडा अर्पण करावा. भक्तिभावानें नमन करावे आणि आरती-मंत्रपुष्पांजली म्हणावी. ' ॐ र्‍हीं नमः शिवाय ' हा मंत्र अकरा वेळा मनोमन जपावा. शिव-पार्वतीला अत्यंत श्रद्धापूर्वक नमस्कार करावा आणि ' हे भगवंता, मी यथाशक्ती-यथामति आपले जे पूजन केले आहे, ते आपण स्वीकारा. काही न्यून राहिले असेल तर क्षमा असावी. ' अशी प्रार्थना करावी.

दुसऱ्या दिवशी, गच्छगच्छं सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर । यत्र ब्रह्मोदये देवास्तत्रगच्छ उमामहेश्वर ॥ पुनरागमनाय च असा मंत्र म्हणत नमस्कार करावा आणि अक्षता वाहून उत्तरपूजा करावी.


सोमवारी प्रदोष असेल तर त्याला सोमप्रदोष म्हणतात. सोमप्रदोषकाळी शिवपूजन केल्यास आरोग्यप्राप्ती, आयु-वृद्धी यांचा लाभ होतो. मंगळवारी भौमप्रदोष होतो. भौमप्रदोष व्रत प्रामुख्याने ऋणमुक्तीसाठी केले जाते. तर कृष्णपक्षातील शनि-प्रदोष विशेष फलदायी असतो.


*** श्रीशिवलीलामृत अध्याय पाचवा ***


श्रीगणेशाय नमः ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय

सदाशिव अक्षरे चारी । सदा उच्चारी ज्याची वैखरी । जो नित्य शिवार्चन करी । तो उद्धरी बहुता जीवा ॥१॥ बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार । शास्त्रवक्ते करिती विचार । परी जे शिवनामे शुद्ध साचार । कासया इतर साधने त्यां ॥२॥ नामाचा महिमा परम-अद्भूत । त्यावरी प्रदोषव्रत आचरत । त्यासी सर्वसिद्धि प्राप्त होत । सत्य सत्य त्रिवाचा ॥३॥ तुष्टि पुष्टि धृति आयुष्यवर्धन । संतति संपत्ति दिव्य ज्ञान । पाहिजे तिही प्रदोषव्रत पूर्ण । यथासांग करावें ॥४॥ प्रदोषव्रत भावे आचरितां । या जन्मीं प्रचीत पहावी तत्त्वतां । दारिद्र्य आणि महद्व्यथा । निःशेष पळती षण्मासांत ॥५॥ एक संवत्सरें होय ज्ञान । द्वादशवर्षी महद्भाग्य पूर्ण । हें जो असत्य मानील व्यासवचन । त्यासी बंधन कल्पांतवरी ॥६॥ त्याचा गुरु लटिकाच जाण । त्याची दांभिक भक्ति लटिकेंच ज्ञान । उमावल्लभचरणीं ज्याचे मन । त्याहुनि पावन कोणी नाहीं ॥७॥ मृत्यु गंडांतरे दारूण । प्रदोषव्रतें जाती निरसोन । येविषयीं इतिहास जाण । सूत सांगे शौनकादिका ॥८॥ विदर्भदेशींचा भूभुज । सत्यरथ नामें तेजःपुंज । सर्वधर्मरत पराक्रमी सहज । बंदीजन वर्णिती सदा ॥९॥ बहु दिवस राज्य करीत । परी शिवभजनीं नाहीं रत । त्यावरी शाल्व देशीचा नृपनाथ । बळें आला चालूनियां ॥१०॥ आणीक त्याचे आप्त । क्षोणीपाल साह्य झाले बहुत । सप्त दिवसपर्यंत । युद्ध अद्भुत जाहलें ॥११॥ हा एकला ते बहुत । समरभूमीसी सत्यरथ । धारातीर्थी पावला मृत्यु । शत्रु नगरांत प्रवेशले ॥१२॥ राजपत्नी गरोदर राजस । पूर्ण झाले नवमास । एकलीच पायीं पळतां वनास । थोर अनर्थ ओढवला ॥१३॥ परम सुकुमार लावण्यहरिणी । कंटक-सराटे रूतती चरणीं । मूर्च्छना येऊनि पडे धरणीं । उठोनि पाहे मागेपुढें ॥१४॥ शत्रु धरितील अकस्मात । म्हणोनि पुढती उठोनि पळत । किंवा ते विद्युल्लता फिरत । अवनीवरी वाटतसे ॥१५॥ वस्त्रें-अलंकार-मंडित । हिर्‍ऱ्यांऐसे दंत झळकत । जिचा मुखेंदु देखतां रतिकांत । तन्मय होवोनि नृत्य करी ॥१६॥ पहा कर्माची गति गहन । जिच्या अंगुष्ठी न पडे सूर्यकिरण । ते गरोदर हिंडे विपिन । मृगनेत्री गजगामिनी ॥१७॥ वनी हिंडे महासती । जेवीं नैषधरायाची दमयंती । कीं भिल्लीरूपें हैमवती । दुस्तरवनी तैसी हिंडे ॥१८॥ कर्म-नदीच्या प्रवाही जाण । पडली तीस काढील कोण । असो एका वृक्षाखाली येऊन । परम व्याकुळ पडियेली ॥१९॥ शतांचीं शतें दासी । ओळंगती सदैव जियेपासीं । इंदुमती नाम जियेसी । ते भूमीवरी लोळत ॥२०॥ चहुंकडे पाहे दीनवदनीं । जिव्हा मुख वाळलें न मिळे पाणी । तों प्रसूत झाली तेच क्षणीं । दिव्य पुत्र जन्मला ॥२१॥ तृषेनें तळमळी अत्यंत । कोण उदक देईल तेथ । बाळ टाकूनि उठत बसत । गेली एका सरोवरा ॥२२॥ उदकांत प्रवेशली तेच क्षणीं । अंजुळी भरोनि घेतले पाणी । तंव ग्राहे नेली ओढोनी । विदारूनी भक्षिली ॥२३॥ घोर कर्मांचें विंदान । वनीं एकला रडे राजनंदन । तंव उमानामक विप्रपत्नी जाण । विगतधवा पातली ॥२४॥ माता पिता बंधु पाहीं । तियेलागीं कोणी नाहीं । एका वर्षाचा पुत्र तीसही । कडिये घेवोनि आली तेथें ॥२५॥ तों नाहीं केलें नालच्छेदन । ऐसें बाळ उमा देखोन । म्हणे आहा रे ऐसें पुत्ररत्न । कोणीं टाकिलें दुस्तर वनीं ॥२६॥ म्हणे कोण याती कोण वर्ण । मी कैसें नेऊं उचलून । जावें जरी टाकून । वृक व्याघ्र भक्षितील कीं ॥२७॥ स्तनी दाटूनी फुटला पान्हा । नेत्रीं ढाळीत अश्रुजीवना । बाळ पुढें घेऊनि ते ललना । मुखकमळीं स्तन लावी ॥२८॥ संशयसमुद्रीं पडली वेल्हाळ । म्हणे नेऊ कीं नको बाळ । तंव तो कृपाळु पयःफेनधवल । यतिरूप धरूनि पातला ॥२९॥ उमेलागीं म्हणे त्रिपुरारी । बाळ नेई संशय न धरी । महद्भाग्य तुझें सुंदरी । क्षत्रिय राजपुत्र तुज सांपडला ॥३०॥ कोणासी न सांगे हे मात । समान पाळीं दोघे सुत । भणंगासी परीस होय प्राप्त । तैसें तुज जाहले ॥३१॥ अकस्मात निधि जोडत । कीं चिंतामणि पुढें येऊनि पडत । कीं मृताच्या मुखात । पडे अमृत पूर्वदत्ते ॥३२॥ ऐसें बोलोनि त्रिपुरारी । गुप्त झाला ते अवसरी । मग दोघे पुत्र घेवोनि ते नारी । देशग्रामांतरीं हिंडत ॥३३॥ ब्रह्मपुत्राचें नाम शुचिव्रत । राजपुत्राचें नाम ठेविले धर्मगुप्त । घरोघरी भिक्षा मागत । कडिये खांदी घेऊनिया ॥३४॥ लोक पुसतां उमा सांगत । माझे पोटीचे दोघे सुत । ऐसी हिंडत हिंडत । एकचक्रनगरा पातली ॥३५॥ घरोघरी भिक्षा मागत । तों शिवालय देखिलें अकस्मात । आंत द्विज दाटले बहुत । शांडिल्य त्यांत मुख्य ऋषि ॥३६॥ शिवाराधना करिती विधियुक्त । तों उमा आली शिवालयांत । क्षण एक पूजा विलोकीत । तों शांडिल्य ऋषि बोलिला ॥३७॥ अहा कर्म कैसें गहन । हा राजपुत्र हिंडे दीन होऊन । कैसें विचित्र प्राक्तन । उमा वचन ऐकती जाहली ॥३८॥ ऋषीचे चरण उमा धरीत । म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत । त्रिकालज्ञानी महासमर्थ । भूतभविष्यज्ञान तुम्हां ॥३९॥ याचीं माता पिता कोण । आहेत कीं पावली मरण । यावरी शांडिल्य सांगे वर्तमान । याचा पिता जाण सत्यरथ ॥४०॥ तो पूर्वी होता नृप जाण । प्रदोषसमयीं करी शिवार्चन । तों शत्रु आले चहूकडोन । नगर त्याचें वेढिले ॥४१॥ शत्रूंची गजबज ऐकून । उठिला तैसीच पूजा सांडोन । तव प्रधान आला पुढें धांवोन । शत्रू धरोनि आणिले ॥४२॥ त्यांचा शिरच्छेद करून । पूजा पूर्ण न करितां उन्मत्तपणें । तैसाच जाऊनि करी भोजन । नाहीं स्मरण विषयांधा ॥४३॥ त्याकरितां या जन्मीं जाण । सत्यरथ अल्पायुषी होऊन । अल्पवयांत गेला मरोन । म्हणोनि पूजन न सोडावें ॥४४॥ याच्या मातेने सवत मारिली । ती जळी विवशी झाली । पूर्व वैरें वोढोनि नेली । क्रोधे भक्षिली विदारूनी ॥४५॥ हा राजपुत्र धर्मगुप्त । यानें काहीच केले नाही शिवव्रत । म्हणोनि मातापितारहित । अरण्यांत पडियेला ॥४६॥ याकरितां प्रदोषकाळीं । अव्यग्र पूजावा इंदुमौळी । पूजन सांडुनि कदाकाळीं । सर्वथाही न उठावें ॥४७॥ भवानीस बैसवूनि कैलासनाथ । प्रदोषकाळी पुढे नृत्य करीत । वाग्देवी वीणा वाजवीत । वेणु पुरुहूत वाजवीतसे ॥४८॥ अंबुजसंभव ताल सावरी । भार्गवी गातसे मधुरस्वरीं । मृदुंग वाजवी मधुकैटभारी । नृत्यगती पाहूनिया ॥४९॥ यक्षपति शिवप्राणमित्र । हस्त जोडोनि उभा समोर । यक्षगण गंधर्व किन्नर । सुरासुर उभे असती ॥५०॥ ऐसा प्रदोषकाळीचा महिमा । अगोचर निगमांगमां । मग काय बोले उमा । मम पुत्र दरिद्री कां झाला ॥५१॥ तुझ्या पुत्रें प्रतिग्रह बहुत । पूर्वी घेतले दुष्ट अमित । दान केले नाही किंचित । शिवार्चन न करी कदा ॥५२॥ परान्नें जिव्हा दग्ध यथार्थ । दुष्ट प्रतिग्रहें दग्ध हस्त । स्त्रीअभिलाषे नेत्र दग्ध होत । मंत्रासी सामर्थ्य मग कैचें ॥५३॥ मग उमेनें पुत्र दोन्ही । घातले ऋषीचे चरणीं । तेणें पंचाक्षर मंत्र उपदेशुनी । प्रदोषव्रत उपदेशिले ॥५४॥ पक्षप्रदोष शनिप्रदोष । महिमा वर्णिला अतिविशेष । निराहार असावे त्रयोदशीस । दिवसा सत्कर्म आचरावें ॥५५॥ तीन घटिका झालिया रजनी । प्रदोषपूजा आरंभावी प्रीतीकरूनी । गोमये भूमि सारवूनी । दिव्य मंडप उभारिजे ॥५६॥ चित्रविचित्र वितान । कर्दळीस्तंभ इक्षुदंडेकरून । मंडप कीजे शोभायमान । रंगमाळा नानापरी ॥५७॥ शुभ्र वस्त्र नेसावें आपण । शुभ्र गंध सुवाससुमन । मग शिवलिंग स्थापून । पूजा करावी विधियुक्त ॥५८॥ प्राणायाम करून देखा । अंतर्बाह्य न्यास मातृका । दक्षिणभागीं पूजावें मुरांतका । सव्यभागी अग्नि तो ॥५९॥ वीरभद्र गजानन । अष्ट महासिद्धि अष्ट भैरव पूर्ण । अष्ट दिक्पालपूजन । सप्तावरणी शिवपूजा ॥६०॥ यथासांग शिवध्यान । मग करावे पूजन । राजोपचारे सर्व समर्पून । करावे स्तवन शिवाचें ॥६१॥ जयजय गौरीनाथ निर्मळ । जय जय कोटिचंद्र सुशीतळ । सच्चिदानंदघन अढळ । पूर्णब्रह्म सनातन ॥६२॥ ऐसे प्रदोषव्रत ऐकवून । बाळ उपदेशिले दोघेजण । मग ते एकमनेकरून । राहते झाले एकचक्री ॥६३॥ चार महिनेपर्यंत । दोघेही आचरती प्रदोषव्रत । गुरुवचने यथार्थ । शिवपूजन करिती पै ॥६४॥ शिवपूजा न द्यावी सर्वथा । न द्यावे प्रसादतीर्था । शत ब्रह्महत्यांचें पाप माथां । होय सांगता शांडिल्य ॥६५॥ सर्व पापांहूनि पाप थोर । शिवपूजेचा अपहार । असो ते दोघे किशोर । सदा सादर शिवभजनीं ॥६६॥ ब्रह्मपुत्र शुचिव्रत । एकला नदीतीरी क्रीडत । दरडी ढासळता अकस्मात । द्रव्यघट सापडला ॥६७॥ घरासी आला घेऊन । माता संतोषली देखोन । म्हणे प्रदोषव्रताचा महिमा जाण । ऐश्वर्य चढत चालिले ॥६८॥ राजपुत्रास म्हणे ते समयी । अर्ध द्रव्यविभाग घेई । थेरू म्हणे सहसाही । विभाग न घेई अग्रजा ॥६९॥ या अवनीतील धन । आमुचेच आहे संपूर्ण । असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण । न विसरती कदाही ॥७०॥ यावरी एकदां दोघेजण । गेले वनविहारालागून । तो गंधर्वकन्या येऊन । क्रीडता दृष्टी देखिल्या ॥७१॥ दोघे पाहती दुरूनी । परम सुंदर लावण्यखाणी । शुचिव्रत म्हणे राजपुत्रालागुनी । परदारा नयनी न पहाव्या ॥७२॥ दर्शने हरती चित्त । स्पर्शनें बळ वीर्य हरीत । कौटिल्यदंभसंयुक्त । महाअनर्थकारिणी ॥७३॥ ब्रह्मसुतास तेथे ठेवून । राजपुत्र चालिला सुलक्षण । स्वरूप सुंदर मन्मथाहून । आकर्णनयन कोमलांग ॥७४॥ जवळी येवोनि पाहात । तव मुख्य नायिका विराजित । अंशुमती नामें विख्यात । गंधर्वकन्या पद्मिनी ॥७५॥ कोद्रविणनामा गंधर्वपति । त्याची कन्या अंशुमती । पिता पुसे महेशाप्रती । हे कन्या अर्पू कोणातें ॥७६॥ मग बोले हिमनगजामात । धर्मगुप्त सत्यरथाचा सुत । तो माझा परम भक्त । त्यासी देई अंशुमती ॥७७॥ हे पूर्वीचे शिववचन । असो यावरी अंशुमती पाहे दुरोन । न्याहाळीत राजनंदन । वाटे पंचबाण दुसरा ॥७८॥ क्षीरसिंधूंत रोहिणीरमण । काय आला कलंक धुवोन । तैसे राजपुत्राचे वदन । अंशुमती न्याहाळी ॥७९॥ बत्तिसलक्षणसंयुक्त । आजानुबाहू चापशरमंडित । विशाळ वक्षःस्थळ चालत । करिनायक ज्यापरी ॥८०॥ ऐसा तो गुणाढ्य देखूनि त्वरित । अंशुमती सखयांप्रती सांगत । तुम्ही दुज्या वनाप्रती जाऊनि समस्त । सुमने आणावी सुवासे ॥८१॥ अवश्य म्हणोनि त्या ललना । जात्या झाल्या आणिका वना । अंशुमती एकली जाणा । राजपुत्रा खुणावीत ॥८२॥ भूरुहपल्लव पसरून । एकांती घातलें आसन । वरी वृक्षडाहाळिया भेदून । भूमीवरी पसरल्या ॥८३॥ असो तेथे बैसला येऊन । राजपुत्र सुहास्यवदन । विशाळभाळ आकर्णनयन । आरक्त ओष्ठ सुकुमार ॥८४॥ मंजुळभाषिणी नेत्रकटाक्षबाणी । विंधिली ते लावण्यहरिणी । मनोजमूर्च्छना सांवरूनी । वर्तमान पुसे तयाते ॥८५॥ शृंगारसरोवरा तुजपासी । मी वास करीन राजहंसी । देखतां तव वदन दिव्यशशी । मम मानसचकोर नृत्य करी ॥८६॥ तव मुखाब्ज देखता आनंद । झेपावती मम नेत्रमिलिंद । की तव वचन गर्जता अंबुद । मम चित्तशिखी नृत्य करी ॥८७॥ कविगुरूहुनी तेज विशाळ । आत्मकंठीची काढिली मुक्ताफळमाळ । कंठी सूदली तत्काळ । चरणी भाळ ठेवीत ॥८८॥ म्हणे मी कायावाचामनेंकरून । तुझी ललना झाले पूर्ण । यावरी धर्मगुप्त वचन । काय बोलता जाहला ॥८९॥ मी जनकजननीविरहित । राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत । तव पित्यासी कळता मात । घडे कैसे वरानने ॥९०॥ यावरी म्हणे अंशुमती । तीन दिवसां येईन या स्थळाप्रती । तुम्हीं यावें शीघ्रगती । लग्नसिद्धि साधावया ॥९१॥ ऐसे बोलून ते चातुर्यराशी । वेगे आली पितयापाशीं । झाले वर्तमान सांगे त्यासी । तो परम मानसी संतोषला ॥९२॥ राजपुत्र गेला परतोन । बंधूप्रती सांगे सर्व वर्तमान । शांडिल्यगुरूचे वचन स्मरून । म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा ॥९३॥ गुरुचरणीं ज्याचे मन । त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून । काळमृत्युभयापासून । सर्वदा रक्षी देशिक तो ॥९४॥ यावरी ते दोघे बंधु येऊन । मातेसी सांगती वर्तमान । येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन । फळ देत चालिले ॥९५॥ यावरी तिसरे दिवशी । दोघेही गेले त्या वनासी । गंधर्वराज सहपरिवारेसी । सर्व सामग्री घेऊनि आला ॥९६॥ दृष्टी देखता जामात । गंधर्व आनंदसमुद्री पोहत । छत्र सेना सुखासन त्वरित । धाडूनि उमा आणविली ॥९७॥ यावरी यथासांग लग्न । चारी दिवस पूर्ण । काही एक पदार्थ न्यून । पडिला नाहीं तेधवां ॥९८॥ स्वर्गीच्या दिव्य वस्तु अमोलिक सतेज । विहिणीस देत गंधर्वराज । लक्ष रथ दहा सहस्त्र गज । तेजःपुंज एक लक्ष वाजी ॥९९॥ एक लक्ष दासदासी । अक्षय कोश रत्नराशी । अक्षय भाते देत शक्तीसी । दिव्य चाप बहुसाल ॥१००॥ अपार सेना संगे देत । एक सेनापति गंधर्व बळिवंत । उमा दोघा पुत्रांसववेत । मान देवोनि बोळविली ॥१०१॥ सुखासनारूढ अंशुमती । पतीसवे चालली शीघ्रगती । कनकवेत्रपाणी पुढे धावती । वाहनासवे जियेच्या ॥१०२॥ चतुर्विध वाद्यांचे गजर । चतुरंग चालिला दळभार । येऊनि वेढिले विदर्भनगर । सत्यरथपितयाचें ॥१०३॥ नगरदुर्गावरूनि अपार । उल्हाटयंत्राचा होत भडिगार । परी गंधर्वाचें बळ फार । घेतले नगर क्षणार्धे ॥१०४॥ जेणें पूर्वी पिता मारिला जाण । त्याचें नाम दुर्मर्षण । तो जिताचि धरूनि जाण । आपला करून सोडिला ॥१०५॥ देशोदेशीचे प्रजाजन । धावती करभार घेऊन । उत्तम मुहूर्त पाहून । सिंहासनारूढ जाहला ॥१०६॥ माता उमा बंधू शुचिव्रत । त्यांसमवेत राज्य करीत । दहा सहस्त्र वर्षेपर्यंत । यशवंत राज्य केलें ॥१०७॥ शांडिल्य गुरु आणून । शतपद्म अर्पिले धन । रत्नाभिषेक करून । अलंकार वस्त्रे दीधली ॥१०८॥ दुर्भिक्ष जळशोष अवर्षण । आधि व्याधि वैवध्य मरण । दुःख शोक कलह विघ्न । राज्यातूनि पळाली ॥१०९॥ प्रजा भूदेव दायाद । देती रायासी आशिर्वाद । कोणासही नाही खेद । सदा आनंद घरोघरी ॥११०॥ ऐसा अंशुमतीसमवेत । धर्मगुप्त राज्य करीत । यौवराज्य शुचिव्रताते देत । पारिपत्य सर्व करी ॥१११॥ ऐसे दहा सहस्त्र वर्षे राज्य करून । सुदत्तपुत्रासी राज्य देऊन । चिंतितां मनीं उमाधवचरण । दिव्य विमान धाडिले ॥११२॥ दिव्य देह पावोनि नृपती । माता-बंधुसमवेत अंशुमती । शिवाविमानी बैसती । करीत स्तुति शिवाची ॥११३॥ कैलासपदासी जाऊन । जगदात्मा शिव विलोकून । जयजयकार करून । लोटांगणे घालिती ॥११४॥ दीनबंधु जगन्नाथ । पतित पावन कृपावंत । हृदयीं धरूनि समस्त । अक्षयपदीं स्थापिली ॥११५॥ हें धर्मगुप्ताचे आख्यान । करिती जे श्रवण पठण । लेखन रक्षण अनुमोदन । तरी पंचवदन रक्षी तयां ॥११६॥ सकळ पापांचा होय क्षय । जेथे जाय तेथे विजय । धनधान्यवृद्धि होय । ऋण जाय निरसूनी ॥११७॥ प्रदोषमहिमा अद्भुत । जे आचरती ऐकूनि ग्रंथ । तेथें कैचे दारिद्र मृत्य । सत्य सत्य त्रिवाचा ॥११८॥ ज्याच्या घरीं शिवलीलामृत ग्रंथ । त्याची शिव पाठी राखीत । सदा हिंडे उमाकांत । अंती शिवपद प्राप्त तया ॥११९॥ हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस । पद्मरचनाफळें आली पाडास । कुतर्कवादी जे वायस । मुखरोग त्यांस नावडे ॥१२०॥ जयजय ब्रह्मानंदा विरूपाक्षा । श्रीधरवरदा सर्वसाक्षा । दुष्टकर्ममोचका कर्माध्यक्षा । न येसी लक्षा निगमागमां ॥१२१॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड । पंचमाध्याय गोड हा ॥१२२॥ इति पंचमोऽध्यायः ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु

Sep 13, 2021

संक्षिप्त रुद्राध्याय - श्री शिवलीलामृत


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय

धन्य धन्य तेचि जन । जे शिवभजनी परायण । सदा शिवलीलामृत श्रवण । अर्चन सदा शिवाचे ॥१॥ सूत म्हणे शौनकादिकांप्रति । जे रुद्राक्षधारण भस्म चर्चिती । त्यांच्या पुण्यास नाही मिती । त्रिजगती तेचि धन्य ॥२॥ जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण । त्यासी वंदिती शक्रादि सुरगण । तो शंकरचि त्याचे दर्शन । घेता तरती जीव बहू ॥३॥ अष्टोत्तरशत माळा । सर्वदा असावी गळा । एकमुखी रुद्राक्ष आगळा । पूजिता भाग्य विशेष ॥४॥ पंचमुख षण्मुख अष्टमुख । चतुर्दशमुख लक्ष्मीकारक । सकळ मंत्र सुफळ देख । रुद्राक्षजप नित्य करिता ॥५॥ नित्य रुद्राक्षपूजन । तरी केले जाणिजे शिवार्चन । रुद्राक्षमहिमा परम पावन । इतिहास ऐका येविषयी ॥६॥ काश्मीर देशींचा नृप पावन । नामाभिधान भद्रसेन । विवेकसंपन्न प्रधान । परम चतुर पंडित ॥७॥ असो तो भद्रसेन आणि प्रधान । बहुत करिता अनुष्ठान । दोघांसी झाले नंदन । शिवभक्त उपजतांचि ॥८॥ राजपुत्र नाम सुधर्म । प्रधानात्मज तारक नाम । दोघे शिवभक्त निःसीम । सावधान शिवध्यानी ॥९॥ आवडे सर्वदा एकांत । श्रवण करिती शिवलीलामृत । बोलती शिवनामावळी नित्य । पाहाणे शिवपूजा सर्वदा ॥१०॥ आश्चर्य करिती राव प्रधान । यांस का नावडे वस्त्रभूषण । करिती रुद्राक्षभस्मधारण । सदा स्मरण शिवाचे ॥११॥ विभूति पुसोनि रुद्राक्ष काढिती । मागुती वस्त्रे भूषणे लेवविती । ते सवेचि ब्राह्मणांसी अर्पिती । घेती मागुती शिवदीक्षा ॥१२॥ शिक्षा करिता बहुत । परी ते न सांडिती आपुले व्रत । राव प्रधान चिंताग्रस्त । म्हणती करावे काय आता ॥१३॥ तो उगवला सुकृतमित्र । घरासी आला पराशर । सवे वेष्टित ऋषींचे भार । अपर सूर्य तेजस्वी ॥१४॥ ऐसा महाराजा पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनि ॥१५॥ राव प्रधान सामोरे धावती । साष्टांग नमूनि घरासी आणिती । षोडशोपचारी पूजिती । भाव चित्ती विशेष ॥१६॥ समस्तां वस्त्रे भूषणे देऊन । राव विनवी कर जोडून । म्हणे दोघे कुमर रात्रंदिन । ध्यान करिती शिवाचे ॥१७॥ नावडती वस्त्रे अलंकार । रुद्राक्षभस्मावरी सदा भर । वैराग्यशील अणुमात्र । भाषण न करिती कोणासी ॥१८॥ पुढे हे कैसे राज्य करिती । हे आम्हांसी गूढ पडिले चित्ती । मग ते दोघे कुमर आणोनि गुरूप्रती । दाखविले भद्रसेने ॥१९॥ यावरी बोले शक्तिसुत । म्हणे हे का झाले शिवभक्त । यांची पूर्वकथा समस्त । ऐक तुज सांगतो ॥२०॥ पूर्वी काश्मीर देशात उत्तम । महापट्टण नंद्रिग्राम । तेथील वारांगना मनोरम । महानंदा नाम तियेचे ॥२१॥ त्या ग्रामीचा तोचि भूप । पृथ्वीमाजी निःसीम स्वरूप । ललिताकृति पाहोनि कंदर्प । तन्मय होवोनि नृत्य करी ॥२२॥ जैसा उगवला पूर्णचंद्र । तैसे तिजवरी विराजे छत्र । रत्‍नखचित याने अपार । भाग्या पार नाही तिच्या ॥२३॥ दास दासी अपार । घरी माता सभाग्य सहोदर । जिचे गायन ऐकता किन्नर । तटस्थ होती कोकिळा ॥२४॥ वेश्या असोन पतिव्रता । नेमिला जो पुरुष तत्त्वता । त्याचा दिवस न सरता । इंद्रासही वश्य नव्हे ॥२५॥ परम शिवभक्त विख्यात । दानशील उदार बहुत । सोमवार प्रदोषव्रत । शिवरात्र करी नेमेसी ॥२६॥ अन्नछत्र सदा चालवीत । नित्य लक्षत्रिदळे शिव पूजीत । ब्राह्मणहस्ते अद्भुत । अभिषेक करवी शिवासी ॥२७॥ याचक मनी जे जे इच्छीत । ते ते महानंदा पुरवीत । कोटि लिंगे करवीत । श्रावणमासी अत्यादरे ॥२८॥ ऐक भद्रसेना सावधान । कुक्कुट मर्कट पाळिले प्रीतीकरून । त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोन । नाचू शिकविले कौतुके ॥२९॥ आपुले जे का नृत्यागार । तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर । कुक्कुट मर्कट त्यासमोर । तेथेंचि बांधी प्रीतीने ॥३०॥ करी शिवलीलापुराणश्रवण । तेही ऐकती दोघेजण । सवेंचि महानंदा करी गायन । नृत्य करी शिवापुढे ॥३१॥ महानंदा त्यांसी सोडून । नृत्य करवी कौतुकेकरून । त्यांच्या गळा कपाळी जाण । विभूति चर्ची स्वहस्ते ॥३२॥ एवं तिच्या संगतीकरून । त्यांसही घडतसे शिवभजन । असो तिचे सत्त्व पाहावया लागोन । सदाशिव पातला ॥३३॥ सौदागराचा वेष धरिला । महानंदेच्या सदना आला । त्याचे स्वरूप देखोनि ते अबला । तन्मय झाली तेधवा ॥३४॥ पूजा करोनि स्वहस्तकी । त्यासी बैसविले रत्‍नमंचकी । तो पृथ्वीमोलाचे हस्तकी । कंकण त्याच्या देखिले ॥३५॥ देखता गेली तन्मय होऊन । म्हणे स्वर्गीची वस्तु वाटे पूर्ण । विश्वकर्म्याने निर्मिली जाण । मानवी कर्तृत्व हे नव्हे ॥३६॥ सौदागरे ते काढून । तिच्या हस्तकी घातले कंकण । येरी होवोनि आनंदघन । नेम करी तयासी ॥३७॥ पृथ्वीचे मोल हे कंकण । मीही बत्तीसलक्षणी पद्मिण । तीन दिवस संपूर्ण । दासी तुमची झाले मी ॥३८॥ तयासी ते मानले । सवेंचि त्याने दिव्यलिंग काढिले । सूर्यप्रभेहूनि आगळे । तेज वर्णिले नवजाय ॥३९॥ लिंग देखोनि ते वेळी । महानंदा तन्मय झाली । म्हणे जय जय चंद्रमौळी । म्हणोनी वंदी लिंगाते ॥४०॥ म्हणे या लिंगाच्या प्रभेवरूनी । कोटि कंकणे टाकावी ओवाळूनी । सौदागर म्हणे महानंदेलागूनी । लिंग ठेवी जतन हे ॥४१॥ म्हणे या लिंगापाशी माझा प्राण । भंगले की गेले दग्ध होऊन । तरी मी अग्निप्रवेश करीन । महाकठीण व्रत माझे ॥४२॥ येरीने अवश्य म्हणोन । ठेविले नृत्यागारी नेऊन । मग दोघे करिती शयन । रत्नखचित मंचकी ॥४३॥ तिचे कैसे आहे सत्त्व । धैर्य पाहे सदाशिव । भक्त तारावया अभिनव । कौतुकचरित्र दाखवी ॥४४॥ त्याच्या आज्ञेकरून । नृत्यशाळेस लागला अग्न । जन धावो लागले चहूकडोन । एकचि हांक जाहली ॥४५॥ तीस सावध करी मदनारी । म्हणे अग्नि लागला ऊठ लवकरी । येरी उठली घाबरी । तव वातात्मज चेतला ॥४६॥ तैशामाजी उडी घालून । कंठपाश त्यांचे काढून । कुक्कुट मर्कट दिधले सोडून । गेले पळोन वनाप्रती ॥४७॥ नृत्यशाळा भस्म झाली समग्र । मग शांत झाला सप्तकर । यावरी पुसे सौदागर । महानंदेप्रति तेधवा ॥४८॥ माझे दिव्यलिंग आहे की जतन । महानंदा घाबरी ऐकोन । वक्षःस्थळ घेत बडवून । म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले ॥४९॥ सौदागर बोले वचन । नेमाचा आजि दुसरा दिन । मी आपुला देतो प्राण । लिंगाकारणे तुजवरी ॥५०॥ मग त्रिचरण चेतविला । आकाशपंथे जाती ज्वाळा । सौदागर सिद्ध झाला । समीप आला कुंडाच्या ॥५१॥ अति लाघवी उमारंग । जो भक्तजनभवभंग । उडी घातली सवेग । ॐ नमः शिवाय म्हणवुनी ॥५२॥ ऐसे देखता महानंदा । बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा । लुटविली सर्व संपदा । कोशसमवेत सर्वही ॥५३॥ रुद्राक्ष सर्वांगी लेऊन । ह्रदयी चिंतिले शिवध्यान । हर हर शिव म्हणवून । उडी निःशंक घातली ॥५४॥ सूर्यबिंब निघे उदयाचळी । तैसा प्रगटला कपाळमौळी । दशभुज पंचवदन चंद्रमौळी । संकटी पाळी भक्तांते ॥५५॥ वरचेवरी कंदुक झेलीत । तेवी दहा भुजा पसरोनी अकस्मात । महानंदेसी झेलूनि धरीत । ह्रदयकमळी परमात्मा ॥५६॥ म्हणे जाहलो मी सुप्रसन्न । महानंदे माग वरदान । ती म्हणे हे नगर उद्धरून । विमानी बैसवी दयाळा ॥५७॥ माताबंधूसमवेत । महानंदा विमानी बैसत । दिव्यरूप पावोनि त्वरित । नगरासमवेत चालली ॥५८॥ पावली सकळ शिवपदी । जेथे नाही आधिव्याधी । क्षुधातृषाविरहित त्रिशुद्धी । भेदबुद्धि कैची तेथे ॥५९॥ जेथे वोसणता बोलती शिवदास । ते ते प्राप्त होय तयास । शिवपद सर्वदा अविनाश । महानंदा तेथे पावली ॥६०॥ हे कथा परम सुरस । पराशर सांगे भद्रसेनास । म्हणे हे कुमर दोघे निःशेष । कुक्कुट मर्कट पूर्वींचे ॥६१॥ कंठी रुद्राक्षधारण । भाळी विभूति चर्चून । त्याचि पूर्वपुण्येकरून । सुधर्म तारक उपजले ॥६२॥ हे पुढे राज्य करतील निर्दोष । बत्तीस लक्षणी डोळस । शिवभजनी लाविती बहुतांस । उद्धरतील तुम्हांते ॥६३॥ अमात्यसहित भद्रसेन । गुरूसी घाली लोटांगण । म्हणे इतुकेन मी धन्य । सुपुत्र उदरी जन्मले ॥६४॥ भद्रसेन बोलत पुढती । हे राज्य किती वर्षै करिती । आयुष्यप्रमाण किती । सांगा यथार्थ गुरुवर्या ॥६५॥ ऋषि म्हणे मी सत्य बोलेन देख । परी तुम्हांसी ऐकता वाटेल दुःख । हे सभा सकळिक । दुःखार्णवी पडेल पै ॥६६॥ भद्रसेन म्हणे सत्य वचन । बोलावया न करावा अनमान । तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण । झाली असता जाण पा ॥६७॥ आजपासोनि सातवे दिवशी । मृत्यु पावेल या समयासी । राव ऐकता धरणीसी । मूर्च्छा येऊनि पडियेला ॥६८॥ करूनिया हाहाकार । वक्षःस्थळ पिटी नृपवर । मग रायासी पराशर । सावध करोनि गोष्ट सांगे ॥६९॥ याकरिता भद्रसेन अवधारी । अयुत रुद्रावर्तने करी । शिवावरी अभिषेकधार धरी । मृत्यु दूरी होय साच ॥७०॥ अथवा शत घट स्थापून । दिव्यवृक्षांचे पल्लव आणून । रुद्रे उदक अभिमंत्रून । अभिषिंचन पुत्रा करी ॥७१॥ नित्य दहा सहस्त्र आवर्तने पूर्ण । क्षोणीपाळा करी सप्तदिन । राये धरिले दृढ चरण । सद्‌गद होवोनि बोलत ॥७२॥ सकळ ऋषिरत्नमंडित पदक । स्वामी तू त्यात मुख्य नायक । काळ मृत्यु भय शोक । गुरु रक्षी त्यांपासूनी ॥७३॥ तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण । तुजसवे जे आहेत ब्राह्मण । आणीक सांगसी ते बोलावून । आताचि आणितो आरंभी ॥७४॥ मग सहस्त्र विप्र बोलावून । ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ति पूर्ण । न्यासध्यानयुक्त पढून । गुरूपासून जे आले ॥७५॥ ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण । बैसला व्यासपिता घेऊन । सहस्त्र घट मांडून । अभिमंत्रोनि स्थापिले ॥७६॥ स्वर्धुनीचे सलिल भरले पूर्ण । त्यांत आम्रपल्लव घालून । रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण । अनुष्ठान दिव्य मांडिले ॥७७॥ शास्त्रसंख्या झाले दिवस । सातवे दिवशी माध्याह्नी आला चंडांश । मृत्युसमय येता धरणीस । बाळ मूर्च्छित पडियेला ॥७८॥ एक मुहूर्त निचेष्टित । चलनवलन राहिले समस्त । परम घाबरला नृपनाथ । गुरु देत नाभीकारा ॥७९॥ रुद्रोदक शिंपून । सावध केला राजनंदन । त्यासी पुसती वर्तमान । वर्तले तेचि सांगत ॥८०॥ एक काळपुरुष भयानक थोर । ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर । विक्राळ दाढा भयंकर । नेत्र खदिरांगारासारिखे ॥८१॥ तो मज घेऊनि जात असता । चौघे पुरुष धांवोनि आले तत्त्वता । पंचवदन दशभुज त्यांची साम्यता । कमळभवांडी दुजी नसे ॥८२॥ ते महाराज येऊन । मज सोडविले तोडोनि बंधन । त्या काळपुरुषासी धरून । करीत ताडण गेले ते ॥८३॥ ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर । भद्रसेन करी जयजयकार । ब्राह्मणांसी घाली नमस्कार । आनंदाश्रू नेत्री आले ॥८४॥ अंगी रोमांच दाटले । मग विप्रचरणी गडबडा लोळे । शिवनाम गर्जत तये वेळे । देव सुमने वर्षती ॥८५॥ चंद्रानना धडकती भेरी । नाद न माये नभोदरी । असो भद्रसेन यावरी । विधियुक्त होम करीतसे ॥८६॥ षड्रस अन्ने शोभिवंत । अलंकार दिव्य वस्त्रे देत । अमोलिक वस्तु अद्भुत । आणोनि अर्पी ब्राह्मणांसी ॥८७॥ ब्राह्मण देती मंत्राक्षता । विजय कल्याण हो तुझिया सुता । ऐसा अति आनंद होत असता । तो अद्भुत वर्तले ॥८८॥ की निर्दैवासी सापडे चिंतामणी । की क्षुधितापुढे क्षीराब्धि ये धावूनी । तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणी । नारदमुनी पातला ॥८९॥ तो नारद देखोनि तेचि क्षणी । कुंडांतूनि मूर्तिमंत निघे अग्नी । दक्षिणाग्नि गार्हपत्य आहवनी । उभे ठाकले देखता ॥९०॥ पराशरादि सकळ ब्राह्मण । प्रधानासहित भद्रसेन । धावोनि धरिती चरण । ब्रह्मानंदे उचंबळले ॥९१॥ दिव्य गंध दिव्य सुमनी । षोडशोपचारे पूजिला नारदमुनी । राव उभा ठाके कर जोडोनी । म्हणे स्वामी अतींद्रियद्रष्टा तू ॥९२॥ त्रिभुवनी गमन तुझे सर्व । काही देखिले सांग अपूर्व । नारद म्हणे मार्गी येता शिव । दूत चौघे देखिले ॥९३॥ दशभुज पंचवदन । तिही मृत्यु नेला बांधोन । तुझ्या पुत्राचे चुकविले मरण । रुद्रानुष्ठाने धन्य केले ॥९४॥ तव पुत्ररक्षणार्थ ते वेळा । शिवे वीरभद्र मुख्य पाठविला । मज देखता मृत्यूसी पुसू लागला । शिवसुत ऐका ते ॥९५॥ तो सार्वभौम होईल तत्त्वता । रुद्रमहिमा तुज ठाऊक असता । शिवमर्यादा उल्लंघूनि तत्त्वता । कैसा आणीत होतासी ॥९६॥ मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन । पत्रिका पाहिली वाचून । तव द्वादशवर्षी मृत्युचिन्ह । गंडांतर थोर होते ॥९७॥ ते महत्पुण्ये निरसूनि सहज । दहा सहस्त्र वर्षे करावे राज्य । मग तो सूर्यनंदन महाराज । स्वापराधे कष्टी बहू ॥९८॥ मग उभा ठाकूनि कृतांत । कर जोडोनि स्तवन करीत । हे अपर्णाधव हिमनगजामात । अपराध न कळत घडला हा ॥९९॥ ऐसे नारद सांगता ते क्षणी । राये पायावरी घातली लोळणी । आणीक सहस्त्र रुद्र करूनी । महोत्साह करीतसे ॥१००॥ शतरुद्र करिता निःशेष । शतायुषी होय तो पुरुष । हा अध्याय पढता निर्दोष । तो शिवरूप याचि देही ॥१०१॥ तो येथेचि झाला मुक्त । त्याच्या तीर्थे तरती बहुत । असो यावरी ब्रह्मसुत । अंतर्धान पावला ॥१०२॥ आनंदमय शक्तिनंदन । राये शतपद्म धन देऊन । तोषविला गुरु संपूर्ण । ऋषींसहित जाता झाला ॥१०३॥ हे भद्रसेनआख्यान जे पढती । त्यासी होय आयुष्य संतती । त्यांसी काळ न बाधे अंती । वंदोनि नेती शिवपदा ॥१०४॥ एवं महापापपर्वत तत्त्वता । भस्म होती श्रवण करिता । हा अध्याय त्रिकाळ वाचिता । गंडांतरे दूर होती ॥१०५॥ मग तो राव भद्रसेन । सुधर्म पुत्रासी राज्य देऊन । युवराज्य तारकालागून । देता झाला ते काळी ॥१०६॥ मग प्रधानासमवेत राव जाणा । जाता झाला तपोवना । शिवअनुष्ठान रुद्रध्याना । करिता महारुद्र तोषला ॥१०७॥ शेवटी शिवपदासी पावून । राहिले शिवरूप होऊन । हा अकरावा अध्याय जाण । स्वरूप एकादश रुद्रांचे ॥१०८॥ हा अध्याय करिता श्रवण । एकादश रुद्रा समाधान । की हा कल्पद्रुम संपूर्ण । इच्छिले फळ देणार ॥१०९॥ मृत्युंजयजप रुद्रानुष्ठान । त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न । पिशाचबाधा रोग दारुण । न बाधीच सर्वथाही ॥११०॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अखंड । संक्षिप्त एकादशाध्याय हा ॥१११॥

॥ इति एकादशोऽध्यायः समाप्तः ॥ ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥


Mar 12, 2021

श्री शिवलीलामृत सार


श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नम: शिवाय

स्कन्दपुराणांतील ब्रह्मोत्तर खंडात वर्णन केलेल्या शिवलीलांवर आधारित श्री शिवलीलामृत हा एक दिव्य आणि सिद्ध ग्रंथ आहे. भगवान शिव शंकरांच्या अनेक कथा, शिवभक्तांसाठी विविध व्रत-वैकल्ये, उपासना, स्तोत्र, महादेवांचे जप, तसेच आध्यत्मिक बोध आदिंनी परिपूर्ण असा हा ग्रंथ अतिशय सुगम आणि रसाळ भाषेंत लिहिला आहे. या महान काव्याचे रचनाकार श्रीधर कवींवर विद्यादेवता शारदेचा वरदहस्त आहे, हे सहजच जाणवते. श्री शिवलीलामृताचे एकूण १४ अध्याय आहेत. प्रत्येक अध्याय शिवोपासनेबरोबरच विविध प्रकारच्या भक्तींचीही ओळख करून देतो. प्राचीन काळी नैमिषारण्यातील यज्ञसत्रात शौनकादिकांनी प्रार्थना केली असता, महामुनी सूत त्या सर्वांस शिवमाहात्म्य सांगू लागले. त्या संवादावर आधारित या ग्रंथाची रचना आहे. संक्षिप्त शिवलीलामृत : अध्याय १ : पहिल्या अध्यायात दोन शिवमंत्रांचे माहात्म्य वर्णिले आहे. पहिला पंचाक्षरी - नम: शिवाय आणि दुसरा षडाक्षरी - ॐ नम: शिवाय हे दोन तारक मंत्र आणि त्यांची फलप्राप्ती सांगितली आहे. वेदांतील हे दोन दिव्य मंत्र शिवकृपेबरोबरच इष्ट मनोकामना, निर्गुण भक्ती आणि मुक्तीही सहज प्रदान करतात. मात्र, योग्य सदगुरूंकडून मंत्रदीक्षा घेऊन हा शिवमंत्र सिद्ध करावा, हे ग्रंथकार आवर्जून सांगतात. यासाठी भक्ती, वैराग्य, आणि ज्ञान अशी सद्गुरूंची विविध लक्षणेंही कथन करतात. सर्वज्ञ, दयाळू, आत्मज्ञानी, क्रोधरहित, मितभाषी आणि सर्वदा आपल्या शिष्यांचे हित बघणारे गुरूच आपले सद्गुरू असतात. यानंतर, या दिव्य शिवमंत्रामुळेच दाशार्ह राजाचा कसा उद्धार झाला, ही कथा विस्तारपूर्वक वर्णिली आहे. अध्याय २ : द्वितीय अध्यायात महाशिवरात्री माहात्म्य आणि शिवपूजनातील बिल्वपत्रांचे महत्व सांगितले आहे. यांत एका व्याधाची आणि शिकार करतांना त्याला दिसलेल्या मृग परिवाराची कथा वर्णन केली आहे. महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी केवळ संयोगामुळे शिवभक्त नसलेल्या व्याधास उपवास घडतो, याचबरोबर विनोद म्हणून केलेला ' हर हर ' हा जप आणि शिवलिंगावर नकळत वाहिलेली बिल्वपत्रें यांमुळे तो भोळा सांब त्याचा कसा उद्धार करतो, हे सांगितले आहे. या दिवशी अजाणता शिवस्मरण, उपोषण, जागरण वा बिल्वार्चन घडले तरी महत्पुण्य प्राप्त होते. भावभक्तीबरोबरच कर्तव्यनिष्ठता आणि प्रामाणिकपणा यांचे महत्व अधोरेखित करत हा अध्याय कर्मविपाक सिद्धांत विस्तारपूर्वक वर्णन करतो. अध्याय ३ : तिसऱ्या अध्यायांत मित्रसह उर्फ कल्माषपाद राजाची कथा आहे. त्याला श्री गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचे माहात्म्य विशद करतांना गौतम ऋषींनी एका अत्यंत पापी स्त्रीचा पूर्वजन्म वृत्तांत सांगितला. ती पापिणी गोकर्णक्षेत्रीं आली असता, शिवरात्रीस तिला उपोषण, जागरण, आणि शिवपूजनही घडले. केवळ त्या पुण्यप्रभावाने ती यमलोकी न जाता शिवलोकी गेली. पुढे, गौतम ऋषींच्या मार्गदर्शनानुसार राजा कल्माषपाद गोकर्ण क्षेत्री जाऊन शिवाराधना करतो आणि ब्रह्महत्येच्या महापातकातून मुक्त होतो, हा कथाभाग आहे. अध्याय ४ : चतुर्थ अध्यायात विमर्षण राजा व राणी कुमुद्वती यांची कथा वर्णिली आहे. पूर्वजन्म पशु योनीत मिळूनही महाशिवरात्रीस उपवास आणि शिवालयाला प्रदक्षिणा घडल्यामुळे त्यांना पुढचा जन्म राजघराण्यांत मिळतो. तसेच, त्यांच्या पुढील सहा जन्मांची कथाही आहे. दुसरी कथा उज्जयिनी नगरीतील महाकाळेश्वर ज्योतिर्लिगांची आहे. एका सहा वर्षाच्या गोप बालकाने अत्यंत भक्तिभावाने केवळ दगड आणि मृत्तिकेने केलेली पूजा स्वीकारत महादेव प्रसन्न झाले. त्या प्रभावाने राज्यावर आक्रमण करणाऱ्या शत्रूंची वृत्ती बदलली आणि शिवभक्त उज्जयिनी नरेश, चंद्रसेनाचा दिव्य मणी व राज्य सुरक्षित राहिले. त्यावेळी, प्रत्यक्ष हनुमंताने प्रगट होऊन त्या गोपपुत्राचे नाव श्रीकर ठेवले. तोच पुढील जन्मी गोकुळांत नंदराजा म्हणून जन्मला. ईश्वर केवळ भावाचा भुकेला आहे, हेच ही कथा अधोरेखित करते. अध्याय ५ : पाचव्या अध्यायात प्रदोषव्रताचे माहात्म्य सांगितले आहे. शाल्व देशाच्या राजाने विदर्भ नगरीचा राजा सत्यरथ याचा रणांत पराभव करून वध केला. सत्यरथाची गरोदर राणी अरण्यांत पळून गेली. तिथे तिने एका पुत्रास जन्म दिला, परंतु दुर्दैवाने एका मगरीने तिला भक्षण केले. उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीने त्या राजपुत्राचा आपल्या मुलाबरोबर सांभाळ केला. पुढे, शांडिल्य ऋषींनी त्या दोन्ही मुलांना शिवमंत्राचा उपदेश केला आणि प्रदोष व्रत आचरण्यास सांगितले. त्या व्रतप्रभावाने, ब्राह्मणपुत्राचे दारिद्र्य दूर झाले आणि राजपुत्रास राज्य परत मिळाले, हा कथाभाग आला आहे. अध्याय ६ : सहाव्या अध्यायात सोमवार व्रत माहात्म्य सांगितले आहे. चित्रवर्मा राजाची कन्या सीमंतिनीची कथा यांत वर्णिली आहे. याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिच्या सांगण्यानुसार, आपला वैधव्यदोष दूर होण्यासाठी सीमंतिनी मोठ्या श्रद्धेने सोमवारचे शिवव्रत करू लागली. अनेक संकटे आल्यावरदेखील तिने आपले शिवव्रत सुरूच ठेवले आणि शिवकृपेमुळे तिचे सर्वतोपरी कल्याण झाले, याचे यांत वर्णन आहे. कठीण परिस्थितीतदेखील ठेवलेली परमेश्वरावरील दृढ श्रद्धा काय फळ देते, हेच इथे विस्तृतपणें सांगितले आहे. अध्याय ७ : सातव्या अध्यायांत शिवव्रतदिनीं राणी सीमंतिनी करीत असलेल्या दाम्पत्यपूजनाची कथा आहे. केवळ द्रव्याभिलाषेने दोन ब्राह्मणपुत्रांपैकी एक जण स्त्रीवेष धारण करतो आणि दाम्पत्य म्हणून ते राणी सीमंतिनीकडे येतात. तीही ते दोघे पुरुषच आहेत हे ओळखते, पण तरीही शिवपार्वती समजून त्यांचे भक्तिपूर्वक पूजन करते. तसेच, भोजन, वस्त्रालंकार आणि भरपूर दक्षिणाही देते. परिणामस्वरूप स्त्रीवेष धारण केलेला ब्राह्मणपुत्र खरोखरच स्त्री होतो. पूर्व पुरुषरूप प्राप्तीसाठी देवीची उपासना करूनही, सीमंतिनीच्या दृढ भक्तीमुळे तो ब्राह्मणपुत्र स्त्रीच राहणार, असे अदिशक्ती सांगते. तर दुसऱ्या कथेत मदन ब्राह्मण आणि पिंगला वैश्या या दोघांनी ऋषभ योगींची सेवा केल्याने त्यांना पुढील जन्म कसा राजघराण्यांत मिळतो, तसेच भस्म माहात्म्य यांचे वर्णन केले आहे. अध्याय ८ : आठव्या अध्यायांत भद्रायु नामक राजपुत्र ( पूर्वजन्मीचा मदन ब्राह्मण ) आणि कीर्तिमालिनी ( पूर्वजन्मीची पिंगला वैश्या ) यांची कथा सविस्तर वर्णिली आहे. शिव-पार्वती त्यांची परीक्षा घेऊन त्यांच्या शिवार्चन आणि भक्तीमुळे प्रसन्न होतात, तसेच त्यांना शिवलोकांत अक्षयपद असा आशीर्वाद देतात, हा कथाभाग आहे. अध्याय ९ : नवव्या अध्यायांत वामदेव नामक महाज्ञानी मुनी एका ब्रह्मराक्षसाला शिवप्रणीत भस्म-माहात्म्य सांगतात. एका पापी ब्राह्मणाच्या प्रेताला केवळ भस्म स्पर्श झाल्याने तो यमलोकीं न जाता त्याला कैलासलोकी कशी गती मिळाली, हे कथन केले आहे. तर पुढील कथा चिताभस्माने शिवलिंगाची नित्य पूजा करणाऱ्या एका भिल्ल भक्ताची आहे. एके दिवशी, त्याला चिताभस्म मिळाले नाही. तेव्हा, पतीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून त्याची पत्नी स्वतःला जाळून घेते, त्या भस्माने तो भक्तिभावाने शिवार्चन करतो. मात्र, महादेवांच्या कृपेने तीच पत्नी नैवेद्य घेऊन येते. अशा रीतीने ते पती-पत्नी शिवरूप होतात आणि शिवलोकी जातात. अध्याय १० : दहाव्या अध्यायांत नैधृव नामक अंध ऋषी गतधवा शारदेला सौभाग्य आणि पुत्र प्राप्तीचा वर देतात. सत्य परिस्थिती समजताच, आपले वचन खरे करण्यासाठी नैधृव ऋषी शारदेला ' ॐ नम: शिवाय ' या मंत्राचा जप करण्यास सांगतात. तसेच, तिच्याकडून उमामहेश्वर व्रतही करवून घेतात. त्या व्रतप्रभावाने भवानी देवी प्रसन्न होऊन दर्शन देते आणि नैधृव ऋषींची प्रार्थना खरी करण्यासाठी सौभाग्य, पुत्रप्राप्तीचा शारदेला आशीर्वाद देते, हा कथाभाग आहे. अध्याय ११ : अकरावा अध्याय रुद्राध्याय आहे. नंदिग्रामातील महानंदा नामक शिवोपासना करणाऱ्या वैश्येची कथा यांत सांगितली आहे. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी तिला आपल्या चरणीं अक्षय स्थान दिलेच, पण तिने पाळलेल्या कोंबडा व माकड यांनादेखील भस्मधारण व शिवपुराण श्रवणाच्या प्रभावाने काश्मीर नगरीचा राजपुत्र आणि प्रधानपुत्र असा उत्तम जन्म मिळाला. याच राजपुत्र सुधर्माचे मृत्यू गंडांतर टाळण्यासाठी पराशर ऋषींनी रुद्राध्यायाची पारायणे केली. सातव्या दिवशी मृत्युघटका येताच सुधर्म शुद्ध हरपून खाली पडला, तेव्हा पराशर ऋषींनी रुद्रोदक शिंपडून राजपुत्राचा अकालमृत्यू हरून आयुष्यवर्धन केले, याचे सविस्तर वर्णन आहे. अध्याय १२ : बाराव्या अध्यायात विदुर आणि बहुला या वेदधर्मविवर्जित, अत्यंत अनाचारी अशा ब्राह्मण दाम्पत्याची कथा आहे. गोकर्ण क्षेत्रीं पुराण श्रवण केल्यावर बहुलेस आपल्या दुर्वर्तनाचा पश्चात्ताप होतो आणि ती शिवभक्तीत रंगून जाते. पुराणिक बुवांनी दिलेल्या ' ॐ नम: शिवाय ' या दिव्य मंत्राचा जप करून ती उमा-महेश्वरांस अनन्यभावानें शरण जाते आणि स्वतःसह पतीचाही उद्धार करते, हे विस्तृतपणें वर्णिले आहे. तसेच, भस्मासुराची उत्पत्ती, श्री शंकरांचे त्यास वरदान आणि तो उन्मत्त झाल्यावर श्रीहरी विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून केलेला त्याचा वध हे आख्यानही सविस्तर कथिले आहे. अध्याय १३ : तेराव्या अध्यायात दक्ष राजाने आयोजित केलेल्या महायज्ञात भवानी मातेचे आत्मसमर्पण आणि त्यानंतर आदिशक्तीने हिमालयाच्या पोटी पार्वती या नावाने जन्म घेतला, हा कथाभाग आहे. उमा पार्वती शंकराच्या प्राप्तीसाठी कडक तपश्चर्या करू लागली. इकडे, श्री शंकरांनी वीरभद्रासह चढाई करून तारकासुराचे पुत्र तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन यांचा संहार केला. ' तारकासुराचा वध शिवसुताकडून होणार आहे.' ही भविष्यवाणी लक्षात घेऊन सर्व सुरगण शिव-पार्वतीच्या विवाहासाठी प्रयत्न करू लागले. यथावकाश, त्यांचा विवाह होऊन कार्तिकेयाचा जन्म झाला आणि त्याने पुढे तारकासुराचा वध केला, ही कथा सविस्तर सांगितली आहे. अध्याय १४ : चौदाव्या अध्यायात एकदा पार्वतीबरोबर सारीपाटाच्या खेळांत शिव हरले आणि रागावून हिमालयांत एकांतात राहू लागले. तेव्हा, पार्वतीने भिल्लीणीचा वेष धारण करून त्यांची समजूत काढली याचे वर्णन आहे. तसेच, नारद मुनींकडून धर्मपरायण आणि उदार श्रियाळ राजाची स्तुती ऐकून महादेव त्याची परीक्षा घेतात. अतिथीरूपांत आलेल्या शंकरांची विचित्र मागणी राजा श्रियाळ आणि राणी चांगुणा पुरवतात. तेव्हा प्रसन्न होऊन शिव त्या सर्वांस दर्शन देतात, तसेच बाळ चिलयास शुभाशिर्वाद देऊन राजा राणीस दिव्य विमानातून शिवलोकी नेतात, ही कथा आहे. शके सोळाशे चाळीस । विलंबीनाम संवत्सरास । शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास । रविवारी ग्रंथ संपविला ॥ब्रह्मकमंडलूच्या तीरी । द्वादशमती नाम नगरी । आद्यंत ग्रंथ निर्धारी । तेथेचि झाला जाणिजे ॥ शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत । चतुर्दश अध्यायापर्यंत । जय जय शंकर उमानाथ । तुजप्रीत्यर्थ हो का सदा ॥ असे निरूपण करून श्रीधर कवी शिवलीलामृत ग्रंथ संपूर्ण झाला, असे सांगतात. या काव्यांतील अध्यायांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अध्यायाचा प्रारंभ ईश्वर प्रार्थनेने होतो. ईश्वराच्या नामस्मरणांत किती सामर्थ्य असते, हे प्रचिती आल्याशिवाय कळत नाही. अर्थात परमेश्वर, सद्‌गुरु यांचा कृपाशिर्वाद असल्याखेरीज प्रासादिक ग्रंथ निर्मिती होऊ शकत नाही, हे ही खरेच ! श्रीधर कवींचे प्रतिभाचातुर्य असे की प्रत्येक अध्यायांतील प्रारंभीच्या या काही ओव्या एकत्र केल्या तर संपूर्ण शिवलीलामृताचे सार तयार होते. काही कारणांमुळे भक्त जर पूर्ण ग्रंथ वाचन करू शकत नसतील, तर श्रद्धापूर्वक या ४२ ओव्या वाचल्या तरी संपूर्ण शिवलीलामृत वाचनाचे/पारायणाचे फळ मिळते.

ब्रह्मानंद म्हणे श्रीधर । ह्या बेचाळीस ओव्या समग्र । शिवलीलामृताचे होय सार । श्रोती निरंतर परिसाव्या ॥ सकळ शिवलीलामृताचे । आणि ह्या बेचाळीस ओव्यांचे । श्रवण पठण केल्याचे । फळ असे समान ॥ नित्य समस्त नोहे पठण । तरी बेचाळीस ओव्या संपूर्ण । वाचिता शुद्धभावे करून । मनोरथ पूर्ण होतील ॥ अशी ग्वाहीही ग्रंथकार देतात. नित्य पाठाच्या बेचाळीस ओव्या :

ॐ नमोजी अपरिमिता । आदि अनादि मायातीता । पूर्णब्रह्मानंदा शाश्वता । हेरंबताता जगद्गुरु ॥१॥ ज्योतिर्मयस्वरुपा पुराणपुरुषा । अनादिसिद्धा आनंदवनविलासा । मायाचक्रचाळका अविनाशा । अनंतवेषा जगत्पते ॥२॥ जय जय विरुपाक्षा पंचवदना । कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या । मनोजदमना मनमोहना । कर्ममोचका विश्वम्भरा ॥३॥ जेथे सर्वदा शिवस्मरण । तेथें भुक्ति मुक्ति आनंद कल्याण । नाना संकटें विघ्नें दारुण । न बाधती कालत्रयीं ॥४॥ संकेतें अथवा हास्येंकरुन । भलत्या मिषें घडो शिवस्मरण । न कळतां परिस लोहालागुन । झगटतां सुवर्ण करीतसे ॥५॥ न कळत प्राशितां अमृत । अमर काया होय यथार्थ । औषध नेणतां भक्षीत । परी रोग हरे तत्काळ ॥६॥ जय जय मंगलधामा । निजजनतारका आत्मारामा । चराचरफलांकित कल्पद्रुमा । नामा अनामा अतीता ॥७॥ हिमाचलसुतामनरंजना । स्कंदजनका शफरीध्वजदहना । ब्रह्मानंदा भाललोचना । भवभंजना महेश्वरा ॥८॥ हे शिवा वामदेवा अघोरा । तत्पुरुषा ईशाना ईश्वरा । अर्धनारीनटेश्वरा । गिरिजारंगा गिरीशा ॥९॥ धराधरेंद्र मानससरोवरीं । तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारीं । तव अपार गुणांसी परोपरी । सर्वदा वर्णिती आम्नाय ॥१०॥ न कळे तुझें आदिमध्यावसान । आपणचि सर्व कर्ता कारण । कोठें प्रकटसी याचें अनुमान । ठायीं न पडे ब्रह्मांदिका ॥११॥ जाणोनि भक्तांचे मानस । तेथेंचि प्रकटसी जगन्निवास । सर्वकाळ भक्तकार्यास । स्वांगे उडी घालिसी ॥१२॥ ' सदाशिव ' ही अक्षरें चारी । सदा उच्चारी ज्याची वैखरी । तो परमपावन संसारी । होऊनि तारी इतरांतें ॥१३॥ बहुत शास्त्रवक्ते नर । प्रायश्चित्तांचे करितां विचार । परी शिवनाम एक पवित्र । सर्व प्रायश्चित्तां आगळें ॥१४॥ नामाचा महिमा अद्भुत । त्यावरी प्रदोषव्रत आचरत । त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत । सत्य सत्य त्रिवाचा ॥१५॥ जय जयाजी पंचवदना । महापापद्रुमनिकृंतना । मदमत्सरकाननदहना । निरंजना भवहारका ॥१६॥ हिमाद्रिजामाता गंगाधरा । सुहास्यवदना कर्पूरगौरा । पद्मनाभमनरंजना त्रिनेत्रा । त्रिदोषशमना त्रिभुवनेशा ॥१७॥ नीलग्रीवा अहिभूषणा । नंदिवहना अंधकमर्दना । दक्षप्रजापतिमखभंजना । दानवदमना दयानिधे ॥१८॥ जयजय किशोरचंद्रशेखरा । उर्वीधरेंद्रनंदिनीवरा । त्रिपुरमर्दना कैलासविहारा । तुझ्या लीला विचित्र ॥१९॥ कोटिभानुतेजा अपरिमिता । विश्वव्यापका विश्वनाथा । समाधिप्रिया भूतादिनाथा । मूर्तामूर्ता त्रयीमूर्ते ॥२०॥ परमानंदा परमपवित्रा । परात्परा पंचदशनेत्रा । पशुपते पयःफेनगात्रा । परममंगला परब्रह्मा ॥२१जयजय श्रीब्रह्मानंदमूर्ती । तू वंद्य भोळा चक्रवर्ती । शिवयोगीरुपें भद्रायूप्रती । अगाध नीती कथिलीस ॥२२जयजय भस्मोद्धूलितांगा । योगिध्येया भक्तभवभंगा । सकलजनआराध्यलिंगा । नेईं वेगीं तुजपासीं ॥२३जेथें नाही शिवाचें नाम । तो धिक् ग्राम धिक् आश्रम । धिक् गृह पुर उत्तम । आणि दानधर्मा धिक्कार ॥२४जेथें शिवनामाचा उच्चार । तेथें कैंचा जन्ममृत्युसंसार । ज्यांसी शिवशिव छंद निरंतर । त्यांहीं जिंकिलें कळिकाळा ॥२५ जयाची शिवनामीं भक्ती । तयाचीं पापें सर्व जळती । आणि चुके पुनरावृत्ती । तो केवळ शिवरुप ॥२६जैसें प्राणियांचे चित्त । विषयीं गुंते अहोरात । तैसें शिवनामीं जरी लागत । तरी मग बंधन कैचें ॥२७कामगजविदारक पंचानना । क्रोधजलदप्रभंजना । लोभांधकारचंडकिरणा । धर्मवर्धना दशभुजा ॥२८मत्सरविपिनकृशाना । दंभनगभेदका सहस्रनयना । लोभमहासागरशोषणा । अगस्त्यमहामुनिवर्या ॥२९आनंदकैलासविहारा । निगमागमवंद्या दीनोद्धारा । रुंडमालांकितशरीरा । ब्रह्मानंदा दयानिधे ॥३०धन्य धन्य तेचि जन । जे शिवभजनीं परायण । सदा शिवलीलामृत पठण । किंवा श्रवण करिती पैं ॥३१सूत सांगे शौनकादिकांप्रती । जे भस्म रुद्राक्ष धारण करिती । त्यांच्या पुण्यासी नाहीं गणती । त्रिजगतीं धन्य ते ॥३२ जे करिती रुद्राक्षधारण । त्यांसी वंदिती शक्र द्रुहिण । केवळ तयांचे घेतां दर्शन । तरती जन तत्काळ ॥३३ब्राह्मणादि चारी वर्ण । ब्रह्मचर्यादि आश्रमीं संपूर्ण । स्त्री बाल वृद्ध आणि तरुण । यांहीं शिवकीर्तन करावें ॥३४शिवकीर्तन नावडे अणुमात्र । ते अत्यंत जाणूनि अपवित्र । लेइले नाना वस्त्रालंकार । तरी केवळ प्रेतचि ॥३५जरी भक्षिती मिष्टान्न । तरी ते केवळ पशुसमान । मयूरांगींचे व्यर्थ नयन । तैसे नेत्र तयांचे ॥३६शिव शिव म्हणतां वाचें । मूळ न राहे पापाचें । ऐसें माहात्म्य शंकराचें । निगमागम वर्णिती ॥३७जो जगदात्मा सदाशिव । ज्यासी वंदिती कमलोद्भव । गजास्य इंद्र माधव । आणि नारदादि योगींद्र ॥३८जो जगद्गुरु ब्रह्मानंद । अपर्णाह्रदयाब्जमिलिंद । शुद्ध चैतन्य जगदादिकंद । विश्वम्भर दयाब्धी ॥३९जो पंचमुख पंचदशनयन । भार्गववरद भक्तजीवन । अघोर भस्मासुरमर्दन । भेदातीत भूतपती ॥४०तो तूं स्वजनभद्रकारका । संकटीं रक्षिसी भोळे भाविकां । ऐसी कीर्ति अलोलिका । गाजतसे ब्रह्मांडीं ॥४१म्हणोनि भावें तुजलागून । शरण रिघालों असें मी दीन । तरी या संकटांतून । काढूनि पूर्ण संरक्षीं ॥४२

॥ नित्य पाठाच्या बेचाळीस ओव्या समाप्त ॥
ॐ नम: शिवाय श्री पार्वतीपरमेश्वरार्पणमस्तु