Dec 17, 2021

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - अनसूयोपाख्यान


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार चतुर्थोऽध्यायः ॥

बहुवित् सिद्धा पुसे द्विज । अत्रि कोण सांग मज । त्रीश केवीं हो अत्रिज । सिद्ध गुज ऐक म्हणे ॥१॥ जाण अत्रि ब्रह्मपुत्र । अनसूया तत्कलत्र । दंपती परम पवित्र । त्यांचा पुत्र दत्तात्रेय ॥२॥ निर्बाध अनसूयेचे । व्रत पाहुनी तें साचें । मन भ्यालें सर्व सुरांचें । अबोधाचें बीज हें कीं ॥३॥ ते निश्चोतत्धैर्य देव । त्रिमूर्तीपाशी घेती धांव । आश्वासोनीं त्यांतें देव । भिक्षुभाव स्वीकारिती ॥४॥ ते ऊर्ध्व लोक सोडुनी । भिक्षुकसे होवुनि । तिघे आले अत्रिसदनीं । जातां रानीं मुनिवर्य ॥५॥ त्यां किंप्रयोजन ऐसें । अनसूया पुसतसे । नग्नभिक्षा दे तूं ऐसें । याचितसे देवत्रय ॥६॥ जरी सृती सोडिती ते । तरी सती वदे त्यातें । तसीच मी तुम्हा देते । स्वस्थचित्तें भिक्षा करा ॥७॥ स्वव्रताच्या सामर्थ्ये ती । अत्रिपदा चिंती चित्तीं । अतिथी बाळ कल्पुनी ती । सती नग्न होती झाली ॥८॥ सुदुस्तर ज्यांची माया । सहसा बालत्व ये तयां । तें पाहून अनसूया । विस्मया पावली ती ॥९॥ सुहास्यमुखी घे बालां । तंव स्तना पान्हा आला । पाजी एका एका बाला । जी विमला पातिव्रत्यें ॥१०॥ त्यांची शांत झालीं मनें । पतिव्रतास्तनपानें । पाळण्यांत घालुनि गाणें । ती प्रीतीनें गायी साध्वी ॥११॥ ती सुखानें गातां मुनि । तेव्हा आला वनांतुनि । ज्ञानें त्रिमूर्ति जाणुनी । स्तवुनि तोषवी त्याला ॥१२॥ त्यांचें गुज तें जाणुनि । राहिले सुत होऊनि । निजरुपेंहि स्वस्थानीं । जाती तीनी देव हर्षे ॥१३॥ सगुणत्वा आले त्यांची । अत्रि नामें योजी साचीं । चंद्र दत्त दुर्वासाचीं । ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥१४॥ चंद्र प्रणाम करुनी । चंद्रलोका गेला, मुनि । दुर्वासा फिरे भुवनीं । स्वसदनीं राहे दत्त ॥१५॥ तो निवृत्तिमार्ग दावी । भक्तांचे काम पुरवी । स्मर्तृगामी पुनः भुवि । अवतरे श्रीपादाख्य ॥१६॥ ॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे अनसूयोपाख्यानं नाम चतुर्थोऽध्यायः ॥
श्री विष्णूंच्या अवतारांचे कारण आणि प्रयोजन याविषयीची कथा ऐकल्यानंतर नामधारक श्री दत्तावताराचे वर्णन ऐकण्यास उत्सुक होता. तो सिद्धमुनींना म्हणाला," अत्रिऋषी कोण होते ? त्यांची पत्नी अनसूया कोण होती ? त्रिमूर्ती कपट वेषाने त्यांच्या आश्रमीं कसे आले ? त्रयमूर्तींचा जन्म कसा झाला ? हे सर्व मला सविस्तर सांगावे." आपल्या शिष्याची ही विनंती ऐकून सिद्धमुनी अति प्रसन्न झाले आणि त्रैमूर्ती अवतार कथा सांगू लागले. - सृष्टिरचना करण्यासाठी ब्रह्मदेवाने सात मानसपुत्र निर्माण केले. त्या सात पुत्रांतील अत्रि हा मुख्य पुत्र होता. श्री गुरु परंपरा ही तेथूनच निर्माण झाली. अत्रि ऋषींची अनसूया नामक भार्या होती. ते उभयंता धर्मपरायण, सदाचरणी आणि वंदनीय असे दाम्पत्य होते. त्यांच्या आश्रमातून कोणीही अतिथी कधीही विन्मुख जात नसे. अभ्यागताला त्यांच्या त्या अतिपवित्र आश्रमीं नित्य अन्न संतर्पण होत असे. प्रभू श्रीदत्तात्रेय या परमपुण्यवंत दाम्पत्यांचे पुत्र होत. अत्रि ऋषींचे आचरण शुद्ध, पवित्र तर होतेच, त्यांची पत्नी अनसूयाही महापतिव्रता होती. ती काया-वाचा-मनाने भक्तीपूर्वक पतिसेवा करीत असे. तिच्या तप व पातिव्रत्याच्या पुण्यप्रभावाने सर्व देव भयभीत झाले. ही ऋषीपत्नी आपल्या योगसामर्थ्यानें केव्हा कुठल्या देवाचे स्थान हिरावून घेईल वा आम्हांस शाप देईल अथवा न जाणो कधी कुणाला वर देऊन आमचा नाश करू शकेल, अशी चिंता त्या सर्व सुरांना वाटू लागली. त्यांचे धैर्य खचू लागले. अखेर, इंद्रादि सर्व देव एकत्र होऊन ब्रह्मा, विष्णु आणि शंकर यांच्याकडे गेले आणि आपली व्यथा त्यांना सांगितली. तसेच, आपण यांवर उपाय केला नाही तर आमचे स्वर्गस्थानही जाऊ शकते अशी भीतीही व्यक्त केली. सर्व देवांचे हे चिंताग्रस्त बोल ऐकून त्रिमूर्तींनी त्यांना धीर दिला आणि ' आपण महापतिव्रता अनसूयेचा व्रतभंग करून सर्व देवांस भयमुक्त करू,' असे आश्वासनही दिले.  सतीची सत्त्वपरिक्षा घेण्यासाठी त्या तीनही देवांनी भिक्षुकांचे रूप धारण केले आणि ऊर्ध्वलोकांतून ते मनोवेगें अत्रिऋषींच्या आश्रमांत अभ्यागत म्हणून आले. त्यावेळीं, अत्रिमुनी अनुष्ठानासाठी वनांत गेले होते. आपल्या गृही आलेल्या त्या तीन अतिथींचे अनसूयेने उचित आदरातिथ्य केले आणि त्यांना नमन करून विनयतेने म्हणाली," ऋषीवर्य, मी आपली काय सेवा करू ?" तेव्हा भिक्षुकांच्या रूपांतील त्रिमूर्तींनी तिच्याकडे भोजनाची मागणी केली, आणि म्हणाले " आम्ही भुकेने फार व्याकुळ झालो आहोत. तुमच्या या आश्रमांत नित्य अन्न संतर्पण होत असते, तुम्ही इच्छाभोजन देता, अशी ख्याती आम्ही ऐकली. म्हणून आम्ही इथे आलो आहोत. आम्हांस सत्वर भोजन द्यावे." अतिथींची ही इच्छा ऐकून अनसूयेने त्वरित सर्व तयारी केली आणि त्यांना आसनांवर बसण्याची प्रार्थना केली. मात्र तिने विवस्त्र होऊन आपणांस भिक्षा घालावी, असा त्या त्रिदेवांनी हट्ट धरला. त्यांचे हे विपरीत, धर्ममार्गाच्या विरुद्ध असे वचन ऐकून, हे निश्चितच कुणी अवतारी पुरुष असावेत असा त्या श्रेष्ठ पतिव्रतेने विचार केला. तसेच," माझे मन निर्मळ आहे आणि माझ्या पतीचे तप:सामर्थ्य मला अवश्य तारेल.", अशी तिची दृढ धारणा होती. तेव्हा, ती महापतिव्रता अनसूया म्हणाली," योगिवर्य, तुमच्या इच्छेनुसार मी तुम्हांस भिक्षा देते. तुम्ही स्वस्थचित्तानें भोजन करावे. "  तेव्हा त्या सतीने आपल्या पतीच्या, अत्रिऋषींच्या चरणांचे मनोभावें चिंतन केले. त्यानंतर तिने, " हे अतिथी माझी बालके आहेत." असा मनांत संकल्प केला आणि आपल्या अंगावरची सर्व वस्त्रें उतरविली. अन काय आश्चर्य ! अनसूया जेव्हा विवस्त्र होऊन अन्नोदक वाढण्यासाठी बाहेर आली, तो ते तीन अतिथी, तान्ही बालके होऊन तिथे रांगत होती. अत्रि ऋषींचे तप आणि तिचे पातिव्रत्य यांच्या पुण्यप्रभावाने तिने केलेल्या या संकल्पात एव्हढे सामर्थ्य होते की ब्रह्मा-विष्णु-महेश्वर या देवाधिदेवानांदेखील बालस्वरूप घ्यावे लागले. ज्यांच्या प्रकृतीरूपी मायेला पार करणे सर्वथा अशक्य, अवघड असते, ते या सृष्टीचे उत्पत्ती-स्थिती-लयकर्ते आता तान्ही बालके झाली होती. हे नवल पाहून अनसूया अतिशय आश्चर्यचकित झाली. मग पुन्हा वस्त्रें नेसून ती त्या तीन बालकांजवळ आली आणि त्या बालकांना तिने वात्सल्यतेनें जवळ घेतले. त्या गोजिरवाण्या बाळांना पाहून अनसूयेला पान्हा फुटला. एकेका बालकाला मांडीवर घेऊन तिने स्तनपान दिले आणि त्या तिन्ही शिशुंचे क्षुधा निवारण केले. ते क्षुधार्त बालकरूपी त्रिमूर्ती त्या महान पतिव्रतेच्या स्तन्यपानाने तृप्त झाले. धन्य ते श्रेष्ठ तपस्वी अत्रि महर्षी अन धन्य ती महापतिव्रता अत्रिभार्या अनसूया !  मग अनसूयेने त्या तिन्ही बालकांना पाळण्यांत घातले आणि ती अंगाई गीते म्हणू लागली. असा तो सुखसोहळा सुरु होता, तोच अत्रिऋषी आश्रमांत परतले. अनसूयेने त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. ही तीन बालके म्हणजे ब्रह्मा-विष्णु-महेशच आहेत, हे त्यांनी अंतर्दृष्टीनें ओळखले. अत्यंत हर्षित होऊन त्यांनी त्रैमूर्तींचे स्तवन केले आणि श्रद्धापूर्वक नमनही केले. त्यांचा तो अनन्य भक्तीभाव पाहून त्रिमूर्ती संतुष्ट झाले. ती तीन बालके तर पाळण्यातच राहिली आणि चतुर्मुख ब्रह्मा, चक्रपाणि विष्णु आणि पिनाकधारी शंकर निजरूपात उभे राहिले. त्रिमूर्तींचे ते दिव्य रूप पाहून अत्रि मुनी आणि सती अनसूया यांना अतिशय आनंद झाला, त्यांनी देवांना प्रणिपात केला. त्यावर ते तीनही देव म्हणाले," अत्रि ऋषी, तुमचे तपोबल आणि अनसूयेचे पातिव्रत्य अलौकीक आहे. तुमच्या भक्तीनें आम्ही प्रसन्न झालो आहोत, तुम्ही इष्ट वर मागा." तेव्हा, " ही तीनही बालके आमच्या गृहीं पुत्र म्हणून राहावेत, व हे त्रिमूर्ती एकरूप असावेत. " हेच अभीप्सित वरदान त्या जगद्वंद्य पती-पत्नींनी मागितले. त्यांचे हे वचन ऐकून तीनही देव ' तथास्तु !' असा वर देऊन आपल्या स्वस्थानीं निघून गेले. एका सुमुहूर्ती, अत्रि ऋषींनी ब्रह्मदेवाच्या बालमूर्तीचे चंद्र, विष्णुमूर्ती बालकाचे दत्त आणि शिवबालमूर्तीचे दुर्वास असे नामकरण केले. अशा रितीने, त्रिमूर्ती अत्रि-अनसूयेच्या आश्रमांत त्यांचे पुत्र होऊन राहिले.  काही कालांतराने, चंद्र आणि दुर्वास यांनी आपल्या माता-पित्यांस निजस्थानीं जाण्याची अनुज्ञा मागितली. अनुमती मागत चंद्र म्हणाला, " मी चंद्रलोकांत राहून तुमचे नित्य दर्शन घेईन." तर " मी ऋषी असून तीर्थाटनास जातो. तसेच अनुष्ठान, यज्ञयाग यांसाठी भूलोकी भ्रमण करीत राहीन." असे म्हणून दुर्वासांनी आपल्या माता-पित्याचा निरोप घेतला. तिन्ही देवांची मूर्ती एक होऊन विष्णूंची दत्तनामक मूर्ती नित्य स्वगृहीं राहीली. अत्रि-अनसूयेला मिळालेले वरदान अशाप्रकारे जगत्कल्याणासाठी पूर्णत्वास गेले. त्रिमूर्ती त्यांच्या सदनीं एकच मूर्ती, एकच देवता म्हणून राहिले. परमात्मा दत्तरूपाने अवतरला ! अत्रि ऋषींचा पुत्र तो आत्रेय, असा तो दत्तात्रेय आहे आणि सिद्ध गुरुचे मूळपीठ तोच आहे. श्री दत्तप्रभूच मोक्षदाते असून, आपल्या भक्तांचा सदैव उद्धार करतात. दत्तमहाराजांच्या कृपेने भक्तांच्या इष्ट मनोकामना सहजच पूर्ण होतात. ते स्मर्तृगामी आहेत, म्हणजेच त्यांचे केवळ मनापासून स्मरण केले असता ते तत्काळ प्रकट होतात. श्रीहरि विष्णूंच्या अवताराप्रमाणेच श्रीदत्तात्रेयांचेही अवतार झाले. आपण अवतार का व केव्हा घेतो ? हे भगवंताने गीतेत अनेक श्लोकांमधून सांगितले आहे. ' परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥' अशी परिस्थिती जेव्हा उद्भवते, तेव्हा भगवंत अवतार घेतात. त्रिमूर्ती दत्तदेखील श्रीपाद श्रीवल्लभ रूपांत पुन्हा या भूलोकी अवतरित झाले.  

श्री दत्तजयंती विशेष : 
दत्तभक्तहो, श्रीदत्तजन्माची ही कथा ब्रह्मनिष्ठ वामनबुवांनी श्रीगुरुलीलामृत या प्रासादिक ग्रंथांत अतिशय रसाळ ओव्यांतून वर्णिली आहे. 
ऋषि योगिजन उत्कृष्टविश्राम । ब्रह्मकैवल्य परंधाम । कृतयुगीं गुरु पुरुषोत्तम । अत्रि-आश्रमीं प्रकटले ॥ मार्गशीर्ष शुक्लपक्षीं । भूतातिथी मंदरोहिणी ऋक्षीं । त्रैमूर्ति हे सायान्हीं सुराध्यक्षीं । अंतर्साक्षी जन्मले ॥ सुरमासीं शुक्लातिथि चवदावी । दत्तावतार मोक्षसुख चव दावी । दासें लीला म्हणूनच वदावी । जगद्गुरुची सर्वदा ॥ ब्रह्मावतार ' सोम ' । रुद्रावतार ' दुर्वास ' नाम । विष्णुस्वरूप ' दत्त ' परम । सर्वांसी मान्य योगीश्वर ॥ भृगु आदिक ऋषी-संमत । चतुर्दशी बुध मार्गशीर्ष शुक्रांत । उच्चस्थ ग्रह-पंचक विख्यात । वृषभलग्नीं प्रगटले ॥ सोम चंद्रमंडलीं निश्चितीं । दुर्वास तीर्थयात्रें जाती । त्रयदेवात्मक घडली मूर्ती । होऊनि स्थिती एकत्र ॥ विधाता-नारायण-पंचवक्त्र । मिळून झाले एकत्र । विशुद्धसत्त्व एकस्वरूप स्वतंत्र । अवतरले सर्वत्र सुखप्रद ॥ स्कंदपुराणींचे वचन । दत्तात्रेयोत्पत्ति कथन । मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमादिन । प्रदोषव्यापिनी रविवारीं वर्णिले ॥ अत्रीस त्रैमूर्तींनी वर दिधले । तेचि त्रयमूर्ति जाहले । ' देवदत्त ' म्हणूनि नाम ठेविलें । दत्तात्रेय ईश्वर ॥ अनसूया अत्रि आनंदले । प्रत्यक्ष ईश्वर पुत्र जाहले  कृतकृत्य उभयतांस वाटलें । वर्णिलें स्कंद्पुराणीं हें ॥ 

श्रीगुरुलीलामृतातील श्रीदत्तजन्म अध्याय इथे उपलब्ध आहे.
दत्तभक्तहो, श्री दत्तजन्म आख्यान लेख इथे वाचता येतील.                          

॥ प. प. श्रीद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

No comments:

Post a Comment