Apr 10, 2024

भावार्थ श्रीगुरुलीलामृत - देवतावंदन


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ  द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-श्रीस्वामीसमर्थमहाराजाय नमः ॥ 

प्रारंभी श्रीमंगलमूर्ति । ज्याचे योगें स्फुरे चैतन्य स्फूर्ति । ब्रह्मादिक देव असुर नर जया वंदिती । त्या नमियेलें आदरें ॥  
श्रीमद्दत्तावतारी अक्कलकोट स्वामी महाराजांचे चरित्र - श्रीगुरुलीलामृत या पोथीच्या प्रारंभी ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य गणेश वंदन करतात. ग्रंथलेखनाचे कार्य निर्विघ्नपणे व्हावें आणि इष्टदेवतेचा अनुग्रह लाभावा यासाठी ग्रंथकर्ते ग्रंथारंभी जे स्तवन करतात त्यास मंगलाचरण म्हणतात. ग्रंथारंभी देवतावंदन । शिष्टाचार प्रवृत्तिजनन । परंपरा मंगलाचरण । अवश्य केले पाहिजे ॥ याच परंपरेला अनुसरून वामनबुवा आद्यपूजेचा मान असलेल्या आणि जो चतुर्दशविद्या, चौसष्ठ कलांचा अधिपती आहे त्या गणपतीची अनेक प्रकारें स्तुती करून, गजानन हेरंब लंबोदरा । विघ्नांतका सर्वविद्या-सागरा । ग्रंथ सिद्धीस नेऊनि दातारा । पूर्ण करा सविस्तर ॥ अशी प्रार्थना करतात. 
त्यानंतर, अनादिविद्येची चित्तशक्ती भगवती सरस्वती, वेदमूर्ति सकल ऋषिवर्य, वेदव्यास - सुरगुरू बृहस्पति, इंद्रादि सुरवर, ग्रहादिक या सर्वांना स्मरणपूर्वक वंदन करतात. जगदगुरु श्रीशंकराचार्य, कालिदासादि कविवर्य, नवनाथादि योगीश्वर आणि ज्ञानेश्वरादि संत-सज्जनांना नमन करून ग्रंथलेखनास सहाय्य करावे अशी प्रार्थना करतात.
पुढे वामनबुवा, आतां वंदूं मातापिता । कुलदेवतादि ग्रामस्थान वास्तुदेवता । ज्यांचे कृपे इहपर साध्य तत्वतां । होय सर्वथा निर्धारें ॥ अशी आपल्या कुळाची माहिती देतांना लिहितात - अहमदनगरनिवासी धारण्य गोत्री वैद्य घराण्यांत माझा जन्म झाला असून सप्तशृंगनिवासिनी जगदंबा आणि श्रीशंकर हे या कुळावर निरंतर प्रसन्न आहेत. माझे पूर्वज माणिक, मोरेश्वर, भटूवैद्य, नारायण आदि निष्णांत वैद्य होते. 
भट्टूवैद्यास होते चार नंदन । त्यांत श्रेष्ठ नारायण विद्वान । तयासि श्रीजगदंबा प्रसन्न । बोले चाले तत्संगें ॥ माझे खापरपणजोबा नारायण वैद्यांस स्वतः सप्तशृंगनिवासिनी माता औषधी आणून देत असे. माझे पणजोबा त्र्यंबक ब्रह्मज्ञानी होते आणि ते वाल्मीक ग्रामीं म्हणजेच वामोरी येथे वास्तव्यास आले. तर माझे आजोबा विठ्ठल उत्तम ज्योतिर्वैद्य होते. माझ्या पित्याचे नाव रावजीभट्ट आणि मातेचे नाव अहल्या होते.
तदनंतर ग्रंथप्रयोजनाचा आरंभ करतांना वामनबुवा - गुरुलीला वर्णनार्थ महाराजा । निजाज्ञा झाली या चरणरजा । मंदमति मी ह्या ग्रंथरूपी कार्यध्वजा । सिद्धीस नेणार आपणचि ॥ अशी अक्कलकोट स्वामी समर्थांची अभ्यर्थना करतात. 
आपल्या सद्‌गुरुंचे स्तवन करतांना वामनबुवांची गुरुभक्ती आणि गुरुनिष्ठा प्रत्येक ओवींमधून इतकी अधोरेखित होते की आपणही श्रीगुरुंचे स्वरूप आणि गुणवर्णनांत अगदी रंगून जातो. - ॐ नमः श्रीसद्‌गुरुनाथा । श्रीगुरुदेवदत्त स्वामी समर्था । पूर्णब्रह्म केवल अनादि यथार्था । आपणचि एक अद्वितीय ॥ जे ऋषि, मुनि, योगिजन, आणि भक्तजनांचे ध्येय आहेत, या जगताचे आधार आहेत, तेच परात्पर, परमगुरु श्रीदत्तात्रेय तुम्हीच आहात. सनकादिकांसही वंदनीय असलेले परब्रह्मस्वरूप, दीनानाथ, अनंतकोटी ब्रह्मांडनायक असे हे हरि-हर-ब्रह्माचे अवतार हे सद्‌गुरु तुम्हीच आहात. साधू-संतसज्जनाचे रक्षण करण्यासाठी, खल-दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी आणि धर्मसंस्थापनासाठी युगायुगी तुम्हीच अवतीर्ण होता. या कलियुगांत जागोजागी घोर दुराचरण होऊ लागले, तेव्हा श्रीपादश्रीवल्लभ रूपांत तुम्ही अवतरित झाला आणि भक्तजनांस सन्मार्ग दाखवला. त्यानंतर पुन्हा एकदा नरवेषांत यति नरसिंह सरस्वती झाला आणि सद्‌धर्म-नीति यांची घडी बसवून असंख्य भक्तजनांचा उद्धार केला. 
पुढे काही कालाने पुनरपि । घोर कलियुगीं प्राणी होऊं लागले पापी । म्हणून दत्तात्रेय ब्रह्मस्वरूपी । अवतरले नृसिंह-यतिरूपें ॥ - या सकल जगताच्या उद्धारासाठी श्रीगुरु नृसिंहयतीश्वरांनी या पृथ्वीतलावर स्वच्छंद संचार केला. हिमाचल, जगन्नाथ, हरिद्वार, द्वारका, गिरनार पर्वत, प्रयाग, गया, श्रीकाशी, व्यंकटेशगिरी, रामेश्वर, नारायण-बिंदू-पंपा-मानस सरोवर, मातुलिंग, खेटक, पंढरपूर, कांची द्वय, बदरीकेदार या तीर्थस्थानीं आणि भागिरथी, गोदावरी, कृष्णा तीरांवरील अनेक पावन क्षेत्रीं तीर्थाटन केले. तेच हे परमात्मा श्रीनृसिंहसरस्वती सोलापुरात काही काळ वास्तव्य करून फिरत फिरत अक्कलकोटी आले आणि भक्तजनांच्या उद्धारासाठी एकवीस वर्षे तिथेच राहिले. श्रीदत्तात्रेयांचे अवतार असलेले, सर्व चराचर सृष्टीला व्यापून उरलेले, सर्वांतर्यामी असे गुरु समर्थ स्वामी जगत-हितार्थ अक्कलकोटग्रामीं वसले, त्यांच्या चरणकमळांना मी अनन्यभावाने नमन करतो. वामनबुवांची अशी भावपूर्ण प्रार्थना ऐकून सद्‌गुरु स्वामी समर्थ प्रसन्न झाले आणि अंतरी प्रगटूनि अत्रिनंदन । ग्रंथ सिद्धीस जाईल निर्विघ्न । आशीर्वचन बोलती ॥
प्रत्यक्ष श्रीस्वामी समर्थांची अशी आज्ञा आणि आशीर्वाद प्राप्त झाल्यावर श्री वामनबुवा वैद्य श्रीगुरुलीलामृत हा ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ करतात. 
दत्तात्रेयस्वामीकृपे सविस्तर । ग्रंथ आरंभिला गुरुलीलामृत-सागर । सत्संकल्पसिद्धीप्रदातार । पूर्ण करील त्याचा तो ॥ 
॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

No comments:

Post a Comment