Showing posts with label आरती. Show all posts
Showing posts with label आरती. Show all posts

Aug 28, 2025

ओवाळीतो स्वामीराया... दावी चिन्मय स्वरुपाला


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते गजाननाय

या अखंड चराचराला व्यापून टाकणारा तो सर्वशक्तिमान परमात्मा या जगताच्या कल्याणासाठीच विविध रूपें धारण करतो. आपल्या परमभक्तांच्या उद्धारासाठी, मुमुक्षु जनांना सत्पथी लावण्यासाठीच त्याच्या या सर्व लीला असतात. कधी कधी तो निर्गुण, निराकार परमात्मा सगुण, साकार होऊन संतरूपांत अवतरित होतो आणि सर्वांनाच त्याच्या या सगुणरुपाचा ध्यास लागतो. हे संत-महात्मे असंख्य बद्ध, मुमुक्षु जनांवर कृपा करतात, आपल्यासारख्या सामान्य जनांना सन्मार्ग दाखवितात. अशा साक्षात् परब्रह्मस्वरुप संतांमध्ये शेगावनिवासी संतशिरोमणी श्री गजानन महाराजांचे स्थान अनन्यसाधारण आहे.

आपल्या अवतारकाळांत श्रीगजानन स्वामींनी असंख्य भक्तांवर कृपानुग्रह केला, आणि आजही ‘ देहांताच्या नंतरहि । कितीजणा अनुभव येई ॥' अशी प्रचिती कित्येक गजाननभक्तांना येत आहे. संतकवी दासगणू महाराजांनी श्रीगजानन विजय या प्रासादिक ग्रंथात गजाननासी अंगें सारीं । होतीं योगाचीं अवगत ॥ अनेक वेळा सांगितले आहे. अशा साक्षात्कारी संतपुरुषांचा वास त्यांच्या स्थूल देहापेक्षा सूक्ष्मांत असतो. त्यांमुळे या योगीराजांच्या समाधीनंतरही त्यांचे अवतार कार्य अखंड, अविरत सुरूच असते. किंबुहना ते सहस्त्रपटींनी अधिक कार्यरत होते. सिद्धयोगी श्रीगजानन महाराजांनी समाधी घेऊन एक शतकापेक्षाही अधिक काळ लोटला आहे, तरीही ' मी गेलों ऐसें मानूं नका । मी आहे येथेंच ॥' या समर्थवचनांची अनुभूती आजही त्यांच्या भक्तांना येत आहे. श्री क्षेत्र शेगांव येथे दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी आणि भक्तांकडून श्रीगजानन विजय या समर्थांच्या चरित्रग्रंथांची होणारी नित्य पारायणे या गोष्टीची साक्ष देतात. 

या दिव्य ग्रंथातील अध्याय १९ आणि अध्याय २१ मध्ये श्रीगजानन महाराजांचे निष्ठावंत भक्त रामचंद्र निमोणकर यांचा उल्लेख आहे. ऐसाच एक निमोणकर । गोविंदाचा कुमार । रामचंद्र नामें साचार । ओव्हरसियरच्या हुद्यावरी ॥ योगयोगेश्वर गजानन महाराजांचा त्यांना प्रसाद प्राप्त झाला आणि योगाभ्यास थोडा बहुत । आला निमोणकराप्रत । श्रीगजाननकृपेनें ॥   त्यांनी समर्थ सदगुरु श्रीगजानन महाराजांवर एक पुस्तिका लिहून ती प्रकाशित केली होती. या पुस्तिकेतील ही अतिशय सुंदर, भावपूर्ण आरती ! या सद्‌भक्ताची महाराजांच्या ठायीं असलेली भक्ती, अनन्य श्रद्धा आणि शरणागतीचा भाव या आरतीतील प्रत्येक पदांतून विनासायास व्यक्त होतात.     

ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया । आवडी जगन्मोहीनीला । दावी चिन्मय स्वरुपाला ॥धृ॥ देई सद्‌बुद्धी मजला । प्रेमे तव यश गाण्याला । भक्तांकिता स्वामीराया, चरण मी शरण, करुनी भय हरण दावी सुखसदन, अमित मम दोष लागुनीया । विनवितो दास तुम्हा सदया ॥१॥ ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया । आवडी जगन्मोहीनीला । दावी चिन्मय स्वरुपाला ॥  जनपद मुक्ति पदान्याया । स्थली या अवतरला राया । ही जड मुढ मनुष्य काया । पदी तव अर्पियली राया । हे दिव्य वसन योगीराया । नको मज जनन, पुनरुपी मरण । प्रार्थना हेचि असे पाया ॥२॥ ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया । आवडी जगन्मोहीनीला । दावी चिन्मय स्वरुपाला ॥  नेण्या आत्मतमा विलया । आलासी ज्ञान रवी उदया । करी तू ज्ञानी जना राया। निरखुनी मोह पटल माया । गजानन संतराजा, असशी बलवंत, तसा तू धिमंत । नको बघू अंत, विनवितो दास तुम्हा राया । नका त्या दुर करु सदया ॥३॥ ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया । आवडी जगन्मोहीनीला । दावी चिन्मय स्वरुपाला ॥

    

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
मूळ स्रोत : श्रीगजानन महाराज चरित्र कोश - ( लेखन, संशोधन - दासभार्गव )

 

Dec 12, 2024

शरण मी आलो तुज, श्रीपती ठेवियला माथा...


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥















पंचप्राण काकड आरती, तत्वात्मक ज्योती, लावुनी तत्वात्मक ज्योती, ओवाळीला गुरुत्रयमूर्ती ।

ओवाळू आरती माझ्या सद्‌गुरुनाथा, शरण मी आलो तुज, श्रीपती ठेवियला माथा ॥धृ.॥ कृष्णा सुपंचगंगा अनादि संगमी, नरहरी अनादि संगमी । राहे गुरुवर तरुतळी, राहे यतिवर तरुतळी तो हा माझा कुलस्वामी । ओवाळू आरती माझ्या सद्‌गुरुनाथा, शरण मी आलो तुज, श्रीपती ठेवियला माथा ॥१॥ द्वारी चौघडा वाजे, वाजंत्री वाजती, कर्णे वाजंत्री वाजती । नाना घोषे गर्जती, नाना वाद्ये गर्जती, भक्त स्वानंदे स्तविती । ओवाळू आरती माझ्या सद्‌गुरुनाथा, शरण मी आलो तुज, श्रीपती ठेवियला माथा ॥२॥ इंद्रादि सुरवर, पन्नग दर्शनास येती, श्रींचे दर्शनास येती । नारद मुनिवर, किन्नर तुंबरे आळविती, सुस्वरे आळविती । ओवाळू आरती माझ्या सद्‌गुरुनाथा, शरण मी आलो तुज, श्रीपती ठेवियला माथा ॥३॥ पाहुनी सिंहासनी आदिमूर्ती सावळी, चिन्मय आदिमूर्ती सावळी । श्रीगुरुभक्त तन्मय, श्रीगुरुभक्त निर्भय, श्रीपदां ओवाळी । ओवाळू आरती माझ्या सद्‌गुरुनाथा, शरण मी आलो तुज, श्रीपती ठेवियला माथा ॥४॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


Aug 26, 2024

अवतार गोकुळीं हो


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् । देवकीपरमानंदं कृष्णं वंदे जगद्‌गुरुम् ॥ 

 

अवतार गोकुळीं हो । जन तारावयासी ॥ लावण्यरूपडें हो । तेजःपुंजाळराशी ॥ उगवलें कोटिबिंब । रवि लोपला शशी ॥ उत्साह सुरवरां । महाथोर मानसीं ॥१॥ जय देवा कृष्णनाथा । राईरखुमाईकांता ॥ आरती ओवाळीन । तुम्हां देवकीसुता ॥धृ.॥  कौतुक पहावया । माव ब्रह्मयानें केली ॥ वत्सेंही चोरुनीयां । सत्यलोकासी नेलीं ॥ गोपाळ गाई वत्सें । दोंहीं ठायीं रक्षिलीं ॥ सुखाचा प्रेमसिंधू । अनाथाची माऊली ॥२॥  चारितां गोधनें हो । इंद्र कोपला भारी ॥ मेघ जो कडाडीला । शिळा वर्षल्या धारीं ॥ रक्षिलें गोकुळ हो । नखीं धरिला गिरी ॥ निर्भय लोकपाळ । अवतरला हरी ॥३॥  वसुदेवदेवकीचे । बंध फोडिली शाळ ॥ होऊनियां विश्व-जनिता । तया पोटिंचा बाळ ॥ दैत्य हे त्रासियेले । समूळ कंसासी काळ ॥ राज्य हें उग्रसेना । केला मथुरापाळ ॥४॥  तारिले भक्तजन । दैत्य सर्व निर्दाळून ॥ पांडवसाह्यकारी । आडलिया निर्वाणीं ॥ गुण मी काय वर्णू । मति केवढी वाणी ॥ विनवितो दास तुका । ठाव मागे चरणीं ॥५॥ *************************************************** ओंवाळूं आरती मदनगोपाळा । श्यामसुंदरगळां वैजयंती माळा ॥धृ.॥  चरणकमळ ज्याचें अतिसुकुमार । ध्वजवज्रांकुश ब्रीदाते तोडर ॥१॥  नाभिकमल ज्याचें ब्रह्मयाचें स्थान । हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन ॥२॥  मुखकमल पाहतां सूर्याच्या कोटी । मोहियेलें मानस कोंदियेली दृष्टी ॥३॥  जडित मुगुट ज्याचा दैदीप्यमान । तेणें तेजें कोंदलें अवघें त्रिभुवन ॥४॥  एका जनार्दनीं देखियेलें रूप । रूप पाहों जातां झालें द्‌रूप ॥५॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

***************************************************


॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥


श्रीहरिविजय - बलराम-श्रीकृष्ण जन्म कथा


॥ श्री गुरुदेव दत्त ॥


Apr 26, 2024

श्रीनृसिंहतात्यामहाराजकृत श्रीमाणिकप्रभूंची आरती


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


जय देव जय देव जयगुरू माणिका । सद्‌गुरु माणिका ।  तव पद मोक्ष आम्हां न स्मरू आणिका ॥धृ.॥ काया वाचा मनें शुद्ध मी शरण तुसी । ठेवुनी मस्तकि हस्तक ज्योती मिळविसी ।  मुमुक्षूला मोक्ष क्षणार्धे तूं देशी । दाउनि चारि देह ब्रह्मा म्हणवीसी ॥१॥ देहातीत विदेही योगी मुगुटमणी । कर्म शुभाशुभ करिसी हेतू नाही मनीं । राजा अथवा रंक पाहसी सम दोनी । तवसम साधू असती परि योगित्वासि उणी ॥२॥ परोपकारी अससी वर्णू काय किती । अकल्पिता तूं देसी करू मी काय स्तुती ।  वर्णाया गुरुमहिमा शेषा नाहि मती । जग ताराया आलासी अंशत्रयमूर्ती ॥३॥  सुरवर इच्छिति दर्शन घेऊं आम्हि त्यासी । देवादिकां अप्राप्त प्राप्त तू आम्हासी ।  पडता चरणीं मी मुक्त होईन म्हणे काशी । सुकृत बहु जन्मांचें नरसिंहापाशी ॥४॥


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥



Jan 5, 2024

जय देव जय देव जय जय सुखमूर्ते - श्री स्वामी समर्थ आरती


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्री स्वामी समर्थाय नमः

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ


जय देव जय देव जय जय सुखमूर्ते । हो स्वामी गुरुमाते ।  आरती ओवाळीतो निर्गुण-सगुणाते ॥धृ.॥ जय देव… वारुळातुनी आला कोणासी वाटे  कोणी म्हणती आला वटवृक्षावाटे धरणीतुनी आला की ओंकारावाटे कोठुनी आला नकळे नकळे कोणाते ॥१॥ जय देव…  काही केल्या नकळे कुळ-मूळ या गुरुचे  सगुण-निर्गुण झाले एकचि परि साचे देवा-मनुजा कौतुक या अवताराचे स्वामी समर्थ झाले जगता उद्धर्ते ॥२॥ जय देव… कोटी आदित्यासम दाहक तव चर्या  कोटी चंद्रसुशीतल परि तू गुरुवर्या  करुणावत्सल करिशी माया सर्वांते चरणी आश्रय लाभे चारही लोकांते ॥३॥ जय देव… कोहं-सोहं शिकविशी ज्ञान-मार्गाने  चित्त-बुद्धी स्थिरविशी नित्य ध्यानाने  भक्ती मार्गा नेसी डोळस श्रद्धेने सार्थक झाले वाटे येऊनि जन्माते ॥४॥ जय देव… कर्मे सर्व सरवा नुरवा आसक्ती भक्तीसेवा करवा मुरवा सुखशांती योगक्षेमा पुरवा विरवा भ्रांतीते ठेवा सदैव चरणी आम्हां गुरुमाते ॥५॥ जय देव…


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


रचनाकार - श्रीयुत् नागेश करंबेळकर


Sep 28, 2023

श्रीदत्तगुरुनाथाची आरती

















॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

अळल निरंजन योगी उन्मन अवधूता दयाळा उन्मन अवधूता ॥

जग संजीवन पावक जग संजीवन पावक सोहं उद्‌गाता
ॐ - दत्तगुरुनाथ ॥ ॐ - दत्तगुरुनाथ ॥
निर्गुण निरहंकारा ॐकारा प्रणवा दयाळा ॐकारा प्रणवा
त्रिगुणात्मक त्रयमूर्ती त्रिगुणात्मक त्रयमूर्ती विश्वंभर देवा
ॐ - दत्तगुरुनाथ ॥ ॐ - दत्तगुरुनाथ दंडकमंडलुधारी मंगल बटुवेषा दयाळा मंगल बटुवेषा ॥
अनसूयेच्या अंगी अनसूयेच्या अंगी ॥ खेळसी जगदीशा ॥
ॐ - दत्तगुरुनाथ ॥ ॐ - दत्तगुरुनाथ षड्भुज धरिले परि तो सूचक शास्त्रांचे ॥ दयाळा सूचक शास्त्रांचे ॥
गुरगुरती ही श्वानें ॥ गुरगुरती ही श्वानें ॥ वदती वेदांचे ॥
ॐ - दत्तगुरुनाथ ॥ ॐ - दत्तगुरुनाथ ॥ जोडीत धरुनी पाणि चरणांवरी माथा दयाळा चरणांवरी माथा ॥
तव पदरजस्पर्शाने तव पद- पदरजस्पर्शाने पावन करी आता ॥
ॐ - दत्तगुरुनाथ ॥ ॐ - दत्तगुरुनाथ ॥ 


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥


Aug 15, 2022

सोरटी सोमनाथ करंजे माहात्म्य


श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय ॥


सौराष्ट्रदेशे विशदेऽतिरम्ये ज्योतिर्मयं चन्द्रकलावतंसम ।

भक्तिप्रदानाय कृपावतीर्णं तं सोमनाथं शरणं प्रपद्ये ॥

अर्थात चंद्रदेवांच्या भक्तीने प्रसन्न होऊन, त्या सोमाच्या तपाचे फलित म्हणून जो परम कृपाळू शिवशम्भू या सौराष्ट्र देशांत अवतरित झाला आहे, ज्याने प्रत्यक्ष चंद्राला आभूषण म्हणून स्वतःच्या मस्तकी धारण केले आहे, तो ज्योतिर्लिंगस्वरुप भगवान श्री सोमनाथ माझा आश्रयदाता आहे.  
जागृत बारा ज्योतिर्लिंगांतील प्रथम ज्योतिर्लिंग म्हणून सोरटी सोमनाथ हे प्रसिद्ध आहे. हा भोळा सांब, शिवभक्त मालूबाई हिच्यासाठी करंजे क्षेत्रीं येऊन राहिला. या करंजे क्षेत्राचे वैशिष्ट्य असे की श्रावण महिन्यातील सोमवारी सोरटी सोमनाथ येथून प्रत्यक्ष महादेवच सर्परूपात इथे येतो असे मानले जाते. त्या नागराजरूपी श्री गिरिजापतीलाच, स्थानिक भाविक ' स्वारी येणे ' असे म्हणतात. या सर्पाच्या मस्तकावर कुऱ्हाडीने घाव घातल्याची खूण स्पष्ट दिसते.

सोमनाथांची आरती जय देव जय देव सोमनाथा । आरती ओवाळीतो मनोभावें आतां ॥धृ. ॥ मालुबाई सती पतिव्रता थोर । भक्ति करुनी आणिले सोरटी सोमेश्वर ॥ पतीने पाळत धरुनी पाहिला चमत्कार । जावा नणंदांचा त्रास सोसिला फार ॥१॥ देखोनी सतीच्या त्रासाते देव । स्वप्नी प्रगटोनी सांगितसे सर्व । शेषरुपी येऊनी करीन वास्तव्य । धेनुसी वेष्ठुनी दुग्ध प्राशीन मी बरवे ॥२॥ स्वप्नाप्रमाणें नाथ शेषरुपी आले । धेनु वेष्ठुनी दुग्ध पिऊं लागले । देखोनी खोमणेराव भयचकित झाले । कुऱ्हाड फेकुनी देवा तुम्हां मारिले ॥४॥ उत्तर ऐकता मालू त्रासली फार । देखोनी खोमणा शाप दिलासे थोर । ऐकोनी शाप खोमणा कापे थरथर । प्रगटोनी देवा त्याचा केला उद्धार ॥४॥ खोमण्याचा उद्धार मालू देखोनी । देवा तुजला मी बोलू कशा रीतीनी । मालूचे शब्द देवा ऐकोनी कानी । तत्काली उद्धरिली मालू भामिनी ॥५॥ सर्परुपे निघतां भक्ति पाहूनी । भक्त घेताती आनंदे उचलोनी । विधीयुक्त तुमची पुजा करोनी । पाजिती दूग्ध तुम्हां शर्करा घालोनी ॥६॥ सोमनाथा तुम्ही भक्ति भुकेला । मालू महादू यांचा उद्धार केला । अल्पबुद्धि खोमणा तोही उद्धरिला । आबा पाटील दास लागें चरणाला ॥७॥

कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी । कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥


॥ ॐ नमः शिवाय ॥

श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु


Jun 16, 2022

॥ आरती दत्तात्रेय प्रभूंची । करावी सद्‌भावें साची ॥


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


आरती दत्तात्रेय प्रभूंची । करावी सद्‌भावें साची ॥धृ.॥

श्रीपद कमळा लाजविती । वर्तुळ गुल्फ रम्य दिसती ॥ कटिस्थित कौपिन ती वरती । छाटी अरुणोदय परि ती ॥ वर्णूं काय तिची लीला ?। हीच प्रसवली । मिष्ट अन्न बहु । तुष्टचि झालें ॥ ब्रह्म-क्षत्र आणि । वैश्य-शूद्रही । सेवुनिया जीची । करावी सद्‌भावें साची ॥१॥ गुरुवर सुंदर जगजेठी । त्याच्या ब्रह्मांडें पोटीं ॥ माळा अवलंबित कंठीं । बिंबफळ रम्य वर्ण ओष्ठीं ॥ अहा ती कुंदरदन शोभा । दंड कमंडलु शंख चक्र करि ।

गदा पद्म धरिं । जटा मुकुट शिरीं । शोभतसे ज्याची ॥ करावी सद्‌भावें साची ॥२॥ रुचिरा सौम्य युग्म दृष्टी । जिनें द्विज तारियला कुष्ठी ॥ दरिद्री ब्राह्मण बहु कष्टी । केला जिनेंच संतुष्टी ॥ दयाळा किती म्हणुनि वर्णूं । वंध्या वृद्धा । तिची सुश्रद्धा ।

पाहुनि विबुधा । पुत्ररत्‍न जिस । देऊनियां सतिची ॥ इच्छा पुरवियली मनिंची ॥३॥ देवा अघटित तव लीला । रजकहि चक्रवर्ति केला ॥ दावुनि विश्वरूप मुनिला । द्विजोदरशूल पळें हरिला ॥ दुभविली वांझ महिषी एक । निमिषामाजीं । श्रीशैल्याला ।

तंतुक नेला । पतिताकरवीं । वेद वदविला ॥ महिमा अशी ज्याची ॥४॥ वळखुनी शूद्रभाव चित्तीं । दिधलें पीक अमित शेतीं ॥ भूसुर एक शुष्क वृत्ती । क्षणार्धें धनद तया करिती ॥ ज्याची अतुल असे करणी । नयन झांकुनी । सवें उघडितां ।

नेला काशीस । भक्त पाहतां ॥ वार्ता अशी ज्याची ॥५॥ दयाकुल औदुंबर मूर्ती । नमितां होय शांत वृत्ती ॥ न देति जनन मरण पुढती । सत्य हें न धरा मनीं भ्रांती ॥ सनातन सर्वसाक्षि ऐसा । दुस्तर हा भव । निस्तरावया ।

जाऊनि सत्वर । आम्ही सविस्तर ॥ पूजा करूं त्याची ॥६॥ तल्लिन हो‍ऊनि गुरुचरणीं । जोडुनि भक्तराज पाणि ॥ मागे हेंचि जनकजननी । आता मजला ठाव देई चरणीं ॥ नको मज दुजें आणिक कांहीं । भक्तवत्सला । दीनदयाळा ।

परमकृपाळा । श्रीपदकमळा । दास नित्य ज्याची ॥ उपेक्षा करूं नको साची ॥७॥


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥


Apr 28, 2022

॥ जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था ॥


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था । आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा ॥धृ.॥ छेली-खेडेग्रामीं तू अवतरलासी । जगदुद्धारासाठी, राया तू फिरसी । भक्तवत्सल खरा, तू एक होसी । म्हणूनी शरण आलो, तुझिया चरणांसी ॥१॥ त्रैगुणपरब्रह्म तुझा अवतार । याची काय वर्णू लीला पामर । शेषादिक शिणले, नलगे त्या पार । तेथे जडमूढ कैसा करु विस्तार ॥२॥  देवाधिदेव तू स्वामीराया । निर्जर मुनिजन ध्याती, भावे तव पाया । तुजसि अर्पण केली आपली ही काया । शरणागता तारी तू स्वामीराया ॥३॥ अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले । कीर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे । चरणप्रसाद मोठा, मज हे अनुभवले । तुझ्या सूता न लगे, चरणावेगळे ॥४॥
 ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

 



Apr 3, 2022

श्री आनंदनाथ महाराजकृत अभंग आणि एकारती


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः

अभंग
आधी नमूं तुमच्या पायां । भक्तवत्सल स्वामिराया ॥१॥ तूंचि माझा बुद्धिदाता । शरण शरण हो समर्था ॥२॥ चौदा विद्यांच्या दातारा । शिरीं ठेवा अभय करा ॥३॥ चौसष्ट कळांचा हा रंग । तुझ्या पायींचा सुरंग ॥४॥ आनंद म्हणे आदि अंत । आम्ही नमिला समर्थ ॥५॥

देह रंग रंगुनि जावा । ठायीं ठायीं स्वामी पाहावा ॥१॥ हीच भक्तिची कसोटी । खरी राखा रे लंगोटी ॥२॥ कैंची संचिताची जोडी । धन वेंची कवडी कवडी ॥३॥ आनंद म्हणे बंड झाले । भक्तीविणें नरका गेले ॥४॥
धन्य अक्कलकोट, धन्य ही बा पेठ । सत्य भुवैकुंठ देखीयले ॥१॥ सुंदर देऊळ समर्थाचे जाण । शोभा ही बा पूर्ण आणीतसे ॥२॥ काय वानूं आतां तेथिल हें भाग्य । मुक्ति लागे वेगें पायरीसी ॥३॥ जोडोनिया कर देव लोटांगणी । लोळती चरणी समर्थाच्या ॥४॥ आनंद म्हणे ऐसे पूर्ण परब्रह्म । अक्कलकोटी वर्म राहीलेंसे ॥५॥ एकारती  प्रेमभावे श्रीगुरुपायी एकारती करूं । अनंत ब्रह्मे रोमी त्यासी कैसे हो धरूं ॥१॥  सर्व ठाव भाव पायीं ओवाळीला । एकारतीचे ध्यान प्रभु ओवाळूं तुजला ॥२॥  तनमन अवघें एकत्र केलें। निजानंद भावें तुजला हो भुलवीलें ॥३॥  सोहं शब्द स्वरूपी समरूप झालों । निजानंदी आनंद रूपासीं मिळलों ॥४॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


Mar 10, 2022

श्री अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


जयदेव जयदेव जय जय अवधुता ।  अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता ॥धृ.॥  तुझे दर्शन होता जाती ही पापे । स्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरिते ।  चरणी मस्तक ठेवुनी मनी समजा पुरिते । वैकुंठीचें सुख नाही यापरते ॥१॥  सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा । कर्णी कुंडल शोभती वक्षस्थळी माळा ।  शरणागत तुज होता भय पडले काळा । तुझे दास करिती सेवा सोज्वळा ॥२॥  मानवरूपी काया दिससी आम्हांस । अक्कलकोटी केला यतिवेषे वास ।  पूर्णब्रह्म तूची अवतरलासी खास । अज्ञानी जीवास विपरित हा भास ॥३॥  निर्गुण निर्विकार विश्वव्यापक । स्थिरचर व्यापुनि अवघा उरलासी एक ।  अनंत रूपे धरिसी करणे मायिक । तुझे गुण वर्णिता थकले विधिलेख ॥४॥  घडता अनंत जन्मी सुकृत हे गांठी । त्याची ही फलप्राप्ती सद्‌गुरुची भेटी ।  सुवर्ण ताटी भरली अमृतरस वाटी । शरणागत दासावरी करी कृपादृष्टी ॥५॥



Sep 15, 2021

श्री स्वामी समर्थ आरती - पंचप्राण हे आतुर झाले


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती ।

सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥धृ.

हरी हर संगे ब्रह्मदेवही, खेळे तव भाळी पुनव हासते प्रसन्नतेने मुख चंद्राचे वरी ।

लाजविती रवि तेजाला, तव नयनांच्या ज्योती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥१

पुण्यप्रद तव नाम असावे, सदैव या ओठी ।श्वासासंगे स्पंदन व्हावे, तुझेच जगजेठी । 

अगाध महिमा अगाध आहे, स्वामी तव शक्ती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥२ धर्माचरणी पावन व्हावे, सदा असो सन्मति । सत्कर्माचा यज्ञ घडावा, झिजवुनि ही यष्टी ।

सन्मार्गाने  सदैव न्यावे, घेऊनी मज हाती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥३ अहंपणाचा लोप करुनि, कृतार्थ जीवन करा । पावन करुनी घ्यावे मजला, तेजोमय भास्करा ।

अल्पचि भिक्षा घालुनि, स्वामी न्यावे मज संगती । सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥४



Jun 21, 2020

आरती दत्तगुरूंची - श्री गुरु दत्तराज मूर्ती


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 


श्री गुरु दत्तराज मूर्ती ओवाळीतो प्रेमे आरती ॥धृ.॥

ब्रह्मा विष्णू शंकराचा, असे अवतार श्री गुरुचा

कराया उद्धार जगाचा, जाहला बाळ अत्रीऋषीचा

धरीला वेष असे यतीचा, मस्तकी मुगुट शोभे जटेचा

कंठी रुद्राक्ष माळ धरुनी, हातामधे आयुधे बहुत भरूनी ,

तेणे भक्तांचे क्लेश हरूनी, त्यासी करूनी नमन

अघशमन होईल रिपुदमन, गमन असे त्रैलोक्यावरती

ओवाळीतो प्रेमे आरती, श्री गुरु दत्तराज मूर्ती... ॥१॥

गाणगापुरी वस्ती ज्याची, प्रीती औदुंबर छायेसी

भीमा अमर संगमाची, भक्ती असे बहूत सुशिष्यांची

वाट दावूनीया योगाची, ठेव देत असे निज मुक्तीची

काशी क्षेत्री स्नान करितो, करविरी भिक्षेला जातो

माहुरी निद्रेला वरीतो, तरतरीत छाटी, झरझरित

नेत्र, गरगरित शोभतो त्रिशुळ जया हाती

ओवाळीतो प्रेमे आरती, श्री गुरु दत्तराज मूर्ती... ॥२॥

अवधुत स्वामी सुखानंदा, ओवाळीतो सौख्यकंदा

तारी हा दास हृदयकंदा, सोडवी विषय मोहछंदा

आलो शरण अत्रीनंदा, दावी सद्गुरु ब्रह्मानंदा

चुकवी चौऱ्यांशीचा फेरा, घालीती षडरिपू मज घेरा

गांजीती पुत्र पौत्र दारा, वदवी भजन मुखी, तव

पूजन करीत असे सुजन जयांचे बलवंतावरती 

ओवाळीतो प्रेमे आरती, श्री गुरु दत्तराज मूर्ती... ॥३॥



Mar 21, 2019

श्रीपाद श्रीवल्लभ आरती


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥  ॥ श्री  गुरुवे  नम: ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥


गोदातट पवित्र पिठीकापूर स्थान ।

सगुण रूपाने करिसी जगताला धन्य ।।

आपळ - सुमती - बापन्नासी भाससी तू सान ।

निर्गुण रूपे भूषविसी ब्रह्मांडाचे आसन ।।

जयदेव जयदेव जय सदगुरु दत्ता हो श्री सदगुरु दत्ता ।

श्रीपाद श्रीवल्लभ परब्रह्म रूपा जयदेव जयदेव ।।१।।


संकल्पासी कथूनी तू कार्यासी धरिसी ।

मुनिजन - साधू - भक्ता निर्भय तू करिसी ।।

खल - कली - कामी जनांही तू उद्धरसी ।

अभिनव लीले पातक कर्मा नाशविसी ।। जयदेव ० ।।२।।


अंध पंगु भ्रात्यांना आरोग्य ते दिधले ।

कुरवपुरासी जाऊनी मुनिजन उद्धरिले ।।

दर्शन मात्रे तुझिया अनेका संतत्व ते फळले ।

प्रिती तुजवर जडुनि कर्मांचे बंधन हे जळले ।। जयदेव ० ।।३।।


नामानंदासी दाखविले चांडाळाचे रूप ।

वल्लभदासासी आणिले अरण्यातून सुखरूप ।।

लोहकारासी रक्षुनी धरिसी गाडीवानाचे रूप ।

निमिषमात्रे करिसी रजकाचा तू नृप ।। जयदेव ० ।।४।।


ब्रह्मा - विष्णू - महेश्वरांचा तू अनघा अवतार ।

निर्गुण ब्रह्म सनातनाचा अनंत आधार ।।

नेती-नेती म्हणता पुढती पडले समस्त श्रुतीसार ।।

दत्तदासावरी असावा तव कृपेचा कर ।। जयदेव ० ।।५।।


श्री दत्तप्रभूंचा प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ यांची ही भक्तीरसपूर्ण आरती आपण सुप्रसिद्ध, ज्येष्ठ गायक श्री. अजित कडकडे यांच्या सुश्राव्य आणि सुमधुर आवाजात इथे ऐकू शकता.


॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त