Aug 26, 2021

श्रीस्वामी समर्थ गुरूकथामृत - अध्याय ८


॥ श्रीगणेशाय नम:। श्रीसरस्वत्यै नम: । श्रीलक्ष्मीनृसिंहाय नम: । नारायण नमोस्तुते ॥१॥ मागील अध्यायीं वाचले । रावजीस आशीर्वाद दिधले । गोमती तीर्थ माहात्म्य कथिले । आणि निघाले तीर्थाटणा ॥२॥ नृसिंहस्वामी विश्वसंचारी । उद्धारास्तव तयांची फेरी । द्दश्याद्दश्य विश्वांतरी । प्रकट होती अकस्मात ॥३॥ निज भक्तांच्या आग्रहे कथिती । दत्तगुरुंची दिव्य महती । कमंडलू तीर्थाची महती । स्वामी वर्णिती सप्रेमे ॥४॥ कमंडलू या तीर्थावरी । दत्तगुरुंची वसे स्वारी । प्रल्हाद आणि अलर्कावरी । ज्ञान देऊनी करिती कृपा ॥५॥ गोरक्ष, मत्स्येंद्र आदि सारे । सिद्वपुरुषा निर्मिले खरे । प्रत्यक्ष परब्रह्म गुरुवरे । सिद्ध जाणती आत्मरुपा ॥६॥ नृसिंहस्वामी भक्तांसि वदती । कठिण कलियुगीं हो सांप्रती । दत्तात्रेय दर्शनास्तव करिती । नाना साधने भक्तजन ॥७॥ करीती कोणी अखंड जप । गुरुचरित्र पारायणे खूप । दत्तदर्शना अत्युग्र तप । करिती कुणी गिरिकंदरीं ॥८॥ वृक्षासि उलटे कुणी टांगुनी । बाहुद्वय ते उभारोनी । भूमीस एक तो पद ठेवुनी । घोर तपासी आचरती ॥९॥ वाढवोनी कोणी जटा । फासोनि रक्षा, करीं लोटा । कुणी घेती त्रिशूळ, चिमटा । अलख निरंजन वदती मुखे ॥१०॥ कटिस वेलिचा करदोटा । कसोनि हिंडती लंगोटा । जटाभार तो शिरी मोठा । जय दत्तदिगंबर गर्जती ॥११॥ लोहकंटक आसनावरी । राहती पडोनी ते दिनभरी । रुद्राक्षमाळा अंगावरी । धारण करोनी फिरती जगीं ॥१२॥ कांहीं वर्तस्थ ते राहती । कुणी पक्के मौन धरिती । कुणी गर्जना सदा करिती । गुरुदेव दत्त म्हणोनिया ॥१३॥ सभोवताली लावुनी धुनी । मग्न होती उग्र साधनी । प्रखर अग्नीवरि चालुनी । दाविती करितो घोर तप ॥१४॥ तपाचरणे किरकोळ सिद्धी । भविष्यकथने हो प्रसिद्धी । जडीबुटीची अल्प बुद्धी । सांगती जनां ही दत्तकृपा ॥१५॥ यात्रा करिती चारही धाम । अन्नोदकस्तव श्रीमंत ग्राम । निवडुनी साधिती आपुले काम । सांगती लोकां दत्तकृपा ॥१६॥ करोनिया नित्य मुंडण । कौपिन आणि कफनी घालुन । करी कटोरा तो घेऊन । भिक्षांदेही करिती सदा ॥१७॥ किमया थोडी साध्य करिती । दत्तकृपा ती हीच म्हणती । ब्रह्मज्ञान जनां वदती । मानिती आपणां वेदान्ती ॥१८॥ असे मी मोठा तपाचरणी । नसावी अशी विचारसरणी । अखंड असावी नम्र वाणी । मनीं असावे दत्तप्रेम ॥१९॥ देव घेई सेवा करोनी । हेचि माझे भाग्य मानुनी । जपतप करितो मी मी म्हणूनी । ऐसा नसावा अहंकार ॥२०॥ जडदेहरुप देवदर्शन । कलियुगीं या अशक्य म्हणून । संत-महंत होऊन । ईश्वर नांदे पृथ्वीवरी ॥२१॥ सर्वाअंतरीं एक परमात्मा । परदुःखाने तळमळे आत्मा । जयाचा त्यासी वदती महात्मा । सकल शास्त्रे वर्णिती ॥२२॥ दत्तगुरुंचा सत्य अवतार । नृसिंहस्वामी अवनीवर । जैशी जयाची इच्छा अपार । दर्शन देती त्या रुपे ॥२३॥ जाया पुढे उद्युक्त होती । हनुमंतधारी तीर्थावरती । भक्तजनांच्या आग्रहे करिती । वसती पवित्र क्षेत्रासी ॥२४॥ देखतां तेथली बजरंग मूर्ती । संतोषले अत्यंत चित्तीं । वाट तेथली सानुली ती । भोंवती दाटले अरण्य ते ॥२५॥ वनीं दरवळे पुष्पगंध । समीर वाहे मंद मंद । पक्षीगायनें रान धुंद । स्थान रमणीय वाटले ॥२६॥ पादचारी भक्त कित्येक । विरगी, तपस्वी, साधुलोक । भीमदर्शनें निमाली भूक । तृप्त मानस जाहले ॥२७॥ अनेक साधू संत तपती । स्वामी पाहता हर्ष चित्तीं । घालोनि दंडवत तयां नमिती । धन्य जाहले तद्‌दर्शने ॥२८॥ साष्टांग नमनांचा सोहळा । दुरोनि पाही एक पांगळा । हर्ष जाहला त्या आगळा । वाटे जावोनि वंदावे ॥२९॥ दुर्दैवी त्या पांगळयासी । जागेवरोनी उठायासी । नसे शक्यता म्हणोनि श्रींसी । प्रार्थना करी करुणा करा ॥३०॥ जन्मसिद्धहो मी पांगळा । पडलो इथे होऊनी गोळा । अन्नोदकही न मिळे वेळा । ऐसा असे मी हतभागी ॥३१॥ सर्वही जन वंदिती पाय । पांगळ्या वाटे हाय हाय । उठायाची शक्ति ना सोय । अरेरे! केवढा करंटा मी ॥३२॥ पातके केली काय न कळे । उठो जाता बळे बळे । देह भूमींवर कोसळे । स्वामी सेवा कैशी करु ॥३३॥ आर्त होउनी निज अंतरीं । करी आक्रंदन धावा हरी । तुम्हाविण प्रभू मला तारी । कोण त्रिभुवनीं समर्थ हो ॥३४॥ पामराचा न बघा अंत । दुर्बलाते वाचवा तात । नातरी माझा जन्म गर्तेत । जाईल ऐसे न घडावे ॥३५॥ आक्रंदता तो कंठ फुटला । आसवें नेत्रीं ती घळघळा । दया न केलिया अशा वेळा । प्राणार्पण करीन मी ॥३६॥ जाणुनी तयाची ती तळमळ । द्रवलें यतीचे ह्रदयकमळ । हांक मारिती अति प्रेमळ । ये ये उठोनी मजपाशी ॥३७॥ तव तो कर जोडुनी । उठवेना मातें स्थलावरुनी । सांगता कैसे ये ये म्हणुनी । चेष्टा न करा गरिबाची ॥३८॥ टवाळ, निंदक भोंवताली । वदती पांगळ्या बैसे स्थली । उठो जाता पडशील खाली । आणखी संकटीं पडशील ॥३९॥ जोगी यासम रे अनेक । नादी लाविती व्याकूळ लोक । चेटूक करिता, भुलताति लोक । फसता पस्तावती जन ॥४०॥ उठता उठता भूमीस पडता । रक्तबंबाळ होशील पुरता । घेशील करुनी घात नसता । ऐके आमुचा उपदेश ॥४१॥ स्वामी उच्च स्वरे वदती । अरे उठाया विलंब किती । संशय धरु नको चित्तीं । अल्प प्रयत्ने उठशील ॥४२॥ प्रयत्न करिता तो उठाया । तया हांसती बुवा, बाया । तोंचि पांगळा निघे जाया । आपुल्या यत्नें स्वामींकडे ॥४३॥ स्वामी सन्निध येतां स्वये । कवटाळिले चरणां तये । वाचवी मज गे माये । अश्रूंनी न्हाणिले चरणद्वय ॥४४॥ स्वामी तयासी गोंजारिती । न धरी कसली आतां भीती । कृपा केली रे तुजवरती । चिंता अंतरीं न करावी ॥४५॥ धावा ऐकता हदय द्रवले । पाहिजे पामरा उद्धरिले । विश्वासाचे फळ हे मिळे । ऐसे हवेति विश्वासू ॥४६॥ पांगळ्या पायावरी हात । फिरविता राहिला उभा ताठ । ऐसा न पाहिला कधीं संत । उभ्या जन्मांत मी कधी ॥४७॥ तयाची देखता उत्तम स्थिती । भयग्रस्त ते टवाळ होती । अरे हा ईश्वर ऐशी मती । जाहली तेधवा टवाळांची ॥४८॥ व्यर्थ निंदिले आपण अती । आम्ही न जाणिली योग्यता ती । क्षमा असावी आम्हांप्रती । साष्टांग नमने प्रार्थिती ॥४९॥ पश्चात्ताप पावतां जन । यतींचे जाहले मन प्रसन्न । निश्चिंत असणे हो आपण । कल्याण होईल सर्वांचे ॥५०॥ नेम सर्वानी पाळावे । संत-महंत न निंदावे । पारखोनी मात्र घ्यावे । संत-असंता दोघांही ॥५१॥ स्वर्ण समजुनी धरिता व्याळ । घात तेणेचि होय सकळ । सावध असणे सर्व काळ । साधाल तेणे निज हिता ॥५२॥ दिसते तैसे कदा नसते । हे न जाणल्या सदा फसते । सावध राहोनि वर्तवेते । आपुले हित साधाया ॥५३॥ हिरा म्हणोनी कांच वरिता । फसल्यावरी पस्तावता । विचारपूर्वक परीक्षा करिता । दुःख बाधेल ना कदा ॥५४॥ ऐसा यतींचा हितोपदेश । संतोषले जन विशेष । धर्मात्मा किंवा हा जगदीश । प्रकटला जणू स्थलासी या ॥५५॥ अवलोकिता साधुची शक्ती । करु लागले लोक भक्ती । दत्तावतार ही पवित्र उक्ती । मान्य जाहली सर्वासी ॥५६॥ गर्भांधासी दिली दृष्टी । पांगळ्यासी निकोप यष्टी । हर्ष पावले पूर्वीचे कष्टी । सामर्थ्य ऐसे स्वामींचे ॥५७॥ मूकांसि देती दिव्य वाणी । प्रकटे मुखीं वेदवाणी । ऐसे सामर्थ्य चक्रपाणी । तुमचे नृसिंहयतीश्वरा ॥५८॥ अनेक संत आले नि गेले । तयांचे म्या चरण धुतले । पंगुत्व परि ना लया नेले । एकाही साधु-संतानी ॥५९॥ कोणत्या जन्मीचा मला न कळे । पुण्यांश ठेवा मी दुर्बळे । होता ठेविला, तोंच कीं फळे । लाभती मातें श्रीचरण ॥६०॥ वर्णील आपणां असा ज्ञानी । सांप्रत मज ना दिसे कोणी । जिथे श्रमलिसे वेदवाणी । तिथे मज मतिमंदा बळ कोठचे ॥६१॥ पांगळा नामे गणेशपुरी । वदे समर्था परोपरी । आज आपुला मी श्रीहरी । ऋणी असे की चरणांचा ॥६२॥ चंचलभारती आनंदगिरी । सवे श्रीस्वामींची असे स्वारी । तयां संगे तो गणेशपुरी । गिरिवरी चढला लीलेने ॥६३॥ कृष्णानंद श्रीसरस्वती । रामपर्वत विश्वानंद यती । हेही असती त्यां संगती । पवित्र पर्वत चढावया ॥६४॥ जातां चढोनी तिथे बघती । बजरंगबलीची दिव्य मूर्ती । गणेशपुरीसह सर्व करिती । साष्टांग दंडवत बजरंगा ॥६५॥ कमंडलुतीर्थ ते नजिक । शोभा तेथली हर्षदायक । धर्मकर्मादि जन अनेक । करिती पावन व्हावया ॥६६॥ गिरनार नामे पर्वतावरी । असती अत्यंत उच्च शिखरी । दत्तात्रेयांच्या पादुका परी । स्वयंभू असती तेथे कीं ॥६७॥ तयांचे घेतां कीं दर्शन । पावन होती पापी जन । अपूर्व ऐसे ते महिमान । संत तेथील वर्णिती ॥६८॥ मूर्ती सिद्धिविनायकाची । मनोहर ती दिसे साची । दर्शन घडतां परमसुखाची । प्राप्ती होतसे तात्काळ ॥६९॥ मंदिरीं घंटानाद करितां । दिव्य आनंद हो चित्ता । भक्तांची ती भक्त्युत्कटता । उचंबळे कीं अनिवार ॥७०॥ जय जयदेवा श्रीगणेशा । तोडी आमुच्या मोहपाशा । अज्ञानाची हरुनी निशा । ज्ञान प्रकाशे उद्धरी गा ॥७१॥ स्वामी स्वये विश्वंभर । असतां परिवाराबरोबर । कासया प्रार्थना प्रभुसमोर । शंका मानसीं उपजेल ॥७२॥ प्रार्थना, सेवा वारंवार । व्हावया खरा आत्मोद्धार । अध्यात्ममार्गीं यत्न थोर । केलेचि पाहिजे भक्तांनी ॥७३॥ भक्तजनांसी ज्ञान द्याया । तत्वज्ञान मनीं ठसाया । भक्तकल्याण साधाया । स्वामी योजितो उपायांसी ॥७४॥ पवित्रस्थानी शिष्यांसवे । हिंडुनी देती अनुभव नवे । अद्‍भुत अनुभव घ्याया हवे । नित्य नूतन हिंडोनी ॥७५॥ अनुभवाविणे शब्दज्ञान । मना न देई समाधान । स्वामी समर्था शरण रिघुन । प्राप्त करोनि घ्यावे ते ॥७६॥ असो, ऐका पुढील कथन । वंदोनिया स्वामीचरण । पुढे निघाले जगज्जीवन । सवे घेऊनी अनुयायी ॥७७॥ गोमुख तीर्थासि ते आले । जगदंबेचे पद वंदिले । माता भवानी त्यांसि बोले । स्वामी समर्था इकडे कुठे ॥७८॥ सगुण रुप हे परब्रह्म । प्रत्यक्ष देखतां आज परम । हर्ष जाहला मज अनुपम । आदिमाये तुज देखतां ॥७९॥ सुहास्य वदने वदे माता । आता पुढे कुठे जाता । करित चाललो तीर्थयात्रा । सवें घेऊनी अनुयायी ॥८०॥ महन्मंगला जगदंबेसी । सांगोनि वदती निज शिष्यांसी । चलावे पुढे तीर्थाटनांसी । विविध ऐशा पावन स्थली ॥८१॥ गोरक्षनाथ ते महासिद्ध । अवघड नाथही अति प्रसिद्ध । आलिंगनीं स्वामीस बद्ध । केले तयें सत्प्रेमे ॥८२॥ अवर्ननीय कीं तयांची भेट । प्रेमोर्मींचा अपूर्व थाट । वर्णील ऐसा कोण भाट । शेषासही ते शक्य नसे ॥८३॥ समर्थचरणीं लोटांगण । घालुनी उभे कर जोडुन । गुह्याति गुह्य ते ज्ञान सांगुन । समर्थ घेती निरोपासी ॥८४॥ कमंडलू या तीर्थासमीप । देखता तयाचें प्रसन्न रुप । सर्वास जाहला हर्ष अमूप । त्रिकाल करिती स्नान तिथे ॥८५॥ पुष्पलतांनी वन दाटले । फळभारांनी वृक्ष लवले । पक्षीगण गायनीं रमले । दृश्य मनोहर स्वर्गीय ॥८६॥ अमृताहुनी मधुर अती । कमंडलू तीर्थाचे जल प्राशिती । तेणे तृषार्त तृप्त होती । वानिती त्या जलाशया ॥८७॥ वन्यफुलांचा दरवळे गंध । निर्झर धावती ते स्वच्छंद । खळखळ नादे होय धुंद । वनश्री ती सर्वही ॥८८॥ आजूबाजूस भव्य पर्वत । विलोकितां हो चित्त तृप्त । क्रीडती वनचरें तीं सर्वत्र । ऐसी नटली वनश्री ती ॥८९॥ गिरनार पर्वता महत्त्व थोर । महंत योगी, सिद्ध अपार । गुहेंत बसुनी साधने घोर । वर्षानुवर्षे करिताती ॥९०॥ इष्ट प्राप्तीचे समाधान । न मिळे म्हणोनी ऋषी खिन्न । गुहेंत होतां स्वामीदर्शन । ऋषीगण सारा आनंदला ॥९१॥ अहाहा! दयाळा श्रीसमर्था । आज लाधली कृतार्थता । दिव्य आपुला कर ठेविता । आपण आमुच्या मस्तकावरी ॥९२॥ विश्वव्यापका विश्वेश्वरा । द्यावा आम्हा निज आसरा । दिव्य स्वरुपी परमेश्वरा । गुहेंत वर्तणे आम्हा सवे ॥९३॥ परंतु स्वामी तयां वदती । जरा न वाटो मना खंती । सदैव आमुची असे प्रीती । सर्वांवरी हो सुनिश्चित ॥९४॥ अडल्या-नडल्या उद्धराया । जावे लागते अन्य ठाया । प्राप्तव्य त्यांते व्हाया । सांगणे लागते उपायासी ॥९५॥ स्वामी निघती मनोवेगे । ऋषी धांवती तयां मागे । अंतर्धान पावती जागे । कवणांसही ते दिसती ना ॥९६॥ समर्थ स्वामी कुठे जाती । जाणावया ते आतुर अति । श्रोतियांची मनोस्थिती । जाहली असे मी जाणतो ॥९७॥ असा श्रोते सावचित्त । पुढील अध्यायीं कथा स्तुत्य । शंकाकुशंका पावती अस्त । व्हाल वाचिता आनंदी ॥९८॥ इति श्रीस्वामीगुरुकथामृत । त्यांतील अध्याय पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥९९॥ ॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥ सौजन्य : https://www.transliteral.org/


No comments:

Post a Comment