Aug 24, 2022

श्रीगुरुचरितम् भक्तिरसामृत - १


श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


ज्ञान, ऐश्वर्य, बल, तेज, वीर्य आणि वैराग्य आदि वैभवाने युक्त अशा विष्णु, शिव, गणेश, सूर्य, देवी (शक्ति) तसेच इंद्र, अग्नि (आदि) मूर्ति जे आपल्या मायेच्या सामर्थ्याने धारण करतात, पण तत्त्वतः जे अनादि आणि अनंत असतात ते सद्‌गुरु दत्तभगवान् नित्य माझ्या हृदयमंदिरी स्थित असो. मी श्री दत्तप्रभूंना भक्तिपूर्वक नमन करतो. 
दत्तात्रेय जन्मरहित, अनंत, निर्गुण, निरिच्छ, एकमेवाद्वितीय, अक्रिय परब्रह्म आहेत. त्यांनी आपल्या योगमायेने विराट पुरुषरूप धारण करून विश्व निर्माण केले. अनंत पाय आणि अनंत शिरे असलेले भगवंताचे ते दिव्य स्वरूप केवळ सिद्धपुरुष आपल्या ज्ञानचक्षूंनी पाहू शकतात. त्यांच्यापासूनच पातालादि लोकांचा विस्तार झाला आहे. हा मायाध्यक्ष ह्या अखिल चराचर सृष्टीचे सृजन करतो. संत आणि धर्म यांच्या रक्षणासाठी मनुष्यरूपाने अवतरलेल्या त्या भगवंताला सामान्य जन मात्र ओळखू शकत नाहीत.
स्वतःचेच दान करून आपले दत्त हे नाम सार्थक केलेला अनसूया आणि अत्रीचा हा पुत्र दत्तात्रेय साक्षात ईश्वरस्वरूप आहे. केवळ स्मरणमात्रेच संतुष्ट होणाऱ्या या परमानंदस्वरूप दत्तप्रभूंचे श्रद्धेने नित्य पूजन करावे. मानसपूजा ही सर्वथैव श्रेष्ठ मानली आहे. तेव्हा या अचिंत्य, अव्यक्त आणि लीलाविग्रही अशा या परमात्म्याने आपल्या भक्तांसाठी नरदेह धारण केला आहे, अशी कल्पना करावी. परमेश्वर हा शुद्ध भक्तीचा भुकेला आहे, त्यामुळे अनन्यभावानें - मनांत कुठलाही किंतु न आणता त्याचे पूजन करावे. 
श्री दत्तात्रेयांची मानसपूजा विविध उपचारांनी करता येते. इथे श्री टेम्ब्ये महाराजांनी षोडशोपचार पूजाविधी वर्णन केला आहे. 
प्रथमतः प्रार्थना करावी - हे भक्तवत्सला ही मानसपूजा आपण स्वीकारावी. श्री दत्तात्रेया आपण माझ्या चित्तात वास करावा.  
ध्यान - सिद्धासनस्थित खेचरी मुद्रेतील श्री दत्तप्रभूंची द्विभुज मूर्ती डोळ्यांसमोर आणावी. आपल्या भक्तांना, शरणागतांना अभय आणि शुभाशिष देण्यासाठी त्यांनी आपला एक हात वर केलेला आहे.  अशा त्या सद्‌गुरु श्रीदत्तांचे मी ध्यान करतो. 
आवाहन - श्रीदत्तात्रेयांना त्याच्या परिवारासह मी श्रद्धेने आणि भक्तीने आवाहन करतो. हे सर्वव्यापी दिगंबरा, आपण शीघ्र या ध्यानमूर्तीत यावे आणि माझी मानसपूजा स्वीकारावी अशी मी आपणांस प्रार्थना करीत आहे. 
आसन - हे दत्तप्रभू, मी आपल्यासाठी हे रत्नजडित असे सुवर्ण सिंहासन कल्पिलेले आहे. त्यावर विराजमान व्हावे. 
पाद्य - चंदन, कापूर आणि केशर यांनी युक्त अशा या सुवासिक, मधुर जलाने मी आपले हे दिव्य चरण धूत आहे. 
अर्घ्य - हे प्रभो, गंध, अक्षता, आणि बेल-तुलसी-शमी आदि विविध पर्ण व कमळ यांनी सुवासित असे हे सुवर्णपात्रांतील जल आपण ग्रहण करा. 
आचमन - हे श्रीपादा, आपल्या आचमनासाठी या सुवर्ण कलशातील हे मधुर जल मी आणले आहे. तुम्ही आचमन करून हा मधुपर्क घ्यावा, अशी मी प्रार्थना करीत आहे. .
स्नान - हे दत्तात्रेया, अनेक प्रकारच्या सुगंधित फुलांचे अर्कमिश्रित असे हे तेल आपल्या अंगाला लावून मी  पंचामृताने आणि अत्यंत पवित्र गंगोदकाने आपल्याला स्नान घालत आहे.
वस्त्र - हे दिगंबरा, स्नानोत्तर हे भगवे वस्त्र आणि मृगचर्म आपण धारण करावे. 
यज्ञोपवीत - हे जगदीशा, मी कल्पनेने केलेले हे नऊ तंतूंचे दिव्य यज्ञोपवीत धारण करावे.
गंधाक्षता - हे नरहरि, भस्म-मृत्तिका-कस्तूरी आणि केशरयुक्त चंदनाचे लेपन मी आपल्या सर्वांगास करत आहे. तदनंतर ह्या रत्नमय अक्षतांनी आपण अलंकृत व्हावे.
पुष्प - हे स्वामी दत्तराज, शमी, बिल्व आणि तुलसी यांच्या पानांनी आणि नानाविध सुगंधित पुष्पांनी मी मनोमन आपले पूजन करीत आहे.
धूप - लाख, अभ्रक, श्रीवास (वृकधूप), चंदन, अगरु आणि गुग्गुळ यांच्यापासून बनवलेला सुगंधी धूप मी जाळीत आहे. त्याचा आपण स्वीकार करावा.
दीप - हे स्वयंप्रकाश प्रभो, गोघृतात भिजवलेल्या वातींनी प्रज्ज्वलित दीप आणि कापूर यांनी मी आपली आरती करत आहे.
नैवेद्य - हे अनसूयानंदना, या सुवर्णाच्या ताटांत मी आपणास ( मधुर, खारट, तिखट, कडू, आंबट आणि तुरट या ) षड्रसयुक्त पक्वान्ने वाढली आहेत. या भोजनाचा आपण स्वीकार करावा, अशी मी अभ्यर्थना करीत आहे. 
फल-तांबूल-दक्षिणा - हे अत्रितनया, भोजनोत्तर हात प्रक्षालन करून हे पुन्हा आचमन घ्यावे आणि ही मधुर फळे, विडा, आणि सुवर्ण दक्षिणा स्वीकारावी. 
आरती-प्रदक्षिणा - हे दत्ता, रत्नजडित नीरांजनाने मी आपली आरती करून नमन करतो आणि तुझ्या लीलांचे स्मरण करीत तुझ्याभोवती प्रदक्षिणाही करतो.
मंत्रपुष्प-राजोपचार - हे दयाळा, मंगल वाद्ये-वेदमंत्रघोषासहित ही पुष्पांजली आपल्या चरणीं अर्पण करतो. 
समर्पण - माझ्या आराध्य देवा, तू सर्वांतर्यामि आहेस. तुझ्याच कृपाप्रसादाने केलेल्या या मानसपूजेचा आपण स्वीकार करावा. तुझा वरदहस्त सतत माझ्या मस्तकी असावा.
विसर्जन - हे दत्तसखया, माझ्या हृदयमंदिरी आपण सदैव स्थित असावे. माझी भक्ती दिवसोंदिवस वृद्धिंगत व्हावी. तुझ्या कृपेला मी नेहेमीच पात्र ठरावे. हे देवाधिदेवा, तू मला हे वरदान दे.

श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त


Aug 18, 2022

श्रीहरिविजय - बलराम-श्रीकृष्ण जन्म कथा


श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥


जय जय अनंतब्रह्मांडनायका । चतुराननाचिया निजजनका । चोघांसीही नव्हे आवांका । तुझें स्वरूप वर्णावया ॥
हे अनंतकोटी ब्रह्मांडनायका, ब्रह्मदेवाच्या जनका तुझ्या स्वरूपाचे वर्णन करतांना चारही वेद थकले. हे प्रभो, एक वेळ या पृथ्वीचे वजन, समुद्रातील जल, भूमीवरील तृणांकुर, आकाशाची भव्यता इत्यादिकांची गणती करता येईल, परंतु तुझे माहात्म्य कथन करणे कदापि शक्य नाही.
क्रूर कंसाने देवकीचे सहा गर्भ मारले, गाई-ब्राह्मणांस अपार कष्ट दिले, तेव्हां क्षीरसागरवासी भगवान श्रीविष्णू शेषास म्हणाले," आता आपण अवतार घेऊन दुष्टांचा निःपात करूं चला." अनंताचे ते वचन ऐकून शेष म्हणाला, " मी पूर्वावतारात सौमित्र होऊन फार कष्ट भोगिले, आता मी अवतार घेणार नाही. हे श्रीहरि, तुम्हीच अवतार घेऊन गाई ब्राह्मण, साधुजन यांचा प्रतिपाळ करावा." त्यावर रमाधव कौतुकाने त्याला म्हणाले, " तूं माझा प्राणसखा । समरभूमीचा पाठिराखा ॥ - मग मी तुझ्याशिवाय अवतार कसा घेऊ ? तरी तूं जाऊन माझा वडील बंधु, बळिभद्र होऊन देवकीच्या गर्भी जाऊन राहा, मी तुझी आज्ञा पाळीन. मी योगमायेसी लवलाहीं । पाठवितो तुजमागें ॥ कंसाने यापूर्वीच्या सर्व गर्भांना मारले असले तरी, तुला माझी योगमाया गोकुळांत नेऊन रोहिणीच्या गर्भात ठेवील. माया स्वतः यशोदेच्या पोटीं जाईल. मग मी मथुरापुरास देवकी-वसुदेव पुत्र म्हणून अवतार घेईन व उपजतांच गोकुळांत येईन. तिथे आपण दोघेजण, गोरक्षमिषें संपूर्ण । दैत्य तेथील संहारूं ॥. नारायणाचे हे बोलणे ऐकून संकर्षणाने त्यांना साष्टांग नमन केले आणि त्यांच्या आज्ञेनुसार देवकीच्या पोटी सातव्या गर्भात जाऊन राहिला. पुढे एके दिवशी वसुदेवास देवकी म्हणाली, " नाथ, मी यापूर्वी सहावेळा गर्भिणी झाले. परंतु या गर्भावस्थेतील माझे डोहाळे काही वेगळेच, नवलाईचे आहेत." वाटे पृथ्वी उचलीन । कीं आकाशा धीर देईन । सप्त समुद्र सांठवीन । नखाग्रीं मज वाटतसे ॥ हातीं घेऊन नांगर-मुसळ । मीच मर्दीन कंसदळ । दैत्य मारावे समूळ । मनामाजी वाटतसे ॥ पत्नीचे हे बोल ऐकून वसुदेव म्हणाला, " ईश्वराची करणी कोणास कळली आहे ? हे बालक तरी वांचून विजयी होवो, एव्हढीच माझी प्रार्थना आहे." लवकरच, देवकीस सातवा महिना लागला. एके रात्री ती निद्रिस्त असतांना, त्या श्रीहरिच्या मायाराणीनें एक अगम्य लीला केली. तंव ती हरीची योगमाया । तिची ब्रह्मांदिकां न कळे चर्या । तिनें देवकीचा गर्भ काढूनी । गोकुळासी पैं नेला ॥ गोकुळांत वसुदेवाची पत्नी रोहिणी कंसाच्या धाकानें नंदगृहांत लपून राहिली होती, ती निद्रिस्त असतां त्या योगमायेने देवकीचा गर्भ काढून तिच्या पोटांत नेऊन घातला. निजले ठायीं गर्भ । पोटांत घातला स्वयंभ । परम तेजस्वी सुप्रभ । सूर्य जैसा तेजस्वी ॥ रोहिणी जागी होताच ती सात महिन्यांची गर्भिणी आहे, याची तिला जाणीव झाली आणि ती चिंताग्रस्त झाली. ही वार्ता नंद-यशोदेस कळताच, तेही अचंबित झाले. इतक्यांत आकाशवाणी झाली की, “ रोहिणी, तू वृथा चिंता करूं नको, हा वसुदेवाचा गर्भ असून, पृथ्वीचा भार उतरण्याकरितां शेषाने अवतार घेतला आहे." ती देववाणी ऐकून सर्वच आनंदित झाले. अशा रीतीने, लोकापवाद सर्व हरला । चिंतेचा डाग धुतला । तों बळिराम जन्मला । नवमास भरतांचि ॥ नंदाने त्या बालकाचे जातक वर्तवून बळिभद्र असे नाव ठेविलें. तों यशोदा जाहली गरोदर । हरिमायेनें अवतार । तेथें घेतला तेधवां ॥ इकडे देवकी जागी झाली. आपल्या पोटांत गर्भ नाही, हे लक्षांत येताच ती अतिशय घाबरली आणि दुःखी स्वरांत वसुदेवास म्हणाली, " नाथा, गर्भ धरणीवर न पडतां पोटांत जिरून गेला." तिचे सांत्वन करीत वसुदेव तिला म्हणाला, " ईश्वराची करणी अगाध आहे. कंसाच्या धाकानें गर्भ कदाचित जिराला असेल !" ही बातमी कंसास कळतांच, त्याने सेवकांस आज्ञा केली, " आतां आठव्याची आठवण विसरू नका." - देवकी होतांचि गर्भिण । जागा नेत्रीं तेल घालून । आठव्याची आठवण । विसरूं नका सर्वथा ॥ देवकीच्या गर्भातील आठव्या बालकाचाच ध्यास कंसाला लागला. त्याला जिकडे तिकडे आठवा दिसू लागला. अर्थात्, आठव्यानें व्यापिलें त्यासी । दिवसनिशीं आठवा ॥ इकडे क्षीरसागरीं श्रीहरीने लक्ष्मीस आज्ञा केली की, तूं वैदर्भ देशांतील भीमक राजाचे पोटी अवतार घे. श्रीविष्णूंचे वचन ऐकून, तात्काळ चालली कमळजा । नमस्कारूनि हरीतें ॥ जगद्वंद्य श्रीविष्णू मथुरापट्टणांत देवकीच्या गर्भी येऊन राहतांच अपूर्व असे तेज तिच्या सभोवती दिसू लागले. पोटा आला विदेही हरी । देवकी नाहीं देहावरी । जनीं वनीं दिगंतरीं । अवघा मुरारी दिसतसे ॥ देवकीस आता सदैव अतीव सुखावस्थेची अनुभूती येऊ लागली. ते पाहून वसुदेव देवकीस म्हणाला, " तुला आपल्या आठव्या बाळाची चिंता वाटत नाही का?" त्यावर, देवकी भुजा पिटोनि बोले वचन । कंसास मारीन आपटोन । मुष्टिकचाणूरांचा प्राण । क्षणमात्रें घेईन मी ॥ हांक फोडोन गर्जे थोर । उतरीन पृथ्वीचा भार । करूनि दैत्यांचा संहार । बंदिशाळा फोडीन मी ॥ आणीं वेगें धनुष्यबाण । युद्ध करीन मी दारुण । जरासंध रथीं बांधोन । सत्रा वेळां आणीन मी ॥ भस्म करीन कालयवन । रचीन द्वारकापट्टण । सकळ नृपां शिक्षा लावून । पट्टराणी आणीन मी ॥ हांक फोडिली क्रोधें थोर । जिवें मारीन भौमासुर । निवटीन कौरवभार । निजभक्तकैवारें ॥ मी भक्तांचा सारथी होईन । दुष्ट सर्व संहारीन । मी ब्रह्मानंद परिपूर्ण । अवतरलों पृथ्वीवर ॥ देवकीचे हे आवेशपूर्ण बोल ऐकून वसुदेवास काळजी वाटू लागली. तिचे हे बोलणे कंसाच्या दूतांनी ऐकले तर अनर्थ होईल, अशी भीती त्याला वाटली. तो देवकीस समजावित म्हणाला, " देवकी ! आतां तू शांत राहा." तत्क्षणीं देवकी गर्जली, मी असें ब्रह्म सनातन । मीच सगुण मीच निर्गुण । देव दैत्य निर्मून ।कर्ता हर्ता मीचि पैं ॥ मी सर्वद्रष्टा अतींद्रिय । मी अज अव्यय निरामय । अजित अपार निष्क्रिय । आनंदमय वर्तें मी ॥ मी प्रळयकाळाचा शास्ता । मी आदिमायेचा नियंता । मी चहूं वाचांपरता । मायानिर्मिता मीच पैं ॥ असें बोलून देवकी स्तब्ध झाली. तोंच देवांनी आकाशात दुंदुभीचा गजर केला; भगवंत आता लवकरच अवतरेल असा विचार करून समस्त सुरवर मथुरेत गुप्तरूपाने आले आणि जय हरे नारायणा गोविंदा । इंदिरावर आनंदकंदा । सर्वेशा मुकुंदा परमानंदा । परमपुरुषा परज्ञा ॥ सर्वतीता सर्वज्ञा । गुणसागरा गुणज्ञा । आम्ही सकळ सुर तवाज्ञा । पाळोनियां राहतों ॥ अशी हस्त जोडून देवकीच्या गर्भाची स्तुति करून अंतर्धान पावले. कंसाला आता सतत आठव्याचाच ध्यास लागला होता. त्याने एका दासीस विचारले, " गर्भास किती महिने झाले ?" त्यावर दासीने नऊ महिन्यांस थोडाच अवधी आहे असे उत्तर दिले. तेव्हा, कंसासुर देवकीपुढे येऊन उभा राहिला, परंतु देवकीस अवघी सृष्टी कृष्णमय दिसत होती. परमानंदात तृप्त असलेल्या त्या देवकीस अणुमात्र चिंता नव्हती. तिला न्याहाळून पाहतांना त्या कंसाला अचानक तिथे तंव तें चतुर्भुज रूपडें । शंख-चक्रयुक्त दिसे ॥ न दिसे स्त्रियेची आकृती । परम देदीप्यमान विष्णुमूर्ती । आरक्तनेत्र सुदर्शन हातीं । ऊर्ध्व करूनि उभी असे ॥ त्याबरोबर कंसाच्या हातांतील शस्त्रे गळाली, अन त्याची बोबडी वळली आणि भयग्रस्त होऊन तो आपली सर्व शस्त्रें आपटू लागला. "आठव्यानें मज व्यापिलें । त्यासी मी गिळीन सगळें ।" असे रागारागांत बोलू लागला. यथावकाश श्रीकृष्णाचा जन्मकाळ जवळ आला असें जाणून आकाशांत देवांच्या विमानांची दाटी झाली. श्रावण वद्य अष्टमीस, बुधवारी रोहिणी नक्षत्र असतांना मध्यरात्री देवकी निद्रिस्त असतांना आठ वर्षांची चतुर्भुज मूर्ती तिच्यापुढे उभी राहिली. तोच देवकीने जागृत होऊन, बालकावरून जिवाचे लिंबलोण केले आणि म्हणाली, आनंद न माये अंबरीं । म्हणे भक्तवत्सला श्रीहरी । तूं माझिया निजोदरीं । पुत्र होवोनि अवतरें ॥ तेव्हा प्रसन्न होऊन श्रीहरी वदला, " मी पुन्हा बालक होतो, परंतु मला गोकुळांत घेऊन जावे. तेथे माझा ज्येष्ठ बंधु बळिभद्र आहे. तो आणि मी लवकरच तुमच्या दर्शनास येऊ." आणि आपल्या योगमायेने देवकीस मोहवून तो सच्चिदानंद घननीळ तिच्यापुढे बालक स्वरूपात प्रकट झाला. त्यावेळी त्या बंदिशाळेत असंभाव्य असे तेज प्रगटले. मग देवकीने वसुदेवास उठवले आणि तों हळूच बोले देवकी बोला । हा अयोनिसंभव पुतळा । यास नेऊन घाला गोकुळा । भय तुम्हांला कदा नाहीं ॥ तेव्हा, वसुदेव तिला म्हणाला," माझ्या पायांत बेड्या आहेत. बाहेर दारांत रक्षक असून सर्वत्र कुलपे लावलेली आहेत. त्यांत पर्जन्यामुळे यमुनेस पूरही आला आहे, यांतून मी बाहेर कसा जाऊं ? असा तो वसुदेव जाहला सद्गद । हृदयीं धरिला ब्रह्मानंद । चैतन्यघन श्रीकृष्ण ॥ त्या मनमोहनाचे मुखकमल पाहताच त्याच्या पदीं शृंखला तुटून गेल्या. तो प्रकार पाहून वसुदेवास नवल वाटले. ज्यांचे करितांच स्मरण । भावबंधन निरसे पैं ॥हेच सर्वथा सत्य नव्हे काय ? मग तो वसुदेव, त्या बाळ श्रीकृष्णास घेऊन चालला, तो देवकीच्या नेत्रांतून आंसवांच्या धारा सुरू झाल्या. तेव्हां श्रीकृष्णाने आपल्या मातेकडे पाहून हास्यवदन केले. त्यावेळी श्रीकृष्णाने दरवाज्यांस पायांचा स्पर्श करितांच, सर्व द्वारे आपोआप उघडली. कंसाचे रक्षक निद्राधीन झाले. वसुदेव सत्वर गोकुळाकडे निघाला. वर्षती पर्जन्याच्या धारा । तों फणींद्र धांविन्नला त्वरा । विशाळ फणा ते अवसरा । कृष्णावरी उभारिला ॥ लवकरच तो यमुनातीरी पोहोचला, त्यावेळी यमुनेस महापूर आला होता तरी तो तसाच यमुनेच्या पाण्यात शिरला. जों जों उचली कृष्णातें । तों तों जीवन चढे वरुतें । स्पर्शावया जगज्जीवनातें । यमुनेतें आल्हाद ॥ अखेर वासुदेवाने, " हे कमळाधवा, वैकुंठपति माझे रक्षण करा." अशी प्रार्थना केली. मग कृष्णाने उजव्या पायानें यमुनेस स्पर्श केला; परमसुखें यमुना सवेग । तात्काळ जाहली दोन भाग । मग वसुदेव लवकरच नंदभुवनीं आला. इकडे त्याचवेळी यशोदा प्रसूत होऊन तिला कन्या झाली; ते योगमाया हरीची पूर्ण । तिनें निद्रिस्त केले सकळ जन । यशोदेशी न कळे वर्तमान । कन्यारत्‍न पुढें तें ॥ त्याचवेळी वसुदेव अंतर्गृही प्रवेशला आणि त्याने यशोदेजवळ श्रीकृष्णास ठेवून ती कन्या उचलून घेतली. कृष्णा ठेवूनि लवलाही । कन्या वेगें उचलिली । पुत्र ठेवूनि कन्या नेली । कोणासी न कळे गोकुळीं ॥ आणि मग तो वसुदेव तेच वेळीं । बंदिशाळे पातला ॥ तेव्हां दरवाजे पूर्ववत बंद झाले. सर्व सेवक पुनःश्च जागृत झाले. इकडे बंदिशाळेत ती कन्या रडूं लागली. तिचे रडणे ऐकून सेवकांनी देवकी प्रसूत झाल्याचे वर्तमान कंसास कळविले. त्याबरोबर कंस धावतच बंदिशाळेत आला आणि माझा आठवा अरी म्हणजे शत्रू कोठे आहे ? असे उच्च स्वरांत विचारू लागला. देवकी रडत विनवणी करत म्हणाली, " बंधुराया ! एवढा वध करूं नकोस रे!" पण तिचे बोलणे ऐकून न घेता त्या दुष्टाने तिच्या मांडीवरील बालकास ओढले. ते शिशु बालक, पुत्र किंवा कन्या आहे तेंही न पाहता रागाने त्याने शिळेवर आपटण्यासाठी गरगर फिरविले. तंव ते महाशक्ति झडकरी । गेली अंबरी निसटूनियां । सहस्र कडकडती चपला । तैसा प्रलय तेव्हां वर्तला ॥ हा अवचित प्रकार पाहून, " आपला वैरी हातातून गेला. " असे वाटून कंस भयभीत झाला. तेव्हां ती तेजस्वी शक्ति त्याला आकाशांत दिसली. कंस जंव वरतें पाहे । तंव ते महाशक्ति तळपत आहे । तेज अंबरीं न समाये । बोले काय कंसासी ॥ अरे मूढा दुराचारा । महामलिना खळा निष्ठुरा । तुझा वैरी पामरा । पृथ्वीवरी वाढतसे ॥ आणि ती अदृश्य झाली. त्या महाशक्तीची वाणी ऐकून कंसाचे मन भयभीत झाले. तो तावातावाने राजगृहात निघून गेला. वसुदेव-देवकी तटस्थ झाली. श्रीहरिचा आठवा अवतार भूतलावर अवतरला होता, श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.

श्रीकृष्णार्पणमस्तु
॥ श्री गुरुदेव दत्त

Aug 15, 2022

सोरटी सोमनाथ करंजे माहात्म्य


श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय ॥


सौराष्ट्रदेशे विशदेऽतिरम्ये ज्योतिर्मयं चन्द्रकलावतंसम ।

भक्तिप्रदानाय कृपावतीर्णं तं सोमनाथं शरणं प्रपद्ये ॥

अर्थात चंद्रदेवांच्या भक्तीने प्रसन्न होऊन, त्या सोमाच्या तपाचे फलित म्हणून जो परम कृपाळू शिवशम्भू या सौराष्ट्र देशांत अवतरित झाला आहे, ज्याने प्रत्यक्ष चंद्राला आभूषण म्हणून स्वतःच्या मस्तकी धारण केले आहे, तो ज्योतिर्लिंगस्वरुप भगवान श्री सोमनाथ माझा आश्रयदाता आहे.  
जागृत बारा ज्योतिर्लिंगांतील प्रथम ज्योतिर्लिंग म्हणून सोरटी सोमनाथ हे प्रसिद्ध आहे. हा भोळा सांब, शिवभक्त मालूबाई हिच्यासाठी करंजे क्षेत्रीं येऊन राहिला. या करंजे क्षेत्राचे वैशिष्ट्य असे की श्रावण महिन्यातील सोमवारी सोरटी सोमनाथ येथून प्रत्यक्ष महादेवच सर्परूपात इथे येतो असे मानले जाते. त्या नागराजरूपी श्री गिरिजापतीलाच, स्थानिक भाविक ' स्वारी येणे ' असे म्हणतात. या सर्पाच्या मस्तकावर कुऱ्हाडीने घाव घातल्याची खूण स्पष्ट दिसते.

सोमनाथांची आरती जय देव जय देव सोमनाथा । आरती ओवाळीतो मनोभावें आतां ॥धृ. ॥ मालुबाई सती पतिव्रता थोर । भक्ति करुनी आणिले सोरटी सोमेश्वर ॥ पतीने पाळत धरुनी पाहिला चमत्कार । जावा नणंदांचा त्रास सोसिला फार ॥१॥ देखोनी सतीच्या त्रासाते देव । स्वप्नी प्रगटोनी सांगितसे सर्व । शेषरुपी येऊनी करीन वास्तव्य । धेनुसी वेष्ठुनी दुग्ध प्राशीन मी बरवे ॥२॥ स्वप्नाप्रमाणें नाथ शेषरुपी आले । धेनु वेष्ठुनी दुग्ध पिऊं लागले । देखोनी खोमणेराव भयचकित झाले । कुऱ्हाड फेकुनी देवा तुम्हां मारिले ॥४॥ उत्तर ऐकता मालू त्रासली फार । देखोनी खोमणा शाप दिलासे थोर । ऐकोनी शाप खोमणा कापे थरथर । प्रगटोनी देवा त्याचा केला उद्धार ॥४॥ खोमण्याचा उद्धार मालू देखोनी । देवा तुजला मी बोलू कशा रीतीनी । मालूचे शब्द देवा ऐकोनी कानी । तत्काली उद्धरिली मालू भामिनी ॥५॥ सर्परुपे निघतां भक्ति पाहूनी । भक्त घेताती आनंदे उचलोनी । विधीयुक्त तुमची पुजा करोनी । पाजिती दूग्ध तुम्हां शर्करा घालोनी ॥६॥ सोमनाथा तुम्ही भक्ति भुकेला । मालू महादू यांचा उद्धार केला । अल्पबुद्धि खोमणा तोही उद्धरिला । आबा पाटील दास लागें चरणाला ॥७॥

कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी । कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥


॥ ॐ नमः शिवाय ॥

श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु


Aug 8, 2022

श्री गौरीपतिशतनामस्तोत्रम्


॥ श्री गणेशाय नमः ॥ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमः शिवाय


बृहस्पतिरुवाच - नमो रुद्राय नीलाय भीमाय परमात्मने । कपर्दिने सुरेशाय व्योमकेशाय वै नमः ॥१॥ भावार्थ : देवगुरु बृहस्पति म्हणाले - रुद्र, नील, भीम आणि परमात्म्यास नमन असो. जटाधारी, देवांचेही देव तसेच आकाशरूपी केश धारण केलेले व्योमकेश यांना मी नमन करतो. 

   वृषभध्वजाय सोमाय सोमनाथाय शम्भवे । दिगम्बराय भर्गाय उमाकान्ताय वै नमः ॥२॥ भावार्थ : ज्यांच्या ध्वजावर वृषभाचे चिन्ह आहे असे वृषभध्वज, पार्वतीपती सोम, चंद्रदेवतेचे रक्षक सोमनाथ अशा शम्भू महादेवास नमस्कार असो. सर्व दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहे असे दिगंबर, तेजस्वरूप भर्ग, तसेच उमापतीस मी नमन करतो.  

   तपोमयाय भव्याय शिवश्रेष्ठाय विष्णवे । व्यालप्रियाय व्यालाय व्यालानां पतये नमः ॥३॥ भावार्थ : जो सर्वदा तपमग्न असतो, ज्याचे रूप कल्याणकारी आहे, तो शिवश्रेष्ठ, विष्णुस्वरूप, सर्पांचे आश्रयस्थान, सर्पस्वरूप, तसेच सर्पांचा स्वामी आहे अशा परमेश्वराला नमन असो. 

महीधराय व्याघ्राय पशूनां पतये नमः । पुरान्तकाय सिंहाय शार्दूलाय मखाय च ॥४॥ भावार्थ : या धरेस (पृथ्वीस) धारण करणारा, व्याघ्ररूपी, पशुपती, त्रिपुरासुराचा विनाश करणारा, सिंहस्वरूप, शार्दूलरूपी आणि यज्ञस्वरूप महादेवास मी वंदन करतो.

   मीनाय मीननाथाय सिद्धाय परमेष्ठिने । कामान्तकाय बुद्धाय बुद्धीनां पतये नमः ॥५॥ भावार्थ : जो मत्स्यरूप, मत्स्यनाथ, सिद्ध आणि परमश्रेष्ठ आहे, ज्याने कामदेवाचा नाश केला आहे, जो ज्ञानस्वरूप आहे अशा मेधापतीस नमन असो.

  कपोताय विशिष्टाय शिष्टाय सकलात्मने । वेदाय वेदजीवाय वेदगुह्याय वै नमः ॥६॥ भावार्थ : जो कपोत (ब्रह्मदेव ज्यांचे पुत्र आहे), विशिष्ट (सर्वश्रेष्ठ), शिष्ट (साधुपुरुष) तथा सर्वात्मा आहे. जो वेदस्वरूप, वेदांना संजीवन देणारा तसेच वेदांतील गूढ तत्त्व जाणतो अशा ईश्वरास मी वंदन करतो. 

दीर्घाय दीर्घरूपाय दीर्घार्थायाविनाशिने । नमो जगत्प्रतिष्ठाय व्योमरूपाय वै नमः ॥७॥ भावार्थ : जो दीर्घ, दीर्घरूप, दीर्घार्थस्वरूप तसेच अविनाशी आहे, जो या सकल चराचर जगताचा उत्पत्तीकर्ता आहे, तसेच सर्व चराचर व्यापून टाकणाऱ्या व्योमरूपी महादेवास नमन असो. 

   गजासुरमहाकालायान्धकासुरभेदिने । नीललोहितशुक्लाय चण्डमुण्डप्रियाय च ॥८॥ भावार्थ : गजासुराचा कर्दनकाळ असणाऱ्या, अंधकासुराचा विनाश करणाऱ्या आणि जो नील-लोहित-शुक्लस्वरूपी आहे तसेच चण्ड- मुण्ड नामक शिवगण ज्यास अतिप्रिय आहेत अशा श्रीशंकरांस नमन असो. 

    भक्तिप्रियाय देवाय ज्ञात्रे ज्ञानाव्ययाय च । महेशाय नमस्तुभ्यं महादेव हराय च ॥९॥ भावार्थ : ज्यास भक्तिभाव प्रिय आहे, जो महादेव आहे, जो ज्ञाता आणि ज्ञानही आहे, जो अव्यय (विकाररहित) आहे, जो महादेव आणि हर या नावांनी प्रसिद्ध आहे, अशा महेशास मी नमस्कार करतो. 

   त्रिनेत्राय त्रिवेदाय वेदाङ्गाय नमो नमः । अर्थाय चार्थरूपाय परमार्थाय वै नमः ॥१०॥ भावार्थ : ज्याला तीन नेत्र आहेत, तीन वेदस्वरूपी, आणि जो वेदांग (वेदांतील कठिण शब्दाचें अर्थ स्पष्ट करणारें शास्त्र) आहे अशा शिवरूपास नमन असो. जो अर्थ (धन), अर्थरूप (काम) तथा परमार्थ (मोक्षस्वरूप) आहे अशा परब्रह्मास मी प्रणिपात करतो.

      विश्वभूपाय विश्वाय विश्वनाथाय वै नमः । शङ्कराय च कालाय कालावयवरूपिणे ॥११॥ भावार्थ : जो या अखिल विश्वाचा स्वामी अर्थात जगन्नियंता आहे, जो विश्वरूप आणि विश्वनाथ आहे. जो काळ आणि कालावयवरूप आहे अशा शंकरांस नमन असो. 

  अरूपाय विरूपाय सूक्ष्मसूक्ष्माय वै नमः । श्मशानवासिने भूयो नमस्ते कृत्तिवाससे ॥१२॥ भावार्थ : जो रूपरहित आहे, विरूप आहे तथा सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे. जो स्मशानभूमीत वास करतो आणि व्याघ्राम्बरधारी अशा महादेवास मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो.

   शशाङ्कशेखरायेशायोग्रभूमिशयाय च । दुर्गाय दुर्गपाराय दुर्गावयवसाक्षिणे ॥१३॥ भावार्थ : जो ईश्वर असूनही भयंकर अशा स्थळीं शयन करतो, त्या भगवान चन्द्रशेखरास नमस्कार असो.  जो अभक्तांना अतिशय दुर्गम आहे, ज्याचे स्वरूपज्ञान होणे अतिशय दुष्कर आहे, जो दुर्गम अवयवस्वरूप (दुर्गारूपी पार्वतीचा पती) आहे अशा गिरिजापतीस नमन असो. 

  लिङ्गरूपाय लिङ्गाय लिङ्गानां पतये नमः । नमः प्रलयरूपाय प्रणवार्थाय वै नमः ॥१४॥ भावार्थ :  जो शिवलिंगरूप, अविकारी आणि आत्मज्ञानी आहे. त्या सदाशिवास नमन असो. महाप्रलयरूप रुद्रास नमन असो, आणि प्रणवाचे आदितत्त्व अर्थात परमात्मारूपी  श्रीशंकरांस मी वंदन करतो.

  नमो नमः कारणकारणाय मृत्युञजयायात्मभवस्वरूपिणे  । श्रीत्र्यम्बकायासितकण्ठशर्व गौरीपते सकलमङ्गलहेतवे नमः ॥१५॥ भावार्थ : जो आदिस्वरूप आहे, जो मृत्युंजय तथा स्वयम्भूरूप आहे अशा परब्रह्मास नमस्कार असो. हे श्रीत्र्यम्बका,  हे नीळकंठा,   हे शर्वा,  हे गौरीच्या स्वामी तू कल्याणकारी, मंगलमय आहेस. तुला नमन असो.   

॥ इति गौरीपतिशतनामस्तोत्रं सम्पूर्णम् ॥