Mar 30, 2017

श्री स्वामीं समर्थ आरती - दादर मठ


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
 श्री स्वामीं समर्थ जय जय स्वामीं समर्थ


धन्य तारक प्रदक्षिणा या श्रीगुरुरायाची, माझ्या स्वामीरायाची 

स्वामी आवड झाली, भक्तजनांला भव उतरायाची || धृ || 

प्रदक्षिणा करितां दुरित भार हा जाई 

स्वामी एक एक पाऊली कोटी तीर्थे आंघोळी || १ ||

कोटीकोटी अश्वमेध एक पाऊली 

स्वामिनाम मुखी गाता गाता पुण्याची भोई || २ ||

कोटी कन्यादान शतकोटी या कपिला 

स्वामी मेरुतुल्य कांचन देतां भार नसे पाऊला || ३ ||

दगड पाषाण तरुवर तरती जाणा ज्या नामे 

स्वामी पदोपदी हे पुण्यची भारी तुटती भवभ्रमे || ४ ||

भूत पिशाच्च समंध जाती प्रदक्षिणा केल्या 

स्वामी बहात्तर रोग कर जोडीती तीर्थे सेवील्या || ५ ||

देवादिक हे कर जोडीती जाणा तद्भक्ता 

स्वामी प्रदक्षिणा ही करितां भावे नाही कधी चिंता || ६ ||

पूर्वज तरती नाती जाती होती सुखरूप 

स्वामि नाम प्रदक्षिणे कार्य साधे नको जपतप || ७ ||

म्हणुनी जना हे सांगतसे मी निज सुख जाणा 

स्वामी आनंदनाथ हा करुणा वचने बोधितसे मना || ८ ||


।।  श्री स्वामीं समर्थ जय जय स्वामीं समर्थ ।।

॥ श्री स्वामीं समर्थ प्रार्थना ॥


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


गुलाब पुष्पासम गौर कांती आजानुबाहु अशी दिव्य मुर्ति ॥
कृपापूर्ण ती नेत्रदीप्ती सतेज । नसे मानवी देह हा स्वामीराज ॥१॥ प्रत्यक्ष नृसिंह सरस्वतींचे । जे रूप श्रीपाद श्री वल्लभाचे ॥ अवधूत मूर्ती अवतार झाला । नमो सदगुरू दत्त स्वामी पदाला ॥२॥ जयाच्या पुढें काळ ही नम्र आहे । अशा स्वामीच्या मी पदी बाळ आहे ॥ समर्था तुझें पोर ना दीन व्हावे । चरणी तुझ्या ते सदा लीन व्हावे ॥३॥ अनन्य भावे घडे स्वामी भक्ती । करिती तयां संतही साह्य प्रीती ॥ ग्रहांची नसे त्या प्रतिकुल भीती । कुलदेवता ही अनुकुल होती ॥४॥ पदी भक्त आले कृपा पात्र झाले । बहु सिद्ध केले किती उद्धरीले ॥ असामान्य तुमची असें किर्तीगाथा । म्हणोनीच हा ठेविला पायी माथा ॥५॥ नसे पात्र स्वामी मी तुमच्या कृपेसी । नको सोडू माते तरी या मुलासी ॥ मला संपदाही तुझे पाय दोन्ही । तुझ्याविण माझे जगी नाही कोणी ॥६॥ फळाली कृपा संत देवादिकांची । मिळाली मला जोड स्वामी पदांची ॥ हृदयी ठेव जीवा धरी घट्ट पाय । तया सारखी न करी कोणी माया ॥७॥ मातेची माया पित्याचीच छाया । दया मूर्तिच्या या नको सोडू पाया ॥ मना भार ठेवी अरे याच ठाया । मिळेना कुठे ही अशी स्वामी माया ॥८॥ सदा स्वामी सन्नीध ऐसे करावे । तुम्ही साह्यकारी मनीं हे ठसावे ॥ जाज्वल्य तुमचा अभिमान राहो । भयाचा मला लेश ना स्पर्श होवो ॥९॥ समर्थ जाणोनी आलो मी पाया । तुम्हीच माझे सर्वस्व व्हाया ॥ कृपेचे जरी अल्प देशी निधान । जीवा सारीखे मी तयासी जपेन ॥१०॥ पदी हट्ट ऐसा धरीला असें मी ॥ ध्यानी दिसावे मला याच जन्मी ॥ मी स्वामीचा,स्वामी सर्वस्व माझे । असें प्रेम वाढो गुरूमाय तुझे ॥११॥ मला स्वामीराया तुमचीच छाया । तुम्हाविण देवा करी कोण माया ॥ स्वामी समर्थ गर्जूनी गावे । या जीवनाचा महायज्ञ होवो ॥१२॥ आधार नाही तुम्हांविण कोणी । नसे आश्रयदाता तुम्हाविण कोणी ॥ माता पिता सदगुरू एक स्वामी । जवळी मला घ्या करी प्रार्थना मी ॥१३॥ स्वामी करावे इतुके करावे । हाती धरावे मला ना त्यजावे ॥ होईन मीं पात्र तुमच्या कृपेने । अशा तळमळीवीण मी कांहीं नेणे ॥१४॥ प्रभो मी न माझा तुमचाची होवो । त्वदिच्छेप्रमाणे ही वृत्ती राहो ॥
असे हो कृपाळा तुम्हां वाहिलो मी चरणारविंदार्पणमस्तु स्वामी ॥१५॥

॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥

Mar 29, 2017

श्री स्वामी समर्थ उपासना


Shree Swami Samarth Ringtone Download Pagalworld | Odiaringtone.Com

।। श्री गणेशाय नमः ।।

।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।



श्री स्वामी कृपा स्तोत्र


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ श्री सद्‌गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ ॥

॥ ॐ श्री गणेशाय नम: ॥ ॐ श्री सरस्व़त्यै नम: ॥ ॐ श्री सर्वशक्तिमूर्तये नम: ॥ ॐ परात्पर जगत्‌गुरु नमो । आता नमू मयुरवाहिनी । जी शब्दविश्वाची स्वामिनी । वंदन करुया तियेसी ॥१॥ जो सकल विश्वाचा आधार । निर्गुण आणि निराकार । तो ब्रह्मा-विष्णु-महेश्वर । सद्भावें वंदू त्रैमूर्ती ॥२॥ त्रैमूर्तिचा महिमा अपार । गुरुचरित्री वर्णिला साचार । स्तुति करता अपरंपार । वेद चारी शिणले ॥३॥ कर्दलवनी झाले गुप्त । साक्ष ठेवून गाणग क्षेत्र । निर्गुण पादुका पवित्र । भक्तांसाठी ठेवियल्या ॥४॥ पंढरीचा पांडुरंग । ज्यासी आवडे संतसंग । तारिले तुक्याचे अभंग । त्यासी प्रणिपात अंतरी ॥५॥ करु या साष्टांग दंडवत । त्रैमूर्ती श्रीगुरुदत्त । अक्कलकोटी यति समर्थ । सद्भावे नमू अंतरी ॥६॥ आता श्री स्वामीरायांचे अख्यान । भाविकतेने करा श्रवण । सर्वसुखाचे निधान । लाभेल स्तविता सर्वांसी ॥७॥ भक्तीचा करुनी सोहळा । दाखवी अगम्य लीला । ऐसी ख्याती त्रैलोक्याला । मी पामर काय वर्णू ॥८॥ नृसिंहसरस्वती गुरुस्वामी । गुप्त जाहले कर्दलवनी । येतां पुनश्च धर्मा ग्लानी । अक्कलकोटी अवतरले ॥९॥ कर्दलवनी गुप्त जाहला । अबू पहाडी प्रगटला । अवधूत मानवरुपे आला । अक्कलकोटी माझारी ॥१०॥ श्री गुरुस्वामी यति पाहिला । मूर्तिमंत तेजाचा पुतळा । कंठी रुळती रुद्राक्षमाळा । पद्मासनी स्थित असे ॥११॥ शांत गंभीर दिसे रुप । हेमसंकाश तनु अनुरुप । नेत्रकमलांची कृपाझेप । भक्तावरी सर्वदा ॥१२॥ भाली शोभे कस्तुरी तिलक । साजिरे दिसे नासिक । ओष्ठ हनुवटी सुंदर मुख । चंद्रापरी दिसतसे ॥१३॥ समुत्कंठ पाहू चला । आजानुबाहू शिव भोळा । कंठा भूषवी त्रिदलमाला । नृसिंहभान गुरुस्वामी ॥१४॥ निम्ननाभी दिठी सुंदर । धूर्जटी कौपीन कटीवर । दत्त नरहरी यतिवर । धीपुरी प्रगटलासे ॥१५॥ अखिल विश्वी विश्वंभरु । भक्तजन सुरतरू । या हो सकल पादपद्म धरु । देहबुध्दी करु दुर ॥१६॥ मम हृदयीं ठसो मूर्ति । शंख चक्रांकित गदा हाती । कामधेनुसह चतुर्वेद मूर्ती । सदैव राहो अंतरी ॥१७॥ अबूगिरीवरुनी हृद्कमली । वेगे येई गुरुमाऊली । रत्नखचित सिंहासनी बैसली । भक्तकाज करावया ॥१८॥ आतां करितों तुझी पूजा । रमावरा अधोक्षजा । सप्रेमें क्षाळितो पदरजा । अर्ध्य देई स्वकरी ॥१९॥ मधुर सुवासिक शीतळ । गंगोदक जळनिर्मळ । पंचामृत स्नान सचैल । निजहस्ते घालितो ॥२०॥ स्नान करुनी, करा आचमन । भरजरी पितांबर नेसून । शालजोडी पांघरुन । सुखे घेई स्वामीया ॥२१॥ चंद्रोपम उपवीत घालुनी । रत्नाभरणे, कौस्तुभमणी । कस्तुरी टिळा लेवुनी । चंदन उटी लावावी ॥२२॥ निराकार, निर्गुण गोपाळा । कंठा भूषवी तुलसीमाळा । बिल्व-शमी दुर्वांकुराला । सहस्त्रनामें अर्पितो ॥२३॥ अष्टगंध, बुक्का सुगंध । सौरभे होती दिशा धुंद । अर्पितो दीप स्वानंद । मानुनी घेई गुरुराया ॥२४॥ रत्नखचित चौरंगावरी । सुवर्णताटी पक्वाने सारी । दहि-दूध लोणचे कोशिंबिरी । पंचखाद्य नैवेद्य सेवा जी ॥२५॥ कर्पूरोदके धुवोनि हस्त । घालितो करी पंचामृत । प्राणापान, व्यान, उदान समस्त । तूचि अससी स्वामिया ॥२६॥ गुरुमूर्ती तू षड्रस । मीहि त्यांस ऐक्य सहज । दिव्य सच्चित रुप निज । वेदपूर्ण भरले असे ॥२७॥ वदनसुवासा तांबूल । त्रयोदशगुणी निर्मळ । मुखशुध्दिस नारळ । घ्यावा आता गुरुराया ॥२८॥ भक्तवत्सला स्वामिराजा । अंगिकारावी माझी पूजा । नमस्कारोनी अधोक्षजा । श्रीमुख बघतो न्याहाळुनी ॥२९॥ तव आरती ओवाळिता । नासती अनंत ब्रम्हहत्या । वेद बोलतो वाणी सत्या । त्रिवार ऐसे सत्यचि ॥३०॥ सनकादिक मुनी सुरवर । करिता स्वामींचा जयकार । मंत्रपुष्पांचा संभार । जडजीवासी उध्दरी ॥३१॥ वेदघोष अति सुस्वर । प्रदक्षिणा घाली वारंवार । प्रेमे साष्टांग नमस्कार । अनंतासी दंडवत ॥३२॥ अनंतकोटी ब्रम्हांडनायका । अनादि स्वरुपा गुरुराया । लागलो आता तव पाया । भक्तकृपाळा उध्दरी ॥३३॥ छत्रचामरे वारीन । गंधर्वगान समर्पिन । सुस्वर वाद्ये वाजवून । तुष्ट करितो तुजलागी ॥२४॥ सुदिव्य, सुखशय्या मृदुल । ठेवी सुखासनी पदकमल । चरण, अहर्निश चुरीन । सेवा मानून घ्यावी जी ॥३५॥ सत्‌शिष्य भजनी रंगती । भजनानंदी विसावती । संतसंगी जडो प्रीती । हेचि मागणे स्वामीया ॥३६॥ शेष, व्यास, सरस्वती । गुणवर्णन करीती महामती । भक्तस्तवन ऐकुनी श्रीपती । प्रसन्न व्हावे सत्वरी ॥३७॥ विश्वंभर तू सौख्यराशी । भक्तकौतुक पुरविशी । योगक्षेम चालविसी । ऐसी ख्याती त्रिभुवनी ॥३८॥ निजनिर्माल्य प्रसाद देसी । उच्छिष्ट आंस सर्वांसी । पूर्वपुण्ये येती फळासी । सेवा गुज ऐसे हे ॥३९॥ सृष्टि-उत्पत्ति-स्थिती-संहारा । अवतार तुझाचि गुरुवरा । ब्रम्हा-विष्णु-महेश्वरा । स्वामीरुपी शोभसी ॥४०॥ रवि-चंद्रासी तेजाळले । ते तेजही तुजकडोनी आले । निज-भक्त कार्य सगळे । तव प्रसादे लाभते ॥४१॥ इह परत्र सौख्य देसी । कल्पतरुसम शोभसी । जैसा भाव धरावा मानसी । तैसा त्यासी अनुभव ॥४२॥ शिव-विष्णु-शक्ति-गणपति । स्वामीरुपे सारे शोभती । निगमागमही स्तविती । सत्यज्ञानानंद तू ॥४३॥ त्रिविधताप हे निवारिसी । दीनजना उध्दरिसी । क्षमा करावी दासासी । मागणे हेचि जीवनी ॥४४॥ जीवात्मज्योति उजळुनी । तव प्रकाशे प्रकाशुनी । पाहते नित्यचि स्तवनी । स्वामीराजा ॥४५॥ ऐशी अतर्क्य स्वामीलीला । वणिर्ता वेदही शिणला । तेथे मज पामराला । कैसी शक्ती ॥४६॥ काया वाचा मानसी । इंद्रियाधीकृत कर्मासी । अर्पितो परात्परा तुजसी । सारी सेवा ॥४७॥ रामकृष्ण तू सर्वसाक्षी । पृथ्वीवर अवतार घेसी । हरावया भूभारासी । पंढरी वास केला ॥४८॥ पंढरीस श्रीविठ्ठल । गिरीवर विष्णु सोज्वळ । करवीरी लक्ष्मी प्रेमळ । विश्वेश्वर काशीवासी ॥४९॥ कलियुगी नृसिंह-सरस्वती । अत्रिनंदन गाणग क्षेत्री । गुरु माणिक प्रभूही तूचि । अक्कलकोटी गुरुराया ॥५१॥ जे भक्त तुजला भजती । अहर्निश राहे त्यांचे पाठी । भक्त संरक्षणासाठी । अक्कलकोटी वास केला ॥५१॥ स्तविता ही स्वामी माऊली । पापे अनंत जन्माची जळाली । वाढविसी प्रेमसाऊली । वात्सल्य नांदे सर्वदा ॥५२॥ असत्‌वृत्ति जावो विलया । सद्‌वृत्ती पावो जया । सकलजनासी देवराया । सौख्य लाभो जगी या ॥५३॥ गोवर्धन गिरी धरिसी । अग्निही तू प्राशिसी । पार्थगुरु सारथी होसी । महिभार हरावया ॥५४॥ अविनाशी अवतार दत्त । जगती आहे विख्यात । अघटित लीला दावित । गाणगापुरी बैसला ॥५५॥ गुरुतत्व गूढ सार । जाणताती भक्त थोर । तोचि प्रज्ञापुरी यतिवर । भक्तकाजी रंगला ॥५६॥ हे स्तोत्र करिता पठण । त्यासी न बाधे चिंता दारुण । भवभय दु:खाचे निरसन । स्वामीकृपे होईल ॥५७॥ अनन्यभावे करा स्मरण । साक्षात्कारे घ्यावे दर्शन । हेचि सद्‌गुरु वचन । असत्य न होई सर्वथा ॥५८॥ ठेवुनिया श्रध्दा भाव । मनी आळवावा गुरुदेव । भक्तासाठी घेई धाव । रक्षणासी सिध्द सदा ॥५९॥ वटवृक्षतळी जाण । श्रीसद्‌गुरु प्रतिमा ठेवून । यथासांग करावे पूजन । षोडशोपचारे आदरे ॥६०॥ मग करावे स्तोत्र पठण । नित्यश: एक आवर्तन । अखंड करिता तीन मास पूर्ण । साक्षात् सद्‌गुरु भेटेल ॥६१॥ श्री स्वामी समर्थ नाम । अनंत कोटींचा कल्पद्रुम । सकल संतांचा विश्राम । नामस्मरणीं नांदतो ॥६२॥ स्वामीकृपा होता क्षणी । मुक्याते फुटेल वाणी । पंगु जाईल उल्लंघुनी । उत्तुंग गिरीही लीलया ॥६३॥ ऐसा महिमा अगाध । एकमुखी वर्णिती वेद । श्री स्वामी स्तोत्र केले सिध्द । आला धावून झडकरी ॥६४॥ स्वामी प्रेमळ माउली । जैसे वत्साते गाऊली । तुझी स्तुति स्त्रोते गायिली । तव प्रेमळ कृपेने ॥६५॥ तूचि श्री व्यंकटेश । तुचि महारुद्र महेश । अनंतकोटी जगदीश । श्री स्वामी समर्था सर्व तूचि ॥६६॥ उत्पति, स्थिती आणि लय । तूचि सकलांचा आशय । गुरूदेवा तुचि मम आश्रय । उपासका सांभाळी ॥६७॥ तव करितां नामस्मरण । लाभे चित्ता समाधान । तव चरणाशी वंदन । देवाधिदेवा समर्था ॥६८॥ जे नर करतील आवर्तन । मनकामना त्यांची होईल पूर्ण । सद्भक्तिचे अधिष्ठान । नित्य ठेवूनी अंतरी ॥६९॥ हा ग्रंथ ज्याचे घरी । तेथे अन्नपूर्णा वास करी । सुख संपत्ति संसारी । लाभेल भाविकां निश्चिती ॥७०॥ करितां ग्रंथाचे पठण । दुःख दारिद्रय जाईल पळून । भक्त सेवेसाठी येईल धावून । दयावंत स्वामीराज ॥७१॥ येथे ठेवूनिया विश्वास । करावे ग्रंथ पारायणास । दृष्टांत देवोनि त्वरेस । सांभाळीन तयालागी ॥७२॥ हे सद्गुरूंचे सत्यवचन । श्रोते ऐका ध्यान देऊन । पुरवील मोक्षसाधन । एकचि माझा स्वामीराज ॥७३॥ विश्वामित्र गोत्र कुलोत्पन्न । देशपांडे उपनामाभिधान । नाम माझे असे वामन । सद्‌गुरुचरणी लीन सदा ॥७४॥ प्रतिभानुज हे संबोधन । घेतले श्रीगुरूने लिहवून । झाली सेवा सफल पूर्ण । पूर्व सुकृतानुसार ॥७५॥ स्तुतिस्तोत्राचा गुंफिला हार । भक्तिमंजिरी त्यावर । घातली वैजयंती सुंदर । कंठी श्रीगुरुरायाचे ॥७६॥ श्रीस्वामीराज स्तोत्र ग्रंथ । जाहला असे समाप्त । मज पामरे वदविले गुरुनाथे । त्यांचे चरणी दंडवत ॥७७॥ श्री स्वामी समर्थ दत्त । मंत्र हा मनी घोषित । झाले चित्त अवघे तृप्त । पुनश्च चरणी दंडवत ॥७८॥ देह अवघे अक्कलकोट । आत्मस्वरुपी श्री स्वामीसमर्थ । त्यांचे ठायी दंडवत । वारंवार घालीतसे ॥७९॥ इति श्रीस्वामीराज सगुण । भक्तांचे वैभव पूर्ण । प्रतिभानुज करीतसे वर्णन । साष्टांग प्रणिपात करोनी ॥८०॥ ॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥ ॥ इति श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र संपूर्णम् ॥ ॥ शुभंभवतु ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


॥ श्री स्वामी समर्थाष्टक ॥


असें पातकी दीन मीं स्वामी राया l

पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ll

नसे अन्य त्राता जगी या दीनाला l

समर्थां तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ll१ll


मला माय न बाप न आप्त बंधू l

सखा सोयरा सर्व तू दीन बंधू ll

तुझा मात्र आधार या लेकराला l

समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ll२ll


नसे शास्त्र विद्या कलादीक काही l

नसे ज्ञान, वैराग्य ते सर्वथा ही ll

तुझे लेकरु ही अहंता मनाला l

समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ll३ll


प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा l

तुझा दास मी ही स्मृती ना मनाला ll

क्षमेची असे याचना त्वत्पदाला l

समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ll४ll


मला काम क्रोधाधिकी जागविले l

म्हणोनी समर्था तुला जागविले ll

नका दूर लोटू तुझ्या सेवकाला l

समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ll५ll


नको अंत पाहू त्वरे धाव घेई l

तुझ्यावीण नाही दुजी श्रेष्ठ आई ll

अनाथासि आधार तुझा दयाळा l

समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला |ll६ll


कधी गोड वाणी न येई मुखाला l

कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला ll

कधी मुर्ती तुझी न ये लोचनाला l

समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ll७ll


मला एवढी घाल भिक्षा समर्था l

मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा ll

घडो पाद सेवा तुझ्या किंकराला l

समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला ll८ll

|| श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ||


Mar 18, 2017

श्री स्वामी समर्थ स्तवन


॥ श्री गणेशाय नमः ॥

॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः॥
नाही जन्म नाही नाम । नाही कुणी माता पिता । प्रगटला अदभुतसा । ब्रह्मांडाचा हाच पिता ॥१॥ नाही कुणी गुरुवर । स्वयें हाच सुत्रधार । नवनाथी आदिनाथ । अनाथांचा जगन्नाथ ॥२॥ नरदेही नरसिंह । प्रगटला तरुपोटी । नास्तिकाच्या कश्यपूला । आस्तिकाची देण्यागती ॥३॥ कधी चाले पाण्यावरी । कधी धावे अधांतरी । यमा वाटे ज्याची भीती । योगीश्वर हाच यती ॥४॥ कधी जाई हिमाचली । कधी गिरी अरवली । कधी नर्मदेच्या काठी । कधी वसे भीमातटी ॥५॥ कालीमाता बोले संगे । बोले कन्याकुमारीही । अन्नपूर्णा ज्याचे हाती । दत्तगुरु एकमुखी ॥६॥ भारताच्या कानोकानी । गेला स्वये चिंतामणी । सुखी व्हावे सारे जन । तेथे धावे जनार्दन ॥७॥ प्रज्ञापुरी स्थिर झाला । माध्यान्हीच्या रविप्रत । रामानुज करी भावे । स्वामी पदा दंडवत ॥८॥ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥   

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


श्री स्वामी समर्थ मानसपूजा


|| श्रीगणेशाय नम: ||


नमो स्वामी राजम दत्तावतारम || श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ती रूपम ||

ब्रह्मस्वरूपाय करूणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते ||

हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा || मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा ||

कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा || समर्था तुम्हाविण हो जीव तैसा || १ ||

स्वामी समर्था तुम्ही स्मर्तुगामी || हृदयासनी या बसा प्रार्थितो मी ||

पूजेचे यथासांग साहित्य केले || मखरांत स्वामी गुरू बैसविले || २ ||

महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती || जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती  ||

असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ || परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त || ३ ||

सुवर्ण ताटी महारत्न ज्योती || ओवाळोनी अक्षता लावू मोती ||

शुभारंभ ऐसा करूनी पूजेला || चरणा वरी ठेवू या मस्तकाला || ४ ||

हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा || तुझी पाद्यपूजा करी बाळ तुझा ||

प्रणिपात साष्टांग शरणागताचा || तुम्ही वाहिला भार या जीवनाचा || ५ ||

ही ब्रह्मपूजा महाविष्णू पूजा || शिव शंकराची असें शक्तिपूजा ||

दही दूध शुद्धोदकाने तयाला || पंचामृत स्नान घालू प्रभूला || ६ ||

वीणा तुताऱ्या किती वाजताती || शंखादि वाद्ये पहा गर्जताती

म्हणती नगारे गुरूदेव दत्त || श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ || ७ ||

प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली || श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली  ||

महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया || महिमा तयांचा कळे ना जगा या || ८ ||

मीं धन्य झालो हे तीर्थ घेता || घडू दे पूजा ही यथासांग आता  ||

अजानबाहू भव्य कांती सतेज || नसे मानवी देह हा स्वामीराज || ९ ||

प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज || तया घालुया रेशिमी वस्त्र साज ||

सुगंधित भाळी टिळा रेखियेला || शिरी हा जरीटोप शोभे तयाला || १० ||

वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा || सुवास तो वाढवी भाव साचा ||

शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते || गुलाब जाई जुई अत्तराते || ११ ||

गंधाक्षता वाहूनीया पदाला || ही अर्पूया जीवन पुष्प माला ||

चरणी करांनी मिठी मारू देई || म्हणे लेकरासी सांभाळ आई || १२ ||

इथें लावुया केशर कस्तुरीचा || सुगंधित हा धूप नानाप्रतिचा ||

पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली || गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली || १३ ||

करूणावतारी अवधूत कीर्ति || दयेची कृपेचीं जशी शुद्धमूर्ती ||

प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची || अशी दिव्यता स्वामी योगेश्वरांची || १४ ||

हृदयमंदिराची ही स्नेह ज्योती || मला दाखवी स्वामींची योगमूर्ती ||

करू आरती आर्त भावे प्रभूची || गुरूदेव स्वामी दत्तात्रयाची || १५ ||

पंचारती ही असे पंचप्राण || ओवाळूनी ठेवू चरणा वरून ||

निघेना पुढें शब्द बोलू मी तोही || मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं || १६ ||

हे स्वामीराजा बसा भोजनाला || हा पंचपक्वान्न नैवेद्य केला ||

पुरणाची पोळी तुम्हा आवडीची || लाडू करंजी असें ही खव्याची || १७ ||

डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा || हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा ||

पुढें हात केला या लेकरानें || प्रसाद द्यावा आपुल्या करानें || १८ ||

तांबुल घ्यावा स्वामी समर्था || चरणाची सेवा करू द्यावी आता ||

प्रसन्नतेतून मागू मी काय || हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय || १९ ||

सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू || दुजी दक्षिणा मी तुम्हां काय देऊ ||

नको दूर लोटू आपुल्या मुलासी || कृपा छत्र तुमचेच या बालकासी || २० ||

धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला || पदी ठेवू दे शीर शरणा गताला ||

हृदयी भाव यावें असे तळमळीचे || करी पुर्ण कल्याण जे या जिवाचे || २१ ||

तुझें बाळ पाही तुझी वाट देवा || नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा ||

मनी पूजनाची असे दिव्य ठेव || वसो माझीया अंतरी स्वामी देव || २२ ||


श्री दत्तमहाराजार्पणमस्तु || श्रीगुरूदेव दत्त ll  ll स्वामी ॐ ll



Mar 17, 2017

श्री स्वामीं समर्थ प्रार्थना


।। श्री गणेशाय नमः ।। 

।। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः।।


भाव नाही अंतरी, कोरडा पाषाणापरी ।

स्वामी समर्था तुजसी, प्रार्थू कैशापरी ||१||


तव नामाचे प्रेम, नाही मम अंतरी ।

काम क्रोध मोहे, मी विटाळल्यापरी ||२||


रुप तुझे पाहू ऐसी, न निर्मलता दृष्टीपरी ।

कृपा तुझी पावू, नाही सद्गुण एकही परी ||३||


मग कैशा परी आळवू, तुम्हां समर्था तरी ।

स्वामी कथितो तुम्हां परी, दयाळू तव कृपेची ना सरी ||४||


कृष्णदास शरणी जाण, स्वामी उभवी कृपाकरी ||


।। श्री गुरुदत्तात्रेयायर्पणमस्तु ।। 

।। श्री स्वामीं समर्थ जय जय स्वामीं समर्थ ।।



Mar 16, 2017

श्री नृसिंहसरस्वती महाराज मनोहर पादुका श्री क्षेत्र नृसिंहवाडी


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


ऐसेपरी तयास्थानीं । प्रकट झाले श्रीगुरुमुनि । 

अमरेश्वरातें पुसोनि । निघते झाले तये वेळीं ॥ ७३ ॥ 

श्रीगुरु निघतां तेथोनि । आल्या चौसष्ट योगिनी । 

विनविताति करुणावचनीं । आम्हां सोडूनि केवीं जातां ॥ ७४ ॥ 

नित्य तुमचे दर्शनेसीं । तापत्रय हरती दोषी । 

अन्नपूर्णा तुम्हांपाशीं । केवीं राहूं स्वामिया ॥ ७५ ॥ 

येणेपरी श्रीगुरुसी । योगिनी विनवीती भक्तीसी । 

भक्तवत्सलें संतोषी । दिधला वर तया वेळीं ॥ ७६ ॥ 

श्रीगुरु म्हणती तयांसी । सदा असो औदुंबरेसी । 

प्रकटार्थ जाणे पूर्वेसी । स्थान आमुचे येथेचि असे ॥ ७७ ॥ 

तुम्ही रहावे येथे औदुंबरी । कल्पवृक्ष मनोहरी । 

अन्नपूर्णा प्रीतिकरीं । औदुंबरी ठेवितों ॥ ७८ ॥ 

कल्पवृक्ष औदुंबर । येथे असा तुम्ही स्थिर । 

अमरापुर पश्चिम तीर । आम्हा स्थान हेचि जाणा ॥ ७९ ॥ 

प्रख्यात होईल स्थान बहुत । समस्त नर पूजा करीत । 

मनकामना होय त्वरित । तुम्ही त्यांसी साह्य व्हावें ॥ ८० ॥ 

तुम्हांसहित औदुंबरी । आमुच्या पादुका मनोहरी । 

पूजा करिती जे तत्परी । मनकामना पुरती जाणा ॥ ८१ ॥ 

येथे असे अन्नपूर्णा । नित्य करिती आराधना । 

तेणें होय कामना । चतुर्विध पुरुषार्थ ॥ ८२ ॥ 


- गुरुचरित्र अध्याय १९ 



Mar 1, 2017

श्री दत्त महाराज पालखी


।। श्री गणेशाय नमः ।।

।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।


कुणीतरी न्या हो मज तया गाणगापुरी

मूर्ती अदृष्य परी पद दाखवा ती गोजीरी ।। १।।


सुस्नान करुनी मी भीमा अमरजा तीरी

धन्य होईन प्रदक्षिणे तया पिंपळ उंबरी ।। २।।


चार घटिका कुंडाशी त्या पाराशी थांबुन

लीला चरित्र ते गुरु कौतुक आठवीन ।। ३ ।।


भक्त सोयरे देखीन तया डोळ्यात साठवीन

भूमी पावित्र चुंबुन तेथ नतमस्तक होईन ।। ४ ।।


तया पादुका वरी माझा जीव ओवाळीन

तया पालखीच्या भोई मी चरणी लोळीन ।। ५।।


तया चैतन्य प्रवाही ऋणी याचक होईन

कण विभुती होत अवघा जन्म हा देईन ।। ६।।


कली असुनी जन्म ब्रह्मपदासी मिरवीन

अर्थ ऐसा मी माझ्या भक्तीने बदलीन ।। ७ ।।


।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।