Aug 30, 2023

अथ श्रीसाईसच्चरिते श्रीसाईमहिमावर्णनं - सार्थ श्री साई रुद्राध्याय (४)



॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ अथ श्रीसाईसच्चरित अध्याय ११ ॥ श्रीसाईमहिमा वर्णनं

(श्रीसाईबाबांच्या प्रभावाचे वर्णन)


असो एकदां साईसमर्था । मेघावरीही जयाची सत्ता । तया इंद्रासी पाहिले प्रार्थितां । आश्चर्य चित्ता दाटलें ॥११४॥ अति भयंकर होता समय । नभ समग्र भरलें तमोमय । पशुपक्षियां उद्भवलें भय । झंजा वायू सुटला ॥११५॥ झाला सूर्यास्त सायंकाळ । उठली एकाएकी वावटळ । सुटला वाऱ्याचा सोसाटा प्रबळ । उडाली खळबळ दुर्धर ॥११६॥ त्यांतचि मेघांचा गडगडाट । विद्युल्लतांचा कडकडाट । वाऱ्याचा भयंकर सोसाट । वर्षाव घनदाट जोराचा ॥११७॥ मेघ वर्षला मुसळधारा । वाजू लागल्या फटफट गारा । ग्रामस्थांसी सुटला भेदरा । गुरांढोरां आकांत ॥११८॥ मशिदीच्या वळचणीखालीं । भणंगभिकारी निवाऱ्या आलीं । गुरेढोरें वासरें एकत्र मिळालीं । भीड झाली मशिदीं ॥११९॥ पाणीच पाणी चौफेर झालें । गवत सारें वाहूनि गेलें । पीकही खळ्यांतील सर्व भिजलें । लोक गजबजले मानसीं ॥१२०॥ अवघे ग्रामस्थ घाबरले । सभामंडपी येऊनि भरले । कोणी मशिदीचे वळचणीस राहिले । गा-हाणे घातलें बाबांना ॥१२१॥ जोगाई जाखाई मरीआई । शनि शंकर अंबाबाई । मारुती खंडोबा म्हाळसाई । ठायी ठायीं शिरडींत ॥१२२॥ परी अवघड प्रसंग येतां । कामी पडेना एकही ग्रामस्था । तयांचा तो चालता बोलता धांवता । संकटी पावता एक साई ॥१२३॥ नलगे तयासी बोकड कोंबडा । नलगे तयासी टका दोकडा । एका भावाचा भुकेला रोकडा । करी झाडा संकटांचा ॥१२४॥ पाहूनि ऐसे लोक भ्याले । महाराज फारचि हेलावले । गादी सोडुनी पुढे आले । उभे राहिले धारेवर ॥१२५॥ मेघनिनादें भरल्या नभा । कडाडती विजा चमकती प्रभा । त्यांतचि साईमहाराज उभा । आकंठ बोभाय उच्चस्वरें ॥१२६॥ निज जीवाहूनि निजभक्त । देवास आवडती साधुसंत । देव तयांचे बोलांत वर्तत । अवतार घेत त्यालागीं ॥१२७॥ परिसोनि भक्तांचा धांवा । देवासी लागे कैवार घ्यावा । वरचेवरी शब्द झेलावा । भक्त-भावा स्मरोनि ॥१२८॥ चालली आरोळीवर आरोळी । नाद दुमदुमला निराळीं । वाटे मशीद डळमळली । कांटाळी बैसली सकळांची ॥१२९॥ त्या गिरागजर तारस्वरें । दुमदुमलीं मशीद-मंदिरें । तंव मेघ निजगर्जना आवरे । वर्षाव थारे धारांचा ॥१३०॥ उदंड बाबांची आरोळी । अवघा सभामंडप डंडळी । गजबजली भक्तमंडळी । तटस्थ ठेली ठायींच ॥१३१॥ अतर्क्य बाबांचे विंदान । जाहलें वर्षावा आकर्षण । वायूही आवरला तत्क्षण । धुई विच्छिन्न जाहली ॥१३२॥ हळूहळू पाऊस उगवला । सोसाटाही मंदावला । नक्षत्रगण दिसू लागला । तम निरसला ते काळीं ॥१३३॥ पाऊस पुढे पूर्ण उगवला । सोसाट्याचा पवनही विरमला । चंद्र गगनीं दिसू लागला । आनंद झाला सकळांतें ॥१३४॥ वाटे इंद्रास दया आली । पाहिजे संतांची वाणी राखली । ढगें बारा वाटा फांकलीं । शांत झाली वावटळ ॥१३५॥ पाऊस सर्वस्वी नरमला । वाराही मंद वाहू लागला । गडगडाट जागींच जिराला । धीर आला पशुपक्ष्यां ॥१३६॥ सोडूनियां घरांच्या वळचणी । गुरें वासरे बाहेर पडुनी । वावरुं लागलीं निर्भय मनीं । पक्षीही गगनीं उडाले ॥१३७॥ पाहूनि पूर्वील भयंकर प्रकार । मानूनियां बाबांचे उपकार । जन सर्व गेले घरोघर । गुरेही सुस्थिर फरकलीं ॥१३८॥ ऐसा हा साई दयेचा पुतळा । तयासी भक्तांचा अति जिव्हाळा । लेकुरां जैसा आईचा कळवळा । किती मी प्रेमळा गाऊं त्या ॥१३९॥ असो. एकदा साईसमर्थांना ज्याची आकाशातील ढगांवरही सत्ता आहे अशा इंद्राची प्रार्थना करताना पाहिले आणि मनाला फार आश्चर्य वाटले. तो प्रसंग अतिभयंकर होता. समग्र आकाश अंधाराने भरून गेले होते, पशु-पक्षी घाबरून गेले होते आणि पावसासकट सोसाट्याचा वारा सुटला होता. सूर्य मावळला आणि संध्याकाळ झाली. एकाएकी वावटळ उठली, वाऱ्याचा जोराचा सोसाटा सुटला आणि भयंकर खळबळ उडाली. त्यातच ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा भयंकर सोसाट व पावसाचा घनदाट भडिमार झाला. मेघांनी मुसळधार पाऊस पाडला, गारा जमिनीवर पडताना फटफट वाजू लागल्या, गावकरी भीतीने गांगरून गेले आणि गुरेढोरे मोठ्याने ओरडू लागली. मशिदीच्या छपराच्या खालच्या भागात जनसमुदाय वाऱ्या पावसापासून वाचण्यासाठी आला, गुरेढोरे व वासरेही जमली आणि मशिदीत एकच गर्दी झाली. चारी बाजूंना पाणीच पाणी झाले, सारे गवत वाहून गेले, खळ्यातले सर्व पीकही भिजले आणि लोक मनात गोंधळून गेले. एकूण एक गावकरी घाबरून गेले, सभामंडपात येऊन गोळा झाले. कोणी मशिदीच्या छपराच्या खाली थांबले आणि बाबांजवळ गाऱ्हाणे करू लागले. जोगाई, जाखाई, मरीआई, शनी. शंकर, अंबाबाई. मारुती. खंडोबा, म्हाळसाई या सर्व देव-देवता शिरडीत ठिकठिकाणी होत्या; परंतु अवघड प्रसंग आल्यावर गावकऱ्यांना एकही उपयोगी पडत नव्हती. त्यांचा चालता, बोलता, धावता, संकटी पावता एकच देव म्हणजे साई होता. त्याला कोंबडा किंवा बोकड लागत नसे किंवा पै-पैसा लागत नसे. तो फक्त प्रत्यक्ष भावाचा भुकेला होता आणि संकटांचा नाश करीत असे. अशा प्रकारे लोक भ्यालेले पाहून साईमहाराज फार दुःखी झाले, गादी सोडून पुढे आले आणि मशिदीच्या ओट्याच्या कडेवर उभे राहिले. आधीच ढगांच्या गडगडाटाने आकाश भरले होते. विजा कडाडत होत्या आणि त्यांचा प्रकाश चमकत होता. त्यातच साईमहाराज उंच आवाजाने घसा ताणून ओरडू लागले. आपल्या जिवापेक्षा आपले भक्त व साधु-संत देवाला जास्त प्रिय असतात. देव त्यांच्या बोलण्याप्रमाणे वागतात आणि त्यांच्यासाठीच अवतारही घेतात. भक्तांचा धावा ऐकून देवांना त्यांचा कैवार घ्यावा लागतो. भक्तांची भक्ती आठवून त्यांचा शब्द वरच्यावर झेलावा लागतो. बाबांची आरोळीवर आरोळी चालली, आवाज आकाशात दुमदुमला, मशीद डळमळू लागली असे वाटले आणि सगळ्यांच्या कानाला दडे बसले. त्या पर्वतात घुमणाऱ्या मोठ्या आवाजाने मशीद व मंदिर दुमदुमली. तेव्हा मग मेघांनी आपल्या गर्जना आवरल्या आणि पावसाच्या सरी थांबल्या. बाबांच्या मोठ्या आरोळ्यांमुळे सगळा सभामंडप डळमळू लागला आणि भक्तमंडळी भीतीने गोंधळून जाऊन आपल्या जागीच स्तब्ध झाली. खरोखरच, बाबांच्या कौशल्याची कल्पनाच करता येत नाही. पावसाच्या सरी ओसरल्या, लगेच वाराही थांबला आणि धुके छिन्नभिन्न झाले. हळूहळू पाऊस कमी झाला, सोसाट्याचा वारा मंदावला; लगेच अंधार नाहीसा झाला आणि आकाशात तारांचा समूह दिसू लागला. पुढे पाऊस पूर्णपणे थांबला, सोसाट्याचा वाराही शांत झाला, आकाशात चंद्र दिसू लागला आणि सगळ्यांना आनंद झाला. इंद्राला जणू काय दया आली आणि वाटले. संताच्या शब्दाला मान दिला पाहिजे. डग बारा वाटे फाकले आणि वादळ शांत झाले. पाऊस अगदी नरमला,वाराही मंदमंद वाहू लागला, गडगडाट आपल्या जागीच जिरला आणि पशु-पक्ष्यांना धीर आला.घराच्या वळचणी (छपराखालील जागा) सोडून गुरे व त्यांची वासरे बाहेर पडून निर्भय मनाने हिंडूफिरू लागली आणि पक्षीही आकाशात उडाले. पूर्वीचा भयंकर प्रकार पाहून, बाबांचे उपकार मानून सर्व लोक घरोघर गेले आणि गुरेदेखील शांतपणे इकडे-तिकडे निघून गेली. असा हा साई दयेचा पुतळा होता. त्याला भक्तांचा फार जिव्हाळा होता, जणू काय आईचा आपल्या लेकरासाठी मायेचा उमाळाच. त्या प्रेमाचे मी किती वर्णन करू !

अग्नीवरीही ऐसीच सत्ता । ये अर्थीची संक्षिप्त कथा । श्रोतां परीसिजे सादर चित्ता । कळेल अपूर्वता शक्तीची ॥१४०॥ एकदां माध्यान्हीची वेळ । धुनीने पेट घेतला सबळ । कोण राहील तेथ जवळ । ज्वाळाकल्लोळ उठला ॥१४१॥ प्रचंड वाढला ज्वाळामाळी । तक्तपोशीला शिखा भिडली । वाटे होते मशिदीची होळी । राखरांगोळी क्षणांत ॥१४२॥ तरी बाबा मनीं स्वस्थ । सकळ लोक चिंताग्रस्त । तोंडात बोटें घालीत समस्त । काय ही शिकस्त बाबांची ॥१४३॥ एक म्हणे आणा की पाणी । दुजा म्हणे घालावें कोणीं । घालितां माथां सटका हाणी । कोण त्या ठिकाणी जाईल ॥१४४॥ मनीं जरी सर्व अधीर । विचारावया नाहीं धीर । बाबाच तंव होऊनि अस्थिर । सटक्यावर कर टाकियला ॥१४५॥ पाहोनि ज्वाळांचा भडका । हातीं घेऊनियां सटका । हाणिती फटक्यावरी फटका । म्हणती “हट का माघारा" ॥१४६॥ धुनीपासाव एक हात । स्तंभावरी करिती आघात । ज्वाळांकडे पहात पहात । "सबूर सबूर" वदत ते ॥१४७॥ फटक्या-फटक्यास खाली खालीं । ज्वाला नरम पडूं लागली । भीती समूळ उडूनि गेली । शांत झाली तें धुनी ॥१४८॥

बाबांची अग्नीवरही अशीच सत्ता होती. त्याविषयीची लहानशी कथा श्रोत्यांनी काळजीपूर्वक ऐकावी.म्हणजे बाबांच्या शक्तीचे असाधारणत्व व श्रेष्ठत्व कळेल. एकदा दुपारची वेळ होती. धुनीने मोठा पेट घेतला. मग तेथे जवळ कोण उभा राहील ! ज्वाळांचा कल्लोळ उठला, अग्नी प्रचंड वाढला आणि जाळ लाकडाच्या फळ्यांच्या तक्तपोशीला जाऊन भिडला. मशीद जळून-पोळून तिचा सत्यानाश होतो की काय, असे वाटू लागले. तरीपण बाबा मनाने स्वस्थ होते. सर्व लोक चिंताग्रस्त होऊन तोंडात बोटे घालू लागले. “काय ही बाबांची कमाल !" एक म्हणे, "आणा पाणी." दुसरा म्हणे, "पण ते घालावे कोणी ? घालायला गेले, तर सटका मारतील ना ! कोण त्या ठिकाणी जाईल !" सर्वजण मनात उतावीळ होते; परंतु बाबांना विचारायचा धीर कोणालाच झाला नाही. पुढे मग बाबाच अस्वस्थ होऊन त्यांनी सटक्यावर हात टाकला. ज्वाळांचा भडका पाहून, त्यांनी सटका हातात घेऊन फटक्यांवर फटका मारण्यास सुरुवात केली आणि म्हणाले, "हट की माघारा. "धुनीच्या बाजूने एक हात घेऊन खांबावर प्रहार करीत करीत आणि ज्वाळांकडे पहात पहात ते “सबूर सबूर" म्हणू लागले. फटक्या फटक्याला जाळ खाली खाली येऊन नरम पडू लागला. धुनी शांत झाली आणि सर्वांची भीती पार नाहीशी झाली. 

तो हा साई संतवर । ईश्वराचा दुजा अवतार । डोई तयाच्या पायांवर । ठेवितां कृपाकर ठेवील ॥१४९॥ होऊनि श्रद्धाभक्तियुक्त । करील जो या अध्यायाचे नित्य । पारायण होऊनि स्वस्थचित्त । आपदानिर्मुक्त होईल ॥१५०॥ फार काय करूं मी कथन । शुद्ध करोनियां अंतःकरण । नेमनिष्ठ व्हा साईपरायण । ब्रह्म सनातन पावाल ॥१५१॥ पुरेल अपूर्व इच्छित काम । व्हाल अंती पूर्ण निष्काम । पावाल दुर्लभ सायुज्यधाम । अखंड राम लाधाल ॥१५२॥ असो जया भक्तांच्या चित्तीं । भोगावी परमार्थसुखसंवित्ती । तेणें ये अध्यायानुवृत्ती । आदरवृत्ति ठेवावी ॥१५३॥ शुद्ध होईल चित्तवृत्ति । कथासेवनीं परमार्थप्रवृत्ति । इष्टप्राप्ती अनिष्टनिवृत्ति । पहावी प्रचीति बाबांची ॥१५४॥ तो हा श्रेष्ठ संत साई, ईश्वराचा दुसरा अवतारच ! त्याच्या पायांवर मस्तक ठेवले, तर त्यावर तो आपला कृपेचा हस्त ठेवेल. जो श्रद्धा व भक्तीसह स्वस्थचित्त होऊन या अध्यायाचे नित्य पारायण करील तो संकटांपासून संपूर्णपणे मुक्त होईल. आणखी मी काय सांगू ! अंत:करण शुद्ध करून नियमितपणे व कडक रीतीने धार्मिक विधी व कृत्ये करणारे व्हा आणि साईबाबांची भक्ती करा; म्हणजे शाश्वत अशा परमात्म्याची प्राप्ती होईल. मनात असलेल्या असाधारण इच्छाही पुऱ्या होऊन शेवटी पूर्णपणे निष्काम बनाल. जेथे ईश्वर व जीव यांचा भेद नाहीसा होतो अशा मिळण्यास कठीण सायुज्य मुक्तीचे स्थान प्राप्त कराल आणि कधीही भंग न पावणारे समाधान तुम्हाला लाभेल. असो. ज्या भक्तांच्या मनात परमार्थ सुखाची चांगली जाणीव भोगायची इच्छा असेल त्यांनी या अध्यायाच्या पुनः पुन्हा वाचनाकडे उत्सुकता व आवड ठेवावी. यातील कथा वाचून चित्तवृत्ती शुद्ध होईल, परमार्थ संपादण्याकडे प्रवृत्ती वळेल आणि सर्व अप्रिय व अशुभ गोष्टींचा नाश होऊन प्रिय व शुभ गोष्टी प्राप्त होतील. बाबांचा अनुभव घेऊन पहावा. 

हेमाडपंत साईंस शरण । पुढील अध्याय अतिपावन । गुरूशिष्यांचें तें महिमान । घोलप-दर्शन गुरूपुत्रा ॥१५५॥ शिष्यास कैसाही प्रसंग येवो । तेणें न त्यजावा निज गुरूदेवो । साई तयाचा प्रत्यक्ष अनुभवो । दावी दृढ भावो वाढवी ॥१५६॥ जे जे भक्त आले पायीं । प्रत्येका दर्शनाची नवाई । कोणास कांहीं कोणास कांहीं । देऊनि ठायींच दृढ केलें ॥१५७॥ स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । श्रीसाईमहिमावर्णनं नाम एकादशोऽध्यायः संपूर्णः ॥ ॥श्रीसद्‌गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ हेमाडपंत साईस शरण आलेले आहेत. पुढील अध्याय अत्यंत पवित्र आहे. त्यात गुरु-शिष्यांच्या संबंधाची थोरवी गाईली आहे आणि गुरूंचा उपदेश घेतलेल्या 'मुळे' नावाच्या शिष्याला आपल्या घोलप' नावाच्या गुरुचे दर्शन कसे झाले हे सांगितले आहे. "शिष्यावर कसलाही प्रसंग येवो, त्याने आपल्या गुरुदेवाला सोडू नये", या तत्त्वाचा प्रत्यक्ष अनुभव दाखवून साईबाबा ज्याची ज्या ठिकाणी दृढ भक्ती असेल त्याच ठिकाणी ती वाढीला लावीत असत. जे जे भक्त साईच्या चरणांशी आले त्या त्या प्रत्येक भक्ताला कोणास काही, तर कोणास काही अशा वेगवेगळ्या, नव्या व आश्चर्यकारक रूपात दर्शन देऊन त्यांची आपल्या आराध्य दैवताच्या किंवा गुरुच्या ठिकाणी असलेली भक्ती साईनी पक्की केली.  सर्वाचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्रीसाईसमर्थ यांच्या सत्य चरित्राचा 'श्रीसाईमहिमा वर्णन' नावाचा अकरावा अध्याय समाप्त झाला. श्रीसद्‌गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो.

॥ श्रीसद्‌गुरुसाईनाथाय नमः ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


स्रोत : हेमाडपंतकृत श्रीसाईसच्चरित आणि कै. मु. ब. निंबाळकर अनुवादित श्रीसाईंचे सत्य चरित्र


No comments:

Post a Comment