॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥
॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥
ऐसा तू बा अपरंपारू । या अनंत ब्रह्माचा आधारू । चराचरीचा आकारू । पूर्णाधारू म्हणविले ॥६॥ असा तुझा महिमा अपरंपार आहे. हे गुरुराया, तूच या अनंत ब्रह्मांडाचा आधारभूत होऊन राहिलेला आहेस. विश्वापेक्षाही ब्रह्मांडाची संकल्पना फार विशाल आहे. वेदशास्त्रांनुसार, ब्रह्मांडात कृतक लोक, महर्लोक आणि अकृतक लोक हे तीन लोक असतात. कृतक लोकात भूलोक, भूवर्लोक, स्वर्लोक यांचा समावेश होतो. तर, जनलोक, तपोलोक, सत्यलोक यांच्या समूहास अकृतक लोक म्हणतात. नऊ खंड व सप्त द्वीपांनी युक्त अशी ही पृथ्वी, सप्त पाताळें, आणि भू:, भुवः आदि सप्त स्वर्ग या सर्वांना निर्माण करणारे हिरण्यगर्भांड अथवा ब्रह्मांड आहे. या सर्व ब्रह्मांडाचे तूच अधिष्ठान आहे. अशाप्रकारे, तूच तर या संपूर्ण चराचराला व्यापून राहतोस. तूच तर या सर्वांचा सांभाळ करतोस. यास्तव, तुला पूर्णाधार म्हणतात.
ऐशा तुजप्रती । स्तवावया अल्प माझी मती । तू जाणसि हे चित्ती । विश्वव्यापक म्हणवूनी ॥७॥ आम्हां सामान्य मनुष्यांच्या आकलन शक्तीच्या पलीकडे असलेले हे तुझे निरामय, शुद्ध चैतन्य, अगोचर स्वरूप आहे. त्या रूपाचे वर्णन करण्याची माझ्यासारख्या अज्ञानी, पामराची गती नाही. हे समर्था, तू सर्वांच्या अंतरात्म्यांत वास करणारा विश्वव्यापक आहेस. अर्थातच, ह्या सीमित बुद्धीमुळे ' नेति नेति शब्द, न ये अनुमाना ' अशी माझी झालेली अवस्था तू जाणतोसच. तरी देवा मतिदान । देणे तुजचि कारण । जरी करणे समाधान । तरी दातृत्वपूर्ण ब्रीद बोलिले ॥८॥ तरी हे मायाध्यक्षा, तू मायेचे हे पटल दूर करून 'स्व' स्वरूपाचे ज्ञान होईल, अशी मला सुबुद्धी दे. हे केवळ तूच करू शकतोस. तुझ्या प्रकृतीच्या अर्थात मायेच्या भ्रमात आम्हा अजाण बालकांना गुंतवू नकोस. भक्तवत्सल, भक्ताभिमानी हे तुझे ब्रीद आहे. ' मला अनन्यभावानें शरण आलेल्यांचा मी उद्धार करणारच.' अशी तुझी प्रतिज्ञा आहे. हे ध्यानात आणून, आता मला योग्य तो बोध कर आणि अद्वैताची अनुभूती दे. ह्या तुझ्या भवतारक चरणद्वयीं माझी बुद्धी अखंड स्थिर राहू दे, हीच प्रार्थना ! अहा जी निर्गुणा । विश्वव्यापक सगुणा । सत्य निराकार निरंजना । भक्तांकारणे प्रगटलासी ॥९॥ हे गुरुराया, तुझे परब्रह्मस्वरूप निर्गुण, निराकार, आणि अनंत आहे. या सृष्टीच्या आरंभाच्याही आधीपासून अस्तित्वात असलेले तूच विमल, शब्दातीत, अवर्णनीय असे परमात्मा तत्व स्वरूप आहेस. अज्ञान, विकार, माया आदिंच्या पलीकडे असलेले तूच पूर्ण सत्य आहेस. संपूर्ण विश्वाला तू व्यापले असून सर्व जीवमात्रांत तुझाच अंश आहे. मुमुक्षु जीवांचा उद्धार करण्यासाठीच तू सगुण रूप धारण करतोस. सगुणाची उपासना करणे सहज शक्य असते. जे रूप डोळ्यांना दिसते, ज्या ठिकाणी मन एकाग्र करून पूजन करता येते, ध्यान करता येते तेच सगुण, साकार होय. वर्षानुवर्षे सगुणाचे असे चिंतन झाले की निर्गुणाची संकल्पना ध्यानांत येते. यासाठीच हे गुरुतत्त्व सगुण रूपांत अवतरित झाले आहे. रूप पहाता मनोहर । मूर्ति केवळ दिगंबर । कोटी मदन तेज निर्धार । ज्याच्या स्वरूपी नटले ॥१०॥ तुझे हे रूप अतिशय लोभस आहे, मनास सुखकारक असे आहे. तुलाच दिगंबर म्हणजेच दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे, असेही म्हणतात. दिशा जशा सर्वव्यापक असतात, त्यांना सीमा नसते, तसेच श्री स्वामींनीदेखील आपल्या चैतन्यरूपाने या सर्व विश्वाला व्यापून टाकले आहे. तुझे हे स्वरूप पाहताच जणू कोटी मदनांचे तेज एकत्र करून ही दिव्य मूर्ती घडविली आहे, असेच वाटते. अतिशय आल्हाददायक अशा तुझ्या रूपाचे वर्णन करणे सर्वथा अशक्य आणि अनाकलनीय आहे, हेच खरे !
॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
क्रमश:
No comments:
Post a Comment