Aug 30, 2023

अथ श्रीसाईसच्चरिते श्रीसाईमहिमावर्णनं - सार्थ श्री साई रुद्राध्याय (२)


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ अथ श्रीसाईसच्चरित अध्याय ११ ॥ श्रीसाईमहिमा वर्णनं

(श्रीसाईबाबांच्या प्रभावाचे वर्णन)


बाबाच सर्वांचे अधिष्ठान । तयांसी केउतें आसन । त्याहीवरी रौप्य सिंहासन । भक्तभावन परी बाबा ॥४१॥ बहुतां दिसांची जुनी बैठक । गोणत्याचा तुकडा एक । त्यावरी घालिती भक्त भाविक । गादी सुरेख बैसाया ॥४२॥ मागील टेकायाची भिंत तेथें तक्या ठेविती भक्त । जैसें भक्तांचे मनोगत बाबाही वागत तैसेच ॥४३॥ वास्तव्य दिसे शिरडींत । तरी ते होते सर्वगत हा अनुभव निजभक्तांप्रत । साई नित्य दाखवीत ॥४४॥ स्वयें जरी निर्विकार । अंगिकारीत पूजा - उपचार । भक्तभावार्थानुसार । प्रकार सर्व स्वीकारीत ॥४५॥ कोणी करीत चामरांदोलन । कोणी तालवृन्त-परिवीजन । सनया चौघडे मंगल वादन । कोणी समर्पण पूजेचें ॥४६॥ कोणी हस्त पादप्रक्षालन । कोणी अत्तर - गंधार्चन । कोणी त्रयोदशगुणी तांबूलदान । निवेदन महानैवेद्या ॥४७॥ कोणी दुबोटी आडवें गंध । शिवलिंगा तैसें चर्चिती सलंग । कोणी कस्तूरीमिश्रित सुगंध । तैसेंचि चंदन चर्चीत ॥४८॥ बाबाच सर्वांचे आधारस्थान होते. मग त्यांना बसण्याला आधार कशाला आणि तोही चांदीच्या सिंहासनाचा ! परंतु बाबा भक्तांचे लाड पुरविणारे होते. खूप दिवसांचे गोणत्याच्या तुकड्याचे त्यांचे एक जूने बसण्याचे आसन होते. त्यावर बसण्यासाठी भाविक भक्त सुरेख गादी घालीत असत आणि मागे टेकण्याची भिंत होती, तेथे तक्या ठेवीत असत. जसे भक्तांच्या मनात असेल तसे बाबादेखील वागत असत. साईबाबांचे राहणे जरी शिरडीत दिसत होते तरी ते सर्व ठिकाणी जाणारे होते, याचा अनुभव आपल्या भक्तांना ते नेहमी दाखवीत असत.त्यांना स्वत:ला जरी काही मनोभावना नव्हत्या तरी ते भक्तांच्या श्रद्धेप्रमाणे सर्व प्रकारचे पूजेचे उपचार स्वीकारीत असत. कोणी चवऱ्या ढाळीत असत, तर कोणी पंख्याने वारा घालीत असत, तर कोणी सनया, चौघडे वगैरे मंगलकारक वाद्ये वाजविण्याची पूजा अर्पित असत. कोणी हात-पाय धूत असत, कोणी अत्तर, गंध वगैरे लावीत असत, तर कोणी महानैवेद्य दाखवून त्रयोदशगुणी (१३ पदार्थ असलेला - १. शिरा काढलेली विड्याची पाने, २. फोडलेली सुपारी, ३. चुना, ४. खैरांचा काथ (बदामी तपकिरी रंगाचा ), ५. केशर, ६. कस्तुरी, ७. बदाम, ८. कंकोल (कापूरचिनी), ९. जायपत्री १०. वेलदोडा, ११. लवंग, १२. जायफळ, १३. थोडेसे सोने) पानाचा विडा अर्पण करीत असत. कोणी शिवलिंगाला लावतात तसे दोन बोटांनी एकसारखे आडवे गंध लावीत असत, तर कोणी कस्तुरी मिसळलेले गंध किंवा चंदन चर्चीत असत.


एकदां तात्यासाहेब नूलकरांचे । स्नेही डॉक्टर पंडित नांवाचे । घ्यावया दर्शन साईबाबांचें । आले एकदांच शिरडींत ॥४९॥ पाऊल ठेवितां शिरडींत । आरंभी गेले मशिदींत । करूनि बाबांसी प्रणिपात । बैसले निवांत क्षणभरी ॥५०॥ बाबा मग वदती तयांतें । “जाईं दादाभटाच्या येथे । जा असे जा" म्हणूनि बोटें हातें । लाविती मार्गाने तयांस ॥५१॥ पंडित दादांकडे गेले । दादांनी योग्य स्वागत केलें । मग दादा बाबांचे पूजेस निघाले । येतां का विचारिलें तयांसी ॥५२॥ दादांसमवेत पंडित गेले । दादांनी बाबांचे पूजन केलें । कोणीही न तोंवर लावाया धजलें । गंधाचे टिळे बाबांस ॥५३॥ कोणी कसाही येवो भक्त । कपाळी गंध लावू न देत । मात्र म्हाळसापती गळ्यासी फांसीत । इतर ते लावीत पायांतें ॥५४॥ परी हे पंडित भोळे भाविक । दादांची तबकडी केली हस्तक । धरूनियां श्रीसाईंचे मस्तक । रेखिला सुरेख त्रिपुंड्र ॥५५॥ पाहूनि हे तयांचें साहस दादांचे मनी धासधूस । चढतील बाबा परम कोपास । काय हे धाडस म्हणावें ॥५६॥ ऐसें अघडतें जरी घडलें । बाबा एकही न अक्षर वदले । किंबहुना वृत्तीने प्रसन्न दिसले । मुळी न कोपले तयांवर ॥५७॥ असो ती वेळ जाऊ दिली । दादांचे मनीं रुखरुख राहिली । मग तेचि दिनी सायंकाळीं । बाबांसी विचारिली ती गोष्ट ॥ ५८॥ " आम्ही गंधाचा उलासा टिळा । लावू जातां आपुलिया निढळा स्पर्श करूं द्या ना कपाळा । आणि हे सकाळा काय घडलें ॥५९॥ आमुच्या टिळ्याचा कंटाळा । पंडितांच्या त्रिपुंड्राचा जिव्हाळा । हा काय नवलाचा सोहळा । बसेना ताळा सुसंगत"॥६०॥ तंव सस्मितवदन प्रीतीं । साई दादांलागीं वदती । परिसावी ती मधुर उक्ती सादर चित्तीं सकळिकीं ॥६१॥ " दादा तयाचा गुरू बामण मी जातीचा मुसलमान । तरी मी तोचि ऐसें मानून । केलें गुरूपूजन तयानें ॥२॥ आपण मोठे पवित्र ब्राह्मण । हा जातीचा अपवित्र यवन कैसे करूं त्याचे पूजन । ऐसें न तन्मन शंकलें ॥६३॥ ऐसें मज त्याने फसविलें । तेथें माझे उपाय हरले । नको म्हणणे जागीच राहिलें । आधीन केलें मज तेणें ॥६४॥ ऐसें जरी उत्तर परीसिलें । वाटलें केवळ विनोदें भरलें । परी तयांतील इंगित कळलें । माघारा परतले जैं दादा ॥६५॥ ही बाबांची विसंगतता । दादांच्या फारचि लागली चित्ता । परी पंडितांसवें वार्ता करितां । कळली सुसंगतता तात्काळ ॥६६॥ धोपेश्वरींचे रघुनाथ सिद्ध । 'काका पुराणिक' नामें प्रसिद्ध । पंडित तयांचे पदीं सन्नद्ध । ऋणानुबंध शिष्यत्वें ॥६७॥ त्यांनी घातला काकांचा ठाव । तयांसी तैसाच आला अनुभव । जया मनी जैसा भाव । भक्तिप्रभावही तैसाच ॥६८॥ 

एकदा तात्यासाहेब नूलकरांचे डॉक्टर पंडित नावाचे स्नेही साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिरडीत एकदाच आले होते. शिरडीत पाऊल ठेवताच प्रथम ते मशिदीत गेले आणि बाबांना साष्टांग नमस्कार करून क्षणभर शांत बसले. मग बाबांनी त्यांना "जा. दादाभटाकडे जा. असे जा". असे म्हणून बोटाने व हाताने मार्ग दाखविला. पंडित दादांकडे गेले. दादांनी योग्य स्वागत केले. मग दादा बाबांच्या पूजेस निघाले आणि पंडितांना येता का म्हणून विचारले. पंडित दादांबरोबर गेले. दादांनी बाबांचे पूजन केले. तोपर्यंत बाबांच्या कपाळाला गंधाचा टिळा लावण्याचे कोणाला धैर्य झाले नव्हते. कोणी कसाही भक्त येवो, बाबा कपाळाला गंध लावू देत नसत. म्हाळसापती मात्र गळ्यास फासत असत आणि इतर भक्त पायाला लावीत असत. परंतु या भोळ्या भाविक पंडितांनी दादांची तबकडी हातात ओढून घेतली आणि श्रीसाईचे डोके धरून सुरेख त्रिपुंड काढला. त्यांचे हे धाडस पाहून दादांच्या मनात धासघूस वाटली की, काय हे धाडस ! बाबा खूप रागवतील ना ! परंतु जरी असे कधीही न घडणारे घडले तरी बाबा एकही शब्द बोलले नाहीत. उलट वृत्तीने प्रसन्न दिसले आणि पंडितांवर मुळीच रागावले नाहीत. असो. ती वेळ जाऊ दिली. पण दादांच्या मनात रुखरुख राहिली. त्यांनी ती गोष्ट संध्याकाळी बाबांना विचारली, "आम्ही तुमच्या कपाळाला इवलासा गंधाचा टिळा लावू जाता आम्हाला कपाळाला स्पर्श करू देत नाही आणि आज सकाळी हे का घडले ? आमच्या टिळ्याचा कंटाळा आणि पंडितांच्या त्रिपुंड्राचा जिव्हाळा ! हा काय विलक्षण प्रसंग ! याचा व्यवस्थित मेळ बसत नाही." त्यावर साईबाबा प्रेमाने हसत दादांना काय म्हणाले ते शब्द सगळ्यांनी स्वस्थ चित्ताने ऐकावेत. "दादा! त्याचा गरु ब्राह्मण, तर मी जातीचा मुलसमान; पंरतु मी तोच आहे, असे मानून त्याने माझे गुरुपूजन केले. आपण मोठे पवित्र ब्राह्मण, हा जातीचा अपवित्र यवन, त्याचे पूजन मी कसे करू, अशी त्याच्या मनात शंकासुद्धा आली नाही. असे त्याने मला फसविले. तेथे माझे उपाय हरले' आणि नको म्हणणे जागीच राहिले. मला त्याने अधीन (आपल्या ताब्यात) केले." असे जरी बाबांचे उत्तर ऐकले तरी दादांना ते थट्टेचेच वाटले. परंतु दादा जेव्हा घरी परत आले तेव्हा त्याचा खरा अर्थ कळला. बाबांची ही विसंगती दादांच्या मनाला फार टोचली होती. परंतु पंडितांशी गप्पा-गोष्टी करताना बाबांची सुसंगती त्यांना लगेच कळली. धोपेश्वरीचे सिद्ध पुरुष रघुनाथ, जे 'काका पुराणिक' या नावाने प्रसिद्ध होते त्यांच्या चरणी डॉ. पंडित आसक्त होते आणि त्यांच्याशी शिष्यत्वाचा ऋणानुबंधही होता. पंडितांनी काकांना पुकारले आणि त्यांना तसाच अनुभव आला. ज्याच्या मनात जसा भाव असतो तसाच त्याच्या भक्तीचा प्रभाव असतो.

असो हे सर्वोपचार करवूनि घेती । केवळ तयांच्या आलिया चित्तीं । ना तों पूजेची ताटें भिरकाविती । रूप प्रकटिती नरसिंह ॥६९॥ हे रूप कां जैं प्रकटिजेल । कोण धीराचा पाशीं ठाकेल । जो तो जीवाभेणें पळेल । वृत्ती खवळेल ती जेव्हां ॥७०॥ कधी अवचित क्रोधवृत्ति । भक्तांवरी आग पाखडिती । कधी मेणाहूनि मऊ भासती । पुतळा शांतिक्षमेचा ॥७१॥ कधी काळाग्निरूप भासती । भक्तांसी खङ्गाचे धारेवरी धरिती । कधीं लोण्याहूनि मवाळ होती । आनंदवृत्ति विलसती ॥७२॥ जरी क्रोधे कांपले थरथरां । डोळे जरी फिरविले गरगरां । तरी पोटीं कारुण्याचा झरा । माता लेकुरा तैसा हा ॥७३॥ क्षणांत वृत्तीवरी येतां । हांका मारूनि बाहती भक्तां । म्हणती "मी कोणावरीही रागावतां । ठावें न चित्ता माझिया ॥७४॥ माय हाणी लेकुरा लाता । समुद्र करी नदियां परता । तरीच मी होय तुम्हां अव्हेरिता । करीन अहिता तुमचिया ॥७५॥ मी माझिया भक्तांचा अंकिला । आहे पासींच उभा ठाकला । प्रेमाचा मी सदा भुकेला । हांक हांकेला देतसें" ॥७६॥ असो. ही सर्व प्रकारची सेवा केवळ त्यांच्या मनात आली, तरच करवून घेत असत. नाही तर पूजेची ताटेच उडवून देत असत आणि नरसिंहाचे रूप दाखवीत असत. हे रूप प्रगट झाल्यावर धीराचा कोण असेल, की जो जवळ उभा राहील ! अशी मनाची वृत्ती खवळली, तर जो तो जिवाच्या भीतीने पळतच सुटेल. कधी अचानक क्रोधावृत्त होत असत आणि भक्तांवर आग पाखडत असत, तर कधी लोण्याहून नरम स्वभावाचे भासत असत, जणू काय शांती व क्षमा यांचा मूर्तिमंत पुतळाच. कधी प्रलयकाळाच्या (कल्पातांच्या वेळी म्हणजे सर्व जगाच्या अंतसमयी प्रगट होणाऱ्या) अग्नीसारखे वागत आणि भक्तांना तलवारीच्या धारेवर धरीत असत, तर कधी लोण्याहन मऊ दिसत असत आणि आनंदवृत्तीने वागत असत. क्रोधाने जरी थरथर कापले, डोळे जरी गरगर फिरविले तरी आईला जसा लेकराकरिता असतो तसा त्यांच्या पोटी कारुण्याचा झरा होता. क्षणात मूळ स्वभावावर आल्यावर भक्तांना हाक मारून बोलावीत असत आणि म्हणत, "माझ्या मनाला कोणावर रागावणे ठाऊक नसते. आई जर लेकराला लाथा मारील, समुद्र जर नदीला परतवून लावील तरच मी तुमचा अव्हेर करीन आणि तुमचे नुकसान करीन. मी माझ्या भक्तांचा आज्ञाधारक आहे आणि त्यांच्याजवळच उभा राहिलेला आहे. मी सदा प्रेमाचा भुकेला आहे आणि भक्तांच्या हाकेला हाक देत असतो."

क्रमश:

॥ श्रीसद्‌गुरुसाईनाथाय नमः ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


स्रोत : हेमाडपंतकृत श्रीसाईसच्चरित आणि कै. मु. ब. निंबाळकर अनुवादित श्रीसाईंचे सत्य चरित्र


No comments:

Post a Comment