Aug 28, 2025

ओवाळीतो स्वामीराया... दावी चिन्मय स्वरुपाला


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते गजाननाय

या अखंड चराचराला व्यापून टाकणारा तो सर्वशक्तिमान परमात्मा या जगताच्या कल्याणासाठीच विविध रूपें धारण करतो. आपल्या परमभक्तांच्या उद्धारासाठी, मुमुक्षु जनांना सत्पथी लावण्यासाठीच त्याच्या या सर्व लीला असतात. कधी कधी तो निर्गुण, निराकार परमात्मा सगुण, साकार होऊन संतरूपांत अवतरित होतो आणि सर्वांनाच त्याच्या या सगुणरुपाचा ध्यास लागतो. हे संत-महात्मे असंख्य बद्ध, मुमुक्षु जनांवर कृपा करतात, आपल्यासारख्या सामान्य जनांना सन्मार्ग दाखवितात. अशा साक्षात् परब्रह्मस्वरुप संतांमध्ये शेगावनिवासी संतशिरोमणी श्री गजानन महाराजांचे स्थान अनन्यसाधारण आहे.

आपल्या अवतारकाळांत श्रीगजानन स्वामींनी असंख्य भक्तांवर कृपानुग्रह केला, आणि आजही ‘ देहांताच्या नंतरहि । कितीजणा अनुभव येई ॥' अशी प्रचिती कित्येक गजाननभक्तांना येत आहे. संतकवी दासगणू महाराजांनी श्रीगजानन विजय या प्रासादिक ग्रंथात गजाननासी अंगें सारीं । होतीं योगाचीं अवगत ॥ अनेक वेळा सांगितले आहे. अशा साक्षात्कारी संतपुरुषांचा वास त्यांच्या स्थूल देहापेक्षा सूक्ष्मांत असतो. त्यांमुळे या योगीराजांच्या समाधीनंतरही त्यांचे अवतार कार्य अखंड, अविरत सुरूच असते. किंबुहना ते सहस्त्रपटींनी अधिक कार्यरत होते. सिद्धयोगी श्रीगजानन महाराजांनी समाधी घेऊन एक शतकापेक्षाही अधिक काळ लोटला आहे, तरीही ' मी गेलों ऐसें मानूं नका । मी आहे येथेंच ॥' या समर्थवचनांची अनुभूती आजही त्यांच्या भक्तांना येत आहे. श्री क्षेत्र शेगांव येथे दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी आणि भक्तांकडून श्रीगजानन विजय या समर्थांच्या चरित्रग्रंथांची होणारी नित्य पारायणे या गोष्टीची साक्ष देतात. 

या दिव्य ग्रंथातील अध्याय १९ आणि अध्याय २१ मध्ये श्रीगजानन महाराजांचे निष्ठावंत भक्त रामचंद्र निमोणकर यांचा उल्लेख आहे. ऐसाच एक निमोणकर । गोविंदाचा कुमार । रामचंद्र नामें साचार । ओव्हरसियरच्या हुद्यावरी ॥ योगयोगेश्वर गजानन महाराजांचा त्यांना प्रसाद प्राप्त झाला आणि योगाभ्यास थोडा बहुत । आला निमोणकराप्रत । श्रीगजाननकृपेनें ॥   त्यांनी समर्थ सदगुरु श्रीगजानन महाराजांवर एक पुस्तिका लिहून ती प्रकाशित केली होती. या पुस्तिकेतील ही अतिशय सुंदर, भावपूर्ण आरती ! या सद्‌भक्ताची महाराजांच्या ठायीं असलेली भक्ती, अनन्य श्रद्धा आणि शरणागतीचा भाव या आरतीतील प्रत्येक पदांतून विनासायास व्यक्त होतात.     

ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया । आवडी जगन्मोहीनीला । दावी चिन्मय स्वरुपाला ॥धृ॥ देई सद्‌बुद्धी मजला । प्रेमे तव यश गाण्याला । भक्तांकिता स्वामीराया, चरण मी शरण, करुनी भय हरण दावी सुखसदन, अमित मम दोष लागुनीया । विनवितो दास तुम्हा सदया ॥१॥ ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया । आवडी जगन्मोहीनीला । दावी चिन्मय स्वरुपाला ॥  जनपद मुक्ति पदान्याया । स्थली या अवतरला राया । ही जड मुढ मनुष्य काया । पदी तव अर्पियली राया । हे दिव्य वसन योगीराया । नको मज जनन, पुनरुपी मरण । प्रार्थना हेचि असे पाया ॥२॥ ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया । आवडी जगन्मोहीनीला । दावी चिन्मय स्वरुपाला ॥  नेण्या आत्मतमा विलया । आलासी ज्ञान रवी उदया । करी तू ज्ञानी जना राया। निरखुनी मोह पटल माया । गजानन संतराजा, असशी बलवंत, तसा तू धिमंत । नको बघू अंत, विनवितो दास तुम्हा राया । नका त्या दुर करु सदया ॥३॥ ओवाळीतो स्वामीराया । माथा पदी ठेवूनीया । आवडी जगन्मोहीनीला । दावी चिन्मय स्वरुपाला ॥

    

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
मूळ स्रोत : श्रीगजानन महाराज चरित्र कोश - ( लेखन, संशोधन - दासभार्गव )

 

No comments:

Post a Comment