॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥
॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥
आम्ही नमू दीनानाथ l श्री गुरु स्वामी हा समर्थ l तोची बुद्धीचा दातार l भक्तवत्सल करुणाकर l चौदा विद्या चौसष्ट कळा l ज्याच्या दारीचा धुरोळा l वेद जेथे लोटांगणी l नेती बोलती वदनी l चारी मुक्तीची पायरी l सदा झुले ज्याचे द्वारी l आणिकाची कथा काय l शिव वंदी भावे पाय l कर जोडी शारंगधर l होऊनी पायाचा किंकर l ब्रह्मा बापुडा तो किती l काळा लागी ज्याची भीती l देव दानव किंकर l मुनी घेती निराकार l तया मानव भुलुनी गेले l अभिमाने नागवले l आनंद म्हणे दीनानाथ l निर्गुण की समर्थ l भगवान श्री दत्तात्रेयांचा तृतीय अवतार, अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांच्या अलौकिक स्वरूपाचे माहात्म्य अतिशय भक्तिपूर्ण आणि सहज सुंदर शब्दांत वर्णन करणारा हा अभंग ! अशा अनेक नितांतसुंदर रचनांचे रचयिता म्हणजेच परब्रह्म परमेश्वर सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांचे परमशिष्य, भक्तशिरोमणी श्रीमद सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज. यांचे मूळ नाव ' गुरुदास एकनाथ वालावलकर ' असे होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यांत महुरे नामक छोट्या गांवात ते वास्तव्यास होते. वंश परंपरेने त्यांच्या घराण्यांत दत्तभक्तीचा वारसा होता. लक्ष्मीचा वरदहस्त लाभल्यामुळे संपन्नताही होती. तरुणपणी ते मुंबईस राहून काथ्याचा आणि हरड्याचा धंदा करीत असत. त्यांचे राहणीमान उच्च थाटाचे होते. एकदा, ते भेंडे यांच्या म्हणजेच स्वामी समर्थांचे भक्त असलेले तात महाराज यांच्या पेढीवर बसले असता, त्यांनी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ यांची महती ऐकली. अनेक भक्तांचे अनुभव आणि काहींना आलेली परमार्थिक प्रचिती ऐकून गुरुदासांना श्री स्वामी दर्शनाची ओढ लागली. ते अस्वस्थ झाले आणि कुणालाही न सांगता अक्कलकोटास प्रयाण करते झाले. मार्गांत श्री स्वामींचेच ध्यान करीत करीत लवकरच गुरुदास अक्कलकोटास पोहोचले. तेथील वडाजवळ असलेल्या तलावांत ते हातपाय धुण्यासाठी म्हणून उतरले. त्यांचे चित्त मात्र श्री स्वामींच्या दर्शनाच्याच ध्यासाने व्यापले होते. तेव्हढ्यांत त्यांच्या डोक्यावर त्या वटवृक्षाची एक सुकलेली डहाळी पडली. दचकून त्यांनी वर पाहिले तो काय आश्चर्य! श्री स्वामी समर्थ त्या वडाच्या एका फांदीवर बसून खळखळून हास्य करीत होते. त्यांनीच ती सुकलेली डहाळी त्यांच्या मस्तकावर टाकली होती. आनंदातिशयाने धावतच गुरुदास त्या वटवृक्षाजवळ गेले. तोपर्यंत स्वामी महाराजही वडावरून खाली उतरले होते. गुरुदासांनी श्री स्वामी समर्थांना अत्यंत भक्तिभावाने प्रणिपात केला, आपले मस्तक त्यांच्या चरणकमलांवर टेकविले. श्री स्वामींनी त्यांच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवला आणि त्यांना समाधी लागली. अशा रितीने, प्रथम भेटीतच श्री स्वामी समर्थांनी त्यांच्यावर अनुग्रह केला आणि कृपांकित केले. काही दिवस, समर्थांच्या सान्निध्यांत राहून गुरुदास आपल्या घरी परतले आणि प्रपंचातील त्यांचे ध्यान उडाले. ते सदा सर्वदा स्वामींच्या ध्यानांत मग्न राहू लागले. त्यानंतर, पुढील सहा वर्ष ते नित्य श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास जाऊन त्यांची सेवा करू लागले. श्री स्वामींवरील त्यांची श्रद्धा आणि भक्ती वृद्धिगंत होऊन ते 'गुरुदासा' चे 'आनंदनाथ' झाले. श्री स्वामींची स्तवनगाथा, अभंग, स्तोत्र असे प्रासादिक वाङ्मय आनंदनाथ महाराजांनी स्वामीकृपेनें रचले. एकदा आनंदनाथ महाराजांनी श्री स्वामींना, 'आपणांस कृपाप्रसाद द्यावा.' अशी प्रार्थना केली असता, प्रसन्न होऊन श्री स्वामी समर्थांनी आपल्या मुखातून आत्मपादुका काढून त्यांना दिल्या आणि आपली कार्यध्वजा उभारण्यास सांगितले. श्री स्वामी समर्थांच्या त्या आत्मपादुका घेऊन आनंदनाथ महाराज नाशिक जिल्ह्यांतील सावरगाव येथे वास्तव्यास आले आणि तेथेच त्यांनी आपल्या या आराध्यदेवतेचा मठ स्थापन केला. काही काळानंतर त्या मठाची धुरा एका भक्ताकडे सोपवून आनंदनाथ महाराज श्री नृसिंहवाडी इथे काही काळ आराधना करीत राहिले. त्यानंतर बेळगांवला जाऊन सावंतवाडी तालुक्यांतील होडावडे या गांवी आले. त्या ग्रामींच एका औदुंबराखाली त्यांनी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांच्या पादुका स्थापन केल्या. कालांतराने, तिथेच श्री स्वामींचा मठही उभा राहिला. त्यानंतर, वेंगुर्ल्याजवळ धावडे या गांवी तिसरा मठ स्थापन केला. श्री स्वामी समर्थांनी प्रसाद म्हणून दिलेल्या त्या दिव्य आत्मपादुका ( आत्मलिंग ) आजही या मठांत नित्यपूजेत आहे. तसेच, स्वामीभक्त दर गुरुवारी त्यांचा दर्शन लाभही घेऊ शकतात. श्री स्वामी समर्थांच्या समाधी नंतरही पंचवीस वर्षांहून अधिक काळ आनंदनाथ महाराजांनी स्वामीभक्ती प्रसाराचे कार्य चालू ठेवले होते. ते ऐश्वर्यसंपन्न होते. त्यांच्या श्रीमंतीच्या थाटाचे काय वर्णन करावें ? ते घोड्यावरून फिरत असत. श्री दत्तजयंती आदी उत्सवांस सहस्त्रभोजन, अमाप दान-दक्षिणा करीत असत. मात्र त्यांची वृत्ती विरक्त होती. शिर्डीवासी श्री साईनाथांचे माहात्म्य यांनीच प्रथम सर्वांस कथन केले. १९०३ साली आनंदनाथ महाराजांनी 'संजीवन समाधी' घेतली आणि ते श्री स्वामी चरणीं लीन झाले. श्री आनंदमहाराजकृत 'श्रीगुरुस्तवन स्तोत्र' ( कामधेनू स्तोत्र ) हे स्वामीभक्तांच्या नित्यपठणांत असते. या दिव्य स्तोत्राचे चिंतन आणि मननाचा हा अल्प प्रयास आपण पुढील काही लेखांमधून करणार आहोत.
॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
क्रमश:
No comments:
Post a Comment