Jun 22, 2019

श्री वासुदेव निवास


परमपूज्य योगीराज सदगुरू श्रीवामनराव गुळवणी महाराज हे दत्तसंप्रदायातील एक अधिकारी सत्पुरुष होते. भगवान दत्तात्रेयांच्या कृपेने त्यांचा जन्म मातोश्री सौ. उमाबाई आणि पिताश्री पं. दत्तंभटजी या दत्तोपासक दांपत्याच्या पोटी दि. २३ डिसेंबर १८८६ रोजी कुडूत्री जि. कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या घराण्यात अनेक पिढ्यांची दत्तोपासना होती. प. पू. श्रीगुळवणी महाराजांनी त्यांचे सदगुरू प.प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज यांच्या दर्शनासाठी चौदाशे किलोमीटर प्रवास केला, त्यातील तब्बल सातशे किलोमीटर प्रवास पायी केला. शेवटी कर्नाटकातील हावनुर येथे त्यांचे दर्शन झाले. याच भेटीत श्रीस्वामी महाराजांनी त्यांना मंत्रोपदेश केला आणि स्वतःमध्ये व्याघ्रांबरधारी भगवान दत्तात्रेयांचे दर्शन घडविले. प. पू. श्रीगुळवणी महाराज चित्रकार होते, त्यांना झालेल्या दर्शनाचे तैलचित्र त्यांनी तयार केले जे आजही श्रीवासुदेव निवास मध्ये देवघरात विराजमान आहे. श्रीस्वामीमहाराजांच्यानंतर पू. श्री गुरुमहाराजांची योगसाधना व महायोगाची जिज्ञासा पाहून प.प. श्रीलोकनाथतीर्थ स्वामीमहाराजांनी त्यांना शक्तिपात दीक्षा दिली. दत्तभक्ती आणि महायोग अर्थात शक्तिपातविद्या यांचा अपूर्व संगम सदगुरू योगीराज श्रीगुळवणी महाराज यांच्या जीवनात झाला आहे. आर्त, मुमुक्षु भक्तांच्या अंतिम कल्याणासाठी भक्तीमार्ग आणि शक्तिपात मार्ग या दोन्हींच्या प्रसारासाठी योगीराजांनी संपूर्ण जीवनभर दीपस्तंभाप्रमाणे कार्य केले.

गुरुतत्व हेच ईश्वरी तत्व आहे तसेच ते विश्व व्यापक आहे, त्याचे वर्णन ‘वासुदेवः सर्वम्’ असेच आहे या भुमिकेतून परमपूज्य योगीराज सदगुरू श्रीगुळवणी महाराजांनी सन १९६५ साली ‘श्रीवासुदेव निवास’ ची स्थापना ‘१२/४७, कर्वे पथ, एरंडवणे, पुणे’ येथे केली. ‘श्री वासुदेव निवास’  शक्तिपात योगविद्येचे आद्यपीठ आणि नित्य प्रकाशित दीपस्तंभ म्हणून जगभर विख्यात आहेच. तसेच प. पू. श्री महाराजांच्या मातोश्री सौ. उमाबाई यांना भगवान श्री दत्तात्रेयांच्या पादुका प्रसाद रूपाने प्राप्त झाल्या, त्याच ‘श्रीप्रसाद पादुका’ श्रीवासुदेव निवासमध्ये अधिष्ठित आहेत.

प.प. श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी यांची समग्र ग्रंथसंपदा तसेच प.प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांचे चरित्र आणि परमपूज्य योगीराज सदगुरू श्रीगुळवणी महाराजांचा जीवनपट ‘श्रीवासुदेव निवास’ यांच्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध आहे. भाविकांनी याचा जरूर लाभ घ्यावा.   


प.प.श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी विरचित समग्र ग्रंथसंपदा, स्तोत्रसंग्रह, नित्य उपासना