Showing posts with label श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत. Show all posts
Showing posts with label श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत. Show all posts

Aug 27, 2025

श्रीसमर्थ रामदासस्वामीकृत श्रीगणेश स्तवन - श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कथन


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये

सर्व दत्तभक्तांना श्री गणेश चतुर्थी आणि 'श्रीदत्तप्रभूंचे संपूर्ण योगावतार' या नांवाने जगतविख्यात असलेले, श्री भगवान दत्तात्रेयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा !!



मयूरेशा, लंबोदरा खळखळू दे मांगल्य झरा
हरी अवकृपा तिमिरा  बा, गजानना, हेरंबा वक्रतुंडा जगन्नायका


श्रीसमर्थ रामदासस्वामीकृत श्रीगणेश स्तवन :

ॐ नमोजी गणनायका । सर्व सिद्धि फळदायका । अज्ञानभ्रांति छेदका । बोधरूपा ॥१॥ वंदूनिया मंगळनिधी । कार्य करितां सर्व सिद्धि आघात अडथळे उपाधी । बाधूं शकेना ॥२॥ ऐसा सर्वांगे सुंदरू । सकळ विद्यांचा आगरू । त्यासी माझा नमस्कारू । साष्टांग भावें ॥३॥ ध्यान गणेशाचे वर्णितां । मति प्रकाश होये भ्रांता । गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ॥४॥ जयासी ब्रह्मादिक वंदिती । तेथे मानव बापूडे किती । असो प्राणी मंदमती । तेहीं गणेश चिंतावा ॥५॥


श्रीपाद श्रीवल्लभ अवतार कथन

श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरित्रग्रंथ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ! या अक्षरसत्य ग्रंथामध्ये श्रीपाद स्वामींच्या जन्माचे विस्तृतपणें वर्णन केले आहे.

आंध्र प्रदेशात मल्याद्रीपूर नामक एक गाव होते. तेच मल्याद्रीपुर सध्या मल्लादि या नावाने ओळखले जाते. त्या ग्रामांत मल्लादि नावाची दोन वेदशास्त्रपारंगत घराणी होती. मल्लादि बापन्नावधानि या नांवाचे विद्यावंत हरितस गोत्रीय तर मल्लादि श्रीधरअवधानी या नांवाचे विद्वान कौशिक गोत्रीय होते. श्रीधरअवधानी यांची बहिण राजमांबा हिचा विवाह बापन्नावधानी यांच्या बरोबर झाला होता. गोदावरी तटांवर असलेल्या आइनविल्लि या गांवात गणपती महायाग संपन्न होणार होता. त्या यज्ञासाठी हे दोन्ही प्राज्ञ पंडित तिथे गेले होते. यज्ञ सर्वथा शास्त्रोक्त विधींनुसार पार पडल्यास, शेवटची आहुती यज्ञवेदींत अर्पण करतेवेळीं प्रत्यक्ष महागणपती स्वर्णकांतीयुक्त स्वरूपांत दर्शन देईल आणि आहुती स्वीकारेल, अशी ग्वाही वेदोक्त मंत्र पठण करणाऱ्या ब्राह्मणांनी दिली होती. त्या विधीवत संपन्न झालेल्या यज्ञाची सांगता सुफळ झाली देखील - वेदमंत्र उच्चारून यज्ञपूर्ततेची आहुती देताच त्या यज्ञकुंडातून सुवर्णकांतीयुक्त, दैदीप्यमान श्रीगणेश प्रगट झाले आणि आपल्या सोंडेत त्यांनी ती आहुती स्वीकारली. श्री गणेश महायाग यथासांग पार पडल्याचे ते फलित पाहून सर्वच तुष्ट झाले. तिथे उपस्थित असलेल्या सर्व भाविकांनी हर्षित होऊन गजाननास नमस्कार केला. प्रसन्न होऊन श्री महागणपती वरदान देत म्हणाले, " मी स्वतः गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण कलेने श्रीपाद श्रीवल्लभ रुपाने अवतार घेईन." गणेशाचे आशीर्वचन ऐकून सर्वांनी त्यांचा जयजयकार केला, मात्र त्या सभेतील तीन नास्तिकांचा त्यावर विश्वास बसला नाही. ते शंकित स्वरांत म्हणाले, " हे दृश्य नक्कीच इंद्रजाल अथवा महेंद्रजाल असावे. हे प्रत्यक्ष महागणपती असतील तर त्यांनी परत एकदा दर्शन द्यावे. " त्या नास्तिकांचे हे वक्तव्य ऐकताच होमकुंडातील विभूती महागणपतीच्या स्वरुपात दृश्यमान झाली आणि आपल्या दिव्य वाणींत बोलू लागली, " मीच परब्रह्म आहे. मीच या सकल ब्रह्माण्डाचा स्वामी असून ईश-पार्वतीनंदन म्हणून या जगतांत प्रसिद्ध आहे. त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी श्रीशंकरांनी, शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास अटकाव करतेवेळी श्री विष्णूंनी, महिषासुराशी युद्ध करण्यापूर्वी श्री आदिमाया जगदंबेनी तसेच सकल देवता, योगी, तपस्वी आणि ऋषी- मुनी यांनीही माझेच स्मरण आणि आराधना करून अभीष्ट प्राप्त केले. ब्रह्मा आणि रुद्र श्री विष्णुरूपात विलीन झाले, तेच त्रैमूर्ति दत्तात्रेय आहेत. शास्त्रांच्या वचनांनुसार मीच दत्तरूप आहे. तेच महागणपतीरूपी श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपांत गणेशचतुर्थीच्या दिवशी अवतार घेतील. माझ्या आजच्या दर्शनाप्रमाणेच दिव्य ज्योतीच्या स्वरूपांत ते प्रगट होतील." 

मल्लादि बापन्नावधानि यांच्या राजयोगावर जन्मलेल्या कन्येच्या जन्मपत्रिकेत सर्वच ग्रह शुभस्थानीं होते. त्यांनी तिचे सुमती महाराणी असे नामकरण केले. तिचा विवाह अप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा नामक भारद्वाज गोत्रीय विप्राशी झाला होता. आपळराज आणि सुमती यांच्या पूर्वजन्मीच्या दत्तभक्तीचे, पुण्यकर्मांचे फलित म्हणूनच त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांचे माता-पिता होण्याचे सद्भाग्य लाभले होते. त्या सत्शील दाम्पत्याचा पूर्वजन्म वृत्तांत थोडक्यात असा - पूर्वयुगीं सह्य पर्वताजवळील माहूर गांवी विष्णुदत्त नामक कर्मनिष्ठ ब्राह्मण रहात होता. तो श्री दत्तप्रभूंचा भक्त होता. त्याची पत्नी सोमदेवम्मा ( श्री दत्तमाहात्म्यात हिचे नाव सुशीला असे आले आहे.) थोर पतिव्रता होती. साक्षात श्री दत्तात्रेय त्या ब्राह्मणाच्या गृही दर्श श्राद्धदिनीं भोजन करण्यासाठी आले होते. त्या पंक्तीला श्री सूर्यनारायण आणि अग्निदेवही यांनीही भोजन स्वीकारले होते. त्यावेळीं, या तीनही देवतांचे उत्तमोत्तम आशीर्वाद त्या धर्मपरायण ब्राह्मण पती-पत्नीस मिळाले होते आणि त्यांच्या पितरांनाही सद्‌गती प्राप्त झाली होती. पुढें, याच पती-पत्नींनी पीठापुरी आपळराज आणि सुमती म्हणून पुन्हा जन्म घेतला होता. सुमतीचे अहोभाग्य असे की या जन्मींदेखील सुमतीला पुनःश्च श्री दत्तप्रभूंचे दर्शन घडले होते आणि भक्तकामकल्पद्रुम श्री दत्तात्रेय, आपळराज-सुमती यांचा पुत्र म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेते झाले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थी रोजी सूर्योदयाच्या वेळी झाला. या अवताराचे वेगळेपण अथवा असाधारणत्व असे की श्रीपादांचा जन्म मातेच्या उदरातून सामान्य मुलासारखा न होता, दिव्य ज्योतीरूपाने झाला. त्यावेळी प्रसूतिगृहात मंगल वाद्ये वाजू लागली. पवित्र अशा वेदमंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला. त्यांच्या जन्मानंतर सतत नऊ दिवस, तीन फणा असलेला नाग त्यांच्या मस्तकी छत्र धरीत असे. भक्तजनरक्षणार्थ श्रीगुरुनाथ या भूतलावर अवतरला होता.


॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


अवश्य वाचा :

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - श्रीपादावतारकथन


Oct 8, 2020

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत - अध्याय - १


श्री  व्याघ्रेश्वर  शर्माचा  वृतांत

॥ श्री गणेशाय नम: ॥  ॐ दत्तात्रेयाय नमः ॥ श्री  गुरुवे  नम:  ॥ 

॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

श्री  महागणपती,  श्री  महासरस्वती,  श्रीकृष्ण  भगवान,  सर्व  चराचरवासी  देवी-देवता  आणि  सकल  गुरु  परंपरेच्या  चरणी  नतमस्तक  होऊन,  मी  त्या  अनंत  कोटी  ब्रह्मांड  नायक  श्री  दत्तप्रभुंच्या,  कलियुगातील,  श्रीपाद  श्रीवल्लभ  स्वामींच्या  अवतार  लीलांचे  वर्णन  करण्याचा  संकल्प  केला  आहे.

अनसूया-अत्रिनंदन  भगवान  श्री  दत्तात्रेय  यांनी  आंध्र  प्रदेशातील  पीठिकापुरम्  या  गावी  श्रीपाद  श्रीवल्लभ  या  नावाने  अवतार  घेतला.  त्यांच्या  दिव्य  चरित्राचे  वर्णन  यथायोग्य  करणे  अनेक  पंडितांना,  विद्वानांनासुद्धा जमले  नाही.  ते  करण्याचे  मी  धाडस  करीत  आहे,  ते  केवळ  आपणासारख्या  थोर,  विद्वान  श्रोत्यांच्या  आशिर्वादामुळेच.

मी  शंकरभट्ट,  देशस्थ  कर्नाटकी  स्मार्त  ब्राह्मण.  माझा  जन्म  भारद्वाज  गोत्रात  झाला.  मी  श्रीकृष्ण  दर्शनासाठी  ''उडपी''  तीर्थस्थानी  गेलो  असताना  तेथील  नयन  मनोहारी,  मोरमुकुटधारी  कृष्णाने  मला  मंत्रमुग्ध  केले.  त्याने  मला  कन्याकुमारीस  जाऊन  कन्यका  परमेश्वरीचे  दर्शन  घेण्याची  आज्ञा  केली.  त्याप्रमाणे  मी  कन्याकुमारीस  जाऊन  त्रिवेणी  सागरात  स्नान  करून  श्रीकन्यका  देवीचे  दर्शन  घेतले.  मंदिरातील  पुजारी  मोठ्या  भक्तीभावाने  देवीची  पूजा  करीत  होता.  मी  आणलेले  लाल  फूल  त्याने  मोठ्या श्रद्धेने  देवीस  अर्पण  केले.  देवी  अंबा  माझ्याकडे  मोठ्या स्नेहपूर्ण  नजरेने  पहात  असल्याचे  जाणवले.  ती  म्हणत  होती  '' शंकरा,  तुझ्या  अंतरंगातील  भक्तीभावावर  मी  प्रसन्न  झाले  आहे.  तू  कुरवपूर  क्षेत्रास  जा  आणि  श्रीपाद  श्रीवल्लभ  स्वामींच्या  दर्शनाने  आपल्या  जीवनाचे  सार्थक  कर.  त्यांच्या  दर्शनाने  मनाला,  अंतर  आत्म्याला  जो  आनंदाचा  अनुभव  येतो,  तो  अवर्णनीय  असतो.''  अंबामातेचा  आशिर्वाद  घेऊन  मी  प्रवास  आरंभ  केला  आणि  थोडया  अंतरावर  असलेल्या  ''मरुत्वमलै''  या  गावी  येऊन  पोहोंचलो.  लंकेतील  राम-रावण  संग्रामात  लक्ष्मणास  इंद्रजीताची  शक्ति  लागून  तो  अचेतन  अवस्थेत  असताना,  श्री  हनुमंताने  संजीवनी  बुटीसाठी  द्रोणागिरी  पर्वत  उचलून  आणला  होता.  लक्ष्मण  संजीवनी  बुटीने  सजीव  झाल्यावर  हनुमंत  तो  पर्वत  स्वस्थानी  घेऊन  जात  असताना  त्याचा  एक  मोठा   तुकडा  येथे  पडला.  त्याचेच  नाव  ''मरुत्वमलै''  असे  पडले.  हे  स्थान  अत्यंत  रम्य  आहे.  येथे  अनेक  गुहा  असून  त्यात  सिद्ध  पुरुष  गुप्तरुपाने  तप:श्चर्या  करीत  असतात.  मी  साऱ्या  गुहेचे  दर्शन  घेण्यास  आरंभ  केला.  एका  गुहेच्या  आत  गेलो  तेव्हा  आत  एक  वाघ  शांत  बसलेला  दिसला.  त्याला  पहाताच  माझ्या  अंगात  कापरे  भरले  आणि  घाबरुन  मी  एकदम  '' श्रीपाद  !  श्रीवल्लभा  !'' असे जोराने  ओरडलो.  त्या  निर्जन  अरण्यात  माझ्या  आरोळीचा  प्रतिध्वनी  तितक्याच  मोठ्या   आवाजात  ऐकू  आला.  त्या  आवाजाने  त्या  गुहेतून  एक  वृद्ध तपस्वी  बाहेर  आले  आणि  म्हणाले  '' बाबारे,  तू  धन्य  आहेस.  या  अरण्यात  श्रीपाद  श्रीवल्लभ  या  नावाचा  प्रतिध्वनी  आला.  श्री  दत्तप्रभूंनी  कलीयुगात  श्रीपाद  श्रीवल्लभ  या  नांवाने  अवतार  घेतल्याचे  योगी,  ज्ञानी,  परमहंस  लोकांनाच  माहीत  आहे.  तू  भाग्यवान  असल्याने  या  पुण्यस्थळी  आलास.  तुझ्या  सर्व  कामना  पूर्ण  होतील.  तुला  श्रीपाद  श्रीवल्लभांच्या  दर्शनाचा  लाभ  होईल.  ह्या  गुहेच्या  दाराजवळ  बसलेला  वाघ  एक  ज्ञानी  महात्मा  आहे.  त्याला  नमस्कार  कर.''  मी  अत्यंत  नम्रभावाने  त्या  वाघास  नमस्कार  केला.  त्या  वाघाने  लगेच  ॐ  काराचा  उच्चार  केला.  त्या  आवाजाने  सारा  मरुत्वमलै  पर्वत  दुमदुमला.  नंतर  त्या  व्याघ्राने  '' श्रीपाद  राजं  शरणं  प्रपद्ये ''  असे  सुस्वरात  प्रभूंना  आळविले.  याच  वेळी  एक  चमत्कार  झाला.  त्या  वाघाच्या  ठिकाणी  एक  दिव्य  कांतीमान  पुरुष  प्रगट  झाला.  त्याने  त्या  वृद्ध तपस्व्यास  साष्टांग  प्रणिपात  केला  आणि  क्षणार्धात  आकाश  मार्गाने  निघून  गेला.  त्या  वृद्ध तपस्व्याने  मला  त्यांच्या  गुहेत  मोठ्या  आग्रहाने  नेले.  गुहेत  गेल्यावर  त्यांनी  केवळ  संकल्पाने  अग्नि  प्रज्वलित  केला.  त्यात  आहुती  देण्या साठी   लागणारे  पवित्र  साहित्य,  मधुर  फळे  यांची  निर्मिती  केली.  वैदिक  मंत्रोच्चारासह  या  पदार्थांची  अग्नित  आहुती  दिली.

ते  वृद्ध तपस्वी  सांगू  लगले,  '' या  कली  युगात  यज्ञ,  याग  सत्कर्मे  सारे  लुप्त  झाले  आहेत.  पंचभुतात्मक सृष्टीतून  सर्व  लाभ  करुन  घ्यायचा,  परंतु  त्या  दैवतांचे  मात्र  विस्मरण  करायचे  असा  मानवाचा  धर्म  झाला  आहे.  देवांची  प्रीति  प्राप्त  करण्यासाठी   यज्ञ  करावेत  व  त्यांना  संतुष्ट  करावे.  त्यांच्या  कृपाप्रसादानेच  प्रकृती  अनुकुल  होते.  प्रकृतीमधील  कोणत्याही  शक्तीचा   प्रकोप  मानव  सहन  करु  शकत  नाही.  प्रकृतीमधील  शक्तींची   मानवाने  यथायोग्य  मार्गाने  शांती  करावी,  नसता  अनेक  संकटे  उद्भवतात.  मानवाने  धर्माचरण  न  केल्यास  प्रकृति  शक्ती  त्याची  शिक्षा  यथाकाली  देते.  लोकहितासाठी   मी  हा  यज्ञ  केला  आहे.  या  यज्ञाचे  फल  स्वरूप  म्हणून  तुला  श्रीपाद  श्रीवल्लभ  स्वामींचे  दर्शन  होईल.  जन्मजन्मांतरीचे  पुण्य  फळास  आले  म्हणजे  असे  लाभ  घडतात.''  त्या  वृद्ध तपस्व्याच्या  मुखातून  वहाणाऱ्या  या  पवित्र  वाकगंगा   प्रवाहाने  मी  अगदी  भाराऊन  गेलो  आणि  अत्यंत  नम्रतेने  त्यांना  साष्टांग  दंडवत  घातले.  मी  त्या  तपस्व्याच्या  चरणी  प्रार्थना  केली  ''हे ऋषिवर,  मी  पंडित  नाही,  योगी  नाही,  साधक  नाही,  मी  एक  अल्पज्ञ  आहे.  माझ्या  मनातील  संदेहाची  निवृत्ती   करुन  आपण  आपला  वरदहस्त  माझ्या  मस्तकी  ठेवावा .''  त्या  महापुरुषाने  माझ्या  शंकेचे  समाधान  करण्याचा  मनोदय  दर्शविला.

मी  म्हटले  ''हे  सिद्ध मुनिवर्या,  मी  कन्यका  देवीचे  दर्शन  घेताना  देवीने  सांगितले  होते  की  कुरवपुरी  जाऊन  श्रीपाद  श्रीवल्लभ  स्वामींचे  दर्शन  घ्यावे.  मी  तेथे  जाण्यासाठी   निघालो  असताना  मार्गात  आपले  व  व्याघ्ररूपी  महात्म्याचे  दर्शन  झाले.  ते  कोण  होते  ?  तसेच  दत्तप्रभू  म्हणजे  कोण  ?  या  विषयी  कृपया  विस्तारपूर्वक  सांगावे  ''  तेव्हा  त्या  वृद्ध तपस्व्याने  सांगण्यास  सुरवात  केली.

या  आंध्र  प्रांतातील,  गोदावरी  मंडलातील  अत्री  मुनींची  तपोभूमी  अशा  नांवाने  प्रसिद्ध  असलेल्या  आत्रेयपूर  ग्रामात  एक  काश्यप  गोत्रीय  ब्राह्मण  कुटुंब  वास्तव्य  करीत  होते.  त्यांना  परमेश्वराच्या  कृपाप्रसादाने  एका  पुत्राचा  लाभ  झाला.  ब्राह्मण  अत्यंत  विद्वान,  आचार  संपन्न  होता  परंतु  पुत्र  मात्र  मतिमंद  होता.  आई  वडिलांनी  त्याचे  नांव  व्याघ्रेश्वर  असे ठेवले .  व्याघ्रेश्वर  मोठा   होऊ  लागला.  परंतु  त्याच्या  बुद्धीची  वाढ  मात्र  होत  नव्हती.  पित्याने  त्याला  शिकविण्याचे  खूप  प्रयत्न  केले.  परंतु  त्यास  संपूर्ण  संध्यावंदनसुद्धा करता  येत  नसे. एवढया  विद्वान  ब्राह्मणाचा  पुत्र  असा  अज्ञानी,  अशी  गावातील  लोकांची  सारखी  टोचणी  त्याला  अत्यंत  दु:खदायक  वाटे.  एका  ब्रह्ममुहूर्तावर  त्यास  स्वप्न  पडले,  त्यात  त्याला  एका  दिव्य  बालकाचे  दर्शन  झाले.  ते  बालक  आकाशातून  खाली  येत  होते.  त्याचे  चरण  कमल  भूमीस  लागताच  भूमीसुद्धा दिव्य  कांतीमान  झाली.  तो  बालक  हळू  हळू  पावले  टाकीत  व्याघ्रेश्वराकडे  आला  आणि  म्हणाला,  मी  असताना  तुला  भय  कशाचे  ?  या  ग्रामाचे  व  माझे ऋणानुबंध  आहेत.  तू  हिमालयातील  बदरिकारण्यात  जा.  तेथे  तुझे  सारे  शुभ  होईल.  एवढे  सांगून  तो  बालक  अंतर्धान  पावला.  त्या  दिव्य  बालकाच्या  संदेशानुसार  व्याघ्रेश्वर  शर्मा  हिमालयातील  बदरिकारण्यात  जाण्यास  निघाला.  मार्गात  त्यास  अन्नपाण्याची  काहीच  अडचण  पडली  नाही.  श्रीदत्तकृपेने  त्याला  वेळेवर  अन्नपाणी  मिळे.  मार्गात  एक  कुत्रा  भेटला  व  तो  त्याच्या  बरोबर  बदरीवनापर्यंत  सोबत  होता.  या  प्रवासात  त्यांनी  उर्वशी  कुंडात  स्नान  केले.  याच  वेळी  एक  महात्मा  आपल्या  शिष्य  समुदायासह  उर्वशी  कुंडात  स्नाना साठी  आले.  व्याघ्रेश्वराने  त्या  गुरुवर्यांना  साष्टांग  नमस्कार  केला  आणि  माझे  शिष्यत्व  स्विकारावे  अशी  नम्र  प्रार्थना  केली.  त्या  महान  गुरुवर्याने  शिष्य  करुन  घेण्याचे  मान्य  केले  आणि  आश्चर्य  असे  की  तत्काळ  बरोबर  आलेले  ते  कुत्रे  अंतर्धान  पावले.  त्यावेळी  ते  महात्मा  म्हणाले  ''हे  व्याघ्रेश्वरा  तुझ्याबरोबर  आलेला  तो  श्वान  तुझ्या  पुर्वजन्मातील  केलेल्या  पुण्याचे  द्योतक  होते.  त्याने  तुला  आमच्या  स्वाधीन  करून  ते  अंतर्धान  पावले.  श्रीपाद  श्रीवल्लभ  स्वामींच्या  कृपे  मुळेच  तू  येथे  आलास  आणि  या  पुण्यप्रद  कुंडात  स्नान  करु  शकलास.  ही  नरनारायणाच्या  वास्तव्याने  पुनीत  झालेली  तपोभूमी  आहे.  यावर  व्याघ्रेश्वर  म्हणाला  हे  गुरुदेवा,  श्रीपाद  श्रीवल्लभ  कोण  आहेत  ?  त्यांनी  माझ्यावर  एवढी  कृपा  का  केली  ?  गुरुदेव  म्हणाले,  '' ते  साक्षात  दत्त  प्रभूच  आहेत.  त्रेतायुगात  भारद्वाज  महर्षीनी  ''सावित्र  काठक  चयन''  नावाचा  महायज्ञ  श्री  क्षेत्र  पीठिकापुरम   येथे  संपन्न  केला  होता.  त्या  यज्ञ  प्रसंगी  शिव-पार्वतींना  आमंत्रित  केले  होते.  त्यावेळी  शिवानी  महर्षींना  आशिर्वाद  दिला  की  ''तुमच्या  कुलामध्ये  अनेक  महात्मा,  सिद्धपुरुष,  योगीपुरुष  अवतार  घेतील''  अनेक  जन्मांच्या  पुण्य  कर्माने  दत्तभक्तीचा   अंकुर  फुटतो  व  तो  पुढे  सातत्याने  वाढत  गेल्यास  श्रीपाद  श्रीवल्लभ  स्वामींचे  दर्शन  होते.  त्यांच्या  चरण  स्पर्शाचे,  संभाषणाचे  भाग्य  लाभते.  हे  व्याघ्रेश्वरा  तुझ्यावर  स्वामींची  कृपा  झाली  आहे.  मी  आता  माझ्या  गुरुदेवांच्या  दर्शनास  जात  आहे.  पुन:  एक  वर्षाने  येईन.  तुम्ही  तुमच्या  गुहेत  आत्मज्ञान  प्राप्तीसाठी   तप:श्चर्या  करावी.''  असे  सांगून  ते  महान  गुरुदेव  द्रोणागिरी  पर्वताकडे  गेले.  व्याघ्रेश्वर  गुहेत  ध्यान  करु  लागला  परंतु  त्याचे  सारे  ध्यान  व्याघ्ररुपाकडेच  असे.  याचा  असा  परिणाम  झाला  की  त्याला  इच्छित  असलेले  वाघाचे  रूपच  प्राप्त  झाले.  एक  वर्षाचा  काळ  लोटला.  गुरुदेव  यात्रा  करुन  परत  आले.  त्यांनी  सर्व  गुहा  बघितल्या. 

प्रत्येक  शिष्याच्या  एका  वर्षात  झालेल्या  प्रगतीचा  ते  आढावा  घेत  होते.  एका  गुहेच्या  आत  गेले,  तेथे  त्याना  एक  वाघ  ध्यानस्थ  बसलेला  दिसला.  त्यांना  अत्यंत  आश्चर्य  वाटले.  त्यांनी  अंतर्ज्ञानाने ओळखले  की  तो  वाघ  दुसरा  कोणी  नसून  व्याघ्रेश्वरच  आहे.  व्याघ्ररूपाचेच  सतत  ध्यान  केल्याने  त्याला  व्याघ्ररूपच  प्राप्त  झाले,  हे  त्यांनी  जाणले.  त्यांनी  त्याला  आशिर्वाद  देऊन  ॐ  काराचा  मंत्र  शिकविला  व  '' श्रीपाद  राजं  शरणं  प्रपद्ये ''  हा  मंत्र  जपण्यास  सांगितला.  गुरूआज्ञेनुसार  व्याघ्रेश्वर  त्या  रूपातच  मंत्राचा  जप  करू  लागला.  वाघाच्या  रूपातच  त्याने  कुरवपूरला  प्रयाण  केले.  यथाकाली  तो  कुरवपूर  ग्रामाजवळ  येऊन  पोहोचला.  मध्ये  कृष्णा  नदी  वहात  होती.  तो  अलिकडील  तीरावर  बसून  ''श्रीपाद  राजं  शरणं  प्रपद्ये''  या  मंत्राचा  जप  करू  लागला.  श्रीपाद  श्रीवल्लभ  कुरवपूर  ग्रामात  आपल्या  शिष्यासह  बसले  होते.  ते  एकदम  उठले   आणि  माझा  परमभक्तच  मला  हाक  मारतो  आहे, असे  म्हणून  नदीच्या  पैलतीरास  येण्यास  निघाले.  ते  पाण्यातून  चालतांना  त्यांच्या  पदकमलांची  चिन्हे  पाण्यावर  उमटत  होती  व  ती  फारच  सुंदर  दिसत  होती.  स्वामी  पैलतीरावर  पोहोचल्यावर,  व्याघ्रेश्वराने  त्यांच्या  दिव्य  चरणांवर  आपले  मस्तक  ठेवून   अत्यंत  भक्तीभावाने   नमस्कार  केला.  स्वामींनी  अत्यंत  आनंदाने  त्या  वाघाचे  मस्तक  कुरवाळले  व  त्यावर  स्वार  होऊन  पाण्यातून  ते  कुरवपूरला  पोहोचले.  वाघावर  बसून  आलेले  बघून  सर्वांना  आश्चर्य  वाटले.  ते  वाघावरुन  उतरताच  त्या  वाघाच्या  शरीरातून  एक  दिव्य  पुरुष  बाहेर  आला.  त्याने  आपल्या  देहाचे  व्याघ्राजिन  (वाघाचे  कातडे)  स्वामींनी  आसन  म्हणून  स्वीकार  करावा  अशी  विनंती  केली.  तो  श्रींच्या  चरणी  अत्यंत  भक्तीभावाने   नतमस्तक  झाला.  त्याचे  अष्टभाव  जागृत  होऊन  प्रेमभावाने  त्याने  स्वामींच्या  चरणांवर  आपल्या  नेत्रातील  अश्रूंनी  अभिषेक  केला.  मोठ्या  प्रेमभराने  स्वामींनी  त्याला  उठवले  आणि  म्हणाले,  ''हे  व्याघ्रेश्वरा  !  तू  एका  जन्मात  अत्यंत  बलशाली  असा  मल्ल  होतास.  तेव्हा  तू  वाघांशी  युद्ध करून  त्यांना  अतिक्रूरतेने  वागवीत  होतास.  त्यांना  वेळेवर  अन्न  पाणीसुद्धा देत  नव्हतास.  त्यांना  साखळीने  बांधून  लोकांच्या  प्रदर्शनासाठी   ठेवीत  होतास.  या  दुष्कर्मामुळे  तुला  अनेक  नीच  जीव  जंतुंच्या  योनीत  जन्म  घ्यावा  लागला  असता  परंतु  माझ्या  अनुग्रहाने  ते  सारे  दुष्कर्म  हरण  झाले  आहेत.  तू  दीर्घकाळ  व्याघ्ररूपात  राहिल्यामुळे  तुला  इच्छेनुसार  वाघाचे  रूप  धारण  करता  येईल  व  सोडताही  येईल.  हिमालयात  कित्येक  वर्षापासून  माझी  तप:श्चर्या  करणाऱ्या  महान  सिद्धांचे तुला  दर्शन   होईल  आणि  आशिर्वादही  मिळतील.  योग  मार्गात  तू  अत्यंत  प्रज्ञावंत  होशील.''  असा  स्वामींनी  आशिर्वाद  दिला.

स्वामी  पुढे  म्हणाले  '' तू  हिमालयात  एक  वाघ  अत्यंत  शांत  असलेला  पाहिला  होतास  ना  !  तो  एक  महात्मा  आहे.  तप:श्चर्या  करणाऱ्या  संत  पुरुषांना  सामान्य  लोक  व  इतर  वन्य  प्राण्यांपासून  त्रास  होऊ  नये  म्हणून  त्याने  ते  व्याघ्ररूप  धारण  केले  होते  व  तो  त्यांचे  संरक्षण  करीत  होता.  गुहेतील  तप:श्चर्या  करणाऱ्या  संतांचे  परस्पर  वर्तमान  कळविण्याचे  कामसुद्धा तो  वाघ  मोठ्या  आनंदाने  करीत  असे,  ही  सगळी  दत्त  प्रभूंची  लीलाच ! '' 

॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥


श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत



॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

॥ॐ  सर्वजगद्रक्षाय  गुरु  दत्तात्रेयाय  श्रीपाद  श्रीवल्लभ  परमात्मने  नम: ॥

॥  दिगंबरा  दिगंबरा  श्रीपाद  श्रीवल्लभ  दिगंबरा  ॥


*** मूळ  ग्रंथ  रचनाकार  - श्री  शंकर  भट ***


*** मराठी अनुवाद - श्री. हरिभाऊ  जोशी  निटूरकर  ( भाऊ  महाराज ) ***


श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाच्या प्रत्येक अध्याय-पठणाचे फल

  • अध्याय १ - घरात शांती नांदते, सुखाची प्राप्ती
  • अध्याय २ - मन:क्लेश निवारण
  • अध्याय ३ - नागदोष निवारण, संतान-प्रतिबंधक-दोष निवारण
  • अध्याय ४ - मुलींना योग्य वर प्राप्ती, गुरुनिंदा-दोष-निवारण
  • अध्याय ५ - विघ्नें दूर होण्यास, देवता कोपापासून मुक्ती
  • अध्याय ६ - पितृ शापापासून निवृत्ती
  • अध्याय ७ - अज्ञान निवृत्ती, विवेक प्राप्ती
  • अध्याय ८ - संतानप्राप्ती, लक्ष्मी-कृपा-कटाक्ष लाभ
  • अध्याय ९ - प्रारब्ध-कर्म-नाश
  • अध्याय १० - दुर्भाग्य-नाश
  • अध्याय ११ - दुर्गुणापासून मुक्ती
  • अध्याय १२ - शरीरारोग्य प्राप्ती
  • अध्याय १३ - व्यवसाय वृद्धी, पशु- वृद्धी
  • अध्याय १४ - आपदा-निवारण, उत्साह- वृद्धी
  • अध्याय १५ - अकारण कलह निवारण, पूर्व जन्म कृत दोष निवारण
  • अध्याय १६ - धनाकर्षण- शक्ती - वृद्धी
  • अध्याय १७ - सिद्धपुरुषांचे आशिर्वाद
  • अध्याय १८ - पापकर्मांचा नाश, भाग्य वृद्धी
  • अध्याय १९ - मानसिक क्लेश निवारण
  • अध्याय २० - कष्ट-नष्ट-निवारण
  • अध्याय २१ - आध्यात्मिक लाभ, पुण्य वृद्धी
  • अध्याय २२ - कर्मदोष निवारण
  • अध्याय २३ - ऐश्वर्यप्राप्ती
  • अध्याय २४ - दांपत्य-सुख
  • अध्याय २५ - आर्थिक समस्या नाशक
  • अध्याय २६ - दुर्दैव नाशक, संतान प्राप्ती
  • अध्याय २७ - ऐश्वर्य लक्ष्मी प्राप्ती
  • अध्याय २८ - विवाह अनुकूल व शीघ्र होण्यासाठी
  • अध्याय २९ - पितृदेवतांचे आशिर्वाद
  • अध्याय ३०- उज्वल भविष्य होण्यासाठी
  • अध्याय ३१ - विद्या,ऐश्वर्य यांची प्राप्ती
  • अध्याय ३२ - सद्गुरु प्राप्ती
  • अध्याय ३३ - अनुकुल विवाह होण्यासाठी
  • अध्याय ३४ - ऋण मोचनासाठी
  • अध्याय ३५ - वाक्-सिद्धीसाठी
  • अध्याय ३६ - अनुकूल दाम्पत्य जीवनासाठी
  • अध्याय ३७ - जीवनात स्थैर्य
  • अध्याय ३८ - आत्मस्थैर्य
  • अध्याय ३९ - सर्प दोष-निवारण
  • अध्याय ४० - असाध्य कार्यात यश मिळण्यासाठी
  • अध्याय ४१ - लोकनिंदा-परिहारार्थ
  • अध्याय ४२ - हरवलेले मूल सापडण्यास
  • अध्याय ४३ - अष्टैश्वर्य प्राप्ती
  • अध्याय ४४ - उज्ज्वल भविष्यासाठी
  • अध्याय ४५ - सर्व क्षेत्रात वृद्धीसाठी
  • अध्याय ४६ - त्वरित विवाहयोग
  • अध्याय ४७ - सर्व शुभफल मिळण्यासाठी
  • अध्याय ४८ - आर्त, अर्थार्थी, जिज्ञासु, मुमुक्षु यांना चारी पुरुषार्थ, सिद्धी यांसाठी
  • अध्याय ४९ - समस्त कर्म-दोषांपासून निवृत्ती
  • अध्याय ५० - गुरुनिंदा केल्यामुळे आलेले दारिद्रय दूर होण्यासाठी
  • अध्याय ५१ - जलगंडादिकापासून रक्षण
  • अध्याय ५२ - सर्व समस्या अप्रयत्नाने दूर होतील
  • अध्याय ५३ - महापातक नाशक

॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

Aug 21, 2020

सिद्धमंगल स्तोत्र


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

 

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ह्या अत्यंत प्रासादिक ग्रंथाचे रचनाकार श्री. शंकर भट ( मराठी अनुवाद : श्री. हरिभाऊ जोशी निटूरकर ) सतराव्या अध्यायांत लिहितात - श्री बापनाचार्युलुंना ( श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे मातामह ) श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी ''सिद्धमंगल'' स्तोत्र लिहिले.
प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायिली जाणारी या स्तोत्रातील अक्षरें अत्यंत प्रभावशाली आहेत. त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगें विलसत राहील. या स्तोत्रात व्याकरणदृष्टया कोणताही दोष अथवा त्रुटी नाही. या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधिनिषेध नाही. मला ते स्तोत्र श्री. बापनाचार्युलूच्या मुखातून ऐकण्याचे भाग्य लाभले. हे स्तोत्र माझ्या हृदयावर अंकित झाले आहे. याच्या पठणाने मनातील सर्व कामना पूर्ण होतात. जे भक्त मन, काया आणि कर्म आदिंनी श्री दत्तात्रेयांची आराधना करून या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र होतात.  तसेच, याच्या नियमितपणे गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्यास सिद्धी प्राप्त होतात. तसेच, परम पवित्र अशा या सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनघाष्टमीचे व्रत करून केल्यास सहस्त्र ब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शनही होते. 
  श्री मदनंत, श्रीविभूषित, अप्पल लक्ष्मीनरसिंह राजा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥१॥ श्री विद्याधरि, राधा, सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥२॥ माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥३॥ सत्यऋषीश्वर-दुहितानंदन बापनार्यनुत श्रीचरणा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥४॥ सवितृकाठकचयन-पुण्यफल भारद्वाजऋषी गोत्र संभवा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥५॥ दो चौपाती देव लक्ष्मीगण संख्या-( लक्ष्मी धनस्ख्या ) बोधित श्रीचरणा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥६॥ पुण्यरूपिणी राजमांबा सुत-गर्भपुण्यफलसंजाता । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥७॥ सुमतीनंदन, नरहरीनंदन, दत्तदेव प्रभू श्रीपादा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥८॥ पीठिकापूरा नित्यविहारा, मधुमतीदत्ता, मंगलरूपा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥९॥ ॥ श्रीपादराजम् शरणम् प्रपद्ये ॥

Feb 15, 2019

कलौ श्रीपाद श्रीवल्लभ:


Image result for gurucharitra adhyay 10

विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णू-व्योमकेशी । धरिला वेष तू मानुषी । भक्तजन तारावयां ।। (श्री गुरुचरित्र अध्याय १४ - ओवी १० )

श्री गुरुदेव दत्तांचा श्रीपाद श्रीवल्लभ हा प्रथम अवतार पीठापूर नामक नगरांत झाला. 'कलौ श्रीपाद श्रीवल्लभ:' अशी ख्याती असलेल्या ह्या अवतारासंबंधित कथा श्री गुरुचरित्रांत अध्याय ते अध्याय १० यामध्ये वर्णिल्या आहेत. साक्षात श्री दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने आपळराज आणि सुमती या सद्गुणी दाम्पत्यांच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी भक्तांनुग्रहाकारणें तें गृहत्याग करून तीर्थयात्रेस निघाले. श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप अतिशय दिव्य होते. पुढें कुरवपुरात त्यांचे जेव्हा वास्तव्य होते, तेव्हा प्राणत्याग करण्यास निघालेल्या एका विप्र स्त्रीस आशीर्वाद देऊन तिचा मूढ पुत्र ज्ञानी केला आणि त्या ब्राह्मण स्त्रीच्या प्रार्थनेनुसार 'श्रीपादांसारखा पूज्य आणि वंदनीय पुत्र व्हावा' यासाठी तिला शनिप्रदोषाचें व्रत करावयास सांगितले. 

श्रीपाद श्रीवल्लभांच्या पुढील नृसिंहसरस्वती अवताराची ही पूर्वपीठिका गुरुचरित्रकारांनी सुरेख शब्दांत वर्णिली आहे : "आणिक कार्य कारणासी । अवतार घेऊ परियेसी । वेष धरू संन्यासी । नाम नरसिंहसरस्वती ।।" 

कुरवपुरातील अजून एका भक्तालाही म्हणजेच रजकाला नृसिंहसरस्वती अवतारांत पुन्हा एकदा त्यांच्या श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपांत दर्शनाचा लाभ प्राप्त झाला. 

"श्री गुरु म्हणती तयासी ।वैदुरानगरीं जन्म होसी ।भेटी देऊं अंतकाळासी । कारण असे आम्हां येणे ॥" असे श्रीपाद श्रीवल्लभांनी त्या भक्तास वचन नवव्या अध्यायांत दिले होतें.

काही दिवस कुरवपुरात वास्तव्य करून श्री गुरु अश्विन शुद्ध द्वादशीस गंगेत अदृश्य झालें. परंतु त्यानंतरदेखील आपण भक्तांच्या सतत पाठीशी आहे, ह्या त्यांच्या वचनाची प्रचिती वल्लभेश ब्राह्मणास आली. तो कथाभाग गुरुचरित्रात दहाव्या अध्यायांत वर्णिला आहे. या अध्यायाचा अजून एक विशेष म्हणजे ज्या चोराने वल्लभेश ब्राह्मणाच्या हत्येत भाग घेतला नाही, त्याने भक्तवत्सल श्रीपादांची क्षमा मागितली असता त्याला जीवदान मिळाले. इतकेच नव्हें तर त्या चोरास श्रीपाद श्रीवल्लभांचे प्रत्यक्ष दर्शन, त्यांच्याशी संभाषण तसेच श्री गुरूंची वल्लभेश ब्राह्मणास पुनर्जिवित करण्याची लीला प्रत्यक्ष घडतांना पाहण्याचा लाभ झाला. हा गुरुकृपेचा चमत्कारदेखील त्यानेच त्या ब्राह्मणास सांगितला. श्रीपादांच्या प्रत्यक्ष दर्शनाचे भाग्य भक्त वल्लभेशासही लाभले नाही. हा विलक्षण प्रभाव श्री गुरूंच्या कृपेचा, भक्तवत्सलतेचा आणि शरणागतांस कायम अभय देण्याचा आहें,  ह्यांत शंकाच नाही.  

' श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ' असा दृढ भाव असेल तर श्री गुरु कसा अनुभव देतात आणि आजही सूक्ष्म रूपात तें कुरवपूर क्षेत्री नित्य वास करत आहेत, हें ह्या कथांवरून सहज लक्षात येते.        


श्री शंकर भट यांनी लिहिलेलें आणि श्री हरिभाऊ जोशी निटूरकर यांनी मराठी अनुवाद केलेले श्रीपाद श्रीवल्लभांचे विस्तृत चरित्र इथे उपलब्ध आहे.    


श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत     


इतर साहित्य : श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत सार 


                   श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत   


                   श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत - MP3               


Feb 5, 2018

श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत सार



कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दन: । द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद वल्लभ: ॥

भगवान दत्तात्रेय जगदोद्धारासाठी इ. स. १३२०मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री अप्पल राजु आणि सुमती या पुण्यदांपत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रकट झाले. दत्तात्रेयांचा हा आद्य अवतार होय. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राची रचना शंकर भट्ट यांनी केली. 


श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत सार  इथे वाचू शकता. 


Source : http://www.dattamaharaj.com/