Showing posts with label भावार्थ श्रीगुरुलीलामृत. Show all posts
Showing posts with label भावार्थ श्रीगुरुलीलामृत. Show all posts

Mar 20, 2026

भावार्थ श्रीगुरुलीलामृत - महीवरी संचरती गुरुनाथ


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ  द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-श्रीस्वामीसमर्थमहाराजाय नमः ॥
जनानुग्रहार्थ घेतीं अवतार । साधूंच्या परित्राणार्थ साचार । नरहरि दत्तात्रेय गुरुवर । परोपकारार्थ सोसिती कष्ट ॥  या पृथ्वीतलावर समस्त प्राणिमात्रांच्या नित्य कल्याणार्थ श्रीदत्तगुरु पुन्हा पुन्हा अवतरीत होत असतात. एकदा हिमालय पर्वतावर श्रीमन्नृसिंह यतिवर्य जगदुद्धारासाठी स्वेच्छाचारें संचार करीत होते. त्या पावन स्थानी अनेक योगी, मुनी, जपी, ब्रह्मचारी सतत अनुष्ठान करीत असतात. त्यांच्या या थोर तपाचे फल-वरदान देण्यासाठीच श्रीगुरुस्वामी तिथे प्रत्यक्ष प्रगटले होते. त्यावेळीं चीन देशांतील एक दाम्पत्य वनौषधी शोधण्यासाठी तिथे आले होते. भगवी वस्त्रें धारण केलेल्या श्रीस्वामींना पाहून ते चिनी स्त्री-पुरुष त्यांची कुचेष्टा करू लागले. हे रिकामे सोंग काय । वृत्ति दिसते पिशाच्चमय । समर्थांची अशी निंदा करीत ते दोघेही पोट धरून हसू लागले. हिमालयातील मनोहर निसर्ग पाहून त्यांच्या मनांत कामोद्भव झाला अन ते तिथेच प्रणयक्रीडा करू लागले. तोच एक विपरीत घडले, त्या पुरुषाचे सुंदर, सावयवी स्त्रीत रूपांतर झाले अन त्याची पत्नी पुरुषावयवसकट नररूप झाली. एकमेकांची अशी अवस्था पाहून ते दोघेही अत्यंत भयभीत झाले. अचानक हे संकट काय ओढवले बरें, असा विचार करत असतांना अचानक त्यांचे लक्ष गुहेतील तपस्वी नृसिंहसरस्वती महाराजांकडे गेले. श्रीस्वामी समर्थांना पाहून ते दोघेही अतिशय लज्जित झाले आणि ' ही यतींद्राचीच माया खरी । सुरनरां अगम्य ।' हे त्या दोघांनीही ओळखले.  श्रीनृसिंहस्वामींची उन्मत्तपणे निंदा केल्याचेच हे फळ आहे, याची त्या पती-पत्नीला पूर्णतः जाणीव झाली. आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होऊन ते दोघेही स्वामींना अनन्य शरण गेले आणि ' क्षमा करा जी अपराध । शरणागतां रक्षावें ।' अशी वारंवार प्रार्थना करत म्हणाले, " महाराज, पूर्वजन्मीचे किंचित सुकृत होते, म्हणूनच तुमचे दिव्य चरण दृष्टीस पडले. मात्र अज्ञान आणि तामसीपणामुळे आम्ही तुम्हांस ओळखले नाही. हे सद्‌गुरुनाथा, आमचे अपराध क्षमा करा अन हे परस्परांचे विपरीत देह पूर्ववत करा." त्या दोघांनीही केलेली शुद्धांत:करणपूर्वक अभ्यर्थना ऐकून सदगुरु दयाघन कळवळले आणि त्यांनी केवळ कृपादृष्टीनें अवलोकन करताच त्या चिनी पती-पत्नीची काया तात्काळ पूर्ववत झाली. स्वामींचा कृपाप्रसाद प्राप्त झाल्याने ते दाम्पत्य अतिशय आनंदले आणि त्यांना पुनः पुनः नमस्कार करू लागले. मग समर्थांनी त्यांना अनेक शुभाशीर्वाद दिले अन चीन देशी परतण्याची आज्ञा केली. पुढें मग ते पती-पत्नी अहर्निश गुरुपदांचे चिंतन करीत जीवन कंठू लागले. यथावकाश त्यांना पुत्रप्राप्तीही झाली अन गुरुभक्तीमुळे त्यांचे वंशपारंपरी इहपर कल्याण झाले.                         
त्या हिमालय पर्वतावर दुसऱ्या प्रांतातील चार शिकारी मृगयेसाठी आले होते. ते उदरपूर्तीसाठी सतत शिकार करीत असत. एकदा श्री स्वामी समर्थांची स्वारी आम्रवृक्षातळीं बसली होती, त्यावेळीं अतिशय घाबरलेले एक हरणाचे पाडस समर्थांच्या आश्रयास आले. हे चार पारधी त्या पाडसाची शिकार करण्यासाठी पाठलाग करीत होते. वृक्षाखालीं बसलेल्या समर्थांजवळ ते मृग पाडस पाहून ते व्याध क्रोधानें बंदुकीचे बार अन अनेक तीर त्या पाडसावर मारू लागले. परी त्या मृगवत्सासह । वृद्ध नृसिंहसरस्वती निःस्पृह । स्वानंदी निमग्न पितामह । निर्भयें स्वस्थ बैसले ॥ त्या शिकाऱ्यांनी कितीतरी बंदुका झाडल्या, मात्र स्वामींच्या नखालाही अणुमात्र धक्का लागला नाही. तो अवचित प्रकार पाहून ते शिकारी भांबावून गेले. तोच समर्थांनी त्या व्याधांकडे पाहून दोन खडे फेकले अन काय आश्चर्य ! ते चारही व्याध तटस्थ झाले. त्यांची शरीरें, बंदुका आणि तीर यांची हालचाल बंद झाली. सुमारें दोन याम त्या चौघांचीही देहस्मृति नाहीशी झाली, अन अखेर सानुतापें ते स्वामींना शरण गेले. कृपावलोकनें तात्काळीं । चौघांची तटस्थता गेली । देहशुद्धी बरवी आली । गुरुमाऊली वळल्यानें ॥  श्रीगुरुस्वामींचे ते अतुल सामर्थ्य पाहून व्याध त्यांचे स्तवन करू लागले. समर्थांनीही 'सर्वभूती अविरोध प्रेम । संरक्षूनि सत्य स्वधर्म ।' अशी त्यांना आज्ञा दिली. श्रीगुरुदर्शनाचा थोर महिमा अनुभवून ते सर्व शिकारी योगक्षेम पावले. परम कृपाळू श्रीगुरुमहाराज हिंसक-दुष्ट यांचाही उद्धार करतात आणि यथार्थ भक्ति, ज्ञान देऊन सकल जनांचे इहपर कल्याण करतात. पुढें एक अपूर्व नवल वर्तले. ते चार शिकारी पाठलाग करत असतांना ते मृग पाडस अन त्याच्या कुटुंबियांची ताटातूट झाली होती. आपल्या वत्साचा शोध घेत घेत हरिणी अन मृग त्या आम्रवृक्षाजवळ आले. तिथे योगिराजांसमवेत आपले पाडस बघून ते दोघेही आनंदले. तयासि पाहून नृसिंहयति । प्रसन्नवदनें हांसती । वदती का रे विप्रा आम्हांप्रति । नोळखिसी सांप्रत ॥  " अरे, आम्ही गाणगापुरांत असतांना तू आमचा भक्त होतास. तू रोगग्रस्त झाला असता आमची सेवा करून तू व्याधिनिर्मुक्त झाला. तुझी पत्नी शुद्ध पतिव्रता होती, तुम्ही पुत्रपौत्रश्रियायुक्त होता. मात्र एकदा तुम्ही सत्पुरुषास छळले, त्या पातकाचे फळ म्हणून हा मृगजन्म तुम्हांस घ्यावा लागला. " श्री समर्थांचे हे वचन ऐकून त्यांना पूर्वजन्मस्मृती आली. त्या मृग-मृगीने नृसिंहसरस्वती महाराजांना साष्टांग नमन केले. स्वामीदर्शनमात्रें त्या उभयतांना तात्काळ वाचा फुटली - बहुत जन्मांचे सुकृत । आजि फळलें आम्हांप्रत । देखिले पुन्हा श्रीगुरुदत्त । झालो पावन गुरुराया ॥ अशी प्रार्थना करून ते पूर्वजन्मवृत्तांत कथन करू लागले. माझा पहिला जन्म रोगी ब्राह्मण, दुसरा वृषभ, तृतीय जन्मी शूद्र तर चतुर्थ जन्म हा काशी क्षेत्रीं तंतुकार म्हणून झाला. त्या पुण्यतीर्थी व्यभिचार घडल्याने पाचवा जन्म खराचा, तर सहाव्या जन्मांत हस्तिनापुरी सुवर्णकार झालो. त्या जन्मांत माझी पतिव्रता पत्नी साधु-संत-माहात्म्यांना मूठ मूठभर पीठाचे दान करीत असे. त्या पुण्याईने हा मृगाचा जन्म लाभला. आज व्याधहस्तें कुलक्षय योग होता, मात्र पदरीं काही पूर्वपुण्यसंचय होता म्हणूनच समर्थांच्या दिव्य चरणांचे दर्शन झाले. पुरे झाल्या जन्मखेपा । आतां सोडवा मायबापा । दीनबंधो व्हावी कृपा । त्रिविध तापां निरसावें ॥ त्यांचे असे करुणावचन ऐकून श्रीस्वामी प्रसन्न झाले अन " तुम्हांस सद्धर्माचारी, पुण्यशील अशा ब्राह्मणवंशी पुढील जन्म प्राप्त होईल, आम्ही महाराष्ट्र दक्षिणदेशी आमच्या स्वक्षेत्रीं वास करू तेव्हा तुम्हांस पुन्हा दर्शनलाभ होईल." असा शुभाशीर्वाद देऊन स्वामींनी त्या तिन्ही मृगांच्या मस्तकीं आपला अभयहस्त ठेवला.  त्या हिमालयांतील दुर्गम गुहांमध्ये जप-तप, अनुष्ठान करणारे तपस्वी, ऋषीमुनी वास करीत होते. ते या श्रीमददत्तात्रेयप्रभू आणि मूक पशु यांच्यातील संवादाचे प्रत्यक्षदर्शी होते. त्या परमपुरुष, परमहंसाची ही अघटित लीला पाहून त्या सर्वांनी स्वामींचा जयजयकार केला आणि ' चलावें गुहेंतील आश्रमास । संध्यासमय जाहला ।' अशी प्रार्थना केली. 
॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
क्रमश:

आवडे दत्तभक्तांसी ...


Dec 9, 2024

भावार्थ श्रीगुरुलीलामृत - श्रीगुरुदेवदत्त जन्माध्याय


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ  द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-श्रीस्वामीसमर्थमहाराजाय नमः ॥
श्रीगुरुसंतती मूळपीठ । कवण स्थलीं झाले प्रकट । - गुरुपरंपरेची ही कथा अत्यंत प्रासादिक आहे. पूर्णब्रह्म हे निर्विकल्प, निरंजन आणि भेदत्रयवर्जित होते. निराकार आणि निरुपाधिक असलेल्या त्या परमात्म्यास अनेक स्वरूपांत प्रगट व्हावे, अशी इच्छा झाली. अनादि स्वयंभू प्रमाण । वेद साक्षात नारायण । पिंड ब्रह्मांड झाले निर्माण । साद्यन्त वर्णी यथार्थ तें ॥ या बुद्धीयुक्त अस्तित्वास हिरण्यगर्भ असे म्हणतात. पंचमहाभूतांच्या कमी-अधिक प्रभावाने जी सृष्टी निर्माण होते, त्यालाच स्थूलसृष्टी असे संबोधतात आणि या समस्त जीवसृष्टीतील नाम, रूप, आकृती, स्थावर आणि जंगम या सर्वांशी तादाम्यता साधणाऱ्या त्या परमात्म्याचेच विराट असे नाम आहे. रजोगुणापासून ब्रह्मदेव या सृष्टीतील सर्जनशक्तीचे कार्य करतात. सत्वगुणापासून श्रीहरि भरण, पोषण आणि संगोपनाचे कार्य करतात. तर तमोगुणापासून महेश्वर संहरणशक्तीचे कार्य करतात. विधात्याचे जे अनेक मानसपुत्र झाले, त्यांत सप्तऋषी विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांतील ब्रह्मज्ञानी अत्रि ऋषी परमश्रेष्ठ होते. त्यांची अनसूयानामक पत्नी वेदाचरणी पतिव्रता होती. पुत्रप्राप्तीसाठी अत्रिऋषींनी अनसूयेसह कुलाद्रि पर्वतावर उग्र तपश्चर्या केली. निर्विध्या नदीच्या तीरी एका पायावर उभे राहून प्राणायामादि करून त्यांनी एकाग्रतेने तप केले. महासती अनसूया एकनिष्ठतेने त्यांची सेवा करत असे. शंभर वर्षांनंतर त्या उग्र तपाने अत्रिऋषींच्या मस्तकांतून अग्नीच्या ज्वाला प्रगट होऊ लागल्या. " या भयंकर दाहापासून आमचे संरक्षण करावे. ", अशी त्यावेळी महेंद्रादिक सुरवरांनी त्रिदेवांची प्रार्थना केली. त्यांना अभयवचन देत ब्रह्मदेव हंसावर, श्रीविष्णु गरुडावर आणि शूलपाणि नंदीवरआरूढ होऊन अत्रिऋषींच्या आश्रमीं पोहोचले. कृपावलोकने हास्यवदन । भक्तवत्सल सुप्रसन्न । ऋषीनें प्रेमे विलोकून । साष्टांग नमन केले तयां ॥ अत्रि-अनसूयेने त्रिदेवांचे मोठ्या भक्तिभावाने पूजन केले, तेव्हा प्रसन्न होऊन त्रिदेवांनी, अथास्मदंशभूत निर्विकल्प । केवल पूर्णब्रह्म स्वरूप । लोकविख्यात ज्ञानदीप । पुत्र होईल असे आशीर्वचन दिले. श्रीमदभागवतात वर्णिलेली श्रीदत्तजन्माची कथाही मोठी सौख्यप्रद आहे. पूर्वी ब्रह्मर्षी नारदांनी श्रेष्ठ अशा विशुद्धसत्वरूपाच्या नित्यदर्शनासाठी मोठे अनुष्ठान आरंभिले. तेव्हा, श्रीहरि विष्णु प्रसन्न झाले आणि त्यांनी त्रिदेव एकत्र आले तरच असे दर्शन शक्य होईल, असे नारदमुनींना सांगितले. हे कार्य साधण्यासाठी नारदमुनी भूमंडळी संचार करीत करीत अत्रिऋषींच्या आश्रमी आले. ऋषींनी त्यांचे योग्य आदरातिथ्य-पूजन केले. त्यावेळी अत्रिमुनींनी देवी अनसूयेला पिण्यासाठी पाणी मागितले. अनसूया तेव्हा हातात मुसळ घेऊन तांदूळ कांडीत होती. पतिसेवाआज्ञातत्पर । मुसल थांबविले वरचेवर अधर । सुगंध शुद्धोदक रूचिकर । दिधलें सुपात्री आणूनी ॥ अनसूयेचे पतिव्रतासामर्थ्य इतके की तिने मुसळ वरच्यावर ठेवले आणि पतिदेवांना पाणी आणून दिले. हे पाहून नारदमुनींस महदाश्चर्य वाटले. तत्क्षणीं त्यांना त्रिदेवांच्या एकत्रीकरणाची एक युक्ती सुचली. नारदऋषि कलहप्रिय । जगत्कल्याणार्थ हिंडती अक्षय । हरि गुरु नारायण जय जय । मुखें उच्चारित निघाले ॥ एके दिवशी हरिप्रिया लक्ष्मी आणि ब्रह्मदेवपत्नी सावित्री या दोघी शिवशक्ती पार्वतीला भेटावयास कैलासभुवनास आल्या होत्या. जगन्माता उमेने त्या दोघींचे यथायोग्य आदरातिथ्य केले. एकमेकींशी लीलाविनोद करीत त्या एकमेकींची चौकशी करू लागल्या. त्यावेळी अकस्मात नारदमुनी त्या स्थानीं आले. नारदमुनींना उत्तम सिंहासनी बसवूनत्या त्रिदेवींनी त्यांचे पूजन केले अन मधुर स्वरांत त्या तिघींनी नारदमुनीस विचारले, या त्रैलोक्यांत कोठे असती । आम्हांसम कोण स्त्रिया सुसती । नारदा हे यथामति । विदित व्हावें आम्हांला ॥ तेव्हा त्या कलहप्रिय ब्रह्मर्षि नारदमुनींनी त्यांना महा साध्वी अनसूया हीच या ब्रह्मांडांत सर्वोपम पतिव्रता-शिरोमणी आहे, हे सांगितले. महर्षी अत्रिंची पत्नी अनसूया ही तिच्या नावाप्रमाणेच असूयाविरहित असून पतिसेवेत सदा तत्पर, कुशल गृहस्थाश्रमीं, अभ्यागतांचे उत्तम आदरातिथ्य करणारी आहे. त्या सतीच्या केवळ दर्शनाने अखिल सुरवरच नव्हे तर पापी जनही पावन होतात. अशा प्रकारें, सतीचे गाऊनि यश । क्षोभविले लावुनि कलहास । उमारमासावित्रीस ॥ आणि मग अखंड भगवतचिंतन करीत नारद तिथून निघाले. अशाप्रकारे कळ लावून नारदमुनींनी तिथून गमन केले खरें! मात्र तिन्ही देवी अत्यंत क्रोधायमान झाल्या आणि आपापल्या पतीजवळ जाऊन " अखिल ब्रह्मांडातील श्रेष्ठ महापतिव्रता अशी अनसूयेची महती आपणांस सहन होत नाही. तेव्हा तुम्ही काहीतरी करावे." अशी त्यांनी तक्रार केली. या कलहाचे मुख्य कारण नारदमुनी आहेत, हे त्रिदेवांनी अंतर्ज्ञानाने जाणले. मात्र स्त्रीहट्टापुढे त्यांचे तरी काय चालणार ? मग ब्रह्मा, विष्णु आणि शिव तिघेही ब्राह्मणांचे रूप घेऊन भूमंडळी अत्रि ऋषींच्या आश्रमीं आले. अत्रि-अनसूया हे उभयंता सर्वकाळ अतिथींचे पूजन-सन्मान करून त्यांस भोजन देत असत. ऐशा पुण्यश्रमीं अतिथीत्रय म्हणजेच त्रिदेव आले आणि महासाध्वी अनसूयेस म्हणाले, " आम्ही अतिशय क्षुधार्त असून आम्हांस इच्छाभोजन द्यावे." त्यांचे वचन ऐकून अनसूयेने त्यांना उत्तम आसन दिले आणि त्यांचे षोडशोपचारे पूजन केले. तदनंतर तिने विविध पक्वान्नांनी भरलेली पानें मांडून अतिथींना भोजन करण्याची प्रार्थना केली. मात्र त्यावर तुमचे लावण्य स्वरूप देखुनी । अभिलाषा उपजली मनीं । वाढावें तुम्ही वस्त्र त्यागुनी । ऐसे अतिथी बोलती ॥ नाहीतर आम्ही तुझे सत्त्व घेऊन जाऊ, अशी ब्राह्मणवेषांतील त्रिदेवांनी विचित्र मागणी केली. त्यावेळी ब्रह्मविद्वर, त्रिकाल-ज्ञानी अत्रि ऋषींनी हे अतिथी म्हणजेच साक्षात विधिहरिहर आहेत, हे ओळखले. मग सती अनसूयेने निजदैवताचे अर्थात पतीदेव अत्रिऋषींचे ध्यान केले आणि त्यांचे चरणतीर्थ घेऊन ते अतिथींवर सिंचन केले. तात्काळ ते त्रिदेव लहान, गोजिरवाणी बालके झाली. विगतवसन होउनी सती । घेतलीं बालकें अंकावरती । तों स्तनीं दुग्धधारा सुटती । मग ते पाजिती लेंकरा ॥ ती अतिसुंदर, लोभस बालकें पाहून अत्रि-अनसूया या दोघानांही परमानंद झाला आणि हे तीन पुत्र देऊन ईश्वराने आपले वरदान पूर्णत्वास नेले, असेच त्यांना वाटले. आश्रमांतील सर्व आबाल-वृद्ध अनसूया सतीचे हे अद्भुत सामर्थ्य पाहून अचंबित झाले.
अत्रिआश्रमांत पुत्रजन्माचा महोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा होऊ लागला. महापतिव्रता अनसूया सुंदर नवीन वस्त्र नेसून ध्वजा, तोरणें उभारू लागली. तेथील सर्व योगी-मुनीजन मंगलवाद्यांच्या गजरांत सुरेख गीत गाऊ लागले. चतुर्मुख ब्रह्मा जो अनेक ब्रह्मांडांची उत्पत्ति करतो, ज्याचे सर्व वेद हिरण्यगर्भ, स्रष्टा असे स्तवन करतात, तो ब्रह्मदेव अत्रिसदनीं तान्हें शिशु होऊन पाळण्यांत लोळू लागला. जनार्दन अर्थात महाविष्णु जो अनंतसृष्टीचे पालन करतो, जो कैवल्यमोक्षदायी आहे आणि ज्याचा महिमा पुराणें, वेद-व्यासादि गातात तो हरी अत्रिआश्रमीं पाळण्यांत लहान बालक होऊन रडू लागला. कैलासराणा नीलकंठ, शिवशंकर ज्याचा रुद्रमहिमा वेद-पुराणें, स्मृतिशास्त्रेंही सर्वत्र गातात, तो अखंड ब्रह्मानंद अत्रिबाळ होऊन मंद हास्य-रुदन करू लागला. आपल्या या तिन्ही पुत्रांना पाळण्यांत घालून महासती अनसूया मोठ्या ममत्वाने जोजवू लागली. असा त्या स्थानीं मोठा आनंदसोहळा सुरु होता.
इतक्यांत एक नवल वर्तले! देवर्षि नारदमुनी अकस्मात तिथे आले आणि त्रैमूर्ति बालस्वरूपांत पाहून हसू लागले. अत्रिऋषि अनसूया । पूजुनी म्हणती देवर्षिराया । आपण बैसविले निजठायां । केली दया समर्थे ॥ पुढे, नारदमुनी सत्वर देवलोकी गेले. त्यांना पाहून सुरवरस्त्रिया विनवित म्हणाल्या, " गेले कित्येक दिवस आमचे पती स्वस्थानीं आले नाहीत. तुम्हांस त्यांचा काही ठावठिकाणा माहित असेल तर, आम्हांस सांगावे." " तुमचे पती अत्रिआश्रमांत । बाल होऊनी लोळती पाळण्यांत ।" असे नारदमुनींनी सांगताच त्या तिन्ही देवी क्रोधायमान झाल्या आणि देवर्षींसह सत्वर भूलोकी अत्रि ऋषींच्या आश्रमांत आल्या. तिथे त्रिदेवांना बालकस्वरूपांत पाहून त्यांचा राग अनावर झाला अन मंत्र जपुनि त्वां केलें कपटें । आमच्या पुरुषांसी धाकटें । पतिव्रतालक्षण चेटकें । शोभे नेटकें तुझे तुज ॥ असे अनसूयेस मोठ्या त्वेषयुक्त स्वरांत बोलू लागल्या. त्या तिन्ही देवस्त्रियांचे ते गर्व-द्वेष आणि अहंभावयुक्त वचन ऐकून ती पतिव्रताशिरोमणी अनसूया अति मधुर स्वरांत त्यांना म्हणाली, " देवींनो, तुमचे पती हे बहुरूपी आहेत, हे तुम्ही जाणता. तुम्हीही अखिल त्रैलोक्यांत महान पतिव्रता म्हणून विख्यात आहात. त्या सामर्थ्याने तुम्ही बालकरूपांतील आपापल्या पतींना ओळखून घेऊन जा." अनसूयेचे हे वचन ऐकून रमा, उमा आणि सावित्री तिघीहीजणी धावतच पाळण्याजवळ गेल्या खऱ्या, मात्र त्या तिन्ही गोजिरवाण्या अत्रिनंदनांचे रूप पाहून, हुंकार ऐकून, अथवा त्यांना उचलून कडेवर घेऊनही, यांतील ब्रह्मा कोण ? श्रीहरिविष्णु कुठले आणि शंभो महादेव कोण? हे काही त्या ओळखू शकल्या नाहीत. अंतर्बाह्य मर्यादा खुणें । स्वपतीस जाणणे न ओळखणे । हे काय पतिव्रतेचे लक्षण म्हणावें काय ? असा विचार करून त्या तिघीहीजणी तेव्हा मनोमन ओशाळल्या. मग सावित्री, लक्ष्मी, उमा या तिघीही जणी अनसूयेची क्षमा मागत म्हणाल्या, " हे अनसूये, तू पतिव्रताधर्म निपुण असून साक्षात जगन्माता आहेस. आम्ही तुला शरण आलो आहोत. तू आमच्या पतीचे दान द्यावे, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो." त्यावर अनसूया हसतहसत उत्तरली," सुरांगना हो, मी या तिन्ही बालकांचे आनंदाने पालन करते. तुम्हीही इथे तुमच्या पतीसह वास्तव्य करावे." असे बोलून ती त्या तिन्ही बालकांस स्तनपान करू लागली. जरी मोठें हे देवत्रय । कोठून मिळे त्यांना सुसतीचे पय । हाचि जाणूनि अभिप्राय । स्तनपान करिती अवश्य ते ॥ असा हा पुत्रसोहळा पहाण्यासाठी आकाशांत सुरवरांच्या विमानांची दाटी झाली अन ते त्या अनसूयेच्या पुत्रांवर सुवर्णपुष्पांची वृष्टी करू लागले. अशाप्रकारे, कृतयुगांत अत्रि आश्रमी ब्रह्मकैवल्य, पुरुषोत्तम गुरु प्रकटले. मार्गशीर्ष शुक्लपक्षीं । भूतातिथी मंदरोहिणी ऋक्षीं । त्रैमूर्ति हे सायान्ही सुराध्यक्षीं । अंतर्साक्षी जन्मले ॥ ब्रह्मावतार 'सोम' नांवानें, रुद्रावतार 'दुर्वास' नामानें तर विष्णुस्वरूप 'दत्त' नामानें जगतविख्यात झाले. प्रत्यक्ष ईश्वर आपले पुत्र झाले, हे पाहून अनसूया-अत्रि अतिशय आनंदले. तेव्हा त्या तिन्ही देवस्त्रियांनी सती अनसूयेस वारंवार नमन केले आणि " कृपा करून आमच्या पतींचे आम्हांस दान द्यावे," अशी प्रार्थना केली. मग त्या महापतिव्रता अनसूयेने पतीचरणांचे तीर्थ त्या तीन बालकांवर शिंपडले अन त्रिदेवांना तात्काळ पूर्वरूप प्राप्त झाले व तिन्ही बाळेंही तशीच पाळण्यांत राहिली. हे पाहून सर्वांसी वाटले आश्चर्य । म्हणती धन्य धन्य सती ऋषिवर्य । नारद वदे साधले कार्य । अमरार्य झाले एकत्र ॥ अशा रितीने, त्रैमूर्तींनी अत्रि महर्षींना दिलेले वरदान फलस्वरूप झाले. तदनंतर ब्रह्मा-सावित्री, श्रीहरि-लक्ष्मी, अन शिव-गिरीजा त्या पुण्यशील दांपत्यास शुभाशिष देऊन स्वस्थानीं गेले. कालांतराने सोम चंद्रमंडळात वास करू लागला, तर दुर्वास तीर्थयात्रा करण्यासाठी प्रयाण करते झाले, अन त्रयदेवात्मक योगीश्वर दत्त अत्रि-अनसूयेजवळ राहिले. विधाता-नारायण-पंचवक्त्र । मिळून झाले एकत्र । विशुद्धसत्त्व-एकस्वरूप स्वतंत्र । अवतरले सर्वत्र सुखप्रद ॥ दकारोSज्ञानदग्धा च । तकारस्तत्त्वमव्ययं । दत्तस्मरणमात्रेण । पुनर्जन्म न विद्यते ॥ अर्थात त्या दत्तप्रभूंच्या - विधि-नारायण-हर यांच्या या अपूर्व त्रैमूर्तिस्वरूपाचे नित्य ध्यान-पूजन केले असता साधकांस भुक्ति-मुक्ती सहज प्राप्त होते.  
॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
क्रमश:

आवडे दत्तभक्तांसी ...


Apr 10, 2024

भावार्थ श्रीगुरुलीलामृत - देवतावंदन


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ  द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-श्रीस्वामीसमर्थमहाराजाय नमः ॥ 

प्रारंभी श्रीमंगलमूर्ति । ज्याचे योगें स्फुरे चैतन्य स्फूर्ति । ब्रह्मादिक देव असुर नर जया वंदिती । त्या नमियेलें आदरें ॥श्रीमद्दत्तावतारी अक्कलकोट स्वामी महाराजांचे चरित्र - श्रीगुरुलीलामृत या पोथीच्या प्रारंभी ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य गणेश वंदन करतात. ग्रंथलेखनाचे कार्य निर्विघ्नपणे व्हावें आणि इष्टदेवतेचा अनुग्रह लाभावा यासाठी ग्रंथकर्ते ग्रंथारंभी जे स्तवन करतात त्यास मंगलाचरण म्हणतात. ग्रंथारंभी देवतावंदन । शिष्टाचार प्रवृत्तिजनन । परंपरा मंगलाचरण । अवश्य केले पाहिजे ॥ याच परंपरेला अनुसरून वामनबुवा आद्यपूजेचा मान असलेल्या आणि जो चतुर्दशविद्या, चौसष्ठ कलांचा अधिपती आहे त्या गणपतीची अनेक प्रकारें स्तुती करून, गजानन हेरंब लंबोदरा । विघ्नांतका सर्वविद्या-सागरा । ग्रंथ सिद्धीस नेऊनि दातारा । पूर्ण करा सविस्तर ॥ अशी प्रार्थना करतात. 
त्यानंतर, अनादिविद्येची चित्तशक्ती भगवती सरस्वती, वेदमूर्ति सकल ऋषिवर्य, वेदव्यास - सुरगुरू बृहस्पति, इंद्रादि सुरवर, ग्रहादिक या सर्वांना स्मरणपूर्वक वंदन करतात. जगदगुरु श्रीशंकराचार्य, कालिदासादि कविवर्य, नवनाथादि योगीश्वर आणि ज्ञानेश्वरादि संत-सज्जनांना नमन करून ग्रंथलेखनास सहाय्य करावे अशी प्रार्थना करतात.
पुढे वामनबुवा, आतां वंदूं मातापिता । कुलदेवतादि ग्रामस्थान वास्तुदेवता । ज्यांचे कृपे इहपर साध्य तत्वतां । होय सर्वथा निर्धारें ॥ अशी आपल्या कुळाची माहिती देतांना लिहितात - अहमदनगरनिवासी धारण्य गोत्री वैद्य घराण्यांत माझा जन्म झाला असून सप्तशृंगनिवासिनी जगदंबा आणि श्रीशंकर हे या कुळावर निरंतर प्रसन्न आहेत. माझे पूर्वज माणिक, मोरेश्वर, भटूवैद्य, नारायण आदि निष्णांत वैद्य होते. 
भट्टूवैद्यास होते चार नंदन । त्यांत श्रेष्ठ नारायण विद्वान । तयासि श्रीजगदंबा प्रसन्न । बोले चाले तत्संगें ॥ माझे खापरपणजोबा नारायण वैद्यांस स्वतः सप्तशृंगनिवासिनी माता औषधी आणून देत असे. माझे पणजोबा त्र्यंबक ब्रह्मज्ञानी होते आणि ते वाल्मीक ग्रामीं म्हणजेच वामोरी येथे वास्तव्यास आले. तर माझे आजोबा विठ्ठल उत्तम ज्योतिर्वैद्य होते. माझ्या पित्याचे नाव रावजीभट्ट आणि मातेचे नाव अहल्या होते.
तदनंतर ग्रंथप्रयोजनाचा आरंभ करतांना वामनबुवा - गुरुलीला वर्णनार्थ महाराजा । निजाज्ञा झाली या चरणरजा । मंदमति मी ह्या ग्रंथरूपी कार्यध्वजा । सिद्धीस नेणार आपणचि ॥ अशी अक्कलकोट स्वामी समर्थांची अभ्यर्थना करतात. 
आपल्या सद्‌गुरुंचे स्तवन करतांना वामनबुवांची गुरुभक्ती आणि गुरुनिष्ठा प्रत्येक ओवींमधून इतकी अधोरेखित होते की आपणही श्रीगुरुंचे स्वरूप आणि गुणवर्णनांत अगदी रंगून जातो. - ॐ नमः श्रीसद्‌गुरुनाथा । श्रीगुरुदेवदत्त स्वामी समर्था । पूर्णब्रह्म केवल अनादि यथार्था । आपणचि एक अद्वितीय ॥ जे ऋषि, मुनि, योगिजन, आणि भक्तजनांचे ध्येय आहेत, या जगताचे आधार आहेत, तेच परात्पर, परमगुरु श्रीदत्तात्रेय तुम्हीच आहात. सनकादिकांसही वंदनीय असलेले परब्रह्मस्वरूप, दीनानाथ, अनंतकोटी ब्रह्मांडनायक असे हे हरि-हर-ब्रह्माचे अवतार हे सद्‌गुरु तुम्हीच आहात. साधू-संतसज्जनाचे रक्षण करण्यासाठी, खल-दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी आणि धर्मसंस्थापनासाठी युगायुगी तुम्हीच अवतीर्ण होता. या कलियुगांत जागोजागी घोर दुराचरण होऊ लागले, तेव्हा श्रीपादश्रीवल्लभ रूपांत तुम्ही अवतरित झाला आणि भक्तजनांस सन्मार्ग दाखवला. त्यानंतर पुन्हा एकदा नरवेषांत यति नरसिंह सरस्वती झाला आणि सद्‌धर्म-नीति यांची घडी बसवून असंख्य भक्तजनांचा उद्धार केला. 
पुढे काही कालाने पुनरपि । घोर कलियुगीं प्राणी होऊं लागले पापी । म्हणून दत्तात्रेय ब्रह्मस्वरूपी । अवतरले नृसिंह-यतिरूपें ॥ - या सकल जगताच्या उद्धारासाठी श्रीगुरु नृसिंहयतीश्वरांनी या पृथ्वीतलावर स्वच्छंद संचार केला. हिमाचल, जगन्नाथ, हरिद्वार, द्वारका, गिरनार पर्वत, प्रयाग, गया, श्रीकाशी, व्यंकटेशगिरी, रामेश्वर, नारायण-बिंदू-पंपा-मानस सरोवर, मातुलिंग, खेटक, पंढरपूर, कांची द्वय, बदरीकेदार या तीर्थस्थानीं आणि भागिरथी, गोदावरी, कृष्णा तीरांवरील अनेक पावन क्षेत्रीं तीर्थाटन केले. तेच हे परमात्मा श्रीनृसिंहसरस्वती सोलापुरात काही काळ वास्तव्य करून फिरत फिरत अक्कलकोटी आले आणि भक्तजनांच्या उद्धारासाठी एकवीस वर्षे तिथेच राहिले. श्रीदत्तात्रेयांचे अवतार असलेले, सर्व चराचर सृष्टीला व्यापून उरलेले, सर्वांतर्यामी असे गुरु समर्थ स्वामी जगत-हितार्थ अक्कलकोटग्रामीं वसले, त्यांच्या चरणकमळांना मी अनन्यभावाने नमन करतो. वामनबुवांची अशी भावपूर्ण प्रार्थना ऐकून सद्‌गुरु स्वामी समर्थ प्रसन्न झाले आणि अंतरी प्रगटूनि अत्रिनंदन । ग्रंथ सिद्धीस जाईल निर्विघ्न । आशीर्वचन बोलती ॥
प्रत्यक्ष श्रीस्वामी समर्थांची अशी आज्ञा आणि आशीर्वाद प्राप्त झाल्यावर श्री वामनबुवा वैद्य श्रीगुरुलीलामृत हा ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ करतात. 
दत्तात्रेयस्वामीकृपे सविस्तर । ग्रंथ आरंभिला गुरुलीलामृत-सागर । सत्संकल्पसिद्धीप्रदातार । पूर्ण करील त्याचा तो ॥ 
॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
क्रमश: