Mar 29, 2017

श्री स्वामी कृपा स्तोत्र


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ श्री सद्‌गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ ॥

॥ ॐ श्री गणेशाय नम: ॥ ॐ श्री सरस्व़त्यै नम: ॥ ॐ श्री सर्वशक्तिमूर्तये नम: ॥ ॐ परात्पर जगत्‌गुरु नमो । आता नमू मयुरवाहिनी । जी शब्दविश्वाची स्वामिनी । वंदन करुया तियेसी ॥१॥ जो सकल विश्वाचा आधार । निर्गुण आणि निराकार । तो ब्रह्मा-विष्णु-महेश्वर । सद्भावें वंदू त्रैमूर्ती ॥२॥ त्रैमूर्तिचा महिमा अपार । गुरुचरित्री वर्णिला साचार । स्तुति करता अपरंपार । वेद चारी शिणले ॥३॥ कर्दलवनी झाले गुप्त । साक्ष ठेवून गाणग क्षेत्र । निर्गुण पादुका पवित्र । भक्तांसाठी ठेवियल्या ॥४॥ पंढरीचा पांडुरंग । ज्यासी आवडे संतसंग । तारिले तुक्याचे अभंग । त्यासी प्रणिपात अंतरी ॥५॥ करु या साष्टांग दंडवत । त्रैमूर्ती श्रीगुरुदत्त । अक्कलकोटी यति समर्थ । सद्भावे नमू अंतरी ॥६॥ आता श्री स्वामीरायांचे अख्यान । भाविकतेने करा श्रवण । सर्वसुखाचे निधान । लाभेल स्तविता सर्वांसी ॥७॥ भक्तीचा करुनी सोहळा । दाखवी अगम्य लीला । ऐसी ख्याती त्रैलोक्याला । मी पामर काय वर्णू ॥८॥ नृसिंहसरस्वती गुरुस्वामी । गुप्त जाहले कर्दलवनी । येतां पुनश्च धर्मा ग्लानी । अक्कलकोटी अवतरले ॥९॥ कर्दलवनी गुप्त जाहला । अबू पहाडी प्रगटला । अवधूत मानवरुपे आला । अक्कलकोटी माझारी ॥१०॥ श्री गुरुस्वामी यति पाहिला । मूर्तिमंत तेजाचा पुतळा । कंठी रुळती रुद्राक्षमाळा । पद्मासनी स्थित असे ॥११॥ शांत गंभीर दिसे रुप । हेमसंकाश तनु अनुरुप । नेत्रकमलांची कृपाझेप । भक्तावरी सर्वदा ॥१२॥ भाली शोभे कस्तुरी तिलक । साजिरे दिसे नासिक । ओष्ठ हनुवटी सुंदर मुख । चंद्रापरी दिसतसे ॥१३॥ समुत्कंठ पाहू चला । आजानुबाहू शिव भोळा । कंठा भूषवी त्रिदलमाला । नृसिंहभान गुरुस्वामी ॥१४॥ निम्ननाभी दिठी सुंदर । धूर्जटी कौपीन कटीवर । दत्त नरहरी यतिवर । धीपुरी प्रगटलासे ॥१५॥ अखिल विश्वी विश्वंभरु । भक्तजन सुरतरू । या हो सकल पादपद्म धरु । देहबुध्दी करु दुर ॥१६॥ मम हृदयीं ठसो मूर्ति । शंख चक्रांकित गदा हाती । कामधेनुसह चतुर्वेद मूर्ती । सदैव राहो अंतरी ॥१७॥ अबूगिरीवरुनी हृद्कमली । वेगे येई गुरुमाऊली । रत्नखचित सिंहासनी बैसली । भक्तकाज करावया ॥१८॥ आतां करितों तुझी पूजा । रमावरा अधोक्षजा । सप्रेमें क्षाळितो पदरजा । अर्ध्य देई स्वकरी ॥१९॥ मधुर सुवासिक शीतळ । गंगोदक जळनिर्मळ । पंचामृत स्नान सचैल । निजहस्ते घालितो ॥२०॥ स्नान करुनी, करा आचमन । भरजरी पितांबर नेसून । शालजोडी पांघरुन । सुखे घेई स्वामीया ॥२१॥ चंद्रोपम उपवीत घालुनी । रत्नाभरणे, कौस्तुभमणी । कस्तुरी टिळा लेवुनी । चंदन उटी लावावी ॥२२॥ निराकार, निर्गुण गोपाळा । कंठा भूषवी तुलसीमाळा । बिल्व-शमी दुर्वांकुराला । सहस्त्रनामें अर्पितो ॥२३॥ अष्टगंध, बुक्का सुगंध । सौरभे होती दिशा धुंद । अर्पितो दीप स्वानंद । मानुनी घेई गुरुराया ॥२४॥ रत्नखचित चौरंगावरी । सुवर्णताटी पक्वाने सारी । दहि-दूध लोणचे कोशिंबिरी । पंचखाद्य नैवेद्य सेवा जी ॥२५॥ कर्पूरोदके धुवोनि हस्त । घालितो करी पंचामृत । प्राणापान, व्यान, उदान समस्त । तूचि अससी स्वामिया ॥२६॥ गुरुमूर्ती तू षड्रस । मीहि त्यांस ऐक्य सहज । दिव्य सच्चित रुप निज । वेदपूर्ण भरले असे ॥२७॥ वदनसुवासा तांबूल । त्रयोदशगुणी निर्मळ । मुखशुध्दिस नारळ । घ्यावा आता गुरुराया ॥२८॥ भक्तवत्सला स्वामिराजा । अंगिकारावी माझी पूजा । नमस्कारोनी अधोक्षजा । श्रीमुख बघतो न्याहाळुनी ॥२९॥ तव आरती ओवाळिता । नासती अनंत ब्रम्हहत्या । वेद बोलतो वाणी सत्या । त्रिवार ऐसे सत्यचि ॥३०॥ सनकादिक मुनी सुरवर । करिता स्वामींचा जयकार । मंत्रपुष्पांचा संभार । जडजीवासी उध्दरी ॥३१॥ वेदघोष अति सुस्वर । प्रदक्षिणा घाली वारंवार । प्रेमे साष्टांग नमस्कार । अनंतासी दंडवत ॥३२॥ अनंतकोटी ब्रम्हांडनायका । अनादि स्वरुपा गुरुराया । लागलो आता तव पाया । भक्तकृपाळा उध्दरी ॥३३॥ छत्रचामरे वारीन । गंधर्वगान समर्पिन । सुस्वर वाद्ये वाजवून । तुष्ट करितो तुजलागी ॥२४॥ सुदिव्य, सुखशय्या मृदुल । ठेवी सुखासनी पदकमल । चरण, अहर्निश चुरीन । सेवा मानून घ्यावी जी ॥३५॥ सत्‌शिष्य भजनी रंगती । भजनानंदी विसावती । संतसंगी जडो प्रीती । हेचि मागणे स्वामीया ॥३६॥ शेष, व्यास, सरस्वती । गुणवर्णन करीती महामती । भक्तस्तवन ऐकुनी श्रीपती । प्रसन्न व्हावे सत्वरी ॥३७॥ विश्वंभर तू सौख्यराशी । भक्तकौतुक पुरविशी । योगक्षेम चालविसी । ऐसी ख्याती त्रिभुवनी ॥३८॥ निजनिर्माल्य प्रसाद देसी । उच्छिष्ट आंस सर्वांसी । पूर्वपुण्ये येती फळासी । सेवा गुज ऐसे हे ॥३९॥ सृष्टि-उत्पत्ति-स्थिती-संहारा । अवतार तुझाचि गुरुवरा । ब्रम्हा-विष्णु-महेश्वरा । स्वामीरुपी शोभसी ॥४०॥ रवि-चंद्रासी तेजाळले । ते तेजही तुजकडोनी आले । निज-भक्त कार्य सगळे । तव प्रसादे लाभते ॥४१॥ इह परत्र सौख्य देसी । कल्पतरुसम शोभसी । जैसा भाव धरावा मानसी । तैसा त्यासी अनुभव ॥४२॥ शिव-विष्णु-शक्ति-गणपति । स्वामीरुपे सारे शोभती । निगमागमही स्तविती । सत्यज्ञानानंद तू ॥४३॥ त्रिविधताप हे निवारिसी । दीनजना उध्दरिसी । क्षमा करावी दासासी । मागणे हेचि जीवनी ॥४४॥ जीवात्मज्योति उजळुनी । तव प्रकाशे प्रकाशुनी । पाहते नित्यचि स्तवनी । स्वामीराजा ॥४५॥ ऐशी अतर्क्य स्वामीलीला । वणिर्ता वेदही शिणला । तेथे मज पामराला । कैसी शक्ती ॥४६॥ काया वाचा मानसी । इंद्रियाधीकृत कर्मासी । अर्पितो परात्परा तुजसी । सारी सेवा ॥४७॥ रामकृष्ण तू सर्वसाक्षी । पृथ्वीवर अवतार घेसी । हरावया भूभारासी । पंढरी वास केला ॥४८॥ पंढरीस श्रीविठ्ठल । गिरीवर विष्णु सोज्वळ । करवीरी लक्ष्मी प्रेमळ । विश्वेश्वर काशीवासी ॥४९॥ कलियुगी नृसिंह-सरस्वती । अत्रिनंदन गाणग क्षेत्री । गुरु माणिक प्रभूही तूचि । अक्कलकोटी गुरुराया ॥५१॥ जे भक्त तुजला भजती । अहर्निश राहे त्यांचे पाठी । भक्त संरक्षणासाठी । अक्कलकोटी वास केला ॥५१॥ स्तविता ही स्वामी माऊली । पापे अनंत जन्माची जळाली । वाढविसी प्रेमसाऊली । वात्सल्य नांदे सर्वदा ॥५२॥ असत्‌वृत्ति जावो विलया । सद्‌वृत्ती पावो जया । सकलजनासी देवराया । सौख्य लाभो जगी या ॥५३॥ गोवर्धन गिरी धरिसी । अग्निही तू प्राशिसी । पार्थगुरु सारथी होसी । महिभार हरावया ॥५४॥ अविनाशी अवतार दत्त । जगती आहे विख्यात । अघटित लीला दावित । गाणगापुरी बैसला ॥५५॥ गुरुतत्व गूढ सार । जाणताती भक्त थोर । तोचि प्रज्ञापुरी यतिवर । भक्तकाजी रंगला ॥५६॥ हे स्तोत्र करिता पठण । त्यासी न बाधे चिंता दारुण । भवभय दु:खाचे निरसन । स्वामीकृपे होईल ॥५७॥ अनन्यभावे करा स्मरण । साक्षात्कारे घ्यावे दर्शन । हेचि सद्‌गुरु वचन । असत्य न होई सर्वथा ॥५८॥ ठेवुनिया श्रध्दा भाव । मनी आळवावा गुरुदेव । भक्तासाठी घेई धाव । रक्षणासी सिध्द सदा ॥५९॥ वटवृक्षतळी जाण । श्रीसद्‌गुरु प्रतिमा ठेवून । यथासांग करावे पूजन । षोडशोपचारे आदरे ॥६०॥ मग करावे स्तोत्र पठण । नित्यश: एक आवर्तन । अखंड करिता तीन मास पूर्ण । साक्षात् सद्‌गुरु भेटेल ॥६१॥ श्री स्वामी समर्थ नाम । अनंत कोटींचा कल्पद्रुम । सकल संतांचा विश्राम । नामस्मरणीं नांदतो ॥६२॥ स्वामीकृपा होता क्षणी । मुक्याते फुटेल वाणी । पंगु जाईल उल्लंघुनी । उत्तुंग गिरीही लीलया ॥६३॥ ऐसा महिमा अगाध । एकमुखी वर्णिती वेद । श्री स्वामी स्तोत्र केले सिध्द । आला धावून झडकरी ॥६४॥ स्वामी प्रेमळ माउली । जैसे वत्साते गाऊली । तुझी स्तुति स्त्रोते गायिली । तव प्रेमळ कृपेने ॥६५॥ तूचि श्री व्यंकटेश । तुचि महारुद्र महेश । अनंतकोटी जगदीश । श्री स्वामी समर्था सर्व तूचि ॥६६॥ उत्पति, स्थिती आणि लय । तूचि सकलांचा आशय । गुरूदेवा तुचि मम आश्रय । उपासका सांभाळी ॥६७॥ तव करितां नामस्मरण । लाभे चित्ता समाधान । तव चरणाशी वंदन । देवाधिदेवा समर्था ॥६८॥ जे नर करतील आवर्तन । मनकामना त्यांची होईल पूर्ण । सद्भक्तिचे अधिष्ठान । नित्य ठेवूनी अंतरी ॥६९॥ हा ग्रंथ ज्याचे घरी । तेथे अन्नपूर्णा वास करी । सुख संपत्ति संसारी । लाभेल भाविकां निश्चिती ॥७०॥ करितां ग्रंथाचे पठण । दुःख दारिद्रय जाईल पळून । भक्त सेवेसाठी येईल धावून । दयावंत स्वामीराज ॥७१॥ येथे ठेवूनिया विश्वास । करावे ग्रंथ पारायणास । दृष्टांत देवोनि त्वरेस । सांभाळीन तयालागी ॥७२॥ हे सद्गुरूंचे सत्यवचन । श्रोते ऐका ध्यान देऊन । पुरवील मोक्षसाधन । एकचि माझा स्वामीराज ॥७३॥ विश्वामित्र गोत्र कुलोत्पन्न । देशपांडे उपनामाभिधान । नाम माझे असे वामन । सद्‌गुरुचरणी लीन सदा ॥७४॥ प्रतिभानुज हे संबोधन । घेतले श्रीगुरूने लिहवून । झाली सेवा सफल पूर्ण । पूर्व सुकृतानुसार ॥७५॥ स्तुतिस्तोत्राचा गुंफिला हार । भक्तिमंजिरी त्यावर । घातली वैजयंती सुंदर । कंठी श्रीगुरुरायाचे ॥७६॥ श्रीस्वामीराज स्तोत्र ग्रंथ । जाहला असे समाप्त । मज पामरे वदविले गुरुनाथे । त्यांचे चरणी दंडवत ॥७७॥ श्री स्वामी समर्थ दत्त । मंत्र हा मनी घोषित । झाले चित्त अवघे तृप्त । पुनश्च चरणी दंडवत ॥७८॥ देह अवघे अक्कलकोट । आत्मस्वरुपी श्री स्वामीसमर्थ । त्यांचे ठायी दंडवत । वारंवार घालीतसे ॥७९॥ इति श्रीस्वामीराज सगुण । भक्तांचे वैभव पूर्ण । प्रतिभानुज करीतसे वर्णन । साष्टांग प्रणिपात करोनी ॥८०॥ ॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥ ॥ इति श्री अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र संपूर्णम् ॥ ॥ शुभंभवतु ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


No comments:

Post a Comment