Jul 28, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी ६ ते १०


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

श्री आनंदनाथ महाराजाय नमः


ऐसा तू बा अपरंपारू । या अनंत ब्रह्माचा आधारू । चराचरीचा आकारू । पूर्णाधारू म्हणविले ॥६॥ असा तुझा महिमा अपरंपार आहे. हे गुरुराया, तूच या अनंत ब्रह्मांडाचा आधारभूत होऊन राहिलेला आहेस. विश्वापेक्षाही ब्रह्मांडाची संकल्पना फार विशाल आहे. वेदशास्त्रांनुसार, ब्रह्मांडात कृतक लोक, महर्लोक आणि अकृतक लोक हे तीन लोक असतात. कृतक लोकात भूलोक, भूवर्लोक, स्वर्लोक यांचा समावेश होतो. तर, जनलोक, तपोलोक, सत्यलोक यांच्या समूहास अकृतक लोक म्हणतात. नऊ खंड व सप्त द्वीपांनी युक्त अशी ही पृथ्वी, सप्त पाताळें, आणि भू:, भुवः आदि सप्त स्वर्ग या सर्वांना निर्माण करणारे हिरण्यगर्भांड अथवा ब्रह्मांड आहे. या सर्व ब्रह्मांडाचे तूच अधिष्ठान आहे. अशाप्रकारे, तूच तर या संपूर्ण चराचराला व्यापून राहतोस. तूच तर या सर्वांचा सांभाळ करतोस. यास्तव, तुला पूर्णाधार म्हणतात.

ऐशा तुजप्रती । स्तवावया अल्प माझी मती । तू जाणसि हे चित्ती । विश्वव्यापक म्हणवूनी ॥७॥ आम्हां सामान्य मनुष्यांच्या आकलन शक्तीच्या पलीकडे असलेले हे तुझे निरामय, शुद्ध चैतन्य, अगोचर स्वरूप आहे. त्या रूपाचे वर्णन करण्याची माझ्यासारख्या अज्ञानी, पामराची गती नाही. हे समर्था, तू सर्वांच्या अंतरात्म्यांत वास करणारा विश्वव्यापक आहेस. अर्थातच, ह्या सीमित बुद्धीमुळे ' नेति नेति शब्द, न ये अनुमाना ' अशी माझी झालेली अवस्था तू जाणतोसच. तरी देवा मतिदान । देणे तुजचि कारण । जरी करणे समाधान । तरी दातृत्वपूर्ण ब्रीद बोलिले ॥८॥ तरी हे मायाध्यक्षा, तू मायेचे हे पटल दूर करून 'स्व' स्वरूपाचे ज्ञान होईल, अशी मला सुबुद्धी दे. हे केवळ तूच करू शकतोस. तुझ्या प्रकृतीच्या अर्थात मायेच्या भ्रमात आम्हा अजाण बालकांना गुंतवू नकोस. भक्तवत्सल, भक्ताभिमानी हे तुझे ब्रीद आहे. ' मला अनन्यभावानें शरण आलेल्यांचा मी उद्धार करणारच.' अशी तुझी प्रतिज्ञा आहे. हे ध्यानात आणून, आता मला योग्य तो बोध कर आणि अद्वैताची अनुभूती दे. ह्या तुझ्या भवतारक चरणद्वयीं माझी बुद्धी अखंड स्थिर राहू दे, हीच प्रार्थना ! अहा जी निर्गुणा । विश्वव्यापक सगुणा । सत्य निराकार निरंजना । भक्तांकारणे प्रगटलासी ॥९॥ हे गुरुराया, तुझे परब्रह्मस्वरूप निर्गुण, निराकार, आणि अनंत आहे. या सृष्टीच्या आरंभाच्याही आधीपासून अस्तित्वात असलेले तूच विमल, शब्दातीत, अवर्णनीय असे परमात्मा तत्व स्वरूप आहेस. अज्ञान, विकार, माया आदिंच्या पलीकडे असलेले तूच पूर्ण सत्य आहेस. संपूर्ण विश्वाला तू व्यापले असून सर्व जीवमात्रांत तुझाच अंश आहे. मुमुक्षु जीवांचा उद्धार करण्यासाठीच तू सगुण रूप धारण करतोस. सगुणाची उपासना करणे सहज शक्य असते. जे रूप डोळ्यांना दिसते, ज्या ठिकाणी मन एकाग्र करून पूजन करता येते, ध्यान करता येते तेच सगुण, साकार होय. वर्षानुवर्षे सगुणाचे असे चिंतन झाले की निर्गुणाची संकल्पना ध्यानांत येते. यासाठीच हे गुरुतत्त्व सगुण रूपांत अवतरित झाले आहे. रूप पहाता मनोहर । मूर्ति केवळ दिगंबर । कोटी मदन तेज निर्धार । ज्याच्या स्वरूपी नटले ॥१०॥ तुझे हे रूप अतिशय लोभस आहे, मनास सुखकारक असे आहे. तुलाच दिगंबर म्हणजेच दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे, असेही म्हणतात. दिशा जशा सर्वव्यापक असतात, त्यांना सीमा नसते, तसेच श्री स्वामींनीदेखील आपल्या चैतन्यरूपाने या सर्व विश्वाला व्यापून टाकले आहे. तुझे हे स्वरूप पाहताच जणू कोटी मदनांचे तेज एकत्र करून ही दिव्य मूर्ती घडविली आहे, असेच वाटते. अतिशय आल्हाददायक अशा तुझ्या रूपाचे वर्णन करणे सर्वथा अशक्य आणि अनाकलनीय आहे, हेच खरे !


॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

क्रमश:


Jul 22, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी १ ते ५



॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥ 

श्री आनंदनाथ महाराजाय नमः


ॐ नमोजी श्रीगुरुनाथा । भक्तवत्सल समर्था । तव पदी ठेऊनि माथा । स्तवितो ताता तुजलागी ॥१॥

ॐकार म्हणजेच परब्रह्माचे स्वरूप ! या विशुद्ध चैतन्याचे मूर्तीमंत रूप म्हणजेच गुरुमहाराज. श्री दत्तात्रेय हे आद्यगुरू आहेत. त्या अनसूयानंदनापासूनच गुरुपरंपरा चालू झाली. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तप्रभूंचाच अवतार आहेत. अशा माझ्या श्री गुरुनाथांना नमन असो. आर्त, अर्थार्थी, मुमक्षु आणि जिज्ञासू अशा सर्व प्रकारचे भक्त श्री स्वामी समर्थांकडे येत असत. श्री स्वामी समर्थ नेहेमीच त्यांना अभय देत असत. अभाविकांचेदेखील त्यांनी कल्याणच केले. आपल्या भक्तांविषयी विशेष ममत्व असलेल्या त्या समर्थांच्या चरणीं मी माझे मस्तक ठेवून वंदन करतो आणि तुझे स्तवन म्हणजेच स्तुतीगाथा गातो. इथे आनंदनाथ महाराज श्री स्वामी समर्थांना पिता असे संबोधतात. आपल्या सद्गुरूंविषयींचा हा सहजभाव त्यांच्या भक्तीची उत्कटता दर्शवितो. तू नित्य निरंजन । तुज म्हणती निर्गुण । तूच जगाचे कारण । अहंभावे प्रगटलासि ॥२॥ तू नित्य निरंजन म्हणजेच सदासर्वदा निर्विकल्प, दोषरहित आहेस. श्री स्वामी समर्थ साक्षात परब्रह्म असल्याने पूर्ण, शुद्ध ज्ञानस्वरूप आहेत. त्यांच्यामध्ये अज्ञान, माया अशी कुठल्याही प्रकारची अशुद्धी नाही. सर्व ऋषी-मुनी, तपस्वी-योगी, ज्ञानी जन तुम्हांस निर्गुण म्हणतात. असे हे वर्ण आणि आकार विरहित निर्गुण, निराकार चैतन्य सर्वांठायीं असूनही अलिप्त असते. अनंतकोटी ब्रह्मांडांचा नायक असलेला तूच तर संकल्पमात्रें या विश्वाची निर्मिती करतो. या जगाचा उत्पत्तीकर्ता, पालनकर्ता आणि संहार करणाराही तूच आहेस. तसेच जगत्कल्याणासाठी तूच अनंत रूपें, अनंत वेष धारण करून प्रगटतोस. तुझी स्तुती करावया । शक्ति नसे हरि-हर-ब्रह्मया । परि अघटित तुझी माया । जी संशयभया निवारीत ॥३॥ तुझी स्तुती अथवा तुझ्या या स्वरूपाचे वर्णन करण्याचे सामर्थ्य तर प्रत्यक्ष त्रैमूर्तींनाही नाही. ( तिथे माझ्यासारख्या पामराची काय कथा ?) सर्व सृष्टीला आपल्या प्रकृतीरूपी मायेच्या प्रभावाने निर्माण करणाऱ्या हे मायाध्यक्षा, तूच आपल्या कृपासामर्थ्यानें हे मायेचे पटल दूर करून आमच्या अज्ञानाचे, भयाचे निवारण करतोस. हे प्रभो, तुझ्या परमकृपेने आम्हांस अद्वैताचा साक्षात्कार होऊ दे !

मूळ मुळीचा आकारू । तुज म्हणती श्रीगुरू । सच्चित शक्तीचा आधारू । पूर्णाधारू ॐकारासी ॥४॥ या सृष्टीच्या प्रारंभाच्याही आधीपासून जो निरामय, शुद्ध चैतन्य रूपांत विद्यमान आहे आणि जो या विश्वाच्या उगमाचे मूळ आहे, त्यालाच तर श्रीगुरु महाराज असे संबोधतात. सत् म्हणजे शाश्वत अर्थात कधीही नाश न पावणारे, सदोदित असणारे आणि चित् म्हणजे शुद्ध ज्ञान होय. अशी ही शाश्वत ज्ञानाची कला/शक्ती म्हणजेच आदिमाया. हा सृष्टीरूपी खेळ मांडण्यासाठी म्हणून त्यानेच तर या मायेची निर्मिती केली आहे. तोच हा प्रणव ॐकार रूपी श्रीगुरु सकल विश्वाचा आणि चित्कलेचा आधार आहे. ऐसा तू देवाधिदेव । हे विश्व तुझेचि लाघव । इच्छेचे वैभव । मूळब्रह्मी नटविले ॥५॥ हे समर्था, तू तर देवांचाही देव आहेस. सर्व देवी-देवता ही तुझीच तर रूपें आहेत. तूच कधी श्री गणेश, कधी श्री हरि, कधी सदाशिव म्हणून प्रगट होतोस आणि आपल्या भक्तांचे संरक्षण करतोस. तुझ्याच संकल्पमात्रें देवी-देवता अवतार घेतात आणि कार्यसिद्धी करतात. तूच हे विश्व निर्माण केले आहेस. या सर्व विश्वाचा नियंता, सूत्रधार असलेला तूच या सकल जीवमात्रांत, स्थावर वृक्षांत चैतन्यरूपाने राहतोस. हा सृष्टीरूपी खेळ मांडून तूच सर्वांचा प्रतिपाळ करतोस, उद्धार करतोस आणि आपल्याच ह्या लीलेचा साक्षीभूत होतोस. या प्रत्येकाला ' सोहं ' ची जाणीव सुप्तरूपांत करून देतोस. तरीही, तू अंतर्यामी मूळ निराकार, ब्रह्मस्वरूपांत अखंड निजानंदी रममाण असतोस.


" महाराज आपण मूळचे कोण ?" , असा एका भक्ताने प्रश्न विचारला असता श्री स्वामी समर्थ उत्तरले, " दत्तनगर... मूळ पुरुष वडाचे झाड... मूळ,मूळ,मूळ... ". अधिकारी भक्तांच्या मते याचा अर्थ एव्हढाच की श्री स्वामी समर्थ हेच मूळ परब्रह्म असून योगमायेच्या सहाय्याने त्यांचा विस्तार वटवृक्षाप्रमाणे झालेला आहे. मात्र ह्यांतून तरून जाण्याचा मार्ग म्हणजेच ह्या वटवृक्षाचे मूळ अर्थात श्री स्वामी समर्थांचे चरण आहेत. तेव्हा, ' भवतारक ह्या तुझ्या पादुका, वंदीन मी माथा, करावी कृपा गुरुनाथा ' असाच भाव स्वामीभक्तांठायीं नित्य असावा.


॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

क्रमश:


Jul 20, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - प्रस्तावना


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

श्री स्वामी समर्थाय नमः ॥

श्री आनंदनाथ महाराजाय नमः


आम्ही नमू दीनानाथ l श्री गुरु स्वामी हा समर्थ l तोची बुद्धीचा दातार l भक्तवत्सल करुणाकर l चौदा विद्या चौसष्ट कळा l ज्याच्या दारीचा धुरोळा l वेद जेथे लोटांगणी l नेती बोलती वदनी l चारी मुक्तीची पायरी l सदा झुले ज्याचे द्वारी l आणिकाची कथा काय l शिव वंदी भावे पाय l कर जोडी शारंगधर l होऊनी पायाचा किंकर l ब्रह्मा बापुडा तो किती l काळा लागी ज्याची भीती l देव दानव किंकर l मुनी घेती निराकार l तया मानव भुलुनी गेले l अभिमाने नागवले l आनंद म्हणे दीनानाथ l निर्गुण की समर्थ l भगवान श्री दत्तात्रेयांचा तृतीय अवतार, अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांच्या अलौकिक स्वरूपाचे माहात्म्य अतिशय भक्तिपूर्ण आणि सहज सुंदर शब्दांत वर्णन करणारा हा अभंग ! अशा अनेक नितांतसुंदर रचनांचे रचयिता म्हणजेच परब्रह्म परमेश्वर सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांचे परमशिष्य, भक्तशिरोमणी श्रीमद सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज. यांचे मूळ नाव ' गुरुदास एकनाथ वालावलकर ' असे होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यांत महुरे नामक छोट्या गांवात ते वास्तव्यास होते. वंश परंपरेने त्यांच्या घराण्यांत दत्तभक्तीचा वारसा होता. लक्ष्मीचा वरदहस्त लाभल्यामुळे संपन्नताही होती. तरुणपणी ते मुंबईस राहून काथ्याचा आणि हरड्याचा धंदा करीत असत. त्यांचे राहणीमान उच्च थाटाचे होते. एकदा, ते भेंडे यांच्या म्हणजेच स्वामी समर्थांचे भक्त असलेले तात महाराज यांच्या पेढीवर बसले असता, त्यांनी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ यांची महती ऐकली. अनेक भक्तांचे अनुभव आणि काहींना आलेली परमार्थिक प्रचिती ऐकून गुरुदासांना श्री स्वामी दर्शनाची ओढ लागली. ते अस्वस्थ झाले आणि कुणालाही न सांगता अक्कलकोटास प्रयाण करते झाले. मार्गांत श्री स्वामींचेच ध्यान करीत करीत लवकरच गुरुदास अक्कलकोटास पोहोचले. तेथील वडाजवळ असलेल्या तलावांत ते हातपाय धुण्यासाठी म्हणून उतरले. त्यांचे चित्त मात्र श्री स्वामींच्या दर्शनाच्याच ध्यासाने व्यापले होते. तेव्हढ्यांत त्यांच्या डोक्यावर त्या वटवृक्षाची एक सुकलेली डहाळी पडली. दचकून त्यांनी वर पाहिले तो काय आश्चर्य! श्री स्वामी समर्थ त्या वडाच्या एका फांदीवर बसून खळखळून हास्य करीत होते. त्यांनीच ती सुकलेली डहाळी त्यांच्या मस्तकावर टाकली होती. आनंदातिशयाने धावतच गुरुदास त्या वटवृक्षाजवळ गेले. तोपर्यंत स्वामी महाराजही वडावरून खाली उतरले होते. गुरुदासांनी श्री स्वामी समर्थांना अत्यंत भक्तिभावाने प्रणिपात केला, आपले मस्तक त्यांच्या चरणकमलांवर टेकविले. श्री स्वामींनी त्यांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला आणि त्यांना समाधी लागली. अशा रितीने, प्रथम भेटीतच श्री स्वामी समर्थांनी त्यांच्यावर अनुग्रह केला आणि कृपांकित केले. काही दिवस, समर्थांच्या सान्निध्यांत राहून गुरुदास आपल्या घरी परतले आणि प्रपंचातील त्यांचे ध्यान उडाले. ते सदा सर्वदा स्वामींच्या ध्यानांत मग्न राहू लागले. त्यानंतर, पुढील सहा वर्ष ते नित्य श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास जाऊन त्यांची सेवा करू लागले. श्री स्वामींवरील त्यांची श्रद्धा आणि भक्ती वृद्धिगंत होऊन ते 'गुरुदासा' चे 'आनंदनाथ' झाले. श्री स्वामींची स्तवनगाथा, अभंग, स्तोत्र असे प्रासादिक वाङ्मय आनंदनाथ महाराजांनी स्वामीकृपेनें रचले. एकदा आनंदनाथ महाराजांनी श्री स्वामींना, 'आपणांस कृपाप्रसाद द्यावा.' अशी प्रार्थना केली असता, प्रसन्न होऊन श्री स्वामी समर्थांनी आपल्या मुखातून आत्मपादुका काढून त्यांना दिल्या आणि आपली कार्यध्वजा उभारण्यास सांगितले. श्री स्वामी समर्थांच्या त्या आत्मपादुका घेऊन आनंदनाथ महाराज नाशिक जिल्ह्यांतील सावरगाव येथे वास्तव्यास आले आणि तेथेच त्यांनी आपल्या या आराध्यदेवतेचा मठ स्थापन केला. काही काळानंतर त्या मठाची धुरा एका भक्ताकडे सोपवून आनंदनाथ महाराज श्री नृसिंहवाडी इथे काही काळ आराधना करीत राहिले. त्यानंतर बेळगांवला जाऊन सावंतवाडी तालुक्यांतील होडावडे या गांवी आले. त्या ग्रामींच एका औदुंबराखाली त्यांनी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांच्या पादुका स्थापन केल्या. कालांतराने, तिथेच श्री स्वामींचा मठही उभा राहिला. त्यानंतर, वेंगुर्ल्याजवळ धावडे या गांवी तिसरा मठ स्थापन केला. श्री स्वामी समर्थांनी प्रसाद म्हणून दिलेल्या त्या दिव्य आत्मपादुका ( आत्मलिंग ) आजही या मठांत नित्यपूजेत आहे. तसेच, स्वामीभक्त दर गुरुवारी त्यांचा दर्शन लाभही घेऊ शकतात. श्री स्वामी समर्थांच्या समाधी नंतरही पंचवीस वर्षांहून अधिक काळ आनंदनाथ महाराजांनी स्वामीभक्ती प्रसाराचे कार्य चालू ठेवले होते. ते ऐश्वर्यसंपन्न होते. त्यांच्या श्रीमंतीच्या थाटाचे काय वर्णन करावें ? ते घोड्यावरून फिरत असत. श्री दत्तजयंती आदी उत्सवांस सहस्त्रभोजन, अमाप दान-दक्षिणा करीत असत. मात्र त्यांची वृत्ती विरक्त होती. शिर्डीवासी श्री साईनाथांचे माहात्म्य यांनीच प्रथम सर्वांस कथन केले. १९०३ साली आनंदनाथ महाराजांनी 'संजीवन समाधी' घेतली आणि ते श्री स्वामी चरणीं लीन झाले. श्री आनंदमहाराजकृत 'श्रीगुरुस्तवन स्तोत्र' ( कामधेनू स्तोत्र ) हे स्वामीभक्तांच्या नित्यपठणांत असते. या दिव्य स्तोत्राचे चिंतन आणि मननाचा हा अल्प प्रयास आपण पुढील काही लेखांमधून करणार आहोत.


॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

क्रमश:


Jul 13, 2021

श्री स्वामी समर्थ महापाद्यपूजा


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

समर्थ स्वामी गुरुदत्त नामी । झणकार वीणा तुझी नादब्रह्मीं । 

मनी तार छेडी अशी तळमळीने । धाऊन ये माय ती कळवळ्याने ॥१॥

पहा ! स्वामींचे ध्यान हे आसनस्थ । करी तेज हे चित्तवृत्ती तटस्थ ।

त्रैमूर्ती ब्रह्मा,विष्णू,महेश । निजरूप पाठी घ्या दर्शनास ॥२॥

धरी सौम्य तेजाकृती स्वामी-ध्यान । तया भूषवी रंगपुष्पेकरून ।

दिसे स्वामीमूर्ती चंद्रप्रभेची । उजळील ती सर्व भूमी पूजेची ॥३॥

पदीं स्नान घालू पंचामृताने । हे अर्घ्य देऊ गंगोदकाने ।

सुगंध गंधादि घ्या स्वामीराजा । दिसो ध्याननेत्री महापाद्यपूजा ॥४॥

करी मेघ वरूनी अभिषेक नाद । स्तुतीस्तोत्र हे गर्जती चार वेद ।

प्रणवादी ओंकार उच्चस्वराने । संकीर्तने भक्त गाती पुराणे ॥५॥

असा हा पुरणपोळी पक्वान्न थाट । ध्यानांतरी हा सुटे घमघमाट ।

करी गोड नैवैद्य, स्वीकारी माझा। विनवी तुला आग्रहे बाळ तुझा ॥६॥

तुझे भक्त थोराहुनी थोर जाण । मी पोर अज्ञान अगदी लहान ।

परी हट्ट धरिला समर्थांपुढे मी । प्रसाद थोडातरी देई स्वामी ॥७॥

कुलदेव माता-पिता, संत यांचे। बहु पुण्य तरि लाभती पाय त्यांचे ।

अलभ्य चिंतामणी साधनेचा । पदलाभ हा स्वामी दत्तात्रेयांचा ॥८॥

प्रसाद घ्या रे ! म्हणे स्वामी या रे ! । नामामृताचे सुखे घोट घ्या रे ! ।

भिऊ नका पाठीशी हा असे स्वामी। तुम्ही जीवनाधार गुरू दत्तस्वामी ॥९॥

दे आत्मबळ दे ! करी शक्तिमंत । तेजस्वी निष्ठा वसो मूर्तिमंत ।

नवशक्तिमाजी नव रूप यावे । मी स्वामींचे सेवकरूप व्हावे ॥१०॥

दिसो चरण हे स्मरण होताच स्वामी । दुजे याविना काही ना मागतो मी ।

अनंत ब्रह्माण्ड ज्या स्वामीठायीं । चिरंजीव हो ध्यान त्या पुण्यपायी ॥१०॥


॥ श्री स्वामी समर्थ चरणारविंदार्पणमस्तु ॥


रचनाकार : श्री. विश्वनाथ दामोदर वऱ्हाडपांडे