Apr 24, 2019

श्रीस्वामी समर्थ गुरूकथामृत - अध्याय १


श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीलक्ष्मीनृसिंहाय नमः । सर्वाधीशा नमोस्तुते ॥१॥

श्रीकुलदेवतायै नमः । श्रीअन्नपूर्णायै नमः । श्रीनर्मदादेव्यै नमः । गंगामाते नमोस्तुते ॥२॥

श्रीअक्कलकोट-निवासी । परब्रह्म श्रीस्वामींसी । शतावधि प्रणिपातांसी । करित असे दास हा ॥३॥

लावोनि भक्तिचे निरांजन । सत्प्रेमाची पुष्पे वाहुन । प्रार्थना हा धूप जाळुन । चरणकमलां पूजितो ॥४॥

सद्‌गुरुंचे ध्यान धरुन । दिव्य स्वरुपा करि वंदन । याचितो मी देईगा ज्ञान । अखंड नाम स्मरणाचे ॥५॥   

श्रीस्वामींचे दिव्य चरित्र । वर्णावया कोण पात्र । काया-वाचा-मने अपात्र । मी तो असे सर्वथा ॥६॥

परंतु इच्छा एक महान । गावी स्वामींची कथा गहन । गाता ऐकता पातके जाण । भस्म होतील सर्वही ॥७॥

पर्वत मुंगीने उचलावा । समुद्र टिटवीने आटवावा । वेद अप्रबुद्धे म्हणावा । कैसे असे शक्य हे ॥८॥

विचार येतां कापरे भरते । लेखणी ती गळोनि पडते । चरित्र कैसे माझिया हाते । होईल देवा संपूर्ण ॥९॥

मिळाला वाटे मला शाप । गतजन्मीं मी करिता पाप । हरावया तो शापताप । चरित्र गावे स्वामींचे ॥१०॥

कृपेविना तुझ्या देवा । कैसा हेतू साध्य व्हावा । चरित्र-ग्रंथ गोड व्हावा । यास्तव द्यावे वरदान ॥११॥

चरित्र-सागर उल्लंघाया । सामर्थ्य द्यावे स्वामिराया । लोटांगणे घालुनी पायां । प्रार्थितो मी तुम्हासी ॥१२॥

जन्मोजन्मीं आपुले नाते । जडो ऐसे मज वाटते । यास्तव पदरज मस्तकाते । लावितो मी सदैव ॥१३॥

शब्दस्फूर्ती, कल्पनास्फूर्ती । देऊनीं करणे ग्रंथपूर्ती । मनीं धरियली तुझी मूर्ती । विलंब आता न करावा ॥१४॥

मातापितयांसी वंदितो । पूर्वजांचे स्मरण करितो । आशीर्वाद असो म्हणतो । पुण्यकर्मा साधावया ॥१५॥

नमितो श्रीसद‌गुरुचरणां । निवारावे सर्व विघ्ना । श्रीस्वामींचे गुणगायना । सत्स्फूर्ती द्या मजलागी ॥१६॥

शनिदेवादी नवग्रहांसी । शरण जाऊनी प्रार्थितो त्यांसी । साह्य द्यावे या समयासी । ग्रंथलेखन करावया ॥१७॥

रामानंद मज लाभले । पाश्चात्त्यविद्याविभूषित भले । अध्यात्ममागीं श्रेष्ठ ठरले । स्वामी कृपा अपूर्व ॥१८॥

तेतों असती माझे गुरु । संसारसागरींचे तारु । अथवा गमती कल्पतरु । सदैव माझे मनास ॥१९॥

रामानंद अति प्रेमळ । शिष्योन्नतीची तयां तळमळ । मार्गदर्शना वेळोवेळ । निज शिष्यांप्रति करिताती ॥२०॥

परम पावन ते गुरुचरण । करोनिया मस्तकी धारण । प्रार्थितो मी कर जोडुन । द्यावे सद्‌यश ग्रंथासी ॥२१॥

आता प्रार्थना श्रोतियांसी । भक्त, बांधव, सज्जनांसी । सावचित्त व्हा परिसायासी । पावन चरित्र स्वामींचे ॥२२॥

जन्ममृत्युच्या अतीत । स्वामी स्वयंभू हो निश्चित । प्रकट झाले अकस्मात । अक्कलकोटीं वृक्षातळीं ॥२३॥

मूर्ति अत्यंत तेजस्वी । बघतां वाटे जणु गभस्ती । मानवरुपे महीवरती । दर्शन द्याया अवतरले ॥२४॥

ऐका, ऐका श्रोतेजन । स्वामी असती तरी कोण । पूर्वकथेचे झालिया ज्ञान । हर्ष पावाल मानसीं ॥२५॥

गुरुचरित्रीं नृसिंहसरस्वती । परमपूज्य ते दत्तमूर्ती । गाणगापुराहुनी शैल्यपर्वती । जाण्याप्रती निघाले ॥२६॥

शैल्यपर्वताचे परिसरांत । येतां रम्य कर्दलीवनांत । विचार करुनी मानसांत । गुप्त वनीं जाहले ॥२७॥

वनीची शोभा वर्णवे न । पक्षिगायनें हरपे भान । अमृत निर्झर कड्यांवरुन । उड्या टाकोने धावती ॥२८॥

छाया दाटली अरण्यांत । हरिण शावके क्रीडा करित । पसरुनी पिसारे रत्नखचित ! मयूर नाचती हर्षाने ॥२९॥

इंद्रधनूतील रंगांनी । लज्जित व्हावे आपुल्या मनीं । ऐशी फुलपांखरे ती वनीं । विहरत होती सर्वत्र ॥३०॥

पुष्पलतांनी वृक्ष भरले । मधु चाखितां भ्रमर रमले । कोकिळ गायन वनीं चाले । वनश्री ऐशी रमणीय ॥३१॥

लहानमोठे जलाशय । दिसती जणू स्फटिकमय । वनदेवींची दर्पणसोय । केली गमे जगदीशे ॥३२॥

निळे, हिरवे मनोहर । पर्वत असती सभोवार । रत्नराशी रचिल्या थोर । कुबेरानी जणू की ॥३३॥

भेदूनि गगना वृक्ष जाती । वार्‍यासंगे ते डोलती । नाना फुले गंध उधळती । सुगंधित झाले वन सारे ॥३४॥

काय आणिक किति वर्णावे । सुरांगनांनीही भुलावे । स्वर्ग सोडुनी इथे यावे । ऐशी वनश्री अपूर्व ॥३५॥

बहुत वर्षे जाहल्यावरी । अवचित घटना घडली खरी । मनोहर अशा त्या कांतावरीं । रम्य प्रभाती एकदा ॥३६॥

गाती प्रभाती अति सुस्वर । विहंग बैसोनिया तरुवर । अवचित येई तिथे वनचर । थोर परशूस घेउनीं ॥३७॥

वृक्ष वल्लरी वेष्टीत भला । बघुनी नर तो आनंदला । शाखोपशाखा तोडण्या सजला ।कुऱ्हाड घेउनी चढला वरी ॥३८॥

शाखा तोडिता फार थकला । करिचा परशू गळोनि पडला । तळीचे वारुळा भेदोनि गेला । खोल अंतर्भागि तो ॥३९॥

अहाहा घडले नवल थोर । अंतरीं प्रगटे ध्वनि ॐकार । ऐकता घाबरे तो वनचर । उतरे खाली त्वरेने ॥४०॥

बघोनि मुनिची ध्यानस्थ मूर्ती । घाव मांडीवरती । पाहोनी बसे पाचावरती । धारण रडू लागला ॥४१॥

आता ऋषी हे शापितील । क्रोधाग्नीने जाळितील । नेत्र आक्रांदिता लाल । झाले लोळे धरणीवरी ॥४२॥

हाय मी पातक केले घोर । घायाळ केला मुनी थोर । घोर नरकीं मी जाणार । करु आता कैसे तरी ॥४३॥

यमदूत नरकीं लोटितील । आसुडे मज फोडितील । तिथे येऊनी सोडवील । ऐसा समर्थ कोण असे ॥४४॥

काय माझी ही कर्मदशा । इथे नेमका आलो कसा । रडू लागला तो ढसढसा । कोण मातें रक्षील कीं ॥४५॥ 

थरथर कापे भिल्लकाया । क्षमा करावी पामरा या । वाचवा मज हो मुनिवर्या । दग्ध मातें न करावे ॥४६॥

भिल्ल रडे तो धायधाय । तोंचि इकडे जाहले काय । स्वामी उघडुनी नेत्रद्वय । प्रसन्न वदने विलोकिती ॥४७॥

भिल्ल धरी प्रभुचे पाय । क्षमा असावी चुकलो माय । वाणी प्रगटे अमूतमय । न भ्यावे तूं मजलागी ॥४८॥

अभय मिळता हर्ष झाला । कवटाळिले प्रभुपदांला । कर जोडुनी तयां वदला । उद्धरावे मजलागी ॥४९॥

स्वामी तयाचे मस्तकावर । ठेवुनी आपुला पवित्र कर । वदती तया रे भिल्लवर । चिंता आता न करि गा ॥५०॥

न करि कुणाचा घातपात । चौर्यकर्मी नसावे रत । द्रव्य असावे कष्टार्जित । आजन्म ऐसे वागावे ॥५१॥

मिळता तया आशीर्वाद । झाला पामर तो सद्‍गद । अश्रूंनी न्हाणिले ते श्रीपद । वदे झालो कृतार्थ मी ॥५२॥

ऐशी लाभावी कृतार्थता । सकल लोकांसी सर्वथा । यास्तव भजणे स्वामिनाथा । मनोभावे अहर्निश ॥५३॥

इति श्रीस्वामीगुरुकथामृत । अध्याय त्यांतला पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥५४॥

॥ श्रीस्वामी समर्थार्पणमस्तु ॥


सौजन्य : https://www.transliteral.org/


Apr 17, 2019

॥ श्री दत्तमहाराज स्तुती ॥


अनसूयानंदन, ब्रह्मा विष्णू महेश्वर

अवतरले भूवरी दत्त दिगंबर ||धृ ||


तीन शिरे, सहा हात रूप तुझे

हाती कमंडलू, भगवी वस्त्रे साजे ||१||


अनसूया माता पतीचरणी लीन

चरणजल स्पर्शिता बालके तीन ||२||


त्रिशूल, डमरू ,शंख, चक्र, गदा हाती

मागे उभी कामधेनू, श्वान पुढे वसती ||३||


भूत, पिशाच्चे तुजला पाहुनिया पळती

जो ध्यातो भक्तीने हृदयी त्या वसती ||४||


श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती

पीठापूर कुरवपूर गाणगापूरी राहती ||५||


वासुदेवानंद सरस्वती, स्वामी समर्थ अक्कलकोटी

अवतार दत्तांचे रूपे कोटी कोटी ||६||


औदुंबर वृक्षातळी वास असे निरंतर

दर्शन देई भक्ता, अवधूत दिगंबर ||७||


त्रिगुणात्मक शक्तींचे स्थान असे तूंचि

वंदन तुजला करिता, सात्विक वृत्ती साची ||८||


बहुजन्मी पुण्य केले आजि फळा आले

दत्तकृपा होऊनिया 'मी' पण हे गळले ||९||


दत्तचरणांवरती मी मस्तक ठेवतो

कृपा असू दे अवधूता, वैभव मी नमितो ||१०||


Apr 6, 2019

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ बावनी






दत्तभक्तांच्या अभिप्रायांनुसार, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ बावनी इथे पुन्हा प्रकाशित केली आहे.

श्री स्वामी समर्थ बावनी इथेही वाचता येईल.

II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II