Dec 15, 2021

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - दीपकाख्यान


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार द्वितीयोऽध्यायः ॥

ते पाहुन येरु उठे । तया पुढें सिद्ध भेटे । तया पुसे कोण तूं कोठें । जासी वाटे मायबाप ॥१॥ सिद्ध रम्य बोले वाचे । त्रिमूर्ति गुरु आमुचे । न देखती भक्त ज्याचे । तापदैन्याचे पसारे ॥२॥ ऐसे व्यक्त ऐकून । नामधारक बोले दीन । मी त्याचा भक्त असून । कां लोटून देई मला ॥३॥ विश्व यंत्र चालक दत्त । तेथें हा अस्थिरचित्त । हें जाणून बोले व्यक्त । सिद्ध मुक्तसंग जो ॥४॥ तूं स्वछंदे वागसी । व्यर्थ देवा दोष देसीं । कोप येतां इतरांसी । स्वभक्तांसीं राखी गुरु ॥५॥ एकदां तो कोपे जरि । न राखती हरहरी । येरु पुसे कवणेपरी । वद थोरीव गुरुची ॥६॥ म्हणे सिद्ध कलीप्रत । ब्रह्मा सांगे हे चरित । गोदावरीतीरस्थित । वेदधर्मशर्मा गुरु ॥७॥ तो स्वीय पातकान्त । करावया ये काशींत । तया दीपक सेवित । स्वयें कष्ट साहोनिया ॥८॥ सुहास्य मुखें सेवा करी । गुरु शिव्या देई मारी । न धरीं तें अंतरी । क्षालन करी मळमूत्र ॥९॥ अंध पङगु गलत्कुष्ठी । गुरु झाला महाकष्टी । शिष्या गांजी सेवेसाठीं । तरी करी सेवा शिष्य ॥१०॥ अपर्णापति हो प्रसन्न । शिष्या देयी वरदान । नाही गुर्वाज्ञा म्हणून । फिरवून धाडी शर्वा ॥११॥ त्याचा निश्चय जाणून । वर दे विष्णूही येऊन । शिष्य बोले सर्व दान । देयील पूर्ण गुरु माझा ॥१२॥ निश्चय त्याचा ओळखून । विष्णू भुक्तिमुक्तिदान । दे, गुरुही हो प्रसन्न । काय न्यून तया शिष्या ॥१३॥ हो अस्तंगत माया । गुरु प्रसन्न हो जया । भज सोडोनि संशया । करील दया त्रिमूर्ति हा ॥१४॥ ॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे दीपकाख्यानं नाम द्वितीयोऽध्यायः ॥ कृपासिंधू श्रीदत्तप्रभूंनी स्वप्नीं साक्षात्कार दिल्यावर नामधारक विप्र जागा झाला आणि आपल्या गुरूंचे दर्शन व्हावे हीच एक मनोकामना ठेवून मार्गक्रमण करू लागला. पुढें, या प्रवासातच त्याला एका यतीचे दर्शन झाले. त्यांना पाहताच नामधारकास जणू आपले माता पिताच आपल्याला भेटले आहेत, असे वाटले आणि त्याने त्या यतिराजांना आपला परिचय द्यावा, अशी विनवणी केली. तेव्हा, आपले नाव सिद्धमुनी असून त्रिमूर्ती हेच आपले गुरु आहेत असे अत्यंत मधुर स्वरांत त्यांनी नामधारकाला सांगितले. आपल्या गुरूंविषयी विस्तारपूर्वक माहिती देत सिद्ध मुनी पुढे म्हणाले - आमच्या गुरुवर्यांच्या भक्तांना कधीही ताप अथवा दैन्य यांचा त्रास होत नाही. सिद्धयोगींचे आपल्या गुरूंविषयीचे ते वक्तव्य ऐकून नामधारक दीन-खिन्न होत म्हणाला, “ हे मुनीवर्य, मीदेखील श्री दत्तप्रभूंचाच भक्त आहे, असे असूनसुद्धा त्यांनी मला असे दूर का लोटलें ?" या अखिल विश्वाचे चालक श्री दत्तप्रभू आहेत, हे सृष्टीरहस्य सिद्धमुनींनी जाणले होते. या नामधारकाचे चित्त अस्थिर असून गुरूंविषयीं शंकाग्रस्त आहे, हे त्यांनी तात्काळ ओळखले. त्याचे मन संशयरहित करण्यासाठी सिद्धमुनी बोलू लागले, " नामधारका, तुझ्या मनांत दृढ भक्ती नाही, गुरूंविषयी किंतु आहे. तरीही, तू व्यर्थच देवाला दोष देत आहेस. आपल्यावर कोणाचाही कोप झाला तर त्यापासून सदगुरु आपले रक्षण निश्चितच करतात. मात्र, श्रीगुरुच आपल्यावर रागावले तर प्रत्यक्ष हरिहर सुद्धा आपले रक्षण करू शकत नाहीत." तेव्हा नामधारकाने ह्याला शास्त्राधार काय असे विचारले आणि सिद्धमुनींना नमन करून म्हणाला, " हे कृपानिधी, आपण मला गुरुंचे माहात्म्य कथन करावे." त्यांवर प्रसन्न चित्ताने सिद्धमुनी नामधारकाला सांगू लागले, " वत्सा, ब्रह्मदेवांनी कलीला गुरु माहात्म्याचे वर्णन करतांना ही कथा सांगितली होती. पूर्वी वेदधर्मशर्मा नावाचे एक गुरु आपल्या शिष्यांसह गोदावरी नदीच्या किनारी असलेल्या आपल्या आश्रमात राहत होते. आपल्या पूर्वजन्मांतील पापकर्म स्वतःच्या देहाने भोगल्याशिवाय मोक्षप्राप्ती होणार नाही, हे जाणून त्या पापाची निष्कृती होण्यासाठी ते काशी नगरींत आले. त्यावेळी वेदधर्म ऋषींचा दीपक नामक उत्तम शिष्य त्यांची भक्तिभावाने सेवा करीत होता. आपल्या गुरूंची सेवा करीत असतांना होणारे कष्ट, क्लेश तो आनंदाने भोगत होता. व्याधीग्रस्त, गलितगात्र आणि चिडखोर झालेले वेदधर्म कधी त्याला अपशब्द बोलत असत, मात्र तो शिष्योत्तम अशा गोष्टींकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असे आणि आपल्या गुरूंनाच विश्वनाथ समजून तो त्यांची एकनिष्ठपणे सेवा करीत होता. आपल्या गुरूंच्या जखमा स्वच्छ करणे, मळमूत्र क्षालन करणे, हवे त्या प्रकारचे अन्न आणून देणे आदि सेवा संतोषपूर्वक सुहास्य वदनाने तो करीत असे. प्रारब्धभोग भोगत असतांना वेदधर्म ऋषींच्या सर्वांगी कुष्ठ आले. ते अंध, पङगु झाले. अशा असह्य यातनांनी अत्यंत त्रासलेले ते गुरु आपल्या या शिष्याला निष्ठुरपणे बोलत असत. दीपक मात्र अत्यंत शांतपणे गुरुसेवा करीत असे. त्याची गुरुचरणीं असलेली भक्ती आणि एकाग्रपणे करत असलेली गुरुसेवा पाहून उमापती सदाशिव अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यास वर मागण्यास सांगितले. त्यावर, तो गुरुभक्त शिष्य " हे व्योमकेशा, माझ्या गुरूंची आज्ञा झाल्याखेरीज मी वर कसा घेऊ ?" असे लीनतेने म्हणाला. त्याचा तो दृढनिश्चय आणि अनन्य गुरुसेवाभावाने श्रीहरी विष्णूदेखील संतुष्ट झाले आणि दीपकासमोर प्रकट होऊन, ' कोणतेही वरदान माग.' असे म्हणाले. तेव्हा वंदन करून तो शिष्य म्हणाला, " हे हृषीकेशा, जो वर तुम्ही मला देता, तेच वरदान माझे गुरुही देतील. त्यामुळे माझी गुरुभक्ती दृढ व्हावी, हेच मागणे मी मागतो." दीपकाचा हा आपल्या गुरूंविषयी असलेला श्रद्धाभाव पाहून विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला गुरुभक्ती आणि मुक्तीचे वरदान दिले. हे सर्व वृत्त त्या परमशिष्याने आपल्या गुरूंना कथन केले. तेव्हा, वेदधर्म ऋषी प्रसन्न झाले आणि त्याच क्षणी त्यांचा देह दिव्य झाला. केवळ आपल्या शिष्याची कसोटी पाहण्यासाठीच त्या परम तपस्वी गुरुने मायालीलेने हे कुष्ठी होऊन क्लेश भोगण्याचे नाटक केले होते. त्या कसोटीत पूर्णपणे उतरलेल्या आपल्या शिष्यास त्यांनी अनेक शुभाशिर्वाद दिले. श्री गुरूंची सदैव कृपादृष्टी असल्यावर शिष्यास न्यून ते काय ? कलिमलापासून वाचण्यासाठी सद्गुरुसेवा अत्यंत फलदायी ठरते हेच खरे !
ब्रह्मवैवर्त पुराणातील ही कथा सिद्धमुनींनी नामधारकास सांगितली आणि म्हणाले, " अखंड आणि अनन्यभावाने केलेली गुरुसेवा इह-पर कल्याण आणि मोक्षदानही साधते. तेव्हा, तू संशयरहित होऊन श्रीगुरुंना शरण जा. परम दयाळू त्रिमूर्ती तुझ्यावर अवश्य कृपा करतील."

॥ प. प. श्रीद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

No comments:

Post a Comment