Aug 20, 2021

महर्षी अण्णासाहेब पटवर्धनविरचित श्रीगुरुपासष्टी


दत्तभक्तांसाठी पाचवा वेद असलेला श्री सरस्वती गंगाधर रचित श्री गुरुचरित्र या ग्रंथातील निवडक ६५ ओव्या म्हणजेच श्रीगुरुपासष्टी ! नित्यपठणाने श्री दत्तप्रभूंच्या कृपेची अनुभूती देणाऱ्या या प्रासादिक ओव्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रांत थोर अधिकार असलेले महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी त्या संकलित केल्या आहेत.

श्रीगणेशाय नमः

मुख्य भाव कारण । प्रेमें करितां श्रवण पठण । निजध्यास आणि मनन । प्रेमें करोनि साधिजे ॥१॥ श्रीनृसिंह सरस्वती शंकर । त्याचे चरणीं अर्पण साग्र । त्याचेचि प्रसादें समग्र । समस्त प्रजा सुखी असती ॥२॥ ग्रंथ ठेवावा शुद्ध स्थानीं । शुद्ध वस्त्रीं शुद्ध मनीं । नित्य पूजा करोनि । ग्रंथ गृहामाजीं ठेवावा ॥३॥
हरये नमः । हरये नमः । हरये नमः ।
॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥
॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॥ श्रीनृसिंहसरस्वत्यै नमः ॥

ॐ नमोजी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा । जय जय लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥४॥ हालविशी कर्णयुगुले । तेथूनि जो का वारा उसळे । त्याचेनि वातें विघ्न पळे । विघ्नांतक म्हणती तुज ॥५॥ तुझे शोभे आनन । जैसे तप्त कांचन । किंवा उदित प्रभारमण । तैसें तेज फाकतसे ॥६॥ विघ्नकाननच्छेदनासी । हाती फरश धरिलासी । नागबंद कटीसी । उरग यज्ञोपवीत ॥७॥ चतुर्भुज दिससी निका । विशालाक्षा विनायका । प्रतिपाळिसी विश्वलोका । निर्विघ्नें करूनिया ॥८॥ वत्सालागी धेनु । जैशी ये धावोनु । तैसे श्रीगुरु आपणु । आले जवळी ॥९॥ येतांचि गुरुमुनि । वंदी नामकरणी । मस्तक ठेवोनि । चरणयुग्मी ॥१०॥ केश तो मोकळी । झाडी चरणधुळी । आनंदाश्रुजळी । अंघ्री क्षाळी ॥११॥ ह्रदयमंदिरात । बैसवोनि व्यक्त । पूजा उपचारित । षोडशविधि ॥१२॥ आनंदभरित । झाला नामांकित । ह्रदयी श्रीगुरुनाथ । स्थिरावला ॥१३॥ भक्तांच्या ह्रदयांत । राहे श्रीगुरुनाथ । संतोष बहुत । सरस्वतीसी ॥१४॥
हरये नमः । हरये नमः । हरये नमः ।
प्रसिद्ध होसी वेळ दहा । उपर अवतार पूर्ण पहा । सहज तू विश्वात्मा महा । स्थूळ सूक्ष्मी वससी तू ॥१५॥ भक्ति करावी दृढतर । गंभीरपणे असावे धीर । तरीच उतरिजे पैलपार । इहपरत्री सौख्य पावे ॥१६॥ निजस्वरुप जननीसी । दाविता झाला परियेसीं । श्रीपादश्रीवल्लभ-दत्तात्रेयासी । देखते झाले जनकजननी ॥१७॥ त्रयमूर्तीचा अवतार । झाला नरहरी नर । निजरुपें दिसे कर्पूरगौर । पाहतां नमिलें चरणासी ॥१८॥ ज्ञानमूर्ती श्रीगुरुनाथ । सर्वांच्या मनीचे जाणत । यतीश्वर निंदा आपुली करीत । म्हणोनि ओळखे मानसी ॥१९॥ ज्ञानवंत श्रीगुरुमूर्ति । विश्वाच्या मनीचे ओळखती । नराधिपासी सांगती । निंदा करितो म्हणोनि ॥२०॥ होणार झाली ब्रह्मकरणी । काळासी जिंकिलें नाहीं कोणीं । जैसी ईश्वराची मांडणी । तेणेंपरी होतसे ॥२१॥ ब्रह्मलिखित न चुके जाण । जे जे भोगणे असेल आपण । घडे तैसे श्रुतिवचन । दुःख कोणी करू नये ॥२२॥ हरिश्चंद्र राजा देखा । डोंबाघरी वाहे उदका । बळी अजिंक्य तिही लोका । तोही पाताळा घातला ॥२३॥ सहस्त्रकोटी वर्षें ज्यासी । आयुष्य असे रावणासी । काळ तयाप्रति ग्रासी । दुर्योधना काय झाले ॥२४॥ भीष्म द्रोण इच्छामरणी । तेही पडले रणांगणी । परीक्षिती सर्पाभेणी । लपता काय झाले तया ॥२५॥ अनंत अवतार येणेपरी । होऊनि गेले संसारी । देव दानव येणेपरी । सकळ काळा आधीन ॥२६॥ या कारणें काळासी । कोणी जिंकिले नाही क्षितीसी । सकळ देवदानवांसी । काळ जिंकी निर्धारे ॥२७॥ काळा जिंकिता नाही कोणी । एका श्रीगुरुवाचोनि । भाव असे ज्याचें मनीं । त्यासी प्रत्यक्ष असे जाणा ॥२८॥ शेष म्हणे रे बाळा । तू आहेसी मन निर्मळा । तुमचे घरी सर्वकाळा । दैवत कवण पूजितसा ॥२९॥ ऐसे ऐकोनि राजकुमार । हर्षे जाहला निर्भर । सांगतसे विस्तार । आपुला देव शंकर देखा ॥३०॥ समस्त देवांचा देव । नाम ज्याचे सदाशिव । वामांगी उमा अपूर्व । त्यातें पूजितों निरंतर ॥३१॥ ज्यापासोनि जनिता ब्रह्मा । सृष्टि सृजितो अनुपमा । तो सदाशिव आम्हा । निज दैवत निर्धारें ॥३२॥ तयाच्या सत्त्वगुणे सृष्टीसी । विष्णु उपजला परियेसी । जीव पाळी निश्चयेसी । तो सदाशिव आराधितो ॥३३॥ ज्याच्या तामसगुणे जाण । एकादश रुद्रगण । उपजले प्रलयाकारण । उत्पत्ती स्थिती नाशाते ॥३४॥ धाता विधाता आपण । उत्पत्ति स्थिति लयाकारण । तेजासी तेज असे जाण। तोचि ईश्वर पूजितसों ॥३५॥ पृथ्वी-आप-तेजासी । जो पूर्ण वायु आकाशी । तैसा पूजितसों शिवासी । म्हणे राजकुमार देखा ॥३६॥ सर्वांभूती असे संपूर्ण । चिन्मय आपण निरंजन । जो रूपे असे अचिंतन । तो ईश्वर पूजितसों ॥३७॥ ज्याची कंथा व्याघ्राची । तक्षक शेष कुंडले ज्याची । त्रिनेत्रें सूर्यचंद्राग्नीची । मौळी चंद्र शोभत ॥३८॥ ऐसे ऐकोनि वचन । तक्षक संतोषला अतिगहन । राजकुमारा आलिंगोन । तुष्टलो तुष्टलो म्हणतसे ॥३९॥ ईश्वर म्हणे गिरिजेसी । गुरुभक्ति आहे ऐसी । एकभाव असे ज्यासी । सकळाभीष्‍टें पावती ॥४०॥ भवरूप हा सागर । उतरावया पैल पार । समर्थ असे एक गुरुवर । त्रिमूर्तींचा अवतार ॥४१॥ या कारणें त्रैमूर्ति । गुरुचरणीं भजती । वेदशास्त्रें बोलती । गुरुविणें सिद्धि नाहीं ॥४२॥
श्लोक ॥ यस्य देवे पराभक्तिर्यथा देवे तथा गुरौ । तस्यैते कथिता ह्यर्था: प्रकाशन्ते महात्मनः ॥४३॥
ऐसें ईश्वर पार्वतीसी । सांगता झाला विस्तारेंसी । म्हणोनि श्रीगुरु प्रीतीसी । निरोपिलें द्विजातें ॥४४॥ इतुकें होतां रजनीसी । उदय झाला दिनकरासी । चिंता अंधकारासी । गुरुकृपा ज्योती जाणा ॥४५॥ संतोषोनि द्विजवर । करिता झाला नमस्कार । ऐसी बुद्धि देणार । तूंचि स्वामी कृपानिधि ॥४६॥ नमन करुनि श्रीगुरुसी । विनवीतसे भावेंसी । स्वामी कथा निरोपिलीसी । अपूर्व मातें वाटलें ॥४७॥ काशीयात्राविधान । निरोपिलें मज विस्तारोन । तया वेळीं होतों आपण । तुम्हांसहित तेथेंचि ॥४८॥ पाहिलें आपण दृष्‍टान्तीं । स्वामी काशीपुरीं असती । जागृतीं कीं सुषुप्तीं । न कळे मातें स्वामिया ॥४९॥ म्हणोनि विप्र तये वेळीं । वंदी श्रीगुरुचरणकमळीं । विनवीतसे करुणा बहाळी । भक्तिभावेंकरोनिया ॥५०॥ आतां करीन नेम एक । जंव भेटेल लक्ष्मीनायक । श्रीमदनंत देखेन मुख । तंव अन्नोदक न घेई ॥५१॥ निर्वाण झाला तो ब्राह्मण । त्यजूं पाहे आपुला प्राण । अनंत अनंत म्हणोन । धरणीवरी पडियेला ॥५२॥ इतुकिया अवसरीं । वृद्ध ब्राह्मण वेषधारी । जवळ येवोनि हांक मारी । उठीं उठीं म्हणतसे ॥५३॥ उठ विप्रा काय पुससी । श्रीमदनंत कोठें असें विचारिसी । दाखवीन चल आम्हांसरसीं । म्हणोनि धरिलें उजवें करीं ॥५४॥ उठवूनिया कौंडिण्यासी । घेऊनि जाई गव्हरासी । नगरी पाहे अपूर्व तैसी । महदाश्चर्य पाहतसे ॥५५॥ घेऊनि गेला नगरांत । सिंहासन रत्नखचित । नेऊनि तेथें बैसवीत । आपण दाखवी निजस्वरुप ॥५६॥ रुप देखोनि कौंडिण्य । स्तोत्र करी अतिगहन । चरणीं माथा ठेवून । विनवीतसे कर जोडुनी ॥५७॥
" नमो नमस्ते गोविंदा । श्रीवत्सला सच्चिदानंदा । तुझे स्मरणमात्रें दुःखमदा । हरोनि जातीं सर्व पापें ॥५८॥ तूं वरेण्य यज्ञपुरुष । ब्रह्मा-विष्णु-महेश । तुझे दर्शनमात्रें समस्त दोष । हरोनि जातीं तात्काळीं ॥५९॥ नमो नमस्ते वैकुंठवासी । नारायण लक्ष्मीनिवासी । जगद्व्यापी प्रतिपाळिसी । अनंतकोटि ब्रह्मांडे ॥६०॥ पापी आपण पापकर्मीं । नेणों तुझी भक्ति धर्मीं । पापात्मा पापसंभव अधर्मी । क्षमा करीं गा गोविंदराया ॥६१॥ तुजवांचोनि आपण । अनाथ असें दीन । याचि कारणें धरिले चरण । शरणागत मी तुम्हांसी ॥६२॥ आजि माझा जन्म सफळ । धन्य माझें जिणें सकळ । तुझें देखिलें चरणकमळ । भ्रमर होवोनि वास घेतों " ॥६३॥
ऐसें स्तवितां कौंडिण्य । प्रसन्न झाला लक्ष्मीरमण । भक्तजन चिंतामणिरत्न । वरत्रय देता झाला ॥६४॥ धर्मबुद्धी दारिद्र्यनाश । शाश्वत वैकुंठनिवास । वरत्रय देत हृषीकेश । ऐक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे ॥६५॥
हरये नमः । हरये नमः । हरये नमः ।
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

No comments:

Post a Comment