Aug 3, 2021

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी ११ ते १५


॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

श्री आनंदनाथ महाराजाय नमः

कर्ण कुंडलाकृती । वदन पाहता सुहास्य मूर्ति । भ्रुकुटी पहाता मना वेधती । भक्त भाविकांचे ॥११॥
प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले श्री स्वामी समर्थ यांचे स्वरूप अवर्णनीय आहे. त्यांच्या केवळ दर्शनाने भक्तांना अनिर्वचनीय असा आनंद होतो. आश्वासक, मंद सुहास्य असलेले त्यांचे वदन पाहताच भाविकांचे भान हरपते. मंगलमूर्तीप्रमाणे कुंडलाकृती विशाल कान, कोरीव भुवया आणि प्रेमळ तरीही तेजस्वी नजर असे हे परब्रह्म चैतन्य पाहता क्षणीच कोणाचे चित्त आकर्षित होणार नाही ?
भोवयांचा आकारू । जेथे भुले धनुर्धरु । ऐसे रूप निर्धारु । नाही नाही जगत्रयी ॥१२॥ सरळ दंड जानु प्रमाण । आजानुबाहु कर जाण । जो भक्तां वरद पूर्ण । ज्याचे स्मरणे भवनाश ॥१३॥
श्री स्वामी समर्थांच्या भुवयांचा आकार एखाद्या धनुष्याप्रमाणे कोरीवाकृती होता. त्यांच्यासारखे रेखीव, तेजस्वी रूप सर्व त्रैलोक्यांत इतरत्र कुठेही आढळणार नाही. श्री स्वामींची उंची सहा फुटांपेक्षाही अधिक होती. केळीच्या खांबासारखे सरळ लांब पाय, गुढघ्यापर्यंत पोहोचणारे लांब आजानुबाहु हात अशा अनेक दैवी लक्षणांनी युक्त अशी त्यांची तनु पाहताच भक्तांची दृष्टी खिळून राहत असे. सिद्ध किंवा अवतारी पुरुषांची जी शुभ लक्षणे वेदश्रुतींनी वर्णिलेली आहेत, ती सर्व स्वामी समर्थांच्या ठायीं होती. असा आपला हा वरदहस्त ते नेहेमीच भक्तांच्या मस्तकीं ठेवीत असत. गुडघ्यापर्यंत लांब असे हे हात सर्वव्यापकताही दर्शवतात. संपूर्ण स्थावर-जंगम अशा चराचराला व्यापून राहिलेल्या स्वामींचे हात भक्तांच्या उद्धारासाठी, रक्षणासाठी कोठेही पोहोचू शकतात. भक्तांनी केवळ स्मरण केले असता प्रगट होणारे, भक्तांसाठी धावत येणारे असे हे स्मर्तृगामी अवधूत आहेत. त्यांचे केवळ नाम घेतले असता या संसारतापापासून आपली सुटका होते.
ऐसा तू परात्परु । परमहंस स्वरूप सद्गुरू । मज दावुनि ब्रह्म चराचरू । बोलविला आधारू जगतासी ॥१४॥
असा तू परात्परू म्हणजेच परमात्मा, ईश्वर आहेस. तूच परमहंसरूपी सद्गुरू आहे. परमहंस ही एक योगमार्गातील सर्वोच्च अवस्था आहे. अशी अवधूत संन्यासावस्था प्राप्त करणारा महायोगीपुरुष गुणातीत तर असतोच, त्याच्या स्वरूपाचे वर्णन करणेदेखील शब्दातीत असते. हे प्रभो, सकल जीवांच्या उद्धारासाठी सदेह रूप धारण केलेले तू परब्रह्म चैतन्य आहेस. नाम, रूप, आकृती, स्थावर-जंगमादि सृष्टीमध्यें तूच अष्टधा प्रकृतीने नटलेला आहेस. या सकल ब्रह्मांडामध्ये तूच भरून राहिला आहेस. या सर्व जगताचा आधार आणि आश्रयदेखील तूच आहेस. तुझ्या या 'स्व' रूपाचे ज्ञान आणि दर्शन होताच स्वानंदरसाची तृप्ती अनुभवता येते. हे समर्था, माझ्यावर हा कृपानुग्रह करून या जगाच्या कल्याणासाठीच तू हे स्तवन रचण्याची मला प्रेरणा दिली.
ऐशा तुज स्तवुनी । मौन्य पावले सहस्त्रफणी । वेद श्वान होऊनी । सदा द्वारी तिष्ठती ॥१५॥
पुराणादिकांत कथन केल्यानुसार, आपल्या सहस्त्रमुखांनी स्तुती करण्यासाठी जो विशेष प्रसिद्ध आहे असा शेषही तुझे वर्णन न करू शकल्याने मौन झाला. हे गुरुराया, अगम्य असा तुझा महिमा गातांना जिथे वेदांनीही ' नेति नेति 'म्हणजे न-इती म्हणत गर्जून हात टेकले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या चार मुख्य वेदांमध्ये या सृष्टीच्या सूत्रांचे धर्मविषयक नियम विस्तारपूर्वक सांगितलेले आहेत. असे हे शुद्ध ज्ञानाने परिपूर्ण वेददेखील, श्वानरूप धारण करून तुझ्या द्वारी तिष्ठत उभे असतात. मग, मन-बुद्धी-वाचा यांना अगोचर असलेल्या या परमेश्वरी तत्त्वाचे वर्णन आम्ही अज्ञानी बालकांनी कसे करावे बरें ?

॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

क्रमश:


No comments:

Post a Comment