Feb 16, 2024

श्री श्रीधरस्वामीकृत सद्‌गुरुंची मानसपूजा


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री राम समर्थ ॥ 

मानसपूजा म्हणजे ज्या पूजेत आपले मनच सारे सोपस्कार थोड्या थोड्या प्रमाणात करते, ती पूजा. परमात्म्याला मानसपूजा खूप आवडते, असे श्री समर्थांनी सांगितले आहे. सगुण व निर्गुण ही परमात्म्याची दोन रूपे आहेत. सगुण साकार रूपात देहाचा आकार असतो, निर्गुण-निराकार रूपात एकाच एक बिंदूत आनंद असतो. त्यात देह-आकाराशी सुतराम् संबंध नसतो. सगुणरूपात श्रीगुरू व देव दोन्ही प्रकार असतात. श्रीगुरू सगळ्या देवांचे रूप व आनंदघन-परब्रह्म असतो. श्रीगुरूचे रूप हे मुमुक्षूंसाठी मोक्षाची वाट दाखवणारे, प्रत्येकाला मंगलमय आनंद देणारे असते. आपल्या देहात मस्तक हे उत्तमांग असे गणले जाते. त्यातही त्याच्या मधोमध असलेले ब्रह्मरंध्र हे अत्युत्तम. येथे येणाऱ्या ब्रह्म या शब्दावरून याची महती समजते. ही जागा जी आहे ती अनंतानंदरूप असलेली, ब्रह्मस्वरूप जागा मानली जाते. 'गुरुर्ब्रह्म नमाम्यहम्', साक्षात् परब्रह्मस्वरूप गुरूला वंदन करतो - म्हणून श्रीगुरूला नमस्कार करताना, त्याचे रूप लक्षात घेऊन नमस्कार करण्याची पद्धत गुरुतत्त्वाचे प्रतिपादन करणारे ग्रंथ सांगतात. हे ब्रह्मरंध्र श्रीगुरूचे वासस्थान आहे. याला सहस्रदल कमल असेही म्हणतात. या सहस्रदल कमलाच्या मध्यकर्णिकेवर लक्ष केंद्रित करून अनंत आनंदरूप श्रीगुरूचे ध्यान करावे. त्याचे बरेच प्रकाश आहेत, पण नव्या साधकाला कल्पना यावी यासाठी श्रीगुरूचा प्रकाश हा निष्कलंक चंद्रप्रकाशासारखा आहे, असे समजून त्याने ध्यान करावे.

तो अमृतरूप चांदण्याचा पसरलेला प्रकाश हाच श्रीगुरूचा देह समजावा. चोहीकडे पसरलेल्या त्या आनंदानेच अमृतरूप चांदण्याच्या प्रकाशाचे रूप धारण केलेल्या, शुभ्रवर्णाच्या आपल्या शुभ रूपाला त्या सहस्रदल कमलाच्या मध्यकर्णिकेच्या मधोमध बसलेल्या प्रसन्नवदन श्रीगुरूचे ध्यान करावे. नंतर आसन, पाद्य, अर्घ्य, स्नान, वस्त्र, गंध-अलंकार, पांढरे सुवासिक फूल, सुगंधी अत्तर अर्पण करावे. तुलसीदल, बिल्वदल किंवा पांढरे फूल घेऊन एकशे आठ किंवा एक हजार एक वेळा 'श्रीधराय नमः'ची नामपूजा करावी. त्यानंतर धूप-दीप व नैवेद्यात हव्या त्या पक्वान्नांची निर्मिती करून सोन्याच्या थाळीत श्रीगुरूला पोटभर जेवू घालावे. हात धुतल्यानंतर अनेक फलार्पण करून श्रीगुरूला तृप्त करावे. त्यानंतर मुखशुद्धीसाठी तुलसीपत्र देऊन, असेल तेवढे नाणे नवरत्न महादक्षिणा म्हणून द्यावे. नंतर मंगलारती, मंत्रपुष्प, स्तोत्र, प्रदक्षिणा आटोपून नमस्कार करून, श्रीगुरूच्या कृपाळू, प्रसन्न मुखकमलावरील मंदहास्य पाहात जप करावा. ब्रह्मानंदाच्या अद्‌भुत प्रकाशाने युक्त अर्चना समर्पित करावी. पाणी, धूप-दीप व नैवेद्य, सगळे आपण तृप्त होईपर्यंत अर्पण करावे. 

इति शिवम्

- श्री श्रीधरस्वामी

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥


मूळ स्रोत : श्रीसद्‌गुरुबोधामृत


No comments:

Post a Comment