Apr 17, 2024

॥ अवतरला रघुनंदन । पूर्णब्रह्म जगद्‌गुरु ॥


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीराम श्रीराम श्रीराम

सर्व दत्तभक्तांना श्रीरामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा !


वसंतऋततु चैत्रमास । शुक्लपक्ष नवमी दिवस । सूर्यवंशीं जगन्निवास । सूर्यवासरीं जन्मला ॥
माध्यान्हा आला चंडकिरण । पुष्य नक्षत्र साधून । अवतरला रघुनंदन । पूर्णब्रह्म जगद्‌गुरु ॥
श्रीराम केवळ परब्रह्म । त्यासी जाहला म्हणतां जन्म । संत हांसतील परम । तत्त्वज्ञानवेत्ते जे ॥

ज्याची लीला ऐकतां अपार । खंडे जन्म मृत्यु दुर्धर । त्या रामासी जन्मसंसार । काळत्रयीं घडेना ॥

सारी अयोध्या ज्या घटनेची वाट पाहत होती ती घटना व घटीका जवळ येत होती. अति शुभदायी असा चैत्र महिना आला. दशरथाची महाराणी कौसल्या आता आसन्नप्रसवा झाली होती. तिच्या सुंदर मुखावर अलौकिक असे तेज दिसत होते. अयोध्या नगरीत सर्वत्र शुभशकून होत होते. चैत्रातील शुद्ध नवमी तिथी उगवली आणि कौसल्येला प्रसूती वेदना सुरु झाल्या. सूर्य नारायण मध्यान्ही आले, तेव्हा कौसल्या महाराणी प्रसूत होऊन तेजःपुंज सावळ्या रंगाचा पुत्र जन्माला आला. जणू काही पृथ्वीतलावर त्यावेळी वसंतऋतूला अत्यंतिक बहर आला, सर्व सुरवर आपापली विमाने घेऊन अयोध्या नगरीवर गगनातून स्वर्गातील पुष्पांची वृष्टी करीत होते ! कौसल्येचा पुत्र म्हणून जन्म घेण्याआधी श्रीहरि विष्णूंनी एक अद्भुत लीला केली. केवळ कौसल्येसाठी ते श्रीपती पद्म-शंख-चक्र-गदाधारी अशा चतुर्भुज रूपांत प्रगट झाले.

ते कौसल्या सती बैसली असतां एकांतीं तों अष्टदश वरुषांची मूर्ति सन्मुख देखे अकस्मात ॥

लक्ष्मी, सरस्वती आणि गंगा यांनी त्यांच्या दिव्य चरणांचा आश्रय घेतला होता. त्यांचे तेज सूर्य चंद्रापेक्षाही अवर्णनीय होते.

संध्याराग अरुण बालार्क दिव्य रत्नांचे काढिले रंग देख तळवे तैसे सुरेख श्रीरामाचे वाटती ॥

सहस्र विजांच्या प्रकाशासम तेजस्वी असा पीतांबर दिसत होता तर मेखलेचे मणी म्हणजे जणू शीतल झालेले सूर्य भासत होते. त्यांनी धारण केलेल्या घागऱ्यांचे कोमल ध्वनी जणू वेद ऋचांशी स्पर्धा करीत होते.

कंठात सूर्यासारखा तेजस्वी कौस्तुभ मणी होता. शंख, चक्र, गदा व पद्म अशी भ्रषणे चारी हातांत होती. त्या चारी हातांना सुवर्ण भूषणे शोभत होती.

श्यामलांगी अति निर्मळ वरी डोले वैजंतीची माळ अनंत भक्त हृदयीं धरिले तरीच वक्षःस्थळ रुंदावलें ॥

जणू कोट्यावधी मदनांच्या सौंदर्यासम त्या त्रिलोकेशाच्या मुद्रेचे कसे वर्णन करावे बरें ?

कंबुकंठ अति शोभत नासिक सरळ सुकुमार बहुत मंदिस्मितवदन विराजत कोटि मन्मथ ओंवाळिजे ॥ विद्रुमवर्ण अधर सतेज माजी ओळीनें झळकती द्विज त्या तेजें शशी नक्षत्रें तेजःपुंज झांकोळती पाहतां ॥ त्रैलोकींचा मेळवोनि आनंद ओतिलें रामाचें वदनारविंद आकर्ण नेत्र भु्रकुटी विशद धनुष्याकृति शोभती स्वानंदसरोवरींचीं कमलदलें तैसे आकर्ण नयन विकासले त्या कृपादृष्टीनें निवाले प्रेमळ जन सर्वही 

कौसल्येने ते केशवाचे अतिमोहक रुप डोळे भरून पाहिले अन कौसल्या बोले ते अवसरीं भक्तवत्सला मधुकैटभारी तूं आतां बाळवेष धरीं माझें उदरीं अवतरें ॥

हे भगवंता ! आतां तू बाल स्वरूप हो. लोक म्हणतील कौसल्यानंदन ॥ ऐसा होय तूं मनमोहन ॥"

कौसल्यामातेने केलेली ही प्रार्थना ऐकताच श्रीहरि विष्णूंनी आपले विराट दिव्य स्वरूप आवरले आणि तिच्यापुढे ते बालकरूपांत प्रकट झाले !

सजलजलदवर्ण कोमळ तो कौसल्येपुढें जाहला बाळ तंव ते परम सुवेळ पुष्यार्कयोग ते समयीं ॥

जो क्षीरसागरवासी तमालनीळ तो कौसल्येपुढें जाहला बाळ चरणांगुष्ठ धरोनि कोमळ मुखकमळीं घालीतसे

महाराणी कौसल्या प्रसूत झाली आणि राजपुत्र जन्मला, ही वार्ता अयोध्या नगरीत पसरली. अयोध्याजन आनंदोत्सव साजरा करू लागले.

थोड्याच वेळांत राणी सुमित्रेस पुत्रप्राप्ती झाली, ही शुभ वार्ता नगरांत पसरली. अयोध्यावासियांचा आनंद द्विगुणित झाला, तोच राणी कैकयीस जुळे पुत्र झाले हे सुखद वर्तमान सर्वांस कळविण्यांत आले. असा तिथे मोठा आनंदसोहळा झाला.

तों सुमित्रेसी जाहला पुत्र म्हणोनि धांवत आले विप्र कैकयीस जाहले दोन कुमर ते विष्णूचे शंखचक्र अवतार क्षीरसागरींहूनि श्रीधर कौसल्येमंदिरी पातला ॥ 

तेरावे दिवशीं वसिष्ठऋषि नामकरण ठेवी चौघांसी कौसल्येचा राम तेजोराशी जो वैकुंठवासी जगदात्मा ॥ सुमित्रेचा नंदन त्याचें नाम ठेविलें लक्ष्मण जो काद्रवेयकुलभूषण विष्णु शयन ज्यावरी करी ॥ कैकयीचे जे कां सुत भरत शत्रुघ्न निश्चित चौघे दशरथी जगविख्यात जाहले ॥

रघुवंशाची पुण्याई फळांस आली होती, भगवंताने बालस्वरूप धारण करून दशरथाचा पुत्र म्हणून अवतार घेतला होता.

पुराणपुरुष परात्पर तो ब्रह्मानंद श्रीधरवर अयोध्येंत अवतरला साचार ॥

॥ श्रीराम श्रीराम श्रीराम


श्रीरामचंद्रांचा पाळणा


बाळा जो जो रे कुळभूषणा । दशरथनंदना । निद्रा करि बाळा मनमोहना । रामा लक्षुमणा ॥धृ॥ पाळणा लांबविला अयोध्येसी । दशरथाचे वंशी । पुत्र जन्मला हृषीकेशी । कौसल्येचे कुशी ॥१॥ रत्नजडित पालख । झळके अलौकिक । वरती पहुडले कुलदिपक । त्रिभुवननायक ॥२॥ हालवी कौसल्या सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी । पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जती जयजयकार ॥३॥ विश्‍वव्यापका रघुराया । निद्रा करी बा सखया । तुजवर कुरवंडी करुनिया । सांडिन आपुली काया ॥४॥ येऊनि वसिष्ठ सत्वर । सागे जन्मांतर । राम परब्रहा साचार । सातवा अवतार ॥५॥ याग रक्षुनिया अवधारा । मारुनि रजनीचरा । जाईल सीतेच्या स्वयंवरा । उद्धरि गौतमदारा ॥६॥ पर्णिले जानकी सुरुपा । भंगुनिया शिवचापा । रावण लज्जित महाकोप । नव्हे पण हा सोपा ॥७॥ सिंधूजलडोही अवलीळा । नामे तरतिल शिळा । त्यावरी उतरुनिया दयाळा । नेईल वानरमेळा ॥८॥ समूळ मर्दूनि रावण । स्थापिल बिभीषण । देव सोडविले संपूर्ण । आनंदले त्रिभुवन ॥९॥ राम भावाचा भुकेला । भक्ताधीन झाला । दास विठ्ठले ऎकिला । पाळणा गाईला ॥१०॥

संतकवी श्री दासगणू महाराजविरचित श्रीरामप्रभूंचा पाळणा


बाळा जो जो रे ! रघुराया । भक्तवत्सला ! सदया ॥धृ०॥ त्रिभुवन पाळना तुजसाठीं शशिवदना । निद्रा करि बारे ! अघशमना । रामा राजिवनयना ॥१॥ ऋग् यजु साचार पाळण्याचे खूर । अठरा पुराणें निर्धार । उपनिषदें विणकर ॥२॥ गादी भावाची त्यावरती । उशि सोज्वल भक्तीची । रामा घातिली म्या, मधे साची । शाल वैराग्याची ॥३॥ शांति ही दोरी घेउनिया । मी बघ अपुले करी । हालविन तुजलागी रघुराया । दासगणूला तारी ॥४॥


॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


No comments:

Post a Comment