Aug 19, 2020

कार्तवीर्योsर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् - २


|| श्री गणेशाय नमः || श्री दत्त समर्थ ||

यथावकाश नवमांस पूर्ण होताच शीलधरा राणीनें कार्तिक शु. सप्तमीला रात्रीच्या शुभवेळी एका पुत्ररत्नाला जन्म दिला. कार्तिकस्यसिते पक्ष सप्तभ्यां भानुवासरे । श्रवणर्क्षे निशानाये निशिचे सु सुभेदर्णे || ( स्मृति पुराण १५/३) कृतवीर्य राजाच्या पुत्राच्या जन्मसमयीं पाचही ग्रह उच्चीचे होते. साक्षात प्रभू दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने जन्मलेल्या त्या दिव्य बालकाच्या आगमनाने सारे ब्रह्माण्ड आनंदाने भरून गेले. अनेक शुभ संकेत सहजच सर्वच स्थानीं दिसू लागले. अत्यंत हर्षित झालेल्या कृतवीर्याने आपल्या प्रजेस धन, धान्य आणि वस्त्रे आदि यांचे यथायोग्य दान केले. ब्राह्मणांना विपुल गोदान आणि सुवर्णदानही केले. साधुजनांना प्रसन्न केले आणि त्या सिद्धांच्या मुखांतून त्या बालकासाठी 'आयुष्यमान हो, यशस्वी हो' असे अनेक आशीर्वाद येऊ लागले. राजानें ज्योतिष्यांना पाचारण करून नवजात बाळाचे जातक वर्तविले. ज्योतिषी लग्न पाहून त्या दैवशाली बालकाचे भविष्य अत्यंत प्रसन्न होऊन वदते झाले, दैवशाली हा कुमार । श्रीदत्तात्रेय कृपापात्र । तपोबळें पवित्र । होईल सर्वत्र प्रख्यात याचें घेतां नाम । नष्ट वस्तूचा आगम । स्मरतां करील आगम । हा वेदशास्त्रपारंगत होईल. अनंतव्रताचे फलस्वरूप म्हणून हा सप्तद्वीपांकित पृथ्वीचा सार्वभौम राजा होईल आणि पंचाऐंशी हजार वर्षें राज्य करील. सूर्यनारायणाच्या व्रतप्रभावाने ह्यास लक्ष वर्षांचे निरोगी आयुष्य लाभेल. हा जितेंद्रिय, सर्वदा विजयी आणि सर्वमान्य होईल. ज्योतिषांचे हे वचन ऐकून कृतवीर्य राजाने त्यांचा यथायोग्य सत्कार केला. पुढें, सोळाव्या दिवशी त्या बालकाचा नामकरण विधी करून त्याचे नाव अर्जुन असे ठेवले. कृतवीर्य राजाचा पुत्र म्हणून त्यास कार्तवीर्य असेही प्रजाजन संबोधू लागले. 

अर्जुन शुक्ल पक्षांतील चंद्राप्रमाणे वाढू लागला. राजगुरु गर्गमुनींकडून विद्याभ्यासाचे शिक्षण घेऊ लागला. थोडयाच काळांत तो सर्व शस्त्र-शास्त्रपारंगत होऊन युवराज्यपदास योग्य झाला. तथापि, दैववशात कृतवीर्य राजाचा वृद्धापकाळानें मृत्यू झाला. तेव्हा, राजगुरू गर्ग मुनी, प्रधानादि मंत्री गण आणि प्रजेनेंसुद्धा अर्जुनास तू आता राज्याची धुरा सांभाळावी आणि आपल्या राजधर्माचे पालन करावेस असा सल्ला दिला. तेव्हा अर्जुनाने मात्र राज्यपद स्वीकारण्यास नकार दिला. अधिक स्पष्टीकरणार्थ तो गर्ग मुनींस वंदन करून नम्रपणें म्हणाला, "गुरुवर्य, मला हे राज्य नको. मी त्यास मनापासून त्याज्य मानतो. राजाचे अधिपत्य सर्वमान्य असलें तरी अंतिम परिणाम अत्यंत कष्टदायकच असतो. जो राजा आपल्या प्रजेचे न्यायाने पालन करीत नाही, राज्यातील जनतेचे रक्षण करीत नाही अथवा अंगी सामर्थ्य असूनही जर राजाचे आचरण अनीती व अधर्मयुक्त असेल, तर तो राजा नरकवास भोगतो. यांवर तुम्ही मला हे सर्व तू जाणतोस तर आपल्या राजधर्माचें योग्य पालन कर असे जरी सांगितले तरी राज्य करतांना मला माझ्या सेवकांवर विसंबून राहावे लागेल. त्या राजसेवकांनी केलेल्या पापाचा एक चतुर्थांश हिस्सा सहजच राजाच्या मस्तकी पडतो. तेव्हा मी एकटा, स्वबळावर सर्वदा धर्मास अनुसरुन आणि न्यायपूर्वक राज्य करण्यास समर्थ झाल्याशिवाय हा राज्यकारभार कसा स्वीकारू ? " 

अर्जुनाचे हे बोलणें ऐकून गर्ग मुनींस अतिशय संतोष झाला. तसेच, या विशाल राज्याचा राजा म्हणून अर्जुन हाच योग्य आहे, याची खात्रीही त्यांना झाली. ते म्हणाले, " अर्जुना, तू हे जे काही बोललास ते अतिशय योग्यच आहे. तुला जर तुझ्या सेवकांवर अवलंबून राज्यकारभार करायचा नसेल तर तू योगाभ्यास कर. त्यांमुळेच तुला राज्याची धुरा समर्थपणे सांभाळता येईल. योगें नाना देह धरिसी । तूं एकला राज्य करिसी । मनोवेगें तूं फिरसी । सर्व जाणशील साक्षित्वें ॥" अर्जुनास असे योग्य मार्गदर्शन करीत गर्ग मुनींनी त्याला भगवान दत्तात्रेयांना शरण जाण्यास सांगितले. " जो या ब्रह्माण्डात ' योगीन्द्र ' म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याचे केवळ नाम उच्चारलें असता हा भवसागर सहजच पार होतो, जो योगसामर्थ्याने भक्तांचे सर्वदा रक्षण करतो, ज्याचे त्रिगुणातीत आचरण देवादिकांनाही अनाकलनीय आहे, आणि जो आपल्या भक्तांना इप्सित वर देतो असा स्मर्तृगामी, अत्रि-अनसूया यांचा नंदन श्री दत्तात्रेय यांची तू आराधना कर."    

ज्याचें नित्य गंगास्नान । माहूरीं करीं शयन । सह्याद्रीवरी आसन । करी ध्यान गाणगापुरीं ॥

कुरुक्षेत्रीं आचमन । धोपेश्वरीं जाऊन । करी जो भस्मधारण । संध्यावंदन कर्‍हाडीं ॥

कोल्हापुरीं भिक्षाटन । पांचाळेश्वरीं जाऊन । नित्य करी भोजन । विचित्राचरण जयाचें ॥

पंढरपुरीं जाऊन । नित्य सुगंध लेवून । पश्चिम सागरीं येऊन । करी अर्ध्यदान सायंकाळीं ॥

जो जो करील स्मरण । त्या त्या देई दर्शन । व्यापिलें जेणें त्रिभुवन । असो नमन तच्चरणा ॥

ज्याची लीला ऐकोन । तृप्त होती कान मन । त्याला कोण कां नमन । न करील जनमान्य जो ॥

श्री दत्तप्रभूंची अशी दिनचर्या आणि महती सांगून गर्ग मुनी पुढे म्हणाले, " अर्जुना, पण एक लक्षात ठेव. दत्त महाराजांना प्रसन्न करणे अतिशय दुष्कर आहे. मात्र निर्मळ चित्त असलेल्या भक्तांना ते सहजच प्राप्त होतात. ' तो भक्तीचा भुकेला । भक्ताधीन राहिला । अंतर न देतां भक्तांला ।' अशा त्रिभुवनव्यापी परमात्म्याला मी मनःपूर्वक नमन करतो.  ' जो मायाध्यक्ष होऊन । करी जग उत्पन्न ।त्याचें करीं पालन । जो स्वयें उदासीन निगर्व ॥ ब्रह्मरूपें उत्पादक । विष्णुरूपें पालक । रुद्ररूपें संहारक । करी एक तो सर्व ॥' अशा दत्तात्रेयांची कृपा आणि वरदान तुला लाभल्यास तू एकटाच स्वबळावर आपल्या इच्छेनुसार या सप्तद्वीप पृथीवर अधिराज्य करू शकशील. ' तो देईल तुला धृती (धैर्य)। तो देईल नाना शक्ती । भावें करीं त्याची भक्ती । दे जो सन्मती मुक्तिदाता ॥ जें जें मनीं आणसी । योगप्रभावें तें मिळविसी ।' तेव्हा तू सत्वर सह्याद्री पर्वतावर जाऊन दत्तात्रेयांची आराधना कर. 

गर्गमुनींचा हा उपदेश ऐकून अर्जुनाने सदगदित होऊन त्यांना वंदन केले आणि त्यांना अतिशय कृतज्ञतापूर्वक स्वरांत म्हणाला, " गुरुवर्य, या राज्याची धुरा सांभाळण्याची योग्यता मला प्राप्त व्हावी, यासाठी आपण मला दत्तप्रभूंच्या भक्तिचा मार्ग दाखविला, हा आपण माझ्यावर मोठाच अनुग्रह केला आहे. श्री दत्तात्रेयांचे अदभूत चरित्र ऐकण्यास मी अतिशय उत्सुक झालो आहे. आता माझी एकच प्रार्थना आहे की आपण मला हे परम पावन दत्तचरित्र सांगावे. इंद्र-जंभासुराची कथा, इंद्राची आराधना मला विस्तृतपणें निवेदन करावी. देवेंद्रावर दत्तप्रभूंनी कशी कृपा केली ?" 

' मग मीही करीन । श्रीदत्ताचें सेवन । जेणें होय प्रसन्न । देईल वरदान श्रीदत्त ॥' 

क्रमश:


No comments:

Post a Comment