॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती अर्थात थोरले महाराज यांची सर्वच वाङ्मयसंपदा वैशिष्ट्यपूर्ण आहे. या संदर्भात प. पू. नारायणकाका महाराज ढेकणे म्हणतात - श्रीस्वामीमहाराजांना श्रीदत्तप्रभूंच्या सतत आज्ञा होत व अन्य देवदेवता, नदीतीर्थे व क्षेत्रपशक्तींची प्रत्यक्ष दर्शने होऊन संवादही होत असे आणि त्यांचें यथार्थ शब्दांकन या पदे / स्तोत्रे / आरत्यांमधून अनुभवास येते.
प.प. श्री टेम्ब्ये महाराजरचित ' कृष्णातीरिंच्या वसणाऱ्या ' हे असेच एक अतिशय रसाळ, भक्तिमय पद आहे. त्याचा भावार्थ जाणून घेण्याचा हा अल्प प्रयत्न दयाघन श्रीदत्तप्रभूंच्या चरणीं रुजू व्हावा, हीच प्रार्थना !
कृष्णातीरिंच्या वसणाऱ्या । ये औदुंबरीं बसणाऱ्या ॥ध्रु.॥ काषायांबर घेणाऱ्या । पायिं पादुका घालणाऱ्या ॥१॥ भस्मोद्धूलन करणाऱ्या । दंडकमंडलु घेणाऱ्या ॥२॥ स्वभक्तसंगें असणाऱ्या । भक्ताभीप्सित करणाऱ्या ॥३॥ स्मरतां दर्शन देणाऱ्या । वासुदेवाच्या कैवाऱ्या ॥४॥ आपल्या सद्गुरूंचा आर्त धावा करतांना श्रीस्वामी महाराज म्हणतात, कृष्णातीरिंच्या वसणाऱ्या । ये औदुंबरीं बसणाऱ्या ॥ हे कृष्णातीरावर औदुंबरतळवटी ध्यानस्थ बसलेल्या श्रीसद्गुरूराया तुम्ही मजकडे धावत या ! थोरल्या महाराजांनी श्रीनृसिंहसरस्वती महाराजांना अतिशय कळवळून आवाहन केलेले आहे, त्यांचे अत्यंत आर्ततेने स्मरण केलेले आहे. दुसऱ्या चरणात श्रीदत्तस्वरूप सद्गुरूंचे वर्णन केले आहे. काषायांबर घेणाऱ्या । पायिं पादुका घालणाऱ्या ॥ औदुंबरतळवटी बसलेले श्रीसद्गुरुंनी काषाय वस्त्र म्हणजेच भगवे वस्त्र धारण केले आहे आणि त्यांच्या पायांत दिव्य अशा पादुका आहेत. श्रीस्वामी महाराज पुढे म्हणतात - भस्मोद्धूलन करणाऱ्या । दंडकमंडलु घेणाऱ्या ॥
श्रीनृसिंहसरस्वती महाराजांनी सर्वांगी भस्म चर्चिलेले आहे, त्यांची तनु भस्मांकित आहे, तसेच त्यांच्या हाती दंड आहे. त्यांनी समोरच बाजूला आपला कमंडलूही ठेवलेला आहे.
हे दत्तप्रभू सर्व जीवांचे नियामक असून भक्तवत्सल आणि दयाळू आहेत. त्यांच्या भक्तांच्या संरक्षणासाठीच त्यांनी दंड हाती घेतला आहे. त्यांचे भक्त जेव्हा वेदविहित मार्ग सोडून मोह-विकारांना बळी पडतात आणि त्यांचा अधःपात होऊ लागतो, तेव्हा त्यांना अटकाव करण्यासाठी, तसेच प्रसंगी दुष्टांना शासन करण्यासाठी हा दंड आहे.
प.पू.श्री.मामा महाराज देशपांडे म्हणत असत - “ श्रीभगवंतांचा कमंडलू हे त्यांचे 'हृदयतीर्थ' आहे. त्यांचे अत्यंत कनवाळू व प्रेमळ असे हृदयच त्यांनी कमंडलूच्या रूपाने त्यांच्यासमोर ठेवलेले असते. म्हणूनच ते प्रसंगी मृताला जिवंत करताना म्हणजेच त्याला संजीवन देताना आणि शुष्क काष्ठाला पर्णयुक्त करतांना ह्याच कमंडलूतील पाणी शिंपडून ते कार्य संपन्न करतात. आपल्या हृदयातील वात्सल्याने ते भक्तांचे जणू संजीवन करत असतात ! यापुढील दोन चरणांत श्रीमहाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या अलौकिक कार्याची महती अतिशय मार्मिकतेने गायली आहे.
स्वभक्तसंगें असणाऱ्या । भक्ताभीप्सित करणाऱ्या ॥ स्मरतां दर्शन देणाऱ्या । वासुदेवाच्या कैवाऱ्या ॥ भक्तवत्सल, भक्ताभिमानी भगवान श्रीदत्तात्रेय प्रभूंचे,' माझ्या भक्तांचा मी कधीही नाश होऊ देणार नाही.' हे ब्रीद आहे. त्यांमुळे ते सदासर्वदा भक्तांच्या नित्य सान्निध्यातच असतात. अर्थात ते सर्वव्यापी आहेत. ते जसे बाहेर आहेत तसेच ते भक्तहृदयातदेखील अखंड प्रतिष्ठितही आहेत. जणू काही त्या करुणाघनाने स्वतःला भक्तहृदयामध्ये स्थापित करून ठेवलेले असते. आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी पदोपदीं तळमळणारी ती माऊली आहे. ते सदैव भक्तांच्या इष्ट मनोकामना सहजच पूर्ण करतात. दत्तमहाराज स्मर्तृगामी आहेत, अर्थात ' स्मरण करताक्षणी आमच्या सद्गुरूंचे दर्शन होते.', अशी श्रीस्वामी महाराज इथे ग्वाही देतात. थोरल्या महाराजांचा हा धावा शेवटी भक्तीच्या अतिशय उच्च पातळीवर येतो, ते आता सद्गुरूंचे, श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीमहाराज, श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामीमहाराज यांचे हृदयपूर्वक स्मरण करून अत्यंत तळमळीने आवाहन करतात, हे श्रीदत्तप्रभू तुम्ही वासुदेवाचे (श्री टेम्ब्ये महाराजांचे) कैवारी आहात, तेव्हा हे कृष्णातीरावर औदुंबरतळवटी ध्यानस्थ बसलेल्या श्रीसद्गुरूराया तुम्ही माझ्याकरितां धावत या ! याच रसाळ पदाचीच द्विरुक्ती करणारे स्वामी महाराजांचे हे पुढील पदही अतिशय सुरेख आहे. कृष्णातीरीं वसणा-या । ये औदुंबरिं बसणा-या ॥ध्रु.॥ स्वभक्तचित्ती असणा-या । भक्तसंग्रह करणा-या ॥१॥ सह्यगिरीवर असणा-या । प्रत्यहिं माहुरिं निजणा-या ॥२॥ करविरिं भिक्षा करणा-या । सारापुरी जेवणा-या ॥३॥ काशीक्षेत्रीं न्हाणा-या । भक्तसंकटीं धांवणा-या ॥४॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
No comments:
Post a Comment