Showing posts with label श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार. Show all posts
Showing posts with label श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार. Show all posts

May 4, 2022

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - गोकर्णक्षेत्रवर्णन


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार षष्ठोऽध्यायः

होता नरपती एक । मित्रसह तत्सेवक । श्राद्धीं नृमांस दे ठक । वसिष्ठादिक ऋषींसी ॥१॥ ऋषी रुसे देयी शाप । ब्रह्मराक्षस हो भूप । विप्रा मारी तत्स्त्री शाप । दे स्त्रीसंपर्के मरसी ॥२॥ तो भूप बारा साल । जातां प्राग्वत् हो विमल । सांगे राणीसी सकल । शापबोल ब्राह्मणीचा ॥३॥ दुःखें मरुं इच्छी राणी । राजा तिला सांवरोनी । केलें पाप सांगोनी । तारा म्हणूनी प्रार्थी विप्रा ॥४॥ मनस्येकं वचस्येकं । असा नोहे हा सेवक । हें जाणोनी द्विज लोक । सांगे सम्यक् तीर्थयात्रा ॥५॥ ब्रह्महत्या न जाय ती । मग भूपा वाटे भीति । मिथिलापुरीं महामती । सांगे खंती गौतमाते ॥६॥ मुनीं तया आश्वासून । सांगे क्षेत्र गोकर्ण । तेथें दोष निवारुन । तूं पावन होशील बा ॥७॥ ऐक थोडेसें आख्यान । म्यां देखिलें तें सांगेन । शिवदूत येती धांवून । चंडाळी मरतां एक ॥८॥ हर्ष पाहतां हो तयां । म्यां पुसतां, करुनी दया । ते सांगती मातें राया । विप्रजाया प्राग्जन्मीं हे ॥९॥ ही बालविधवा झाली । जारकर्मी रमली । स्वजनांनीं सोडिली । व्यक्त झाली वैश्यकांता ॥१०॥ असभ्य संगें दुष्ट । जारकर्में झाली भ्रष्ट । मद्यमांसें झाली पुष्ट । नेणे कष्ट पुढील ती ॥११॥ मत्ता ते मेष म्हणून । गोवत्सा खायी मारुन । दुजे दिनी शिर पाहून । शिव म्हणून छपवी तें ॥१२॥ असी नांदता ती मेली । गोवधें हो चंडाळी । अविचारें हो आंधळी । व्रणें झाली जारकर्में ॥१३॥ असी तोकपणें झाली । मायबापें रक्षियेली । लवकर तेही मेले । पोरी झाली निराश्रय ॥१४॥ ती जन संयोगेशीं । आली गोकर्णक्षेत्रासी । वस्त्रहीन उपवासी । व्रतदिवशीं मागे अन्न ॥१५॥ ती याचावया कर । पुढें करी, कोणी नर । करीं टाकी बिल्वपत्र । टाकी दूर हुंगोनी ती ॥१६॥ पडे दिष्टें लिंगावर । तेणें तुष्टे गौरीवर । करी इला भवपार । धाडी शीघ्र आम्हां येथें ॥१७॥ पुनर्न जन्मेल ही । म्हणोनियां नेली त्यांहीं । गौतम म्हणे तूंही । नृपा पाहीं गोकर्णातें ॥१८॥ नृप चमत्कार मानून । जातांची हो पांवन । तेथ साक्षाच्छिव जाण । म्हणोन ये श्रीपाद ॥१९॥
॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे गोकर्णक्षेत्रवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥

सूर्यवंशांत (इक्ष्वाकु) एक मित्रसह नांवाचा राजा होता. एकदा तो अरण्यांत मृगयेसाठी गेला असतां त्याने एका राक्षसाचा वध केला. त्या मृत राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्याचा निश्चय केला. वैमनस्य हेतूने त्याने मनुष्यरूप धारण केले आणि मित्रसह राजाचा सेवक होऊन त्याची मर्जी संपादन केली. एकदां श्राद्धतिथीसाठी मित्रसह राजाने वसिष्ठ मुनींसह अनेक ऋषीमुनींना भोजनाचे आमंत्रण दिले होते. तेव्हा, भोजनसमयीं त्या राक्षसाच्या भावाने कपटाने वसिष्ठादि ऋषीश्वरांच्या पानांत नरमांस वाढले. ते पाहतांच वसिष्ठ मुनी अतिशय क्रोधित झाले आणि तत्काळ त्यांनी " हे राजन, तू आज श्राद्धदिनीं ब्राह्मणांना भोजन म्हणून नरमांस वाढलें, या तुझ्या दुष्कृत्यासाठी तू ब्रह्मराक्षस होशील." असा राजाला शाप दिला. आपला काही दोष नसतांना वसिष्ठ ऋषींनी नाहक आपणांस शाप दिला याचा मित्रसह राजाला राग आला व तोही हातांत उदक घेऊन वसिष्ठ मुनींना शाप देणार, तोच त्या राजाची पतिव्रता पत्नी, मदयंती प्रार्थनापूर्वक म्हणाली, " स्वामी, गुरूंना शाप देण्यासारखे महापाप नाही, आपण त्यांना शरण जाऊन उद्धाराचे वरदान मागावे." आपल्या राणीचे हे वचन ऐकून राजाने तें शापोदक आपल्याच पायांवर टाकले. त्यायोगें, त्याचे पाय काळे पडले अन त्यास कल्माषपाद हे नांव प्राप्त झालें. त्या उभयतांनी वसिष्ठ मुनींची क्षमायाचना मागितली. वसिष्ठ ऋषींनीदेखील अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणला. तेव्हा उ:शाप देत ते म्हणाले, " हे राजन, तू बारा वर्षे ब्रह्मराक्षस होऊन हा शाप भोगशील अन त्यानंतर पूर्ववत राजा होशील." शापग्रस्त राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्यांत राहू लागला. एके दिवशी अत्यंत क्षुधाग्रस्त होऊन अन्न शोधार्थ निघालेल्या त्या ब्रह्मराक्षसाने अरण्यातून मार्गक्रमण करणाऱ्या एका ब्राह्मण दाम्पत्यास पहिले. त्या ब्राह्मणास त्याने धरले असता ती विप्रपत्नी अत्यंत काकुळतीने आपल्या पतीस सोडून देण्याची विनवणी करू लागली. मात्र राक्षसाने तिचे काही एक न ऐकता त्या ब्राह्मणास मारून खाऊन टाकले. त्या वेळी आपल्या मृत पतीच्या अस्थी गोळा करतांना ती पतिव्रता म्हणाली, " हे राजा, शाप भोगल्यानंतर जेव्हा तू पुनश्च राजा होशील, तेव्हां तुझ्या स्त्रीशी समागम करतांच तुझा अंत होईल! " पुढें, बारा वर्षांनंतर वसिष्ठ ऋषींनी दिलेल्या उ:शापामुळे तो मित्रसह राजा शापमुक्त झाला आणि आपल्या नगरी परतला. तो पूर्ववत राज्यकारभार पाहूं लागला. त्याने आपल्या पत्नीला, राणी मदयंतीस आपल्या हातून घडलेली ब्रह्महत्या, अन त्यांमुळे त्या ब्राह्मण स्त्रीने दिलेला शाप यांविषयी सर्व सांगितले. ते ऐकून राजपत्नी अत्यंत दुःखी स्वरांत म्हणाली, " नाथा, हेच आपले प्रारब्ध असेल तर आता प्राण देण्याशिवाय गत्यंतर नाही." तेव्हा, मित्रसह राजाने तिची समजूत काढली. पुढें, राजाने वेदज्ञानी अशा विप्रवर्गांस बोलावले आणि आपल्या हातून घडल्या ब्रह्महत्येच्या पातकाचे परिमार्जन करण्याविषयीं शास्त्रमार्ग सांगावा अशी प्रार्थना केली. अत्यंत धर्मविवेकी, सदाचारसंपन्न आणि पश्चात्तापग्रस्त त्या मित्रसह राजाचे ते वचन ऐकून ब्रह्मवृंदाने राजा मित्रसहास ब्रह्महत्येच्या परिमार्जनासाठी समस्त तीर्थयात्रा करून पावन होण्याचा सल्ला दिला. ते ऐकून तो राजा आपल्या पत्नीसह अत्यंत भक्तिभावाने अन निष्ठापूर्वक तीर्थयात्रा करू लागला. मात्र, विविध तीर्थक्षेत्रीं अनेक शात्रोक्त विधी आणि पुण्यकर्मे करूनदेखील त्याचा ब्रह्महत्येचा दोष गेला नाही. तेव्हा, ते उभयंता पती-पत्नी चिंताग्रस्त आणि भयभीत झाले. अनेक पुण्यक्षेत्रांना भेटी देत देत राजा मित्रसह आणि राणी मदयंती मिथिला नगरीत पोहोचले. तिथे त्यांची भेट स्वेच्छेने भूमीपर्यटन करणाऱ्या गौतम ऋषींबरोबर झाली. महर्षी गौतमांना आदरपूर्वक नमन करून त्या पतीपत्नींनी त्यांचे पूजन केले. तसेच, आपले दुःखही त्यांना निवेदन केले. सर्व वृत्तांत ऐकल्यावर गौतम ऋषींनी राजाच्या मस्तकी अभयहस्त ठेवला आणि आश्वासक स्वरांत म्हणाले," राजा, पापांच्या अगणित राशी स्नान-दर्शन-पूजनमात्रें जाळून टाकणारे आणि समस्त भाविकांच्या इष्ट मनोकामना कल्पवृक्षाप्रमाणे पूर्ण करणारे गोकर्णासारखे क्षेत्र या भूतलावर असतांना, तू ब्रह्महत्येचे किंचितही भय बाळगू नकोस. प्रत्यक्ष कैलासासम असलेल्या या शिवक्षेत्री तुझ्या सर्व दोषांचे पूर्णतः निवारण होईल. लवकरच तू पापमुक्त होशील." " राजा, गोकर्ण क्षेत्री मी प्रत्यक्ष पाहिलेली एक घटना तुला कथन करतो. एकदा मी भ्रमण करीत करीत त्या गोकर्ण क्षेत्रांत आलो. तेव्हा, तिथे अत्यंत विपन्नावस्थेत असलेली एक चांडाळीण मृत झाली. तेव्हा, तिला कैलासधामी घेऊन जाण्यासाठी शिवदूत विमान घेऊन आले. मी आश्चर्यचकित होऊन त्यांना ' ह्या महापातकी स्त्रीला शिवलोकप्राप्ती कशी झाली ?' हे विचारले. त्यांवर, ते शिवदूत मृदु वाणींत म्हणाले, " मुनीवर्य, या स्त्रीचा अवघा वृत्तांत ऐका. पूर्वजन्मी ही एक लावण्यवती ब्राह्मणकन्या होती. प्रारब्धवशांत, ती बालपणीच विधवा झाली. एकदां तिने जारकर्म केले. तिच्या आप्त-स्वकीयांना हे दुष्कृत्य समजल्यावर त्यांनी तिला घराबाहेर काढले. मात्र, कामविकाराने विवेकशून्य होऊन ती एका वैश्य तरुणाची कुलस्त्री बनून राहू लागली. अशी ती दुराचरणी, पापिणी त्या वाण्याबरोबर रममाण झाली आणि अनेक पापकर्मे करू लागली. ती उन्मत्तपणे नित्य मद्य प्राशन करून मांसाहार भक्षण करीत असे. अशा अनेक धर्मबाह्य आणि व्यभिचारी वर्तनांचे भविष्यांत अतीव कष्टदायक फळ मिळेल, यांविषयी ती पूर्णतः अनाभिज्ञ होती. एकदां मद्यधुंद अवस्थेत तिने बकरा समजून गाईचे वासरूच मारले आणि शिजवून खाल्ले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते वासराचे डोके पाहून ती घाबरली आणि " शिव-शिव हे माझ्या हातून काय कुकर्म घडले ?" असे म्हणत तिने वाण्याच्या भीतीने ते वासराचे शिर जमिनीत पुरून टाकले. अशी असंख्य, अनुचित दुष्कृत्ये करून काही कालांतराने ती मरण पावली. त्यानंतर दारुण अशा नरकांत आपल्या पातकांमुळे तिने अपरिमित दुःख भोगले. पुढें, गोवधाचे पाप यांमुळे ती चांडाळाच्या घरी जन्मास आली. अविचारी कृत्यें आणि गाईचे वासरूं मारल्याने ती जन्मतः अंध होती. जारकर्माचे फलस्वरूप म्हणून तिच्या सर्वांगावर व्रण होते." " पूर्वजन्मी केलेल्या पापांमुळे अशी विद्रूप, बाल्यावस्था तिला प्राप्त झाली. तिच्या माता-पित्यांनी तिचा कसाबसा सांभाळ केला. मात्र तेही लवकरच मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूनंतर ती सर्वथा निराश्रित झाली आणि अत्यंत दुःख-कष्टांत कशीबशी जगू लागली. पूर्वजन्माचेच हे भोग होते. दैवयोगाने, ती काही यात्रेकरूंच्या बरोबर माघ महिन्यात गोकर्ण क्षेत्रीं आली. अंग झाकायलादेखील तिच्याजवळ काही वस्त्र नव्हते. भुकेने ती अतिशय व्याकुळ झाली होती. महाशिवरात्रीच्या व्रतदिनी, ती येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना खायला अन्न मागू लागली. भिक्षा मागण्यासाठी तिने एका भक्तापुढे हात पसरला असता त्या व्रतस्थ भाविकाने तिच्या हातावर बिल्वपत्र ठेवले. त्या अंध चांडाळणीने ते बिल्वपत्र हुंगले आणि ते खाण्यायोग्य नाही असे जाणून दूर फेकून दिले. तेच बिल्वपत्र शिवलिंगावर जाऊन पडले. त्या अजाणता घडलेल्या शिवपूजनाने भोळा सांब-सदाशिव प्रसन्न झाला. तसेच, दिवसभर ऐकलेले शिवकीर्तन, उपोषण, जागरण यांमुळे हे शिवरात्रीचे व्रत तिच्याकडून यथासांग पार पडले. त्याचे फलस्वरूप म्हणून तिच्या उर्वरित सर्व पातकांचे क्षालन झाले. महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वणी दिनीं या जागृत आणि पुण्यक्षेत्रीं हिला मृत्यू आला. यास्तव, तिला सहजच सद्‌गती प्राप्त झाली. त्यामुळे करुणासागर गौरीपती-महादेवांनी आम्हांला या स्त्रीला त्वरित कैलासावर घेऊन येण्याची आज्ञा केली आहे. जन्म-मृत्यूच्या बंधनातून ही पूर्णपणे मुक्त झाली आहे." असा वृत्तांत कथन करून त्या शिवदूतांनी त्या चांडाळणीच्या देहावर अमृत शिंपडले. तेव्हा तात्काळ तिचा देह दिव्य अन तेजस्वी झाला. पुढें, ते शिवदूत तिला विमानात बसवून शिवलोकी घेऊन गेले.
गोकर्ण क्षेत्राचे हे माहात्म्य सांगून गौतम ऋषी म्हणाले, " हे राजा, तूदेखील त्या अतिपवित्र गोकर्णक्षेत्री त्वरित जा. तिथे जाताच तुझी सर्व पातके अवश्य नष्ट होतील आणि पार्वतीपती शंकरांच्या आशीर्वादाने इह-पर सौख्य तुला प्राप्त होईल." गौतम ऋषींनी दिलेल्या अभयवचनांवर पूर्ण विश्वास ठेवून मित्रसह राजा राणी मदयंतीसह सत्वर श्रीक्षेत्र गोकर्ण येथे गेला आणि पापमुक्त झाला. सिद्धमुनी वदले - या परम पवित्र पुण्यक्षेत्री प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव सदैव वास करतात. केवळ याचसाठी हे नामधारका, अर्थात आपल्या भक्तांची या जन्म-मृत्यूच्या संसृतीचक्रातून मुक्तता करून त्यांना सायुज्यधाम प्राप्ती करून देण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ या स्थानी येऊन राहिले.

॥ प. प. श्रीद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः
॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

Jan 28, 2022

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - गोकर्णमहाबळेश्वरप्रतिष्ठापन


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार षष्ठोऽध्यायः

कथा असी परिसून । नामधारक करी प्रश्न । म्हणे सर्व क्षेत्रें त्यजून । ये गोकर्णक्षेत्रीं कां हा ॥१॥ शैव धर्में रावणमाता । कैलासाची धरुनि चिंता । मृण्मयलिंग पूजितां । ये श्रीमत्ता सुता खेद ॥२॥ तो आश्‍चर्य मानून । म्हणे कैलास आणून । देतों, दे ही माती त्यजून । असें म्हणून चालिला ॥३॥ बळें मूळासह कैलासा । उचलितां हाले सहसा । भिऊनी गौरी वदे गिरिशा । प्रळय कसा हा वारीं ॥४॥ तैं कैलासा चेपी हर । खालीं रगडे निशाचर । मरणोन्मुख हो करीं स्तोत्र । तेणें हर प्रसन्न हो ॥५॥ त्वदन्य न मला त्राता । तूंचि माझा प्राणदाता । दयाळू तूं राखें आतां । असें म्हणतां सोडी शंभू ॥६॥ त्वां अनुमान न करितां । शिवा सोडविलें आतां । असें म्हणूनी तो गीता । गाता झाला सप्तस्वरें ॥७॥ गायी संम्यक्‌ रागरागिणी । निजशिर छेदुनि । त्याचा वीणा करुनी । काल साधुनि प्रेमानें ॥८॥ शिव तयाच्या गाण्यासी । भुलोनी ये तयापाशीं । आत्मलिंग देऊनि त्यासी । म्हणे होसि तूंचि शंभू ॥९॥ ये हाता अमरता । तीन वर्षें हें पूजितां । लंका कैलासचि ताता । होईल आतां निःसंशय ॥१०॥ अवनिवरी मध्यें जरी । ठेवितां न ये करीं । येणेंपरी नेई पुरीं । काय करिसी कैलासा ॥११॥ शिवा करुनी नमन । पुरा जाई रावण । त्वरें नारद जाऊन । करी कथन सर्व इंद्रा ॥१२॥ अधर्मा त्या जाणून । इंद्र ब्रम्ह्या दे सांगून । तोही विष्णूसी कथून । ये घेऊन शिवाप्रती ॥१३॥ त्या अनुचितकर्मे हर । पश्चात्तापें म्हणे विसर । पडला झाला पाव प्रहर । गेला क्रूर येथोनियां ॥१४॥ देव बंदींत पडले । विष्णू म्हणे तुज कळलें । तरी कां हें असें केलें । जड ठेलें पुढें मज ॥१५॥ जो आधी मारी जीव । तया केला चिरंजीव । वरदान सांगे शिव । म्हणे उपाय करीं तूं ॥१६॥ ऐसें निगुती ऐकून । नारदा दे पाठवून । विष्णू करावया विघ्न । धाडी विघ्नविनायकांते ॥१७॥ मुनी मनोवेगें तया । गांठुनी लोटी काळ वायां । धाडी संध्या करावया । गणराया तंव आला ॥१८॥ त्या मानुनी ब्रह्मचारी । तो न घेतां त्याचे करीं । रावण दे लिंग तरी । अवधारी म्हणे बटू ॥१९॥ स्वपोष्य मी अतिदीन । तीन वार बोलावीन । जड होतां खालीं ठेवीन । दोष ने मग मला ॥२०॥ स्वर्गलोकीं सुर पाहतां । बोलावी त्या अर्घ्य देतां । तीन वेळ तो न येतां । तो स्थापिता झाला लिंग ॥२१॥ त्यानें केलें तें स्थापन । रावणा न हाले म्हणून । महाबळी हो गोकर्ण । क्षेत्र जाण भूकैलास ॥२२॥
॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे गोकर्णमहाबळेश्वरप्रतिष्ठापनं नाम षष्ठोऽध्यायः ॥

सिद्धमुनींनी दत्तप्रभूंच्या प्रथम अवताराची अर्थात श्रीपादांची जन्मकथा नामधारकांस सांगितली. कथेच्या अखेरीस, जनकल्याणार्थ अनेक तीर्थक्षेत्रयात्रा करीत, तसेच अधिकारी शिष्यांना दीक्षा देत देत श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्ण क्षेत्रास आले हे ही सविस्तर सांगितले. हा कथाभाग ऐकून, नामधारकास उत्सुकता वाटली आणि त्याने सिद्धमुनींना प्रश्न विचारला," स्वामी, त्रिमूर्ती दत्तावतार अनेक तीर्थक्षेत्रीं गेले. मात्र, गोकर्ण क्षेत्राचे विशेष असे काय महात्म्य आहे ? इतर अनेक अतिपावन तीर्थे असतांना, तिथे न राहतां श्रीपाद गोकर्णक्षेत्रींच का आले ? हे मला सविस्तर सांगा." आपल्या शिष्याच्या या प्रश्नाने संतोष पावलेले सिद्धमुनी गोकर्ण क्षेत्राचा महिमा सांगू लागले. - गोकर्ण क्षेत्रीं प्रत्यक्ष श्रीशंकरांचे आत्मलिंग आहे आणि त्याची प्रतिष्ठापना गणपतीने केली आहे, त्यांमुळे त्रैमूर्तींचे निर्गुण स्वरूपांत तिथे वास्तव्य असते. या अतिपवित्र स्थानाच्या उत्पत्तीचे आख्यान असे की लंकाधिपती रावणाची माता कैकसी (श्री गुरुचरित्राध्यायात हिचा उल्लेख कैकया असा आला आहे.) ही परम शिवभक्त होती. नित्य शिवलिंग पूजनाचे तिचे व्रत होते, शिवार्चन होईपर्यंत ती अन्नग्रहण करीत नसे. एकदा, शिवलिंग न मिळाल्यामुळे तिने मृत्तिकेचे लिंग तयार केले आणि मोठ्या भक्तिभावाने ती त्याचे पूजन करू लागली. तेव्हा, दशमुख रावण आपल्या मातेच्या दर्शनासाठी तिथे आला होता. लंकेसारख्या अत्यंत समृद्ध राज्याचे आपण सार्वभौम अधिपति आहोत, आणि तरीही आपली आई एका मृण्मय शिवलिंगाचे पूजन करत आहे, हे पाहून रावणास विषाद वाटला. आपल्या वैभवाचा, पराक्रमाचा रावणाला अत्यंत गर्व होता. त्याने कैकसीला वंदन केले आणि म्हणाला, " माते, या शिवलिंगाच्या पूजनाने काय फलप्राप्ती होते ? " त्यावर, " मी कैलासपदाच्या प्राप्तीसाठी हे व्रत करत आहे." असे कैकसी उत्तरली. आपल्या मातेची ही काम्यव्रत उपासना ऐकून रावणाने अहंकारयुक्त स्वरांत प्रतिज्ञा केली, " एव्हढेच ना ! तू उगाच कष्ट का करतेस ? मी कैलासासह उमा-शंकर आपल्या लंकेत घेऊन येतो. यापुढे, तू या मृत्तिकालिंगाचे पूजन करू नकोस. " असे म्हणून तो क्रूर असुर त्वरेनें तेथून निघाला. मनोवेगाने तो थेट कैलास पर्वतापाशी आला आणि आपल्या वीस बाहूंचे बळ लावून, धवलगिरी कैलास क्रोधाने हलवू लागला. आपली दहा शिरें कैलासाला टेकून, त्याने तो पर्वत उचलला. तेव्हा, वैकुंठ, सप्तपाताळे, स्वर्गादि इतर लोक डळमळू लागले. सर्व शिवगण, सूर भयभीत झाले. जगन्माता गिरिजाही भयचकित होऊन श्री महादेवांकडे गेली आणि म्हणाली, " हे कैलासनाथा, इथे जणू काही प्रलयकालच आला आहे, असे भासत आहे. हे शूलपाणी, तुम्ही तत्काळ या अनर्थाचे निवारण करा. आमचे रक्षण करा." उमेची ही विनवणी ऐकून महादेवांनी आपल्या डाव्या हाताने कैलास पर्वताला दाब दिला. त्यामुळे रावणाची दहाही मस्तकें आणि वीस बाहू त्या महाकाय पर्वताखाली अडकले. अशा अतीव कष्टदायी स्थितीत अडकलेला, मरणोन्मुख रावण सदाशिवास पूर्णपणे शरण आला, आणि स्वतः रचलेले शिवस्तुतीपर स्तोत्र तो अत्यंत आर्ततेने गाऊ लागला. त्याने श्री शंकरांची, ' हे पिनाकपणे, मी तुला अनन्य शरण आलो आहे. तुझ्याशिवाय मला अन्य कोणीही त्राता नाही. सर्व जगताचे रक्षण करणाऱ्या श्री शंकरा, तूच माझे सर्वस्व आहेस. तुझ्या या भक्ताला मरण कसे येईल बरें ? हे दयाळा, या दीन शरणागतास अभय दे.' अशी प्रार्थना केली. भोळा चक्रवर्ती शम्भोमहादेव प्रसन्न झाला. त्याने डाव्या हाताचा दाब काढून टाकला आणि कैलासखाली अडकलेल्या रावणाची सुटका केली. आपण अक्षम्य अपराध केला असतांनादेखील कैलासपतीने आपल्याला जीवदान दिले, हे पाहून रावणाने शंकरांची अपार स्तुती केली. त्याने आपले एक मस्तक कापून त्याला आपल्या आतड्याचे तंतू जोडले. असे पूर्ण समर्पणभावाने तयार केलेले ते तंतुवाद्य तो वाजवू लागला आणि गण, रस आणि सप्तस्वरयुक्त असे गायन करू लागला. पार्वतीपती श्रीशंकराची भक्ती निर्वाणरुप कशी आहे, हे तो लंकानाथ छत्तीस राग-रागिण्यांमध्ये गाऊ लागला. त्याच्या भावभक्तीमुळे प्रसन्न झालेला शिव, पंचमुख-दशवदन या स्वरूपांत रावणासमोर प्रगट झाला आणि त्याने वर मागण्यास सांगितले. तेव्हा, शंकरास साष्टांग प्रणिपात करून रावण म्हणाला, " हे ईश्वरा, कैलासप्राप्तीसाठी तुझी नित्य पूजा करण्याचे माझ्या मातेचे व्रत आहे. त्यासाठी हा कैलास पर्वत मला लंकेस घेऊन जाता यावा." रावणाचे ते मागणे ऐकून चंद्रमौळी म्हणाला," भक्ता, माझ्या पूजनासाठी मी तुला माझे प्राणलिंग देतो. याची त्रिकाळ पूजा केल्यास तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. या दिव्य आत्मलिंगाची जर तू तीन वर्षे पूजा केलीस, तर तुला ईश्वरस्वरूप अर्थात माझे स्वरूप प्राप्त होईल. तुला अमरत्व येईल आणि निःशंकपणे लंकानगरीच कैलासासमान होईल. मात्र तुझ्या नगरीत पोहोचेपर्यंत हे दिव्य लिंग कोठेही भूमीवर ठेवू नकोस. या आत्मलिंगाच्या पूजनाचे एव्हढे फळ मिळणार असेल तर आता हा कैलास नेण्याचे कष्ट का घेतोस ?" शिवाचे ते आत्मलिंग प्राप्त झाल्यामुळे रावण अत्यानंदित झाला, त्याने शंकरांस पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार केला आणि तात्काळ, तो लंकानगरीकडे प्रयाण करता झाला. ही सर्व वार्ता देवर्षी नारदमुनींना कळली आणि जगत्कल्याणासाठी, अत्यंत त्वरेनें त्यांनी ती देवराज इंद्रास सांगितली. श्रीशंकरांच्या वरदानामुळे रावण अजरामर होऊ शकतो, लंकानगरीच कैलासासम होईल, हा अधर्म आहे, हे लक्षांत घेऊन इंद्राने हे वृत्त लगोलग ब्रह्मदेव आणि श्रीहरी विष्णुंस कथन केले. मग, नारद, इंद्रादि सुरगणांसहित ब्रह्मदेव आणि विष्णू कैलास पर्वतावर आले. व्यथित झालेले नारायण शंकरास म्हणाले, " महादेवा, रावण हा एक क्रूर दैत्य आहे. सर्व देव-देवता त्याच्या बंदिवासात आहेत. आता जर तुमच्या आत्मलिंग पूजनाच्या फलस्वरूप तो ईश्वर झाला तर मी रामावतारात त्याचा वध कसा करू शकेन ? त्या दुष्ट दैत्याचे निर्दालन करण्याऐवजी तुम्ही त्याला चिरंजीव होण्याचे वरदान दिले. या सृष्टीची घडी आता बिघडून जाईल." तेव्हा शंकर म्हणाले, " त्याच्या भावभक्तीला मी भुललो आणि हे अनुचित कृत्य माझ्या हातून घडले. तो दैत्य प्रबळ आणि अमर झाला तर मोठाच अनर्थ होईल, याचा मला विसर पडला. तो क्रूर दैत्य जाऊन आता साधारण पाव प्रहर झाला असेल. अजूनही तो लंकेत पोहोचला नसेल. तेव्हा हे ऋषिकेशा, हे वरदान निष्फळ होईल, अशी काहीतरी तू उपाययोजना कर." हे शिववचन ऐकून, श्रीविष्णूंनी त्वरित नारदाला बोलावले आणि " देवर्षी, रावणास लंकेत पोहोचण्यास विलंब होईल, एव्हढे कार्य तुम्ही करा. मी माझ्या सुदर्शनचक्राने सूर्यास झाकतो, म्हणजे संध्याकाळ झाली आहे असे वाटेल. तुम्ही रावणास गाठून सायंसंध्या करण्यास सांगा." असे सांगितले. ते ऐकून नारद त्वरेने लंकाधीशाच्या शोधार्थ निघाले. त्यानंतर, श्रीविष्णूंनी विघ्न करण्यासाठी गणेश्वराला पाठवले. लगोलग, गौरीहरपुत्र बटूचा वेष घेऊन निघाला. इकडे, नारदमुनींनी रावणास गाठले आणि त्याला प्राप्त झालेल्या शिव आत्मलिंगाचे माहात्म्य सांगू लागले. तोवर श्रीहरीने सुदर्शन चक्र सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. रावणासही लवकरांत लवकर लंकेस पोहोचायचे होते, त्यामुळे त्यांनी नारदाची अनुज्ञा मागितली. तेव्हा, नारद म्हणाले, " आता सूर्यास्ताची वेळ झाली आहे. दशानना, तू तर वेदज्ञानी ब्राह्मण आहेस. तू सायंसंध्या करणार नाहीस का ? ब्राह्मणाने शक्यतो संध्येची वेळ चुकवू नये. मी तर माझे संध्यावंदन आणि नित्यकर्मे उरकून येतो." असा निरोप घेऊन देवर्षी स्नान-संध्येसाठी निघून गेले.
नारदमुनींचे बोलणे ऐकून रावणही आज आपला व्रतभंग होईल, म्हणून थोडा चिंतीत झाला. ' आपले नित्य त्रिकाळ संध्या करण्याचे व्रत आहे, आणि आता तर संध्येची वेळ झाली आहे. मात्र, शंकरांनी हे लिंग भूमीवर न ठेवण्याविषयी सांगितले आहे. आता काय करावें बरे ?' असा तो विचार करू लागला. तेव्हढ्यात बालबटूच्या वेषांतील श्रीगणेश त्याला दिसला. हा बालब्रह्मचारी आपला विश्वासघात करणार नाही, आपण हे शिवलिंग काही काळ त्याच्या हातात देऊन स्वस्थचित्तानें संध्या करावी, असे ठरवून रावणाने त्या बटुवेषधारी गणेशाला जवळ बोलावले आणि संध्यावंदन होईपर्यंत हे लिंग हातात धरण्यास सांगितले. त्यावर श्री गणेश म्हणाला, " मी वनवासी ब्रह्मचारी आहे. मी तर एक लहान बालक असून स्वतःचे पालन-पोषणही करण्यास असमर्थ आहे. हे दिव्य लिंग जड असेल, जर हे माझ्या हातातून खाली पडले तर ?" पण रावणाने त्याची अनेक प्रकारें समजूत घातली. तेव्हा, बालबटू गणपती निर्धारपूर्वक म्हणाला," हे लिंग जर जड झाले तर मी तुम्हांला तीन वेळा हाक मारीन. तरी तुम्ही आला नाही तर मग हे लिंग मी जमिनीवर ठेवीन आणि त्याचा मला दोष लागणार नाही." ते मान्य करून रावणाने ते प्राणलिंग बालगणेशाच्या हाती दिले आणि तो संध्या करण्यासाठी नदीतीरावर गेला. त्यावेळी, सर्व सुरवर विमानांत बसून ही गंमत मोठ्या कौतुकाने पाहत होते. इकडे रावण अर्घ्य देत होता, तोच श्रीगणेशाने त्याला आवाज दिला, " हे लिंग फार जड आहे, मी ते फार वेळ हातात धरू शकणार नाही. तू लवकर परत ये." न्यासपूर्वक अर्घ्य घेतांना रावणाने हातानेच खूण करून मी येतोच आहे, असे त्याला सांगितले. काही काळ वाट पाहून, त्या बटूने दोनदा रावणाला बोलावले आणि " हे आत्मलिंग अतिशय जड झाले असून, यापुढें एक क्षणही ते मी हातांत धरू शकत नाही." असे मोठ्या स्वरांत म्हणाला. त्यावेळीं रावण ध्यानस्थ होता, त्याने गणेशाला काहीच प्रतिसाद दिला नाही. तेव्हा, श्रीहरींचे स्मरण करून, समस्त देवादिकांच्या साक्षीने श्रीगणेशाने आपल्या हातातील स्वतःच्या पित्याचे ते दिव्य, आत्मलिंग भूमीवर ठेवले. सर्व सुरवरांनी हर्षोल्हासानें पुष्पवृष्टी केली. लवकरच, लंकेश्वर सांयसंध्या आटपून त्वरेनें तिथे आला. तेव्हा, त्याला महादेवाचे आत्मलिंग भूमीवर स्थित झालेले दिसले. संतप्त झालेल्या त्या महाबली रावणाने प्रचंड जोर लावून ते आत्मलिंग उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु ते जमिनीत अढळपणे स्थिरावले होते. त्या प्रचंड बळानें त्या आत्मलिंगाला गायीच्या कानाचा आकार प्राप्त झाला, पण अथक प्रयत्न करूनसुद्धा ते शिवलिंग रावणाच्या हातात आले नाही. याच कारणांमुळे, ते शिवलिंग ' गोकर्ण महाबळेश्वर ' म्हणून प्रख्यात झाले. खिन्न, निराश झालेला रावण रिक्तहस्तेंच लंकेस परतला. या क्षेत्रीं महादेवाचा अक्षय्य वास असल्याने भूलोकीचे कैलास असा या तीर्थाचा महिमा आहे.
॥ प. प. श्रीद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः
॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

Jan 24, 2022

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - श्रीपादावतारकथन


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार पंचमोऽध्यायः ॥

ये श्राद्धा हीं विप्राघरीं । उत्तरदेशीं भिक्षा करी । श्राद्धापूर्वीं द्विजनारी । दान करी श्राद्धान्नाचें ॥१॥ दत्त विप्रस्त्रीचा भाव । पाहुनी सुत स्वयमेव । झाला श्रीपादराव । गृहभाव स्वीकारीना ॥२॥ विशेष विद्याभिज्ञ झाला । तात आरंभी विवाहाला । पुत्र म्हणे योगश्रीला । वरीं, अबला सर्व माता ॥३॥ निश्चय हा ते ऐकून । खिन्न होती त्यां दावून । त्रिमूर्तीरुप, आश्वासून । बंधू दोन पंग्वंध जे ॥४॥ करी प्रभू त्यांवरी डोळा । चालूं लागला पांगळा । पाहूं लागला आंधळा । अतर्क्य लीला श्रीपादाची ॥५॥ आशीर्वाद देई तयां । काशीपुरा जाऊनिया । बदर्याश्रम पाहुनियां । श्रीपाद ये गोकर्णासी ॥६॥ विमलाः कीर्तयो यस्य । श्रीदत्तात्रेय एव सः । कलौ श्रीपादरुपेण । जयति स्वेष्टकामधुक् ॥७॥ ॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे श्रीपादावतारकथनं नाम पंचमोऽध्यायः ॥ पीठापूर येथे आपळराज नरसिंह राजशर्मा नामक आपस्तंभ शाखेचा एक ब्राह्मण रहात होता. त्याच्या पत्नीचे नाव सुमती महाराणी होते. ते दाम्पत्य मोठे सदाचरणी आणि भक्तिपरायण होते. त्यांना अनेक पुत्र झाले, पण दुर्दैवाने त्यापैकी केवळ दोनच पुत्र जगले. जे जगले, त्यातील एक जन्मांध तर दुसरा पांगळा होता. या दुःखाचा परिहार व्हावा, व आपल्याला एखादा ज्ञानी, सद्गुणी पुत्र व्हावा यासाठी ते पती-पत्नी ईश्वराची सश्रद्धेने उपासना करीत होते. एकदा महालय अमावास्येच्या दिनीं त्यांच्या घरीं पितृश्राद्ध होते. त्यावेळीं, श्रीदत्तात्रेय अतिथीवेषात त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले आणि त्यांनी ' भवति भिक्षां देहि ' अशी साद दिली. घरीं श्राद्धाला बोलाविलेले ब्राह्मण अद्यापि जेवायचे होते, तरीही माध्यान्हकाळी आलेल्या त्या अतिथीला सुमतीने श्राद्धान्नाची भिक्षा वाढली व भक्तिभावाने नमस्कार केला. तिचा अभ्यागत-सेवाभाव पाहून अवधूत प्रसन्न झाले. आपले त्रिमूर्तींचे गूढ रूप प्रगट करून तिला म्हणाले," माग माते जे इच्छिसी । जे जे वासना तुझे मन पावसी । पावसी त्वरित म्हणतसे ॥ अर्थात, " माते, तुझें काही मागणे असेल तर तू मला सांग. तुझ्या इष्ट कामना अवश्य पूर्ण होतील." तेव्हा, पुन्हा एकदा श्री दत्तप्रभूंना चरणवंदन करून सुमती म्हणाली, " प्रभू, तुम्ही मला आई म्हणून हाक मारली, हेच आपले वचन सिद्ध करा. मला तुमच्यासारखा विश्ववंद्य, तेजस्वी, आणि परमज्ञानी पुत्र व्हावा." तिची ही प्रार्थना ऐकून दत्त महाराजांनी स्मित केले आणि तथास्तु असा आशीर्वाद देत म्हणाले, " तुला एक तपस्वी, तुमच्या कुळाचा उद्धार करणारा पुत्र होईल. एक मात्र सदैव लक्षात ठेव - असावें तुम्हीं त्याचिया बोलीं, अर्थात तुम्ही तो जे काही सांगेल, त्याप्रमाणेच वागा." आणि प्रभू अंतर्धान पावले. यथावकाश, श्री दत्तप्रभूंनी आपले वरदान सत्य केले. सुमतीला एके शुभदिनी ( भाद्रपद शुक्ल चतुर्थी ) पुत्र झाला, प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय आपळराज-सुमती यांच्या कुळात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेते झाले. श्रीपादांच्या बाललीलांनी त्यांचे माता-पिता सुखावले. श्रीपाद सात वर्षांचे झाल्यावर आपळराजाने त्यांचे यथाशास्त्र मौंजीबंधन केले. असामान्य, प्रगल्भ बुद्धिमत्ता असलेले श्रीपाद वेदपठण, तसेच मीमांसा, तर्क आदि शास्त्रांत लवकरच पारंगत झाले. पुढें, तें सोळा वर्षांचे झाल्यावर त्यांचे पिता, आपळराज श्रीपादांचा विवाह करण्याचा विचार करू लागले. तेव्हा, श्रीपाद म्हणाले, "तात, मी तापसी व ब्रह्मचारी आहे. योगश्री म्हणजेच वैराग्य हीच माझी पत्नी आहे. माझे नावच श्रीवल्लभ आहे. इतर सर्व स्त्रिया मला मातेसमान आहेत. मी आता तप करण्यासाठी उत्तर दिशेला जाणार आहे." श्रीपादांचा, आपल्या पुत्राचा हा निश्चय ऐकून आपळराज-सुमती दोघेही खिन्न झाले. पुत्रस्नेहाने ते व्याकुळ झाले. तत्क्षणीं, सुमतीला श्रीदत्तप्रभूंचे वचन आठवले. स्वतःला अति कष्टाने सावरत ती म्हणाली," पुत्रा, तू आमचा प्रतिपाळ करशील, अशी आम्हाला आशा होती. पण आम्ही तुला अडवणार नाही." आणि आता पुत्रवियोग होणार या दुःखाने तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हा, श्रीपादांनी आपल्या माता-पित्यास त्रिमूर्ती स्वरूपांत दर्शन दिले आणि आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे अमृतमय दृष्टीने पहिलें अन काय आश्चर्य ! पांगळा बंधू चालू लागला व आंधळ्या भावास दृष्टी प्राप्त झाली. श्रीपादांची लीला खरोखर अनाकलनीय होती. श्रीपादांनी आपल्या सहोदरांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्यांना शुभाशीर्वाद दिला. त्यानंतर, आपल्या माता-पित्याची अनुमती मागत ते म्हणाले, " माझी अवज्ञा न करता मला निरोप द्या." पुढें, श्रीपाद श्रीवल्लभ काशीक्षेत्री गेले. तेथून बदरिकाश्रमात जाऊन त्यांनी तेथे श्रीनारायणाचे दर्शन घेतले. त्यानंतर आपले ज्ञानमार्गाचे अवतार कार्य करण्यासाठी ते तीर्थस्थानी भेट देऊ लागले. अनेक भक्तांना दीक्षा देत देत, ते गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रीं आले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचे अवतार वर्णन करतांना श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराज म्हणतात - दिगंत कीर्तिमान आणि शुद्ध सत्त्वमय श्री दत्तात्रेयच या कलीयुगात आपल्या भक्तांच्या इष्ट मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ रुपाने प्रगटले आहेत. संत-सज्जनांचे रक्षण करण्यासाठी, दुर्जनांचा विनाश करण्यासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे धर्माची पुन्हा नीट घडी बसविण्यासाठी भगवंताचे अवतार होतात. दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवंत जेव्हा अवतरित होतात, त्या अवतारांत रजोगुणाचा अंश येतो. मात्र श्री दत्तप्रभूंच्या अवतारांचे वैशिष्ट्य असे की साधक, उपासक, योगीपुरुष, तसेच भक्त यांची साधनामार्गातील प्रगती करून देण्याचे कार्य दत्तावतारी अवधूत करतात. याचकरिता, श्री दत्तात्रेयांचे स्वरूप शुद्धात शुद्ध असे मानले जाते.
श्रीपाद श्रीवल्लभ यांचा चरित्रग्रंथ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत. या अक्षरसत्य ग्रंथामध्ये श्रीपाद स्वामींच्या जन्माचे विस्तृतपणें वर्णन केले आहे. आपळराज आणि सुमती यांच्या पूर्वजन्मीच्या दत्तभक्तीचे, पुण्यकर्मांचे फलित म्हणूनच त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांचे माता-पिता होण्याचे सद्भाग्य लाभले होते. त्या सत्शील दाम्पत्याचा पूर्वजन्म वृत्तांत थोडक्यात असा - पूर्वयुगीं सह्य पर्वताजवळील माहूर गांवी विष्णुदत्त नामक कर्मनिष्ठ ब्राह्मण रहात होता. तो श्री दत्तप्रभूंचा भक्त होता. त्याची पत्नी सोमदेवम्मा ( श्री दत्तमाहात्म्यात हिचे नाव सुशीला असे आले आहे.) थोर पतिव्रता होती. साक्षात श्री दत्तात्रेय त्या ब्राह्मणाच्या गृही दर्श श्राद्धदिनीं भोजन करण्यासाठी आले होते. त्या पंक्तीला श्री सूर्यनारायण आणि अग्निदेवही यांनीही भोजन स्वीकारले होते. त्यावेळीं, या तीनही देवतांचे उत्तमोत्तम आशीर्वाद त्या धर्मपरायण ब्राह्मण पती-पत्नीस मिळाले होते आणि त्यांच्या पितरांनाही सद्गती प्राप्त झाली होती. पुढें, याच पती-पत्नींनी पीठापुरी आपळराज आणि सुमती म्हणून पुन्हा जन्म घेतला होता. सुमतीचे अहोभाग्य असे की या जन्मींदेखील सुमतीला पुनःश्च श्री दत्तप्रभूंचे दर्शन घडले होते आणि भक्तकामकल्पद्रुम श्री दत्तात्रेय, आपळराज-सुमती यांचा पुत्र म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेते झाले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थी रोजी सूर्योदयाच्या वेळी झाला. या अवताराचे वेगळेपण अथवा असाधारणत्व असे की श्रीपादांचा जन्म मातेच्या उदरातून सामान्य मुलासारखा न होता, दिव्य ज्योतीरूपाने झाला. त्यावेळी प्रसूतिगृहात मंगल वाद्ये वाजू लागली. पवित्र अशा वेदमंत्रांचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला. त्यांच्या जन्मानंतर सतत नऊ दिवस, तीन फणा असलेला नाग त्यांच्या मस्तकी छत्र धरीत असे. भक्तजनरक्षणार्थ श्रीगुरुनाथ या भूतलावर अवतरला होता. 

॥ प. प. श्रीद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः
॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

Dec 17, 2021

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - अनसूयोपाख्यान


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार चतुर्थोऽध्यायः ॥

बहुवित् सिद्धा पुसे द्विज । अत्रि कोण सांग मज । त्रीश केवीं हो अत्रिज । सिद्ध गुज ऐक म्हणे ॥१॥ जाण अत्रि ब्रह्मपुत्र । अनसूया तत्कलत्र । दंपती परम पवित्र । त्यांचा पुत्र दत्तात्रेय ॥२॥ निर्बाध अनसूयेचे । व्रत पाहुनी तें साचें । मन भ्यालें सर्व सुरांचें । अबोधाचें बीज हें कीं ॥३॥ ते निश्चोतत्धैर्य देव । त्रिमूर्तीपाशी घेती धांव । आश्वासोनीं त्यांतें देव । भिक्षुभाव स्वीकारिती ॥४॥ ते ऊर्ध्व लोक सोडुनी । भिक्षुकसे होवुनि । तिघे आले अत्रिसदनीं । जातां रानीं मुनिवर्य ॥५॥ त्यां किंप्रयोजन ऐसें । अनसूया पुसतसे । नग्नभिक्षा दे तूं ऐसें । याचितसे देवत्रय ॥६॥ जरी सृती सोडिती ते । तरी सती वदे त्यातें । तसीच मी तुम्हा देते । स्वस्थचित्तें भिक्षा करा ॥७॥ स्वव्रताच्या सामर्थ्ये ती । अत्रिपदा चिंती चित्तीं । अतिथी बाळ कल्पुनी ती । सती नग्न होती झाली ॥८॥ सुदुस्तर ज्यांची माया । सहसा बालत्व ये तयां । तें पाहून अनसूया । विस्मया पावली ती ॥९॥ सुहास्यमुखी घे बालां । तंव स्तना पान्हा आला । पाजी एका एका बाला । जी विमला पातिव्रत्यें ॥१०॥ त्यांची शांत झालीं मनें । पतिव्रतास्तनपानें । पाळण्यांत घालुनि गाणें । ती प्रीतीनें गायी साध्वी ॥११॥ ती सुखानें गातां मुनि । तेव्हा आला वनांतुनि । ज्ञानें त्रिमूर्ति जाणुनी । स्तवुनि तोषवी त्याला ॥१२॥ त्यांचें गुज तें जाणुनि । राहिले सुत होऊनि । निजरुपेंहि स्वस्थानीं । जाती तीनी देव हर्षे ॥१३॥ सगुणत्वा आले त्यांची । अत्रि नामें योजी साचीं । चंद्र दत्त दुर्वासाचीं । ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥१४॥ चंद्र प्रणाम करुनी । चंद्रलोका गेला, मुनि । दुर्वासा फिरे भुवनीं । स्वसदनीं राहे दत्त ॥१५॥ तो निवृत्तिमार्ग दावी । भक्तांचे काम पुरवी । स्मर्तृगामी पुनः भुवि । अवतरे श्रीपादाख्य ॥१६॥ ॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे अनसूयोपाख्यानं नाम चतुर्थोऽध्यायः ॥
श्री विष्णूंच्या अवतारांचे कारण आणि प्रयोजन याविषयीची कथा ऐकल्यानंतर नामधारक श्री दत्तावताराचे वर्णन ऐकण्यास उत्सुक होता. तो सिद्धमुनींना म्हणाला," अत्रिऋषी कोण होते ? त्यांची पत्नी अनसूया कोण होती ? त्रिमूर्ती कपट वेषाने त्यांच्या आश्रमीं कसे आले ? त्रयमूर्तींचा जन्म कसा झाला ? हे सर्व मला सविस्तर सांगावे." आपल्या शिष्याची ही विनंती ऐकून सिद्धमुनी अति प्रसन्न झाले आणि त्रैमूर्ती अवतार कथा सांगू लागले. - सृष्टिरचना करण्यासाठी ब्रह्मदेवाने सात मानसपुत्र निर्माण केले. त्या सात पुत्रांतील अत्रि हा मुख्य पुत्र होता. श्री गुरु परंपरा ही तेथूनच निर्माण झाली. अत्रि ऋषींची अनसूया नामक भार्या होती. ते उभयंता धर्मपरायण, सदाचरणी आणि वंदनीय असे दाम्पत्य होते. त्यांच्या आश्रमातून कोणीही अतिथी कधीही विन्मुख जात नसे. अभ्यागताला त्यांच्या त्या अतिपवित्र आश्रमीं नित्य अन्न संतर्पण होत असे. प्रभू श्रीदत्तात्रेय या परमपुण्यवंत दाम्पत्यांचे पुत्र होत. अत्रि ऋषींचे आचरण शुद्ध, पवित्र तर होतेच, त्यांची पत्नी अनसूयाही महापतिव्रता होती. ती काया-वाचा-मनाने भक्तीपूर्वक पतिसेवा करीत असे. तिच्या तप व पातिव्रत्याच्या पुण्यप्रभावाने सर्व देव भयभीत झाले. ही ऋषीपत्नी आपल्या योगसामर्थ्यानें केव्हा कुठल्या देवाचे स्थान हिरावून घेईल वा आम्हांस शाप देईल अथवा न जाणो कधी कुणाला वर देऊन आमचा नाश करू शकेल, अशी चिंता त्या सर्व सुरांना वाटू लागली. त्यांचे धैर्य खचू लागले. अखेर, इंद्रादि सर्व देव एकत्र होऊन ब्रह्मा, विष्णु आणि शंकर यांच्याकडे गेले आणि आपली व्यथा त्यांना सांगितली. तसेच, आपण यांवर उपाय केला नाही तर आमचे स्वर्गस्थानही जाऊ शकते अशी भीतीही व्यक्त केली. सर्व देवांचे हे चिंताग्रस्त बोल ऐकून त्रिमूर्तींनी त्यांना धीर दिला आणि ' आपण महापतिव्रता अनसूयेचा व्रतभंग करून सर्व देवांस भयमुक्त करू,' असे आश्वासनही दिले.  सतीची सत्त्वपरिक्षा घेण्यासाठी त्या तीनही देवांनी भिक्षुकांचे रूप धारण केले आणि ऊर्ध्वलोकांतून ते मनोवेगें अत्रिऋषींच्या आश्रमांत अभ्यागत म्हणून आले. त्यावेळीं, अत्रिमुनी अनुष्ठानासाठी वनांत गेले होते. आपल्या गृही आलेल्या त्या तीन अतिथींचे अनसूयेने उचित आदरातिथ्य केले आणि त्यांना नमन करून विनयतेने म्हणाली," ऋषीवर्य, मी आपली काय सेवा करू ?" तेव्हा भिक्षुकांच्या रूपांतील त्रिमूर्तींनी तिच्याकडे भोजनाची मागणी केली, आणि म्हणाले " आम्ही भुकेने फार व्याकुळ झालो आहोत. तुमच्या या आश्रमांत नित्य अन्न संतर्पण होत असते, तुम्ही इच्छाभोजन देता, अशी ख्याती आम्ही ऐकली. म्हणून आम्ही इथे आलो आहोत. आम्हांस सत्वर भोजन द्यावे." अतिथींची ही इच्छा ऐकून अनसूयेने त्वरित सर्व तयारी केली आणि त्यांना आसनांवर बसण्याची प्रार्थना केली. मात्र तिने विवस्त्र होऊन आपणांस भिक्षा घालावी, असा त्या त्रिदेवांनी हट्ट धरला. त्यांचे हे विपरीत, धर्ममार्गाच्या विरुद्ध असे वचन ऐकून, हे निश्चितच कुणी अवतारी पुरुष असावेत असा त्या श्रेष्ठ पतिव्रतेने विचार केला. तसेच," माझे मन निर्मळ आहे आणि माझ्या पतीचे तप:सामर्थ्य मला अवश्य तारेल.", अशी तिची दृढ धारणा होती. तेव्हा, ती महापतिव्रता अनसूया म्हणाली," योगिवर्य, तुमच्या इच्छेनुसार मी तुम्हांस भिक्षा देते. तुम्ही स्वस्थचित्तानें भोजन करावे. "  तेव्हा त्या सतीने आपल्या पतीच्या, अत्रिऋषींच्या चरणांचे मनोभावें चिंतन केले. त्यानंतर तिने, " हे अतिथी माझी बालके आहेत." असा मनांत संकल्प केला आणि आपल्या अंगावरची सर्व वस्त्रें उतरविली. अन काय आश्चर्य ! अनसूया जेव्हा विवस्त्र होऊन अन्नोदक वाढण्यासाठी बाहेर आली, तो ते तीन अतिथी, तान्ही बालके होऊन तिथे रांगत होती. अत्रि ऋषींचे तप आणि तिचे पातिव्रत्य यांच्या पुण्यप्रभावाने तिने केलेल्या या संकल्पात एव्हढे सामर्थ्य होते की ब्रह्मा-विष्णु-महेश्वर या देवाधिदेवानांदेखील बालस्वरूप घ्यावे लागले. ज्यांच्या प्रकृतीरूपी मायेला पार करणे सर्वथा अशक्य, अवघड असते, ते या सृष्टीचे उत्पत्ती-स्थिती-लयकर्ते आता तान्ही बालके झाली होती. हे नवल पाहून अनसूया अतिशय आश्चर्यचकित झाली. मग पुन्हा वस्त्रें नेसून ती त्या तीन बालकांजवळ आली आणि त्या बालकांना तिने वात्सल्यतेनें जवळ घेतले. त्या गोजिरवाण्या बाळांना पाहून अनसूयेला पान्हा फुटला. एकेका बालकाला मांडीवर घेऊन तिने स्तनपान दिले आणि त्या तिन्ही शिशुंचे क्षुधा निवारण केले. ते क्षुधार्त बालकरूपी त्रिमूर्ती त्या महान पतिव्रतेच्या स्तन्यपानाने तृप्त झाले. धन्य ते श्रेष्ठ तपस्वी अत्रि महर्षी अन धन्य ती महापतिव्रता अत्रिभार्या अनसूया !  मग अनसूयेने त्या तिन्ही बालकांना पाळण्यांत घातले आणि ती अंगाई गीते म्हणू लागली. असा तो सुखसोहळा सुरु होता, तोच अत्रिऋषी आश्रमांत परतले. अनसूयेने त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. ही तीन बालके म्हणजे ब्रह्मा-विष्णु-महेशच आहेत, हे त्यांनी अंतर्दृष्टीनें ओळखले. अत्यंत हर्षित होऊन त्यांनी त्रैमूर्तींचे स्तवन केले आणि श्रद्धापूर्वक नमनही केले. त्यांचा तो अनन्य भक्तीभाव पाहून त्रिमूर्ती संतुष्ट झाले. ती तीन बालके तर पाळण्यातच राहिली आणि चतुर्मुख ब्रह्मा, चक्रपाणि विष्णु आणि पिनाकधारी शंकर निजरूपात उभे राहिले. त्रिमूर्तींचे ते दिव्य रूप पाहून अत्रि मुनी आणि सती अनसूया यांना अतिशय आनंद झाला, त्यांनी देवांना प्रणिपात केला. त्यावर ते तीनही देव म्हणाले," अत्रि ऋषी, तुमचे तपोबल आणि अनसूयेचे पातिव्रत्य अलौकीक आहे. तुमच्या भक्तीनें आम्ही प्रसन्न झालो आहोत, तुम्ही इष्ट वर मागा." तेव्हा, " ही तीनही बालके आमच्या गृहीं पुत्र म्हणून राहावेत, व हे त्रिमूर्ती एकरूप असावेत. " हेच अभीप्सित वरदान त्या जगद्वंद्य पती-पत्नींनी मागितले. त्यांचे हे वचन ऐकून तीनही देव ' तथास्तु !' असा वर देऊन आपल्या स्वस्थानीं निघून गेले. एका सुमुहूर्ती, अत्रि ऋषींनी ब्रह्मदेवाच्या बालमूर्तीचे चंद्र, विष्णुमूर्ती बालकाचे दत्त आणि शिवबालमूर्तीचे दुर्वास असे नामकरण केले. अशा रितीने, त्रिमूर्ती अत्रि-अनसूयेच्या आश्रमांत त्यांचे पुत्र होऊन राहिले.  काही कालांतराने, चंद्र आणि दुर्वास यांनी आपल्या माता-पित्यांस निजस्थानीं जाण्याची अनुज्ञा मागितली. अनुमती मागत चंद्र म्हणाला, " मी चंद्रलोकांत राहून तुमचे नित्य दर्शन घेईन." तर " मी ऋषी असून तीर्थाटनास जातो. तसेच अनुष्ठान, यज्ञयाग यांसाठी भूलोकी भ्रमण करीत राहीन." असे म्हणून दुर्वासांनी आपल्या माता-पित्याचा निरोप घेतला. तिन्ही देवांची मूर्ती एक होऊन विष्णूंची दत्तनामक मूर्ती नित्य स्वगृहीं राहीली. अत्रि-अनसूयेला मिळालेले वरदान अशाप्रकारे जगत्कल्याणासाठी पूर्णत्वास गेले. त्रिमूर्ती त्यांच्या सदनीं एकच मूर्ती, एकच देवता म्हणून राहिले. परमात्मा दत्तरूपाने अवतरला ! अत्रि ऋषींचा पुत्र तो आत्रेय, असा तो दत्तात्रेय आहे आणि सिद्ध गुरुचे मूळपीठ तोच आहे. श्री दत्तप्रभूच मोक्षदाते असून, आपल्या भक्तांचा सदैव उद्धार करतात. दत्तमहाराजांच्या कृपेने भक्तांच्या इष्ट मनोकामना सहजच पूर्ण होतात. ते स्मर्तृगामी आहेत, म्हणजेच त्यांचे केवळ मनापासून स्मरण केले असता ते तत्काळ प्रकट होतात. श्रीहरि विष्णूंच्या अवताराप्रमाणेच श्रीदत्तात्रेयांचेही अवतार झाले. आपण अवतार का व केव्हा घेतो ? हे भगवंताने गीतेत अनेक श्लोकांमधून सांगितले आहे. ' परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥' अशी परिस्थिती जेव्हा उद्भवते, तेव्हा भगवंत अवतार घेतात. त्रिमूर्ती दत्तदेखील श्रीपाद श्रीवल्लभ रूपांत पुन्हा या भूलोकी अवतरित झाले.  

श्री दत्तजयंती विशेष : 
दत्तभक्तहो, श्रीदत्तजन्माची ही कथा ब्रह्मनिष्ठ वामनबुवांनी श्रीगुरुलीलामृत या प्रासादिक ग्रंथांत अतिशय रसाळ ओव्यांतून वर्णिली आहे. 
ऋषि योगिजन उत्कृष्टविश्राम । ब्रह्मकैवल्य परंधाम । कृतयुगीं गुरु पुरुषोत्तम । अत्रि-आश्रमीं प्रकटले ॥ मार्गशीर्ष शुक्लपक्षीं । भूतातिथी मंदरोहिणी ऋक्षीं । त्रैमूर्ति हे सायान्हीं सुराध्यक्षीं । अंतर्साक्षी जन्मले ॥ सुरमासीं शुक्लातिथि चवदावी । दत्तावतार मोक्षसुख चव दावी । दासें लीला म्हणूनच वदावी । जगद्गुरुची सर्वदा ॥ ब्रह्मावतार ' सोम ' । रुद्रावतार ' दुर्वास ' नाम । विष्णुस्वरूप ' दत्त ' परम । सर्वांसी मान्य योगीश्वर ॥ भृगु आदिक ऋषी-संमत । चतुर्दशी बुध मार्गशीर्ष शुक्रांत । उच्चस्थ ग्रह-पंचक विख्यात । वृषभलग्नीं प्रगटले ॥ सोम चंद्रमंडलीं निश्चितीं । दुर्वास तीर्थयात्रें जाती । त्रयदेवात्मक घडली मूर्ती । होऊनि स्थिती एकत्र ॥ विधाता-नारायण-पंचवक्त्र । मिळून झाले एकत्र । विशुद्धसत्त्व एकस्वरूप स्वतंत्र । अवतरले सर्वत्र सुखप्रद ॥ स्कंदपुराणींचे वचन । दत्तात्रेयोत्पत्ति कथन । मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमादिन । प्रदोषव्यापिनी रविवारीं वर्णिले ॥ अत्रीस त्रैमूर्तींनी वर दिधले । तेचि त्रयमूर्ति जाहले । ' देवदत्त ' म्हणूनि नाम ठेविलें । दत्तात्रेय ईश्वर ॥ अनसूया अत्रि आनंदले । प्रत्यक्ष ईश्वर पुत्र जाहले  कृतकृत्य उभयतांस वाटलें । वर्णिलें स्कंद्पुराणीं हें ॥ 

श्रीगुरुलीलामृतातील श्रीदत्तजन्म अध्याय इथे उपलब्ध आहे.
दत्तभक्तहो, श्री दत्तजन्म आख्यान लेख इथे वाचता येतील.                          

॥ प. प. श्रीद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

Dec 16, 2021

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - अंबरीषोपाख्यान


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार तृतियोऽध्यायः ॥

ऐसें वेदधर्माख्यान । नामधारक ऐकून । पुसे कां हा देव असून । अवतरुन ये येथें ॥१॥ कां घे दशावतार हे । सिद्ध म्हणे ऐक तूं हें । अंबरीषाकरितां हें । नटन आहे नारायणा ॥२॥ दुर्वास ऋषी द्वादशीसी । आला अंबरीषापाशीं । लावी विलंब कर्मासी । हो मानसीं खिन्न भूप ॥३॥ टळे वेळा हें जाणून । राजा करी जलपान । गर्भवासा जा म्हणून । दे कोपून ऋषी शाप ॥४॥ तेव्हां दयाळु येऊन । स्वयें शाप स्वीकारुन । अवतरे नारायण । जो असोन सर्वव्यापी ॥५॥ ॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे अंबरीषोपाख्यानं नाम तृतियोऽध्यायः ॥ सिद्धमुनींनी कथन केलेले वेदधर्म-दीपक आख्यान नामधारकाने एकाग्र चित्ताने श्रवण केले. त्यामुळे, त्याचे मन संशयरहित झाले आणि दृढ गुरुभक्ती त्याच्या ठायीं निर्माण झाली. त्याने सिद्धयोगींना नमस्कार करून, " स्वामी, मला श्री गुरूंचा महिमा आणि चरित्र विस्तारपूर्वक सांगावे.", अशी विनवणी केली. त्यावर सिद्धांनी त्याला आश्वस्त केले आणि परम पवित्र, कामधेनूस्वरूप श्री गुरुचरित्र सांगण्यास सुरुवात केली. नामधारकाने पुन्हा एकदा श्री गुरूंना वंदन केले आणि विनयाने हात जोडून विचारले," हे सिद्ध योगेश्वरा, श्रीगुरु तर प्रत्यक्ष ब्रह्मा-विष्णु-महेशरूपी त्रिमूर्ती आहेत, असे तुम्ही सांगितले. तर मग ते मानव म्हणून अवतार घेऊन का आले ? त्यांना दहा अवतार का घ्यावे लागले ? हे मला सविस्तर सांगा." तेव्हा सिद्ध म्हणाले, " नामधारका, भक्तवत्सल श्रीहरीने आपल्या प्रिय भक्त अंबरीषासाठी हे दहा अवतार घेतले. अंबरीष नामक धर्मपरायण राजा अत्यंत भक्तिभावाने द्वादशी व्रत करत असे. एकदा, द्वादशीच्या दिवशी दुर्वास ऋषी अतिथी म्हणून अंबरीषाच्या राजदरबारांत आले. राजाने वंदन करून त्यांची यथोपचारें पूजा केली आणि प्रार्थना केली, " महर्षी, आपण आपले अनुष्ठान करून सत्वर भोजनास यावे. आज एक घटिकाच साधन द्वादशी असल्याने, घटकेच्या आत व्रत सोडण्याकरिता राजवाड्यांत परतावे. " दुर्वास ऋषी नदीवर अनुष्ठानासाठी गेले, तिथे त्यांना विलंब झाला. इकडे अंबरीष राजास व्रत कसे पूर्ण करावे, याची चिंता वाटू लागली. अखेर, आपला व्रतभंग होऊ नये यासाठी घटिका सरण्यापूर्वी राजाने जल प्राशन करून उपवास सोडला. मात्र अतिथीला न घेताच राजाने भोजन केले म्हणून दुर्वास ऋषी कोपले आणि त्यांनी अंबरीषाला शाप दिला," तुला प्रत्येक योनींत जन्म घ्यावें लागतील." अंबरीष राजाने आपल्या आराध्य देवतेचे म्हणजेच शार्ङ्गधराचे स्मरण केले. भक्तवत्सलता हेच ब्रीद असलेला नारायण तात्काळ तिथे प्रकट झाला आणि दुर्वास ऋषींना म्हणाला, " ऋषीवर्य, आपण माझ्या भक्ताला दिलेला शाप मी स्वीकारतो." तेव्हा, आपल्या भक्तांचे, सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचे निर्दालन करून भूमीचा भार उतरण्याचे कार्य करण्यासाठी श्रीविष्णूंनी लक्ष्मीसहित अवतार घेतल्यास जनकल्याणच होईल आणि या भूलोकी हरिचरणांचे दर्शन तसेही दुर्लभ आहे, तेही भाग्यवंतांना प्राप्त होईल, असा विचार करून दुर्वास ऋषी वदले, " हे विश्वात्म्या, तू या अवघ्या चराचरांस स्थूल अन सूक्ष्म रूपांत व्यापून आहेसच. पुढें, या पृथीतलावर अनेक स्थानीं तू अवतार घेशील. तुझे हे दहा अवतार विशेष प्रसिद्ध होतील. " अशारितीने, जगत्पिता श्रीहरीने आपल्या प्रिय भक्तासाठी दुर्वास ऋषींनी दिलेला शाप स्वीकारला आणि दहा अवतार घेतले.

॥ प. प. श्रीद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

Dec 15, 2021

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - दीपकाख्यान


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार द्वितीयोऽध्यायः ॥

ते पाहुन येरु उठे । तया पुढें सिद्ध भेटे । तया पुसे कोण तूं कोठें । जासी वाटे मायबाप ॥१॥ सिद्ध रम्य बोले वाचे । त्रिमूर्ति गुरु आमुचे । न देखती भक्त ज्याचे । तापदैन्याचे पसारे ॥२॥ ऐसे व्यक्त ऐकून । नामधारक बोले दीन । मी त्याचा भक्त असून । कां लोटून देई मला ॥३॥ विश्व यंत्र चालक दत्त । तेथें हा अस्थिरचित्त । हें जाणून बोले व्यक्त । सिद्ध मुक्तसंग जो ॥४॥ तूं स्वछंदे वागसी । व्यर्थ देवा दोष देसीं । कोप येतां इतरांसी । स्वभक्तांसीं राखी गुरु ॥५॥ एकदां तो कोपे जरि । न राखती हरहरी । येरु पुसे कवणेपरी । वद थोरीव गुरुची ॥६॥ म्हणे सिद्ध कलीप्रत । ब्रह्मा सांगे हे चरित । गोदावरीतीरस्थित । वेदधर्मशर्मा गुरु ॥७॥ तो स्वीय पातकान्त । करावया ये काशींत । तया दीपक सेवित । स्वयें कष्ट साहोनिया ॥८॥ सुहास्य मुखें सेवा करी । गुरु शिव्या देई मारी । न धरीं तें अंतरी । क्षालन करी मळमूत्र ॥९॥ अंध पङगु गलत्कुष्ठी । गुरु झाला महाकष्टी । शिष्या गांजी सेवेसाठीं । तरी करी सेवा शिष्य ॥१०॥ अपर्णापति हो प्रसन्न । शिष्या देयी वरदान । नाही गुर्वाज्ञा म्हणून । फिरवून धाडी शर्वा ॥११॥ त्याचा निश्चय जाणून । वर दे विष्णूही येऊन । शिष्य बोले सर्व दान । देयील पूर्ण गुरु माझा ॥१२॥ निश्चय त्याचा ओळखून । विष्णू भुक्तिमुक्तिदान । दे, गुरुही हो प्रसन्न । काय न्यून तया शिष्या ॥१३॥ हो अस्तंगत माया । गुरु प्रसन्न हो जया । भज सोडोनि संशया । करील दया त्रिमूर्ति हा ॥१४॥ ॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे दीपकाख्यानं नाम द्वितीयोऽध्यायः ॥ कृपासिंधू श्रीदत्तप्रभूंनी स्वप्नीं साक्षात्कार दिल्यावर नामधारक विप्र जागा झाला आणि आपल्या गुरूंचे दर्शन व्हावे हीच एक मनोकामना ठेवून मार्गक्रमण करू लागला. पुढें, या प्रवासातच त्याला एका यतीचे दर्शन झाले. त्यांना पाहताच नामधारकास जणू आपले माता पिताच आपल्याला भेटले आहेत, असे वाटले आणि त्याने त्या यतिराजांना आपला परिचय द्यावा, अशी विनवणी केली. तेव्हा, आपले नाव सिद्धमुनी असून त्रिमूर्ती हेच आपले गुरु आहेत असे अत्यंत मधुर स्वरांत त्यांनी नामधारकाला सांगितले. आपल्या गुरूंविषयी विस्तारपूर्वक माहिती देत सिद्ध मुनी पुढे म्हणाले - आमच्या गुरुवर्यांच्या भक्तांना कधीही ताप अथवा दैन्य यांचा त्रास होत नाही. सिद्धयोगींचे आपल्या गुरूंविषयीचे ते वक्तव्य ऐकून नामधारक दीन-खिन्न होत म्हणाला, “ हे मुनीवर्य, मीदेखील श्री दत्तप्रभूंचाच भक्त आहे, असे असूनसुद्धा त्यांनी मला असे दूर का लोटलें ?" या अखिल विश्वाचे चालक श्री दत्तप्रभू आहेत, हे सृष्टीरहस्य सिद्धमुनींनी जाणले होते. या नामधारकाचे चित्त अस्थिर असून गुरूंविषयीं शंकाग्रस्त आहे, हे त्यांनी तात्काळ ओळखले. त्याचे मन संशयरहित करण्यासाठी सिद्धमुनी बोलू लागले, " नामधारका, तुझ्या मनांत दृढ भक्ती नाही, गुरूंविषयी किंतु आहे. तरीही, तू व्यर्थच देवाला दोष देत आहेस. आपल्यावर कोणाचाही कोप झाला तर त्यापासून सदगुरु आपले रक्षण निश्चितच करतात. मात्र, श्रीगुरुच आपल्यावर रागावले तर प्रत्यक्ष हरिहर सुद्धा आपले रक्षण करू शकत नाहीत." तेव्हा नामधारकाने ह्याला शास्त्राधार काय असे विचारले आणि सिद्धमुनींना नमन करून म्हणाला, " हे कृपानिधी, आपण मला गुरुंचे माहात्म्य कथन करावे." त्यांवर प्रसन्न चित्ताने सिद्धमुनी नामधारकाला सांगू लागले, " वत्सा, ब्रह्मदेवांनी कलीला गुरु माहात्म्याचे वर्णन करतांना ही कथा सांगितली होती. पूर्वी वेदधर्मशर्मा नावाचे एक गुरु आपल्या शिष्यांसह गोदावरी नदीच्या किनारी असलेल्या आपल्या आश्रमात राहत होते. आपल्या पूर्वजन्मांतील पापकर्म स्वतःच्या देहाने भोगल्याशिवाय मोक्षप्राप्ती होणार नाही, हे जाणून त्या पापाची निष्कृती होण्यासाठी ते काशी नगरींत आले. त्यावेळी वेदधर्म ऋषींचा दीपक नामक उत्तम शिष्य त्यांची भक्तिभावाने सेवा करीत होता. आपल्या गुरूंची सेवा करीत असतांना होणारे कष्ट, क्लेश तो आनंदाने भोगत होता. व्याधीग्रस्त, गलितगात्र आणि चिडखोर झालेले वेदधर्म कधी त्याला अपशब्द बोलत असत, मात्र तो शिष्योत्तम अशा गोष्टींकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असे आणि आपल्या गुरूंनाच विश्वनाथ समजून तो त्यांची एकनिष्ठपणे सेवा करीत होता. आपल्या गुरूंच्या जखमा स्वच्छ करणे, मळमूत्र क्षालन करणे, हवे त्या प्रकारचे अन्न आणून देणे आदि सेवा संतोषपूर्वक सुहास्य वदनाने तो करीत असे. प्रारब्धभोग भोगत असतांना वेदधर्म ऋषींच्या सर्वांगी कुष्ठ आले. ते अंध, पङगु झाले. अशा असह्य यातनांनी अत्यंत त्रासलेले ते गुरु आपल्या या शिष्याला निष्ठुरपणे बोलत असत. दीपक मात्र अत्यंत शांतपणे गुरुसेवा करीत असे. त्याची गुरुचरणीं असलेली भक्ती आणि एकाग्रपणे करत असलेली गुरुसेवा पाहून उमापती सदाशिव अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यास वर मागण्यास सांगितले. त्यावर, तो गुरुभक्त शिष्य " हे व्योमकेशा, माझ्या गुरूंची आज्ञा झाल्याखेरीज मी वर कसा घेऊ ?" असे लीनतेने म्हणाला. त्याचा तो दृढनिश्चय आणि अनन्य गुरुसेवाभावाने श्रीहरी विष्णूदेखील संतुष्ट झाले आणि दीपकासमोर प्रकट होऊन, ' कोणतेही वरदान माग.' असे म्हणाले. तेव्हा वंदन करून तो शिष्य म्हणाला, " हे हृषीकेशा, जो वर तुम्ही मला देता, तेच वरदान माझे गुरुही देतील. त्यामुळे माझी गुरुभक्ती दृढ व्हावी, हेच मागणे मी मागतो." दीपकाचा हा आपल्या गुरूंविषयी असलेला श्रद्धाभाव पाहून विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला गुरुभक्ती आणि मुक्तीचे वरदान दिले. हे सर्व वृत्त त्या परमशिष्याने आपल्या गुरूंना कथन केले. तेव्हा, वेदधर्म ऋषी प्रसन्न झाले आणि त्याच क्षणी त्यांचा देह दिव्य झाला. केवळ आपल्या शिष्याची कसोटी पाहण्यासाठीच त्या परम तपस्वी गुरुने मायालीलेने हे कुष्ठी होऊन क्लेश भोगण्याचे नाटक केले होते. त्या कसोटीत पूर्णपणे उतरलेल्या आपल्या शिष्यास त्यांनी अनेक शुभाशिर्वाद दिले. श्री गुरूंची सदैव कृपादृष्टी असल्यावर शिष्यास न्यून ते काय ? कलिमलापासून वाचण्यासाठी सद्गुरुसेवा अत्यंत फलदायी ठरते हेच खरे !
ब्रह्मवैवर्त पुराणातील ही कथा सिद्धमुनींनी नामधारकास सांगितली आणि म्हणाले, " अखंड आणि अनन्यभावाने केलेली गुरुसेवा इह-पर कल्याण आणि मोक्षदानही साधते. तेव्हा, तू संशयरहित होऊन श्रीगुरुंना शरण जा. परम दयाळू त्रिमूर्ती तुझ्यावर अवश्य कृपा करतील."

॥ प. प. श्रीद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

Dec 13, 2021

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - चरितानुसंधान


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसारप्रारम्भ: ॥

नमः श्रीदत्तगुरवे हृद्वासोधौतिकारवे । स्वात्मज्योतिःप्रकाशाय सुखायानर्थशांतये ॥१॥ भूतं भव्यं भवच्चास्माज्जायते येन जीवति । लीयते यत्र तद्‌ब्रह्म श्रीदत्ताख्यं त्र्यधीश्वरम्‌ ॥२॥ भक्तिगम्यस्य तस्येदं चरितं चित्तशुद्धये । संक्षेपेण स्फुटं वक्ति वासुदेवसरस्वती ॥३॥ ग्रंथीं वासुदेव निमित्त । कर्ता करविता दत्त । तत्पदीं ठेवोनि चित्त । चरित ऐकोत संत हे ॥४॥ हें मानुनी जे वाचिती । किंवा भक्तिनें ऐकती । तेचि भवाब्धि तरती । उद्धरती निजकुळा ॥५॥ मना वाचा अगोचर । तो स्वच्छंदें हो गोचर । कलियुगीं यतीश्वर । नरसिंहसरस्वती ॥६॥ त्याचें चरित्र ऐकून । नामधारक ब्राह्मण । गाणगापुरीं दर्शन । घ्यावें म्हणून पातला ॥७॥ प्राणी ऊष्मानें तापून । इच्छिती छाया जीवन । तैसा त्रितापें तापून । ये लक्षून निजजीवना ॥८॥ जो ऊर्ध्व खालीं भरला । आंत बाहेर सांचला । नामधारक म्हणे त्याला । दत्ता मला भेट देई ॥९॥ तूंचि मूर्तिमंत ब्रह्म । त्रिमूर्ति तूं गुरु परम । कलियुगीं मंगलधाम । भक्तकामपूरक ॥१०॥ विशाल तव सत्कीर्ती । परिसोनि केली विनंती । तव कर्णावरी न ये ती । वाटे खंती सर्वज्ञा हे ॥११॥ जरी मज तूं नेणसी । तरी सर्वज्ञ कीं होसी । किंवा मातें उपेक्षिसी । दयाळूसी साजे हें कीं ॥१२॥ मी अधःपाता जाईन । जरी देसी उपेक्षून । सेवा इच्छी कीं तव मन । तेणें होसी कीं दाता ॥१३॥ सेवा शान ठेवून । मेघापरी दे जीवन । पूर्वी जेवी दिल्हें दान । विभीषणध्रुवादिकां ॥१४॥ किं मुख पसरितां । बाळापाशीं मागें माता । जरी बाळ मारी लाथा । तया माता टाकून दे कीं ॥१५॥ तूंची मम माता पिता । तूंचि एक कुळदेवता । भिन्न भाव येथें नसतां । कोण दाता मज दुजा ॥१६॥ नरेश्वर सेवकवंशा । रक्षी न धरितां आशा । तूं अस्मत्पूर्वजेशा । सर्वेशा कीं उपेक्षिसी ॥१७॥ मी इत्यंभूत सर्व । कथितां ही नये द्रव । जेणें पाषाणा ये द्रव । तूं निर्द्रव होसी कैसा ॥१८॥ अशी प्रार्थना करुन । हो मूर्छित हें जाणून । दत्त चित्तीं प्रगटून । आश्वासन देयी स्वप्नीं ॥१९॥
॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे चरितानुसंधानं नाम प्रथमोऽध्यायः ॥

ग्रंथारंभीं श्री दत्तप्रभूंची स्तुती करतांना प.प.श्री.वासुदेवानंद सरस्वती महाराज म्हणतात - जे आपल्या आत्मरूपी वस्त्रास धुऊन शुद्ध, मलरहित करतात, जे आपल्या आत्मरूप ज्योतीचेच प्रकाशरूप आहेत, जे ब्रह्मानंद स्वरूप आहेत आणि जे समस्त अनर्थ-अनिष्टांचे शमन करतात अशा श्रीदत्तप्रभूंना मी अनन्य शरणागत होऊन नमन करतो. ज्या परब्रह्मातून हे भूत, भव्य आणि भवत अर्थात सर्व चराचर निर्माण होते, ज्यांच्या कृपेनें हे अखिल ब्रह्मांड कार्यरत राहते आणि ज्यांच्या ठायींच लय पावते, असे हे त्रिगुणात्मक ब्रह्म श्री दत्तात्रेय आहेत. केवळ भावपूर्ण भक्तीनेच ज्यांची प्राप्ती होते, त्या श्रीदत्तमहाराजांचे चरित्र माझे चित्त शुद्ध, पावन होण्यासाठी मी साररूपांत कथन करीत आहे. खरें तर हा वासुदेव केवळ निमित्त आहे, या साररूपी गुरुचरित्राचे कर्ते-करवितें प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहेत. त्यांच्या या भवतारक चरणीं चित्त एकाग्र करून संत सज्जनांनी ह्या गुरुचरित्राचे श्रवण करावे. असा भाव ठेवून जे दत्तभक्त हे चरित्र वाचतात अथवा श्रद्धेनें श्रवण करतात, त्यांच्यावर त्या भक्तवत्सल श्री दत्तप्रभूंची सहजच कृपा होते. ते हा भवसागर तरुन जातात आणि त्यांच्या कुळाचा उद्धार होतो.
ज्यांचे वर्णन करणे मन आणि वाचेला अगोचर आहे, मात्र आपल्या निजभक्तांसाठी जे स्वेच्छेनें प्रगट होतात आणि आपले पुण्यप्रद दर्शन देतात असे या कलियुगांतील श्री दत्तप्रभूंचे द्वितीय अवतार, यतिराज श्री नृसिंह सरस्वती महाराज आहेत. त्यांचे चरित्र माहात्म्य ऐकून नामधारक ब्राह्मणाच्या मनीं त्यांच्या दर्शनाची इच्छा झाली आणि तो गाणगापूरला जाण्यास निघाला. ज्याप्रमाणें तप्त उष्म्यानें ग्रस्त मनुष्य शीतल छाया आणि मधुर जलाची अत्यंत आर्ततेनें अभिलाषा करतो, त्याचप्रमाणें त्रितापांनी अतिशय त्रस्त झालेला हा नामधारक श्रीदत्तप्रभूंच्या भेटीसाठी तळमळत होता. त्यांची वारंवार प्रार्थना करीत होता. - हे विश्वम्भरा, या सर्व चराचर अखिल सृष्टीला तू पूर्णतः व्यापून राहिला आहेस. या कलियुगीं केवळ तूच एक मंगलधाम आहेस, आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या हे श्रीदत्तात्रेया मला तू दर्शन दे. तुझी भक्ताभिमानी अशी सत्कीर्ती ऐकून मी तुला आर्तभावाने विनवणी करीत आहे, हे सर्वज्ञा, माझी ही प्रार्थना अजून तुझ्यापर्यंत कशी पोहोचत नाही, याचे मला अतीव दुःख होत आहे. हे प्रभो, तू मला जाणत नाहीस असे तरी मी कसे म्हणू? योगीं-मुनीं तुला सर्वज्ञ म्हणतात. तू अंतर्यामी आहेस. या ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट, तसेच आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना तुला ज्ञात असतात. तू भक्तवत्सल, करुणासागर आहेस. त्यांमुळे तू माझी उपेक्षा करीत असशील हे मला सर्वथा अशक्य वाटते. हे दयाळा तूच जर इतका कठोर झालास, तर माझा अधःपात निश्चित आहे. तेव्हा, तुझी भक्ती आणि सेवा करण्याचे भाग्य मला प्राप्त व्हावे, असा तू आशीर्वाद दे. हे दत्तात्रेया, तुझा वरदहस्त माझ्या मस्तकीं ठेव अन एव्हढें दान मला दे. ज्याप्रमाणे मेघ पर्जन्यवर्षाव करून तृषार्त जीवसृष्टीस तृप्त करतात, त्याचप्रमाणे हे कृपावंता, तुझे पुण्यप्रद दर्शन देऊन मला कृतार्थ कर. पूर्वी विभीषण, ध्रुवादिकांच्या भक्तीने प्रसन्न होऊन तू त्यांना अपूर्व दान दिले होतेस ना ? लहान बाळाने आपल्या मातेला कितीही लाथा मारल्या, तरी माता त्याला मायेने दुग्धपान करतेच ना ? ती त्याला रागाने कधी दूर करते का ? हे गुरुराया, तुम्हीच माझी माता आहात आणि पिताही तुम्हीच आहात. माझे कुलदैवत, इष्टदैवत केवळ तुम्हीच आहात. आपण कधीही दुजाभाव करत नाही, तुम्हांस शरण आलेल्यांचा नेहेमीच उद्धार करता अशी आपली ख्याती आहे. हे दीनोद्धारा, तुमच्यावाचून अन्य कोणाला मी शरण जाऊ ? हे नरेश्वरा, आपल्या भक्तांचे तू सदैव अगदी निरपेक्षपणें रक्षण करतोस. माझ्या पूर्वजांनीदेखील तुलाच ईशस्वरूप मानून तुझी भक्ती, उपासना केली होती. आमच्या कुळाचा तूच तर सर्वेश्वर आहेस. तरिही, माझी तू इतकी उपेक्षा का करीत आहेस ? मी अत्यंत प्रांजळपणे तुला इत्थंभूत सर्व कथन केले आहे, किती व्याकुळतेने तुमची आळवणी केली आहे तरीही हे दयाळा, तुझे हे कोमल हृदय अजून का बरें द्रवत नाही? एखाद्या पाषाणालादेखील एव्हाना पाझर फुटला असता, मात्र माझी अशी ही हीन-दिन अवस्था पाहूनसुद्धा तू एवढा कठोर कसा होऊ शकतोस? अशी कळकळीची प्रार्थना करून तो नामधारक ब्राह्मण अखेर मूर्च्छित पडला. तेव्हा, त्या परमदयाळू, भक्तवत्सल श्रीदत्तप्रभूंनी त्यास स्वप्नदृष्टांत दिला आणि सिद्धरूपांत दर्शन देऊन त्याचा उद्धार करण्याचे आश्वासन दिले.

॥ प. प. श्रीद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥