Aug 30, 2023

अथ श्रीसाईसच्चरिते श्रीसाईमहिमावर्णनं - सार्थ श्री साई रुद्राध्याय (४)



॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ अथ श्रीसाईसच्चरित अध्याय ११ ॥ श्रीसाईमहिमा वर्णनं

(श्रीसाईबाबांच्या प्रभावाचे वर्णन)


असो एकदां साईसमर्था । मेघावरीही जयाची सत्ता । तया इंद्रासी पाहिले प्रार्थितां । आश्चर्य चित्ता दाटलें ॥११४॥ अति भयंकर होता समय । नभ समग्र भरलें तमोमय । पशुपक्षियां उद्भवलें भय । झंजा वायू सुटला ॥११५॥ झाला सूर्यास्त सायंकाळ । उठली एकाएकी वावटळ । सुटला वाऱ्याचा सोसाटा प्रबळ । उडाली खळबळ दुर्धर ॥११६॥ त्यांतचि मेघांचा गडगडाट । विद्युल्लतांचा कडकडाट । वाऱ्याचा भयंकर सोसाट । वर्षाव घनदाट जोराचा ॥११७॥ मेघ वर्षला मुसळधारा । वाजू लागल्या फटफट गारा । ग्रामस्थांसी सुटला भेदरा । गुरांढोरां आकांत ॥११८॥ मशिदीच्या वळचणीखालीं । भणंगभिकारी निवाऱ्या आलीं । गुरेढोरें वासरें एकत्र मिळालीं । भीड झाली मशिदीं ॥११९॥ पाणीच पाणी चौफेर झालें । गवत सारें वाहूनि गेलें । पीकही खळ्यांतील सर्व भिजलें । लोक गजबजले मानसीं ॥१२०॥ अवघे ग्रामस्थ घाबरले । सभामंडपी येऊनि भरले । कोणी मशिदीचे वळचणीस राहिले । गा-हाणे घातलें बाबांना ॥१२१॥ जोगाई जाखाई मरीआई । शनि शंकर अंबाबाई । मारुती खंडोबा म्हाळसाई । ठायी ठायीं शिरडींत ॥१२२॥ परी अवघड प्रसंग येतां । कामी पडेना एकही ग्रामस्था । तयांचा तो चालता बोलता धांवता । संकटी पावता एक साई ॥१२३॥ नलगे तयासी बोकड कोंबडा । नलगे तयासी टका दोकडा । एका भावाचा भुकेला रोकडा । करी झाडा संकटांचा ॥१२४॥ पाहूनि ऐसे लोक भ्याले । महाराज फारचि हेलावले । गादी सोडुनी पुढे आले । उभे राहिले धारेवर ॥१२५॥ मेघनिनादें भरल्या नभा । कडाडती विजा चमकती प्रभा । त्यांतचि साईमहाराज उभा । आकंठ बोभाय उच्चस्वरें ॥१२६॥ निज जीवाहूनि निजभक्त । देवास आवडती साधुसंत । देव तयांचे बोलांत वर्तत । अवतार घेत त्यालागीं ॥१२७॥ परिसोनि भक्तांचा धांवा । देवासी लागे कैवार घ्यावा । वरचेवरी शब्द झेलावा । भक्त-भावा स्मरोनि ॥१२८॥ चालली आरोळीवर आरोळी । नाद दुमदुमला निराळीं । वाटे मशीद डळमळली । कांटाळी बैसली सकळांची ॥१२९॥ त्या गिरागजर तारस्वरें । दुमदुमलीं मशीद-मंदिरें । तंव मेघ निजगर्जना आवरे । वर्षाव थारे धारांचा ॥१३०॥ उदंड बाबांची आरोळी । अवघा सभामंडप डंडळी । गजबजली भक्तमंडळी । तटस्थ ठेली ठायींच ॥१३१॥ अतर्क्य बाबांचे विंदान । जाहलें वर्षावा आकर्षण । वायूही आवरला तत्क्षण । धुई विच्छिन्न जाहली ॥१३२॥ हळूहळू पाऊस उगवला । सोसाटाही मंदावला । नक्षत्रगण दिसू लागला । तम निरसला ते काळीं ॥१३३॥ पाऊस पुढे पूर्ण उगवला । सोसाट्याचा पवनही विरमला । चंद्र गगनीं दिसू लागला । आनंद झाला सकळांतें ॥१३४॥ वाटे इंद्रास दया आली । पाहिजे संतांची वाणी राखली । ढगें बारा वाटा फांकलीं । शांत झाली वावटळ ॥१३५॥ पाऊस सर्वस्वी नरमला । वाराही मंद वाहू लागला । गडगडाट जागींच जिराला । धीर आला पशुपक्ष्यां ॥१३६॥ सोडूनियां घरांच्या वळचणी । गुरें वासरे बाहेर पडुनी । वावरुं लागलीं निर्भय मनीं । पक्षीही गगनीं उडाले ॥१३७॥ पाहूनि पूर्वील भयंकर प्रकार । मानूनियां बाबांचे उपकार । जन सर्व गेले घरोघर । गुरेही सुस्थिर फरकलीं ॥१३८॥ ऐसा हा साई दयेचा पुतळा । तयासी भक्तांचा अति जिव्हाळा । लेकुरां जैसा आईचा कळवळा । किती मी प्रेमळा गाऊं त्या ॥१३९॥ असो. एकदा साईसमर्थांना ज्याची आकाशातील ढगांवरही सत्ता आहे अशा इंद्राची प्रार्थना करताना पाहिले आणि मनाला फार आश्चर्य वाटले. तो प्रसंग अतिभयंकर होता. समग्र आकाश अंधाराने भरून गेले होते, पशु-पक्षी घाबरून गेले होते आणि पावसासकट सोसाट्याचा वारा सुटला होता. सूर्य मावळला आणि संध्याकाळ झाली. एकाएकी वावटळ उठली, वाऱ्याचा जोराचा सोसाटा सुटला आणि भयंकर खळबळ उडाली. त्यातच ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा भयंकर सोसाट व पावसाचा घनदाट भडिमार झाला. मेघांनी मुसळधार पाऊस पाडला, गारा जमिनीवर पडताना फटफट वाजू लागल्या, गावकरी भीतीने गांगरून गेले आणि गुरेढोरे मोठ्याने ओरडू लागली. मशिदीच्या छपराच्या खालच्या भागात जनसमुदाय वाऱ्या पावसापासून वाचण्यासाठी आला, गुरेढोरे व वासरेही जमली आणि मशिदीत एकच गर्दी झाली. चारी बाजूंना पाणीच पाणी झाले, सारे गवत वाहून गेले, खळ्यातले सर्व पीकही भिजले आणि लोक मनात गोंधळून गेले. एकूण एक गावकरी घाबरून गेले, सभामंडपात येऊन गोळा झाले. कोणी मशिदीच्या छपराच्या खाली थांबले आणि बाबांजवळ गाऱ्हाणे करू लागले. जोगाई, जाखाई, मरीआई, शनी. शंकर, अंबाबाई. मारुती. खंडोबा, म्हाळसाई या सर्व देव-देवता शिरडीत ठिकठिकाणी होत्या; परंतु अवघड प्रसंग आल्यावर गावकऱ्यांना एकही उपयोगी पडत नव्हती. त्यांचा चालता, बोलता, धावता, संकटी पावता एकच देव म्हणजे साई होता. त्याला कोंबडा किंवा बोकड लागत नसे किंवा पै-पैसा लागत नसे. तो फक्त प्रत्यक्ष भावाचा भुकेला होता आणि संकटांचा नाश करीत असे. अशा प्रकारे लोक भ्यालेले पाहून साईमहाराज फार दुःखी झाले, गादी सोडून पुढे आले आणि मशिदीच्या ओट्याच्या कडेवर उभे राहिले. आधीच ढगांच्या गडगडाटाने आकाश भरले होते. विजा कडाडत होत्या आणि त्यांचा प्रकाश चमकत होता. त्यातच साईमहाराज उंच आवाजाने घसा ताणून ओरडू लागले. आपल्या जिवापेक्षा आपले भक्त व साधु-संत देवाला जास्त प्रिय असतात. देव त्यांच्या बोलण्याप्रमाणे वागतात आणि त्यांच्यासाठीच अवतारही घेतात. भक्तांचा धावा ऐकून देवांना त्यांचा कैवार घ्यावा लागतो. भक्तांची भक्ती आठवून त्यांचा शब्द वरच्यावर झेलावा लागतो. बाबांची आरोळीवर आरोळी चालली, आवाज आकाशात दुमदुमला, मशीद डळमळू लागली असे वाटले आणि सगळ्यांच्या कानाला दडे बसले. त्या पर्वतात घुमणाऱ्या मोठ्या आवाजाने मशीद व मंदिर दुमदुमली. तेव्हा मग मेघांनी आपल्या गर्जना आवरल्या आणि पावसाच्या सरी थांबल्या. बाबांच्या मोठ्या आरोळ्यांमुळे सगळा सभामंडप डळमळू लागला आणि भक्तमंडळी भीतीने गोंधळून जाऊन आपल्या जागीच स्तब्ध झाली. खरोखरच, बाबांच्या कौशल्याची कल्पनाच करता येत नाही. पावसाच्या सरी ओसरल्या, लगेच वाराही थांबला आणि धुके छिन्नभिन्न झाले. हळूहळू पाऊस कमी झाला, सोसाट्याचा वारा मंदावला; लगेच अंधार नाहीसा झाला आणि आकाशात तारांचा समूह दिसू लागला. पुढे पाऊस पूर्णपणे थांबला, सोसाट्याचा वाराही शांत झाला, आकाशात चंद्र दिसू लागला आणि सगळ्यांना आनंद झाला. इंद्राला जणू काय दया आली आणि वाटले. संताच्या शब्दाला मान दिला पाहिजे. डग बारा वाटे फाकले आणि वादळ शांत झाले. पाऊस अगदी नरमला,वाराही मंदमंद वाहू लागला, गडगडाट आपल्या जागीच जिरला आणि पशु-पक्ष्यांना धीर आला.घराच्या वळचणी (छपराखालील जागा) सोडून गुरे व त्यांची वासरे बाहेर पडून निर्भय मनाने हिंडूफिरू लागली आणि पक्षीही आकाशात उडाले. पूर्वीचा भयंकर प्रकार पाहून, बाबांचे उपकार मानून सर्व लोक घरोघर गेले आणि गुरेदेखील शांतपणे इकडे-तिकडे निघून गेली. असा हा साई दयेचा पुतळा होता. त्याला भक्तांचा फार जिव्हाळा होता, जणू काय आईचा आपल्या लेकरासाठी मायेचा उमाळाच. त्या प्रेमाचे मी किती वर्णन करू !

अग्नीवरीही ऐसीच सत्ता । ये अर्थीची संक्षिप्त कथा । श्रोतां परीसिजे सादर चित्ता । कळेल अपूर्वता शक्तीची ॥१४०॥ एकदां माध्यान्हीची वेळ । धुनीने पेट घेतला सबळ । कोण राहील तेथ जवळ । ज्वाळाकल्लोळ उठला ॥१४१॥ प्रचंड वाढला ज्वाळामाळी । तक्तपोशीला शिखा भिडली । वाटे होते मशिदीची होळी । राखरांगोळी क्षणांत ॥१४२॥ तरी बाबा मनीं स्वस्थ । सकळ लोक चिंताग्रस्त । तोंडात बोटें घालीत समस्त । काय ही शिकस्त बाबांची ॥१४३॥ एक म्हणे आणा की पाणी । दुजा म्हणे घालावें कोणीं । घालितां माथां सटका हाणी । कोण त्या ठिकाणी जाईल ॥१४४॥ मनीं जरी सर्व अधीर । विचारावया नाहीं धीर । बाबाच तंव होऊनि अस्थिर । सटक्यावर कर टाकियला ॥१४५॥ पाहोनि ज्वाळांचा भडका । हातीं घेऊनियां सटका । हाणिती फटक्यावरी फटका । म्हणती “हट का माघारा" ॥१४६॥ धुनीपासाव एक हात । स्तंभावरी करिती आघात । ज्वाळांकडे पहात पहात । "सबूर सबूर" वदत ते ॥१४७॥ फटक्या-फटक्यास खाली खालीं । ज्वाला नरम पडूं लागली । भीती समूळ उडूनि गेली । शांत झाली तें धुनी ॥१४८॥

बाबांची अग्नीवरही अशीच सत्ता होती. त्याविषयीची लहानशी कथा श्रोत्यांनी काळजीपूर्वक ऐकावी.म्हणजे बाबांच्या शक्तीचे असाधारणत्व व श्रेष्ठत्व कळेल. एकदा दुपारची वेळ होती. धुनीने मोठा पेट घेतला. मग तेथे जवळ कोण उभा राहील ! ज्वाळांचा कल्लोळ उठला, अग्नी प्रचंड वाढला आणि जाळ लाकडाच्या फळ्यांच्या तक्तपोशीला जाऊन भिडला. मशीद जळून-पोळून तिचा सत्यानाश होतो की काय, असे वाटू लागले. तरीपण बाबा मनाने स्वस्थ होते. सर्व लोक चिंताग्रस्त होऊन तोंडात बोटे घालू लागले. “काय ही बाबांची कमाल !" एक म्हणे, "आणा पाणी." दुसरा म्हणे, "पण ते घालावे कोणी ? घालायला गेले, तर सटका मारतील ना ! कोण त्या ठिकाणी जाईल !" सर्वजण मनात उतावीळ होते; परंतु बाबांना विचारायचा धीर कोणालाच झाला नाही. पुढे मग बाबाच अस्वस्थ होऊन त्यांनी सटक्यावर हात टाकला. ज्वाळांचा भडका पाहून, त्यांनी सटका हातात घेऊन फटक्यांवर फटका मारण्यास सुरुवात केली आणि म्हणाले, "हट की माघारा. "धुनीच्या बाजूने एक हात घेऊन खांबावर प्रहार करीत करीत आणि ज्वाळांकडे पहात पहात ते “सबूर सबूर" म्हणू लागले. फटक्या फटक्याला जाळ खाली खाली येऊन नरम पडू लागला. धुनी शांत झाली आणि सर्वांची भीती पार नाहीशी झाली. 

तो हा साई संतवर । ईश्वराचा दुजा अवतार । डोई तयाच्या पायांवर । ठेवितां कृपाकर ठेवील ॥१४९॥ होऊनि श्रद्धाभक्तियुक्त । करील जो या अध्यायाचे नित्य । पारायण होऊनि स्वस्थचित्त । आपदानिर्मुक्त होईल ॥१५०॥ फार काय करूं मी कथन । शुद्ध करोनियां अंतःकरण । नेमनिष्ठ व्हा साईपरायण । ब्रह्म सनातन पावाल ॥१५१॥ पुरेल अपूर्व इच्छित काम । व्हाल अंती पूर्ण निष्काम । पावाल दुर्लभ सायुज्यधाम । अखंड राम लाधाल ॥१५२॥ असो जया भक्तांच्या चित्तीं । भोगावी परमार्थसुखसंवित्ती । तेणें ये अध्यायानुवृत्ती । आदरवृत्ति ठेवावी ॥१५३॥ शुद्ध होईल चित्तवृत्ति । कथासेवनीं परमार्थप्रवृत्ति । इष्टप्राप्ती अनिष्टनिवृत्ति । पहावी प्रचीति बाबांची ॥१५४॥ तो हा श्रेष्ठ संत साई, ईश्वराचा दुसरा अवतारच ! त्याच्या पायांवर मस्तक ठेवले, तर त्यावर तो आपला कृपेचा हस्त ठेवेल. जो श्रद्धा व भक्तीसह स्वस्थचित्त होऊन या अध्यायाचे नित्य पारायण करील तो संकटांपासून संपूर्णपणे मुक्त होईल. आणखी मी काय सांगू ! अंत:करण शुद्ध करून नियमितपणे व कडक रीतीने धार्मिक विधी व कृत्ये करणारे व्हा आणि साईबाबांची भक्ती करा; म्हणजे शाश्वत अशा परमात्म्याची प्राप्ती होईल. मनात असलेल्या असाधारण इच्छाही पुऱ्या होऊन शेवटी पूर्णपणे निष्काम बनाल. जेथे ईश्वर व जीव यांचा भेद नाहीसा होतो अशा मिळण्यास कठीण सायुज्य मुक्तीचे स्थान प्राप्त कराल आणि कधीही भंग न पावणारे समाधान तुम्हाला लाभेल. असो. ज्या भक्तांच्या मनात परमार्थ सुखाची चांगली जाणीव भोगायची इच्छा असेल त्यांनी या अध्यायाच्या पुनः पुन्हा वाचनाकडे उत्सुकता व आवड ठेवावी. यातील कथा वाचून चित्तवृत्ती शुद्ध होईल, परमार्थ संपादण्याकडे प्रवृत्ती वळेल आणि सर्व अप्रिय व अशुभ गोष्टींचा नाश होऊन प्रिय व शुभ गोष्टी प्राप्त होतील. बाबांचा अनुभव घेऊन पहावा. 

हेमाडपंत साईंस शरण । पुढील अध्याय अतिपावन । गुरूशिष्यांचें तें महिमान । घोलप-दर्शन गुरूपुत्रा ॥१५५॥ शिष्यास कैसाही प्रसंग येवो । तेणें न त्यजावा निज गुरूदेवो । साई तयाचा प्रत्यक्ष अनुभवो । दावी दृढ भावो वाढवी ॥१५६॥ जे जे भक्त आले पायीं । प्रत्येका दर्शनाची नवाई । कोणास कांहीं कोणास कांहीं । देऊनि ठायींच दृढ केलें ॥१५७॥ स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । श्रीसाईमहिमावर्णनं नाम एकादशोऽध्यायः संपूर्णः ॥ ॥श्रीसद्‌गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ हेमाडपंत साईस शरण आलेले आहेत. पुढील अध्याय अत्यंत पवित्र आहे. त्यात गुरु-शिष्यांच्या संबंधाची थोरवी गाईली आहे आणि गुरूंचा उपदेश घेतलेल्या 'मुळे' नावाच्या शिष्याला आपल्या घोलप' नावाच्या गुरुचे दर्शन कसे झाले हे सांगितले आहे. "शिष्यावर कसलाही प्रसंग येवो, त्याने आपल्या गुरुदेवाला सोडू नये", या तत्त्वाचा प्रत्यक्ष अनुभव दाखवून साईबाबा ज्याची ज्या ठिकाणी दृढ भक्ती असेल त्याच ठिकाणी ती वाढीला लावीत असत. जे जे भक्त साईच्या चरणांशी आले त्या त्या प्रत्येक भक्ताला कोणास काही, तर कोणास काही अशा वेगवेगळ्या, नव्या व आश्चर्यकारक रूपात दर्शन देऊन त्यांची आपल्या आराध्य दैवताच्या किंवा गुरुच्या ठिकाणी असलेली भक्ती साईनी पक्की केली.  सर्वाचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्रीसाईसमर्थ यांच्या सत्य चरित्राचा 'श्रीसाईमहिमा वर्णन' नावाचा अकरावा अध्याय समाप्त झाला. श्रीसद्‌गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो.

॥ श्रीसद्‌गुरुसाईनाथाय नमः ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


स्रोत : हेमाडपंतकृत श्रीसाईसच्चरित आणि कै. मु. ब. निंबाळकर अनुवादित श्रीसाईंचे सत्य चरित्र


अथ श्रीसाईसच्चरिते श्रीसाईमहिमावर्णनं - सार्थ श्री साई रुद्राध्याय (३)


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ अथ श्रीसाईसच्चरित अध्याय ११ ॥ श्रीसाईमहिमा वर्णनं

(श्रीसाईबाबांच्या प्रभावाचे वर्णन)

हा कथाभाग लिहितां लिहितां । ओघानें आठवली समर्पक कथा । उदाहरणार्थ कथितों श्रोतां । सादरचित्ता परीसिजे ॥७७॥ आला कल्याणवासी एक यवन । सिदीक फाळके नामाभिधान । मक्का-मदीना यात्रा करून । शिरडीलागून पातला ॥७८॥ उतरला तो वृद्ध हाजी । उत्तराभिमुख चावडीमाजी । प्रथम नऊ मास इतराजी । बाबा न राजी तयातें ॥७९॥ आला नाहीं तयाचा होरा । व्यर्थ जाहल्या येरझारा । केल्या तयाने नाना तन्हा । नजरानजर होईना ॥८०॥ मशीद मुक्तद्वार अवघ्यांसी । कोणासही ना पडदपोशी । परी न आज्ञा त्या फाळक्यासी । चढावयासी मशिदीं ॥८१॥ फाळके अंतरीं खिन्न झाले । काय तरी हे कर्म वहिले । मशिदीस न लागती पाउलें । काय म्यां केलें पाप की ॥८२॥ कवण्या योगें प्रसन्न होती । आतां बाबा मजवर पुढती । हाच विचार दिवसरातीं । हृद्रोग चित्तीं फाळक्यांचे ॥८३॥ तितक्यांत कोणी कळविलें तयांस । होऊ नका ऐसे उदास । धरा माधवरावांची कास । पुरेल आस मनींची ॥८४॥ आधीं न घेतां नंदीचे दर्शन । शंकर होईल काय प्रसन्न । तयासी याच मार्गाचें अवलंबन । गमलें साधन तें बरवें ॥८५॥ सकृद्दर्शनी ही अतिशयोक्ती । ऐसें वाटेल श्रोतयां चित्तीं । परी हा अनुभव दर्शनवक्तीं । भक्तांप्रती शिरडींत ॥८६॥ जया मनी बाबांचे सवें । संथपणे संभाषण व्हावें । तयाचिया समवेत जावें । माधवरावें आरंभीं ॥८७॥ आले हे कोण कोठूनि किमर्थ । गोड शब्दें कळवावा कार्यार्थ । सूतोवाच होतांच समर्थ । होत मग उद्युक्त बोलाया ॥८८॥ ऐकोनियां तें हाजीनें सकळ । माधवरावांस घातली गळ । म्हणाले " एकदां ही माझी तळमळ । घालवा, दुर्मिळ मिळवूनि द्या" ॥८९॥ पडतां माधवरावांस भीड । केला मनाचा निश्चय दृढ । असो वा नसो कार्य अवघड । पाहूं कीं दगड टाकुनी ॥९०॥ गेले मशिदीस केला धीर । गोष्ट काढिली अतिहळुवार । "बाबा तो म्हातारा कष्टी फार । कराना उपकार तयावरी ॥९१॥ हाजी तो करूनि मक्का-मदीना । शिरडीस आला आपुले दर्शना । तयाची कैसी येईना करुणा । येऊंच द्याना मशिदीं ॥९२॥ जन येती असंख्यात । जाऊनि मशिदीत दर्शन घेत । हातोहात चालले जात । हाच खिचपत पडला कां ॥९३॥ करा की एकदां कृपादृष्टी । होवो तयासी मशिदीत भेटी । जाईल मग तोही उठाउठी । पुसूनि गोष्टी मनींची " ॥९४॥ " शाम्या तुझ्या ओठांचा जार । अजून नाहीं वाळला तिळभर । नसतां अल्लाची खुदरत तयावर । मी काय करणार तयासी ॥९५॥ नसतां अल्लामियाचा ऋणी । चढेल काय या मशिदी कुणी । अघटित येथील फकीराची करणी । नाहीं मी धणी तयाचा ॥९६॥ असो बारवीपलीकडे थेट । आहे जी एक पाऊलवाट । चालूनि येसील काय तूं नीट । विचार जा स्पष्ट तयातें" ॥९७॥ हाजी वदे " कितीही बिकट । असेना ती मी चालेन नीट । परी मज द्यावी प्रत्यक्ष भेट । चरणानिकट बैसू द्या" ॥९८॥ परिसूनि शामाकरवी हे उत्तर । बाबा वदती आणीक विचार । "चार वेळांती चाळीस हजार । रुपये तूं देणार काय मज" ॥९९ ॥ माधवराव हा निरोप सांगतां । हाजी म्हणाले "हे काय पुसतां । देईन चाळीस लाखही मागतां । हजारांची कथा काय" ॥१००॥ परिसोनि बाबा वदती त्या पुस । "आज बोकड कापावयाचा मानस । आहे आमुचा मशिदीस । तुज काय गोस पाहिजे ॥१०१॥ किंवा पाहिजे 'तुवर अस्थी । किंवा वृषणवासना चित्तीं । जा विचार त्या म्हाताऱ्याप्रती । काय निश्चित वांछी तो" ॥१०२॥ माधवरावें समग्र कथिलें । हाजीप्रती बाबा जें वदले । हाजी निक्षून वदते झाले । “नलगे त्यांतलें एकही मज ॥ १०३ ॥ द्यावें मज कांहीं असेल चित्ता । तरी मज आहे एकचि आस्था । 'कोळंब्यांतील तुकडा लाभतां । कृतकल्याणता पावेन" ॥१०४॥ हाजीचा हा निरोप घेऊन । माधवराव आले परतोन । करितांच बाबांस ते निवेदन । बाबा जे तत्क्षण खवळले ॥१०५॥ कोळंबा आणि पाण्याच्या घागरी । स्वयें उचलूनि भिरकाविल्या द्वारीं । हात चावोनियां करकरी । आले शेजारी हाजीच्या ॥ १०६ ॥ धरूनि आपुली कफनी दों करीं । हाजीसन्मुख उचलून वरी । म्हणती "तूं काय समजलास अंतरीं । करिसी फुशारी मजपुढें ॥१०७॥ बुढ्ढेपणाचा तोरा दाविसी । ऐसेंचि काय तूं कुराण पढसी । मक्का केल्याचा ताठा वाहसी । परी न जाणसी तूं माते" ॥१०८॥ ऐसें तयासी निर्भत्सिलें । अवाच्य शब्दप्रहार केले । हाजी बहु गांगरूनि गेले । बाबा परतले माघारा ॥ १०९ ॥ मशिदीचे आंगणी शिरतां । माळिणी देखिल्या आंबे विकितां । खरेदिल्या त्या पाट्या समस्ता । पाठविल्या तत्त्वता हाजीस ॥११०॥ तैसेचि तात्काळ मागे परतलें । पुन्हां त्या फाळक्यापाशी गेले । रुपये पंचावन्न खिशांतूनि काढिले । हातावर मोजिले तयाचे ॥१११॥ तेथूनि पुढे मग प्रेम जडलें । हाजीस जेवावया निमंत्रिलें । दोघेही जणूं अवघें विसरले । हाजी समरसले निजरंगीं ॥ ११२ ॥ पुढे मग ते गेले आले । यथेच्छ बाबांचे प्रेमी रंगले । नंतरही बाबांनी वेळोवेळे । रुपये दिधले तयास ॥११३॥ हा कथाभाग लिहिता लिहिता ओघाने जुळण्यासारखी समर्पक कथा आठवली, ती उदाहरण म्हणून सांगतो. श्रोत्यांनी ती काळजीपूर्वक ऐकावी. एकदा एक कल्याणचा सिद्दीक फाळके नाव असलेला मुसलमान मक्का-मदीना यात्रा करून शिरडीला येऊन पोहोचला. तो म्हातारा हाजी (मक्का-मदीनेची म्हणजे हजची यात्रा करून आलेल्या माणसाला हाजी म्हणतात.) उत्तरेकडे तोंड असलेल्या चावडीत उतरला. आधी नऊ महिने बाबांची त्याच्यावर गैरमर्जी होती. बाबा त्याच्यावर प्रसन्न नव्हते. त्याची योग्य वेळ आली नव्हती; म्हणून त्याच्या खेपा फुकट गेल्या. त्याने नाना तऱ्हा केल्या; परंतु बाबांशी नजरानजर होत नव्हती. मशीद तशी सर्वांना येण्या-जाण्याला मोकळी होती. कोणालाही आडवळणाचे किंवा गुप्त स्थान ते नव्हते. परंतु या फाळक्याला मशिदीत वर चढण्याची बाबांची आज्ञा नव्हती. फाळके मनात फार खिन्न झाले. "काय तरी हे नशीब विचित्र ! मशिदीला पायच लागत नाहीत ! काय मी पाप केले होते ? आता बाबा माझ्यावर कशाने प्रसन्न होतील?" हाच विचार रात्रदिवस हृदयरोगाप्रमाणे फाळक्यांच्या मनाला लागला. तितक्यात कोणी त्यांना सांगितले की, असे उदास होऊ नका. माधवराव देशपांड्यांची मदत घ्या; म्हणजे मनाची इच्छा पुरी होईल. आधी नंदीचे दर्शन घेतल्याशिवाय शंकर प्रसन्न होईल का ! फाळक्यांना हा मार्ग स्वीकारणे बरे वाटले. प्रथम दर्शनी श्रोत्यांच्या मनाला अतिशयोक्ती वाटेल. परंतु शिरडीत बाबांच्या दर्शनाला जाताना भक्तांना हाच अनुभव येत असे. ज्यांच्या मनात बाबांबरोबर शांतपणे संभाषण व्हावे, असे वाटत असेल त्यांच्याबरोबर सुरुवातीला माधवरावांनी जावे. त्यांनी पण हे कोण, कोठून, कशाला आले, हे गोड शब्दांनी बाबांना कळवावे. त्यांच्या कामाबद्दलचा असा प्रारंभ झाला की, साईसमर्थ बोलण्यास तयार होत असत. हे सगळे ऐकून हाजीने माधवरावांना अतिआग्रह केला आणि म्हणाले, "एकदा माझी ही तळमळ घालवा आणि मिळण्यास कठीण अशी बाबांची भेट करवून द्या." अशा प्रकारे माधवरावांना आग्रह पडल्यावर त्यांनी काम अवघड असो की नसो, प्रयत्न करून पाहण्याचा मनात पक्का बेत केला. मग ते मशिदीत गेले आणि धीर करून अगदी हळुवारपणे बाबांजवळ गोष्ट काढली, "बाबा ! तो म्हातारा फार कष्टी आहे. त्यावर मेहेरबानी करा की ! तो हाजी मक्का-मदीनाची यात्रा करून शिरडीत तुमच्या दर्शनाला आला आहे. त्याची तुम्हाला दया का येत नाही ? त्याला मशिदीत येऊ द्या ना ! अगणित लोक मशिदीत येऊन दर्शन घेतात आणि चटकन परत जातात आणि हाच का ताटकळत पडला आहे बरे ? याच्यावर एकदा कृपादृष्टी करा; म्हणजे त्याला मशिदीत तुमची भेट होईल आणि तो मनातील गोष्ट विचारून ताबडतोब निघून जाईल." "शाम्या ! तुझ्या ओठाचा जार (नुकत्याच जन्म झालेल्या मुलाच्या तोंडातून निघणारा फेस) अजून तीळभरही वाळला नाही. अल्लाची शक्ती त्याच्या पाठीशी नसल्यावर मी तरी त्याच्यासाठी काय करणार ! अल्लामियाचा देणेकरी असल्याशिवाय या मशिदीत वर कोणी चढेल काय ! येथील फकिराची करणी अभूतपूर्व आहे. मी त्याचा मालक नव्हे. असो. त्याला जाऊन स्पष्ट विचार की. 'जवळच्याच त्या विहिरीपलीकडे थेट जी अरुंद पायवाट आहे ती तू नीट चालून येशील का?" हाजीने उत्तर दिले. "ती कितीही अवघड असली, तरी ती मी नीट चालून येईन. परंतु मला आपण प्रत्यक्ष भेट द्यावी आणि चरणापाशी बसू द्यावे. हे शाम्याकडून उत्तर ऐकून बाबा त्याला आणखी विचार म्हणाले, "चार वेळा चाळीस हजार रुपये तू मला देणार काय?" माधवरावांनी हा निरोप सांगितल्यावर हाजी म्हणाले, "हे काय विचारता ! मागितल्यावर चाळीस लाखसुद्धा देईन. हजारांची काय गोष्ट !" हे ऐकून बाबा शाम्याला पुन्हा म्हणाले, "याला विचार, आज मशिदीत बोकड कापण्याचा आमचा विचार आहे. तुला मांस पाहिजे की एका भागाचे मांसासकट हाड पाहिजे की अंडकोश खाण्याची इच्छा तुझ्या मनात आहे ? जा, विचार त्या म्हाताऱ्याला की, तुला निश्चित काय पाहिजे." अशा प्रकारे बाबा जे म्हणाले ते शाम्याने हाजीला सांगितले; पण हाजी स्पष्टपणे म्हणाले, “यातले मला काहीएक नको. जे काही तुमच्या मनाला वाटेल ते मला द्यावे. मला एकच उत्सुकता आहे. कोळंब्यातील एक तुकडा जरी मिळाला तरी माझे कल्याण झाले, असे मी मानीन." हाजीचा हा निरोप घेऊन माधवराव परत आले आणि तो बाबांना सांगताच बाबा खवळले आणि पाण्याच्या घागरी स्वतः उचलून दारातून फेकून दिल्या.हात करकर चावून हाजीच्या शेजारी आले आणि दोन्ही हातांनी आपली कफनी हाजीसमोर वर उचलून म्हणाले. "तू तुझ्या मनात काय समजलास? माझ्यासमोर फुशारकी मारतोस ! म्हातारपणाचा दिमाख दाखवितोस! असा काय तू कुराण पढतोस ! मक्केची यात्रा केल्याचा अभिमान वाहतोस ! पण तू मला ओळखत नाहीस." अशा प्रकारे बाबांनी हाजींचा अपमान केला, न बोलण्यासारखे आणि मनाला लागतील असे शब्द बोलले. हाजी भीतीने फार गोंधळून गेले. मग बाबा मशिदीत माघारी परत आले. मशिदीच्या अंगणात शिरताना माळिणी आंबे विकताना पाहिल्या.त्यांच्या सर्व पाट्या विकत घेतल्या आणि सर्वच्या सर्व हाजीला पाठवून दिल्या. मग लगेच बाबा परतले आणि त्या हाजीपाशी पुन्हा गेले. खिशातून पंचावन्न रुपये काढले आणि त्यांच्या हातावर मोजले. तेथून मग पुढे हाजीवर प्रेम जडले आणि त्याला जेवायला आमंत्रण दिले. दोघेही जणू काय सर्व विसरले आणि हाजी अत्यानंदात तल्लीन झाले. पुढे मग ते बाहेर गेले व पुन्हा आले आणि बाबांच्या प्रेमात मनसोक्त रंगले. बाबांनी नंतरदेखील त्यांना वेळोवेळी रुपये दिले.  बाबांनी सुरुवातीला हाजीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. सर्व भक्त कधीही मशिदीत येऊन बाबांचे दर्शन घेत असत. मात्र साईंनी हाजीला तब्बल नऊ महिने मशिदीच्या पायऱ्या चढू दिल्या नाहीत. याचे कारण इतुकेच की हाजी सिद्दीक फाळके यांना त्यांच्या म्हातारपणाचा, नित्य कुराण वाचनाचा आणि मक्का मदिना यात्रेचा खूप अभिमान होता. शिर्डीला पोहोचल्यावर बाबा आपला आदर-सत्कार करतील, अशी त्यांची अपेक्षा होती. अंतर्यामी बाबांना हे सर्व माहीत होते. म्हणूनच माधवराव देशपांडे यांनी - हाजीला मशिदीत येऊन दर्शन घेऊ द्यावे अशी प्रार्थना केल्यावरही साईनी स्पष्ट शब्दांत सांगितले, त्याच्या पाठीशी ईशशक्ती नसल्यावर मी तरी त्याच्यासाठी काय करणार? अल्लामियाचा देणेकरी असल्याशिवाय या मशिदीत वर कोणीही चढू शकत नाही. येथील फकिराची अर्थात दत्तमहाराजांची करणी अभूतपूर्व आहे. मी काही इथला स्वामी नव्हे.

पुढे जसजसा हाजीचा अहंभाव नष्ट होऊ लागला तसेच ' श्रद्धा अन सबुरी ' या बाबांच्या मंत्राचा त्याने पूर्णपणे अंगीकार केला आहे, हे पाहून बाबांनी त्याला वरील प्रश्न विचारले, आणि त्याच्या शरणागतीची परीक्षा घेतली. पहिल्या प्रश्नाचा हेतू हाच की ईशकृपेसाठी त्याची शारीरिक श्रम करायची अथवा देह झिजवण्याची तयारी आहे का ? हाजीचा आर्थिक लोभ, धनाची लालसा खरोखर नष्ट झाली आहे का ? हे जाणण्यासाठी बाबांनी दुसरा प्रश्न विचारला. तर बाबांनी तिसरा प्रश्न विचारून त्याच्या मनाचा मोह, हाव अजमावून पहिले. हाजीनेही शुद्धभावानें प्रामाणिक उत्तरे देऊन आपले तन, मन आणि धन बाबांना अर्पण केले आहे, हे स्पष्ट केले. त्यामुळे तो साईंच्या कसोटीवर पूर्णपणे उतरला. अर्थात यानंतरही बाबांनी त्याची सर्वात कठीण अशी परीक्षा घेतलीच. ती कशी? तर बाबांनी हाजींचा अपमान केला, न बोलण्यासारखे आणि मनाला लागतील असे शब्द त्याला बोलले. मात्र तरीही हाजी शांत राहिला, त्याने काही प्रत्युत्तर दिले नाही अन तसाच साईकृपेची, साई-आज्ञेची वाट पाहत तिथेच थांबला. त्यावेळी 'गुरुवाक्य प्रमाण' अशीच त्याची भावना होती. साईचरणीं तो अनन्यभावानें शरण आला होता, हेच त्यांतून सिद्ध झाले. म्हणूनच बाबांनी त्याला कृपाप्रसाद म्हणून आंब्याच्या सर्व टोपल्या पाठवल्या अन शिवाय पंचावन्न रुपयेही दिले आणि एकत्र जेवायलाही बोलावले. साईभक्तहो, " आडमार्गी पाऊल पडता I सांभाळुनि मार्गावरता I आणिता न दूजा त्राता II" या वचनाची नित्य प्रचिती देणारी ही परम कृपाळू साई माऊली सर्वदा भक्तांचे कल्याण करते, हेच खरें!

क्रमश:

॥ श्रीसद्‌गुरुसाईनाथाय नमः ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


स्रोत : हेमाडपंतकृत श्रीसाईसच्चरित आणि कै. मु. ब. निंबाळकर अनुवादित श्रीसाईंचे सत्य चरित्र


अथ श्रीसाईसच्चरिते श्रीसाईमहिमावर्णनं - सार्थ श्री साई रुद्राध्याय (२)


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ अथ श्रीसाईसच्चरित अध्याय ११ ॥ श्रीसाईमहिमा वर्णनं

(श्रीसाईबाबांच्या प्रभावाचे वर्णन)


बाबाच सर्वांचे अधिष्ठान । तयांसी केउतें आसन । त्याहीवरी रौप्य सिंहासन । भक्तभावन परी बाबा ॥४१॥ बहुतां दिसांची जुनी बैठक । गोणत्याचा तुकडा एक । त्यावरी घालिती भक्त भाविक । गादी सुरेख बैसाया ॥४२॥ मागील टेकायाची भिंत तेथें तक्या ठेविती भक्त । जैसें भक्तांचे मनोगत बाबाही वागत तैसेच ॥४३॥ वास्तव्य दिसे शिरडींत । तरी ते होते सर्वगत हा अनुभव निजभक्तांप्रत । साई नित्य दाखवीत ॥४४॥ स्वयें जरी निर्विकार । अंगिकारीत पूजा - उपचार । भक्तभावार्थानुसार । प्रकार सर्व स्वीकारीत ॥४५॥ कोणी करीत चामरांदोलन । कोणी तालवृन्त-परिवीजन । सनया चौघडे मंगल वादन । कोणी समर्पण पूजेचें ॥४६॥ कोणी हस्त पादप्रक्षालन । कोणी अत्तर - गंधार्चन । कोणी त्रयोदशगुणी तांबूलदान । निवेदन महानैवेद्या ॥४७॥ कोणी दुबोटी आडवें गंध । शिवलिंगा तैसें चर्चिती सलंग । कोणी कस्तूरीमिश्रित सुगंध । तैसेंचि चंदन चर्चीत ॥४८॥ बाबाच सर्वांचे आधारस्थान होते. मग त्यांना बसण्याला आधार कशाला आणि तोही चांदीच्या सिंहासनाचा ! परंतु बाबा भक्तांचे लाड पुरविणारे होते. खूप दिवसांचे गोणत्याच्या तुकड्याचे त्यांचे एक जूने बसण्याचे आसन होते. त्यावर बसण्यासाठी भाविक भक्त सुरेख गादी घालीत असत आणि मागे टेकण्याची भिंत होती, तेथे तक्या ठेवीत असत. जसे भक्तांच्या मनात असेल तसे बाबादेखील वागत असत. साईबाबांचे राहणे जरी शिरडीत दिसत होते तरी ते सर्व ठिकाणी जाणारे होते, याचा अनुभव आपल्या भक्तांना ते नेहमी दाखवीत असत.त्यांना स्वत:ला जरी काही मनोभावना नव्हत्या तरी ते भक्तांच्या श्रद्धेप्रमाणे सर्व प्रकारचे पूजेचे उपचार स्वीकारीत असत. कोणी चवऱ्या ढाळीत असत, तर कोणी पंख्याने वारा घालीत असत, तर कोणी सनया, चौघडे वगैरे मंगलकारक वाद्ये वाजविण्याची पूजा अर्पित असत. कोणी हात-पाय धूत असत, कोणी अत्तर, गंध वगैरे लावीत असत, तर कोणी महानैवेद्य दाखवून त्रयोदशगुणी (१३ पदार्थ असलेला - १. शिरा काढलेली विड्याची पाने, २. फोडलेली सुपारी, ३. चुना, ४. खैरांचा काथ (बदामी तपकिरी रंगाचा ), ५. केशर, ६. कस्तुरी, ७. बदाम, ८. कंकोल (कापूरचिनी), ९. जायपत्री १०. वेलदोडा, ११. लवंग, १२. जायफळ, १३. थोडेसे सोने) पानाचा विडा अर्पण करीत असत. कोणी शिवलिंगाला लावतात तसे दोन बोटांनी एकसारखे आडवे गंध लावीत असत, तर कोणी कस्तुरी मिसळलेले गंध किंवा चंदन चर्चीत असत.


एकदां तात्यासाहेब नूलकरांचे । स्नेही डॉक्टर पंडित नांवाचे । घ्यावया दर्शन साईबाबांचें । आले एकदांच शिरडींत ॥४९॥ पाऊल ठेवितां शिरडींत । आरंभी गेले मशिदींत । करूनि बाबांसी प्रणिपात । बैसले निवांत क्षणभरी ॥५०॥ बाबा मग वदती तयांतें । “जाईं दादाभटाच्या येथे । जा असे जा" म्हणूनि बोटें हातें । लाविती मार्गाने तयांस ॥५१॥ पंडित दादांकडे गेले । दादांनी योग्य स्वागत केलें । मग दादा बाबांचे पूजेस निघाले । येतां का विचारिलें तयांसी ॥५२॥ दादांसमवेत पंडित गेले । दादांनी बाबांचे पूजन केलें । कोणीही न तोंवर लावाया धजलें । गंधाचे टिळे बाबांस ॥५३॥ कोणी कसाही येवो भक्त । कपाळी गंध लावू न देत । मात्र म्हाळसापती गळ्यासी फांसीत । इतर ते लावीत पायांतें ॥५४॥ परी हे पंडित भोळे भाविक । दादांची तबकडी केली हस्तक । धरूनियां श्रीसाईंचे मस्तक । रेखिला सुरेख त्रिपुंड्र ॥५५॥ पाहूनि हे तयांचें साहस दादांचे मनी धासधूस । चढतील बाबा परम कोपास । काय हे धाडस म्हणावें ॥५६॥ ऐसें अघडतें जरी घडलें । बाबा एकही न अक्षर वदले । किंबहुना वृत्तीने प्रसन्न दिसले । मुळी न कोपले तयांवर ॥५७॥ असो ती वेळ जाऊ दिली । दादांचे मनीं रुखरुख राहिली । मग तेचि दिनी सायंकाळीं । बाबांसी विचारिली ती गोष्ट ॥ ५८॥ " आम्ही गंधाचा उलासा टिळा । लावू जातां आपुलिया निढळा स्पर्श करूं द्या ना कपाळा । आणि हे सकाळा काय घडलें ॥५९॥ आमुच्या टिळ्याचा कंटाळा । पंडितांच्या त्रिपुंड्राचा जिव्हाळा । हा काय नवलाचा सोहळा । बसेना ताळा सुसंगत"॥६०॥ तंव सस्मितवदन प्रीतीं । साई दादांलागीं वदती । परिसावी ती मधुर उक्ती सादर चित्तीं सकळिकीं ॥६१॥ " दादा तयाचा गुरू बामण मी जातीचा मुसलमान । तरी मी तोचि ऐसें मानून । केलें गुरूपूजन तयानें ॥२॥ आपण मोठे पवित्र ब्राह्मण । हा जातीचा अपवित्र यवन कैसे करूं त्याचे पूजन । ऐसें न तन्मन शंकलें ॥६३॥ ऐसें मज त्याने फसविलें । तेथें माझे उपाय हरले । नको म्हणणे जागीच राहिलें । आधीन केलें मज तेणें ॥६४॥ ऐसें जरी उत्तर परीसिलें । वाटलें केवळ विनोदें भरलें । परी तयांतील इंगित कळलें । माघारा परतले जैं दादा ॥६५॥ ही बाबांची विसंगतता । दादांच्या फारचि लागली चित्ता । परी पंडितांसवें वार्ता करितां । कळली सुसंगतता तात्काळ ॥६६॥ धोपेश्वरींचे रघुनाथ सिद्ध । 'काका पुराणिक' नामें प्रसिद्ध । पंडित तयांचे पदीं सन्नद्ध । ऋणानुबंध शिष्यत्वें ॥६७॥ त्यांनी घातला काकांचा ठाव । तयांसी तैसाच आला अनुभव । जया मनी जैसा भाव । भक्तिप्रभावही तैसाच ॥६८॥ 

एकदा तात्यासाहेब नूलकरांचे डॉक्टर पंडित नावाचे स्नेही साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिरडीत एकदाच आले होते. शिरडीत पाऊल ठेवताच प्रथम ते मशिदीत गेले आणि बाबांना साष्टांग नमस्कार करून क्षणभर शांत बसले. मग बाबांनी त्यांना "जा. दादाभटाकडे जा. असे जा". असे म्हणून बोटाने व हाताने मार्ग दाखविला. पंडित दादांकडे गेले. दादांनी योग्य स्वागत केले. मग दादा बाबांच्या पूजेस निघाले आणि पंडितांना येता का म्हणून विचारले. पंडित दादांबरोबर गेले. दादांनी बाबांचे पूजन केले. तोपर्यंत बाबांच्या कपाळाला गंधाचा टिळा लावण्याचे कोणाला धैर्य झाले नव्हते. कोणी कसाही भक्त येवो, बाबा कपाळाला गंध लावू देत नसत. म्हाळसापती मात्र गळ्यास फासत असत आणि इतर भक्त पायाला लावीत असत. परंतु या भोळ्या भाविक पंडितांनी दादांची तबकडी हातात ओढून घेतली आणि श्रीसाईचे डोके धरून सुरेख त्रिपुंड काढला. त्यांचे हे धाडस पाहून दादांच्या मनात धासघूस वाटली की, काय हे धाडस ! बाबा खूप रागवतील ना ! परंतु जरी असे कधीही न घडणारे घडले तरी बाबा एकही शब्द बोलले नाहीत. उलट वृत्तीने प्रसन्न दिसले आणि पंडितांवर मुळीच रागावले नाहीत. असो. ती वेळ जाऊ दिली. पण दादांच्या मनात रुखरुख राहिली. त्यांनी ती गोष्ट संध्याकाळी बाबांना विचारली, "आम्ही तुमच्या कपाळाला इवलासा गंधाचा टिळा लावू जाता आम्हाला कपाळाला स्पर्श करू देत नाही आणि आज सकाळी हे का घडले ? आमच्या टिळ्याचा कंटाळा आणि पंडितांच्या त्रिपुंड्राचा जिव्हाळा ! हा काय विलक्षण प्रसंग ! याचा व्यवस्थित मेळ बसत नाही." त्यावर साईबाबा प्रेमाने हसत दादांना काय म्हणाले ते शब्द सगळ्यांनी स्वस्थ चित्ताने ऐकावेत. "दादा! त्याचा गरु ब्राह्मण, तर मी जातीचा मुलसमान; पंरतु मी तोच आहे, असे मानून त्याने माझे गुरुपूजन केले. आपण मोठे पवित्र ब्राह्मण, हा जातीचा अपवित्र यवन, त्याचे पूजन मी कसे करू, अशी त्याच्या मनात शंकासुद्धा आली नाही. असे त्याने मला फसविले. तेथे माझे उपाय हरले' आणि नको म्हणणे जागीच राहिले. मला त्याने अधीन (आपल्या ताब्यात) केले." असे जरी बाबांचे उत्तर ऐकले तरी दादांना ते थट्टेचेच वाटले. परंतु दादा जेव्हा घरी परत आले तेव्हा त्याचा खरा अर्थ कळला. बाबांची ही विसंगती दादांच्या मनाला फार टोचली होती. परंतु पंडितांशी गप्पा-गोष्टी करताना बाबांची सुसंगती त्यांना लगेच कळली. धोपेश्वरीचे सिद्ध पुरुष रघुनाथ, जे 'काका पुराणिक' या नावाने प्रसिद्ध होते त्यांच्या चरणी डॉ. पंडित आसक्त होते आणि त्यांच्याशी शिष्यत्वाचा ऋणानुबंधही होता. पंडितांनी काकांना पुकारले आणि त्यांना तसाच अनुभव आला. ज्याच्या मनात जसा भाव असतो तसाच त्याच्या भक्तीचा प्रभाव असतो.

असो हे सर्वोपचार करवूनि घेती । केवळ तयांच्या आलिया चित्तीं । ना तों पूजेची ताटें भिरकाविती । रूप प्रकटिती नरसिंह ॥६९॥ हे रूप कां जैं प्रकटिजेल । कोण धीराचा पाशीं ठाकेल । जो तो जीवाभेणें पळेल । वृत्ती खवळेल ती जेव्हां ॥७०॥ कधी अवचित क्रोधवृत्ति । भक्तांवरी आग पाखडिती । कधी मेणाहूनि मऊ भासती । पुतळा शांतिक्षमेचा ॥७१॥ कधी काळाग्निरूप भासती । भक्तांसी खङ्गाचे धारेवरी धरिती । कधीं लोण्याहूनि मवाळ होती । आनंदवृत्ति विलसती ॥७२॥ जरी क्रोधे कांपले थरथरां । डोळे जरी फिरविले गरगरां । तरी पोटीं कारुण्याचा झरा । माता लेकुरा तैसा हा ॥७३॥ क्षणांत वृत्तीवरी येतां । हांका मारूनि बाहती भक्तां । म्हणती "मी कोणावरीही रागावतां । ठावें न चित्ता माझिया ॥७४॥ माय हाणी लेकुरा लाता । समुद्र करी नदियां परता । तरीच मी होय तुम्हां अव्हेरिता । करीन अहिता तुमचिया ॥७५॥ मी माझिया भक्तांचा अंकिला । आहे पासींच उभा ठाकला । प्रेमाचा मी सदा भुकेला । हांक हांकेला देतसें" ॥७६॥ असो. ही सर्व प्रकारची सेवा केवळ त्यांच्या मनात आली, तरच करवून घेत असत. नाही तर पूजेची ताटेच उडवून देत असत आणि नरसिंहाचे रूप दाखवीत असत. हे रूप प्रगट झाल्यावर धीराचा कोण असेल, की जो जवळ उभा राहील ! अशी मनाची वृत्ती खवळली, तर जो तो जिवाच्या भीतीने पळतच सुटेल. कधी अचानक क्रोधावृत्त होत असत आणि भक्तांवर आग पाखडत असत, तर कधी लोण्याहून नरम स्वभावाचे भासत असत, जणू काय शांती व क्षमा यांचा मूर्तिमंत पुतळाच. कधी प्रलयकाळाच्या (कल्पातांच्या वेळी म्हणजे सर्व जगाच्या अंतसमयी प्रगट होणाऱ्या) अग्नीसारखे वागत आणि भक्तांना तलवारीच्या धारेवर धरीत असत, तर कधी लोण्याहन मऊ दिसत असत आणि आनंदवृत्तीने वागत असत. क्रोधाने जरी थरथर कापले, डोळे जरी गरगर फिरविले तरी आईला जसा लेकराकरिता असतो तसा त्यांच्या पोटी कारुण्याचा झरा होता. क्षणात मूळ स्वभावावर आल्यावर भक्तांना हाक मारून बोलावीत असत आणि म्हणत, "माझ्या मनाला कोणावर रागावणे ठाऊक नसते. आई जर लेकराला लाथा मारील, समुद्र जर नदीला परतवून लावील तरच मी तुमचा अव्हेर करीन आणि तुमचे नुकसान करीन. मी माझ्या भक्तांचा आज्ञाधारक आहे आणि त्यांच्याजवळच उभा राहिलेला आहे. मी सदा प्रेमाचा भुकेला आहे आणि भक्तांच्या हाकेला हाक देत असतो."

क्रमश:

॥ श्रीसद्‌गुरुसाईनाथाय नमः ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


स्रोत : हेमाडपंतकृत श्रीसाईसच्चरित आणि कै. मु. ब. निंबाळकर अनुवादित श्रीसाईंचे सत्य चरित्र


अथ श्रीसाईसच्चरिते श्रीसाईमहिमावर्णनं - सार्थ श्री साई रुद्राध्याय (१)


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

चरित्र नव्हे हा सुखाचा ठेवा। निज परमामृताचा मेवा ।

भाग्ये आगळा तेणेचि सेवावा । भक्ति भावा करोनि ॥ (अ. १४ : १२५) 'श्रीमद्भगवद्गीता' ही जशी भगवान श्रीकृष्णाची आणि 'श्री ज्ञानेश्वरी' ही जशी संत शिरोमणी ज्ञानेश्वरांची वाङ्मय मूर्ती आहे तशीच हेमाडपंतकृत 'श्रीसाईसच्चरित' ही श्रीसाईबाबांची वाङ्मय मूर्ती आहे. अशा या परम मंगल 'श्रीसाईसच्चरित' पोथीचा साईभक्त कै. मु. ब. निंबाळकर यांनी केलेला गद्य-भाष्यानुवाद 'श्रीसाईंचे सत्य चरित्र' या नावाने प्रसिद्ध आहे. श्रीसाईसच्चरित या दिव्य, प्रासादिक ग्रंथातील अकरावा अध्याय अर्थात ‘श्री साई रुद्राध्याय’ - याचे महत्व विशेष आहे. या अध्यायाचे आदरपूर्वक वाचन अथवा नेमाने पारायण केल्यानें श्रीसाईकृपेने संकट निवारण अवश्य होते असा अनेक साईभक्तांचा अनुभव आहे.

अशा या संकटमोचक अध्यायाचे पूरक विवरण करतांना थोर साईभक्त कै. मु. ब. निंबाळकर लिहितात -  हा अकरावा अध्याय फार महत्त्वाचा आहे. हेमाडपंतांनी तर या अध्यायाचे पठण म्हणजे यजुर्वेदातील प्रसिद्ध रुद्राध्यायाचे अकरा वेळा पठणच म्हटले आहे. श्रीधर स्वामीकृत श्रीशिवलीलामृताचाही अकरावा अध्याय श्रेष्ठ मानला आहे. "असो सर्वभावे निश्चित । अखंड पाहावे शिवलीलामृत । हें न घडे जरी त्वरित । हा अध्याय तरी वाचावा ॥७८॥”  तेव्हा हेमाडपंतांनी या अध्यायाच्या पठणाची जी फलश्रुती सांगितली आहे त्याबद्दल शंका घेण्याचे कारणच नाही. होऊनि श्रद्धा-भक्तियुक्त । करील जो या अध्यायाचें नित्य । पारायण होऊनि स्वस्थचित्त । आपदानिर्मुक्त होईल ॥१५०॥ फार काय करूं मी कथन । शुद्ध करोनियां अंत:करण । नेमनिष्ठ व्हा साईपरायण। ब्रह्म सनातन पावाल ॥१५१॥ पुरेल अपूर्व इच्छित काम। व्हाल अंतीं पूर्ण निष्काम । पावाल दुर्लभ सायुज्यधाम । अखंड राम लाधाल ॥१५२॥ साईभक्तांसाठी 'श्रीसाईंचे सत्य चरित्र' या ग्रंथातील सार्थ श्री साई रुद्राध्याय इथे क्रमश: प्रकाशित करत आहे. 

   ॥ अथ श्रीसाईसच्चरित अध्याय ११ ॥ श्रीसाईमहिमा वर्णनं

(श्रीसाईबाबांच्या प्रभावाचे वर्णन)

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ श्रीसद्‌गुरुसाईनाथाय नमः ॥ श्रीगणेशाला नमस्कार असो. श्रीसरस्वती देवीला नमस्कार असो. श्रीगुरुमहाराजांना नमस्कार असो. श्रीकुलदेवतेला नमस्कार असो. श्रीसीता व श्रीरामचंद्र यांना नमस्कार असो. श्रीसद्‌गुरु साईनाथांना नमस्कार असो.

गतकथेचें अनुसंधान बाबांचें अरुंद फळीवर शयन । अलक्ष्य आरोहण अवतरण । अकळ विंदान तयांचें ॥१॥ असो हिंदू वा यवन । उभयतांसी समसमान । जाहलें आयुर्दाय-पर्यालोचन । तें हैं देवार्चन शिरडीचें ॥२॥ मागच्या कथांची संगती अशी आहे. बाबांचे अरुंद फळीवर झोपणे, कोणालाही न दिसता चढणे आणि उतरणे असे त्यांचे न कळणारे कौशल्य होते. हिंदू असो किंवा मुसलमान असो, दोघांनाही एकसारखीच वागणूक होती. ज्यांच्या जीवनकाळाचे निरीक्षण झाले ते हे शिरडीच्या लोकांचे पूज्य दैवत होते.

आतां हा अध्याय अकरावा । गोड गुरूकथेचा सुहावा । वाटलें साईचरणीं वहावा । दृढ भावा धरूनी ॥३॥ घडेल येणें सगुणध्यान । हे एकादशरुद्रावर्तन । पंचभूतांवर सत्ता प्रमाण । बाबांचें महिमान कळेल ॥४॥ कैसे इंद्र अग्नि वरुण । बाबांच्या वचनास देती मान । आतां करूं तयाचे दिग्दर्शन । श्रोतां अवधान देईंजे ॥५॥ आता वाटते की, हा गोड कथांनी सजविलेला अकरावा अध्याय दृढ भाव धरून श्रीसाईच्या चरणी वहावा. यामुळे बाबांच्या सगुण रूपाचे ध्यान घडेल, रुद्राचे (यजुर्वेदातील रुद्राध्याय नावाच्या प्रसिद्ध मंत्रगटाचे) अकरा वेळा पारायण घडेल, बाबांच्या पंचमहाभूतांवरील सत्तेचा पुरावा सापडेल आणि त्यांचा महिमा कळेल. इंद्र (पर्जन्याची देवता), अग्नी व वरुण (जलाची देवता) बाबांच्या शब्दांना कसे मान देत असत याची आता थोडक्यात माहिती करून घेऊ या. श्रोत्यांनी लक्ष द्यावे.

पूर्ण विरक्तीची विरक्ति । ऐसी साईंची सगुण मूर्ति । अनन्यभक्तां निजविश्रांति । आठवू चित्तीं सप्रेम ॥६॥ गुरूवाक्यैक-विश्वासन । हेंचि बसाया देऊं आसन । सर्वसंकल्पसंन्यासन । करूं पूजन या संकल्पें ॥७॥ प्रतिमा स्थंडिल अग्नि तेज । सूर्यमंडळ उदक द्विज । या सातांहीवरी गुरूराज अनन्य पूजन करूं कीं ॥८॥ चरण धरितां अनन्यभावें । गुरूचि काय परब्रह्म हेलावे । ऐसे गुरूपूजेचे नवलावे । अनुभवावे गुरूभक्तें ॥९॥ साईबाबांचे सगुण रूप म्हणजे मूर्तिमंत पूर्ण वैराग्य व अनन्यपणे भक्ती करणाऱ्यांचे विश्रांतीचे स्थान होय. ते आपण मनात प्रेमपूर्वक आठवू या. गुरुचे वाक्य हेच फक्त खरे मानणे याचे त्यांना बसायला आसन देऊ या आणि सर्व कामनांचा त्याग करणे या संकल्पाने त्यांचे पूजन करू या. प्रतिमा, स्थंडिल (यज्ञ, होम इत्यादींकरिता केलेला साधारण एक हात चौरस व चार अंगुळे उंचीचा मातीचा ओटा), अग्नी, तेज, सूर्यमंडळ, उदक (पाणी) व द्विज (ब्राह्मण) या सातही पूजास्थानांपेक्षा गुरुराज हे श्रेष्ठ आहेत. त्यांचे अनन्यपणे पूजन करू या. अनन्य भावाने चरण धरले असता गुरुच काय, परब्रह्मसुद्धा हलेल, इतके गुरुपूजेचे आश्चर्य आहे. गुरुभक्तांनी त्याचा अनुभव घ्यावा.

पूजक जेथवर साकारू । देहधारीच आवश्यक गुरू । निराकारास निराकारू । हा निर्धारू शास्त्राचा ॥१०॥ न करितां सगुणाचे ध्याना । भक्तिभाव कदा प्रकटेना । आणि सप्रेम जंव भक्ति घडेना । कळी उघडेना मनाची ॥११॥ तें उमलल्यावीण कांहीं केवळ कर्णिकेस गंध नाहीं । ना मकरंद ना भ्रमर पाहीं । तेथ राहील क्षणभरी ॥१२॥ सगुण तेंचि साकार । निर्गुण तें निराकार । भिन्न नाहीं परस्पर । साकार निराकार एकचि ॥१३॥ थिजले तरी तें घृतचि संचलें । विघुरलें तेंही घृतचि म्हणितलें । सगुण निर्गुण एकचि भरलें । समरसले विश्वरूपें ॥१४॥ डोळे भरूनि जे पाहूं येई । पदी ज्याच्या ये ठेवितां डोई । जेथ ज्ञानाची लागे सोई । आवडी होई ते ठायीं ॥१५॥ जयाचियें संगती । प्रेमवार्ता करूं येती । जयासी पूजूं ये गंधाक्षतीं । म्हणूनि आकृति पाहिजे ॥१६॥ निर्गुणाहूनि सगुणाचें । आकलन बहु सुकर साचें । दृढावल्या प्रेम सगुणाचें । निर्गुणाचे बोधन तें ॥१७॥ भक्तां निर्गुण ठायीं पडावें । बाबांनी अनंत उपाय योजावे । अधिकारानुरूप दूर बसवावें । दर्शन वर्जावें बहुकाळ ॥१८॥ एकास देशांतरा पाठवावें । एकास शिरडींत एकांती कोंडावें । एकास वाड्यांत अडकवावें । नेम द्यावे पोथीचे ॥१९॥ वर्षानुवर्ष हा अभ्यास । होतां वाढेल निर्गुणध्यास आसनीं शयनीं भोजनीं मनास । जडेल सहवास बाबांचा ॥२०॥ पूजा करणारा जोवर साकारू (देहाचे भान असलेला) असतो तोवर त्याला गुरुही देहधारीच लागतो.निराकारास (देहाचे भान विसरलेल्या पूजकाला) निराकारू (देहधारी नसलेला, सूक्ष्मरूप असलेला) गुरु लागतो, असा शास्त्राचा निर्णय आहे. सगुणाचे ध्यान केल्याशिवाय भक्तिभाव कधीच प्रगट होत नाही आणि जोवर सप्रेम भक्ती घडत नाही तोवर मनाची कळी उघडत नाही. उमलल्याशिवाय केवळ कळीला वास नसतो, फुलातील मधही नसतो आणि मग भुंगादेखील तेथे क्षणभरसुद्धा थांबत नाही बघा. रूप - गुणसंपन्न म्हणजेच साकार व रूप-गुणाशिवाय म्हणजेच निराकार, दोन्ही एकमेकांपासून भिन्न नाहीत. साकार व निराकार एकच. गोठले, तरी ते तूपच. घट्ट झाले आणि वितळले, तरी त्याला तूपच म्हटले जाते. ब्रह्मदेवाने सगुण व निर्गुण दोन्ही एकत्र करून मिसळून टाकले आहेत. डोळे भरून ज्याला पाहता येते, ज्याच्या पायी डोके ठेवता येते. जेथे ज्ञान प्रत्यक्ष भेटून मिळण्याची सोय असते त्या ठिकाणी आवड उत्पन्न होते. ज्याच्याबरोबर प्रेमाच्या गोष्टी करता येतात. ज्याची गंध व अक्षता लावून पूजा करता येते म्हणून सगुण साकार व्यक्ती पाहिजे. निर्गुणापेक्षा सगुणाचे आकलन होणे खरोखर फार सोपे असते. सगुणाचे प्रेम दृढ झाले की, निर्गुण आपोआप समजले जाते. भक्तांना निर्गुण समजावे म्हणून बाबा अनेक उपाय योजत असत. ज्याच्या - त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याला दूर बसवीत आणि बऱ्याच काळपर्यंत आपले दर्शन घेऊ देत नसत. एकाला शिरडीच्या बाहेर दूर पाठवीत, एकाला शिरडीत एकांतात कोंडून ठेवीत, तर एकाला वाड्यात अडकवून ठेवून पोथी वाचण्याचा नेम सांगत असत. बाळाराम मानकरांना मच्छिंदर गडावर पाठवले. तसेच कुणाला शिर्डीत एकांतात ठेवले होते. उपासनी महाराजांना खंडोबाच्या मंदिरात एकटे ठेवले होते. तसेच ते मशिदीच्या अंगणात कोणाला तरी थांबवून नियमितपणे पोथी वाचायला सांगत. काकासाहेब दीक्षित यांनी रात्री भावार्थ रामायण आणि दिवसा एकनाथी भागवत वाचण्याचा नियम केला. हेतू हा की, वर्षानुवर्षे असा अभ्यास झाला म्हणजे, निर्गुण रूपाचे आतुरतेने सतत चिंतन वाढेल आणि बसले असताना, झोपले असताना आणि जेवण करीत असताना त्यांच्या मनाला बाबांचा सहवास जडेल.

  देह तरी हा नाशिवंत । कधी तरी होणार अंत । म्हणूनि भक्ती न करावी खंत अनाद्यनंत लक्षावें ॥२१॥ हा बहुविध दृश्य पसारा । सकल अव्यक्ताचा सारा । अव्यक्तांतूनि आला आकारा जाणार माघारा अव्यक्तीं ॥२२॥ ही 'आंब्रह्मस्तंब ' सृष्टी । व्यष्टी जैसी तैसी समष्टीं । उपजली ज्या अव्यक्तापोटीं । तेथेंच शेवटी समरसे ॥२३॥ म्हणवूनि कोणासही ना मरण । मग तें बाबांस तरी कोठून । नित्य शुद्धबुद्धनिरंजन निर्मरण श्रीसाई ॥२४॥ कोणी म्हणोत भगवद्भक्त । कोणी म्हणोत महाभागवत । परी आम्हांसी ते साक्षात भगवंत । मूर्तिमंत वाटले ॥२५॥ गंगा समुद्रा भेटू जाते । वाटेनें तापार्ता शीतल करिते । तीरींचे तरूंसी जीवन देते । तृषा हरिते सकळांची ॥२६॥ तैसीच संतांची अवतारस्थिति । प्रकट होती आणि जाती । परी तयांची आचरिती रीती। पावन करिती जगातें ॥२७॥ कमालीची क्षमाशीलता । नैसर्गिक विलक्षण अक्षोभ्यता । ऋजुता मृदुता सोशिकता । तैसीच संतुष्टता निरुपम ॥२८॥ दिसाया जरी देहधारी । तरी तो निर्गुण निर्विकारी । निःसंग निर्मुक्त निज अंतरीं । प्रपंची जरी विचरला ॥२९॥ कृष्ण स्वयें जो परमात्मा । तोही म्हणे संत मदात्मा । संत माझी सजीव प्रतिमा । संतसप्रेमा तो मीच ॥३०॥ प्रतिमारूपही संतां न साजे संत निश्चळ स्वरूप माझें । म्हणवूनि मद्भक्तांचे ओझें । तयांचें लाजें मी वाहें ॥३१॥ संतांसी जो अनन्यशरण । मीही वंदी तयाचे चरण । ऐसें वदला उद्धवा आपण संतमहिमान श्रीकृष्ण ॥३२॥ सगुणांतला जो सगुण । निर्गुणांतला जो निर्गुण । गुणवंतांतील जो अनुत्तम गुण । गुणियांचा गुणिया गुणिराजा ॥३३॥ पर्याप्तकाम जो कृतकृत्य । सदा यदृच्छालाभतृप्त । जो अनवरत आत्मनिरत । सुखदुःखातीत जो ॥३४॥ आत्मानंदाचें जो वैभव । कोणा वर्णवेल तें गौरव । अनिर्वाच्य सर्वथैव । ब्रह्म दैवत मूर्त जो ॥३५॥ की ही अनिर्वचनीय शक्ति । दृश्यरूपें अवतरली क्षितीं । सच्चित्सुखानंदाची मूर्ति । ज्ञानसंवित्ती तीच ती ॥३६॥ ब्रह्माकारांतःकरणमूर्ति । झाली जयाची प्रपंची निवृत्ति । नित्य निष्प्रपंच ब्रह्मात्म्यैक्यस्थिती आनंदमूर्ती केवळ ती ॥३७॥ “आनंदो ब्रह्मेति" श्रुति । श्रोते नित्य श्रवण करिती । पुस्तकज्ञानी पोथींत वाचिती । भाविकां प्रतीती शिरडींत ॥३८॥ धर्माधर्मादि ज्याचें लक्षण तो हा संसार अति विलक्षण अनात्मज्ञांसी क्षणोक्षण । करणे रक्षण प्राप्त कीं ॥ ३९ ॥ परी हा न आत्मज्ञांचा विषय । तयांसी आत्मस्वरूपींच आश्रय । ते नित्यमुक्त आनंदमय । सदा चिन्मयरूप जे ॥४०॥ आपले हे शरीर नाश पावणारे आहे. कधीतरी त्याचा शेवट होणारच आहे. म्हणून भक्तांनी दुःख न करता जन्मरहित व मृत्युरहित परमेश्वराकडे लक्ष द्यावे. हा सृष्टीचा नाना प्रकारचा दिसणारा पसारा म्हणजे मायेचा प्रभाव आहे. हा अव्यक्तातून आकाराला आला आणि अव्यक्तातच माघारा जाईल. ही ब्रह्मापासून लहान झुडुपापर्यंतची सृष्टी, ज्यात एकेकटा जीव व अनेकांचा समूह असलेले ब्रह्मांड समाविष्ट आहे ती अव्यक्तातून आकारा आली आणि त्यातच शेवटी समरस होईल. अशा प्रकारे मरण कोणासच नसते; मग ते साईबाबांना तरी कोठून येईल! श्रीसाई शुद्ध, बुद्ध (ज्ञानी), निरंजन (दोषरहित) व निर्मरण (मरण नसलेले) आहेत. त्यांना कोणी भगवंताचे भक्त म्हणोत की महान वैष्णव म्हणोत. परंतु आम्हाला ते साक्षात मूर्तिमंत भगवंत वाटले. गंगा नदी समुद्राला भेटण्यास जाताना वाटेत उन्हाने तापलेल्यांना थंड करते, काठांवरच्या वृक्षांना पाणी देते आणि सगळ्यांची तहान भागविते.तशीच संतांची अवतारस्थिती असते. ते प्रगट होतात आणि निघून जातात. परंतु त्यांची वागण्याची पद्धत जगाला पापमुक्त करते. बाबांचा क्षमा करण्याचा स्वभाव कमालीचा होता, शांती नैसर्गिक व विलक्षण होती आणि निष्कपटता, कोमलता, सहनशीलता, तशीच सदा समाधानी वृत्ती अजोड होती. दिसायला जरी ते देहधारी होते तरी ते रूपगुणांशिवायचे व काम, क्रोध इत्यादी क्षुब्ध विकारांशिवायचे होते. ते या संसारी जगात फिरत असले, तरी अंत:करणात कोणाचीही संगत नसलेले व सर्व मोहांच्या बंधनांपासून मुक्त होते. कृष्ण स्वतः जो साक्षात् परमेश्वर तोही म्हणतो की, भक्तिपूर्ण संत हे माझेच जीव की प्राण आहेत. ते माझ्या जिवंत मूर्ती आहेत. संत म्हणजे मी स्वत:च आहे. परंतु संतांना प्रतिमांची उपमासुद्धा बरोबर नव्हे. "संत माझेच न ढळणारे रूप आहे; म्हणून त्या माझ्या भक्तांची प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांचे ओझे मी वाहतो. संतांना जो शरण जातो त्याचे मी चरण वंदितो". असे संतांचे माहात्म्य स्वतः श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितले. सर्व सगुण वस्तूंमध्ये जो श्रेष्ठ सगुण वस्तू आहे आणि सर्व निर्गुण वस्तूंमध्ये जो श्रेष्ठ निर्गुण वस्तू आहे, चांगले गुण असलेल्या व्यक्तीमधील जो सर्वांत श्रेष्ठ गुण आहे आणि सर्व गुणीजनांतला जो अत्यंत श्रेष्ठ गुण असलेला असा गुणीजनांचा राजा आहे, जो कृतकृत्य (आपल्या श्रमांचे फळ मिळून समाधान पावलेला), अवाप्तकाम (सर्व इच्छा पूर्ण झालेला) व यदृच्छालाभतृप्त (दैवाने जे लाभेल त्याने संतुष्ट) आहे, जो सतत आपल्या स्वरूपात अत्यंत तल्लीन असून सुख-दुःखांच्या पलीकडे आहे, जो आत्मानंदाचे ऐश्वर्य आहे त्याचा बडेजाव कोणाला वर्णन करता येईल ! जो साक्षात् पूजनीय परमात्मा आहे तो सर्व प्रकारे वर्णन करण्याला अशक्यच असतो. ही वर्णन न करता येणारी शक्ती पृथ्वीवर दिसण्याजोग्या रूपाने अवतरली आहे. सत्य, ज्ञान व आनंदाच्या सुखाची मूर्ती आणि ज्ञानाची पूर्ण ओळख ती हीच; जिचे अंत:करण ब्रह्माशी एकरूप झालेले आहे ती मूर्तीदेखील हीच ! ज्याची प्रपंचापासून निवृत्ती झालेली आहे, ज्याची संसारासंबंधीच्या व्यवहारापासून मुक्त अशी ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्याच्या अनुभवाची स्थिती आहे अशी जी शुद्ध आनंदमूर्ती ती हीच ! "आनंदो ब्रह्मेति" (आनंद म्हणजेच ब्रह्म किंवा परमात्मा) ही श्रुती (तैत्तिरी उपनिषद, वल्ली ३, अनुवाक ६) श्रोते नित्य ऐकतात. पुस्तके वाचणारे पोथीत वाचतात. परंतु भाविक शिर्डीत त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतात, धर्म व अधर्म वगैरे ज्याचे लक्षण आहे असा हा संसार फार विलक्षण आहे. ज्यांना स्वस्वरूपाचे खरे ज्ञान झालेले नाही त्यांना क्षणोक्षणी हा संसार सांभाळावा लागतो; परंतु ज्यांना स्वस्वरूपाचे खरे ज्ञान झालेले आहे त्यांचा संसार हा विषय नव्हे. ते सदा आत्मस्वरूपातच स्थित असतात. ते नित्य मुक्त व आनंदस्वरूप असतात आणि सदा शुद्ध ज्ञानस्वरूप म्हणजे परमात्मरूप असतात.

क्रमश:

॥ श्रीसद्‌गुरुसाईनाथाय नमः ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


स्रोत : हेमाडपंतकृत श्रीसाईसच्चरित आणि कै. मु. ब. निंबाळकर अनुवादित श्रीसाईंचे सत्य चरित्र


Aug 8, 2023

सार्थ श्रीदत्तस्तवस्तोत्रं


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

( दत्तभक्तांच्या खास आग्रहास्तव श्री टेम्ब्येस्वामीविरचित दिव्य श्रीदत्तस्तवस्तोत्र आणि त्याचा भावार्थ )

भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः । दूरादेव पलायंते दत्तात्रेयं नमामि तम् ॥१॥ भावार्थ : ज्या दत्तमहाराजांच्या केवळ नामस्मरणमात्रें भूत, प्रेत, पिशाच्च वगैरे दूर पळून जातात आणि स्मरणकर्त्यास पुन्हा कधीही पीडा देत नाहीत अशा श्रीदत्तमहाराजांना मी नमन करतो. 

यन्नामस्मरणाद्दैन्यं पापं तापश्च नश्यति । भीतिग्रहार्तिदुःस्वप्नं दत्तात्रेयं नमामि तम् ॥२॥ भावार्थ : ज्या श्रीदत्तप्रभूंच्या स्मरणमात्रें दैन्य, पाप आणि त्रास समूळ नाश पावतात, तसेच ज्या दत्तमहाराजांच्या केवळ कृपादृष्टीने सर्व प्रकारची भीती, ग्रहपीडा आणि वाईट स्वप्ने ( व त्यांची अशुभ फळे) नष्ट होतात, त्या दत्तमहाराजांना मी नमन करतो.

    दद्गुस्फोटककुष्ठादि महामारी विषूचिका । नश्यन्त्यन्येऽपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामि तम् ॥३॥ भावार्थ : ज्यांचे केवळ नामस्मरण केले असता स्मरणकर्त्याचे खरूज, फोड, कुष्ठादि त्वचारोग, महामारी, कॉलरा इत्यादि गंभीर रोग व अन्य प्राणघातक रोगदेखील सहजच नष्ट होतात त्या श्रीदत्तात्रेयांना मी नमन करतो.

  सङ्गजा देशकालोत्था अपि साङ्क्रमिका गदाः । शाम्यंति यत्स्मरणतो दत्तात्रेयं नमामि तम् ॥४॥ भावार्थ : ज्यांच्या स्मरणाने संपर्क-देश-काल यांमुळे उद्भवणारे तसेच संसर्गजन्य रोग यांचादेखील उपशम होतो, त्या श्री दत्तात्रेय प्रभूंना मी नमन करतो. 

सर्पवृश्चिकदष्टानां विषार्तानां शरीरिणाम् । यन्नाम शान्तिदं शीघ्रं दत्तात्रेयं नमामि तम् ॥५॥ भावार्थ : साप, विंचू यांसारख्या प्राण्यांच्या दंशामुळे शरीरांत विषबाधा झालेल्या मनुष्यांस ज्यांचे नाम तत्काळ शांती देते (विषाचे शमन करते), अशा श्री दत्तात्रेयांना मी नमन करतो.

त्रिविधोत्पातशमनं विविधारिष्टनाशनम् । यन्नाम क्रूरभीतिघ्नं दत्तात्रेयं नमामि तम् ॥६॥ भावार्थ : ज्यांचे नाम घेतले असता (आधिभौतिक, आध्यात्मिक व आधिदैविक) असे विविध ताप नाहीसे होतात, तसेच ज्यांच्या नामस्मरणामुळे अनेक प्रकारची अरिष्टे व क्रूर प्राण्यांपासूनचे भय यांचाही नायनाट होतो, त्या दत्तमहाराजांना मी नमन करतो.

  वैर्यादिकृतमंत्रादिप्रयोगा यस्य कीर्तनात् । नश्यंति देवबाधाश्च दत्तात्रेयं नमामि तम् ॥७॥ भावार्थ : शत्रू-दुष्ट लोक यांनी केलेली करणी व जारण मारण-मोहनादि सर्व मंत्रप्रयोग तसेच देवी-देवतांचा कोपही ज्यांच्या नामसंकीर्तनाने नष्ट होतात, त्या श्रीदत्तात्रेयांना मी नमन करतो. 

यच्छिष्यस्मरणात्सद्यो गतनष्टादि लभ्यते । य ईशः सर्वतस्त्राता दत्तात्रेयं नमामि तम् ॥८॥ भावार्थ : ज्यांच्या ( सहस्त्रार्जुन म्हणजेच कार्तवीर्य या ) शिष्याचे स्मरण केले असता हरवलेली अथवा न सापडणारी वस्तू मिळते, आणि जो सर्व बाजूंनी नेहेमीच आपल्या भक्तांचे रक्षण करतो, त्या श्रीदतात्रेयांना मी नमन करतो.

जयलाभयशःकामदातुर्दत्तस्य यः स्तवम् । भोगमोक्षप्रदस्येमं पठेद्दत्तप्रियो भवेत् ॥९॥ भावार्थ : जयप्राप्ती, यश आणि इच्छापूर्ती करणारे, तसेच ऐहिक भोग व पारमार्थिक सुख प्रदान करणारे श्री भगवान दत्तात्रेयांचे हे स्तोत्र जो मनुष्य श्रद्धेने पठण करेल, तो दत्तमहाराजांना अत्यंत प्रिय होईल. ( हे श्री टेम्ब्येस्वामी महाराजांचे वचन आहे.) ॥ इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं दत्तस्तवस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


Aug 2, 2023

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय ९


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे सगुणस्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभागातटविहारा, हे श्रीसंतवरदा शारंगधरा, हे पतितपावना दयानिधे (तुला नमन असो.)॥१॥ ज्याप्रमाणें लहानांशिवाय मोठयांचा मोठेपणा सिद्ध होत नाही, त्याचप्रमाणें पातकी मनुष्यांशिवाय परमेश्वराचा बोलबाला होत नाही.॥२॥ आम्हीं पतित आहोत, म्हणूनच तर तुला (जन) पावनकर्ता रुक्मिणीकांत म्हणतात, हे आतां तू विसरू नकोस.॥३॥ परिस लोहाला सोनें बनविते, म्हणूनच ह्या भूमीवर त्याचे महत्त्व आहें. गोदावरी ओहोळांस आपल्यात सामावून घेते, म्हणूनच त्यांतील जलाला तीर्थाची योग्यता प्राप्त होते.॥४॥ हे माधवा, (कृपा करून) ह्या गोष्टींचा विचार आपल्या चित्तीं करावा. या दासगणूला आपला हात द्यावा आणि कोठेंही बुडू न द्यावे.॥५॥ असो. गोविंदबुवा टाकळीकर नावाचा एक थोर हरिदास ( वऱ्हाडप्रांती ) होता. तो गजर-कीर्तन करण्यासाठीं शेगांवात आला.॥६॥ तिथे ( शेगांवात ) एक शिवाचें पुरातन मंदिर होते. मोटे नामक एका सावकारानें त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.॥७॥ सध्याच्या काळांतील श्रीमंतांना मंदिर आदिंचा कंटाळा येतो. मोटार-बायसिकल, क्लब या गोष्टींचीच त्यांना आवड असते.॥८॥ मात्र मोटे सरकार त्यांस अपवाद होता. हा अतिशय श्रीमंत असूनही फार भाविक होता. त्यानेच या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.॥९॥ म्हणून ' मोट्याचे मंदिर ' असे सर्व लोक त्या मंदिरास म्हणू लागले. श्रोतें हो, तिथें काय प्रकार घडला तो तुम्हीं ऐका.॥१०॥ त्याच मोट्याच्या मंदिरांत कीर्तनकार टाकळीकर उतरलें होते. त्यांचा घोडा मंदिरासमोरच बांधला होता.॥११॥ तो घोडा अतिशय द्वाड होता. कोणासही लाथा मारायचा. त्याच्या समोर कोणी आलें, तर एखाद्या कुत्र्यासारखा त्या मनुष्यास तो चावायचा.॥१२॥ नेहेमीच चऱ्हाटें तोडायचा. तो घोडा एक क्षणभरही स्थिर रहात नसे. कधीं कधीं तर जंगलातही पळून जात असे.॥१३॥ रात्रंदिवस खिंकाळत असे. अश्या अनेक वाईट सवयी त्या घोड्याच्या अंगी होत्या.॥१४॥ शेवटी, त्या घोड्यास बांधण्यासाठी लोखंडाच्या सांखळ्या (गोविंदबुवांनी) बनवून घेतल्या होत्या. ह्यावेळीं (अनावधानानें गोविंदबुवा) त्या सांखळ्या टाकळीतच विसरून आले होते.॥१५॥ चऱ्हाटानें कसा तरी तो घोडा मंदिरासमोर बांधून कथेकरीबुवा (रात्री) शय्येला जाऊन झोपलें.॥१६॥ रात्रीचें दोन प्रहर उलटून गेलें होते. साऱ्या आकाशांत काळोखाचे साम्राज्य पसरलें होते. वृक्षांवरील निशाचरांचे घुत्कार ऐकू येत होतें.॥१७॥ टिटव्यां ' टी टी ' असा आवाज करीत होत्या. वटवाघुळें भक्ष्य शोधण्यास बाहेर पडली होती. पिंगळे (घुबडं) झाडांवर बसून घुमत होते.॥१८॥ जिकडे तिकडे सामसुम झालीं होती. सर्व घरांचे दरवाजे कधीच बंद झाले होते. एकही मनुष्य (शेगांवांतील) रस्त्यांवर दृष्टीस पडत नव्हता.॥१९॥ अशा भर रात्रीच्या समयास, पुण्यपुरुष श्रीगजानन महाराज जिथे घोडा बांधला होता, त्या ठिकाणी सहजच आले.॥२०॥ खरे तर साधुपुरुष, जे कोणी द्वाड असतात, त्यांस सन्मार्गी लावण्यासाठीच ईश्वराच्या आज्ञेनें या भूमीवर अवतार घेतात.॥२१॥ जसे औषधाचे प्रयोजन रोग-व्याधी निवारणासाठी असते, तसेच साधुसंत द्वाडांचे द्वाडपण दूर करतात.॥२२॥ असो. अश्या त्या रात्रीच्या वेळीं गजाननस्वामी घोड्याजवळ आले आणि त्या घोड्याच्या चार पायांत जाऊन अगदी आनंदात झोपले.॥२३॥ नेहेमीप्रमाणेच ' गणी गण गणांत बोते ' हे भजन त्यांच्या मुखीं चालले होते. या भजनाचा सांकेतिक अर्थ जाणण्यास कोण समर्थ आहे, लोकहो?॥२४॥ त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ पुढीलप्रमाणें असावा असे वाटतें. गणी ह्या शब्दाचा अर्थ मोजणें असाच आहे.॥२५॥ जीवात्मा म्हणजेच गण होय. तो ब्रह्माहून भिन्न-वेगळा नाही, हे सुचवण्यासाठी गणांत हा शब्द वापरला गेला आहे.॥२६॥ बोते हा शब्द अपभ्रंश असावा असे वाटते. त्याऐवजी तिथे बाते हा मूळ शब्द असावा असे नि:संशय वाटते.॥२७॥ बाया शब्दाचा अर्थ मन असा आहे आणि 'तें' हे सर्वनाम शब्दासाठी वापरले आहे.॥२८॥ म्हणजेच हे मना,' जीव हाच ब्रह्म आहे, हे सत्य आहे. त्यास ब्रह्मापासून निराळा मानू नकोस. ते दोन्ही एकच आहेत.' हे नेहेमी ध्यानांत ठेव.॥२९॥ या भजनाविषयीं शेगांवांत दोन मतांतरे आहेत. काही जण ' गिणगिण गिणांत बोते ' तर काही जण ' गणी गण गणांत बोते ' असे तें भजन असल्याचे सांगतात.॥३०॥आपल्याला त्या भजनाचे खरे शब्द काय होते? हे जाणण्याचे काही कारण नाही. आपण मुख्य कथेकडें वळू या. तर महाराज घोड्याच्या चार पायांत येऊन झोपले.॥३१॥ अत्यंत आनंदात वरील भजन त्यांच्या मुखीं चालले होते. जणू काही या भजनरूप सांखळीने त्यांनी घोडा बांधला होता.॥३२॥ गोविंदबुवांच्या मनांत (घोड्याच्या खोड्यांची) फार जबरदस्त भीती होती. त्यामुळें ते वरचेवर उठून त्या घोड्याला बघून येत होते.॥३३॥ तेव्हां त्या बांधलेल्या ठिकाणी तो शांत उभा राहिलेला त्यांस दिसला. ते दृश्य पाहून गोविंदबुवा आश्चर्यचकित झाले.॥३४॥ ते मनांत विचार करू लागले, हे कसे शक्य आहे ? किंवा काही आजाराने ग्रस्त तर झाला नाही ना ?॥३५॥ कदाचित म्हणूनच हा इतका वेळ शांत उभा आहे. हा असा आजपर्यंत कधीच स्थिरावला नाही, याचे काय कारण असावे? हे काही कळून येत नाही.॥३६॥ त्या घोड्यास जवळ जाऊन बघावे असा विचार करून ते तिथे गेले, तोच त्या द्वाड घोड्याच्या चार पायांत एक माणूस झोपलेला आहे,हे त्यांनी पहिले.॥३७॥ गोविंदबुवा अगदी जवळ जाऊन त्या मनुष्यास पाहू लागले, तोच त्यांना कैवल्यदानी समर्थ दिसले.॥३८॥ " माझा घोडा का बरे इतका शांत झाला? हे सकारण मला आता कळून आले." असे ते (कीर्तनकार) मनांत म्हणाले.॥३९॥ समर्थांच्या सहवासानेच हा घोडा शांत (आणि शहाणा) झाला, हे नक्की. जिथे कस्तुरी असते, तिथे दुर्गंधीला कधीच थारा नसतो.॥४०॥ अत्यंत आदरानें गोविंदबुवांनी समर्थांच्या चरणीं आपले मस्तक ठेवले. त्यांच्या मनांत अष्टभाव दाटले होते.॥४१॥ आणि ते मुखाने समर्थांचे स्तवन करू लागले, " आपण खरोखरच गजानन आहांत. सर्व विघ्नांचे हरण आपण करतां. मला आजच याचा प्रत्यय आला आहे.॥४२॥ माझा घोडा अतिशय द्वाड होता, सर्व लोक त्याला घाबरायचे. हे गुरुमूर्ती, त्याचा हा द्वाडपणा दूर करण्यासाठीच आपण इथे आलात.॥४३॥ ह्या घोड्याच्या खोड्यां अगदी अचाट होत्या. महाराज, हा दुर्गुणी घोडा चालतां चालतां मध्येच उडी मारायचा, मागील पायांनी लाथाही मारायचा.॥४४॥ मी अगदीच त्रासून गेलो होतो. म्हणूनच बाजारांत ह्यास विकायलाही घेऊन गेलो होतो. पण कोणीही ह्या घोड्यास घेईना.॥४५॥ फुकटही द्यायला लागलो, तरीही कुणी घ्यायला तयार होईना. त्यावर आपण कृपा केली, हे फार बरें झाले.॥४६॥ आम्हां कथेकऱ्यांचे घोडे खरे तर गरीब असायला पाहिजे. धनगराच्या घरी वाघ कधी कामाचा (उपयोगी) असतो का?"॥४७॥ श्रोते हो, असा प्रकार घडून ते घोडे फार गरीब झाले. स्वामी जडजीवांचा उध्दार करण्यासाठीच (या भूमीवर) अवतरले होते.॥४८॥ श्री समर्थ त्या घोड्यास म्हणाले, "गड्या, आता इथून पुढें तू खोड्या करू नकोस. त्या अवघ्या वाईट सवयी इथेच सोडून दे.॥४९॥ तू शिवशंकरांच्या समोर आहेस, ह्याचा काही तरी विचार कर. बैलाप्रमाणे (आज्ञाधारक होऊन) वागत जा आणि कोणालाही त्रास देऊ नकोस."॥५०॥ असे त्यास बोलून दयाघन तिथून निघून गेले. समर्थांच्या केवळ कृपाकटाक्षाने पशुही त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागू लागला.॥५१॥ असो. श्रोतेहो, दुसऱ्या दिवशी पुण्यराशी गजानन महाराज मळ्यांत असतांना गोविंदबुवा आपल्या घोड्यावर बसून श्रींच्या दर्शनास आले.॥५२॥ गोविंदबुवांचा तो घोडा कसा आहे ते साऱ्या शेगांवांस ठाऊक होते. अवघ्या वाईट सवयींची खाण असलेल्या त्या घोड्यास सर्व लोक घाबरत होते.॥५३॥ त्यामुळें तो घोडा मळ्यांत आलेला पाहून तिथे असलेले लोक बोलू लागले, "गोविंदबुवा, ही पीडा इथे कशास घेऊन आला आहात? या मळ्यांत अनेक बायका-लहान मुले वावरत आहेत. तुमचा हा घोडा त्याच्या सवयीने कोणासही हानी पोहोचवेल."॥५४-५५॥ त्यावर गोविंदबुवा उत्तरले, " तुमचे म्हणणे मला अगदीच मान्य आहे, पण काल रात्रीं समर्थांनी माझ्या ह्या घोड्यास शहाणें केले. त्यानें त्याच्या सर्व खोड्या टाकून दिल्या आहेत आणि तो गोगलगायीसारखा गरीब झाला आहे. आतां कोणीही त्याला घाबरण्याचे कारण नाही."॥५६-५७॥ टाकळीकरांनी तो घोडा एका चिंचेच्या वृक्षाखाली उभा केला होता. त्यास चऱ्हाटही बांधले नव्हते, तरीही तो तसाच एक प्रहर शांत उभा राहिला.॥५८॥ त्या मळ्यांत कितीतरी भाजीपाला, कोवळें गवत होते. पण त्या एकाही गोष्टीला त्या घोड्याने तोंड लावले नाही.॥५९॥ पहा बरें, संतांच्या वचनांतही केवढी शक्ती असते. अगदी पशुही त्यांचे आज्ञापालन करतात. गोविंदबुवांनी पत्र्यांच्या झोपडींत येऊन (कृतज्ञतेने) समर्थांचे स्तवन आरंभ केले.॥६०॥
श्लोक ( पृथ्वी वृत्त )
अचिंत्य जगताप्रती कृति तुझी न कोणा कळे । असो खलहि केवढा तव कृपें सुमार्गी वळे ॥
उणें पुढति ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी । शिरीं सतत माझिया वरदहस्त ठेवा झणीं ॥१॥
अनाकलनीय अशी तुझी कृती या जगतांत कोणासही उमजत नाही. कितीही दुष्ट प्राणी असू दे, तुझ्या कृपेनें सन्मार्गालाच लागतो. अनेक रत्नें, चिंतामणीही (ह्यांचे तेज, महती) तुझ्या समोर खचितच फिके, उणें आहेत. हे दयाळा, माझ्या मस्तकीं तुमचा वरदहस्त सतत असू द्या.॥१॥समर्थांची अशी स्तुती करून गोविंदबुवा आपल्या घोड्यास घेऊन टाकळी गांवी निघून गेले.॥६१॥ श्रोते हो, त्या शेगांवांत दररोज किती तरी समर्थांचे भक्त गण आपल्या मनांत काही हेतू धरून येत असत.॥६२॥ अशाच काही यात्रेकरू मंडळींत बाळापूरचे दोन गृहस्थ काही तरी इच्छापूर्तीसाठी समर्थांच्या दर्शनास आले होते.॥६३॥ दर्शन घेऊन परतीचा मार्गक्रमण करतांना ते एकमेकांस बोलू लागले की पुढच्या शेगांव वारीस येतांना आपण सुका गांजा घेऊन येऊ या.॥६४॥ कारण, समर्थांना या गांजाची फार आवड आहे. त्यामुळें तो आपण जर आणला, तर त्यांची आपल्यावर कृपा होईल.॥६५॥ इतर लोक खवा, बर्फी आणतात. पण आपण मात्र महाराजांना प्रिय असलेला गांजाच नेऊ या. चला, खूणगांठ म्हणून आपल्या धोतरांस गाठ बांधू या, नाही तर याची विस्मृती होईल.॥६६॥ पुढल्या वारीस पुन्हा ते दोघें गृहस्थ महाराजांच्या दर्शनास आले. परंतु बोलल्याप्रमाणें गांजा आणायचे पार विसरून गेले.॥६७॥ समर्थांच्या चरणी मस्तक टेकवल्यावर मात्र त्यांना एकदम आठवलें की आपण गांजा काही अर्पण करण्यास आणला नाही.॥६८॥ मग पुढच्या वारीस येतांना आपण दुप्पट गांजा आणू या, असा मनीं निर्धार करून तें दर्शन होताच परत आपल्या गांवी गेले.॥६९॥ मात्र त्या पुढच्या वारीसही परत तसेच घडलें. ते दोघेंही गांजा आणण्याचे पार विसरून गेले. समर्थांसमोर हात जोडून बसल्यावरदेखील त्यांना गांजाच्या नवसाची काही आठवण झाली नाही.॥७०॥ तेव्हां स्वामी भास्करास म्हणाले, " जगाची रीत पाहा, कशी आहे. काही लोक धोतरांस गाठ मारूनही ती वस्तू आणण्यास विसरतात.॥७१॥ जातीनें ब्राह्मण असूनही, आपलें बोलणें आपल्याच वर्तनानें सर्व बाबतीत खोटें करतात.॥७२॥ ब्राह्मणांचे बोलणें कधीही असत्य असू नये, या तत्त्वाला जे जाणत नाहीत ते चांडाळ असतात.॥७३॥ आपला निजधर्म या ब्राह्मणांनी सोडला, आचार विचार आदींचा त्याग केला, त्यामुळेंच तर सध्या आपल्या श्रेष्ठत्वाला ते अंतरले आहेत.॥७४॥ पठ्ठे, मनांत नवस करतात, पण येतांना मात्र हात हालवत येतात. अशा वागण्याने का त्यांच्या अंतरीचे मनोरथ पूर्ण होतील?॥७५॥ बोलण्यांत आणि वागण्यांत मेळ असला पाहिजे. चित्तही निर्मळ असावे. भास्करा, तरच तो घननीळ कृपावर्षाव करतो."॥७६॥ समर्थांचे हे शब्द त्या दोघांच्या मनास अतिशय लागले. तें एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागले.॥७७॥ पाहा बरे, यांचे ज्ञान केवढें अगाध आणि परिपूर्ण आहे. हा गजानन, सूर्याप्रमाणेच पूर्ण जगतावर दृष्टी ठेऊन आहे.॥७८॥ आपण जरी मनांत नवस बोलला होता, तरी समर्थांना तो कळला. चला, आता तरी आपण गांवांतून गांजा घेऊन येऊ या.॥७९॥ असा विचार करून (ते दोन गृहस्थ) उठले आणि गांजा आणण्यासाठी गांवांत जाऊ लागले. तेव्हा महाराज त्या दोघांस म्हणाले, " आता उगाच शिळ्या कढीला का उकळी आणता? याचा काहीही उपयोग नाही. मी काही गांज्यासाठी आसुसलेला नाही.॥८०-८१॥ आता आपण गांजा आणण्यासाठी गांवांतील पेठेंत जाऊ नका. मात्र आपल्या बोलण्या-वागण्यांत तुम्हीं कायम खरेपणा ठेवा.॥८२॥ लबाड मनुष्याचे हेतु कधीही पूर्ण होत नाहीत, ही तुम्हीं आपल्या मनीं खूणगांठ बांधा. तुमचे काम झाल्यावर, तुमची इच्छा असल्यास गांजा आणा.॥८३॥ पुढील आठवड्यांत तुमचे काम अतिशय उत्तमरीत्या पार पडेल. पण, येथील पाच वाऱ्या मात्र नेम न चुकवतां अवश्य करा.॥८४॥ कारण इथें साक्षात मृडानीपती कर्पूरगौराचे वास्तव्य आहे, ज्याच्या कृपेनें कुबेर या जगांत ऐश्वर्यसंपन्न झाला.॥८५॥ जा, आता त्यास नमस्कार करा आणि (पुढील आठवड्यांत) गांजा आणण्यास विसरू नका. मानवांनी परमार्थांत थोडेसुद्धा खोटें बोलूं नये."॥८६॥ असा उपदेश ऐकून त्यांनी महाराजांस (सद्‌गदीत होऊन) वंदन केले. त्यानंतर शिवाचें दर्शन घेऊन ते दोघें बाळापूरास गेले.॥८७॥ (समर्थांच्या वचनाप्रमाणेच) पुढील आठवड्यांत त्यांचे काम सफल झाले. (नवस केल्यानुसार) ते दोघेंही शेगांवांत वारीला येतांना गांजा घेऊन आले.॥८८॥ श्रोतें हो, त्या बाळापुरांत घडलेली दुसरी एक कथा आतां तुम्ही ऐका. बाळापुरांत बाळकृष्ण नावाचा एक रामदासी रहात होता.॥८९॥ त्याची पुतळाबाई नावाची परम भाविक पत्नी होती. तें दरवर्षीं सज्जनगडाच्या वारीस पायीं जात असत.॥९०॥ पौष महिन्यांत ते पती-पत्नी वारीसाठी तयारी करून निघत असत. ओझ्यासाठी एक घोडें त्यांच्या बरोबर असे.॥९१॥ सामानांत कुबडी, कंथा, दासबोध आदी पूजाअर्चा, पारायणासाठी साहित्य असे. त्या रामदास्याला साधुत्वाचा अहंकार अजिबात नव्हता.॥९२॥ वारीचा मार्गक्रमण करतांना ते पती-पत्नी वाटेत लागलेल्या गांवांत झोळी फिरवून भिक्षा मागत असत. त्या मिळालेल्या भिक्षेतूनच श्रीरामांस नैवेद्य करून दाखवत असत.॥९३॥ पौष वद्य नवमीला तो बाळापूरहून प्रयाण करीत असे. पुतळाबाई नावांची त्याची पत्नी त्याच्याबरोबर असे.॥९४॥ बाळकृष्णबुवांच्या हातांत चंदनाच्या चिपळ्या असत, तर पुतळाबाई झांज हातीं घेऊन त्यास साथ देत असे.॥९५॥ मार्गक्रमण करीत असतां दोघेंही रघुपतीचा नामगजर करीत असत. त्यांच्या वारीचा मार्ग शेगांव, खामगांव, पुढें देऊळगांवराजा असे.॥९६॥ त्यानंतर ते पती-पत्नी जालनापुरींस आनंदीस्वामींस वंदन करून जांब नगरींत येत असत. तिथे मात्र तीन दिवस त्यांचा मुक्काम असे.॥९७॥ त्याचे कारण असे की जांब हे समर्थांचे जन्मस्थान आहे. पुढें दिवऱ्यास येऊन गोदावरी मातेला वंदन करीत असत.॥९८॥ मग आंबेजोगाईचे बीड, बेलेश्वर स्वामींचे मोहोरी, आणि डोमगांवी येऊन समर्थांचे पट्टशिष्य कल्याण यांचे दर्शन घेऊन नमन करीत असत.॥९९॥ त्यानंतरचा त्यांचा मार्ग नरसिंगपूर, पंढरपूर, नातेपोतें, शिंगणापूर, वाई असा असे. पुढें गडाच्या पायथ्याशी असलेल्या सातारा नगरीत तें येत असत.॥१००॥ माघ वद्य प्रतिपदेला तो श्रीसज्जनगडावर, तेथील दासनवमीच्या उत्सवासाठी पोहोचत असे.॥१०१॥ (तिथें बाळकृष्णबुवा) श्री स्वामीं समर्थांसाठी यथाशक्ती ब्राह्मणभोजन घालीत असे. असा तो खरोखर रामदासी होता.॥१०२॥ असें रामदासी आतां होणे सर्वथा कठीण आहे. दासनवमीचा उत्सव संपन्न झाल्यावर तो परत त्याच मार्गानें परत (बाळापुरास) जाई.॥१०३॥ बाळकृष्णबुवांचा वारीचा असा क्रम बरेच वर्षें चालला होता. त्याचे वयही साठीच्या वर झाले होते.॥१०४॥ दरवर्षी माघ वद्य द्वादशीस सज्जनगड सोडून आपल्या गांवास, बाळापूरास परत जाण्यासाठी तो निघत असे.॥१०५॥ असो. त्या वद्य एकादशीच्या दिवशी, समर्थ रामदासस्वामींच्या समाधीपाशी तो उदास होऊन बसला होता. बाळकृष्णबुवांच्या डोळ्यांत दु:खाश्रु आले, अन एक शब्दही त्यास बोलवेना.॥१०६॥ हे रामदास स्वामी समर्था, हे गुरुराया, पुण्यवंता ! माझें शरीर आतां (वार्धक्यानें) थकले आहे. आता पायीं वारी करणे शक्य होईल असे वाटत नाही.॥१०७॥ हे दयाळा, या सज्जनगडांस जरी वाहनांत बसून यावें म्हंटले, तरी तेसुद्धा मला कठीणच दिसतें आहे.॥१०८॥ आजपर्यंत ही वारी नेमानें घडली, आतां मात्र त्यांत खंड पडेल असे वाटते आहे. परमार्थ करण्यासाठी निकोप शरीराची आवश्यकता असते.॥१०९॥ तें असल्यावरच सर्व योग्य प्रकारें घडते. हे माझी आई रामदासा, हे सर्व आपणांस सांगण्याची काहीच जरुरी नाही. आपण हे सर्व जाणता.॥११०॥ अशी प्रार्थना करून, तो शय्येस जाऊन झोपला. बाळकृष्णबुवाला त्या प्रभातकाळीं एक स्वप्न पडले.॥१११॥ (स्वप्नांत) रामदासस्वामींनी त्यास दर्शन देऊन सांगितले, " बाळा, तू असा हताश होऊ नकोस. बाळापूरहून खास या सज्जनगडावरही येऊ नकोस.॥११२॥ माझी कृपा तुझ्यावर नेहेमीच राहील. माझा उत्सव तू आपल्या घरीं, बाळापूरास कर. मी नवमीला तिथें येऊन तुला दर्शन देईन. हे माझें सत्य वचन आहे. अरे, आपल्या शक्तीप्रमाणे परमार्थाचे आचरण करावे."॥११३-११४॥ असा तो स्वप्न-दृष्टांत पाहून बाळकृष्णबुवांना आनंद झाला. आपल्या पत्नीसह ते बाळापूरास आपल्या घरीं परतले.॥११५॥ श्रोतें हो, पुढें दुसऱ्या वर्षी माघ महिन्यांत त्या बाळापूरास काय घडलें, ते ऐका.॥११६॥ बाळापुरांत बाळकृष्णबुवांनी माघ वद्य प्रतिपदेस आपल्या घरी समर्थांच्या उत्सवास आरंभ केला.॥११७॥ दासबोधाचे वाचन, दुसऱ्या प्रहरी ब्राह्मणभोजन, संध्याकाळी धूप-आरती आणि रात्रींस हरिकीर्तन (असा प्रत्येक दिवसाचा नित्यक्रम होता ).॥११८॥ स्वामी समर्थ नवमीला आपल्या घरी कसे येतील बरें? हाच विचार बाळकृष्णाच्या मनांत सतत घोळत असायचा.॥११९॥ बाळकृष्णाच्या दृष्टांतावर विश्वास ठेऊन उत्सवास मदत व्हावी, यासाठी गावकऱ्यांनी आपापसांत वर्गणी काढली होती.॥१२०॥ असा भरगच्च कार्यक्रम नऊ दिवस उत्साहांत होत होता. नवव्या दिवशी, दुसऱ्या प्रहरी एक अघटित घडले.॥१२१॥ श्रोतें, त्या बाळापुरांत दासनवमीच्या दिवशी, दुसऱ्या प्रहरी साक्षात्कारी श्री गजानन महाराजांचे आगमन झाले.॥१२२॥ बाळकृष्णाच्या घरांत श्रीराम अभिषेक सुरु होता अन त्याच वेळीं त्याच्या दारांत महाराजांना पाहून लोक आश्चर्यचकित झाले.॥१२३॥ आणि बुवांस म्हणू लागले, " तुम्हीं लवकर उठा, तुमच्या दासनवमीच्या उत्सवासाठी श्री गजानन महाराज तुमच्या दारी उभें ठाकले आहेत."॥१२४॥ त्यावर बुवा उत्तरले, " गजानन महाराज आज इथें आले ते फार बरें झाले. त्याही संतपुरुषाचे पाय माझ्या घरांस लागले.॥१२५॥ पण, आज या (दासनवमीच्या) दिवशी मी त्या सज्जनगडांवर निवास करणाऱ्या समर्थांची अतिशय आतुरतेनें वाट पाहतो आहे.॥१२६॥ मी नवमीला तुझ्या घरीं येईन, असे त्यांनी मला वचन दिले आहे. ते कदापिही असत्य होणार नाही, असा मला दृढ विश्वास आहे."॥१२७॥ इकडे स्वामी गजानन दारांत उभे राहून 'जय जय रघुवीर' हा श्लोक म्हणू लागले.॥१२८॥ श्लोक - अहिल्या शिळा राघवें मुक्त केली । पदीं लागतां दिव्य होऊनि गेली महाराजांच्या अमोघ वाणींत हा श्लोक ऐकताच बाळकृष्णाची स्वारी त्वरेनें उठली.॥१२९॥ द्वारीं येऊन तो पाहू लागताच, त्याला गजाननाची आजानुबाहू, नग्न, निजानंदी रमलेली, साजिरी स्वारी उभी असलेली दिसली.॥१३०॥ त्यांस नमस्कार करण्यास तो झुकत असतांना त्यास साक्षात रामदास स्वामी त्या जागी दिसले. त्यांच्या हातीं कुबडी होती आणि पाठीवर जटाभार रुळत होता.॥१३१॥ त्यांच्या भव्य कपाळीं गोपीचंदनाचा उभा त्रिपुंड्र रेखलेला होता. त्यांनी नेसलेल्या लंगोटीचा रंग हिरमुजी होता.॥१३२॥ श्रोतें हो, असे तें दिव्य रूप पाहून बाळकृष्णास प्रेमाचें भरतें आलें. त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रु आलें.॥१३३॥ अचानक त्याला परत तिथें गजानन महाराज दिसू लागले. त्यांच्याजवळ ना कुबडी होती ना लंगोटी वा त्रिपुंड्र, मस्तकावर जटाभार असे काहीच नव्हते.॥१३४॥ पुन्हा त्यानें हताश होऊन पाहावे, तो रामदास स्वामी दृष्टींस पडायचे. पण पुन्हा निरखून पाहिल्यास परत गजानन महाराजच दिसायचे.॥१३५॥ एखाद्या सिनेमातील दृश्याप्रमाणें ती नवलाईची गोष्ट तिथें घडत होती. शेवटी तो पुरता गोंधळून गेला. ह्या कोडयाचां त्यास काहीच उलगडा होईना.॥१३६॥ अखेर गजानन स्वामी त्या रामदास्यास ममत्वानें म्हणाले, " असा, गांगरून जाऊ नकोस. तुझा समर्थ मीच आहे रे! ॥१३७॥ पूर्वी (सज्जन)गडावर माझीच तर वस्ती होती, बापा ! सांप्रत शेगांवांत मळ्यांत येऊन राहिलो आहे.॥१३८॥ तुला सज्जनगडांवर वचन दिलें होते की ह्या दासनवमीस मी बाळापुरांस येईन. ह्याचे स्मरण तुला आहे का ?॥१३९॥ त्या वचनाची पूर्तता करण्यासाठीच मी इथें आलो आहे. तू अवघी चिंता करणें सोडून दे. अरे, मीच रामदास आहे.॥१४०॥ या शरीररूपी वस्त्रांस तू किंमत देतोस आणि आत्म्याला मात्र विसरतोस, याला आता मी काय म्हणावें ?॥१४१॥ " वासांसि जीर्णानि " हा गीतेंतील श्लोक तू आठवून पाहा. तेव्हां असा मुळीच भ्रमिष्ट होऊ नकोस. चल, मला आतां पाटावर बसव."॥१४२॥ बाळकृष्णाचा हात धरून श्री गजानन घरांत आले. स्वामी गजानन एका मोठ्या पाटावर स्थानापन्न झाले.॥१४३॥ गजानन महाराजांच्या आगमनाची वार्ता साऱ्या बाळापुरांत पसरली. सर्व गांवकरी मंडळी त्यांच्या दर्शनासाठी तिथें सत्वर येऊ लागली.॥१४४॥ रामदासी (बाळकृष्णबुवा) अवघ्या दिवसभर (त्यांस पडलेल्या कोड्याचाच) विचार करीत राहिला. शेवटीं रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी बाळकृष्णास स्वप्न पडले.॥१४५॥ (स्वप्नीं श्री रामदासस्वामीं आले आणि त्यांनी बाळकृष्णास बोध केला.)" अरे, हल्ली तुमच्या वऱ्हाडप्रांतांत गजाननरुपी माझीच मूर्ती आहे. आपल्या मनांत असा संशय मुळीच घेऊ नकोस. असा शंकित राहिल्यास तू अधोगतीला जाशील.॥१४६॥ गजानन हे माझेच रूप आहे, तेव्हा मी तोच समजून त्यांचे पूजन कर. गीतेत ' संशयात्मा विनश्यति ' असे वचन आहे.(तें लक्षात घे.)"॥१४७॥ असा स्वप्न-दृष्टांत झाल्यावर बाळकृष्णास अतिशय आनंद झाला. (संशयरहित होऊन) अत्यंत आदरानें त्याने आपले मस्तक गजानन महाराजांच्या चरणीं ठेवले.॥१४८॥ (आणि म्हणाला,) " महाराज, आपली लीला समजण्यास मी असमर्थ ठरलो, मात्र तुम्हीं स्वप्नीं येऊन माझ्या शंकेचे निवारण केलेत.॥१४९॥ माझा नवमीचा उत्सव यथासांग पार पडला. त्यात काहीच न्यूनता राहिली नाही. या बालकावर आपण केवढी कृपा केलीत, त्यांमुळे मी धन्य, कृतार्थ झालो.॥१५०॥ आतां काही दिवस माझ्या सदनीं या बाळापुरांत आपण राहावे, अशी माझी इच्छा आहे. ती तेवढी पूर्ण करा." ॥१५१॥ त्यावर महाराज उत्तरले, " तू माझा विचार ऐक. कांही दिवसांनंतर मी बाळापुरास येईन."॥१५२॥ भोजन झाल्यावर गजानन स्वामींनी तेथून प्रयाण केले.कोणासही ते रस्त्यानें जातांना दिसले नाहीत, एका क्षणांत जणू ते शेगांवांत पोहोचले.॥१५३॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित हा गजाननविजय नांवाचा ग्रंथ भाविकांस सुखदायक होवों, हेच दासगणू इच्छितो.॥१५४॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥इति नवमोऽध्यायः समाप्तः ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


श्री गजानन विजय कथामृत अध्याय १ ते ८ इथे वाचता येतील.


अवश्य वाचावे असे काही :

श्रीगजानन महाराज चरित्र कोश - ( लेखन, संशोधन - दासभार्गव )