Aug 16, 2021

स्वामीन् नमस्ते अक्कलकोटवासिन् - १


॥ श्री गणेशाय नम: श्री सरस्वत्यै नम: ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

॥ ध्यानम् ॥
अजानुबाहु विशाल नेत्रम् । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम् ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥

दत्तभक्तहो, अनेक वाचकांनी श्री स्वामी चरित्र, त्यांच्या लीला याविषयीं लिहिण्याबद्दल सूचना/अभिप्राय पाठवले. तसे पाहतां, या अक्कलकोटनिवासी अवतारी पुरुषाच्या चरित्रावर आधारित श्रीगुरुलीलामृत, श्री स्वामी समर्थ सारामृत, श्री स्वामी समर्थ बखर, श्री स्वामी समर्थ गुरुकथामृत, श्री स्वामी समर्थ सप्तशती असे अनेक सिद्ध ग्रंथ रचले आहेत. तरीही, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अफाट चरित्र सागरांतून अनेक अमौलिक रत्ने, त्यांच्या काही लीला, स्वामीभक्तांना आलेल्या अनुभूती भक्तजनांपुढे मांडण्यासाठी एक उपक्रम घेऊन येत आहोत.
स्वामीभक्तहो, आपणही या उपक्रमात सहभागी होऊ शकता. करायचे एव्हढेच आहे की आपण आपली आवडती श्री स्वामी चरित्र कथा, लीला, बोधकथा आम्हांस ' संपर्क ' वापरून अथवा Email Us इथे कळवावी. आम्ही तुमचा नामनिर्देश करून त्या प्रकाशित करू. जेणे करून सर्व श्री स्वामी भक्तांना त्याचा लाभ होईल. महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

जास्तीत जास्त भाविकांना हे श्री स्वामी चरित्र वाचता यावे, श्री स्वामी/दत्तभक्तीचा प्रसार व्हावा आणि स्वामींच्या लीलांचे मनन करीत आपण सर्वजण स्वामीकृपेत रंगून जावे, केवळ हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.  

काष्ठावर पादुका उमटल्या !
चिंतोपंत टोळ स्वामी समर्थांचे एकनिष्ठ भक्त बनले होते. श्रीसमर्थ म्हणजे साक्षात दत्तप्रभू अशा भावनेनेच त्यांची सेवा चालली होती. एकदा चिंतोपंतांनी आपल्या पूजेतील श्रीविष्णूमूर्तीला एक कोटी तुलसीपत्रे वाहण्याचा संकल्प केला. त्याचप्रमाणे ते दररोज नेमाने तुलसीपत्रे वाहत होते. केव्हा केव्हा श्रीसमर्थ पूजेच्या वेळी टोळाच्या घरी येत. त्यावेळी टोळ प्रसन्न चित्ताने भक्तिपूर्वक त्यांचीही पूजा करीत व त्यांच्या चरणी तुलसीपत्रे वाहून त्यांच्या चरणावर लोटांगण घालीत. एक दिवस श्रीसमर्थांची स्वारी अशीच पूजेच्या वेळी दत्त म्हणून टोळाच्या घरी उपस्थित झाली. टोळांनी त्यांची यथासांग पूजा केली. धूप-दीप-नैवेद्य दाखविला व त्यांच्या चरण कमलावर पवित्र तुलसीपत्रे वाहिली. त्या दिवशी श्रीसमर्थांची स्वारी विशेषच प्रसन्न दिसत होती. त्यांच्या तेजोमय मुखमंडलाभोवती चांदण्यासारखे आल्हादक आणि शांत तेज पसरलेले दिसत होते. पाद्यपूजा आटोपल्यावर चिंतोपंत डोळ्यात आसवे आणून म्हणाले, " महाराज, आपले परमपवित्र चरण पूजेसाठी निरंतर सन्निध असावेत अशी इच्छा आहे. " श्रीसमर्थ पाटावरून उठत म्हणाले, " ठीक आहे, तुझी मनोकामना पूर्ण होईल. " एवढे आश्वासन देऊन समर्थ निघून गेले. काही वेळाने चिंतोपंत पाटावर पाहतात तो पाटावर समर्थांचे दोन्ही चरण उमटलेले ! त्या अदभुत चमत्कार पाहून चिंतोपंतांना विलक्षण आश्चर्य वाटले व त्यांनी त्या चैतन्यमय पादुकांवर डोके ठेऊन त्यावर प्रेमाश्रूंचा अभिषेक केला. कुशल कारागीर अनेक हत्यारे उपयोगात आणून काष्ठावर कोरीव काम करतो; परंतु श्री समर्थांना हत्यारांची काय आवश्यकता ? संकल्प हेच त्यांचे हत्यार ! हल्ली सदरच्या प्रासादिक पादुका ज्या पाटावर उमटल्या आहेत, तो पाट अक्कलकोटास जोशीबुवांच्या मठात आहे.
|| श्री स्वामी समर्थ || || श्री गुरुदेव दत्त ||

सौजन्य- ll श्री अक्कलकोट स्वामी चरित्र ll लेखक- वि.के.फडके

No comments:

Post a Comment