Aug 30, 2023

अथ श्रीसाईसच्चरिते श्रीसाईमहिमावर्णनं - सार्थ श्री साई रुद्राध्याय (३)


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ अथ श्रीसाईसच्चरित अध्याय ११ ॥ श्रीसाईमहिमा वर्णनं

(श्रीसाईबाबांच्या प्रभावाचे वर्णन)

हा कथाभाग लिहितां लिहितां । ओघानें आठवली समर्पक कथा । उदाहरणार्थ कथितों श्रोतां । सादरचित्ता परीसिजे ॥७७॥ आला कल्याणवासी एक यवन । सिदीक फाळके नामाभिधान । मक्का-मदीना यात्रा करून । शिरडीलागून पातला ॥७८॥ उतरला तो वृद्ध हाजी । उत्तराभिमुख चावडीमाजी । प्रथम नऊ मास इतराजी । बाबा न राजी तयातें ॥७९॥ आला नाहीं तयाचा होरा । व्यर्थ जाहल्या येरझारा । केल्या तयाने नाना तन्हा । नजरानजर होईना ॥८०॥ मशीद मुक्तद्वार अवघ्यांसी । कोणासही ना पडदपोशी । परी न आज्ञा त्या फाळक्यासी । चढावयासी मशिदीं ॥८१॥ फाळके अंतरीं खिन्न झाले । काय तरी हे कर्म वहिले । मशिदीस न लागती पाउलें । काय म्यां केलें पाप की ॥८२॥ कवण्या योगें प्रसन्न होती । आतां बाबा मजवर पुढती । हाच विचार दिवसरातीं । हृद्रोग चित्तीं फाळक्यांचे ॥८३॥ तितक्यांत कोणी कळविलें तयांस । होऊ नका ऐसे उदास । धरा माधवरावांची कास । पुरेल आस मनींची ॥८४॥ आधीं न घेतां नंदीचे दर्शन । शंकर होईल काय प्रसन्न । तयासी याच मार्गाचें अवलंबन । गमलें साधन तें बरवें ॥८५॥ सकृद्दर्शनी ही अतिशयोक्ती । ऐसें वाटेल श्रोतयां चित्तीं । परी हा अनुभव दर्शनवक्तीं । भक्तांप्रती शिरडींत ॥८६॥ जया मनी बाबांचे सवें । संथपणे संभाषण व्हावें । तयाचिया समवेत जावें । माधवरावें आरंभीं ॥८७॥ आले हे कोण कोठूनि किमर्थ । गोड शब्दें कळवावा कार्यार्थ । सूतोवाच होतांच समर्थ । होत मग उद्युक्त बोलाया ॥८८॥ ऐकोनियां तें हाजीनें सकळ । माधवरावांस घातली गळ । म्हणाले " एकदां ही माझी तळमळ । घालवा, दुर्मिळ मिळवूनि द्या" ॥८९॥ पडतां माधवरावांस भीड । केला मनाचा निश्चय दृढ । असो वा नसो कार्य अवघड । पाहूं कीं दगड टाकुनी ॥९०॥ गेले मशिदीस केला धीर । गोष्ट काढिली अतिहळुवार । "बाबा तो म्हातारा कष्टी फार । कराना उपकार तयावरी ॥९१॥ हाजी तो करूनि मक्का-मदीना । शिरडीस आला आपुले दर्शना । तयाची कैसी येईना करुणा । येऊंच द्याना मशिदीं ॥९२॥ जन येती असंख्यात । जाऊनि मशिदीत दर्शन घेत । हातोहात चालले जात । हाच खिचपत पडला कां ॥९३॥ करा की एकदां कृपादृष्टी । होवो तयासी मशिदीत भेटी । जाईल मग तोही उठाउठी । पुसूनि गोष्टी मनींची " ॥९४॥ " शाम्या तुझ्या ओठांचा जार । अजून नाहीं वाळला तिळभर । नसतां अल्लाची खुदरत तयावर । मी काय करणार तयासी ॥९५॥ नसतां अल्लामियाचा ऋणी । चढेल काय या मशिदी कुणी । अघटित येथील फकीराची करणी । नाहीं मी धणी तयाचा ॥९६॥ असो बारवीपलीकडे थेट । आहे जी एक पाऊलवाट । चालूनि येसील काय तूं नीट । विचार जा स्पष्ट तयातें" ॥९७॥ हाजी वदे " कितीही बिकट । असेना ती मी चालेन नीट । परी मज द्यावी प्रत्यक्ष भेट । चरणानिकट बैसू द्या" ॥९८॥ परिसूनि शामाकरवी हे उत्तर । बाबा वदती आणीक विचार । "चार वेळांती चाळीस हजार । रुपये तूं देणार काय मज" ॥९९ ॥ माधवराव हा निरोप सांगतां । हाजी म्हणाले "हे काय पुसतां । देईन चाळीस लाखही मागतां । हजारांची कथा काय" ॥१००॥ परिसोनि बाबा वदती त्या पुस । "आज बोकड कापावयाचा मानस । आहे आमुचा मशिदीस । तुज काय गोस पाहिजे ॥१०१॥ किंवा पाहिजे 'तुवर अस्थी । किंवा वृषणवासना चित्तीं । जा विचार त्या म्हाताऱ्याप्रती । काय निश्चित वांछी तो" ॥१०२॥ माधवरावें समग्र कथिलें । हाजीप्रती बाबा जें वदले । हाजी निक्षून वदते झाले । “नलगे त्यांतलें एकही मज ॥ १०३ ॥ द्यावें मज कांहीं असेल चित्ता । तरी मज आहे एकचि आस्था । 'कोळंब्यांतील तुकडा लाभतां । कृतकल्याणता पावेन" ॥१०४॥ हाजीचा हा निरोप घेऊन । माधवराव आले परतोन । करितांच बाबांस ते निवेदन । बाबा जे तत्क्षण खवळले ॥१०५॥ कोळंबा आणि पाण्याच्या घागरी । स्वयें उचलूनि भिरकाविल्या द्वारीं । हात चावोनियां करकरी । आले शेजारी हाजीच्या ॥ १०६ ॥ धरूनि आपुली कफनी दों करीं । हाजीसन्मुख उचलून वरी । म्हणती "तूं काय समजलास अंतरीं । करिसी फुशारी मजपुढें ॥१०७॥ बुढ्ढेपणाचा तोरा दाविसी । ऐसेंचि काय तूं कुराण पढसी । मक्का केल्याचा ताठा वाहसी । परी न जाणसी तूं माते" ॥१०८॥ ऐसें तयासी निर्भत्सिलें । अवाच्य शब्दप्रहार केले । हाजी बहु गांगरूनि गेले । बाबा परतले माघारा ॥ १०९ ॥ मशिदीचे आंगणी शिरतां । माळिणी देखिल्या आंबे विकितां । खरेदिल्या त्या पाट्या समस्ता । पाठविल्या तत्त्वता हाजीस ॥११०॥ तैसेचि तात्काळ मागे परतलें । पुन्हां त्या फाळक्यापाशी गेले । रुपये पंचावन्न खिशांतूनि काढिले । हातावर मोजिले तयाचे ॥१११॥ तेथूनि पुढे मग प्रेम जडलें । हाजीस जेवावया निमंत्रिलें । दोघेही जणूं अवघें विसरले । हाजी समरसले निजरंगीं ॥ ११२ ॥ पुढे मग ते गेले आले । यथेच्छ बाबांचे प्रेमी रंगले । नंतरही बाबांनी वेळोवेळे । रुपये दिधले तयास ॥११३॥ हा कथाभाग लिहिता लिहिता ओघाने जुळण्यासारखी समर्पक कथा आठवली, ती उदाहरण म्हणून सांगतो. श्रोत्यांनी ती काळजीपूर्वक ऐकावी. एकदा एक कल्याणचा सिद्दीक फाळके नाव असलेला मुसलमान मक्का-मदीना यात्रा करून शिरडीला येऊन पोहोचला. तो म्हातारा हाजी (मक्का-मदीनेची म्हणजे हजची यात्रा करून आलेल्या माणसाला हाजी म्हणतात.) उत्तरेकडे तोंड असलेल्या चावडीत उतरला. आधी नऊ महिने बाबांची त्याच्यावर गैरमर्जी होती. बाबा त्याच्यावर प्रसन्न नव्हते. त्याची योग्य वेळ आली नव्हती; म्हणून त्याच्या खेपा फुकट गेल्या. त्याने नाना तऱ्हा केल्या; परंतु बाबांशी नजरानजर होत नव्हती. मशीद तशी सर्वांना येण्या-जाण्याला मोकळी होती. कोणालाही आडवळणाचे किंवा गुप्त स्थान ते नव्हते. परंतु या फाळक्याला मशिदीत वर चढण्याची बाबांची आज्ञा नव्हती. फाळके मनात फार खिन्न झाले. "काय तरी हे नशीब विचित्र ! मशिदीला पायच लागत नाहीत ! काय मी पाप केले होते ? आता बाबा माझ्यावर कशाने प्रसन्न होतील?" हाच विचार रात्रदिवस हृदयरोगाप्रमाणे फाळक्यांच्या मनाला लागला. तितक्यात कोणी त्यांना सांगितले की, असे उदास होऊ नका. माधवराव देशपांड्यांची मदत घ्या; म्हणजे मनाची इच्छा पुरी होईल. आधी नंदीचे दर्शन घेतल्याशिवाय शंकर प्रसन्न होईल का ! फाळक्यांना हा मार्ग स्वीकारणे बरे वाटले. प्रथम दर्शनी श्रोत्यांच्या मनाला अतिशयोक्ती वाटेल. परंतु शिरडीत बाबांच्या दर्शनाला जाताना भक्तांना हाच अनुभव येत असे. ज्यांच्या मनात बाबांबरोबर शांतपणे संभाषण व्हावे, असे वाटत असेल त्यांच्याबरोबर सुरुवातीला माधवरावांनी जावे. त्यांनी पण हे कोण, कोठून, कशाला आले, हे गोड शब्दांनी बाबांना कळवावे. त्यांच्या कामाबद्दलचा असा प्रारंभ झाला की, साईसमर्थ बोलण्यास तयार होत असत. हे सगळे ऐकून हाजीने माधवरावांना अतिआग्रह केला आणि म्हणाले, "एकदा माझी ही तळमळ घालवा आणि मिळण्यास कठीण अशी बाबांची भेट करवून द्या." अशा प्रकारे माधवरावांना आग्रह पडल्यावर त्यांनी काम अवघड असो की नसो, प्रयत्न करून पाहण्याचा मनात पक्का बेत केला. मग ते मशिदीत गेले आणि धीर करून अगदी हळुवारपणे बाबांजवळ गोष्ट काढली, "बाबा ! तो म्हातारा फार कष्टी आहे. त्यावर मेहेरबानी करा की ! तो हाजी मक्का-मदीनाची यात्रा करून शिरडीत तुमच्या दर्शनाला आला आहे. त्याची तुम्हाला दया का येत नाही ? त्याला मशिदीत येऊ द्या ना ! अगणित लोक मशिदीत येऊन दर्शन घेतात आणि चटकन परत जातात आणि हाच का ताटकळत पडला आहे बरे ? याच्यावर एकदा कृपादृष्टी करा; म्हणजे त्याला मशिदीत तुमची भेट होईल आणि तो मनातील गोष्ट विचारून ताबडतोब निघून जाईल." "शाम्या ! तुझ्या ओठाचा जार (नुकत्याच जन्म झालेल्या मुलाच्या तोंडातून निघणारा फेस) अजून तीळभरही वाळला नाही. अल्लाची शक्ती त्याच्या पाठीशी नसल्यावर मी तरी त्याच्यासाठी काय करणार ! अल्लामियाचा देणेकरी असल्याशिवाय या मशिदीत वर कोणी चढेल काय ! येथील फकिराची करणी अभूतपूर्व आहे. मी त्याचा मालक नव्हे. असो. त्याला जाऊन स्पष्ट विचार की. 'जवळच्याच त्या विहिरीपलीकडे थेट जी अरुंद पायवाट आहे ती तू नीट चालून येशील का?" हाजीने उत्तर दिले. "ती कितीही अवघड असली, तरी ती मी नीट चालून येईन. परंतु मला आपण प्रत्यक्ष भेट द्यावी आणि चरणापाशी बसू द्यावे. हे शाम्याकडून उत्तर ऐकून बाबा त्याला आणखी विचार म्हणाले, "चार वेळा चाळीस हजार रुपये तू मला देणार काय?" माधवरावांनी हा निरोप सांगितल्यावर हाजी म्हणाले, "हे काय विचारता ! मागितल्यावर चाळीस लाखसुद्धा देईन. हजारांची काय गोष्ट !" हे ऐकून बाबा शाम्याला पुन्हा म्हणाले, "याला विचार, आज मशिदीत बोकड कापण्याचा आमचा विचार आहे. तुला मांस पाहिजे की एका भागाचे मांसासकट हाड पाहिजे की अंडकोश खाण्याची इच्छा तुझ्या मनात आहे ? जा, विचार त्या म्हाताऱ्याला की, तुला निश्चित काय पाहिजे." अशा प्रकारे बाबा जे म्हणाले ते शाम्याने हाजीला सांगितले; पण हाजी स्पष्टपणे म्हणाले, “यातले मला काहीएक नको. जे काही तुमच्या मनाला वाटेल ते मला द्यावे. मला एकच उत्सुकता आहे. कोळंब्यातील एक तुकडा जरी मिळाला तरी माझे कल्याण झाले, असे मी मानीन." हाजीचा हा निरोप घेऊन माधवराव परत आले आणि तो बाबांना सांगताच बाबा खवळले आणि पाण्याच्या घागरी स्वतः उचलून दारातून फेकून दिल्या.हात करकर चावून हाजीच्या शेजारी आले आणि दोन्ही हातांनी आपली कफनी हाजीसमोर वर उचलून म्हणाले. "तू तुझ्या मनात काय समजलास? माझ्यासमोर फुशारकी मारतोस ! म्हातारपणाचा दिमाख दाखवितोस! असा काय तू कुराण पढतोस ! मक्केची यात्रा केल्याचा अभिमान वाहतोस ! पण तू मला ओळखत नाहीस." अशा प्रकारे बाबांनी हाजींचा अपमान केला, न बोलण्यासारखे आणि मनाला लागतील असे शब्द बोलले. हाजी भीतीने फार गोंधळून गेले. मग बाबा मशिदीत माघारी परत आले. मशिदीच्या अंगणात शिरताना माळिणी आंबे विकताना पाहिल्या.त्यांच्या सर्व पाट्या विकत घेतल्या आणि सर्वच्या सर्व हाजीला पाठवून दिल्या. मग लगेच बाबा परतले आणि त्या हाजीपाशी पुन्हा गेले. खिशातून पंचावन्न रुपये काढले आणि त्यांच्या हातावर मोजले. तेथून मग पुढे हाजीवर प्रेम जडले आणि त्याला जेवायला आमंत्रण दिले. दोघेही जणू काय सर्व विसरले आणि हाजी अत्यानंदात तल्लीन झाले. पुढे मग ते बाहेर गेले व पुन्हा आले आणि बाबांच्या प्रेमात मनसोक्त रंगले. बाबांनी नंतरदेखील त्यांना वेळोवेळी रुपये दिले.  बाबांनी सुरुवातीला हाजीकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. सर्व भक्त कधीही मशिदीत येऊन बाबांचे दर्शन घेत असत. मात्र साईंनी हाजीला तब्बल नऊ महिने मशिदीच्या पायऱ्या चढू दिल्या नाहीत. याचे कारण इतुकेच की हाजी सिद्दीक फाळके यांना त्यांच्या म्हातारपणाचा, नित्य कुराण वाचनाचा आणि मक्का मदिना यात्रेचा खूप अभिमान होता. शिर्डीला पोहोचल्यावर बाबा आपला आदर-सत्कार करतील, अशी त्यांची अपेक्षा होती. अंतर्यामी बाबांना हे सर्व माहीत होते. म्हणूनच माधवराव देशपांडे यांनी - हाजीला मशिदीत येऊन दर्शन घेऊ द्यावे अशी प्रार्थना केल्यावरही साईनी स्पष्ट शब्दांत सांगितले, त्याच्या पाठीशी ईशशक्ती नसल्यावर मी तरी त्याच्यासाठी काय करणार? अल्लामियाचा देणेकरी असल्याशिवाय या मशिदीत वर कोणीही चढू शकत नाही. येथील फकिराची अर्थात दत्तमहाराजांची करणी अभूतपूर्व आहे. मी काही इथला स्वामी नव्हे.

पुढे जसजसा हाजीचा अहंभाव नष्ट होऊ लागला तसेच ' श्रद्धा अन सबुरी ' या बाबांच्या मंत्राचा त्याने पूर्णपणे अंगीकार केला आहे, हे पाहून बाबांनी त्याला वरील प्रश्न विचारले, आणि त्याच्या शरणागतीची परीक्षा घेतली. पहिल्या प्रश्नाचा हेतू हाच की ईशकृपेसाठी त्याची शारीरिक श्रम करायची अथवा देह झिजवण्याची तयारी आहे का ? हाजीचा आर्थिक लोभ, धनाची लालसा खरोखर नष्ट झाली आहे का ? हे जाणण्यासाठी बाबांनी दुसरा प्रश्न विचारला. तर बाबांनी तिसरा प्रश्न विचारून त्याच्या मनाचा मोह, हाव अजमावून पहिले. हाजीनेही शुद्धभावानें प्रामाणिक उत्तरे देऊन आपले तन, मन आणि धन बाबांना अर्पण केले आहे, हे स्पष्ट केले. त्यामुळे तो साईंच्या कसोटीवर पूर्णपणे उतरला. अर्थात यानंतरही बाबांनी त्याची सर्वात कठीण अशी परीक्षा घेतलीच. ती कशी? तर बाबांनी हाजींचा अपमान केला, न बोलण्यासारखे आणि मनाला लागतील असे शब्द त्याला बोलले. मात्र तरीही हाजी शांत राहिला, त्याने काही प्रत्युत्तर दिले नाही अन तसाच साईकृपेची, साई-आज्ञेची वाट पाहत तिथेच थांबला. त्यावेळी 'गुरुवाक्य प्रमाण' अशीच त्याची भावना होती. साईचरणीं तो अनन्यभावानें शरण आला होता, हेच त्यांतून सिद्ध झाले. म्हणूनच बाबांनी त्याला कृपाप्रसाद म्हणून आंब्याच्या सर्व टोपल्या पाठवल्या अन शिवाय पंचावन्न रुपयेही दिले आणि एकत्र जेवायलाही बोलावले. साईभक्तहो, " आडमार्गी पाऊल पडता I सांभाळुनि मार्गावरता I आणिता न दूजा त्राता II" या वचनाची नित्य प्रचिती देणारी ही परम कृपाळू साई माऊली सर्वदा भक्तांचे कल्याण करते, हेच खरें!

क्रमश:

॥ श्रीसद्‌गुरुसाईनाथाय नमः ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


स्रोत : हेमाडपंतकृत श्रीसाईसच्चरित आणि कै. मु. ब. निंबाळकर अनुवादित श्रीसाईंचे सत्य चरित्र


No comments:

Post a Comment