॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
Jan 23, 2026
स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - ७
Feb 16, 2024
श्री श्रीधरस्वामीकृत सद्गुरुंची मानसपूजा
॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री राम समर्थ ॥
मानसपूजा म्हणजे ज्या पूजेत आपले मनच सारे सोपस्कार थोड्या थोड्या प्रमाणात करते, ती पूजा. परमात्म्याला मानसपूजा खूप आवडते, असे श्री समर्थांनी सांगितले आहे. सगुण व निर्गुण ही परमात्म्याची दोन रूपे आहेत. सगुण साकार रूपात देहाचा आकार असतो, निर्गुण-निराकार रूपात एकाच एक बिंदूत आनंद असतो. त्यात देह-आकाराशी सुतराम् संबंध नसतो. सगुणरूपात श्रीगुरू व देव दोन्ही प्रकार असतात. श्रीगुरू सगळ्या देवांचे रूप व आनंदघन-परब्रह्म असतो. श्रीगुरूचे रूप हे मुमुक्षूंसाठी मोक्षाची वाट दाखवणारे, प्रत्येकाला मंगलमय आनंद देणारे असते. आपल्या देहात मस्तक हे उत्तमांग असे गणले जाते. त्यातही त्याच्या मधोमध असलेले ब्रह्मरंध्र हे अत्युत्तम. येथे येणाऱ्या ब्रह्म या शब्दावरून याची महती समजते. ही जागा जी आहे ती अनंतानंदरूप असलेली, ब्रह्मस्वरूप जागा मानली जाते. 'गुरुर्ब्रह्म नमाम्यहम्', साक्षात् परब्रह्मस्वरूप गुरूला वंदन करतो - म्हणून श्रीगुरूला नमस्कार करताना, त्याचे रूप लक्षात घेऊन नमस्कार करण्याची पद्धत गुरुतत्त्वाचे प्रतिपादन करणारे ग्रंथ सांगतात. हे ब्रह्मरंध्र श्रीगुरूचे वासस्थान आहे. याला सहस्रदल कमल असेही म्हणतात. या सहस्रदल कमलाच्या मध्यकर्णिकेवर लक्ष केंद्रित करून अनंत आनंदरूप श्रीगुरूचे ध्यान करावे. त्याचे बरेच प्रकाश आहेत, पण नव्या साधकाला कल्पना यावी यासाठी श्रीगुरूचा प्रकाश हा निष्कलंक चंद्रप्रकाशासारखा आहे, असे समजून त्याने ध्यान करावे.
तो अमृतरूप चांदण्याचा पसरलेला प्रकाश हाच श्रीगुरूचा देह समजावा. चोहीकडे पसरलेल्या त्या आनंदानेच अमृतरूप चांदण्याच्या प्रकाशाचे रूप धारण केलेल्या, शुभ्रवर्णाच्या आपल्या शुभ रूपाला त्या सहस्रदल कमलाच्या मध्यकर्णिकेच्या मधोमध बसलेल्या प्रसन्नवदन श्रीगुरूचे ध्यान करावे. नंतर आसन, पाद्य, अर्घ्य, स्नान, वस्त्र, गंध-अलंकार, पांढरे सुवासिक फूल, सुगंधी अत्तर अर्पण करावे. तुलसीदल, बिल्वदल किंवा पांढरे फूल घेऊन एकशे आठ किंवा एक हजार एक वेळा 'श्रीधराय नमः'ची नामपूजा करावी. त्यानंतर धूप-दीप व नैवेद्यात हव्या त्या पक्वान्नांची निर्मिती करून सोन्याच्या थाळीत श्रीगुरूला पोटभर जेवू घालावे. हात धुतल्यानंतर अनेक फलार्पण करून श्रीगुरूला तृप्त करावे. त्यानंतर मुखशुद्धीसाठी तुलसीपत्र देऊन, असेल तेवढे नाणे नवरत्न महादक्षिणा म्हणून द्यावे. नंतर मंगलारती, मंत्रपुष्प, स्तोत्र, प्रदक्षिणा आटोपून नमस्कार करून, श्रीगुरूच्या कृपाळू, प्रसन्न मुखकमलावरील मंदहास्य पाहात जप करावा. ब्रह्मानंदाच्या अद्भुत प्रकाशाने युक्त अर्चना समर्पित करावी. पाणी, धूप-दीप व नैवेद्य, सगळे आपण तृप्त होईपर्यंत अर्पण करावे.
॥ इति शिवम् ॥
- श्री श्रीधरस्वामी
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
मूळ स्रोत : श्रीसद्गुरुबोधामृत
Jun 23, 2022
स्मरता जो भक्तां भेटे... श्री दत्तात्रेय ध्यान आणि वाङ्मय संग्रह
॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
स त्वं परात्मा पुरुषोत्तम श्रुति-ख्यातः समाविश्य जगत्त्रयं सदा । ईशाव्ययानन्त बिभर्षि दत्त ते पादाब्जयुग्माय नमोऽस्तु सर्वदा ॥१॥ वज्राङ्कुशध्वजाब्जाड़्क-युग्रक्ताब्जाभपत्तलः। गूढगुल्फः कूर्मपृष्ठोल्लसत्पादोपरिस्थलः ॥२॥ जानुपूर्वकजङ्घश्च विशालजघनस्थलः । पृथुश्रोणिश्च काकुत्स्थश्चारुनाभिर्दलोदरः ॥३॥ अररोरा मांसलांसो युगव्यायतबाहुकः । सुचिह्नचिह्नितकरः कम्बुकण्ठः स्मिताननः ॥४॥
स्नैग्ध्यधावल्ययुक्ताक्षश्चलत्-पिङ्गजटाधरः। चन्द्रकान्तिः प्रभुः कृष्ण-भ्रूरःश्मश्रुकनीनिकः ॥५॥
भावशुद्धद्विजाकीर्ण-स्वास्याब्जोऽभीवरप्रदः । दत्तात्रेयः स भगवान्सदा वसतु मे हृदि ॥६॥
भावार्थ : सर्वांतर्यामी, क्षर-अक्षर अर्थात सर्व जड-स्थावर-चेतन पदार्थांचा नियंता, वेदश्रुतींनी पुरुषोत्तम असे समर्पक वर्णन केलेला, त्रैलोक्यव्यापी, पालनकर्ता, अव्यय आणि अनंत ईश्वररूपी असा तू परमात्मा आहेस. तुझ्या या भवतारक चरणद्वयांना सतत वंदन असो. वज्र, अंकुश, ध्वजा आणि पद्म या शुभ चिह्नांनी युक्त, लाल कमळाप्रमाणे आरक्त तळवे, पदांचा वरील भाग कांसवाच्या पाठीसारखा फुगीर आणि टांचा झांकलेले असे ज्याचे चरण आहेत, ज्याने मांडीच्या वरच्या भागावर एक पाय ठेवलेला आहे, स्थिर आणि विशाल बैठकीवर सिद्धासन घालून जो बसलेला आहे, जो दिगंबर आहे, ज्याच्या पिंपळाच्या पानाप्रमाणे पातळ अशा उदरावर (पोटावर ) शोभायमान नाभी आहे, तसेच रुंद छाती असलेला, मांसल आणि विशाल स्नायूयुक्त असे द्विबाहू असलेला, ज्याचे हात शुभचिन्हांनी मंडित आहेत, ज्याचा कंठ एखाद्या शंखाप्रमाणे तीन वलयांनी युक्त आहे, प्रसन्न चेहऱ्यावर मधुर स्मित विलसत आहे, ज्याचे नयन अतिशय तेजस्वी आणि कृपार्द्र आहेत, (ज्याच्या कपाळावर) पिंगट अशा जटा रुळत आहे, चंद्राप्रमाणे ज्याची कांती दिव्य आहे, ज्याच्या भुवया, छाती, दाढीमिशा आणि डोळ्यांतील बुबुळे काळी आहेत, सुंदर अशा दंतपंक्तीने ज्याचे मुखकमल शोभत आहे, आणि आपल्या दोन वरदहस्तांनी, आपल्या भक्तांना सर्वदा अभय तसेच वरदान देणारा तो अत्रि-अनसूयानंदन श्री दत्तप्रभू सदैव माझ्या हृदयांत वास करो.॥ दत्तात्रेयः स भगवान्सदा वसतु मे हृदि ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
Mar 18, 2017
श्री स्वामी समर्थ मानसपूजा
|| श्रीगणेशाय नम: ||
नमो स्वामी राजम दत्तावतारम || श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ती रूपम ||
ब्रह्मस्वरूपाय करूणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते ||
हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा || मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा ||
कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा || समर्था तुम्हाविण हो जीव तैसा || १ ||
स्वामी समर्था तुम्ही स्मर्तुगामी || हृदयासनी या बसा प्रार्थितो मी ||
पूजेचे यथासांग साहित्य केले || मखरांत स्वामी गुरू बैसविले || २ ||
महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती || जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती ||
असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ || परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त || ३ ||
सुवर्ण ताटी महारत्न ज्योती || ओवाळोनी अक्षता लावू मोती ||
शुभारंभ ऐसा करूनी पूजेला || चरणा वरी ठेवू या मस्तकाला || ४ ||
हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा || तुझी पाद्यपूजा करी बाळ तुझा ||
प्रणिपात साष्टांग शरणागताचा || तुम्ही वाहिला भार या जीवनाचा || ५ ||
ही ब्रह्मपूजा महाविष्णू पूजा || शिव शंकराची असें शक्तिपूजा ||
दही दूध शुद्धोदकाने तयाला || पंचामृत स्नान घालू प्रभूला || ६ ||
वीणा तुताऱ्या किती वाजताती || शंखादि वाद्ये पहा गर्जताती
म्हणती नगारे गुरूदेव दत्त || श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ || ७ ||
प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली || श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली ||
महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया || महिमा तयांचा कळे ना जगा या || ८ ||
मीं धन्य झालो हे तीर्थ घेता || घडू दे पूजा ही यथासांग आता ||
अजानबाहू भव्य कांती सतेज || नसे मानवी देह हा स्वामीराज || ९ ||
प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज || तया घालुया रेशिमी वस्त्र साज ||
सुगंधित भाळी टिळा रेखियेला || शिरी हा जरीटोप शोभे तयाला || १० ||
वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा || सुवास तो वाढवी भाव साचा ||
शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते || गुलाब जाई जुई अत्तराते || ११ ||
गंधाक्षता वाहूनीया पदाला || ही अर्पूया जीवन पुष्प माला ||
चरणी करांनी मिठी मारू देई || म्हणे लेकरासी सांभाळ आई || १२ ||
इथें लावुया केशर कस्तुरीचा || सुगंधित हा धूप नानाप्रतिचा ||
पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली || गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली || १३ ||
करूणावतारी अवधूत कीर्ति || दयेची कृपेचीं जशी शुद्धमूर्ती ||
प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची || अशी दिव्यता स्वामी योगेश्वरांची || १४ ||
हृदयमंदिराची ही स्नेह ज्योती || मला दाखवी स्वामींची योगमूर्ती ||
करू आरती आर्त भावे प्रभूची || गुरूदेव स्वामी दत्तात्रयाची || १५ ||
पंचारती ही असे पंचप्राण || ओवाळूनी ठेवू चरणा वरून ||
निघेना पुढें शब्द बोलू मी तोही || मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं || १६ ||
हे स्वामीराजा बसा भोजनाला || हा पंचपक्वान्न नैवेद्य केला ||
पुरणाची पोळी तुम्हा आवडीची || लाडू करंजी असें ही खव्याची || १७ ||
डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा || हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा ||
पुढें हात केला या लेकरानें || प्रसाद द्यावा आपुल्या करानें || १८ ||
तांबुल घ्यावा स्वामी समर्था || चरणाची सेवा करू द्यावी आता ||
प्रसन्नतेतून मागू मी काय || हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय || १९ ||
सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू || दुजी दक्षिणा मी तुम्हां काय देऊ ||
नको दूर लोटू आपुल्या मुलासी || कृपा छत्र तुमचेच या बालकासी || २० ||
धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला || पदी ठेवू दे शीर शरणा गताला ||
हृदयी भाव यावें असे तळमळीचे || करी पुर्ण कल्याण जे या जिवाचे || २१ ||
तुझें बाळ पाही तुझी वाट देवा || नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा ||
मनी पूजनाची असे दिव्य ठेव || वसो माझीया अंतरी स्वामी देव || २२ ||
श्री दत्तमहाराजार्पणमस्तु || श्रीगुरूदेव दत्त ll ll स्वामी ॐ ll
Dec 16, 2016
॥ श्रीदत्तात्रेय मानसपूजा ॥
॥ श्रीगणेशायनमः ॥
॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
प्रथम होवोनि सुस्नात । मन करुनिया पवित्र । आसनी बैसावें स्वस्थचित्त । श्रीगुरुमानसपूजेसी ॥१॥
सिद्धासनारुढ ध्यानीं । खेचरी मुद्रा धारणीं । तूंचि तारक आम्हां लागुनी । हरि स्वरुपी दत्तगुरु ॥२॥
मानसपूजें कारणें । परिवारासह तुम्ही येणें । उतावीळ मी दर्शनाकारणे । ऐसी प्रार्थना करावी ॥३॥
सुवर्णयुक्त रत्नजडित । देवतामय सुंदर खचित । सिंहासन मी कल्पिलें येथ । बैसावें जी सद्गुरु मूर्ती ॥४॥
कर्पुर चंदन मिश्रित तेलें । पादप्रक्षालना जल कल्पिलें । स्वीकार कर हो येवेळें । तव चरण प्रक्षाळितों ॥५॥
गंधतुलसी बिल्वपत्र । उदक अक्षता शमी पवित्र । यांनीं भरलें हें सुवर्णपात्र । सुवास तयांचा घ्याहो स्वामी ॥६॥
सुवासिक जल मनांत आणिलें । सुवर्णपात्रीं मग तें भरलें । भक्तीनें तुम्हा अर्पण केलें । आचमन मधुपर्क दिगंबरा ॥७॥
सुगंधित सुंदर तेलें । स्नानालागीं मी कल्पियलें । पंचामृतें गंगोदकें न्हाणिलें । स्वीकारजी देवराया ॥८॥
दिगंबराहो आचां त्यजलें । भक्तीनें तुम्हां अभिषेकिलें । भगवें वस्त्र मृगचर्म अर्पिलें । स्वीकार करा हीच प्रार्थना ॥९॥
बहू सूत्रांनीं असे युक्त । ऐसें हे ब्रह्मसुत्र । म्हणूनी देवतामय सूत्र । धारण करा गुरुवर्या ॥१०॥
भस्म कस्तुरी आणि केशर । चंदनयुक्त परिकर । रत्नाक्षता असती तयार । अलंकृत तुम्हां करितसें ॥११॥
तुळसीगंध शमिबिल्वपत्र । सुवासिक नानापुष्पें येथ । मनात कल्पिलीं म्यां बहूत । अर्पिली ती सद्गुरुचरणी ॥१२॥
लाक्षासिता अभ्रक श्रीवास । श्रीखंड अगरु गुग्गुल खास । युक्तअग्नींत धूपास । घातलासे यतिराया ॥१३॥
सुवर्णपात्र मी कल्पिलें । तयांमध्यें दीप लाविले । कर्पुरयुक्त प्रज्वाळिलें । स्वीकाराहो दत्तप्रभू ॥१४॥
षड्रसाचें पक्वान्न परिकर । गोरसयुक्त मिष्टान्न साचार । सुवर्णपात्रीं ठेविलें सत्वर । भक्षण जलपान करावें ॥१५॥
हस्तमुख प्रक्षालून । सवेचि आचमन करुन । तांबुल दक्षिणादिफलेन । संतुष्ट व्हावें स्वामिया ॥१६॥
रत्नदीपांची आरती लावून । आणि आपणा नमस्कार करुन । करितों तवगुण वर्णन । प्रदक्षिणा सहितपैं ॥१७॥
दिगंबराहो तव मस्तकीं । अर्पिली मंत्रपुष्पांजली कीं । गायन वादन नर्तनादि । उपचार षोडश अर्पिले ॥१८॥
तव प्रेरणेनें प्रेरित । अज्ञान पामर मी खचित । पूजा केलीहो त्वरित । प्रेरक तुम्हीं संतुष्ट व्हावें ॥१९॥
मग घालोनि प्रदक्षिणा । करितों साष्टांग नमना । करद्वय जोडोनि जाणा । तव प्रार्थना करीतसें ॥२०॥
जयजयाजी दिगंबरा । जयजयाजी अत्रीकुमरा । ब्रह्मा विष्णू महेश्वरा । सांभाळावें बालकांसी ॥२१॥
तूं दीनांचा कैवारी । अवतरलासी अनुसूयोदरीं । तुझी भक्ती जो निरंतरीं । प्रतिपाळिसी वरदहस्तें ॥२२॥
ऐसी प्रार्थना करुन । मागतसें तुजलागुन । या मानसपूजेचें पठण । करितां दुःखें हरावीं ॥२३॥
भक्तांची व्हावी कामना पूर्ण । पिशाच्चादि बाधा निरसन । अनेक संकटांपासून । मुक्त व्हावे भक्तानें ॥२४॥
येणेंपरी मागतां वर । प्रसन्न झाला यतिवर । जो भक्तिभावें पठण करील नर । संकटें त्याचीं दूरी पळती ॥२५॥
विश्वास धरील जो मानसीं । त्यासी कृपा करील औदुंबरवासी । न म्हणाहो असत्य यासीं । अनुभवें कळों येईल ॥२६॥
इति श्री दत्तदास विरचितं दत्तात्रेय मानसपूजास्तोत्रं संपूर्णम् ।
॥ श्रीदत्तार्पणमस्तु ॥
॥ दिगंबर दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ॥
