Aug 21, 2020

सिद्धमंगल स्तोत्र


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

 

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ह्या अत्यंत प्रासादिक ग्रंथाचे रचनाकार श्री. शंकर भट ( मराठी अनुवाद : श्री. हरिभाऊ जोशी निटूरकर ) सतराव्या अध्यायांत लिहितात - श्री बापनाचार्युलुंना ( श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे मातामह ) श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी ''सिद्धमंगल'' स्तोत्र लिहिले.
प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायिली जाणारी या स्तोत्रातील अक्षरें अत्यंत प्रभावशाली आहेत. त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगें विलसत राहील. या स्तोत्रात व्याकरणदृष्टया कोणताही दोष अथवा त्रुटी नाही. या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधिनिषेध नाही. मला ते स्तोत्र श्री. बापनाचार्युलूच्या मुखातून ऐकण्याचे भाग्य लाभले. हे स्तोत्र माझ्या हृदयावर अंकित झाले आहे. याच्या पठणाने मनातील सर्व कामना पूर्ण होतात. जे भक्त मन, काया आणि कर्म आदिंनी श्री दत्तात्रेयांची आराधना करून या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस पात्र होतात.  तसेच, याच्या नियमितपणे गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्यास सिद्धी प्राप्त होतात. तसेच, परम पवित्र अशा या सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनघाष्टमीचे व्रत करून केल्यास सहस्त्र ब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शनही होते. 
  श्री मदनंत, श्रीविभूषित, अप्पल लक्ष्मीनरसिंह राजा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥१॥ श्री विद्याधरि, राधा, सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥२॥ माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥३॥ सत्यऋषीश्वर-दुहितानंदन बापनार्यनुत श्रीचरणा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥४॥ सवितृकाठकचयन-पुण्यफल भारद्वाजऋषी गोत्र संभवा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥५॥ दो चौपाती देव लक्ष्मीगण संख्या-( लक्ष्मी धनस्ख्या ) बोधित श्रीचरणा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥६॥ पुण्यरूपिणी राजमांबा सुत-गर्भपुण्यफलसंजाता । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥७॥ सुमतीनंदन, नरहरीनंदन, दत्तदेव प्रभू श्रीपादा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥८॥ पीठिकापूरा नित्यविहारा, मधुमतीदत्ता, मंगलरूपा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥९॥ ॥ श्रीपादराजम् शरणम् प्रपद्ये ॥

Aug 20, 2020

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजविरचित श्रीराम पाठ


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीराम समर्थ ॥ श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा । ध्यातों तुझी राजस योगमुद्रा । नेत्रीं न ये रे तुजविण निद्रा । कैं भेटसी बा मजला सुभद्रा ॥ जयाचा जनीं जन्म नामार्थ झाला । जयानें सदा वास नामांत केला । जयाच्या मुखीं सर्वदा नामकीर्ति । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ॥ श्रीराम श्रीराम श्रीराम ॥ ॐ नमो जी सद्गुरुनाथा । तुझे चरणी ठेविला माथा । पूर्ण करी मनोरथा । विनंती माझी परिसावी ॥१॥ रामपाठाचा उच्चार । मम हृदयी करी उद्धार । हेचि मागणे वारंवार । तुजलागी दयाळा ॥२॥ व्यास वाल्मिकी नारदमुनी । शुकसनकादिक ज्याचे ध्यानी । तो श्रीराम चापपाणि । मम वाणी वदो का ॥३॥ अयोध्यावासी नगरजन । रामासी भजती अनुदिन । तो कौसल्यानंदन । मम हृदयी वसावा ॥४॥ सद्गुरू म्हणे ऊठ लवलाही । ज्ञानदीपाचे प्रकाशे पाही । वस्तु आपली शोधून घेई । मग पावसी निजसुखा ॥५॥ सद्गुरू राजवैद्य पूर्ण । रामनामाचे रसायन । स्वहस्ते मम मुखी पाजून । केले सावध स्वरूपी ॥६॥ नेत्री घातले बोधांजन । भवरोग काढिला मुळीहून । मूर्ती दाविली सगुण । ते रूप वर्णिले न जाय ॥७॥ चतुर्भुज मेघश्याम सावळा । कांसे पीतांबर पिवळा । गळा वैजयंतीमाळा । मुक्ताहार डोलती ॥८॥ अंगी चंदनाची उटी । केशर कस्तुरी लल्लाटी । अमूल्य रत्ने शोभती मुकुटी । कर्णी कुंडले तळपती ॥९॥ क्षुद्रघंटा वाजती कटी । दशांगुली मुद्रिकांची दाटी । बाहुभूषणे शोभती मनगटी । सुवर्णपादुका चरणकमली ॥१०॥ शंख चक्र चाप बाण । वरद हस्त उदार वदन । विशाळ भाळ आकर्ण नयन । ऐसा भगवान देखिला ॥११॥ गुप्त ठेविले निर्गुण । प्रकट केले स्वरूप सगुण । श्रीराम अवतार घेऊन । धर्म स्थापिला स्वहस्ते ॥१२॥ अयोध्या पुण्यपावन नगरी । तेथे श्रीराम राज्य करी । तपोनिधी महाक्षत्री । सिंहासनी विराजे ॥१३॥ शेषे धरिले छत्र । भरतशत्रुघ्न धरिती चामर । भक्त प्रार्थिती वारंवार । जयजयकारे गर्जती ॥१४॥ नळ नीळ जांबुवंत । अंगद सुग्रीव बिभीषण भक्त । निरिच्छ वायुसुत । सदा निमग्न रामरूपी ॥१५॥ वसिष्ठ विश्वामित्र ऋषी । दत्त दिगंबर तापसी । ब्रह्मचारी कित्येक संन्यासी । रामनामी लुब्धले ॥१६॥ रामनाम हृदयी धरून । ध्यानी बैसले योगीजन । यम इंद्र अग्नि वरुण । पंचवदन तप करी ॥१७॥ रामनामाची अपरिमित शक्ती । शेषाची वर्णिता खुंटली मती । वेदाची न चले गति । शास्त्रे लज्जित बैसली ॥१८॥ अनंत अवतारांचा महिमा । तोही रामनामी तुळेना । ऐशिया रामाच्या सद्गुणा । मी मानव काय वर्णू ॥१९॥ रामी रंगले त्रिभुवन । जडमूढ काष्ठ पाषाण । घटमठांत सर्वांत परिपूर्ण । त्याहून वेगळा राहिला ॥२०॥ पिंडब्रह्मांडाची रचना । तू निर्मिली रघुनंदना । जगव्यापका आत्मारामा । शोधिता ठायी न पडे कोठे ॥२१॥ तुझे स्वरूपाची व्हावी प्राप्ती । यालागी कित्येक तप करिती । कित्येक पंचाग्निधूम्रपान साधिती । तयांसी अंत न लागे तुझा ॥२२॥ तेथे मी अज्ञान मूढमती । करू नेणे तुझी भक्ती । परि संतमुखे ऐकिली कीर्ती । शरणागता उद्धरी तू ॥२३॥ माझ्या भाग्यासी नाही मिती । तू भेटलासी जगज्ज्योती । आता कळेल तैशा रीती । उद्धारगति करी माझी ॥२४॥ तुझे ब्रीदाचे महिमान । कित्येक उद्धरिले पापीजन । विरोधभक्तीने रावण । वैकुंठपदी पावविला ॥२५॥ सात्विक भक्त थोर थोर । तुलसीदास कमाल कबीर । रामदास वायुकुमर । त्यांचा किंकर मज करी ॥२६॥ मी न मागे धनसंपत्ती । मज न लगे वैकुंठप्राप्ती । परी तुझ्या भक्तांची संगती । मज घडो सर्वदा ॥२७॥ कोट्यानुकोटी जन्म घेईन । करीन तुझे पादसेवन । अवतारलीला मुखाने गाईन । ऐसे मज देई सर्वथा ॥२८॥ तुझ्या अवतारलीला बहुत । व्यास बोलिले संस्कृत । ते अज्ञानासी न होय प्राप्त । यास्तव प्राकृत वर्णिले ॥२९॥ सद्गुरूने निर्मिला हा ग्रंथ । रामपाठ केवळ अमृत । श्रवणद्वारे पाजूनि यथार्थ । तृप्त केले भक्तजन ॥३०॥ ज्यासी वैकुंठपदाची गोडी । त्याने रामपाठ भजावा आवडी । त्याचे संकटी घालूनि उडी । श्रीराम रक्षी निजांगे ॥३१॥ ज्ञानदेव करी हरिपाठ । ब्रह्मचैतन्य करी रामपाठ । भक्तजनी मानावे दोन्ही श्रेष्ठ । ग्रंथ वरिष्ठ प्रभूंचा ॥३२॥ मज काही ज्ञान नसे किंचित् । हृदयी प्रकटला जानकीकांत । त्याचा त्याने लिहून ग्रंथ । भक्तासी अर्पिला प्रीतीने ॥३३॥
॥ जानकीजीवनस्मरण जय जय राम ॥ ॥ श्रीराम श्रीराम श्रीराम ॥  


Aug 19, 2020

कार्तवीर्योsर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् - २


|| श्री गणेशाय नमः || श्री दत्त समर्थ ||

यथावकाश नवमांस पूर्ण होताच शीलधरा राणीनें कार्तिक शु. सप्तमीला रात्रीच्या शुभवेळी एका पुत्ररत्नाला जन्म दिला. कार्तिकस्यसिते पक्ष सप्तभ्यां भानुवासरे । श्रवणर्क्षे निशानाये निशिचे सु सुभेदर्णे || ( स्मृति पुराण १५/३) कृतवीर्य राजाच्या पुत्राच्या जन्मसमयीं पाचही ग्रह उच्चीचे होते. साक्षात प्रभू दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने जन्मलेल्या त्या दिव्य बालकाच्या आगमनाने सारे ब्रह्माण्ड आनंदाने भरून गेले. अनेक शुभ संकेत सहजच सर्वच स्थानीं दिसू लागले. अत्यंत हर्षित झालेल्या कृतवीर्याने आपल्या प्रजेस धन, धान्य आणि वस्त्रे आदि यांचे यथायोग्य दान केले. ब्राह्मणांना विपुल गोदान आणि सुवर्णदानही केले. साधुजनांना प्रसन्न केले आणि त्या सिद्धांच्या मुखांतून त्या बालकासाठी 'आयुष्यमान हो, यशस्वी हो' असे अनेक आशीर्वाद येऊ लागले. राजानें ज्योतिष्यांना पाचारण करून नवजात बाळाचे जातक वर्तविले. ज्योतिषी लग्न पाहून त्या दैवशाली बालकाचे भविष्य अत्यंत प्रसन्न होऊन वदते झाले, दैवशाली हा कुमार । श्रीदत्तात्रेय कृपापात्र । तपोबळें पवित्र । होईल सर्वत्र प्रख्यात याचें घेतां नाम । नष्ट वस्तूचा आगम । स्मरतां करील आगम । हा वेदशास्त्रपारंगत होईल. अनंतव्रताचे फलस्वरूप म्हणून हा सप्तद्वीपांकित पृथ्वीचा सार्वभौम राजा होईल आणि पंचाऐंशी हजार वर्षें राज्य करील. सूर्यनारायणाच्या व्रतप्रभावाने ह्यास लक्ष वर्षांचे निरोगी आयुष्य लाभेल. हा जितेंद्रिय, सर्वदा विजयी आणि सर्वमान्य होईल. ज्योतिषांचे हे वचन ऐकून कृतवीर्य राजाने त्यांचा यथायोग्य सत्कार केला. पुढें, सोळाव्या दिवशी त्या बालकाचा नामकरण विधी करून त्याचे नाव अर्जुन असे ठेवले. कृतवीर्य राजाचा पुत्र म्हणून त्यास कार्तवीर्य असेही प्रजाजन संबोधू लागले. 

अर्जुन शुक्ल पक्षांतील चंद्राप्रमाणे वाढू लागला. राजगुरु गर्गमुनींकडून विद्याभ्यासाचे शिक्षण घेऊ लागला. थोडयाच काळांत तो सर्व शस्त्र-शास्त्रपारंगत होऊन युवराज्यपदास योग्य झाला. तथापि, दैववशात कृतवीर्य राजाचा वृद्धापकाळानें मृत्यू झाला. तेव्हा, राजगुरू गर्ग मुनी, प्रधानादि मंत्री गण आणि प्रजेनेंसुद्धा अर्जुनास तू आता राज्याची धुरा सांभाळावी आणि आपल्या राजधर्माचे पालन करावेस असा सल्ला दिला. तेव्हा अर्जुनाने मात्र राज्यपद स्वीकारण्यास नकार दिला. अधिक स्पष्टीकरणार्थ तो गर्ग मुनींस वंदन करून नम्रपणें म्हणाला, "गुरुवर्य, मला हे राज्य नको. मी त्यास मनापासून त्याज्य मानतो. राजाचे अधिपत्य सर्वमान्य असलें तरी अंतिम परिणाम अत्यंत कष्टदायकच असतो. जो राजा आपल्या प्रजेचे न्यायाने पालन करीत नाही, राज्यातील जनतेचे रक्षण करीत नाही अथवा अंगी सामर्थ्य असूनही जर राजाचे आचरण अनीती व अधर्मयुक्त असेल, तर तो राजा नरकवास भोगतो. यांवर तुम्ही मला हे सर्व तू जाणतोस तर आपल्या राजधर्माचें योग्य पालन कर असे जरी सांगितले तरी राज्य करतांना मला माझ्या सेवकांवर विसंबून राहावे लागेल. त्या राजसेवकांनी केलेल्या पापाचा एक चतुर्थांश हिस्सा सहजच राजाच्या मस्तकी पडतो. तेव्हा मी एकटा, स्वबळावर सर्वदा धर्मास अनुसरुन आणि न्यायपूर्वक राज्य करण्यास समर्थ झाल्याशिवाय हा राज्यकारभार कसा स्वीकारू ? " 

अर्जुनाचे हे बोलणें ऐकून गर्ग मुनींस अतिशय संतोष झाला. तसेच, या विशाल राज्याचा राजा म्हणून अर्जुन हाच योग्य आहे, याची खात्रीही त्यांना झाली. ते म्हणाले, " अर्जुना, तू हे जे काही बोललास ते अतिशय योग्यच आहे. तुला जर तुझ्या सेवकांवर अवलंबून राज्यकारभार करायचा नसेल तर तू योगाभ्यास कर. त्यांमुळेच तुला राज्याची धुरा समर्थपणे सांभाळता येईल. योगें नाना देह धरिसी । तूं एकला राज्य करिसी । मनोवेगें तूं फिरसी । सर्व जाणशील साक्षित्वें ॥" अर्जुनास असे योग्य मार्गदर्शन करीत गर्ग मुनींनी त्याला भगवान दत्तात्रेयांना शरण जाण्यास सांगितले. " जो या ब्रह्माण्डात ' योगीन्द्र ' म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याचे केवळ नाम उच्चारलें असता हा भवसागर सहजच पार होतो, जो योगसामर्थ्याने भक्तांचे सर्वदा रक्षण करतो, ज्याचे त्रिगुणातीत आचरण देवादिकांनाही अनाकलनीय आहे, आणि जो आपल्या भक्तांना इप्सित वर देतो असा स्मर्तृगामी, अत्रि-अनसूया यांचा नंदन श्री दत्तात्रेय यांची तू आराधना कर."    

ज्याचें नित्य गंगास्नान । माहूरीं करीं शयन । सह्याद्रीवरी आसन । करी ध्यान गाणगापुरीं ॥

कुरुक्षेत्रीं आचमन । धोपेश्वरीं जाऊन । करी जो भस्मधारण । संध्यावंदन कर्‍हाडीं ॥

कोल्हापुरीं भिक्षाटन । पांचाळेश्वरीं जाऊन । नित्य करी भोजन । विचित्राचरण जयाचें ॥

पंढरपुरीं जाऊन । नित्य सुगंध लेवून । पश्चिम सागरीं येऊन । करी अर्ध्यदान सायंकाळीं ॥

जो जो करील स्मरण । त्या त्या देई दर्शन । व्यापिलें जेणें त्रिभुवन । असो नमन तच्चरणा ॥

ज्याची लीला ऐकोन । तृप्त होती कान मन । त्याला कोण कां नमन । न करील जनमान्य जो ॥

श्री दत्तप्रभूंची अशी दिनचर्या आणि महती सांगून गर्ग मुनी पुढे म्हणाले, " अर्जुना, पण एक लक्षात ठेव. दत्त महाराजांना प्रसन्न करणे अतिशय दुष्कर आहे. मात्र निर्मळ चित्त असलेल्या भक्तांना ते सहजच प्राप्त होतात. ' तो भक्तीचा भुकेला । भक्ताधीन राहिला । अंतर न देतां भक्तांला ।' अशा त्रिभुवनव्यापी परमात्म्याला मी मनःपूर्वक नमन करतो.  ' जो मायाध्यक्ष होऊन । करी जग उत्पन्न ।त्याचें करीं पालन । जो स्वयें उदासीन निगर्व ॥ ब्रह्मरूपें उत्पादक । विष्णुरूपें पालक । रुद्ररूपें संहारक । करी एक तो सर्व ॥' अशा दत्तात्रेयांची कृपा आणि वरदान तुला लाभल्यास तू एकटाच स्वबळावर आपल्या इच्छेनुसार या सप्तद्वीप पृथीवर अधिराज्य करू शकशील. ' तो देईल तुला धृती (धैर्य)। तो देईल नाना शक्ती । भावें करीं त्याची भक्ती । दे जो सन्मती मुक्तिदाता ॥ जें जें मनीं आणसी । योगप्रभावें तें मिळविसी ।' तेव्हा तू सत्वर सह्याद्री पर्वतावर जाऊन दत्तात्रेयांची आराधना कर. 

गर्गमुनींचा हा उपदेश ऐकून अर्जुनाने सदगदित होऊन त्यांना वंदन केले आणि त्यांना अतिशय कृतज्ञतापूर्वक स्वरांत म्हणाला, " गुरुवर्य, या राज्याची धुरा सांभाळण्याची योग्यता मला प्राप्त व्हावी, यासाठी आपण मला दत्तप्रभूंच्या भक्तिचा मार्ग दाखविला, हा आपण माझ्यावर मोठाच अनुग्रह केला आहे. श्री दत्तात्रेयांचे अदभूत चरित्र ऐकण्यास मी अतिशय उत्सुक झालो आहे. आता माझी एकच प्रार्थना आहे की आपण मला हे परम पावन दत्तचरित्र सांगावे. इंद्र-जंभासुराची कथा, इंद्राची आराधना मला विस्तृतपणें निवेदन करावी. देवेंद्रावर दत्तप्रभूंनी कशी कृपा केली ?" 

' मग मीही करीन । श्रीदत्ताचें सेवन । जेणें होय प्रसन्न । देईल वरदान श्रीदत्त ॥' 

क्रमश:


Aug 17, 2020

जरी त्रिकाली म्हणसी ‘ करुणात्रिपदी ’ तरी - पद क्र. ३


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

करुणात्रिपदी तिसरें पद : जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानंदन पाहि जनार्दन ।।ध्रु.।। निजअपराधें उफराटी दृष्टी । होउनि पोटीं भय धरूं पावन ।।१।। तूं करुणाकर कधीं आम्हांवर । रुसशी न किंकर-वरदकृपाघन। ।२।। वारी अपराध तूं मायबाप । तव मनीं कोपलेश न वामन ।।३।। बालकापराधा गणे जरी माता । तरी कोण त्राता देईल जीवन ।।४।। प्रार्थी वासुदेव पदिं ठेवी भाव । पदीं देवो ठाव देव अत्रिनंदन ।।५।।

मराठी विवरण :- डॉ. वा. व्यं. देशमुख

जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानंदन पाहि जनार्दन ।।ध्रु.।। तिसऱ्या पदात श्री दत्तप्रभूंच्या कोपाच्या स्वरूपाचे विवेचन आहे. सहेतुक विशेषणांनी संबोधून श्रीदत्तप्रभूंच्या कोपाच्या स्वरूपाचे प्रार्थनेला आरंभ केला आहे. ' हे अनसूयानंदना ' या हाकेने दत्तप्रभूंना त्यांच्या मातेचा आठव करून देऊन, जणू त्यांच्या मातृहृदयालाच जागवले आहे. आपण वर्षाव करणारे मेघच आहात. दयेने नुसते ओतप्रोत भरलेलेच आहात असे नाही, तर त्या दयेची, भक्तांवर सहज, अयाचित पखरण करणे हा आपला स्वभावच आहे. असे सूचित केले आहे. कारण आपल्या आश्रित जनांचे आपण जीवनच आहात. आपला विजय असो! आपण सर्व जनांचे अर्दन, शासन करणारे असला तरी आमचे रक्षण करा.


निजअपराधें उफराटी दृष्टी । होउनि पोटीं भय धरूं पावन ।।१।। ह्या चरणात स्वामीमहाराजांनी एक महत्वाचा सिद्धांत मांडला आहे. भगवंताचा कोप आणि त्यामुळे आम्हाला वाटणारे भय, हा आमच्याच मनाचा खेळ आहे. आमच्याच अपराधांमुळे दूषित झालेल्या आमच्या मनात देवाची भयावह प्रतिमा उमटली आहे. आरशाच्या वक्रतेने जसे प्रतिबिंब विकृत होते, त्याचप्रमाणे आपल्याच चित्ताच्या विकारांनी आम्हाला कृपाळू भगवंत क्रुद्ध भासतो आणि त्याचे भय वाटू लागते. हे चित्तातील प्रतिकूल संस्कार आमच्याच दुष्कर्मांपासून उद्भवतात. वस्तुतः परमेश्वर निराकार, निःसंग , आनंदपूर्ण , शुद्ध चैतन्यघनच आहे. डोळ्यांना कावीळ झाल्यावर जगच पिवळे दिसते किंवा सापाने विष भिनल्यावर कडुलिंब गोडच लागतो, त्याचप्रमाणे आमच्याच पापांनी आमची जाणीव विकृत होते. हेच आमच्या भीतीचे खरे कारण इथे प्रतिपादले आहे.

तूं करुणाकर कधीं आम्हांवर । रुसशी न किंकर-वरदकृपाघन। ।२।। पहिल्या पदातच सांगितल्याप्रमाणे या अखिलविश्वाचा आणि त्यातील सकल जिवांचा मायबाप परमेश्वरच आहे. तो स्वभावतःच वात्सल्य सिंधू आहे. तो आमच्यावर का आणि कसा रुष्ट होईल? आम्हा दासांचा तोच करुणासागर वरदाता आहे.

वारी अपराध तूं मायबाप । तव मनीं कोपलेश न वामन ।।३।। ' त्वमेव माता च त्वमेव पिता... ' ही प्रार्थना दृढ करून श्रीमहाराज आमच्या अपराधांचा परिहार करण्याचे मागणे मागत आहेत. हे त्रिविक्रम वामना, तुमच्या मनात कोपाचा लवलेश असूच शकत नाही.' वामन ' ह्या संबोधनाची योजना मार्मिक आहे. इंद्राला स्वर्गाचे राज्य परत मिळवून देण्यासाठी वामनावतार झाला. त्यानुसार बलीराजाच्या औदार्याचाच आधार घेऊन त्याला पाताळात घातले. सकृतदर्शनी हा बलीराजावर क्रोध वाटतो, पण त्याला पाताळाचे राज्य तर दिलेच, शिवाय भगवंत स्वतःच त्याचे द्वारपाल होऊन रक्षण करत आहेत आणि भविष्यात त्याला इंद्रपदही देणार आहेत. अशा रीतीने क्वचित देवाचा कोप झाल्यासारखा वाटलं तरी अंतिम तो कल्याणकारीच ठरतो, अशी गर्भीत सूचना यातून दिली आहे.

बालकापराधा गणे जरी माता । तरी कोण त्राता देईल जीवन ।।४।। आईच्या प्रेमाबद्दल समर्पक दृष्टांत भगवंताच्या कृपेसाठी दुसरा नाही. आईचे मन आपल्या बाळाच्या प्रेमानेच सदैव तुडुंबलेले असते. त्याच्याविषयी इतर कोणत्याही भावाला तिथे वावच नसतो. तिच्या सर्व कृतींचा उगम बाळाचे रक्षण आणि पोषण यासाठीच असतो. ती बाळावर रागावेल, ओरडेल , अगदी त्याला मारीलही; पण त्यात बाळाची सुरक्षा आणि संवर्धन हाच उद्देश असतो. ह्या तिच्या आंतरिक प्रेमात बाळाकडून कसली अपेक्षा तर नसतेच: पण त्याच्या अपराधांचा त्या प्रेमावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. त्या बाळाला त्याच्या अपराधाच्या शासनाचा किंवा कोणत्याही प्रकारे त्याला दुखवण्याचा विचारही तिच्या मनात येऊ शकत नाही. बाळ आईच्या मांडीवर, रडत, भेकत , लाथाही मारीत असते, पण ती मात्र त्याला शांत करून आपले स्तन त्याच्या मुखात घालण्याचाच प्रयत्न करीत असते. परमेश्वराचेही आम्हा बाळगोपाळांवर असेच निर्हेतुक प्रेम असते. 'दत्तमाऊलीने जर आमच्या अपराधांचा खेद मानला, तर आम्हाला दयास्तन्याने बुझविणारा दुसरा कोण आहे?' एकीकडे ह्या सत्याकडे देवाचे लक्ष वेधत असताना दुसरीकडे श्रीस्वामीमहाराज आम्हाला देवाच्या कारुण्याला कसे आवाहन करावे याची शिकवण देत आहेत.

प्रार्थी वासुदेव पदिं ठेवी भाव । पदीं देवो ठाव देव अत्रिनंदन ।।५।। आतापर्यंत या तीन पदांतून श्रीस्वामीमहाराजांनी भक्तिमार्गाचे उध्वोधन केले आहे. पहिल्या पदात अनन्य होऊन श्रीदत्तप्रभूंची भक्ती करावी, सर्व प्रापंचिक भार त्यांच्यावर घालावा, म्हणजे ते सर्वोतोपरी सांभाळ करून आपल्याला मोक्षमार्गावर प्रगत करतात, असा उपदेश केला. दुसऱ्या पदात त्यांच्या लीलांचे स्मरण, कीर्तन, श्रवण यांच्या द्वारा चित्तशुद्धी करून आपली श्रद्धा दृढतर करायला सांगितली. तिसऱ्या पदात श्रीदत्तप्रभूंच्या सच्चिदानंदस्वरूपातील परमप्रेमस्वरूपाचे प्रतिपादन केले आहे. आता या समारोपाच्या चरणात भक्तिमार्गाची जणू फलश्रुतीच सांगितली आहे. संत ज्ञानेश्वरमहाराजांनी भक्तीचे उद्दिष्ट भगवंताच्या 'अव्यंग धामाची प्राप्ती' असे सांगितले आहे. ('तरि झडझडोनि वहिला निघ I इथे भक्तिचिये वाटे लाग I जिया पावसी अव्यंग I निजधाम माझें II' ९.५१६) नाममुद्रेने अंकित केलेल्या या चरणात श्रीदत्तचरणीं भक्तिभाव व्यक्त केला आहे. आतापर्यंत मांडलेल्या भक्तिमार्गाचा तो निर्देश आहे. तो निर्देश करून आपल्याला दत्तपदी ठाव मागितला आहे. यातील पहिले 'पद' साधनरूप श्रीदत्तचरण आहेत तर दुसरे पद हे भगवद्गीतेत प्रतिपादले अव्यय पद (गच्छन्त्यमूढा: पदअव्ययं तत् II १५.५) आहे. सर्व वेद ज्या पदाचा उद्घोष करतात (सर्वे वेदा यतपदमामनन्ति II कठ उ. १ .२.१५ ) ते सच्चिदानंदपद श्रीस्वामीमहाराजांना इथे अभिप्रेत आहे. त्यांनी आपल्या वेदनिवेदनिस्तोत्रात याचा उहापोह केलेला आहे, तो जिज्ञासूंनी मुळातच पाहावा. अत्रिनंदन परमात्म्याकडे त्याच्या पदाच्या प्राप्तीची याचना केली आहे. यात परमात्मा आणि त्याचे पद या दोन वस्तू नाहीत. याला राहू आणि त्याचे शीर यांचा दृष्टांत दिला आहे. राहुला केवळ शिरच असते. तो जसा त्या शिरापासून अभिन्न असतो तसेच परमात्मा आणि त्याचे पद अभिन्न आहेत. ते पद प्राप्त होणे म्हणजेच आत्मस्वरूपाशी एकत्व पावणे. हेच मागणे मागून श्रीस्वामीमहाराजांनी या 'करुणात्रिपदी' चा उपसंहार केला आहे. यथाशक्ती, यथामती केलेली ही वाक्-सेवा श्रीगुरुचरणी समर्पित असो.

मूळ स्तोत्र : प. प श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित करुणात्रिपदी संदर्भ - श्री वासुदेव निवास, पुणे



श्री प. प. श्री वासुदेवानंदसरस्वतीविरचित मंत्रात्मक श्लोक


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

गुरुअनुग्रह : अनसूयात्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबर: । स्मृर्तगामी स्वभक्तानामुद्धर्ता भव संकटात् ॥१ दारिद्र्यनिवारण : दरिद्रविप्रगेहे यः शाकं भुक्त्वोत्तमश्रियम् । ददौ श्रीदत्तदेवः स दारिद्रयाच्छ्रीप्रदोSवतु ॥२ संतानप्राप्ती : दूरिकृत्यपिशाचार्तिम् जीवयित्वा मृत सुतम्  । योSभूदभीष्टदः पातु स नः संतानवृध्दिकृत् ॥३

सौभाग्य : जीवयामास भर्तारं मृतं सत्या हि मृत्युहा । मृत्युञ्जय: स योगींद्रः सौभाग्यम् मे प्रयच्छतु ॥४ ऋणविमुक्ती : अत्रेरात्मप्रदानेन यो मुक्तो भगवानृणात्  । दत्तात्रेयं तमीशानं नमामि ऋणमुक्तये ॥५   

सर्वपापनिवारण :  जपेच्छ्लोकमिमं देवपित्रर्षिपुंनृणापहं । सोSनृणो दत्तकृपया परंब्रह्माधिगच्छति ॥६ अत्रिपुत्रो महातेजा दत्तात्रेयो महामुनि: । तस्य स्मरणमात्रेण सर्वपापै: प्रमुच्चते ॥७

सर्व बाधा मुक्ती : नमस्ते भगवन्देव दत्तात्रेय जगत्प्रभो । सर्वबाधाप्रशमनं कुरु शांतिं प्रयच्छ मे ॥८ 
असाध्यव्याधी मुक्ती : नमस्ते भगवन्देव दत्तात्रेय जगत्प्रभो । सर्वरोगा प्रशमनं कुरु शांतिं प्रयच्छ मे ॥९ श्री दत्त अनुग्रह : अनुसूयासुत श्रीश जनपातकनाशन  । दिगंबरं नमो नित्यं तुभ्यं मे वरदो भव ॥१० श्री विष्णोरवतारोSयं दत्तात्रेयो दिगंबर : । मालाकमण्डलूच्छूलडमरूशंखचक्रधृक् ॥११ विद्याप्राप्ती : नमस्ते शारदे देवि सरस्वति मतिप्रदे । वस त्वं मम जिव्हाग्रे सर्वविद्याप्रदा भव ॥१२ दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबंधुं मुकुंदम् । नैर्गुण्यं संनिविष्टं पथि परमपदं बोधयंतं मुनीनाम ।। भस्माभ्यंगं जटाभि: सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरुपं । सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्-गुरुं चारूशीलम् ॥१३

इति श्री प. प. श्री वासुदेवानंदसरस्वतीविरचिता: मंत्रश्लोका:


Aug 13, 2020

जरी त्रिकाली म्हणसी ‘ करुणात्रिपदी ’ तरी - पद क्र. २


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

करुणात्रिपदी दुसरें पद : श्रीगुरुदत्ता जय भगवंता । तें मन निष्ठुर न करी आता ।। ध्रु. ।। चोरें द्विजासी मारीतां मन जें । कळवळलें तें कळवळो आतां ।। श्रीगुरुदत्ता ।।१।। पोटशूळानें द्विज तडफडतां । कळवळलें तें कळवळो आतां ।। श्रीगुरुदत्ता ।।२।। द्विजसुत मरता वळलें तें मन । हो कीं उदासीन न वळे आतां ।। श्रीगुरुदत्ता।।३।। सतिपति मरता काकुळती येतां । वळलें तें मन न वळे कीं आतां ।। श्रीगुरुदत्ता।।४।। श्रीगुरुदत्ता त्यजि निष्ठुरता । कोमल चित्ता वळवी आतां ।। श्रीगुरुदत्ता।।५।।

मराठी विवरण :- डॉ. वा. व्यं. देशमुख

श्रीगुरुदत्ता जय भगवंता I ते मन निष्ठुर न करी आता ।। ध्रु. ।। प्रथम पदात श्रीस्वामीमहाराजांनी भक्ताचा पक्ष मांडला आहे. अपराधांचा कबुलीजबाब देऊन दत्तप्रभूंच्या दयेची याचना केली आहे. त्या तीनही पदांचा रोख केवळ देवाकडे किंवा भक्तांकडे नाही. भक्तांच्या वतीने देवाची आळवणी करतांनाच, भक्ताला आत्मपरीक्षणाला, आपल्या चुका सुधारण्याला आणि परमेश्वराच्या इच्छेला शरण जाण्याला प्रवृत्त केले आहे. दुसऱ्या पदात असे दिसते की भक्ताविषयीच्या देवाच्या साहजिक (inherent) अनुकंपेला आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी केलेल्या भक्त रक्षणाचे दाखले दिले आहेत. याचाच दुसरा परिणाम भक्ताची श्रद्धा आणि भाव दृढ करण्यात होतो. पूर्वीच्या भक्तांना आलेले अनुभव स्मरून आपली भक्ती पुष्ट करावी, आपले देवाशी नाते अधिक घट्ट करावे असाच उपदेश श्रीमहाराज करीत आहेत. त्यासाठी भगवान दत्तात्रेयांनी दासाच्या शासनासाठी धारण केलेली कठोरता टाकावी, अशी प्रार्थना केली आहे. त्यासाठी गुरुचरित्रातल्या काही काही प्रातिनिधिक घटनांचा आधार घेतला आहे.

चोरें द्विजासी मरितां मन जे I कळवळलें ते कळवळो आतां ।। १ ।। श्रीपादवल्लभांनी पुढचा (नरसिंहसरस्वती) अवतार घेण्यासाठी आपला वर्तमान लीलादेह अदृश्य केला, तरी ते सूक्ष्मरूपाने कुरुगुड्डीला राहिले आहेत असे सिद्धमुनींनी नामधारकाला सांगितले. तेव्हा त्याचा एखादा दाखला सांगावा अशा नामधारकाच्या प्रार्थनेनंतर ही कथा सिद्धमुनी सांगत आहेत. वल्लभेश नावाचा श्रीवल्लभांचा निस्सीम ब्राह्मणभक्त वाणिज्यवृत्तीने जीविका चालवी. एकदा व्यापारासाठी तो फिरतीवर निघताना त्याने नवस केला की मला व्यापारात जेवढा लाभ होईल त्या प्रमाणात मी कुरुगड्डीला येऊन ब्राह्मणभोजन करीन. त्याला श्रीगुरुकृपेने अकल्पित प्रमाणात खूप पैसा मिळाला. तेव्हा एक हजार ब्राह्मणांना भोजन देण्याचा संकल्प करून तो नवस फेडण्यासाठी पुरेसे धन घेऊन निघाला. वाटेत त्याला ठगांनी गाठले व आपणही श्रीपादगुरूंचे भक्त असल्याचे नाटक करून त्याचा बरोबर निघाले. मार्गावर, निर्जन ठिकाणी त्यांनी त्याचे धन हडपण्यासाठी त्याला ठार केले. त्यावेळी भक्तवत्सल गुरुनाथ एका शूलधारी तापसाच्या वेषाने तिथे प्रकटले. त्यांनी त्या ठगांचा वध केला. त्यात एकजण त्यांना सामील नसल्याने त्याला निर्दोष जाणून श्रीपादप्रभूंनी जिवंत ठेवले आणि त्याला भस्म देऊन वल्लभेशाचे मुंडके जोडून त्या धडाच्या ठिकाणी ते लावायला सांगितले. त्याने तसे करताच वल्लभेश जिवंत झाला व त्याचवेळी श्रीपादप्रभू अंतर्धान पावले. नंतर त्याने कुरुगड्डीला जाऊन आपला सहस्त्रभोजनाचा संकल्प पूर्ण केला. 'त्या वल्लभेशाच्या संकटकाळी जसे आपले चित्त द्रवले, हे भगवंता त्याचप्रमाणे आता आमच्यासाठी पाझरो.'

पोटशूळानें द्विज तडफडता I कळवळलें ते कळवळो आतां ।। २ ।। श्रीगुरु नृसिंहसरस्वती गोदावरीतीरावर संचार करीत असता बासर ( वासर ब्रह्मेश्वर ) येथे त्यांना गळ्यात धोंडा बांधून आत्महत्येला उद्युक्त झालेला कोणी ब्राह्मण दिसला. आपल्या शिष्यांना सांगून दयासागर प्रभूंनी त्या पोटशूळाने तडफडणाऱ्या दीनवाण्या रुग्णाला "का असे दुःसाहस करीत आहेस?" असे विचारले. तो उत्तरला, "मला हे विचारून काय उपयोग? माझा दु:खनाश तुम्ही कराल काय? अन्नाचा वैरी असलेला हा पोटशूळ नावाचा विकार आता अगदी सोसवत नाही. मी कसा जगूं ?" श्रीगुरु त्याला म्हणाले, भिऊ नकोस! मी वैद्य आहे. अन्न पचावे असे दिव्या औषध मी तुला देतो." असे श्रीगुरु बोलतात तोच त्यांच्याकडे सायंदेव नावाचा, ब्राह्मण शासकीय अधिकारी आला. त्याला श्रीगुरूंनी त्या शूलग्रस्ताला पथ्य म्हणून पंचपक्वान्नाचे जेवण द्यायला सांगितले. सायंदेव म्हणाले, "ह्याने महिन्या-पंधरवड्याला कधीतरी अन्न खाल्ले तरी भयंकर वेदना होतात. मी अन्न दिले तर न जाणो , त्याचे काही बरेवाईट झाले तर मला ब्रह्महत्येचे पाप लागेल, अशी भीती वाटते." श्रीगुरूंच्या आश्वासनानंतर सायंदेवाने ते मान्य करून श्रीगुरूंनीही शिष्यांसह आपल्या घरी भिक्षा घ्यावी अशी विनंती केली. श्रीगुरूंनी ती मान्य करून त्याच्या घरी भिक्षा घेतली. त्यांच्या पंक्तीला पोटभर भोजन करून तो गृहस्थ त्या दीर्घकालीन रोगापासून तर मुक्त झालाच पण भवव्याधीपासूनही मुक्त झाला. ' त्या व्याधिग्रस्त ब्राह्मणाच्या वेदना पाहून जसे आपले चित्त कळवळले तसेच आम्हा त्रिविध तापग्रस्तांसाठीही कळवळू द्या. ' अशी प्रार्थना केली आहे.

द्विजसुत मरता वळलें ते मन I हो किं उदासीन न वळे आता ।। ३ ।। हा तिसरा दृष्टांत शिरोळच्या स्त्रीचा आहे. तिची मुले गर्भातच किंवा जन्मानंतर लगेच मरण पावत. तिने तिथल्या एका जाणत्या ब्राह्मणाला आपली मुले वाचविण्याचा उपाय विचारला. त्या ब्राह्मणाने सांगितले, "तू पूर्वजन्मी एका शौनकगोत्रीय ब्राह्मणाचे पैसे लुबाडले. तोच आता पिशाच होऊन तुझी बाळे मारीत आहे. " त्या संत्रस्त सतीने त्यावर उपाय विचारला असता तो ब्राह्मण म्हणाला, " त्या पिशाच झालेल्या ब्राह्मणाचे शास्त्रोक्त पिंडदानादि अंत्यक, नारायणनागबळी इत्यादि तुझ्या पतीकडून करवून घे. तसेच प्रतिदिन एक महिनाभर कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमात न्हाऊन आणि अष्टतीर्थ स्नाने करून श्रीगुरूंच्या पादुकांची तसेच औदुंबरवृक्षाची विधिपूर्वक पूजा कर. मग सांगता करून, त्या प्रेताच्या शांतीसाठी शौनकगोत्राच्या एखाद्या ब्राह्मणाला शंभर रौप्य मुद्रांचे दान कर म्हणजे तुझ्या पापाची निष्कृती होईल." ' शंभर रौप्यमुद्रा मी कुठून आणू ? मात्र एक महिनाभर मनोभावे मी सद्गुरूंची पूजा करीन. तो हरीच माझे या पिशाचाच्या बाधेपासून रक्षण करो,' असा मनोमन निश्चय करून त्या ब्राह्मणीने आपल्या पतीसह औदुंबराखाली पादुकांची आराधना सुरु केली. तीन दिवसांनी एक ब्रह्मसमंध तिच्या स्वप्नात येऊन भीती दाखवून तिचे पूर्वजन्मी लुबाडलेले धन मागू लागला. त्या भयभीत सतीला औदुंबराच्या मुळापाशी श्रीगुरुंचे दर्शन झाले. त्यांनी त्या पिशाचाला दरडावून त्या ब्राह्मणीला तिच्या संततीचा नाश करून त्रास देण्याचे कारण विचारले. तो समंध उत्तरला," अहो यतिराज, आपल्यासारख्या संन्याशाला हा पक्षपात शोभत नाही. ह्या स्त्रीने लुबाडलेल्या माझ्या धनाच्या लोभाने मी या अमंगळ योनीत आलो." श्रीगुरूंनी त्याला विचारले, " या दरिद्री स्त्रीचा छळ करून तुझी या योनीतून सुटका होईल का? माझे ऐक, ती तिच्या ऐपतीप्रमाणे तुझे अंत्यसंस्कार करील आणि यथाशक्ती तुझ्या गोत्राच्या ब्राह्मणाला द्रव्य देईल. मी तुला या गलिच्छ योनीतून मुक्ती देईन." श्रीगुरुंचे म्हणणे मान्य करून त्या दंपतीने क्रियाकर्म केल्यावर पिशाच्चाला गती मिळाली आणि त्या स्त्रीला लवकरच जुळे मुलगे झाले. पुढे योग्यवेळी ज्येष्ठ मुलाच्या मुंजीची तयारी करत असतानाच अचानक धनुर्वाताने तो मुलगा मरण पावला. त्याची माता डोके व छाती पिटीत जोरजोराने रडू लागली. पुत्रशोकाने वेडी होऊन ती माता त्याला उद्देशून बोलू लागली. त्याचे गुण आठवून आक्रोश करू लागली. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना त्या प्रेताला हातही लावू देईना, ' माझेही त्याच्याबरोबर दहन करा. ' असे म्हणू लागली.गावातील मंडळीसमोर एक मोठेच संकट उभे राहिले. त्या बाळाचे संस्कार झाल्याशिवाय गावात चूल पेटू शकत नव्हती. ती दुःखाने बेभान झालेली सती कोणाचेही ऐकेना. त्यावेळी एक फिरस्ता तापसी अचानक तेथे आला. त्याने त्या स्त्रीला अध्यात्माचा उपदेश केला. पण तिचा एकच हेका,' मला श्रीगुरूंनी स्थिर म्हणून दिलेले कसे नष्ट झाले ? आता त्यांच्यावर कोण भरवसा करील ?' त्या साधूने तिला जिथे वर मिळाला तिथेच जाऊन विचारायला सांगितले. साधूचे बोलणे ऐकून ती सती आपल्या पुत्राचे शव घेऊन सद्गुरुंच्या मंदिरात गेली. त्या शोक आणि संतापाने त्रस्त स्त्रीने तिचे पादुकांवर डोके आपटून घेतले आणि पादुका रक्ताने भिजवल्या. अशा प्रकारे तिने रात्रीपर्यंत शोक केला आणि अंत्यसंस्कारासाठी ते प्रेत दिले नाही त्यामुळे वाट पाहून सगळे घरी गेले. ते दोघे पतिपत्नी मात्र तिथेच राहिले. थोड्या वेळाने रात्री तिला झोप लागली. स्वप्नात तिला श्रीगुरुंचे दर्शन दर्शन झाले. ते तिला म्हणाले," बाई का माझ्यावर रागावलीस? मी काय तुझे अहित केले आहे? तुझ्या मुलाचा गेलेला प्राण मी पूर्वव्रत जागच्या जागी आणून ठेवला आहे. आता तो मृत नाही. तेव्हा तू आता शोक सोड." हे स्वप्न पाहून ती साध्वी जागी होऊन पाहते तर तिचा मुलगा उठून बसला होता. ते पाहून तिच्या मनातल्या शोकाची जागा आनंदाने घेतली. ओठांवर हसू आणि डोळ्यांत पाणी अशी काहीशी तिची अवस्था झाली. तिने प्रेमाने आपल्या पतीला हाक मारली. त्यानेही उठून आपल्या भुकेने आणि तहानेने व्याकुळ होऊन रडणाऱ्या मुलाला होऊन जवळ घेतले आणि परमेश्वराची स्तुती केली. तेवढ्यात सर्व गावकरी तेथे आले. सर्वानी पादुकारूपी भगवंताची महापूजा करून समाराधना केली. ' हे प्रभो, त्या ब्राह्मणीच्या पुत्रशोकाने पाझरलेले आपले मन आत्ताच कसे उदासीन झाले? ' असा प्रश्न श्रीमहाराज विचारीत आहेत.

सतिपति मरता काकुळती येता I वळलें ते मन न वळे कीं आतां ।। ४ ।। ही माहूरच्या गोपीनाथाला नवसाने झालेल्या दत्त नावाच्या मुलाची पत्नी, सावित्री हिची गोष्ट आहे. अगदी लहान वयातच असाध्य क्षयाची बाधा झालेल्या पतीला सर्व उपाय निष्फल झाल्यावर ही षोडशा, सासूसासऱ्यांची आज्ञा घेऊन श्रीगुरुंची कीर्ती ऐकून गाणगापूरला आली. वेशीत पाऊल ठेवताच पतीने प्राण सोडले. शोकविव्हल सावित्रीने बरोबर आणलेल्या खंजीराने आत्महत्येचा प्रयत्न केला. पण जवळच्या लोकांच्या सावधानतेने तो फसला. ती धाय मोकलून रडू लागली. बेभान होऊन पतीला उठवू लागली. अंगावरची वस्त्रे फाडू लागली. अशावेळी एक जटाधरी तापसी तिथे येऊन तिचे सांत्वन करू लागला. तिला त्याने अध्यात्माचा उपदेश केला. वयाने लहान असली तरी सावित्रीने आपल्या पातिव्रत्याने चित्त शुद्ध केले होते. त्या अधिकारी गुरूने केलेला उपदेश तिच्या मनात ठसला. जगाची आणि जीवनाची नश्वरता पटली. त्या साधूकडून तिने स्त्रियांचे धर्म जाणून घेतले. त्याने सहगमन आणि विधवाधर्म हे दोन पर्याय तिच्या पुढे ठेवले. तिने सहगमनाचा पर्याय स्वीकारला. साधूने दिलेले चार रुद्राक्ष पतीच्या गळ्यात घालून, सुवासिनींना वाणे देऊन ती सहगमनाला निघाली. तेव्हा इतक्या आल्यासारखे श्रीगुरुंचे दर्शन तरी घ्यावे, ह्या विचाराने ती संगमावर श्रीगुरुंकडे आली. सर्व सौभाग्यचिन्हे धारण केलेल्या त्या तरुण मुलीला पाहताच श्रीगुरूंनी ' सौभाग्यवती भव! ' असा आशीर्वाद दिला. तिच्यासह सर्व लोक चमकून पाहीपर्यंत श्रीगुरूंनी ' अष्टपुत्रा हो! ' असाही वर दिला. उपस्थित लोकांनी त्यांना सांगितले, " महाराज हिचा पती मृत झाला असून ही सहगमनाला सिद्ध झाली आहे." त्यावर श्रीगुरु म्हणाले. " आमचे वचन वाया जाणार नाही. तिच्या पतीचा देह इथे आणा. पाहू केव्हा प्राण गेला आहे? " लोकांनी आणलेल्या शवाच्या मुखात आपल्या पादुकांवरील रुद्राभिषेकाचे तीर्थ घालण्याची आज्ञा श्रीगुरूंनी केली. तसे करताच तो झोपेतून सावध झाल्यासारखा उठून बसला. सर्व भक्तांनी श्रीगुरुंचा जयजयकार केला. त्या दांपत्याने त्यांची प्रार्थनापूर्वक पूजा केली. श्रीगुरूंनी त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा आशीर्वाद दिला. ' त्या बालिकेच्या आर्त शोकाने कळवळलेले मन आमच्यासाठी द्रवणार नाही का ? ' असा करुण प्रश्न श्रीस्वामीमहाराज विचारीत आहेत.

श्रीगुरुदत्ता त्यजि निष्ठुरता I कोमल चित्ता वळवी आतां ।। ५ ।। या पदात श्रीदत्तप्रभूंची आर्त आळवणी आणि दत्तभक्ताच्या श्रद्धेचा परिपोष आहेतच, पण आणखी एक महत्वाचा पैलू आहे. तो म्हणजे श्रीदत्तगुरुंच्या लीला आणि गुणांचे वर्णन आहे. भक्तिमार्गात भगवल्लीलांच्या स्मरण , कीर्तन आणि श्रवण यांना अनन्यसाधारण महत्व आहे. ' स्वलीलया त्वं हि जनान पुनासि, तन्मे स्वलीलाश्रवण प्रयच्छ ' असे स्वामीमहाराज ' दत्तभावसुधारसात ' म्हणतात. त्यासाठीच कदाचित त्यांनी ह्या पदाची मध्यवर्ती योजना केली असावी. एकाच वेळी श्रीदत्तगुरुंच्या अनुकंपेची आवाहन, दत्तभक्तांच्या श्रद्धेची पुष्टी आणि चित्तशुद्धी असा तिहेरी लाभ यातून मिळतो. या सर्व उदाहरणांतून भगवान दत्तात्रेयांचे अंतःकरण मूलतः लोण्याहून मऊ आहे, काठिण्य हा केवळ बाह्य देखावा आहे मात्र आहे, हेच स्पष्ट केले आहे. ' ती वरपांगी कठोरता टाकून आम्हा शरणागतांवर आपल्या करुणेचा वर्षाव करावा. ' अशी प्रार्थना करून पदाचा समारोप केला आहे.

मूळ स्तोत्र : प. प श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित करुणात्रिपदी संदर्भ - श्री वासुदेव निवास, पुणे क्रमश:



Aug 11, 2020

जरी त्रिकाली म्हणसी ‘ करुणात्रिपदी ’ तरी - पद क्र. १


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

करुणात्रिपदी पहिले पद : शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आतां ।। ध्रु. ।। तूं केवळ माता जनिता । सर्वथा तूं हितकर्ता ।। तूं आप्त स्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता ।। (चाल) भयकर्ता तूं भयहर्ता । दंडधर्ता तूं परिपाता । तुजवाचुनि न दुजी वार्ता । तूं आर्ता आश्रय दत्ता ।। शांत हो श्रीगुरुदत्ता... ।।१।। अपराधास्तव गुरुनाथा । जरि दंडा धरिसी यथार्था ।। तरि आम्ही गाऊनि गाथा । तव चरणीं नमवूं माथा ।। (चाल) तूं तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करूं धावा ? सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ? शांत हो श्रीगुरुदत्ता... ।।२।। तूं नटसा होउनि कोपी । दंडितांहि आम्ही पापी । पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरि नच संतापी ।। (चाल) गच्छतः स्खलनं क्वापि । असें मानुनि नच हो कोपी । निजकृपालेशा ओपी । आम्हांवरि तूं भगवंता ।। शांत हो श्रीगुरुदत्ता... ।।३।। तव पदरीं असता ताता । आडमार्गीं पाऊल पडतां । सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दूजा त्राता । (चाल) निजबिरुदा आणुनि चित्ता । तूं पतीतपावन दत्ता। वळे आतां आम्हांवरता । करुणाघन तूं गुरुनाथा ।। शांत हो श्रीगुरुदत्ता... ।।४।। सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हें घरदार । तव पदी अर्पुं असार । संसाराहित हा भार । (चाल) परिहरिसी करुणासिंधो । तूं दीनानाथ सुबंधो। आम्हां अघलेश न बाधो । वासुदेव प्रार्थित दत्ता ।। शांत हो श्रीगुरुदत्ता... ।।५।।

मराठी विवरण :- डॉ. वा. व्यं. देशमुख

शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आतां ।। ध्रु. ।। ' शांत हो श्रीगुरुदत्ता ' या पहिल्या पदात ध्रुपदात आपले मुख्य मागणे मांडले आहे. 'हे दत्त प्रभो ! शांत व्हा आणि माझ्या क्षुब्ध मनाला शांत करा !'. जीवनातील सर्व सुखदुःखांचे स्थान मन आहे. ' चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्न, चित्ते विषण्णे | ' या उक्तीप्रमाणे मनाची प्रसन्नता हीच सुखाची गुरुकिल्ली आहे. मन शांत असेल तरच प्रसन्न असते. तेव्हा माझे मन शांत करा म्हणजेच मला सुखी करा, असा अभिप्राय होतो. मनःशांतीच सर्व सुखांचा आधार आहे. पण इथे आपल्या मनाची शांती मागण्याआधी भक्त , देवा, तुम्ही शांत व्हा !' अशी प्रार्थना करीत आहे. यांत आपल्या चित्ताची शांती, पर्यायाने आपल्या सुखाचा आधार, देवाची शांती आहे, असा कार्यकारणभाव अध्याहृत आहे व देव कसा अशांत वा क्षुब्ध होईल ? निर्विकार, निरपेक्ष आनंदरूप परमेश्वरावर अशांतीचा आरोप कसा होऊ शकतो ? पण भक्तासाठी देव जेव्हा सांगून साकार होतो, तेव्हा देवभक्तांच्या नात्याच्या निर्वाहासाठी त्याला रागद्वेषादी विकार धारण करावे लागतात. त्याशिवाय सगुणात येण्याचे मुख्य प्रयोजन अर्थात दुष्टांना शासन आणि सज्जनांचे रक्षण हे कसे सिद्ध होतील? आपण या पदाच्या पार्श्वभूमीत पाहिले आहे की अर्चकगणाच्या ( दोषामुळे ) देव रागावले आहेत. अर्थात हा कृत्रिमकोप आहे, हे पुढे स्पष्ट होईलच. अशा रीतीने दासाला दत्तप्रभूंचा कोप अनुभवाला येत आहे. तेव्हा हा राग आवरून, त्यापासूनच उद्भवलेला माझ्या मनाचा क्षोभ ही शमवावा, अशी प्रार्थना केली आहे. हेच या पदाचे मुख्य प्रयोजन आहे.

तूं केवळ माता जनिता । सर्वथा तूं हितकर्ता ।। तूं आप्त स्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता ।। (चाल) भयकर्ता तूं भयहर्ता । दंडधर्ता तूं परिपाता । तुजवाचुनि न दुजी वार्ता । तूं आर्ता आश्रय दत्ता ।। शांत हो श्रीगुरुदत्ता... ।।१।। पुढे, देवाचा आणि भक्ताचा संबंध स्पष्ट केला आहे. जणू ,' कोणत्या नात्याने वा अधिकाराने तू माझ्याकडे आला आहेस?' असा दत्तप्रभूंचा प्रश्न अपेक्षून त्याचे उत्तर दिले आहे,' हे प्रभो ! आपणच आमचे मायबाप आहात. भगवदगीतेत आपणच सांगितले आहे, "पिताSहमस्य जगतो माताधाता पितामह: I "(९. १७) तेव्हा आईबापच नव्हे, तर सर्वच - बंधू, सखा , हितकर्ता, आप्त, स्वजन अशा सर्वही प्रकारे आपणच आमचे रक्षणकर्ते आहात.' इथे या सर्व प्रापचिक नात्यांचा अप्रत्यक्षतया निरासच केला आहे. सामान्यतः आपल्याला यांचा आधार वाटतो; पण तो लटकाच आहे. खरा आधार भगवंताचाच आहे की ही खूणगाठ मनाशी बांधायची आहे. आमच्या चित्तवृत्तींचे नियंत्रक श्रीगुरुदत्तच आहेत. तेच भयादि विकारांचा प्रादुर्भाव करतात आणि त्यांचा उपशमही करतात. आमच्या अपराधांच्या शासनासाठी दत्तप्रभूच दंड धारण करतात आणि आम्ही आर्त झालो दुःखाने कळवळलो की तोच दत्त आमचा आश्रय आहे. असे सर्वबाजूंनी आम्ही त्या दत्ताशी संलग्न आहोत. त्याच्यावाचून दुसऱ्या कशाचीही वार्तासुद्धा नाही. या कडव्याचा मुख्य प्रतिपाद्य विषय अनन्य शरणागती हा आहे. इतर सर्व आश्रयांना निक्षून बाजूला सारले तरच परमेश्वर जवळ करतो. असे म्हणतात की वस्त्रहरणाच्या प्रसंगी द्रौपदीने निरीवर घट्ट धरलेला हातसुद्धा जेव्हा सोडला, तेव्हाच श्रीहरी वस्त्ररूपाने प्रकटले आणि त्यांनी तिच्यालज्जेचे संरक्षण केले. अश्याप्रकारे स्वतःच्या प्रयत्नांसह सर्वही आधार सोडल्यावरच अनन्यता सिद्ध होते. हे भक्तिमार्गातले रहस्य या पहिल्या कडव्याची शिकवण आहे.

अपराधास्तव गुरुनाथा । जरि दंडा धरिसी यथार्था ।। तरि आम्ही गाऊनि गाथा । तव चरणीं नमवूं माथा ।। (चाल) तूं तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करूं धावा ? सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ? शांत हो श्रीगुरुदत्ता... ।।२।। 'हे दत्तप्रभो, आपणच आम्हा सर्व जीवांचे नियामक आहात. जेव्हा आम्ही नियम्य आमच्या विकारांना बळी पडतो आणि आडवाटेला लागतो. तेव्हा आम्हाला अटकाव करण्यासाठी, प्रसंगी शासन करण्यासाठी आपण दंड हाती घेतला आहे. तो योग्यच आहे. त्या दंडाला सामोरे जातानाही आम्ही आपली प्रार्थना करीत आपल्या चरणी विनम्र होऊ. दुसरा कोणता पर्याय आमच्याकडे आहे ? या उप्परही, देवराया, तू आम्हाला ताडन करशील तर आम्ही दुसऱ्या कुणाला बोलावणार? तुझ्याविना आमचा इतर कोणी वाली आहे?' अशा रीतीने या कडव्याची अनन्यताच दृढ केली आहे. ' दत्तभावसुधारसस्तोत्रांत ' हीच अगतिकता मार्मिकतेने व्यक्त केली आहे. लौकिक बालकाला माता आणि पिता असे दोन पालक असतात. एक रागवला तर बालक दुसऱ्याचा आसरा घेते. पण हे दत्तदयाघना, आमच्यासाठी या दोहोंच्या ठायी तूच एक आहेस. तरी तू निर्दय होऊ नकोस !' प्रत्येक भक्ताच्या जीवनात प्रारब्धानुसार अनुकूल आणि प्रतिकूल प्रसंग येतातच. आपल्याच कर्मांची ती फळे असतात. सुखद घटनांचे अभिमानाने श्रेय स्वतःकडे घेणारा जीव, दुःखसमोर आले की मात्र ' देवाने असे का केले ?' असा त्यालाच जाब विचारायला लागतो. अशा प्रसंगी देव आपल्याला ' कृपाळूपणे ' करण्याचे धैर्य आणि त्यातून योग्य तो धडा शिकण्याचा विवेक, आपण देवाकडे मागावा. हाच उपदेश श्री स्वामीमहाराज करीत आहेत.

तूं नटसा होउनि कोपी । दंडितांहि आम्ही पापी । पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरि नच संतापी ।। (चाल) गच्छतः स्खलनं क्वापि । असें मानुनि नच हो कोपी । निजकृपालेशा ओपी । आम्हांवरि तूं भगवंता ।। शांत हो श्रीगुरुदत्ता... ।।३।। पुजाऱ्यांच्या हातून स्वारी ( उत्सवमूर्ती ) उतरणे आणि श्रीस्वामीमहाराजांच्या मुखातून श्रीदत्तप्रभूंच्या कोपाची अभिव्यक्ती होणे ह्या , अर्जुनाला युद्धाच्या आरंभीच होणाऱ्या मोहवश उपरतीसारख्याच प्रतिकात्मक आहेत. भगवदगीता ही जशी मानवमात्रांना आध्यात्मिक मार्गदर्शन करते, त्याचप्रमाणे ही करुणात्रिपदीही सर्वच दत्तभक्तांना इहपारलौकिक सुखाचे साधन ठरते. पुजाऱ्यांवरचा राग सर्वच संसारिकांना अनुभवाला येणाऱ्या दैवीकोपाचे प्रतिनिधित्व करतो. हा देवाचा राग खरा नसतो, तर कृत्रिम असतो. ते रागाचे नाटक मात्र असते. कारुण्यसिंधू अत्रिनंदन कधीतरी आपल्या भक्तांवर रागावतील काय ? विस्तवाला स्पर्श करू पाहणाऱ्याला बाळाला आई जशी रागावते, प्रसंगी मारतेही, तसाच भगवंत आम्हाला आमच्या अकल्याणापासून परावृत्त करण्यासाठी , आमच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी कठोर होतो. दुःखाचा अनुभव करवितो त्याच्या पोटी प्रेमच असते. संसारामधील सुखदुःखे आपलीच कर्मे असतात. ज्याअर्थी आपल्या जीवनात आध्यात्मिक , आधिभौतिक वा आधिदैवक दुःख आले आहे, त्याअर्थी ते आपलेच पाप मिळाले आहे. हे पाप प्रथम आपल्या बुद्धीत दुष्प्रवृत्तीच्या रूपाने येते. तीच दुःखाची वाट आहे. मानवमात्रांत पाप आणि पुण्य सारख्याच प्रमाणात असतात असे शास्त्रात सांगितलेच आहे. म्हणून ' आम्ही पापी ' असा शब्दप्रयोग श्रीस्वामीमहाराजांनी केला आहे. वरचेवर दुःखाचे अनुभव येऊनही, जोपर्यंत संचित पाप शिल्लक आहे तोपर्यंत पुन्हा पुन्हा त्याच चुका तो करीत राहतोच. ही मानवाची प्रमादशीलता ध्यानात घेऊन दत्तप्रभूंनी कोप न करता, ' होते एखाद्यावेळी चूक ! ' असा क्षमाशील विचार करून आमच्यावर आपल्या कृपेची स्वल्पांशानेही पखरण करावी. तीच आम्हाला सर्व प्रापंचिक कष्टांतून तारून नेईल, अशी प्रार्थना करायची आहे.

तव पदरीं असता ताता । आडमार्गीं पाऊल पडतां । सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दूजा त्राता । (चाल) निजबिरुदा आणुनि चित्ता । तूं पतीतपावन दत्ता। वळे आतां आम्हांवरता । करुणाघन तूं गुरुनाथा ।। शांत हो श्रीगुरुदत्ता... ।।४।। भक्ती म्हणजे देवाशी जुळणे, देवाशी संलग्न होणे. दास्य , सख्य , राग किंवा द्वेष अशा भावाने देवाशी संबंध जोडणे म्हणजेच भक्ती. असा एकदा संबंध जुळला की भक्त देवाच्या पदरात पडतो. देवाच्या परिवारात मिळतो. अशा रीतीने एकदा देवाच्या पदरी रुजू झाल्यावर त्याचा सर्व भार देवावरच पडतो. जे असे भगवंताला शरण झाले ते कृतार्थ होणारच ( ये त्वां शरण मापन्ना:कृतार्थ अभवन्हि ते II - दत्तभावसुधारस ) सर्व धर्मांचा परित्याग करून तू मलाच शरण ये, मी तुला सर्वपापांपासून मुक्त करीन, असे गीतेचे अभिवचन प्रसिद्ध आहे. जाणता अजाणता असा भक्त जरी वाकड्या वाटेला लागला, तरी त्या भक्ताला काळजीपूर्वक पुनश्च सन्मार्गावर आणणारा दत्तगुरुंवाचून दुसरा कोण आहे? त्या ' पतितपावन ' या बिरुदाचे श्रीदत्तप्रभूंना स्मरण देऊन श्रीस्वामीमहाराजांनी त्यांच्या कृपेची भीक मागण्यास सांगितले आहे. मग तो कारुण्यसिंधू सद्गुरूनाथ निश्चितच आपल्याकडे कृपाकटाक्ष करील.

सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हें घरदार । तव पदी अर्पुं असार । संसाराहित हा भार । (चाल) परिहरिसी करुणासिंधो । तूं दीनानाथ सुबंधो। आम्हां अघलेश न बाधो । वासुदेव प्रार्थित दत्ता ।। शांत हो श्रीगुरुदत्ता... ।।५।। प्रारंभी ज्या कौटुंबिक नात्यांचा निरास केला आहे, त्यांना इथे समारोपात संसारातून लादला गेलेला भार, असे म्हंटले आहे. जन्ममरणरूपी संसाराचे मूळ अज्ञानात आहे. अविद्याजन्य मोहानेच संसाराचा आभास उपजला आहे. मायेच्या आवरणशक्तीने जीव आपले खरे शुद्ध , बुद्ध अविनाशी ,अविकारी , आनंदमय चेतन स्वरूप विसरून जाऊन त्याच मायेच्या विक्षेपशक्तीने भासविलेल्या बुद्धी , मन , इंद्रिये आणि देहादिंनाच आपले स्वरूप मानून आभासात्मक पंचभौतिक जगतात हरवून जातो. देह म्हणजेच मी आणि त्याचे संबंधीच माझे अशा संमोहात तो सापडतो. त्यांचे मिथ्यत्व ओळखून त्यांचा निरास करण्याचा विवेक त्या मोहग्रस्त जीवाकडे नाही. अशा या संसारजनित (संसार + अहित ) आभासिक ओझ्याचा परिहार श्रीदत्तप्रभूच करूं शकतात. या ओझ्याखाली दबलेल्या हीनदीन शरणागताचा तोच खरा बंधू आहे. ' तुका म्हणे घालूं तयावरी भार I वाहूं हा संसार देवापायीं I ' या संतोक्तीशी जुळणारा उपदेश श्रीस्वामीमहाराज करीत आहे. आमच्या संचित , क्रियमाण आणि प्रारब्ध अशा सर्वही कर्मांतून सतत उद्भवणाऱ्या पापांची आम्हा आश्रित भक्तगणांना यत्किंचितही बाधा होऊ नये, यासाठी वासुदेव या मुद्रेने श्रीस्वामीमहाराज दत्तगुरूंची विनवणी करीत आहेत. षडैश्वर्यसंपन्न गुरुराज दत्तात्रेया, आपल्या कोपाचा उपसंहार करा आणि आमच्या चित्ताला आपल्या पदीं परमशांतीचा लाभ करून द्या.'

मूळ स्तोत्र : प. प श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित करुणात्रिपदी संदर्भ - श्री वासुदेव निवास, पुणे क्रमश:



Aug 10, 2020

जरी त्रिकाली म्हणसी ‘ करुणात्रिपदी ’ तरी - प्रस्तावना


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ 

आपत्ति येता श्रद्धापुर्वक | या त्रिपदीचे पाठ देख | एकविंशतिवर नि:शक | नित्य करिता एकनिष्ठेनें || ५० || आपत्तिचे होते निरसन | तसेंच व्याधिग्रस्तासि जाण | एकविंशतीवर नित्य श्रवण | दत्तत्रिपदी ऐकवितां || ५१ || व्याधीपासुनियां तो रोगी | मुक्त होईल जाणिजे वेगीं | परि श्रध्दा पाहिजे अंगीं | श्रध्देसमान फल लाभे || ५२ || करुणात्रिपदींचे हे फल | निवेदिलें भक्त हो सकळ | यास्तव त्रिपदें सर्वकाळ | दत्त दयाळ स्तवावा || ५३ || श्री गुरुमूर्ती चरित्र ( अध्याय- ९२) वरील ओव्यांत करुणात्रिपदीची महती समर्पकरित्या वर्णिली आहे. प.प.श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज रचित करुणात्रिपदी रोज म्हटल्याने श्री दत्तप्रभूंच्या कृपेची अनुभूती नक्कीच येते. श्रीदत्तप्रभूंची राजधानी म्हणून मान्यता पावलेलें श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील नित्यपूजेची व उत्सवांची सर्व पद्धत आणि आचारसंहिता-नियमावली स्वत: प. प. श्री. टेंब्ये स्वामींनीच आखून दिलेली आहे. त्या नित्य नियमांनुसार, चातुर्मासातील आषाढ पौर्णिमा ते दसरा हा अडीच महिन्यांचा काळ सोडता उर्वरित वर्षभर दररोज संध्याकाळी इथे श्रींची पालखी प्रदक्षिणा असते. आजही दररोज पालखीच्या तिस-या प्रदक्षिणेला तीन थांब्यांवर ही त्रिपदी म्हटली जाते. दत्तभक्तांसाठी, याच करुणात्रिपदीचे डॉ. वा. व्यं. देशमुख यांनी केलेले सुरेख विवरण इथे प्रकाशित करत आहोत. श्री. टेम्ब्ये स्वामींना अभिप्रेत असलेला करुणा भाव समजून घेऊन ही करुणात्रिपदी वाचल्यास भक्तवत्सल श्री दत्त महाराज आपल्या मनोकामना निश्चितच पूर्ण करतील. मूळ स्तोत्र : प. प श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित करुणात्रिपदी संदर्भ : श्री वासुदेव निवास, पुणे क्रमश:


Aug 3, 2020

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरातील थेट प्रक्षेपण


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

श्री दत्तात्रेयांचा आद्य अवतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी, उत्तरावतार श्री नृसिंहसरस्वती महाराज आणि तृतीय अवतार असलेले श्री स्वामी समर्थ यांनी अनेक स्थानी वास्तव्य करून तपाचरण केले. ही सर्व क्षेत्रे आज श्री दत्तप्रभूंची तीर्थक्षेत्रें म्हणून उदयास आली आहेत. त्यापैकी कुरवपूर, औदुंबर, श्री नृसिंहवाडी, गाणगापूर आणि अक्कलकोट आदि ठिकाणांचे दत्तभक्तांमध्ये विशेष माहात्म्य आहे. कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेलं श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथे श्री नृसिंहसरस्वती महाराजांनी १२ वर्षे औदुंबराच्या वृक्षाखाली तपानुष्ठान केले होते. त्यामुळे इथे औदुंबराला कल्पवृक्ष तर या अत्यंत जागृत स्थानाला ' दत्तप्रभूंची राजधानी ' असे संबोधले जाते. श्रींच्या प्रदीर्घ वास्तव्यामुळे आजही येथे दत्तभक्तांना त्यांच्या कृपेची अनुभूती येत असते. ह्या पावन क्षेत्राचे वर्णन करतांना प.प.टेम्ब्ये स्वामी कुमारशिक्षा या ग्रंथात म्हणतात - पूर्वी कृतयुगात कश्यप, अत्रि-अनसूया यांना ' मी तुमचा पुत्र होईन.' असे वरदान देऊन दत्तात्रेय पृथ्वीतलावर अवतार घेते झाले. हे पूर्वी घडले असेलही, परंतु तोच दत्तात्रेय कृष्णा नदीच्या काठी नृसिंहवाटीका इथे जागृतरूपांत वास्तव्य करून आहे. भक्तांचे अभिष्ट करण्यासाठीच तो इथे आला असून श्रद्धावंतास सत्वर प्रचिती देतो. औदुंबर वृक्षाखाली असलेल्या श्रींच्या पादुका पाषाणाच्या असून त्यांवर अनेक दैवी चिन्हें आहेत. श्री गुरुचरित्रांत त्यांचे वर्णन मनोहर पादुका असे केले आहे. विजापूरच्या आदिलशहाने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून श्री नृसिंह स्वामींना प्रार्थना केली होती. महाराजांच्या कृपेचा अनुभव येताच आदिलशहाने मंदिराचे बांधकाम करून दिले. त्यामुळे येथील मंदिरास कळस नाही. दत्तभक्तांच्या साधना, उपासना आणि भक्तीसाठी अत्यंत योग्य अशा या स्थानी दत्तभक्तीचा गजर सतत सुरू असतो. काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा, पवमान पठन, धूप-दीप आरती या दैनंदिन कार्यक्रमांबरोबरच पालखी सोहळा आणि त्यानंतर होणारी शेजारती आदि इथे पुजारीवर्गाकडून नित्यनियमाने होत असतात. शेकडो वर्षांपासून पिढ्यानपिढ्या ही दत्तसेवा काटेकोरपणें अव्याहत सुरु आहे. कृष्णामाईला पूर आला की, कृष्णेचे पाणी महाराजांच्या पादुकांना स्पर्श करते, तेव्हा दक्षिणद्वार सोहळा पार पडतो. दत्तमंदिरात पुराचे पाणी शिरले तरीदेखील सारे नित्य सोपस्कार पार पाडले जातात. अर्थात मंदीर पाण्याखाली गेल्यावर मात्र उत्सव मूर्ती टप्प्याटप्प्याने हलवली जाते. श्री टेम्ब्ये स्वामी, श्री रामचंद्रयोगी, श्री नारायण स्वामी, श्री मौनीस्वामी, श्री गुळवणी महाराज अशा अनेक तपस्वी आणि योगिजनांनी इथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते. चतुर्विध पुरुषार्थ । तेथे होय निश्र्चित । प्रत्यक्ष असे श्रीगुरुनाथ । औदुंबरी सनातन ॥ जया नाम कल्पतरु । प्रत्यक्ष जाणा औदुंबरु । जें जें मनीं इच्छिती नरु । साध्य होय परियेसा ॥ किती वर्णू तेथील महिमा । सांगतां असे अशक्य आम्हां । श्रीगुरु ' नृसिंहसरस्वती ' नामा । प्रख्यात असे परियेसा ॥ अशा ह्या अतिशय जागृत स्थानाचे दत्तभक्त आता कधीही दर्शन घेऊ शकतात. श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानाने श्री दत्त मंदिरातील Live दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दत्तभक्तांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा.

🌷🌷श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरातील थेट प्रक्षेपण ( LIVE DARSHAN ) 🌷🌷   


|| श्री गुरुदेव दत्त ||