॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे सगुणस्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभागातटविहारा, हे श्रीसंतवरदा शारंगधरा, हे पतितपावना दयानिधे (तुला नमन असो.)॥१॥ ज्याप्रमाणें लहानांशिवाय मोठयांचा मोठेपणा सिद्ध होत नाही, त्याचप्रमाणें पातकी मनुष्यांशिवाय परमेश्वराचा बोलबाला होत नाही.॥२॥ आम्हीं पतित आहोत, म्हणूनच तर तुला (जन) पावनकर्ता रुक्मिणीकांत म्हणतात, हे आतां तू विसरू नकोस.॥३॥ परिस लोहाला सोनें बनविते, म्हणूनच ह्या भूमीवर त्याचे महत्त्व आहें. गोदावरी ओहोळांस आपल्यात सामावून घेते, म्हणूनच त्यांतील जलाला तीर्थाची योग्यता प्राप्त होते.॥४॥ हे माधवा, (कृपा करून) ह्या गोष्टींचा विचार आपल्या चित्तीं करावा. या दासगणूला आपला हात द्यावा आणि कोठेंही बुडू न द्यावे.॥५॥ असो. गोविंदबुवा टाकळीकर नावाचा एक थोर हरिदास ( वऱ्हाडप्रांती ) होता. तो गजर-कीर्तन करण्यासाठीं शेगांवात आला.॥६॥ तिथे ( शेगांवात ) एक शिवाचें पुरातन मंदिर होते. मोटे नामक एका सावकारानें त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.॥७॥ सध्याच्या काळांतील श्रीमंतांना मंदिर आदिंचा कंटाळा येतो. मोटार-बायसिकल, क्लब या गोष्टींचीच त्यांना आवड असते.॥८॥ मात्र मोटे सरकार त्यांस अपवाद होता. हा अतिशय श्रीमंत असूनही फार भाविक होता. त्यानेच या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.॥९॥ म्हणून ' मोट्याचे मंदिर ' असे सर्व लोक त्या मंदिरास म्हणू लागले. श्रोतें हो, तिथें काय प्रकार घडला तो तुम्हीं ऐका.॥१०॥ त्याच मोट्याच्या मंदिरांत कीर्तनकार टाकळीकर उतरलें होते. त्यांचा घोडा मंदिरासमोरच बांधला होता.॥११॥ तो घोडा अतिशय द्वाड होता. कोणासही लाथा मारायचा. त्याच्या समोर कोणी आलें, तर एखाद्या कुत्र्यासारखा त्या मनुष्यास तो चावायचा.॥१२॥ नेहेमीच चऱ्हाटें तोडायचा. तो घोडा एक क्षणभरही स्थिर रहात नसे. कधीं कधीं तर जंगलातही पळून जात असे.॥१३॥ रात्रंदिवस खिंकाळत असे. अश्या अनेक वाईट सवयी त्या घोड्याच्या अंगी होत्या.॥१४॥ शेवटी, त्या घोड्यास बांधण्यासाठी लोखंडाच्या सांखळ्या (गोविंदबुवांनी) बनवून घेतल्या होत्या. ह्यावेळीं (अनावधानानें गोविंदबुवा) त्या सांखळ्या टाकळीतच विसरून आले होते.॥१५॥ चऱ्हाटानें कसा तरी तो घोडा मंदिरासमोर बांधून कथेकरीबुवा (रात्री) शय्येला जाऊन झोपलें.॥१६॥ रात्रीचें दोन प्रहर उलटून गेलें होते. साऱ्या आकाशांत काळोखाचे साम्राज्य पसरलें होते. वृक्षांवरील निशाचरांचे घुत्कार ऐकू येत होतें.॥१७॥ टिटव्यां ' टी टी ' असा आवाज करीत होत्या. वटवाघुळें भक्ष्य शोधण्यास बाहेर पडली होती. पिंगळे (घुबडं) झाडांवर बसून घुमत होते.॥१८॥ जिकडे तिकडे सामसुम झालीं होती. सर्व घरांचे दरवाजे कधीच बंद झाले होते. एकही मनुष्य (शेगांवांतील) रस्त्यांवर दृष्टीस पडत नव्हता.॥१९॥ अशा भर रात्रीच्या समयास, पुण्यपुरुष श्रीगजानन महाराज जिथे घोडा बांधला होता, त्या ठिकाणी सहजच आले.॥२०॥ खरे तर साधुपुरुष, जे कोणी द्वाड असतात, त्यांस सन्मार्गी लावण्यासाठीच ईश्वराच्या आज्ञेनें या भूमीवर अवतार घेतात.॥२१॥ जसे औषधाचे प्रयोजन रोग-व्याधी निवारणासाठी असते, तसेच साधुसंत द्वाडांचे द्वाडपण दूर करतात.॥२२॥ असो. अश्या त्या रात्रीच्या वेळीं गजाननस्वामी घोड्याजवळ आले आणि त्या घोड्याच्या चार पायांत जाऊन अगदी आनंदात झोपले.॥२३॥ नेहेमीप्रमाणेच ' गणी गण गणांत बोते ' हे भजन त्यांच्या मुखीं चालले होते. या भजनाचा सांकेतिक अर्थ जाणण्यास कोण समर्थ आहे, लोकहो?॥२४॥ त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ पुढीलप्रमाणें असावा असे वाटतें. गणी ह्या शब्दाचा अर्थ मोजणें असाच आहे.॥२५॥ जीवात्मा म्हणजेच गण होय. तो ब्रह्माहून भिन्न-वेगळा नाही, हे सुचवण्यासाठी गणांत हा शब्द वापरला गेला आहे.॥२६॥ बोते हा शब्द अपभ्रंश असावा असे वाटते. त्याऐवजी तिथे बाते हा मूळ शब्द असावा असे नि:संशय वाटते.॥२७॥ बाया शब्दाचा अर्थ मन असा आहे आणि 'तें' हे सर्वनाम शब्दासाठी वापरले आहे.॥२८॥ म्हणजेच हे मना,' जीव हाच ब्रह्म आहे, हे सत्य आहे. त्यास ब्रह्मापासून निराळा मानू नकोस. ते दोन्ही एकच आहेत.' हे नेहेमी ध्यानांत ठेव.॥२९॥ या भजनाविषयीं शेगांवांत दोन मतांतरे आहेत. काही जण ' गिणगिण गिणांत बोते ' तर काही जण ' गणी गण गणांत बोते ' असे तें भजन असल्याचे सांगतात.॥३०॥आपल्याला त्या भजनाचे खरे शब्द काय होते? हे जाणण्याचे काही कारण नाही. आपण मुख्य कथेकडें वळू या. तर महाराज घोड्याच्या चार पायांत येऊन झोपले.॥३१॥ अत्यंत आनंदात वरील भजन त्यांच्या मुखीं चालले होते. जणू काही या भजनरूप सांखळीने त्यांनी घोडा बांधला होता.॥३२॥ गोविंदबुवांच्या मनांत (घोड्याच्या खोड्यांची) फार जबरदस्त भीती होती. त्यामुळें ते वरचेवर उठून त्या घोड्याला बघून येत होते.॥३३॥ तेव्हां त्या बांधलेल्या ठिकाणी तो शांत उभा राहिलेला त्यांस दिसला. ते दृश्य पाहून गोविंदबुवा आश्चर्यचकित झाले.॥३४॥ ते मनांत विचार करू लागले, हे कसे शक्य आहे ? किंवा काही आजाराने ग्रस्त तर झाला नाही ना ?॥३५॥ कदाचित म्हणूनच हा इतका वेळ शांत उभा आहे. हा असा आजपर्यंत कधीच स्थिरावला नाही, याचे काय कारण असावे? हे काही कळून येत नाही.॥३६॥ त्या घोड्यास जवळ जाऊन बघावे असा विचार करून ते तिथे गेले, तोच त्या द्वाड घोड्याच्या चार पायांत एक माणूस झोपलेला आहे,हे त्यांनी पहिले.॥३७॥ गोविंदबुवा अगदी जवळ जाऊन त्या मनुष्यास पाहू लागले, तोच त्यांना कैवल्यदानी समर्थ दिसले.॥३८॥ " माझा घोडा का बरे इतका शांत झाला? हे सकारण मला आता कळून आले." असे ते (कीर्तनकार) मनांत म्हणाले.॥३९॥ समर्थांच्या सहवासानेच हा घोडा शांत (आणि शहाणा) झाला, हे नक्की. जिथे कस्तुरी असते, तिथे दुर्गंधीला कधीच थारा नसतो.॥४०॥ अत्यंत आदरानें गोविंदबुवांनी समर्थांच्या चरणीं आपले मस्तक ठेवले. त्यांच्या मनांत अष्टभाव दाटले होते.॥४१॥ आणि ते मुखाने समर्थांचे स्तवन करू लागले, " आपण खरोखरच गजानन आहांत. सर्व विघ्नांचे हरण आपण करतां. मला आजच याचा प्रत्यय आला आहे.॥४२॥ माझा घोडा अतिशय द्वाड होता, सर्व लोक त्याला घाबरायचे. हे गुरुमूर्ती, त्याचा हा द्वाडपणा दूर करण्यासाठीच आपण इथे आलात.॥४३॥ ह्या घोड्याच्या खोड्यां अगदी अचाट होत्या. महाराज, हा दुर्गुणी घोडा चालतां चालतां मध्येच उडी मारायचा, मागील पायांनी लाथाही मारायचा.॥४४॥ मी अगदीच त्रासून गेलो होतो. म्हणूनच बाजारांत ह्यास विकायलाही घेऊन गेलो होतो. पण कोणीही ह्या घोड्यास घेईना.॥४५॥ फुकटही द्यायला लागलो, तरीही कुणी घ्यायला तयार होईना. त्यावर आपण कृपा केली, हे फार बरें झाले.॥४६॥ आम्हां कथेकऱ्यांचे घोडे खरे तर गरीब असायला पाहिजे. धनगराच्या घरी वाघ कधी कामाचा (उपयोगी) असतो का?"॥४७॥ श्रोते हो, असा प्रकार घडून ते घोडे फार गरीब झाले. स्वामी जडजीवांचा उध्दार करण्यासाठीच (या भूमीवर) अवतरले होते.॥४८॥ श्री समर्थ त्या घोड्यास म्हणाले, "गड्या, आता इथून पुढें तू खोड्या करू नकोस. त्या अवघ्या वाईट सवयी इथेच सोडून दे.॥४९॥ तू शिवशंकरांच्या समोर आहेस, ह्याचा काही तरी विचार कर. बैलाप्रमाणे (आज्ञाधारक होऊन) वागत जा आणि कोणालाही त्रास देऊ नकोस."॥५०॥ असे त्यास बोलून दयाघन तिथून निघून गेले. समर्थांच्या केवळ कृपाकटाक्षाने पशुही त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागू लागला.॥५१॥ असो. श्रोतेहो, दुसऱ्या दिवशी पुण्यराशी गजानन महाराज मळ्यांत असतांना गोविंदबुवा आपल्या घोड्यावर बसून श्रींच्या दर्शनास आले.॥५२॥ गोविंदबुवांचा तो घोडा कसा आहे ते साऱ्या शेगांवांस ठाऊक होते. अवघ्या वाईट सवयींची खाण असलेल्या त्या घोड्यास सर्व लोक घाबरत होते.॥५३॥ त्यामुळें तो घोडा मळ्यांत आलेला पाहून तिथे असलेले लोक बोलू लागले, "गोविंदबुवा, ही पीडा इथे कशास घेऊन आला आहात? या मळ्यांत अनेक बायका-लहान मुले वावरत आहेत. तुमचा हा घोडा त्याच्या सवयीने कोणासही हानी पोहोचवेल."॥५४-५५॥ त्यावर गोविंदबुवा उत्तरले, " तुमचे म्हणणे मला अगदीच मान्य आहे, पण काल रात्रीं समर्थांनी माझ्या ह्या घोड्यास शहाणें केले. त्यानें त्याच्या सर्व खोड्या टाकून दिल्या आहेत आणि तो गोगलगायीसारखा गरीब झाला आहे. आतां कोणीही त्याला घाबरण्याचे कारण नाही."॥५६-५७॥ टाकळीकरांनी तो घोडा एका चिंचेच्या वृक्षाखाली उभा केला होता. त्यास चऱ्हाटही बांधले नव्हते, तरीही तो तसाच एक प्रहर शांत उभा राहिला.॥५८॥ त्या मळ्यांत कितीतरी भाजीपाला, कोवळें गवत होते. पण त्या एकाही गोष्टीला त्या घोड्याने तोंड लावले नाही.॥५९॥ पहा बरें, संतांच्या वचनांतही केवढी शक्ती असते. अगदी पशुही त्यांचे आज्ञापालन करतात. गोविंदबुवांनी पत्र्यांच्या झोपडींत येऊन (कृतज्ञतेने) समर्थांचे स्तवन आरंभ केले.॥६०॥
श्लोक ( पृथ्वी वृत्त )
अचिंत्य जगताप्रती कृति तुझी न कोणा कळे । असो खलहि केवढा तव कृपें सुमार्गी वळे ॥
उणें पुढति ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी । शिरीं सतत माझिया वरदहस्त ठेवा झणीं ॥१॥
अनाकलनीय अशी तुझी कृती या जगतांत कोणासही उमजत नाही. कितीही दुष्ट प्राणी असू दे, तुझ्या कृपेनें सन्मार्गालाच लागतो. अनेक रत्नें, चिंतामणीही (ह्यांचे तेज, महती) तुझ्या समोर खचितच फिके, उणें आहेत. हे दयाळा, माझ्या मस्तकीं तुमचा वरदहस्त सतत असू द्या.॥१॥समर्थांची अशी स्तुती करून गोविंदबुवा आपल्या घोड्यास घेऊन टाकळी गांवी निघून गेले.॥६१॥ श्रोते हो, त्या शेगांवांत दररोज किती तरी समर्थांचे भक्त गण आपल्या मनांत काही हेतू धरून येत असत.॥६२॥ अशाच काही यात्रेकरू मंडळींत बाळापूरचे दोन गृहस्थ काही तरी इच्छापूर्तीसाठी समर्थांच्या दर्शनास आले होते.॥६३॥ दर्शन घेऊन परतीचा मार्गक्रमण करतांना ते एकमेकांस बोलू लागले की पुढच्या शेगांव वारीस येतांना आपण सुका गांजा घेऊन येऊ या.॥६४॥ कारण, समर्थांना या गांजाची फार आवड आहे. त्यामुळें तो आपण जर आणला, तर त्यांची आपल्यावर कृपा होईल.॥६५॥ इतर लोक खवा, बर्फी आणतात. पण आपण मात्र महाराजांना प्रिय असलेला गांजाच नेऊ या. चला, खूणगांठ म्हणून आपल्या धोतरांस गाठ बांधू या, नाही तर याची विस्मृती होईल.॥६६॥ पुढल्या वारीस पुन्हा ते दोघें गृहस्थ महाराजांच्या दर्शनास आले. परंतु बोलल्याप्रमाणें गांजा आणायचे पार विसरून गेले.॥६७॥ समर्थांच्या चरणी मस्तक टेकवल्यावर मात्र त्यांना एकदम आठवलें की आपण गांजा काही अर्पण करण्यास आणला नाही.॥६८॥ मग पुढच्या वारीस येतांना आपण दुप्पट गांजा आणू या, असा मनीं निर्धार करून तें दर्शन होताच परत आपल्या गांवी गेले.॥६९॥ मात्र त्या पुढच्या वारीसही परत तसेच घडलें. ते दोघेंही गांजा आणण्याचे पार विसरून गेले. समर्थांसमोर हात जोडून बसल्यावरदेखील त्यांना गांजाच्या नवसाची काही आठवण झाली नाही.॥७०॥ तेव्हां स्वामी भास्करास म्हणाले, " जगाची रीत पाहा, कशी आहे. काही लोक धोतरांस गाठ मारूनही ती वस्तू आणण्यास विसरतात.॥७१॥ जातीनें ब्राह्मण असूनही, आपलें बोलणें आपल्याच वर्तनानें सर्व बाबतीत खोटें करतात.॥७२॥ ब्राह्मणांचे बोलणें कधीही असत्य असू नये, या तत्त्वाला जे जाणत नाहीत ते चांडाळ असतात.॥७३॥ आपला निजधर्म या ब्राह्मणांनी सोडला, आचार विचार आदींचा त्याग केला, त्यामुळेंच तर सध्या आपल्या श्रेष्ठत्वाला ते अंतरले आहेत.॥७४॥ पठ्ठे, मनांत नवस करतात, पण येतांना मात्र हात हालवत येतात. अशा वागण्याने का त्यांच्या अंतरीचे मनोरथ पूर्ण होतील?॥७५॥ बोलण्यांत आणि वागण्यांत मेळ असला पाहिजे. चित्तही निर्मळ असावे. भास्करा, तरच तो घननीळ कृपावर्षाव करतो."॥७६॥ समर्थांचे हे शब्द त्या दोघांच्या मनास अतिशय लागले. तें एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागले.॥७७॥ पाहा बरे, यांचे ज्ञान केवढें अगाध आणि परिपूर्ण आहे. हा गजानन, सूर्याप्रमाणेच पूर्ण जगतावर दृष्टी ठेऊन आहे.॥७८॥ आपण जरी मनांत नवस बोलला होता, तरी समर्थांना तो कळला. चला, आता तरी आपण गांवांतून गांजा घेऊन येऊ या.॥७९॥ असा विचार करून (ते दोन गृहस्थ) उठले आणि गांजा आणण्यासाठी गांवांत जाऊ लागले. तेव्हा महाराज त्या दोघांस म्हणाले, " आता उगाच शिळ्या कढीला का उकळी आणता? याचा काहीही उपयोग नाही. मी काही गांज्यासाठी आसुसलेला नाही.॥८०-८१॥ आता आपण गांजा आणण्यासाठी गांवांतील पेठेंत जाऊ नका. मात्र आपल्या बोलण्या-वागण्यांत तुम्हीं कायम खरेपणा ठेवा.॥८२॥ लबाड मनुष्याचे हेतु कधीही पूर्ण होत नाहीत, ही तुम्हीं आपल्या मनीं खूणगांठ बांधा. तुमचे काम झाल्यावर, तुमची इच्छा असल्यास गांजा आणा.॥८३॥ पुढील आठवड्यांत तुमचे काम अतिशय उत्तमरीत्या पार पडेल. पण, येथील पाच वाऱ्या मात्र नेम न चुकवतां अवश्य करा.॥८४॥ कारण इथें साक्षात मृडानीपती कर्पूरगौराचे वास्तव्य आहे, ज्याच्या कृपेनें कुबेर या जगांत ऐश्वर्यसंपन्न झाला.॥८५॥ जा, आता त्यास नमस्कार करा आणि (पुढील आठवड्यांत) गांजा आणण्यास विसरू नका. मानवांनी परमार्थांत थोडेसुद्धा खोटें बोलूं नये."॥८६॥ असा उपदेश ऐकून त्यांनी महाराजांस (सद्गदीत होऊन) वंदन केले. त्यानंतर शिवाचें दर्शन घेऊन ते दोघें बाळापूरास गेले.॥८७॥ (समर्थांच्या वचनाप्रमाणेच) पुढील आठवड्यांत त्यांचे काम सफल झाले. (नवस केल्यानुसार) ते दोघेंही शेगांवांत वारीला येतांना गांजा घेऊन आले.॥८८॥ श्रोतें हो, त्या बाळापुरांत घडलेली दुसरी एक कथा आतां तुम्ही ऐका. बाळापुरांत बाळकृष्ण नावाचा एक रामदासी रहात होता.॥८९॥ त्याची पुतळाबाई नावाची परम भाविक पत्नी होती. तें दरवर्षीं सज्जनगडाच्या वारीस पायीं जात असत.॥९०॥ पौष महिन्यांत ते पती-पत्नी वारीसाठी तयारी करून निघत असत. ओझ्यासाठी एक घोडें त्यांच्या बरोबर असे.॥९१॥ सामानांत कुबडी, कंथा, दासबोध आदी पूजाअर्चा, पारायणासाठी साहित्य असे. त्या रामदास्याला साधुत्वाचा अहंकार अजिबात नव्हता.॥९२॥ वारीचा मार्गक्रमण करतांना ते पती-पत्नी वाटेत लागलेल्या गांवांत झोळी फिरवून भिक्षा मागत असत. त्या मिळालेल्या भिक्षेतूनच श्रीरामांस नैवेद्य करून दाखवत असत.॥९३॥ पौष वद्य नवमीला तो बाळापूरहून प्रयाण करीत असे. पुतळाबाई नावांची त्याची पत्नी त्याच्याबरोबर असे.॥९४॥ बाळकृष्णबुवांच्या हातांत चंदनाच्या चिपळ्या असत, तर पुतळाबाई झांज हातीं घेऊन त्यास साथ देत असे.॥९५॥ मार्गक्रमण करीत असतां दोघेंही रघुपतीचा नामगजर करीत असत. त्यांच्या वारीचा मार्ग शेगांव, खामगांव, पुढें देऊळगांवराजा असे.॥९६॥ त्यानंतर ते पती-पत्नी जालनापुरींस आनंदीस्वामींस वंदन करून जांब नगरींत येत असत. तिथे मात्र तीन दिवस त्यांचा मुक्काम असे.॥९७॥ त्याचे कारण असे की जांब हे समर्थांचे जन्मस्थान आहे. पुढें दिवऱ्यास येऊन गोदावरी मातेला वंदन करीत असत.॥९८॥ मग आंबेजोगाईचे बीड, बेलेश्वर स्वामींचे मोहोरी, आणि डोमगांवी येऊन समर्थांचे पट्टशिष्य कल्याण यांचे दर्शन घेऊन नमन करीत असत.॥९९॥ त्यानंतरचा त्यांचा मार्ग नरसिंगपूर, पंढरपूर, नातेपोतें, शिंगणापूर, वाई असा असे. पुढें गडाच्या पायथ्याशी असलेल्या सातारा नगरीत तें येत असत.॥१००॥ माघ वद्य प्रतिपदेला तो श्रीसज्जनगडावर, तेथील दासनवमीच्या उत्सवासाठी पोहोचत असे.॥१०१॥ (तिथें बाळकृष्णबुवा) श्री स्वामीं समर्थांसाठी यथाशक्ती ब्राह्मणभोजन घालीत असे. असा तो खरोखर रामदासी होता.॥१०२॥ असें रामदासी आतां होणे सर्वथा कठीण आहे. दासनवमीचा उत्सव संपन्न झाल्यावर तो परत त्याच मार्गानें परत (बाळापुरास) जाई.॥१०३॥ बाळकृष्णबुवांचा वारीचा असा क्रम बरेच वर्षें चालला होता. त्याचे वयही साठीच्या वर झाले होते.॥१०४॥ दरवर्षी माघ वद्य द्वादशीस सज्जनगड सोडून आपल्या गांवास, बाळापूरास परत जाण्यासाठी तो निघत असे.॥१०५॥ असो. त्या वद्य एकादशीच्या दिवशी, समर्थ रामदासस्वामींच्या समाधीपाशी तो उदास होऊन बसला होता. बाळकृष्णबुवांच्या डोळ्यांत दु:खाश्रु आले, अन एक शब्दही त्यास बोलवेना.॥१०६॥ हे रामदास स्वामी समर्था, हे गुरुराया, पुण्यवंता ! माझें शरीर आतां (वार्धक्यानें) थकले आहे. आता पायीं वारी करणे शक्य होईल असे वाटत नाही.॥१०७॥ हे दयाळा, या सज्जनगडांस जरी वाहनांत बसून यावें म्हंटले, तरी तेसुद्धा मला कठीणच दिसतें आहे.॥१०८॥ आजपर्यंत ही वारी नेमानें घडली, आतां मात्र त्यांत खंड पडेल असे वाटते आहे. परमार्थ करण्यासाठी निकोप शरीराची आवश्यकता असते.॥१०९॥ तें असल्यावरच सर्व योग्य प्रकारें घडते. हे माझी आई रामदासा, हे सर्व आपणांस सांगण्याची काहीच जरुरी नाही. आपण हे सर्व जाणता.॥११०॥ अशी प्रार्थना करून, तो शय्येस जाऊन झोपला. बाळकृष्णबुवाला त्या प्रभातकाळीं एक स्वप्न पडले.॥१११॥ (स्वप्नांत) रामदासस्वामींनी त्यास दर्शन देऊन सांगितले, " बाळा, तू असा हताश होऊ नकोस. बाळापूरहून खास या सज्जनगडावरही येऊ नकोस.॥११२॥ माझी कृपा तुझ्यावर नेहेमीच राहील. माझा उत्सव तू आपल्या घरीं, बाळापूरास कर. मी नवमीला तिथें येऊन तुला दर्शन देईन. हे माझें सत्य वचन आहे. अरे, आपल्या शक्तीप्रमाणे परमार्थाचे आचरण करावे."॥११३-११४॥ असा तो स्वप्न-दृष्टांत पाहून बाळकृष्णबुवांना आनंद झाला. आपल्या पत्नीसह ते बाळापूरास आपल्या घरीं परतले.॥११५॥ श्रोतें हो, पुढें दुसऱ्या वर्षी माघ महिन्यांत त्या बाळापूरास काय घडलें, ते ऐका.॥११६॥ बाळापुरांत बाळकृष्णबुवांनी माघ वद्य प्रतिपदेस आपल्या घरी समर्थांच्या उत्सवास आरंभ केला.॥११७॥ दासबोधाचे वाचन, दुसऱ्या प्रहरी ब्राह्मणभोजन, संध्याकाळी धूप-आरती आणि रात्रींस हरिकीर्तन (असा प्रत्येक दिवसाचा नित्यक्रम होता ).॥११८॥ स्वामी समर्थ नवमीला आपल्या घरी कसे येतील बरें? हाच विचार बाळकृष्णाच्या मनांत सतत घोळत असायचा.॥११९॥ बाळकृष्णाच्या दृष्टांतावर विश्वास ठेऊन उत्सवास मदत व्हावी, यासाठी गावकऱ्यांनी आपापसांत वर्गणी काढली होती.॥१२०॥ असा भरगच्च कार्यक्रम नऊ दिवस उत्साहांत होत होता. नवव्या दिवशी, दुसऱ्या प्रहरी एक अघटित घडले.॥१२१॥ श्रोतें, त्या बाळापुरांत दासनवमीच्या दिवशी, दुसऱ्या प्रहरी साक्षात्कारी श्री गजानन महाराजांचे आगमन झाले.॥१२२॥ बाळकृष्णाच्या घरांत श्रीराम अभिषेक सुरु होता अन त्याच वेळीं त्याच्या दारांत महाराजांना पाहून लोक आश्चर्यचकित झाले.॥१२३॥ आणि बुवांस म्हणू लागले, " तुम्हीं लवकर उठा, तुमच्या दासनवमीच्या उत्सवासाठी श्री गजानन महाराज तुमच्या दारी उभें ठाकले आहेत."॥१२४॥ त्यावर बुवा उत्तरले, " गजानन महाराज आज इथें आले ते फार बरें झाले. त्याही संतपुरुषाचे पाय माझ्या घरांस लागले.॥१२५॥ पण, आज या (दासनवमीच्या) दिवशी मी त्या सज्जनगडांवर निवास करणाऱ्या समर्थांची अतिशय आतुरतेनें वाट पाहतो आहे.॥१२६॥ मी नवमीला तुझ्या घरीं येईन, असे त्यांनी मला वचन दिले आहे. ते कदापिही असत्य होणार नाही, असा मला दृढ विश्वास आहे."॥१२७॥ इकडे स्वामी गजानन दारांत उभे राहून 'जय जय रघुवीर' हा श्लोक म्हणू लागले.॥१२८॥ श्लोक - अहिल्या शिळा राघवें मुक्त केली । पदीं लागतां दिव्य होऊनि गेली ॥ महाराजांच्या अमोघ वाणींत हा श्लोक ऐकताच बाळकृष्णाची स्वारी त्वरेनें उठली.॥१२९॥ द्वारीं येऊन तो पाहू लागताच, त्याला गजाननाची आजानुबाहू, नग्न, निजानंदी रमलेली, साजिरी स्वारी उभी असलेली दिसली.॥१३०॥ त्यांस नमस्कार करण्यास तो झुकत असतांना त्यास साक्षात रामदास स्वामी त्या जागी दिसले. त्यांच्या हातीं कुबडी होती आणि पाठीवर जटाभार रुळत होता.॥१३१॥ त्यांच्या भव्य कपाळीं गोपीचंदनाचा उभा त्रिपुंड्र रेखलेला होता. त्यांनी नेसलेल्या लंगोटीचा रंग हिरमुजी होता.॥१३२॥ श्रोतें हो, असे तें दिव्य रूप पाहून बाळकृष्णास प्रेमाचें भरतें आलें. त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रु आलें.॥१३३॥ अचानक त्याला परत तिथें गजानन महाराज दिसू लागले. त्यांच्याजवळ ना कुबडी होती ना लंगोटी वा त्रिपुंड्र, मस्तकावर जटाभार असे काहीच नव्हते.॥१३४॥ पुन्हा त्यानें हताश होऊन पाहावे, तो रामदास स्वामी दृष्टींस पडायचे. पण पुन्हा निरखून पाहिल्यास परत गजानन महाराजच दिसायचे.॥१३५॥ एखाद्या सिनेमातील दृश्याप्रमाणें ती नवलाईची गोष्ट तिथें घडत होती. शेवटी तो पुरता गोंधळून गेला. ह्या कोडयाचां त्यास काहीच उलगडा होईना.॥१३६॥ अखेर गजानन स्वामी त्या रामदास्यास ममत्वानें म्हणाले, " असा, गांगरून जाऊ नकोस. तुझा समर्थ मीच आहे रे! ॥१३७॥ पूर्वी (सज्जन)गडावर माझीच तर वस्ती होती, बापा ! सांप्रत शेगांवांत मळ्यांत येऊन राहिलो आहे.॥१३८॥ तुला सज्जनगडांवर वचन दिलें होते की ह्या दासनवमीस मी बाळापुरांस येईन. ह्याचे स्मरण तुला आहे का ?॥१३९॥ त्या वचनाची पूर्तता करण्यासाठीच मी इथें आलो आहे. तू अवघी चिंता करणें सोडून दे. अरे, मीच रामदास आहे.॥१४०॥ या शरीररूपी वस्त्रांस तू किंमत देतोस आणि आत्म्याला मात्र विसरतोस, याला आता मी काय म्हणावें ?॥१४१॥ " वासांसि जीर्णानि " हा गीतेंतील श्लोक तू आठवून पाहा. तेव्हां असा मुळीच भ्रमिष्ट होऊ नकोस. चल, मला आतां पाटावर बसव."॥१४२॥ बाळकृष्णाचा हात धरून श्री गजानन घरांत आले. स्वामी गजानन एका मोठ्या पाटावर स्थानापन्न झाले.॥१४३॥ गजानन महाराजांच्या आगमनाची वार्ता साऱ्या बाळापुरांत पसरली. सर्व गांवकरी मंडळी त्यांच्या दर्शनासाठी तिथें सत्वर येऊ लागली.॥१४४॥ रामदासी (बाळकृष्णबुवा) अवघ्या दिवसभर (त्यांस पडलेल्या कोड्याचाच) विचार करीत राहिला. शेवटीं रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी बाळकृष्णास स्वप्न पडले.॥१४५॥ (स्वप्नीं श्री रामदासस्वामीं आले आणि त्यांनी बाळकृष्णास बोध केला.)" अरे, हल्ली तुमच्या वऱ्हाडप्रांतांत गजाननरुपी माझीच मूर्ती आहे. आपल्या मनांत असा संशय मुळीच घेऊ नकोस. असा शंकित राहिल्यास तू अधोगतीला जाशील.॥१४६॥ गजानन हे माझेच रूप आहे, तेव्हा मी तोच समजून त्यांचे पूजन कर. गीतेत ' संशयात्मा विनश्यति ' असे वचन आहे.(तें लक्षात घे.)"॥१४७॥ असा स्वप्न-दृष्टांत झाल्यावर बाळकृष्णास अतिशय आनंद झाला. (संशयरहित होऊन) अत्यंत आदरानें त्याने आपले मस्तक गजानन महाराजांच्या चरणीं ठेवले.॥१४८॥ (आणि म्हणाला,) " महाराज, आपली लीला समजण्यास मी असमर्थ ठरलो, मात्र तुम्हीं स्वप्नीं येऊन माझ्या शंकेचे निवारण केलेत.॥१४९॥ माझा नवमीचा उत्सव यथासांग पार पडला. त्यात काहीच न्यूनता राहिली नाही. या बालकावर आपण केवढी कृपा केलीत, त्यांमुळे मी धन्य, कृतार्थ झालो.॥१५०॥ आतां काही दिवस माझ्या सदनीं या बाळापुरांत आपण राहावे, अशी माझी इच्छा आहे. ती तेवढी पूर्ण करा." ॥१५१॥ त्यावर महाराज उत्तरले, " तू माझा विचार ऐक. कांही दिवसांनंतर मी बाळापुरास येईन."॥१५२॥ भोजन झाल्यावर गजानन स्वामींनी तेथून प्रयाण केले.कोणासही ते रस्त्यानें जातांना दिसले नाहीत, एका क्षणांत जणू ते शेगांवांत पोहोचले.॥१५३॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित हा गजाननविजय नांवाचा ग्रंथ भाविकांस सुखदायक होवों, हेच दासगणू इच्छितो.॥१५४॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥इति नवमोऽध्यायः समाप्तः ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
श्री गजानन विजय कथामृत अध्याय १ ते ८ इथे वाचता येतील.
अवश्य वाचावे असे काही :
श्रीगजानन महाराज चरित्र कोश - ( लेखन, संशोधन - दासभार्गव )
No comments:
Post a Comment